वान्या - 'त्याच्या' शब्दात - भाग ७

Submitted by bedekarm on 9 April, 2008 - 11:01

वानूचं खरखरं खोल नातं त्याच्याशी. वानूचं हिंडवणं, फिरवणं, औषधपाणी, काळजी सगळं काही तोच करतो. मी थोडी दूरच. माझ्यावर येउन पडलं आणि दुसरा पर्याय नसला तर मी वानूची सेवा करते. वानू हल्ली चालताना धडपडायला लागलाय. जिन्यावरून धाडधाड जाता येता पडला असावा बहुधा. त्याच्या कमरेतील जोर कमी झालाय. चालताना कोलमडायचा मधेच. पण अजून रग कायम होती. शिवाय लहानपणच्या दुखण्यात त्याची श्वसनसंस्था नाजूक झाली होती. गेली दोन वर्ष त्याला दम्याचाही त्रास होतो. माझी खास मैत्रिण वीणा घरी आली होती एकदा. मला म्हणाली मीना, तुला वान्यामुळे दम्याचा त्रास होत असेल. तर मी म्हणाले, छे, ग, माझ्यामुळेच त्याला त्रास होतो. ती खूप हसली म्हणाली, सांगू नको कुणाला. कुणी येणार नाही बघ तुझ्याकडे. तर वानूच्या असल्या सगळ्या दुखण्यामधे तो वानूची सेवा करतो.

वानूवर लिही म्हणून मी खूपदा मागे लागले त्याच्या. पण कामाच्या व्यापात त्याने काही मनावर घेतले नाही. छान छान बोलायचा. लिहून काढायला पाहिजे त्यानं अस वाटायच. शंतनूच्याही मागे लागून पाहिलं. पण एवढे थोर्थोर चरित्रलेखक नसावेत वानूच्या नशीबात. मीच लिहीन अस कधी मनातच नाही आलं. हातात कॉम्पुटर आणि नेटवर मायबोली मिळाली आणि लिहीतच सुटले मी. पण वानूच्या अपघाताच मात्र त्यानच लिहावं असं वाटल मला. काल सुट्टी होती तर अक्षरशः टेबलावर बसवून लिहायला लावल त्याला.

वानू --त्याच्या शब्दात ---

"शंतनूच्या फ्लॅटच्या खरेदीच काम आटपून पुण्याहून मी, मीना आणि शंतनू संध्याकाळी परतीच्या प्रवासाला लागलो. चार-पाच तासांचा रस्ता. पोचायला एक तासभर शिल्लक असताना रश्मीचा-माझ्या भाच्याच्या बायकोचा- मोबाइल आला, 'मामा, तुम्ही पोचताय ना रात्री १०-१०.३० पर्यंत? अहो, वानूला जीपची धडक बसली आणि मागच्या पायाला लागलय. आत आणून ठेवलय तुमच्या अंगणात.' मी पोचतोच म्हटलं. माझ्या फोनवरच्या केंव्हा, कधी, कुठे, किती अशा प्रश्नांवरुन आणि गाडीतल्या शांततेवरुन मीना आणि शंतनूला साधारण काय घडलय कळलच. अशा वेळी माझी खास सवय, मी एकदम गप्पच होतो. म्हणालो, फास्ट चला, लवकर पोचायला हवं. डोळ्यासमोरुन वानूचे आत्तापर्यंतचे बाहेर भटकण्याचे, आणि त्यातून हमखास उद्भवणार्‍या मारामार्‍या, इनफेक्शन्स, न्युमोनिया, आजारपण, या सार्‍याचे असंख्य प्रसंग तरळून गेले. पण जीपची धडक हे नवीनच होतं. बघू पोचल्यावर. सगळेच नि:शब्द.

रात्री अकरा वाजता पोचलो. व्हरांड्याजवळ अंगणात वानू निपचित पडला होता. जवळ बसलो तर शेपूट हळूहळू हलवू लागला. डोळे अर्धवट उधडलेले. डोळ्यात वेदना आणि सुकलेल्या पाण्याचे ओघळ. हळूच डावा पाय उचलला तर थोडासा विव्हळला. पंजा मिटून घेतला होता त्याने. जास्वंदीच फूल रात्री मिटून घेतं स्वतःला तसा. जबर मार बसल्याचं लक्षण. बाकी तपासणी केली तर गळ्याजवळ आणि पायाला जखमा आणि ताजे लालसर ओरखाडे. ही तर मारामारी आणि नक्कीच जीवावर बेतलेली. प्रथम क्रोसिन आणि दुसरी एक पेन किलर टॅब्लेट पाण्यात विरघळवून त्याला घातली. वान्या औषध घ्यायला कधीच त्रास देत नाही. खुशाल एकानं दोन्ही हातानी जबडा उघडायचा आणि दुसर्‍या कुणीही लिक्वीड फॉर्ममधील औषध, गोळ्या, सायरप काहीही तोंडात ओतायचं. बस. किंवा त्यात डिप केलेला टोस्ट किंवा ब्रेड स्लाइस पुढे ठेवायची. खाउन टाकतो. कदाचित नाही, तर माझा ठाम विश्वास आहे की आपल्याला औषधानी बर वाटतं, दुखण्याचा उपचार होतो, हे त्याला नक्की समजत. त्याचे डॉक्टरही म्हणतात की अस कुत्र बघायला मिळत नाही. मी जवळ बसून त्याची पाठ आणि पाय चेपायला लागलो तर तशाही स्थितीत डोळ्यात पाणी आणून, जीभ बाहेर काढून हात चाटायचा प्रयत्न करु लागला. वानूची रिऍक्शन नेहमी इमिजिएट असते. अगदी रोख. चांगली सुद्धा आणि आमच्यासह कुणाच काही चुकल असल तर वाइटसुद्धा! म्हणजे दार उघडं मिळालं तर पळून जाणे वगैरे. उधारी नेहमी आमच्यावरच राहते.

तेवढ्यात आमची चाहूल लागून शेजारचे भटसर बाहेर आले आणि थोडक्यात वृत्तांत सांगितला. संध्याकाळी सातच्या सुमारास साहेब बाहेर सटकले होते. हल्ली त्याची कंबर थोडी अधु झाल्याने, पळण्याचा वेग, मारामारीच्या प्रसंगातली चपळता, आक्रमकता आणि ताकद कमी झाली आहे. नाहीतर आत्ताआत्तापर्यंत तो या परिसरात अजिंक्य होता. कुठे गेलाच तर इतर कुत्र्यांकडून त्याला धोका होईल अशी भितीच नव्हती. तर भटकून परत येताना त्याचा, पलिकडच्या परंपरागत रायव्हल्च्या नेतृत्वाखालच्या सात-आठ कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला आणि त्याला आमच्या बंगल्यासमोरच गाठून घेरलं. पूर्वीचा वानू असता तर सर्वांना पुरुन उरला असता. आम्ही पूर्वी म्हणायचो, वानूचे मागचे पाय आणि हिप्सवर कधीच जखमा नसतात. वीराच्या पाठीवर वार नसतात तसं. निदान तो चपळाईने आमच्या कंपाउंडमधे तरी घुसला असता. पण त्यांनी त्याला गाठलं आणि घेरलं, चावाचावी सुरु झाली. तोवर मागून एक जीप आली आणि रस्त्याच्या मध्यात सुरु असलेल्या लढाईमुळे थांबली. ती संधी साधून वानू बचावासाठी तिच्या खाली घुसला. ड्रायव्हराला वाटलं की तो पलिकडे गेलाय म्हणून तो हळूच पुढे निघाला. तर हा मागच्या चाकाखाली सापडला. जीप पुढे निघून गेली. शेजार्‍यांनी मिळून इतर कुत्र्यांना हाकललं. वानूला माझ्या मेव्हण्यांनी उचलून कसबस आत आणून ठेवलं. आणि आत्ता आम्ही पाहत आहोत अशी अवस्था होती. सकाळपर्यंत थांबणं भाग होतं. तो ही आता ग्लानीत पडला होता.

सकाळी आठ वाजताच उचलून त्याच्या म्हणजे सरकारी दवाखान्यात नेला. आमच्या येथील डॉक्टर्स आणि स्टाफ फारच चांगला आहे. (आमच्या गाड्यांच्या मागच्या सीटवरून माणसांपेक्षा वानूनेच जास्त प्रवास केला आहे. हे लोकांना माहीत नाही म्हणून ते मागच्या सीटवर बसतात इतकचं) तपासणी-एक्स्-रे-हिप जॉइंट्जवळच्या मांडीच्या हाडाला फ्रॅक्चर. गळ्याजवळ चावल्याची खोल जखम आणि इतर जखमा, त्यावरची इंजक्शन्स. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे लगेच इंजक्शन्स आणून पाच-सहा टोचण्या झाल्या. वान्या चुपचाप. त्याच तोंडही बांधावं लागत नाही कधी. डॉक्टर म्हणाले मांडीचं हाड मोडलयं. शेपूट धरून सपोर्ट केलं तर तीन पायावर लटपटत कसबस उभा राहू शकत होता. सोडलं की कोलमडायचा. विचारलं तर डॉक्टर म्हणाले, बघू थोडी सुधारणा झाली की खुरडत सरकू शकेल. ठीक. पुढे? ..अं.. नाही, बहुतेक तितपतचं--डॉक्टर.

सो हार्ड टु बिलिव्ह. हार्ड टु ऍक्सेप्ट. वानू, तू असा जगणार, तुला अस जगवायचं? हळूच उचलून गाडीत मागच्या सीटवर ठेवलं. मी आणि शंतनू दोघांनी मिळून. उद्या शंतनू परत जाइल आपल्या उद्योगाला दूरवर. मग मी एकटाच. अलिकडे खूप दिवसात वान्याला उचलून हलविण्या-वागविण्या इतके मोठे आजारपण झाले नव्हते. लहान असताना त्याला औषध घालायचं, त्यानं उलटी करू नये म्हणून उचलून लहान मुलासारखं खांद्यावर टाकून फेर्‍या मारायच्या आणि फिरता फिरता औषध पोटात पोचल्याची त्याच्या पातळ नाजूक गुलाबी पोटाला कान लावून गुडगुड ऐकायची. मग त्याला हळूच खाली सोडायचं. पण मग तो चारही पायांवर फिरायचा घरभर. आणि आता हा येवढा मोठा झालाय. कसं उचलायचं याला. तेही करीन पण हा आता चालणार नाही. खुरडणार म्हणे. इंपॉसिबल. मला नाही सहन होणार. हा तर अनभिषक्त सम्राट. रस्त्यांवरून चालला तर समोरून येणारी कुत्री शेपूट घालून हळूच रस्त्याच्या कडेने सटकतात आणि धूम पळत सुटतात. मोठ्या घोळक्याकडे पळत सुटला की प्रथम सैरभैर होतात आणि हळूहळू याच्या भोवती शेपट्या हलवत सलगी करत येतात. डोंगरा-माळावर तळ्यावर गेलं की हा वारं पिऊन धिंगाणा घलतो. नवख्याची आणि चोरा-चिलटांची घराच्या जवळ फिरकायची हिंमत नाही. घराभोवती गोफण फिरावी तसा गोल गोल रात्रंदिवस फिरतो. आणि याच्या भितीनी झाडांवर पक्षीही कमी उंचीवर घरटी बांधत नाहीत. कंपाउंडखालून खड्डे काढून जाण्याची आणि गेटवरून झेप घ्यायची ताकद याच्या पायात. आणि आता हा खुरडणार? हे अस नाही चालणार. त्याला, का अधिकतर मला? मनात दुष्ट वाइट विचार यायला लागले. वानू, असं न जगायला मी तुला मदत करू? अस काही बोलल तर पूर्वीचे म्हातारे डॉक्टर रागावायचे. झापायचे. म्हणायचे, असं बोलायच नाही. आताचे तरुण नवीन होते. त्यांनीही असच म्हणावं अशी सुप्त इच्छा मनात ठेवून चाचपडत बोललो तर म्हणाले, पाहू थोडे दिवस वाट. अंगावर काटा आला. असं कसं बोलतात हे? विचारशक्ती ठप्प झाली. त्याच सगळ करत होतो पण आता पूर्वीचा उत्साह नव्हता.

अशातच तीन दिवसांनी वानूच्या व्हेटरनरी डॉक्टरांचा -डॉ.डोकेंचा फोन आला. मी (माणसांच्या) ऑर्थोपेडिक सर्जन मित्रांशी एक्स्-रे दाखवून केस डिस्कस केली आहे. ते दुपारी तीन वाजता येत आहेत. त्याच्या पायात स्टीलचा रॉड वगैरे टाकून सर्जरी करु असं ते म्हणतायत. ते स्वतः सर्जरी करणार आहेत. वानूला घेउन या. विश्वासच बसेना. सगळी कामं गुंडाळून वानूला घेऊन दोन वाजताच पोचलो. माणसांचे डॉक्टर चंद्रपट्टण (ऑर्थो सर्जन) आले. सर्व इंस्ट्र्मेंटस, साहित्य भरलेल्या दोन बॅग घेऊन जनावरांच्या दवाखान्यात. तिथल्या म्हातार्‍या सहाय्यक कर्मचार्‍याने ते सामान आत घेतले. मी ही थिएटरमधे गेलो वानूला घेऊन. म्हणाले त्याचे तोंड बांधा. म्हटलं, अहो तुम्ही काही करा, मी त्याच्या जवळ उभा राहतो, तोंड नाही बांधावं लागत. डॉक्टर(शहाणे आहात अस नजरेनं म्हणत, उघडपणे) म्हणाले, तसं नको, त्याला भूल द्यायची आहे. मी तोंड बांधल्यावर वानूला आडवं पाडल तर वानू केविलवाणेपणाने माझ्याकडे बघून डोळ्यातून पाणी काढू लागला. इंजेक्शन्स देऊन तो बेशुद्ध झाल्यावर डॉक्टरांनी मला बाहेर काढले. दोन तास आत सर्जरी चालू होती. सामान, औषध अस आत बाहेर होत होतं. डॉ.चंद्रपट्टण बाहेर आले. त्यांच्य समानाच्या बॅगा गाडीत गेल्या. मी अधीरपणे पुढे गेलो. म्हणाले, ठीक झालय. पाहू सुधारणा कशी आणि कितपत होते ते. त्याला जास्त हालचाल करु देउ नका. आणि जखम चाटू देऊ नका. काळजी घ्या. डॉक्टरांना ते माणसांचे नावाजलेले ऑर्थोपेडिक सर्जन असूनही वानूसाठी आले हे नवल बोलून दाखवलं तर म्हणाले, अहो त्याच्या डॉक्टरांनी त्याचं आणि तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांच आणि तुमचं त्याच्यावरच्या प्रेमाचं इतकं कौतुक केलं की मला यावसच वाटलं. त्याच्यासाठी मला रडू येऊ लागल. माझ्या खांद्यावर हलकेच थोपटून शुभेच्छा देत डॉक्टर निघून गेले. वानू शुद्धीवर आल्यावर सगळ्यांचे आभार मानून मी त्याला घेऊन घरी आलो. सकाळी तो थोडा फ्रेश झाला. आणि मोठा प्रोब्लेम झाला. वानूने जखमेवरचे बँडेज काढून टाकून जखम चाटायला सुरुवात केली. तोंड बांधल तर फटीतून जीभ बाहेर काढून चाटायचा. मस्त युक्ती सुचली. थम्सअपची प्लॅस्टिकची रिकामी बाटली निम्म्यात कापून तोंडाकडचा भाग घेतला. कापलेल्या कडेच्या धारेवर टोचू नये म्हणून मऊ कापूस गोल बसवून त्यावर चिकटपट्टी लावली. परस्पर विरुद्ध बाजूला परिघावर आतल्या बाजूला लोखंडी खिळा तापवून भोके पाडली. त्याच्या भोवती बाटलीला तशीच खूप भोके पाडली. बाटलीच बूच काढून टाकल. वरच्या बाजूच्या दोन भोकातून मऊ जाड दोरी घातली. आणि वानूच्या तोंडावर बाटलीचा कापलेला भाग आणि निमुळता भाग चोचीसारखा तोंडाकडे पुढे असा बसवून दोरी कानामागून मानेवर बांधून टाकली. काम फत्ते. फक्त खाण्यापिण्याच्या वेळेला सोडायचं. दुसर्‍या दिवशी अशा थाटात वानूला घेऊन दवाखान्यात गेलो तर डॉक्टर बघून थक्क झाले. म्हणाले आम्हाला कुणालाच हे आत्तापर्यंत सुचल नव्हतं. सगळ्या कुत्र्यांच्या मालकांना कुत्र्यानं जखम चाटणं हाच फार मोठा प्रोब्लेम असतो. तुम्ही कमालच केलीत. आता याच पेटंट घेऊन सप्लायच सुरु करा. मी म्हटल, तुमच्याकडच्या सहाय्यक कर्मचार्‍यांनाच ते डिव्हाइस तयार करून विकायची परवानगी द्या.

अस सगळं होऊन आठ दिवसात वानू चक्क चारही पायांवर चालू लागला. त्याच्या दवाखान्यातील सहाय्यक इरकर म्हणाले, साहेब तुम्ही लै पैसं घातलं माणसालाबी इतकं घालत नाहीत. आणि लै केलत बी. तेला येश आल. मी म्हणालो, तस काही नाही. प्रयत्न आणि सदिच्छा तुम्हा सार्‍यांच्या आणि डॉक्टरांच्या, आणि आपल्याला यश द्यायची जिद्द वानूची.

वानूचे पाय चेपताना बिच्चारा इमानदारीत प्रेमानं हात चाटायला बघायचा. पण बाटलीत तोंड बंद असल्याने चाटता यायचं नाही. मग बाटलीसह तोंडच हातावर घासायचा. वानू दुखण्यातून हळूहळू बाहेर पडायला लागलाय. घराभोवती फिरू लागेल. वेग मंदावलाय. पण काहीच बिघडत नाही. वानूचा दरारा कधीच कमी झाला नाही. वानू मर्यादित क्षेत्रात का होइना पण पुन्हा सम्राट होइल. बसल्या अवस्थेतून उठताना थोडा त्रास होतोय. दुखत असेल. वयही होत चाललय. पण वानू पुन्हा उभा राहील. अजून खुरडतोय. मधनच उभा राहतोय. आता जखमही भरत आली आहे.

वानूची सेवा शुश्रुषा मी करत असताना मीना नेहमी दुरुन बघत असते. ती मजेत असताना चेष्टा पण करते. पण ती आजारी असताना मी माझ्याच नादात असतो आणि कामात असतो. आणि तिची काहीच विचारपूस करत नाही, तेंव्हा अगदी रागाने कळवळून म्हणते, 'जरा तरी माझी काळजी विचारपूस करा. त्या वान्याचं आजारपणात इतकं करता. माझं का करावसं वाटत नाही? तुमच्या घरात माणूस म्हणून येण पाप आहे. निदान मला तुमचा कुत्रा तरी समजा.'मला कळतच नाही काय बोलावं, कस वागावं. 'वान्याशी तुलना? काहीतरीच काय', अस मोठ्याने आणि 'सॉरी, नॉट अलाउड' अस मनातल्या मनात म्हणतो. मग तीच अगतिकपणे म्हणते-तेवढ कुठलं आलय आमचं भाग्य?-

पण आठच दिवसात जे काही घडलं ते मात्र अनपेक्षित होतं.

क्रमशः

गुलमोहर: 

सुन्दर!! पण वाचताना डोळ्यातून पाणी येते. वानू नाव कसे ठेवले? काही अपभ्रंश, किंवा कशाचा शॉर्टफॉर्म?
गंमत म्हणून सांगते, माझ्या मैत्रिणीचे आडनाव रायते आहे तर त्यांच्या कुत्र्याचे नाव राकू!! रायत्यांचे कुत्रे - याची अद्याक्षरे. मी पण हातात कॉम्प. आणि त्यात मायबोली ...........तुमच्यासारखेच माझे झाले आहे.

एमेम तीन्तीन्त्तीन, तू पहिला भाग नाही का वाचलास. त्यात वानू या शब्दाची व्युत्पत्ति आणि रशियन भाषेतील त्याचा अर्थ (?) दिलेला आहे.

बाहेर...नि:शब्द. (मनात - वान्या बरा होरे बाबा लवकर....'ते' ही कसले कसलेले लिहिणारे आहेत.)

सगळे बेडेकर कुठल्या चक्कीचा आटा खातात? थोडा थोडा पार्सल करून सर्व होतकरु लेखकांना पाठवा पाहू. सगळेच अगदी जबरदस्त लिहिता आहात. वानू मोठा नशिबवान यात शंका नाही.

अ॑प्रतिम हिरा आहे तुमचा वानु...आणि तुमचे सर्वान्चे श्वान प्रेम देखिल...

शोनूला अनुमोदन!
सर्व भाग एका दमात वाचून काढले.. काय सशक्त लिखाण आहे.. आणि 'वानू' तर सुपरहीरोच आहे.. त्याच्या फोटोंमुळे सगळं रीलेट करता येतंय..
अप्रतिम लेखमाला..

खरं तर शंका विचारल्यावर वाटलंच होतं की आपण १ ला भाग वाचला नाही , त्यात नक्की असणार नावाची व्युत्पत्ती. आता वाचते.
चल भेटू!

सर्व लेख काल एका दमात वाचून काढले. केवळ अप्रतिम. मी आणि माझा लेक दोघेही प्राणी प्रेमी! त्यामुळे प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आम्हाला नेहमी जवळचे वाटतात्...आपल्यातले वाटतात! लेकाला सर्व लेख वाचून दाखवले. (त्याला मराठी वाचनाचा कंटाळा) आम्ही दोघेही वान्याचे 'पंखे' झालोय.

तुमची लेखनशैली फारच छान आहे. आणि वान्याही तितकाच जीव लावणारा आहे.

पुढच्या पोस्टची वाट बघतोय आम्ही दोघे!

शोनू तुला अनुमोदन. सगळेच बेडेकर अप्रतिम लिहीतात.

किती छान लिहिताय सगळे.... लवकर लिहा पुढे...