१)http://www.maayboli.com/node/4355
२)http://www.maayboli.com/node/10245
४)http://www.maayboli.com/node/29012
३) लुई द ओन्ली वन
शनिवार सकाळ....लुई जिवाच्या आकांताने भुंकतोय. इतक्या सकाळी कुणावर भुंकतोय म्हणून जरा डोकावले तर रस्त्यावरून जैन धर्मगुरू आणि साध्वीजी चाललेले दिसले. आमच्या शेजारी एक आणि समोर २/३ अशी मारवाडी समाजातील कुटुंबं रहातात. त्यांच्याकडे हे साधू दर शनीवारी सकाळी येतात. हे जैन साधू जरा वेगळेच दिसतात ना! त्यांच्या तोंडावर पांढरी पट्टी असते. आणि पूर्णपणे पांढरा असा पेहेरावही वेगळाच असतो. हातातही काही तरी अनोळखी गोष्टी असतात. लुईला ते अगदी आवडत नाहीत.
दर शनिवारचा हा सकाळी साधारणपणे सहा साडेसहाचा एपिसोड असतो.
पुतणी म्हणते, ''काकू अगं ते त्याला आपल्या कळपातले वाटत नसतील बहुतेक! दादा तर म्हणतो त्याला आपणच सगळे त्याच्या कळपातले वाटतो. कारण तो बाहेरच्या कुत्र्यांमधे कधी मिक्सपच होत नाही ना!''
असो.... तर ते साधू आले की हा अगदी चवताळून भुंकतो. आणि ते जसे बाहेरून पुढे पुढे जात रहातील तसा तो आधी मोठया गेटपाशी भुंकत रहातो नंतर छोटया गेटपाशी. अश्या त्याच्या रागारागाने भुंकत चकरा चालू रहातात. ते साधू नजरेआड होईपर्यंत!
सकाळी सात वाजता त्याला फ़िरायला नेण्यासाठी शरद येतो. तो कुठून येतो त्याला बरोब्बर माहिती असते. छोटया गेटकडे तोंड करून वेगवेगळे आवाज काढत त्याची वाट पहात रहातो. तो आधी छोटया गेटकडून येताना दिसतो. तिथून तो मोठया गेटमधून आत येईपर्यंत लुई अगदी घर डोक्यावर घेतो. मग शरद आत येतो आणि त्याचा लालचुटुक पट्टा हातात घेतो. मग गेटपर्यंत जाईपर्यंत तो पट्टा लुई स्वता:च स्वता:च्या तोंडात धरून वेडयावाकडया उडया मारत गेटपर्यंत जातो. मग शरद त्याला पट्टा अडकवतो व मग महाराज फ़िरायला जातात.
अर्धा एक तास फ़िरून घरी आल्यावर तो हात पाय धुतल्या शिवाय घरात जात नाही. म्हणजे काय? अहो...... आमच्या कुत्र्याला चांगलं वळण आहे! अंगणातील एक बराच मोठा भाग जाळी आणि जाळीचं दार टाकून बंदिस्त केला आहे. ती लुईची टेरीटरी आहे. तेवढया भागात महाराज अगदी सुखेनैव संचार करत असतात. तिथेच एक नळ आहे. त्या नळाखाली एक प्लॅस्टिकचा टब आहे. तो आम्ही कायम भरून ठेवतो. त्याच्या शेजारी एक मातीचं मोठया तोंडाचं भांडं आहे. त्याचा माठ म्हणा ना! तर साहेब माठातलं पाणी पितात आणि टबच्या पाण्यात हातपाय धुतात.
ते त्याचं बाहेरून आल्यावरचं हातपाय धुणं अगदी बघण्यासारखं असतं. पुढचे दोन पाय तो टबमधे ठेऊन आधी तो पद्ध्तशीर उभा रहातो. स्वता:ला सेटल करतो. नंतर पुढच्या पायांनी अक्षरश: माती खणल्यासारखं पाणी खणतो आणि दोन्ही पायांनी स्वता:च्या पूर्ण अंगावर मस्तपैकी पाणी उडवून घेतो. इतका जोर लावतो की ते पाणी अंगणात किती तरी दूर वहात जातं. ही त्याची अॅक्शन इतकी सिंक्रोनाइज्ड असते की अगदी पहात रहावंस वाटतं. हा कार्यक्रम १/२ मिनिटे चालतो. नंतरच तो घरात येतो.
नाही हो SSSSS.वळण बिळण काही नाही. खूप फ़िरून आल्यामुळे त्याचे तळवे गरम होतात ते तो थंड करतो.
त्याला आम्ही तो २ महिन्यांचा असताना आणला. ओंजळीत मावत होता. अगदी गुटगुटीत!
तेव्हा मी मुलांसाठी नगर पुणे करायची आणि कुत्रं आणूया ...हा हट्ट पुतणीचा. त्यामुळे जेव्हा माझं मत विचारलं गेलं तेव्हा मी म्हटलं, '' मी तर येऊन जाऊन असते.तेव्हा त्याचं तुम्हालाच करावं लागेल. खूप करावं लागतं कुत्र्याचं.'' ... जाऊ तर एकदम विरोधात होती. (जरूर पहा http://www.maayboli.com/node/10245 "पाहुणा") पण पुतणीसाठी त्याचं आगमन झालं.
नंतर मुलांची शिक्षणं वगैरे झाल्यावर मी कायमचीच नगरला आले. तोपर्यंत लुई चांगलाच मोठा झाला. आकाराने!!!! डोक्याने किती झाला देवाला माहिती!
एकदा गंमतच झाली. माझी एक डॉग हेटर(डॉग लव्हरच्या उलट) मैत्रीण आली होती.
कुत्री(अनेकवचन) आवडत नसल्यामुळे तिला या गोड प्राण्यांबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे आम्ही सांगतो ते सगळं तिला खरं वाटतं! तिलाही लुई हात पाय धुतल्याशिवाय घरात जात नाही असंच वाटतं....घरच्या चांगल्या वळणामुळे!
तसाच तिचा दुसरा गैरसमज....
एकदा ती आली असता आम्ही हॉलमधे बसलो होतो. बाहेर पाउस सुरू झाला.
पण हे महाराज पावसात भिजत नाहीत. त्याला आवडत नाही. लगेच व्हरांडयात येतात. दुसरी एक गंमत म्हणजे.... मी दिसले की लुईला वाटते आता काही तरी खेळायचे. आणि माझी जाऊ दिसली की त्याला वाटतं आता काही तरी खायला मिळणार. कारण तीही फ़क्त त्याला खायला द्यायचंच काम करते. तिला ते कुत्र्यांचे लाड करायचे त्यांच्याशी खेळायचं वगैरे काही जमत नाही. त्यामुळे मी दिसले की तो त्याचं बसायचं पोतं, बॉल काहीही खेळायची वस्तू भराभरा घेऊन येतो. त्याला वाटतं आता खेळायचं....तर सांगायची गोष्ट ........बाहेर पाउस सुरू झाल्यावर त्याला दिसला तो त्याचा टॉवेल...व्हरांडयाच्या कट्ट्यावर ठेवलेला..............भराभरा घेऊन आला. आता त्याने तो टॉवेल आणला होता खेळण्यासाठी. त्याने तो तोंडात धरायचा आणि मी त्याचं दुसरं टोक ओढायचं. तो शेवटपर्यंत तोंडातलं सोडत नाही.... ओढत रहातो. त्याला मजा येते.
पण मैत्रिणीला वाटलं...''हा जसं बाहेरून आल्यावर हातपाय धुतो तसंच पावसात भिजून आल्यावर टॉवेल घेऊन येतो आणि अंग पुसून घेतो( हो बाई....इतकं वळण लावलय यांनी कुत्र्याला.........!)''
आम्हीही तिची गैरसमजूत ...नव्हे खात्रीच ...आमच्या संस्काराबद्दलची ....तशीच ठेवली. असतं एकेकाचं कुत्र्यांबद्दलचं अज्ञान........काय करणार?
लॅब्रेडॉर हा कुत्रा मूळचा कॅनडातल्या(?) लॅब्रेडॉर या समुद्र किनारा असलेल्या गावातला. तिथल्या मच्छीमार कोळ्यांना माश्यांनी भरलेलं जाळं ओढायला ही कुत्री मदत करायची अशी माहिती कुठे तरी जालावर वाचनात आली होती. तेव्हा लक्षात आलं की याचं जी ती गोष्ट...पोतं, फ़डकं .....ओढण्यातलं मूळ कशात आहे ते! त्याला कोणतीही गोष्ट दातात धरून ओढायला फ़ार मजा येते. अज्जिबात सोडत नाही.अगदी जीव खाऊन ओढत रहातो. अर्थातच तो एकटा कसा ओढणार ना? तुम्ही दुसरं टोक ओढावं लागतं.
मांजरी त्याच्या कट्टर वैरी. अगदी खानदानी दुष्मनी! आमच्या आवारातून सतत मांजराची ये जा चालू असते. त्यांना पण पक्कं माहिती आहे. हा येडा कितीही भुंकला तरी तो बाहेर येऊन आपल्याला पकडू शकत नाही. काही काही तर मांजरी तर इतक्या चॅप्टर असतात.......खुशाल त्याच्या समोरून शांतपणे चालत जातात.
रोज संध्याकाळी ऑफ़िसमधला शेवटचा स्टाफ़/क्लाएंट गेल्यावर आम्ही गेटला कुलूप घालतो आणि लुईला मोकळं सोडतो. आमचं घर आणि ऑफ़िस एकाच कंपाउंडमधे आहे. सुटल्याबरोबर जोरात पळत आधी गाड्यांच्या खाली वास घेतो. अगदी हायपर होउन सगळ्या गाडयांच्या खाली तोंड घालून जोराजोरात फ़ुसफ़ुस करत वास घेत रहातो. एकदा खात्री झाली की गाडीखाली मांजर नाहीये........मग बागेत लॉनमधे शू (नाही नाही...शी नाही करत ...सकाळी शरद त्याला बाहेर नेतो तेव्हा बाहेरच करून येतो.... ) वगैरे उरकतो, मग आम्ही दोघे अंगणात चकरा मारतो. तेवढयात जर कोणी ऑफ़िसच्या कामासाठी आलं तर त्याला आधी पट्टा लावून मगच गेटचं कुलूप काढायचं !
कधीकधी मांजरी पण त्याला चकवतात. एकादे मांजर गाडीखालीच असते. पण त्या मांजराला माहिती असते की हा काही गाडीखाली येऊ शकत नाही. ते मांजर बरोब्बर त्याला गुंगारा देऊन बंदुकीच्या गोळीसारखे गेटखालून पळून जाते. हा बसतो अजून गाडीखालीच नाक घालून!मग जेव्हा त्याच्या लक्षात येते आपल्याला चुकवण्यात आलेले आहे तेव्हा अगदी चिडतो आणि भुंकत बसतो.
लपाछपी तर इतकी मस्त खेळतो.......या खेळात बहुतेक तीनच गडी असतात. मी, पुतणी(मैथिली) आणि लुई! त्याला मोठया गेटपाशी सोडायचं... तिथंच गुंतवायचं........तोपर्यंत मैथिली लपते. मग मी अगदी ठेवणीतला सीक्रेट आवाज काढते ...अगदी कुजबुजल्यासारखा.." लुई मैथिली कुठाय? शोध शोध....!" की साहेब एकदम ऐटीत, दुडक्या चालीने मोठया गेटपासून सुटतात. जणू काही त्याच्यावर फ़ार मोठी जबाबदारी सोपवली आहे. तो मैथिलीला कसा शोधतो ते अगदी पहाण्यासारखं असतं! आधी गाडयांखाली नाक घालतो.......अहो, असं काय करता?..अहो SSSSS.......त्या वैरिणी(मांजरी!) नाही का लपत गाडीखाली?
घराच्या आणि ऑफ़िसच्या मधे एक फ़्लाइंग स्पॅरोचा मोठा वाफ़ा आहे. तो अगदी गच्च भरलेला असतो. त्याच्या पानांपलिकडचं काहीच दिसत नाही. मग हा त्याच्याही पलिकडे जाऊन शोधतो. कधीकधी मैथिली त्याला चकवते. मग हा बावचळलेला चेहेरा करून दुडक्या चालीने पळत शोधत रहातो.
कधी कधी अगदी बरोब्बर शोधतो. तेव्हा प्रोसेस संपल्याचा आनंद अगदी त्याच्या चेहेर्यावर झळकत असतो. आणि म्हणत असतो, ''कशी सापडली!'' मग ती सापडल्यावर अगदी तिला मिठया मारून चाटून बेजार करून टाकतो.
दर रवीवारी त्याला फ़ीस्ट असते. मागील दारी ऑफ़िसवापरासाठी असलेल्या गॅस शेगडीवर त्याचं मटण शिजतं. त्याच्या शिट्ट्या सुरू झाल्या आणि वास यायला लागला की भुंकून भुंकून परिसर डोक्यावर घेतो. त्याच्यासाठी एक सेपरेट जुना कुकर ठवलेला आहे. तसाही या कुत्र्यांचा घर रक्षणासाठी वगैरे काही उपयोग नसतोच. कारण हे फ़क्त दिसतात मोठे आणि भीतिदायक! पण फ़ारच प्रेमळ असतात.( मला तर कुठलंच कुत्रं कधीच भीतिदायक वाटत नाही. उलट सगळी कुत्री खूप गोड दिसतात.)
तर रविवारी एकदा का लुईसाहेब सामिष भोजन करून व्हरांडयात आडवे झाले की त्यांना एकदम सुखाचा साक्षात्कार होतो. आणि ते ट्रान्समधे जातात. जे ताणून देतात......संध्याकाळच्या खेळाची सुद्धा त्यादिवशी त्यांना फ़ारशी इच्छा उरलेली नसते.
त्याला एकटं रहायला आवडत नाही. जाऊ, पुतणी वगैरे मंडळी बाहेर पडताना दिसली की तो वर बघून भुंकायला लागतो. मग मला जावंच लागतं!
घरातल्या सगळ्यांची चाहूल त्याला खूप आधी लागते. माझा लेक येण्याआधी पाच मिनिटे तो अस्वस्थ असतो ...विचित्र आवाज काढतो. मग लेक आला की आम्हाला कळतं की लुई का ओरडत होता.
माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी लुईची काय व्यवस्था करायची यावर खूप खल झाला. कारण आम्हाला दोन दिवस घर बंद करायला लागणार होतं. शेवटी दीरांनी एक कुत्र्यांचं पाळणाघर शोधून काढलं. त्याला तिथली सवय व्हावी म्हणून एक दिवस मुक्रर करण्यात आला.
सकाळीच साश्रु नयनांनी लुईची पाठवणी करण्यात आलीं. नाही नाही ....अहो साश्रू नयन लुईचे नव्हेत....पुतणी, माझा लेक यांचे! कारण लुईला तर पुढच्या संकटाची काहीच कल्पना नव्हती. सोडायला दीर, मुलगा, पुतणी सगळे गेले होते. त्याला सोडून आले तेव्हा त्यांचे चेहेरे बघवत नव्हते. आधीच्या प्लॅनप्रमाणे त्याला तिथे किमान दोन दिवस तरी ठेवायचं होतं. दुसरा दिवस उजाडला...कसा तरी गेला...संध्याकाळी मुलगा आणि पुतणी लुईला बघून येऊ म्हणून तिकडे पाळणाघरात गेले. आणि त्याला घेऊनच घरी आले. शेवटी लग्नाच्या वेळी लुईला घरीच ठेवायचं आणि शरदलाच(त्याला फ़िरवणारा मुलगा) त्याच्या बरोबर रहायला ठवायचं ठरलं. कारण तिकडे पाळणाघरात गेल्यावर लुईला भेटल्यावर पुतणीने रडायला सुरवात केली होती. माझा मुलगाही अस्वस्थ झाला होता. घरी आल्यावर तो मला सांगत होता, ''आई अगं त्याची तिकडे हवाच गेली होती. वेगवेगळ्या पिंजर्यात खूप कुत्री होती आणि हा खूप बावचळलेला होती. त्याला परत कधीही तिकडे ठवायचं नाही........आपण काहीही व्यवस्था करू!''
(हा फोटो खास दक्षिणासाठी!)
तर असा हा आमचा लुई द ओन्ली वन..........तेरावा किंवा चौदावा नव्हे.
सर्वात शेवटचा किस्सा........आमच्या घराच्या हॉलमधे मी सकाळी योगासनं, प्राणायाम करते. तेव्हा नवरोबा पोहायला जातात. मधल्या काळात शरद येतो ..लुईला घेऊन तो फ़िरायला जातो. पण त्या आधीच त्याला मोकळं सोडलेलं असतं. तो खाली अंगणात बागडत असतो. परवा लुई हट्ट करून वर आला. आता मी कसली आसनं करते...कारण त्याच्यासमोर असं काही केलं की त्याला वाटतं मी त्याच्याशी खेळतीये. तो लगेच अंगावर उडया मारायला सुरवात करतो. आणि त्याचं वजन इतकं आहे की बेसावध असताना त्यानं जर अंगावर उडी मारली तर हाड बीड मोडण्याची शक्यता.
नवरोबा आले त्यांची पोहोण्याची पिशवी घेऊन. आता लुईला वरच ठेवणं भाग पडलं ...नाहीतर नवरोबांना त्यानं जाऊच दिलं नसतं. शेवटी लुईला धरून ठवलं ...मग ते गेले पोहायला. मी दाराला बोल्ट लावून टाकला. जरा इकडे तिकडे करून तो बसला सोफ़्याजवळ. तो बसला म्हणून मी माझी सतरंजी टाकली व त्यावर बसले. तर तोही आपली जागा सोडून माझ्या समोरच्या भिंतीला टेकून बसला. अगदी माझ्यासमोर! शांतपणे! पुढचे पाय सरळ उभे....बूड फ़क्त टेकवलेलं......शांत बसला. म्हणून मीही चान्स घेतला. म्हटलं बघू प्रणायाम करायला जमतंय का....! मी नेहेमीप्रमाणे आधी अनुलोम विलोम प्राणायाम केला. नंतर ओंकारासाठी दीर्घ श्वास घेतला...डोळे मिटले....श्वास सोडताना ओ.....म म्हणायला लागले..तर लुईनेही त्याच बसलेल्या अवस्थेत तोंड वर करून सूर लावलेला.............. ऊ SSSSSS..ऊSSSSSSS....!पाहिलं तर चेहेरा अगदी सीरियस!
मी डोळे उघडले आणि इतकी हसले......आसनं बिसनं सगळं राहिलं बाजूला.
मला ती माझी मैत्रिण आठवली. डॉग हेटर.........आता तिला वाटेल, '' अरे, यांच्या कुत्र्याला इतकं घरचं चांगलं वळण आहे की तो सकाळी सकाळी ओंकार करतो!''...... कल्पनेनंच मला इतकं हसू आलं. खरी गोष्ट काय आहे...कुत्र्यांना जर एकदम असे काही वेगळे आवाज आले तर ते लगेच त्या आवाजाला साथ देतात. त्यावेळी ते इतके क्यूट दिसतात.........मान पूर्ण वर केलेली आणि अगदी मनापासून सूर लावलेला! गाताना एकाद्या कसलेल्या गवयासारखे अधून मधून माना वाकडयाही करतात.
आमच्या समोर एक कुटुंब रहाते. त्यांच्याकडे कधीतरी भजनांचा कार्यक्रम असतो. तोही लुईला आजिबात आवडत नाही. खूप रागारागाने भुंकतो. पण खरंच सांगते...ते सगळे खूपच बेसूर गातात.
एकदा आम्ही अंगणात खुर्च्या टाकून बसलो होतो. तेव्हा लुईला मोकळं सोडलेलं होतं. लेकही पुण्याहून आलेला होता. त्याने एक विशिष्ठ अशी शिट्टी मारली त्याबरोबर लुई त्याच्या त्या दुडक्या चालीने, अगदी आनंदात शेपटी हलवत, भराभरा गेटकडे गेला. अगदी लहान मूल बरोबरीच्या दुसर्या लहान मुलाकडे जाते तस्सच! मी म्हटलं, "अरे हा तिकडे कुठे गेला?"
त्यावर लेकाने दिलेले स्पष्टीकरण मजेशीर होते.तो म्हणाला, ''अगं...ही शिट्टी त्याला वाटते... त्या दुसर्या कुत्र्यासाठी आहे. म्हणून तो गेटपाशी त्या दुसर्या कुत्र्याला पहायला जातो.'' आणि जेव्हा जेव्हा लेक तीच विशिष्ठ शिट्टी वाजवतो तेव्हा तेव्हा लुई प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने त्या "दुसर्या कुत्र्याला" पहायला गेटकडे धावतो.
आणि त्याला स्वता:ला बोलावण्यासाठीची एक वेगळी शिट्टी आहेच. तेव्हा बरोब्बर सुसाट धावत येतो. आहे की नाही गंमत?
तर आता लुई महाराज वयात आलेले आहेत. तर हळूहळू वधू संशोधनाची तयारी चालू आहे.................!
मानुषी, फोटोंबद्दल थँक्स गं.
मानुषी, फोटोंबद्दल थँक्स गं. सहीच आहे लुई. पहिल्या फोटोत त्याचे डोळे कसले चमकतायत.
निंबू आणि आडो......बरं वाटलं
निंबू आणि आडो......बरं वाटलं गं तुम्ही फोटो पाहिलेत म्हणून.....किती खटपटी केल्या मी या फोटो साठी!
आणि निंबे.......ओंकाराचं काही सांगता येत नाही(कितीही चांगलं वळण लावा...........रोज करेलच याची गॅरंटी नाही!)..पण हातपाय धुतानाची व्हिडिओ क्लिप मात्र कधी ना कधी टाकीनच!
मानुषी, मस्तच आहे तुमचा लुई!
मानुषी, मस्तच आहे तुमचा लुई! आणि मस्त लिहीलंय तुम्ही
मानुषी, मी तुला परवाच हे
मानुषी, मी तुला परवाच हे विचारणार होते की फोटोंच्या साईजमुळे ते टाकता येत नसतील, पण तू लिहीलं होतंस की तू या आधीही फोटो अपलोड केलेयस. असो.
मस्त लिहिलय! लुई एकदम आवडला!
मस्त लिहिलय! लुई एकदम आवडला!
धन्यवाद आर्बिट, शैलजा. हो आडो
धन्यवाद आर्बिट, शैलजा. हो आडो साइजचाच प्रॉब होता.
कशं गोड गं
कशं गोड गं
किती गोड गं तो प्रतिसाद!
किती गोड गं तो प्रतिसाद!
गोड आहे चारी पाय वर करुन
गोड आहे
चारी पाय वर करुन झोपण्याची स्टाइल फार खास असते बर्का. आमची मांजरं पण अशी झोपतात. एक बोका होता त्याला तर बेडवरुन उचलुन खाली टाकला तर जिथे टाकला असेल तिथेच पाय वर करुन झोपून जायचा 
खरंच गोडू आहे लुई.
खरंच गोडू आहे लुई.
मस्त. हँडसम दिसतोय लुई!
मस्त. हँडसम दिसतोय लुई!
मस्तंय लुई एकदम!!
मस्तंय लुई एकदम!!
मस्तच आहे ग लुई. खूप आवडतात
मस्तच आहे ग लुई. खूप आवडतात कुत्रे आणि मांजरं मला.
चला बै........मला खूप बरं
चला बै........मला खूप बरं वाटलं........सर्वांनी फुट्टू पाहिले बाळाचे आणि प्रतिसादही दिला!
आज लुईसाहेब डेस्कटॉप वर झोपले
आज लुईसाहेब डेस्कटॉप वर झोपले आहेत. व विनी स्वीटी जेलसपणे बघत आहेत.
काय सांगते अश्विनी! ग्रेट!
काय सांगते अश्विनी! ग्रेट!
मस्त लिहिलय! लुई आवडला!
मस्त लिहिलय! लुई आवडला!
धन्यवाद अमया!
धन्यवाद अमया!
मानुषी, लेख आणि लुई आवडला !
मानुषी,
लेख आणि लुई आवडला !
अरेरे....... अनिल टेक इट ईझी.
अरेरे....... अनिल टेक इट ईझी. एक तर हा एक थोडा विनोदी अंगाने जाणारा लेख आहे. आणि मला तसं काहीच म्हणायचं नाही. या माणसांचा अॅपिअरन्स खूप वेगळा असल्याने लुई त्याच्या जन्मजात स्वभावामुळे भुंकतो इतकच. आता पावसाळ्यात रेनकोट घातलेली माणसं येतात. त्यांच्यावरही तो भुंकतो. धोतर, टोपी वगैरे नेहेमीपेक्षा वेगळा पेहेराव केलेल्यांवरही तो भुंकतो. आता धोतर नेसणारी माणसं फारशी नसतात ना! आणि हे नुसते कपडयांवर नसते. या कुत्र्यांना वास घेण्याची क्षमताही प्रचंड असते. म्हणून तर पोलिसात स्निफर डॉग्स जनरली लॅब्स च असतात.
एक गुरखा दर महिन्याला पैसे मागायला येतो. त्याला तर लुईने पाहिलं की इतका भुंकतो ...तो गुरखा आल्या वाटेने पळत निघून जातो . एवढ्यात तर तो आलाच नाही.
माझा स्वता:चा कुठल्याही धर्मातील साधूंच्या पेहेरावावर काहीही आक्षेप नाही. किंवा कोणत्याही धर्माबद्द्ल माझ्या मनात अनादर नाही.
ते फक्त वेगळे दिसतात म्हणून तो भुंकतो.
अनील तुम्हाला ते तेलंगी ब्राह्मण माहिती आहेत का? कानडी भाषिक....काहीतरी केशरी रंगाची वस्त्रे परिधान केलेली असतात. माझे सासरे होते तेव्हा ते त्यांना ऑफिसमधे बोलावून त्यांना बरीच दक्षिणा द्यायचे. ते लोकही काही मंत्रपठण , स्तोत्रे वगैरे म्हणायचे. तेव्हा लुई नव्हता ...आता ते लोक एकदम ६/७ जण येतात........त्यांच्यावरही हा इतका भुंकतो की ....काय विचारू नका.
कृपया गैरसमज नसावा!
भौ भौ ....
भौ भौ ....
मला पण हा अनुभव आहे. आमच्या
मला पण हा अनुभव आहे. आमच्या घरी पँट्वाले कोणी ( कुरीअर/ प्लंबर वगैरे) आले तर कुत्रे भुंकतात. कार मधून जाताना भिकारी, वगैरेंवर भुंकतात. तो त्यांचा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. मी कुत्र्यांना घेऊन शांतपणे एका पार्कात चालत होते तर पार्कात आय्पॉड लाऊन चालणारी बाई आमच्यावर भुंकली होती. हे काय कुत्र्यांचे पार्क आहे का चला फुटा म्हणून. तरी आमच्या दोघींनी त्या पार्कात काहीच घाण वगैरे केली नव्हती. त्या दोघी, गाढव, उंट, म्हैस, कोंबडी वर पण भूंकतात. इतर कुत्रे, मांजर यांच्या मागे पळून त्यांना हाकलतात. हे अगदी नैसर्गिक आहे. कुत्रे पाळणारे लोक जास्त सहिष्णू व इतरांना अॅक्सेप्ट करून घेणारे असतात. ओपन माइंडेड.
मस्त! लुई एकदम आवडला. आता
मस्त! लुई एकदम आवडला. आता नगरला आल्यावर पहायला येणार
छान लिहिलय. लुई आवडला.
छान लिहिलय. लुई आवडला.
छान लेख...कुत्री खूप cute
छान लेख...कुत्री खूप cute दिसतात...(भुंकणे सोडले तर )..जवळचा मित्र/ मैत्रीण हवी असेल तर कुत्रा जरूर आणावा...पण त्याचे करावेसुद्धा तेवढेच लागते..
पाळणाघरातला अनुभव हेलावणारा....प्राणी असला म्हणून काय झालं त्यालासुद्धा भावना असतात आणि खूप काही कळतं...
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अरे वा ...अजूनही वाचताहेत
अरे वा ...अजूनही वाचताहेत ...
वर्षा म, स्वाती २, अनिताताई, शिल्पा बडवे
सर्वांना धन्यवाद.
मायबोलीवर इतके श्वानप्रेमी
मायबोलीवर इतके श्वानप्रेमी भेटतील असे अजिबात वाटले नव्हते. मुळात मी मायबोलीवर खूप कमी लिहिले आहे त्यामुळे येथे चकरा कमी होतात म्हणून असे सुंदर लेख नजरेआड झाले. खूप मजा आली हा लेख वाचून; सगळे डोळ्यासमोर उभे राहीले.
अरे हे मी वाचलच नव्हतं आजवर..
अरे हे मी वाचलच नव्हतं आजवर.. छान लिहिले आहे तुम्ही..
धन्यवाद अजय आणि टण्या. टण्या
धन्यवाद अजय आणि टण्या.
टण्या पण वानूची मजा काही औरच होती.
Pages