पाऊसवेडी !

Submitted by के अंजली on 4 July, 2010 - 11:06

तुझं बरयं!
तुला पाहिजे तेंव्हा यावं
पाहिजे तेंव्हा जावं
बरसलं तर बरसावं मनसोक्त
नाहीतर नुसतच शिंपून जावं!
नाहीतर नसतच उंडारावं
रानोमाळ उगाचच
सरींच्या गळ्यात गळे घालून..
प्रेमात असतोस ना त्यांच्या..?

माझं नाहीये रे तसं..
तू येतोस तेंव्हा पहाते मी,
पीठमाखल्या हातांनी
खिडकीची कवाडे सताड उघडून
चिंब डोळ्यात तुला भरुन घेते
भाजीला फोडणी देताना
चूर्रर्र येणार्‍या आवाजातही
माझे कान तुझचं गाणं ऐकत असतात..
मातीचा गंध श्वासात भरून घेताना
भान गोठून जातं माझं!..
पण तुला भेटायला तेंव्हा
मी नाहीच येऊ शकत
घरातल्यांना खाऊ घालायचं असतं ना!

स्वंयपाकपाणी आटपून
संध्याकाळची जरा लवकरच
घराबाहेर पडते
छत्री न घेताच..
(छत्री उघडली की पाऊस जातो म्हणे!)
तू भेटशील म्हणून रेंगाळत पावलं टाकते..
भाजीवालीशी जरा जास्तच घासाघीस करते..
पण आता तू रुसलेला!
केसातल्या मोगरीला सुद्धा शिंपत नाहीस..
खट्टू होऊन मी घरी जाते..
तुझी आठवण उशाला घेऊन निजून जाते

मग अचानक वर्षासहलीची टूम निघते!
तुला भेटायला पुन्हा रानावनात हुंदडतो त्यात मीही..
जिथे तिथे धबधबे उत्साहात कोसळत असतात
माणसांचे नी पाण्याचे
तु मात्र कुठेच दिसत नाहीस..

मी थोडी अलीप्तच असते
दाटून आलेले ढग..
कुंद वातावरण..
फक्त तुझीच उणीव असते..

आमची निघायची वेळ होते
सारा बाडबिस्तारा आवरून
आम्ही चालू लागतो,
जड मनाने अन रेंगाळत्या पावलांनी
मीही चालू लागते..

एका वळणावर मागे पहाते
भरल्या डोळ्यांनी
तुझी चाहूल घेते.....

....न रहावून तू अचानक
तीरासारखा येतोस
गच्च मिठी घालून
अनावर बरसू लागतोस...

माझ्या देहावर तुझ्या
सरींची नक्षी उमटू लागते..
मला तळाशी खेचून पाणी काठावर येते...

आता...?
तुझ्या अस्तित्वाचे थेंब
माझ्या ओंजळीत असतात
आणि सर्वस्वाने वेढलेले
तुझे श्वास भाळी असतात!!

गुलमोहर: 

क्या बात है!!
खूप छान कविता!!

<<मी थोडी अलीप्तच असते
दाटून आलेले ढग..
कुंद वातावरण..
फक्त तुझीच उणीव असते..

आता...?
तुझ्या अस्तित्वाचे थेंब
माझ्या ओंजळीत असतात
आणि सर्वस्वाने वेढलेले
तुझे श्वास भाळी असतात!!

अप्रतिम कविता..........!

भावना छान मांडलीय.
आणि सर्वस्वाने वेढलेले
तुझे श्वास भाळी असतात!!>>>>
भाळीऐवजी दुसरे काही अजून रूतून राहिले असते का?

गंगाधरजी,गणेश, रेव्यु,भ्रमर,किरणकुमार, अनंत,चिन्तामणी,अलका आणि उमेश
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद!

उमेश आपला प्रश्न मला कळला नाही

"तुला पाहिजे तेंव्हा यावं
पाहिजे तेंव्हा जावं
बरसलं तर बरसावं मनसोक्त
नाहीतर नुसतच शिंपून जावं"
.......मस्त आहे.... Happy

सु रे ख ! मस्स्स्स्स्स्स्स्स्त !

मानसी आणि आरती धन्यवाद!
उमेश, कवितेतली नायिका पावसाच्या मिठीत आहे म्हणून त्याचे श्वास तिच्या भाळी किंवा माथ्यावर अशी कल्पना!

ओह, मला तेथे तुझे श्वास माझ्या उरी असतात असे असावे असे वाटले.असो. त्रासाबद्दल क्षमस्व.

के अंजली !
आता आम्ही बापडे या पावसावर काय बोलणार ?
पाऊस(थेंब)वेडी कविता !
Happy
....न रहावून तू अचानक
तीरासारखा येतोस
गच्च मिठी घालून
अनावर बरसू लागतोस...

सध्या पाऊस पण बिघडलायं म्हणतात हेच खरं .....(अचानक आल्यामुळे!)

Pages