सिंधूचा बाप

Submitted by dreamgirl on 1 July, 2010 - 07:50

आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे...

ग्रॅज्युएशनपर्यंत चौकटीतलं आयुष्य जगत होते. चौकटीतल्या परीघाला स्वतःचं जग समजून सुखी होते. डिग्री, मग नोकरी आणि मग लग्न- सगळं कसं चौकटीसारखं आखीव्-रेखीव. लग्नाबद्दलच्याही अपेक्षा चौकटीतल्या! आईबाबांनी बघून दिलेला, अनुरूप आणि मला समजून घेणारा नवरा...माफक अपेक्षा होत्या माझ्या. अगदी स्मार्ट, देखणा वगैरे कॅटेगरी नको पण डोळे आणि हास्य छान असावं निदान छाप पाडणारं असं आपलं उगाचच वाटायचं. अर्थात तिथेही तडजोडीची तयारी होतीच. (काये की 'मुलगी' म्हणून जन्माला आलं तर बंडखोरी वगैरे एका विशिष्ट वयापर्यंत खपवून घेतली जाते... मग अपेक्षांचं जू मानेवर बसतं ते कायमचं)

पण अचानकच वार्‍याने रोख बदललामुळे ढगांनी वार्‍याबरोबर पाठ फिरवून चालू लागावं तसं तू भेटलास आणि माझ्या अपेक्षांच्या ढगांची पांगापांग झाली. चौकट विस्कळीत कधी झाली आणि फ्रेमच्या कोपर्‍यातून अपेक्षांचा एक तुकडा बाहेर कधी डोकवायला लागला कळलंच नाही. प्रकर्षाने वाटलं की तू चारचौघांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि काही बाबतीत तू आहेसही. आईने आणि मी आटोकाट प्रयत्न केला फ्रेमच्या चौकटी रूंदावण्याचा (आईला कदाचित खात्री होती माझ्या निवडीवर!) पण बाबा मात्र परंपरांची चौकट सोडायला तयार नव्हते...

मग मीही हट्टाला पेटले. आयुष्यात पहिल्यांदाच! अपेक्षांचा तो डोकावलेला तुकडा तुझ्यासकट आणि माझ्या स्वप्नांसकट बाबांच्या परंपरावादी रूढीप्रिय चौकटीत कोंबायचा निष्फळ प्रयत्न करून पाहीला... नाहीच जमलं... मग टराटरा फाडून टाकली ती चौकट! बाबा बिथरले... आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी..! माझंच हे रूप मला अनोळखी होतं... आपले सर्व हट्ट पूर्ण करणार्‍या बाबांना कधी दुखवायचं नाही असं ठरवूनही...
तसंही आपण आपल्याच अपेक्षा कुठे पूर्ण करू शकतो? हातातून निसटून आरसा फुटल्यावर विखुरलेल्या आरश्याच्या तुकड्यांत दिसणारी असंख्य प्रतिबिंबे एकाच व्यक्तिची असली तरी सारखी थोडीच असतात??

प्रवाहाविरूद्ध पोहताना बरीच दमछाक होणार हे माहीती होतंच... पण तारूण्याची रग आणि तुझ्या प्रेमाने बहाल केलेली बंडखोरी ही दोन वल्ही पुरेशी वाटली तेव्हा, माझ्या आयुष्याचं तारू जीवनसागराच्या अथांग प्रवाहात झोकून द्यायला. वाटलं तुझी साथ मिळेल... आत्ता आत्ता कुठे भार हलका करतोयस माझा असं वाटेपर्यंत धडपडायचे... असंख्यवेळा तोंडघशी पडले...

नाकारले जाण्याचा पहिला प्रसंग... "तू आमच्या जातीची नाहीस, घरी पसंत नाही..."अरेरे! लग्नातही तेथे पाहीजे जातीचे??
आता तुमच्या जातीत जन्माला नाही आले, हा माझा दोष कसा? आणि तुम्ही आमच्यापेक्षा उच्च कुळात जन्माला आलात त्यात तुमचं क्रेडिट कितीसं? पण हे प्रश्न गौण होते आणि ते विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता. एकतर मी मुलगी त्यातून खालच्या जातीची! मग वाटलं असू दे. माझं प्रेम, माझा चांगुलपणा यातूनही तारून नेईल मला.

एकीकडे मानसिक कुतरओढ तर होतंच होती... तू आणि बाबा यातील निवड करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करत होते... नसतेच करू शकले...
पण तरीही कळत नकळत तुझ्याकडे पारडं झुकतं ठेवलं आणि बाबांना गृहीत धरलं, आजवर लेकीचे हट्ट पुरवले... आता आयुष्याचा निर्णय घ्यायच्यावेळी कसे अडवतील? आणि मी बाबांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तरी माझ्या बाबांनी बापाचं कर्तव्य पार पाडलं... माझा बाप नरमला लेकीच्या हट्टापुढे!

माझा हळवेपणा, माझं तुझ्यासाठी झुरणं, तुझ्याबाबतीत फक्त ह्रदयाने विचार करणं तुला आवडायचं बहुतेक. प्रत्येक पुरूषाला आवडतं तसं 'सांभाळणं'. मग हळव्या क्षणी वाहावत जायचास. (मी तर कधीच वाहावत गेले होते, डोळ्यांना पट्टी बांधून स्वतःचं भविष्य नशीबाच्या हवाली करणार्‍या गांधारीप्रमाणे.)
"मला तुझ्याइतकं कोणीच सांभाळू शकणार नाही. तू खूप वेगळी मुलगी आहेस, माझं तुझ्याशी लग्न झालं तर माझ्याइतका नशीबवान दुसरा कोणीच नसेल..." अशासारखी तुझी वाक्ये अंगावर मोरपिस फिरवून जायची. मी सुखवायचे तात्पुरती का होईना.... मग 'लग्न झालं त'' ही शक्यताही नकळत नजरेआड व्हायची आणि माझ्या लग्नाची स्वप्ने पाहीलेल्या माझ्या बाबांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात्-असतील हे त्या तात्पुरत्या सुखाच्या धुंदीत पूर्णपणे विसरून जायचे.

पण मी मात्र अजूनही नाकारले जातच होते, कधी तुझ्याकडून तर कधी तुझ्या घरच्यांकडून. तुझ्या प्रत्येक अटी मान्य करायचे, रडायचे, कळवळायचे. न केलेल्या चुकीची माफी मागायचे; आयुष्य त्रिशंकूसारखं अधांतरी लोंबकळत ठेऊन, याच आशेवर की कधीतरी माझी संसारची स्वप्ने पूर्ण होतील. तू बोलवायचास तेव्हा बोलवायचास तिथे यायचे, धावत पळत. तू रूसायचास, नाराज व्हायचास. कधी मला उशीर झाला म्हणून तर कधी माझ्या घामेजलेल्या अवताराकडे बघून. मी गयावाया करायचे, रडायचे तो तुला तमाशा वाटायचा..

प्रेमासारख्या अत्यंत अव्यवहार्य गोष्टीवर अजिबात विश्वास न टाकणार्‍या माझ्या बापाशी मात्र मी हिरीरीने भांडायचे, माझी बाजू मांडायचे.
तुला माहीत होतं मी माझ्या बाबांवर किती प्रेम करते ते... एक दिवस तू चिडलेलास आणि मी गयावाया करत होते. अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." मी रडत रडत म्हणाले... खाडकन जाणवलं, हे काय बोलतेय मी... कोणासाठी...
मी रडत रडत पुन्हा फोन केला तुला आणि म्हणाले, "माझा बाप नालायक नाहीये, तुला माझ्याशी लग्न नाही करायचं तर नको करूस!" तुलाही ते जाणवलं, तू सॉरी सॉरी बोलत राहीलास... मी तुटत गेले, स्वप्नांची फुले तर कधीच कोमेजली... कुठल्या तोंडाने सांगू बाबांना, ज्याच्यासाठी तुम्हाला त्यादिवशी एवढं तोडून बोलले तो माझ्या मनाचाही साधा विचार करू शकत नाहीये... मग म्हटलं राहू दे, ते जरी तोंडावर कुत्सितपणे बोलले की,"बघ आधीच म्हटलं नव्हतं तुला..." तरी माझी तडफड त्यांना नाही बघवणार...

तू माफी मागितलीस, फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून राग तुझ्यावर काढला म्हणालास... काहीही चूक नसणार्‍या माझ्या बापावर तू निष्कारण राग काढलास हे तूही विसरलास आणि मी तर एक स्वार्थी, प्रेमांध, नतद्रष्ट मुलगी बनले होते, जिला आपल्या बापाच्या स्वप्नांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्वाची वाटत होती...

मग एके दिवशी परवानगी मिळाली तुमच्या घरून आपल्या लग्नासाठी. मी मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वप्न बघू लागले... आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण सुखाच्या सायीची तृप्ती अंगभर पसरण्याआधीच पुन्हा कोलमडले. आजपर्यंत 'खालच्या जातीतली' म्ह्णून फक्त मला ऐकावं लागत होतं, आता माझ्या बापालाही ऐकावं लागलं होतं - लेकीला लंकेची पार्वती म्हणून 'दान' करणार असल्याबद्दल. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संस्कारांचं, शिक्षणाचं, चांगुलपणाचं काहीच मोल नव्हतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा माझ्यामुळे आणि माझ्यासमोर माझा बाप ढसाढसा रडला-"मला वाटत नाही का गं तुला काहीच कमी पडता कामा नये? परिस्थिती असती माझी तर केलं असतं गं तुझं सालंकृत कन्यादान..." आधी परिस्थितीने हतबल, नंतर पोरीच्या प्रेमापोटी हतबल आणि मग असहायतेनी हतबल! मुलीच्या बापाच्या अश्रूंमधील तडफड आणि हतबलता समजायला मुलीचा बापच व्हावं लागतं. सिंधूचा बाप पुन्हा एकदा मुलीमुळे असहाय ठरला होता, अपमानित झाला होती, हतबल झाला होता; एका लाचार प्रेमांधळ्या सिंधूमुळे!

मी एकटीच लढत होते, झगडत होते. तुझ्या साथीची अपेक्षा केव्हाच सोडून दिली होती, जेव्हा तू 'मुलाकडची बाजू' म्हणून स्वतःचं आणि घरच्यांचं समर्थन केलंस. आतून पुन्हा पुन्हा तुटत राहीले. कीव वाटली. अहं, तुझी नव्हे! समाजव्यवस्थेचीही नाही. स्वत:चीच! मुलीच्या सुखासाठी जबाबदारीचे जोखड अडकवलेल्या मान तुकवून निमूट अपमान सहन करणार्‍या सगळ्या वधूपित्यांची!

मी ज्या व्यक्तिला स्वतःच्या मर्जीने स्वत:च्या जोखमीवर आयुष्यभरासाठी निवडले त्याचेच विचार इतके कमजोर कसे? मी चुकले का तुला समजून घ्यायला? नाही! 'कशी त्यजू या पदाला' म्हणत तुझ्या पायाशी लीन होणारी मीही एक सिंधूच! आणि माझा बाप? तो या कथेमध्ये कुठंच नाहीये. 'एकच प्याला' या नाटकात तरी 'सिंधूचा बाप कुठे होता? तो व्यक्त झाला त्याच्या असहायतेतून, हतबलतेततून! मुलीच्या सुखासाठी अपमानाचे कडूजहर घोट निमुटपणे गिळणार्‍या एका मुलीच्या बापाच्या भुमिकेतून! मुलगी जन्माला आल्यापासून त्याला या भुमिकेचा सराव करावा लागत असेल. माझा बापही शेवटी सिंधूचा बाप ठरला- असहाय, हतबल - फक्त शिर्षकापुरता!

गडकर्‍यांना मुलींच्या दु:खी असहाय बापवर्गावरून 'सिंधूचा बाप' सुचला असावा. ते तरी काय करणार? समाजव्यवस्थेच्या विरूद्ध पोहोण्याचं ताकद आणि धाडस कमी लोकांमध्ये असतं. प्रवाहाविरूद्ध पोहोणार्‍यांची होणारी दमछाक पचवण्याइतकी ताकद सर्वांच्यातच असते असं नाही. पुन्हा किनारा गाठलाच तरी त्या यशाचा आनंद साजरा करायला कोणी सोबत असेल की नाही कुणास ठाऊक! गडकर्‍यांनी प्रवाहासोबत पोहण्याचा सोयिस्कर मार्ग निवडला. अश्रू ढाळणारी, पतीपरमेश्वराच्या चरणांत स्वर्ग समजणारी सोशिक सिंधू ही समाजाच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न संसारी स्त्री गडकर्‍यांच्या 'एकच प्याला'ने अजरामर केली. (सिंधूच्या बापाला त्यात स्थानच नव्हते, समाजाच्या दृष्टीने तो एक उपेक्षित आणि उपकृत घटक!) तशीच ही सिंधू आमच्याही मनात अजरामर होऊ पाहतेय, पण मी ही सिंधूंची असहाय जमात नष्ट करणार. प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं धाडस यापूर्वीही एकदा केलंय, पुन्हा करेन आणि खात्रीने तीर गाठेन. आणि हा आनंद साजरा करायला मी एकटी नसेन तर त्या माझ्या सार्‍या भगिनी असतील ज्या धडपडताहेत या असहायतेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी!

मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. ती चौकट रूंदावण्याचा प्रयत्न करेन. नाहीच जमलं तर फाडून टाकेन. आधीही फाडली होतीच की चौकट तुझ्यासाठी. आता मी ही चौकट फाडणार आहे माझ्या बापासाठी, सिंधूच्या असहाय बापासाठी! त्याला न्याय देण्यासाठी!! उगाच लेकीचं दु:ख बघून त्यानं असहायतेने झुरून मरण्यापेक्षा या लढ्यात तिच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणावं, तेही स्वतःचा कणा ताठ ठेऊन!

माझ्या या लढ्यात मला साथ देशील आशी आशा आहे, अपेक्षा नाही... सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... नाहीतर कुणी सांगावं, तू ही एका सिंधूचा असहाय बाप असू शकशील!

गुलमोहर: 

माझीच कथा वाटली थोड्याफार फरकाने.... फक्त मी सर्व लग्न झाल्यावर अनुभवलं. माझं अ‍ॅरेंज मॅरेज आहे ना. पण एक गोष्ट की नवर्‍याला उशीरा का होईना उपरती झाली. आता मी जरी सासु-सासर्‍यांबरोबर रहात असले तरी नवर्‍याचा आणी मुलीचाच वीचार करते फक्त. आपली कर्तव्य करायची (जास्तीत जास्त), ते(सा.बा. आणि सा.बु.) काही करतील अशी अपेक्षा करीयचीच कशाला. जेव्हा आपल्याला महीती आहे की ४ गोष्टींपैकी २ बदलल्यात पण २ बदलणारच नाहीत तेव्हा त्या पुर्ण दुर्लक्षीत करणे उत्तम. माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी आहे की मला ३ वर्षांची मुलगी आहे. तीच्या बाळलीलांनी सगळं घर व्यापलंय आता. आणि मी मुद्दामहुन राहीले त्या घरात. येता जाता सारखं बोलुन दाखवते सा. बा. ना की मी पुरेपुर बदला घेणार तुम्ही माझ्या आईचा (मला वडील नाहीत ) जो अपमान केलात त्याचा आणि मला छळलंत त्याचा सुधा. पण देवाने सुधा बरोबर मुलगी धाडली. आता माझा नवरा (कोणे एके काळी वर पक्ष असलेला) एका मुलीचा बाप आहे. आणि सा.बा. त्याच मुलीची आजी आहेत. फार बदललंय वातावरण आता जेव्हा पासुन मी क्षणा क्षणाला जाणीव करुन द्यायला लागले की ही जशी तुमची मुलगी आहे तशीच मी पण कोणाची तरी मुलगी होते आणि आहेच की...

कल्पु अगदी बरोबर Happy
स्वाती, वाईट वाटलं की तुम्ही या अवस्थेतून गेल्या आहात... खूप त्रास होतो जेव्हा आपली काही चूक नसताना समाजव्यवस्थेच्या परंपरेने चालत आलेल्या चुकीच्या वागणूकीचे बळी ठरतोय... ही व्यवस्था बदलायला हवी निश्चितच पण मी पुरेपुर बदला घेणार तुम्ही माझ्या आईचा (मला वडील नाहीत ) जो अपमान केलात त्याचा आणि मला छळलंत त्याचा सुधा.>> या स्वरूपात नव्हे...

बदला घेणे, चुकीची शिक्षा देणे अशा कामांसाठी देव समर्थ आहे. वेळ आल्यावर बोलून जरूर दाखवा त्याने कदाचित तुमच्या मनाची ठसठस कमी होईल. तुमच्या संवेदनाशील स्वभावावरून वाटतेय बदला घेणे हा तुमचा स्वभाव नाही, अगतिकतेने आणि अपमानाच्या धगीत जळून पेटून उठलेल्या संवेदनाशील मनाचा फुत्कार आहे..

दोन प्रकार असतात... त्यांनी त्रास दिला म्हणून तुम्ही बदला घेणे, त्यांनी त्रास देऊनही त्यांचं सगळं करून त्यांना दाखवून देणे, ज्या स्त्रीचा तुम्ही अपमान केला, त्या स्त्रीने आपल्या मुलीला किती उच्च दर्जाचे संस्कार दिलेत ते... ते मान्य नाही करणार, पण मनात जरून येईल त्यांच्या. आणि वेळ येईल तेव्हा बोलून दाखवा ना... कारण कधी कधी केलेलं बोलून दाखवल्याशिवाय लोकांना समजत नाही.
पण बदला वगैरे... अहं तुम्हाला नाही जमणार, खरं ना?

हो, तुमच्या मुलीच्या बाबांना कळेलंच, मुलीच्या लग्नाच्या वेळी, आपल्या काळजाचा तुकडा दुसर्‍याच्या हाती सोपवताना ह्रदयाची कशी घालमेल होते ते! विधात्याने ती व्यवस्था करून ठेवलेय स्वाती, तुला वेगळा बदला वगैरे घ्यायची गरज नाहीय Happy तशीच वाग जसं तुझ्या आईने तुला संस्कार दिलेत, बाकी कोणासाठी नाही पण तुझ्या आईसाठी! Happy बघ, तुझ्या मुलीलाही तू नकळत तेच संस्कार देतेस की नाही ते!

कल्पू, के अंजली, स्वाती खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल! Happy

ह्या मधे बरेचदा मुलगी होरपळल्या जाते मग॑ आपली चुक कधिही लक्षात येउ देत्.....एकदा का तडा गेला की तेच प्रतिबि॑ब परत कस दिसु शकेल....>>
हे कस॑ ठरवायच की कुठली वेळ बरोबर होती आणि आता उशीर झालेला आहे?>> सावरलं तर कुठलीही वेळ बरोबर आणि नाही सावरू शकलो तर कुठलीही वेळ चूकीची.

प्रेंमात चुकिचि वेळ येत नाहि. चुकिचि वेळ येते ति फक्त शारीरक आकर्षणात........
आज काल ह्यालच प्रेम म्हणतात. पण प्रेमचा अर्थ खुप वेगळा होतो.......
For your kind information..........

जरासे विषयांतर करते.. मला तुमचा सल्ला हवा आहे. माझी एक मैत्रिण आहे. तिने तिच्या भुतकाळात केलेल्या चुका तिच्या बिल्डींगमधल्या एका मुलाला माहिती आहे. अचानक तो तिच्याशी बोलू लागला. सुरुवातीला तो तिच्याशी खुप चांगला वागायचा. मग तिच्या भुतकाळाबद्द्ल बोलुन तिला दुखवायचा.हळूह्ळू ती प्रत्येक गोष्ट त्याचा म्हणण्याप्रमाणे वागू लागली.पण ती त्याला जेव्हा आपले काय नाते आहे असे विचाराची तेव्हा तो म्हणायचा कि " आपल्यात काही नाते नाही..मैत्रीचे पण नाही.." पण रोज तो तिच्याशी SMS chat करतो. स्वत:ची काही चुक असेल तर sorry म्हणतो.

problem असा आहे की आता तिला तो आवड्तो पण त्याच्या मनात काय आहे हे काहीच समजत नाही.
तिने स्वत:च्या वाईट सवयी आणि वाईट स्वभाव त्याच्यासाठी बदलेल्या आहेत. मला तर काहि समजत नाही तिला काय सल्ला द्यावा...तुम्ही मदत कराल...???

मुलानाहि ह्या अवस्थेतुन जाव लागत......
................ समझल.>> भुषण, ह्या म्हणजे कुठल्या? हा... एखादी मुलगी त्यांच्या पैशाचा, चांगुलपणाचा, प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्याचं विश्व उध्वस्त करून जात असेल... नव्हे करतातच, अशा बर्‍याचशा मुली माझ्याही पाहण्यात आहेत. लग्न करून नवर्‍याशी त्याच्या आई वडीलांशी पटलं नाही, तर सोडून जाणार्‍या, एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून इश्यू करून तमाशे करतात. त्यांच्याविषयीही लिहेनच ना.

पण ही कथा एका अशा मुलीची आहे, जीने त्या मुलावर जिवापाड प्रेम केले, स्वतःच्या अस्तीत्वाला विसरून, घरच्यांच्या विरोधात, त्या मुलीच्या बाबांनाही अपमानित व्हावं लागलं हुंड्यासाठी! ही कथा तिची आहे ('त्याची' कथाही लिहीन ना...) मी स्त्रीपुरस्कर्ती अज्जिबात नाही. मी पुरूषद्वेष्टी तर त्याहूनही नाही.

मी अशा खूप्प्प्प्प्प मुली बघितल्या आहेत, ज्यांना प्रेम म्हणजे राजाराणीचा संसार हवाय. सासू सासर्‍यांचं लोढणं नकोय, दीर, जावा, नणंदा वगैरे तर परकेच! स्वतःचं घर हवंय. कसली पैशाची जबाबदारी नको.
अशाही एक दोघी बघितल्या आहेत ज्यांचे नवरे मॅनेजर पोस्टला आहेत १ दीड लाख पगार आहे, २/३ BHK फ्लॅट आहेत. त्यांची स्वतःची शिक्षणं यथातथा आहेत. एक १० हजार कमावते, एक घरीच असते BE असून. सासवा नको म्हणून वेगळ्या राहतात आणि मुलं कोण सांभाळणार म्हणून मुल होऊ देत नाहीयेत. अर्थात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे नक्कीच. तुमचा राग योग्य आहे, पण इथे असं कुठेही म्हणण्याचा उद्देश नाहीय, की सगळीच मुले मुलींना अशी छळतात, मुली गरीब बिच्चार्‍या... उलट या कथेत मी त्या मुलीची तडफड मांडलेय, तिचा मुर्खपणा आणि तिच्या या अवस्थेला सर्वस्वी ती जवाबदार आहे, तिच्या नवर्‍यापेक्षाही!

प्रेंमात चुकिचि वेळ येत नाहि. चुकिचि वेळ येते ति फक्त शारीरक आकर्षणात........>> अगदीच बरोबर नाही म्हणू शकत. प्रेम दोन्ही बाजूनी व्यक्त व्हावं लागतं. संसार म्हणजे फक्त प्रेम नव्हे, जबाबदार्‍या येतात, तडजोड येते आणि ती प्रेमाच्या साह्याने आणि प्रेमाच्या व्यक्तीसाठी सहज करता येते. पण असं प्रत्येक वेळी होत नाही ना. आणि एकच जण प्रेमापोटी तडाजोड करत असेल दुसरा त्याला (प्रेमापोटीच!) फक्त गृहीत धरत असेल तर त्या नात्याला काय म्हणणार?

मग मुलं जेव्हा जीवापाड प्रेम करूनही एखादी मुलगी त्यांना फसवून निघून जाते तेव्हा प्रेमापोटी माफ नाही करू शकत? तेव्हा त्यांना वाटतंच ना की आपण हिच्यावर प्रेम करून चूक केलेय. मग तेही त्यांचं शारीरिक आकर्षण असतं का? कुठलीच एक बाजू नेहमी बरोबर किंवा चूकीची असू शकत नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं! नाही का? चूकलं असेल किंवा जास्त बोलून गेले असेन तर माफ करा.

मयूरी, मदत करायला मी एका पायावर काय गुढघ्यावर पण तयार अस्ते :D... shit bad joke !, ok now seriously,

आपल्यात काही नाते नाही..मैत्रीचे पण नाही..>> त्या मुलाने स्पष्ट सांगितले आहे ना... मग तुमची मैत्रीण का मृगजळाच्या मागे लागलेय?

आता तिला तो आवड्तो??? म्हणजे नक्की काय आवडतं... कुठपर्यंत आवडतं... मित्र म्हणून, प्रियकर म्हणून की आयुष्यभराचा जोडीदार म्हणून? ते तिला माहीत नसणारच, अनुभवावरून सांगते... Happy आणि जरी तिने पुढचा विचार करून त्याला जोडीदार बनवायचं ठरवलं तरी, तो तयार हवा ना... राक्षस विवाह करणार काय? Wink sorry jokes apart!

बरं तो तयार का नाहीय? म्हणजे त्याला तिच्याशी साधी मैत्रीही का करावीशी वाटत नाहीये? प्रेम बिम तर फार दूरची गोष्ट!

त्याला विचारायची हिम्मत होत नसणार! मग एवढं तर विचारू शकते, की बाबा मित्र नाहीयेस तर chatting का करतोयस?

जर त्याच्याही मनात असेल तर... तर... मग... अम्म १) त्याला तुमच्या मैत्रीणीच्या भुतकाळात केलेल्या चुका माहीत आहेत, कुठला मुलगा करेल accept? No seriously tell me frankly काय चुका आहेत मला माहीत नाही. and of course I am not concerned about that.

तुमच्या मैत्रीणीला माहीतेत एखाद्या मुलाच्या चुका तर तीही विचार करेलच ना पुढे पाऊल टाकताना... भलेही मग पूर्णपणे त्याची चूक नसेलही त्यात!

२) जरी केलं कशावरून तो मुलगा तिला भविष्यात त्या गोष्टीवरून टोचून बोलणार नाही, उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवणार नाही?

३) त्याचं सोडा तुमच्या मैत्रीणीला खात्री आहे का... तिला soft corner नक्की कशाबद्दल आहे? soft corner आहे की अजून काही? soft corner असणं वेगळं आणि आयुष्य काढणं खरं तर निभावणं वेगळं!
यासाठी ती तयार आहे का?

४) आपण फक्त सल्ले देऊ शकतो, निर्णय तिने घ्यायचा आहे. let she decide. Hope तिला निर्णयावर पश्चाताप करण्याची पाळी नको यायला.
मी असते आणि मला त्या मुलाकडून रिस्पॉन्स मिळाला नसता तर मी मृगजळाच्या मागे धावले नस्ते... मी माझं करियर, आईबाबा यांना प्राधान्य दिलं असतं... पण माझ्या सुदैवाने तसं झालं नाही... मला त्या मुलाकडून १००% रिटर्न्स मिळाले, आणि मग मी त्याच्याशी लग्न केलं Happy

५) भविष्यात त्या मुलीने दुसर्‍याशी लग्न करायचं ठरवलं तर कशावरून तो मुलगा तिची चूक त्याला सांगणार नाही आणी त्यांच्या दोघांबद्दल(आताचा तो आणि तुमची मैत्रीण यांचं असलेलं नसलेलं जे काय आहे ते नातं)? मला वाटतं तिने त्याच्याशी बोलणं हळूहळू कमी करावं.

dreamgirl
चूकलं असेल किंवा जास्त बोलून गेले असेन तर माफ करा.

मी तुम्हच्या पेक्षा वयाने लहान आहे. त्यामुळे माफी वैगेरे मागु नका please.

(मग मुलं जेव्हा जीवापाड प्रेम करूनही एखादी मुलगी त्यांना फसवून निघून जाते तेव्हा प्रेमापोटी माफ नाही करू शकत? तेव्हा त्यांना वाटतंच ना की आपण हिच्यावर प्रेम करून चूक केलेय. मग तेही त्यांचं शारीरिक आकर्षण असतं का? )
-- हो.
प्रेमाची व्याख्या वेगळी आहे . प्रेमाची व्याख्या नसते अस म्हणतात पण माझ्याजवळ आहे :-
& No one can beat that definition………….

.

भूषण, पटेश! Happy पण दुर्दैवाने ही (अर्धी) सत्य घटना आहे फक्त कथा नाहीय! Sad

कदाचित तुमच्या जवळ असलेली प्रेमाची व्याख्या इतरांना समजून घेता येत नाही, जगता येत नाही म्हणून हे प्रसंग त्यांच्यावर ओढवत असतील. पण एक नक्की अशा चुकार पोरांमुळे त्यांच्या आईवडीलांना निष्कारण त्रास होतो. भरडले तर ते जास्त जातात. Sad

कथा छान लिहीली आहे. बर्‍याचदा समाज काय म्हणेल किंवा घरच्याना दुखवायचे नाही म्हणून भारतीय स्त्रिया खूप काही सहन करतात. हे वेळीच थांबवले तर निदान जगणे तरी सुसह्य होईल्.अन्यथा नरक बरा असे जी वन जगतात या स्त्रिया. कित्येक शतके गेली तरी आपले डोळे आणि नजर अजुन बदलत नाहीये. साधी पुजा घ्या . मान पुरुषाला आणि स्त्रिने फक्त 'मम' म्हणायचे. कधी बदलणार आहोत आपण?

सुनिल जोग
साधी पुजा घ्या . मान पुरुषाला आणि स्त्रिने फक्त 'मम' म्हणायचे. कधी बदलणार आहोत आपण?

- sorry. पण त्यासाठी योग्य अस कारण आहे.

मी पुरेपुर बदला घेणार तुम्ही माझ्या आईचा (मला वडील नाहीत ) जो अपमान केलात त्याचा आणि मला छळलंत त्याचा सुधा.>> माझ्या या शब्दांचा अर्थ मार झोड कींवा भांडण नाहीये. जसं तुम्ही म्हणता की काही लोकांना बोलल्याशीवाय कळत नाही तशीच परीस्थीती आहे माझ्या घरात. आज पर्यत मी मला ऑफीसला लेट झाला तरी घरातली कामं सा.बा. च्या अंगावर सोपवुन कधीच घराबाहेर पडत नाही. पण एक मात्र करते मी करते ते सगळं आणि त्या वागतात ते सगळं मुद्दामहुन तोलुन दाखवते त्यांच्या समोर बर्‍याच वेळा. एक गोष्ट मात्र नक्की मी जरी शेवट पर्यंत (माझ्या कींवा त्यांच्या) कर्तव्य म्हणुन त्यांचं सगळं केलं तरी त्यांच्याबद्दल आदर कधीच वाटणार नाही. आणि माझ्या सु / र्दु दैवाने त्याना हे समजायला लागलंय हळु हळु. घडलेल्या घटनांमुळे मी माझ्या मुलीला मात्र कधीच दुरावायचा प्रयत्न केला नाही त्यांच्यापासुन. किंबहुना कीतीही ठरवलं तरी मला जमणारही नाही ते हे माहीतीये मला.

dreamgirl.....सर्वात आधी तुम्ही म्हणू नका "तु" पळेल..
त्याला तुमच्या मैत्रीणीच्या भुतकाळात केलेल्या चुका माहीत आहेत, कुठला मुलगा करेल accept? >> अगदी खरे पण मग तो तिच्याशी बोलायला तरी का आला असेल???

जरी केलं कशावरून तो मुलगा तिला भविष्यात त्या गोष्टीवरून टोचून बोलणार नाही, उपकाराच्या ओझ्याखाली दाबून ठेवणार नाही??>>>१०० % अगदी खरे

त्याला तिच्याशी साधी मैत्रीही का करावीशी वाटत नाहीये? >> याचे उत्तर त्यालाच माहिति असणार..

मी तिच्याशी हेच बोलले आहे..पाहू काय करते आता... Happy

धन्यवाद!!!

स्वाती, आज पर्यत मी मला ऑफीसला लेट झाला तरी घरातली कामं सा.बा. च्या अंगावर सोपवुन कधीच घराबाहेर पडत नाही. >> कौतुक तुझं! कसं जमतं तुझं तुलाच ठाऊक! पण तरीही... Happy

परवाच ट्रेनमध्ये एक मुलगी आपल्या आईला सासूच्या कागाळ्या सांगत होती... Lol
कमवणारी सून मिळालेय तर उशीर होणारच ना घरी यायला! एका वेळचं जेवण केलं तर काय मोठ्ठासा त्रास पडणार आहे! होना बघ ना... तो कसला ममाज बॉय!(हे पतीदेवांसाठी) काह्ही बोलत नाही. he knows how much this project is important to me. त्याने सांगायला नको का आईंना! माझ्यावरच डाफरत असतात दोघं... (थोडं कुजबुजत) आणि आता नवीन खुळ घेतलंय डोक्यात... नातू बघायचाय म्हणे, करणार कोण हे दोघं बघ ना... (सॉरी मी सगळं चोरून ऐकलं) Lol

असो, विषयांतर! त्या वागतात ते सगळं मुद्दामहुन तोलुन दाखवते त्यांच्या समोर बर्‍याच वेळा. >> ते तर होतंच, फ्रस्ट्रेशनमधून Happy

किंबहुना कीतीही ठरवलं तरी मला जमणारही नाही ते हे माहीतीये मला.>> मलाही माहीतेय, मी वरंच म्हटलंय तुझ्याबद्दल! Happy
धन्यवाद!

@ मयूरी, .....सर्वात आधी तुम्ही म्हणू नका "तु" पळेल..>> तू पळेल! आणि मलाही तेच आवडेल Happy

पण मग तो तिच्याशी बोलायला तरी का आला असेल???>> याचंही उत्तर त्यालाच माहीत!
काही मुलांना असा "टाईमपास" आवडतो.. मैत्री नाहीय, काही विशेष कारण नाहीय तर बोलायची गरजच काय पडते...

आता काही म्हणतील निखळ संवाद असू शकत नाही का... महत्वाची गोष्ट त्यांच्यात निखळ संवाद नाहीय. त्या मैत्रीणीच्या चुका दाखवून तिला रिग्रेट फील करण्यासाठी तो तिच्याशी बोलतो.

मैत्रीणीने त्याला टाळावे, माझं स्पष्ट मत आहे. आणि मला खात्री आहे, त्यानंतर तो तिला त्या गोष्टीवरून इमोशनल ब्लॅकमेल करेल... पटत नसेल तर पहा बरं प्रयत्न करून!

त्याच्या मनात "काही" नाहीय ना... मग आपण कशाला खोटी आशा धरावी, स्पष्ट सांगावं ना, मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाहीय, यापुढे माझ्याशी संबंध ठेऊ नकोस. शक्य असल्यास नंबर बदलून घ्यावा.

शुभेच्छा तुला आणि तुझ्या मैत्रीणीला. Happy

@ सुनिल, बर्‍याचदा समाज काय म्हणेल किंवा घरच्याना दुखवायचे नाही म्हणून भारतीय स्त्रिया खूप काही सहन करतात. हे वेळीच थांबवले तर निदान जगणे तरी सुसह्य होईल्.अन्यथा नरक बरा असे जी वन जगतात या स्त्रिया. >> खरंय काही बाबतीत. बर्‍याचशा स्त्रिया असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतात, पण काही ठिकाणी मात्र गंगा उलटी वाहते.. Lol

साधी पुजा घ्या . मान पुरुषाला आणि स्त्रिने फक्त 'मम' म्हणायचे. कधी बदलणार आहोत आपण?>> टेंन्शन घेऊ नका, आता बायका पूजा सांगतात, बर्‍याचशा ठिकाणी तर अग्नीही दिलेत त्यांनी. जग बदलतंय... काही पुरूष आपल्या बायकांना स्वयंपाक घरात मदत करतात, करीयरसाठी प्रोत्साहन देतात... टिपीकल नवरा बायको नातं बदलून मैत्रीचं नातं येतंय! खरंच परिस्थिती बदलतेय. पूर्णपणे नाही पण सुरूवात तर झालेय!

हम्म...
प्रेमविवाह नाही अरेंज मॅरेजच पण मुलीला असेच काहिसे सिग्नल मिळाल्यावर ठरलेला साखरपुडा ६ महिन्यानी मोडुन त्या मुलीच दुसरीकडे लग्न झालय अस एक उदाहरण आहे माझ्या पाहण्यात.
अर्थात त्या मुलीने असे सिग्नल ओळखले, घरच्याना सांगण्याची हिम्मत दाखवली आणि घरच्याने वेळीच सावधपणा दाखवला हे खुप चांगल झाल.

झकासराव, धन्यवाद प्रतिसादाबद्दल!

माझ्या रूमपार्टनरच्या ऑफीसमधील एका मुलीचं लग्न होतं, आदल्या दिवशी साखरपुडा झाला, दुसर्‍या दिवशी लग्न होतं, रात्री उशीरा आलेले आणि साखरपुड्याला उपस्थित न राहू शकलेले काही नातेवाईक मुलाकडच्यांना आणि मुलाला भेटले (वर वधू आणि मंडळी एकाच हॉटेलात उतरलेली...) आणि समजलं त्या मुलाचं पहीलं लग्न झालेलं आहे आणि घटस्फोटासाठी दावा दाखल केलाय, पण अजून मिळाला नाहीय. मग काय, वधूकडची मंडळी दुसर्‍या दिवशी बारात घेऊन परत!

माझ्या एका मैत्रीणीच्या घरी... तिची वहीनी आहे, ती भावाच्या फ्रेंण्ड सर्कल्मधील. लग्न दुसर्‍याशी झालेलं आधी, तेव्हा त्यांच्या घरी येऊन मैत्रीणीच्या आईकाडून ओटी वगैरे भरून गेलेली (तेव्हा आईला काय माहीत आपण भावी सुनेची पहील्या लग्नाबद्दल ओटी भरतोय ते!). ४ महीन्यांनी त्याच्याशी घटस्फोट, आणि मैत्रीणीच्या भावाशी लग्न! (मैत्रीणीची आई झिट येऊन पडायची बाकी होती!)

कुछभी हो सकता है... नात्यामधला विश्वासाचा पायाच हरवलाय म्हणूनच नात्याची ईमारत अशी डळामळीत झालेय आणि इमोशनल अत्याचार सारख्या रिअ‍ॅलिटी शोज मधून डिटेक्टिवगिरी करवून घेऊन नात्याची चिरफाड आणि लोकांची करमणूक करून द्यायची पाळी आलेय! Sad

Pages