लाख मोलाची गोष्ट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लाख मोलाचे क्षण.
खरच असे लाख मोलाचे क्षण.....
२६ जुलैच्या पावसात असे लाखमोलाचे क्षण नाही तर अनेक तास मे अनुभवलेत. पण सगळ्यात लक्षात राहीली ती केवळ २७ जुलैची संध्याकाळ. मुंबईत पाउस झाला तो २६ ला पण आमच्या कळव्यात मात्र त्याचा फटका बसला २७ ला.
मी आणी संघाचे काही स्वयंसेवक २६ ला रात्रीपासुनच गावात फिरत होतो. स्टेशनजवळच्या तलावाचा बंधारा वाहुन गेला होता.पाणी वस्त्यांवर शिरलेलं. २७ ला सकाळ पर्यंत आम्ही सतत कंबरभर पाण्यात होतो.सकाळी पाउस उघडला.पाण्याचा जोरही कमी झाला होता. आग्नीशनमचे लोक आले. सरकारी मदत पोहोचायला लागली म्हणुन आम्ही जरा विश्रांती घ्यावी म्हणुन घरी गेलो.
रात्रीच्या पावसानी उल्हास नदीचा ड्याम भरला आणि २७ ला सकाळी त्याचे सर्व दरवाजे उघडले गेले होते . ते पाणी फुल फोर्स नी कळवा खाडीत पोहोचतं होत. २६ला रात्रभर बाहेर अडकलेले कळवेकर गावात पोहोचत होते आणि अक्षरश: कपाळाला हात लावुन बसले होते. या पुराच्या पाण्यानी पार घरापर्यंत पाठ सोडली नव्हती.
दुपारी ४ वाजता खाडीतल्या पाण्याचा कहर सांगत माझा मित्र अनुराग घरी आला.मनिषानगर भागातल्या सगळ्या इमारती १ल्या मजल्या पर्यंत बुडाल्या होत्या. धावत तिथे पोहोचलो. गळाभर पाण्यातुन चालत आत पोहोचलो. अक्षरश: बोटीतुन सामान आणि माणसांची ने आण चालली होती. वाटेत कोणी तरी म्हणालं अरे आघारकर कांकांच घर ही १ल्याच मजल्यावर आहे .आणि त्या खाडीच्या थंड पाण्यातही अंगावर काटा उठला. कांकांच वय ७० च्या पुढेच . तस एकदमं जुन खोड. पण माणुस फार मानी आहे. कर्करोगाने शरीर पोखरलेले तरीही ताठ मानेनी वागणारा.
मी, अमित, अनुराग तसेच काकांच्या घराकडे वळलो. खरोखरीच १ल्या मजल्यावर पाणी पोहोचलं होतं. सुदैवानी काकांच्या घरात दिवा दिसला, खालुनच आवाज दिला. काका बाल्कनीत आले. मी म्हट्ल"काका खाली उतरा पाण्याचं काही खरं नाही. आम्ही तिघे आहोत सोडतो तुम्हाला बाहेर मेन रोडला" त्यांचा काही जीवं होइना. म्हणाले "अरे मी वरच थांबतो".आमचा नाइलाज झाला पाण्याचा जोर वाढला होता परत मागे फिरण भाग होतं. चार पावलं माग गेलो तर काकांनी सांगितल "अरे सकाळपासुन खाली गेलो नाहीये, दुपारचा ड्बा ही आणलेला नाही. जरा दुध आणी ब्रेड तरी वर देता आला तर बघ ना". मी म्हणालो "बघतो".
शर्थ होती या माणसाची . १२ तास भुकेलेला हा माणुस स्वत:च अर्ध पाण्यात बुडालेलं घर काही सोडायला तयार नव्ह्ता. आम्ही परत मागे फिरलो. जवळ पासची सगळी दुकान एक तर बंद होती किंवा पाण्याखाली. तसच परत गावात फिरलो.एका ओळखीच्यांकडुन दुकान उघडुन ब्रेड दुध घेतल.काकांच्या घरापर्यंत पोहोचलो. ब्रेड-दुधाची पिशवी मी डोक्यावरच्या रेनकोटाच्या टोपीत बांधली होती. गळाभर पाण्यातुन वाट काढत बिल्डींग पर्यंत पोहोचलो आता खरी कसोटी होती. कारण जिने दिसत नव्हते, अमित आणि अनुरागला सांगितल "तळमजल्याच्या ग्रिलला धरुन रहा मी पाण्यात पडलो तर पटकन बाहेर ओढा रे कारण मला फारसं पोहोता येत नाही". तसाच कांकांना आवाज दिला "बाल्कनीत या, ग्रिल मधुन सामान देतो". ग्रिल, बाल्कनीचा सज्जा, असं करत वर पोहोचलो आणी एकदाचं ते सामान त्यांच्या हातात दिलं. काकांनी ते बाजुच्या कट्ट्यावर ठेवलं आणि त्या ग्रिल मधुन चार बोट माझ्या अर्ध्या ओल्या कपाळ्पट्टीवर ठेवली म्हणाले "अन्नदाता सुखी भव!!" ते एकलं आणि माझ्या डोळ्यातं टचकन पाणी आलं. पाणी ,घामानी रग लागुन हात सुटला आणी मी पाण्यात पडलो ते डोळ्यातले अश्रु खाडीच्या पाण्यापेक्षाही खारट जाणवले. पण कानात साठवलेलें ते ३ शब्द मात्र लाख मोलाचे होते.

विषय: 
प्रकार: 

छान

Pages