सिंधूचा बाप

Submitted by dreamgirl on 1 July, 2010 - 07:50

आज माझा प्रत्येक अश्रू
हरएक शब्द बनला आहे;
म्हणूनच जीभेला धार अन
डोळ्यांना कोरडेपणा आला आहे...

ग्रॅज्युएशनपर्यंत चौकटीतलं आयुष्य जगत होते. चौकटीतल्या परीघाला स्वतःचं जग समजून सुखी होते. डिग्री, मग नोकरी आणि मग लग्न- सगळं कसं चौकटीसारखं आखीव्-रेखीव. लग्नाबद्दलच्याही अपेक्षा चौकटीतल्या! आईबाबांनी बघून दिलेला, अनुरूप आणि मला समजून घेणारा नवरा...माफक अपेक्षा होत्या माझ्या. अगदी स्मार्ट, देखणा वगैरे कॅटेगरी नको पण डोळे आणि हास्य छान असावं निदान छाप पाडणारं असं आपलं उगाचच वाटायचं. अर्थात तिथेही तडजोडीची तयारी होतीच. (काये की 'मुलगी' म्हणून जन्माला आलं तर बंडखोरी वगैरे एका विशिष्ट वयापर्यंत खपवून घेतली जाते... मग अपेक्षांचं जू मानेवर बसतं ते कायमचं)

पण अचानकच वार्‍याने रोख बदललामुळे ढगांनी वार्‍याबरोबर पाठ फिरवून चालू लागावं तसं तू भेटलास आणि माझ्या अपेक्षांच्या ढगांची पांगापांग झाली. चौकट विस्कळीत कधी झाली आणि फ्रेमच्या कोपर्‍यातून अपेक्षांचा एक तुकडा बाहेर कधी डोकवायला लागला कळलंच नाही. प्रकर्षाने वाटलं की तू चारचौघांपेक्षा खूप वेगळा आहेस आणि काही बाबतीत तू आहेसही. आईने आणि मी आटोकाट प्रयत्न केला फ्रेमच्या चौकटी रूंदावण्याचा (आईला कदाचित खात्री होती माझ्या निवडीवर!) पण बाबा मात्र परंपरांची चौकट सोडायला तयार नव्हते...

मग मीही हट्टाला पेटले. आयुष्यात पहिल्यांदाच! अपेक्षांचा तो डोकावलेला तुकडा तुझ्यासकट आणि माझ्या स्वप्नांसकट बाबांच्या परंपरावादी रूढीप्रिय चौकटीत कोंबायचा निष्फळ प्रयत्न करून पाहीला... नाहीच जमलं... मग टराटरा फाडून टाकली ती चौकट! बाबा बिथरले... आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी..! माझंच हे रूप मला अनोळखी होतं... आपले सर्व हट्ट पूर्ण करणार्‍या बाबांना कधी दुखवायचं नाही असं ठरवूनही...
तसंही आपण आपल्याच अपेक्षा कुठे पूर्ण करू शकतो? हातातून निसटून आरसा फुटल्यावर विखुरलेल्या आरश्याच्या तुकड्यांत दिसणारी असंख्य प्रतिबिंबे एकाच व्यक्तिची असली तरी सारखी थोडीच असतात??

प्रवाहाविरूद्ध पोहताना बरीच दमछाक होणार हे माहीती होतंच... पण तारूण्याची रग आणि तुझ्या प्रेमाने बहाल केलेली बंडखोरी ही दोन वल्ही पुरेशी वाटली तेव्हा, माझ्या आयुष्याचं तारू जीवनसागराच्या अथांग प्रवाहात झोकून द्यायला. वाटलं तुझी साथ मिळेल... आत्ता आत्ता कुठे भार हलका करतोयस माझा असं वाटेपर्यंत धडपडायचे... असंख्यवेळा तोंडघशी पडले...

नाकारले जाण्याचा पहिला प्रसंग... "तू आमच्या जातीची नाहीस, घरी पसंत नाही..."अरेरे! लग्नातही तेथे पाहीजे जातीचे??
आता तुमच्या जातीत जन्माला नाही आले, हा माझा दोष कसा? आणि तुम्ही आमच्यापेक्षा उच्च कुळात जन्माला आलात त्यात तुमचं क्रेडिट कितीसं? पण हे प्रश्न गौण होते आणि ते विचारण्याचा मला मुळीच अधिकार नव्हता. एकतर मी मुलगी त्यातून खालच्या जातीची! मग वाटलं असू दे. माझं प्रेम, माझा चांगुलपणा यातूनही तारून नेईल मला.

एकीकडे मानसिक कुतरओढ तर होतंच होती... तू आणि बाबा यातील निवड करण्याची वेळ येऊ नये एवढीच प्रार्थना करत होते... नसतेच करू शकले...
पण तरीही कळत नकळत तुझ्याकडे पारडं झुकतं ठेवलं आणि बाबांना गृहीत धरलं, आजवर लेकीचे हट्ट पुरवले... आता आयुष्याचा निर्णय घ्यायच्यावेळी कसे अडवतील? आणि मी बाबांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकले तरी माझ्या बाबांनी बापाचं कर्तव्य पार पाडलं... माझा बाप नरमला लेकीच्या हट्टापुढे!

माझा हळवेपणा, माझं तुझ्यासाठी झुरणं, तुझ्याबाबतीत फक्त ह्रदयाने विचार करणं तुला आवडायचं बहुतेक. प्रत्येक पुरूषाला आवडतं तसं 'सांभाळणं'. मग हळव्या क्षणी वाहावत जायचास. (मी तर कधीच वाहावत गेले होते, डोळ्यांना पट्टी बांधून स्वतःचं भविष्य नशीबाच्या हवाली करणार्‍या गांधारीप्रमाणे.)
"मला तुझ्याइतकं कोणीच सांभाळू शकणार नाही. तू खूप वेगळी मुलगी आहेस, माझं तुझ्याशी लग्न झालं तर माझ्याइतका नशीबवान दुसरा कोणीच नसेल..." अशासारखी तुझी वाक्ये अंगावर मोरपिस फिरवून जायची. मी सुखवायचे तात्पुरती का होईना.... मग 'लग्न झालं त'' ही शक्यताही नकळत नजरेआड व्हायची आणि माझ्या लग्नाची स्वप्ने पाहीलेल्या माझ्या बाबांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असू शकतात्-असतील हे त्या तात्पुरत्या सुखाच्या धुंदीत पूर्णपणे विसरून जायचे.

पण मी मात्र अजूनही नाकारले जातच होते, कधी तुझ्याकडून तर कधी तुझ्या घरच्यांकडून. तुझ्या प्रत्येक अटी मान्य करायचे, रडायचे, कळवळायचे. न केलेल्या चुकीची माफी मागायचे; आयुष्य त्रिशंकूसारखं अधांतरी लोंबकळत ठेऊन, याच आशेवर की कधीतरी माझी संसारची स्वप्ने पूर्ण होतील. तू बोलवायचास तेव्हा बोलवायचास तिथे यायचे, धावत पळत. तू रूसायचास, नाराज व्हायचास. कधी मला उशीर झाला म्हणून तर कधी माझ्या घामेजलेल्या अवताराकडे बघून. मी गयावाया करायचे, रडायचे तो तुला तमाशा वाटायचा..

प्रेमासारख्या अत्यंत अव्यवहार्य गोष्टीवर अजिबात विश्वास न टाकणार्‍या माझ्या बापाशी मात्र मी हिरीरीने भांडायचे, माझी बाजू मांडायचे.
तुला माहीत होतं मी माझ्या बाबांवर किती प्रेम करते ते... एक दिवस तू चिडलेलास आणि मी गयावाया करत होते. अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." मी रडत रडत म्हणाले... खाडकन जाणवलं, हे काय बोलतेय मी... कोणासाठी...
मी रडत रडत पुन्हा फोन केला तुला आणि म्हणाले, "माझा बाप नालायक नाहीये, तुला माझ्याशी लग्न नाही करायचं तर नको करूस!" तुलाही ते जाणवलं, तू सॉरी सॉरी बोलत राहीलास... मी तुटत गेले, स्वप्नांची फुले तर कधीच कोमेजली... कुठल्या तोंडाने सांगू बाबांना, ज्याच्यासाठी तुम्हाला त्यादिवशी एवढं तोडून बोलले तो माझ्या मनाचाही साधा विचार करू शकत नाहीये... मग म्हटलं राहू दे, ते जरी तोंडावर कुत्सितपणे बोलले की,"बघ आधीच म्हटलं नव्हतं तुला..." तरी माझी तडफड त्यांना नाही बघवणार...

तू माफी मागितलीस, फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून राग तुझ्यावर काढला म्हणालास... काहीही चूक नसणार्‍या माझ्या बापावर तू निष्कारण राग काढलास हे तूही विसरलास आणि मी तर एक स्वार्थी, प्रेमांध, नतद्रष्ट मुलगी बनले होते, जिला आपल्या बापाच्या स्वप्नांपेक्षा स्वतःची स्वप्नं महत्वाची वाटत होती...

मग एके दिवशी परवानगी मिळाली तुमच्या घरून आपल्या लग्नासाठी. मी मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने स्वप्न बघू लागले... आतापर्यंतच्या माझ्या धडपडीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. पण सुखाच्या सायीची तृप्ती अंगभर पसरण्याआधीच पुन्हा कोलमडले. आजपर्यंत 'खालच्या जातीतली' म्ह्णून फक्त मला ऐकावं लागत होतं, आता माझ्या बापालाही ऐकावं लागलं होतं - लेकीला लंकेची पार्वती म्हणून 'दान' करणार असल्याबद्दल. आजपर्यंत त्यांनी केलेल्या संस्कारांचं, शिक्षणाचं, चांगुलपणाचं काहीच मोल नव्हतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा माझ्यामुळे आणि माझ्यासमोर माझा बाप ढसाढसा रडला-"मला वाटत नाही का गं तुला काहीच कमी पडता कामा नये? परिस्थिती असती माझी तर केलं असतं गं तुझं सालंकृत कन्यादान..." आधी परिस्थितीने हतबल, नंतर पोरीच्या प्रेमापोटी हतबल आणि मग असहायतेनी हतबल! मुलीच्या बापाच्या अश्रूंमधील तडफड आणि हतबलता समजायला मुलीचा बापच व्हावं लागतं. सिंधूचा बाप पुन्हा एकदा मुलीमुळे असहाय ठरला होता, अपमानित झाला होती, हतबल झाला होता; एका लाचार प्रेमांधळ्या सिंधूमुळे!

मी एकटीच लढत होते, झगडत होते. तुझ्या साथीची अपेक्षा केव्हाच सोडून दिली होती, जेव्हा तू 'मुलाकडची बाजू' म्हणून स्वतःचं आणि घरच्यांचं समर्थन केलंस. आतून पुन्हा पुन्हा तुटत राहीले. कीव वाटली. अहं, तुझी नव्हे! समाजव्यवस्थेचीही नाही. स्वत:चीच! मुलीच्या सुखासाठी जबाबदारीचे जोखड अडकवलेल्या मान तुकवून निमूट अपमान सहन करणार्‍या सगळ्या वधूपित्यांची!

मी ज्या व्यक्तिला स्वतःच्या मर्जीने स्वत:च्या जोखमीवर आयुष्यभरासाठी निवडले त्याचेच विचार इतके कमजोर कसे? मी चुकले का तुला समजून घ्यायला? नाही! 'कशी त्यजू या पदाला' म्हणत तुझ्या पायाशी लीन होणारी मीही एक सिंधूच! आणि माझा बाप? तो या कथेमध्ये कुठंच नाहीये. 'एकच प्याला' या नाटकात तरी 'सिंधूचा बाप कुठे होता? तो व्यक्त झाला त्याच्या असहायतेतून, हतबलतेततून! मुलीच्या सुखासाठी अपमानाचे कडूजहर घोट निमुटपणे गिळणार्‍या एका मुलीच्या बापाच्या भुमिकेतून! मुलगी जन्माला आल्यापासून त्याला या भुमिकेचा सराव करावा लागत असेल. माझा बापही शेवटी सिंधूचा बाप ठरला- असहाय, हतबल - फक्त शिर्षकापुरता!

गडकर्‍यांना मुलींच्या दु:खी असहाय बापवर्गावरून 'सिंधूचा बाप' सुचला असावा. ते तरी काय करणार? समाजव्यवस्थेच्या विरूद्ध पोहोण्याचं ताकद आणि धाडस कमी लोकांमध्ये असतं. प्रवाहाविरूद्ध पोहोणार्‍यांची होणारी दमछाक पचवण्याइतकी ताकद सर्वांच्यातच असते असं नाही. पुन्हा किनारा गाठलाच तरी त्या यशाचा आनंद साजरा करायला कोणी सोबत असेल की नाही कुणास ठाऊक! गडकर्‍यांनी प्रवाहासोबत पोहण्याचा सोयिस्कर मार्ग निवडला. अश्रू ढाळणारी, पतीपरमेश्वराच्या चरणांत स्वर्ग समजणारी सोशिक सिंधू ही समाजाच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न संसारी स्त्री गडकर्‍यांच्या 'एकच प्याला'ने अजरामर केली. (सिंधूच्या बापाला त्यात स्थानच नव्हते, समाजाच्या दृष्टीने तो एक उपेक्षित आणि उपकृत घटक!) तशीच ही सिंधू आमच्याही मनात अजरामर होऊ पाहतेय, पण मी ही सिंधूंची असहाय जमात नष्ट करणार. प्रवाहाविरूद्ध पोहोण्याचं धाडस यापूर्वीही एकदा केलंय, पुन्हा करेन आणि खात्रीने तीर गाठेन. आणि हा आनंद साजरा करायला मी एकटी नसेन तर त्या माझ्या सार्‍या भगिनी असतील ज्या धडपडताहेत या असहायतेच्या दलदलीतून बाहेर पडण्यासाठी!

मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. ती चौकट रूंदावण्याचा प्रयत्न करेन. नाहीच जमलं तर फाडून टाकेन. आधीही फाडली होतीच की चौकट तुझ्यासाठी. आता मी ही चौकट फाडणार आहे माझ्या बापासाठी, सिंधूच्या असहाय बापासाठी! त्याला न्याय देण्यासाठी!! उगाच लेकीचं दु:ख बघून त्यानं असहायतेने झुरून मरण्यापेक्षा या लढ्यात तिच्या पाठीवर हात ठेऊन लढ म्हणावं, तेही स्वतःचा कणा ताठ ठेऊन!

माझ्या या लढ्यात मला साथ देशील आशी आशा आहे, अपेक्षा नाही... सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... नाहीतर कुणी सांगावं, तू ही एका सिंधूचा असहाय बाप असू शकशील!

गुलमोहर: 

मी नक्की लढेन, एकटी- समाजव्यवस्थेविरूद्ध, परंपरेच्या चौकटीविरूद्ध कारण माझी असहायता, घुसमट या चौकटीत मावत नाहीये. >> आधी 'त्याला' सोड, त्यासाठी स्वतःविरुद्ध लढावं लागेल ते पहा.
असल्या शेंबड्या, आईबाबा-परंपरा-घरचे काय म्हणतील अशा बागुलबुवांच्या मागे दडणार्‍या मुलाबरोबर जन्म काढायचा म्हणजे सुळावरची पोळी ठरणार आहे !

हे कथेतल्या तिला अन अशाच परिस्थितीत असलेल्या सर्वांना

कॉलेजात असताना एक मैत्रीण होती (आता कॉन्टॅक्ट नाहीय Sad )... रोजची रडारड... त्यावेळचे तिचे प्रॉब्लेम्स.... जाईजुई, मेधा मीही अगदी हाच अगदी हाच सल्ला दिलेला तिला... पण... Sad प्रेमाची पट्टी इतकी आंधळेपणा आणू शकते की एवढी वर्ष तुम्हाला फुलासारखे सांभाळणारे आईवडील तुम्हाला एका क्षणात इतके परके वाटू लागतात की...

आता ती मैत्रीण कुठे आहे कशी आहे माहीत नाही पण अपेक्षा आहे, तिला मी या कथेत दाखविल्याप्रमाणे उशीरा का होईना अक्कल येते का ते...

जाईजुई, मेधा प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पहीलीच (अर्धी सत्य) कथा आहे... सांभाळून घ्या... सूचना प्रतिसाद जरूर कळवा... सुधारणा करता येईल. Happy

सही.................
तुमच्याशी १००% सहमत आहे..............
कारण ज्या काही चुका हल्लीच्या मुली प्रेमापायी करत आहेत त्याना उघडपणे सागणे समजावणे सध्याची गरज आहे. प्रेम हा मुलासाठी खेळ झाला.
हे सर्वासाठी नसुन त्या लोकासाठी आहे जे प्रेमाला टाईमपास समजतात. आणि अश्यावेळी मुलिची साथ सोड्तात जेव्हा तीला खरच प्रेमाची गरज असते.
मनापासुन अभिनन्दन आपले.
निवड्क दहात पहीलीच कथा...........
पु.ले.शु.

हळवा विषय! हृदय आणि मेंदूतलं द्वंद्व! आंधळ्या प्रेमापोटी मुलीला आणि तिच्या घरच्यांना लग्नाच्या ''बाजारात'' काय काय सहन करायला लागतं ते चांगलं मांडलं आहेस! पु. ले. शु. Happy

कथा खुप आवडली.
असे प्रकार आजुबाजुला खुप पाहिलेत. प्रेम विवाहातही आई वडिलांचे मन मोडायला नको म्हणुन हक्काने मानपानाची अपेक्षा ठेवणारे, घरच्यांबरोबर बसुन देण्याघेण्याच्या याद्या करणारी मुले पाहिली की कीव करावीशी वाटते.
मुलीच्या आईवडिलांना मान न देणारे, अपमान करणारे महाभाग हे सोईस्करपणे विसरतात की आपण ही कधी वधुपित्याच्या भुमिकेत असु शकतो.

किती सुंदर हाताळली आहेस गं कथा तू, dreamgirl...

आणि खरंच अशा असहाय्य मुलींची एक जमातच आहे...सगळ्या जगात आहे. खरंतर मुलीच नाही तर कित्येक मुले सुद्धा अशीच अगतिक असतात...आपल्या मनात जपलेल्या जीवनसाथीदाराची प्रतिमा प्रत्यक्षातल्या ज्या व्यक्तीसोबत जुळेल, त्या व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करता यावं म्हणून वाट्टेल ती तडजोड करायला आणि सगळ्या घरादाराशी नातं तोडायला तयार असतात ही मंडळी...म्हणूनच तर त्याला आंधळं प्रेम म्हणतात ना! आता त्यांच्या सुदैवाने तो(/ती) जोडीदार चांगला निघाला तर ठिक... नाहीतर काय होतं हे आपण अनुभवतोच...

आणि जाईजुईला अनुमोदन...जोडीदार चांगला आहे की नाही, त्याचे आपल्यावर खरे प्रेम आहे की नाही, ह्याचे सिग्नल्स मिळतच असतात सर्वांना. त्याच्या प्रत्येक कृतीतून ते व्यक्त होत असतात. ते ओळखूनसुद्धा त्याकडे दूर्लक्ष करणारी मंडळी म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसणारीच म्हणायला हवीत. जोवर हा विश्वास जागृत होत नाही, तोवर अशी जमात नष्ट होणे अवघडच आहे.

सप्तपदीवेळी आयुष्यभराच्या साथीच्या शपथा घेतल्यावर तेवढ्या साथीची आशा तर करू शकते ना... >>>>> अशा माणसाकडुन साथीची अपेक्षा ?

ड्रिमगर्ल खरच खुप छान आणि प्रभावी मांडणी आहे कथेची . आपल्या समाजात मुलीच्या आई-वडीलांना आजही मानहानी सहन करावी लागते कारण केवळ ते मुलीचे जन्मदाते आहेत म्हणुन. चला आपण आपल्यापासुन सुरुवात करुयात आणि या प्रथा बदलुयात.

लग्न झाल्यानंतरही मुलींना कितीतरी प्रोब्लेम असतात. आज आई-वडिल मुलाचा हट्ट न करता मुलींनाच मुलगा समजुन वाढवतात. पण लग्न झाल्यावर आई-वडिलांना संभाळण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी किती जणींना झगडावे लागते ? पाठींबा, सहकार्य मिळणे तर सोडाच, मुलीनेही आई-वडीलांच्या संपर्कात राहीलेले यांना आवडत नाही. असो. हा एक वेगळा आणि खुप मोठा विशय होउ शकतो. मी खुप भाग्यवान आहे या बाबतीत. पण आजुबाजुला खुप उदाहरणे बघायला मिळतात. आपणच आपल्या पुढच्या पिढीला शिकवण देताना या गोष्टी लक्षात घेउयात.

अरूंधती, एक फूल, मयूरी, प्राजक्त, गौरी, सानी, चिमुरी, सुर्यकिरण, वैशाली, मनापासून धन्यवाद.

मयूरी, प्राजक्त, अभिनंदन, लढा देण्यासाठी, चूका वेळीच सावरण्यासाठी आणि नव्या लढवैय्या सिंधूला अंगिकारल्याबद्दल.

मयूरी वेळीच सावध होणं खूप कमीजणींना जमतं. स्वतःचा आत्मसन्मान आणि आपल्या जन्मदात्यांचा योग्य तो मान ठेवणं आपल्याच हातात असतं, कुठल्याही कारणासाठी तो पायदळी न तुडवू देणे, गेल्यास त्यासाठी त्याविरोधात लढणे हेही आपलंच कर्तव्य असतं...

सानी, जाईजुई, खरंय, असे सिग्नल्स मिळतात्च, पण प्रेमांधळ्या मुली त्याकडे सपशेल दुर्लक्ष करून मागाहून पस्तावतात... मग अरूंधतीने म्हटल्याप्रमाणे हे मन आणि हृदय यातील द्वंद्वात स्वताची आणि घरच्यांची फरफट करून घेतात.

आपणच आपल्या पुढच्या पिढीला शिकवण देताना या गोष्टी लक्षात घेउयात.>> वैशाली अग्दी बरोबर!
महाभाग हे सोईस्करपणे विसरतात की आपण ही कधी वधुपित्याच्या भुमिकेत असु शकतो.>> गौरी, ज्यांना मुलगी नसते, ते या वेदना, ही परवड, मुलीचे, वधूपित्याचे दु:ख नाही समजून घेऊ शकत.

अर्थात सगळेच असे नसतात. माझ्या सासर्‍यांचाही विरोध होताच आमच्या लग्नाला. पण माझा नवरा हटूनच बसलेला, मुलीला बघा भेटा. मी त्यांना भेटल्यावर... विचार करतो म्हणाले, रात्री हळवे होऊन म्हणाले, माझी मुलगी असती तर मी तिला असं वागवू दिलं असतं का? जातीतल्या लग्नात काय माहीत कशी भेटेल आत्ता निदान दोघं एकमेकांना समजू शकाल सांभाळू शकाल. तिघांच्या आयुष्याचं नुकसान कशाला करू मी? असेही वरपिते आहेतच की काही ... Happy ही लेखाची दुसरी बाजू झाली.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार. Happy

छान लिहिलय... हळवा विषय!

((अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." )) मोगलाई आहे काय ?

((आपल्या समाजात मुलीच्या आई-वडीलांना आजही मानहानी सहन करावी लागते कारण केवळ ते मुलीचे जन्मदाते आहेत म्हणुन.)) खरच हे खुप दु:खद सत्य आहे...

रेशमा, कविता धन्यवाद!

((अचानक म्हणालास, "म्हण, माझा बाप नालायक आहे..." )) मोगलाई आहे काय ? >> मुलीला टॉर्चर करायचा विकृत प्रकार... मानी मुलगी असती तर याआधीच कानफटात लावून सोडून गेली असती... एवढ्या उशीरा डोळे उघडून काहीच फायदा नाही... असो...

((आपल्या समाजात मुलीच्या आई-वडीलांना आजही मानहानी सहन करावी लागते कारण केवळ ते मुलीचे जन्मदाते आहेत म्हणुन.)) खरच हे खुप दु:खद सत्य आहे...>> सत्य बर्‍याच प्रमाणात बदलतेय सुखद रित्या तरीही आयुष्याच्या कुठल्यातरी वाटेवर अशी प्रेमांधळी सिंधू भेटून जाते...

ही झाली प्रेमविवाहातील सिंधू... अमच्या शेजारी एक गुजराती काकू राहयच्या आता सत्तरीला पोहोचल्या. नवरा वेगळा राहतो पटत नाही म्हणून. काडीमोड घेतला नाहीय रीतसर... शनिवारी वगैरे आला की भांडण, मारामारी शिव्यागाळी अजूनही. दोघेही इतरांशी हसून खेळून असतात... पण परस्परांशी साता जन्मांचे वैरी असल्यासारखे. मी विचारलं मग वेगळे का नाही झालात, तर वडीलांनी लग्न लावून दिलं, मागच्या बहीणींची लग्न आहेत... जमवून घे... मग मुलं झाली, त्यांच्यासाठी... पण दोघांनीही हा विचार नाही केला की ज्या मुलांसाठी म्हणून ते असे मारहाणी करत असे एकत्र राहीलेत, त्यांच्या आयुष्याचं नुकसान झालंय लहानपणापासून या भांडणांमुळे... आणि भांडणं का तर लग्नात मागितलेल्या वस्तू नंतर देईन म्हणून त्या काकूंच्या वडीलांनी त्यांच्या सासरच्यांना म्हणे "फसवलं(!)"

असो घरोघरी... Happy

धन्यवाद सर्वांना.

dreamgirl , हा विषय इतका जिव्हाळ्याचा आहे ना, की परत परत येऊन लिहिल्याशिवाय राहवत नाही आणि सगळ्यांचे प्रतिसाद वाचले की मग आपसूकच नवीनच काहीतरी आठवतं.
आज खास काही सांगावसं वाटतंय.
माझी मावशी आणि आई यांच्या वयात खुप अंतर आहे. त्यामुळे मावशी माझ्या आई-बाबांना तिच्या आई-बाबांच्या स्थानी मानते. मावशीला एक मुलगा विवाहायोग्य वाटला होता आणि त्या मुलाला मावशी. त्या मुलाची आणि माझ्या आई-बाबांची चांगली ओळख. अचानक मावशी आणि त्याचे जमेनासे झाले आणि त्यांनी लग्नही नाही केले.
आत्ता आत्ता मला मावशी कडून त्याचे कारण समजले. तो मुलगा माझ्या बाबांविषयी एकेरीवर येऊन अनादराने बोलायचा मावशीशी गप्पा मारतांना. बहुतेक असाच विकृत माणूस असावा... आपल्यासाठी ही मुलगी काय काय सहन करेल याची परिक्षा घेत असावा.
मावशीला भयंकर राग आला त्याचा. सिग्नल्स ओळखणार्‍या महान लोकांपैकी ती एक होती ना. धुडकावून लावलं तिने सरळ त्याला. काय अभिमान वाटला मला तिचा!!! एकिकडे मुली स्वतःच्या वडिलांचा झालेला अपमान गिळून त्या मुलाबरोबर संसाराची स्वप्ने पाहातात तर दुसरीकडे माझ्या मावशीसारखे लोक जे आपल्या मेहुण्यांचा अनादर म्हणजे वडिलांचा असे समजून योग्यवेळी जागे होतात.

आपल्यासाठी ही मुलगी काय काय सहन करेल याची परिक्षा घेत असावा.>>
अगदी बरोबर सानी.

मलाही अभिमान वाटला तुझ्या मावशीचा Happy

<< वेळीच सावध होणं खूप कमीजणींना जमतं >>.... खरय॑..... पण हे कस॑ ठरवायच की कुठली वेळ बरोबर होती आणि आता उशीर झालेला आहे?... ह्या मधे बरेचदा मुलगी होरपळल्या जाते मग॑ आपली चुक कधिही लक्षात येउ देत्.....एकदा का तडा गेला की तेच प्रतिबि॑ब परत कस दिसु शकेल....

ह्या मधे बरेचदा मुलगी होरपळल्या जाते मग॑ आपली चुक कधिही लक्षात येउ देत्.....एकदा का तडा गेला की तेच प्रतिबि॑ब परत कस दिसु शकेल....>> मयूरी, अगदी खरंय.

हे कस॑ ठरवायच की कुठली वेळ बरोबर होती आणि आता उशीर झालेला आहे?>> सावरलं तर कुठलीही वेळ बरोबर आणि नाही सावरू शकलो तर कुठलीही वेळ चूकीची. पण हे ही खरंच की कधीही गेलेला तडा प्रतिबिंब पूर्वीसारखं नाही करू शकत, पण आणखी तडे जाऊन अस्तीत्व संपवण्यापासून वाचवू जरूर शकतो. Happy

खुप मस्त लिहीलंय...जाईजुई आणि सानीला अनुमोदन...ते चूकीचे सिग्नल्स ओळखणं खुप महत्वाचं असतं..मा़झ्या बाबतीत माझ्या आई-डॅडींनीच मदत केली होती माझी चूक लक्षात यायला..अगदी उत्तम शब्दात सगळं मांडलय..

हे कस॑ ठरवायच की कुठली वेळ बरोबर होती आणि आता उशीर झालेला आहे?>> जब जागो तब सवेरा Happy better late than never
बाकी विषय वेगळा आहे आणि चांगला मांडलाय.
प्रत्येकाच्या हातुन चुका होतातच , ठरवुन लग्नातही असे घडु शकतेच , तेव्हा प्रथम स्वतःची चुक झालेली लक्षात येताच , स्वतःला माफ करणे महत्वाचे. आणि लक्षात येताच चुक सुधारण्याचा सगळा प्रयत्न करायलाच हवा.
कधी कधी काही गोष्टी चुका करुनच शिकता येतात. प्रेमाला एकंदरीतच फार ग्लोरिफाय करुन ठेवले आहे. त्याची larger than life अशी प्रतिमा बनवीली गेलेली आहे. 'प्रेमासाठी वाट्टेल ते' ई. मधुन. पण प्रेम हे आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा असले तरी 'संपुर्ण आयुष्य' नाही हे सत्य असे अनुभव शिकवुन जातात.

खुप छान लिहिलेस..

हल्लीच्या हल्ली अशा दोन केसेस ऐकल्या. Sad
एकातला मुलगा इतका नालायक निघालाय की प्रेमलग्नानंतर दोन महिन्यातच मुलीला सोडुन आता कोर्टात 'हे लग्न मला फसवुन झाले, सबब ते रद्द करा व मला सिंगल हे स्टेटस द्या' असा अर्ज करुन मोकळा झालाय. मुलगी शिकलेली, सुंदर सुस्वभावी, पण तेव्हा घरच्यांनी आणि मैत्रिणींनी हजारदा समजाऊनही कान आणि डोळे बंद करुन बसलेली.. Sad

माणुस नकळत आपला मुळ स्वभाव कसा आहे याचे सिग्नल्स वागण्यातुन देत असतो. प्रेमात पडलेले ते सिग्नल्स पाहुनही तिकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पस्तावतात.

ड्रीमगर्ल,

छान लिहला आहेस लेख. होणारा नवरा आपल्या घरच्या सर्व लोकांशी कसा वागतो याच नीट निरीक्षण केल तर त्याच्या स्वभावाबद्दल बरच कळत. आदर, आपुलकी याची नाटक करता येत नाहीत. मात्र त्याचप्रमाणे मुलाच वागण खटकल तर यू टर्न मारायला धाडस लागत, मनाची प्रगल्भता लागते.

Pages