घर, परिसर, झाडं वेली, पशु पक्षी इत्यादि! - कडुलिंब आणि बुलबुल -

Submitted by मानुषी on 12 September, 2011 - 11:08

घर, परिसर, झाडं वेली, पशु पक्षी इत्यादि!
४) कडुलिंब आणि बुलबुल
१) http://www.maayboli.com/node/4355

२) http://www.maayboli.com/node/10245

३) http://www.maayboli.com/node/17378

४) कडुलिंब आणि बुलबुल
काही महिन्यांपूर्वी सकाळी साधारण अकराच्या सुमारास एक बुलबुलांची जोडी मला अंगणातल्या कडुलिंबावरून माझ्या सिटाउट मध्ये झेपावताना दिसायची. मला ते दोघे माझ्या स्वयंपाकघरातून दिसायचे. रोज ठराविक वेळेला ही जोडी कशासाठी येते याची मला उत्सुकता वाटायला लागली. दुसर्‍या दिवशी लक्ष ठेवलं. तर ही जोडी अंगणातल्या कडुलिंबाच्या हिरव्या गार विस्तारातून निघून डायरेक्ट गच्चीच्या कॅनॉपीवर लॅंड झाली. या कॅनॉपीवर सिमेंटची एक आयताकृती कुंडी आहे. त्यात निळ्या रंगाच्या छोट्या फ़ुलांच्या रोपांचं रान माजलं आहे. ही फ़ुलं साधारण अंगठ्याच्या नखापेक्षा थोडी मोठी आहेत. सध्या फ़ुलली आहेत. झाड अगदी फ़ुटभर उंचीचं. पण याचे बुंधे जाडीला करंगळीच्याही निम्मे आणि फ़ांद्यांच्या काड्या अगदी चिवट!
तर ही जोडी घरट्यासाठी या झाडांच्या काड्या नेत होती असं लक्षात आलं. या कुंडीच्या काठावर व्यवस्थित बसून माना वाकड्या करकरून, चोचीत काडी पकडून, पिरगाळून तोडून, पुन्हा भरारी मारून ही जोडी कडुलिंबाच्या हिरव्या पसाऱ्यात अदृश्य व्हायची.
त्यांचं घरटं बांधणीचं काम अगदी सिस्टिमॅटिक चाललेलं दिसत होतं.
DSC00854.JPG

काही दिवस यांचं सिटाउटमधे येणं बंद झालं. कधी कधी सकाळी गच्चीतल्या पाण्याच्या टाकीच्या पायथ्याशी बसून चोचीने खाली झिरपणारं पाणी पिताना दिसत.
नंतर काही दिवसांनी कडुलिंबावर याच बुलबुलांची कलकल ऐकू यायला लागली. अगदी बालवाडीच्या वर्गात मुलांचा कसा दंगा ऐकू येतो तसंच! अगदी अखंड, न थांबता अव्याहतपणे! मधेच मोठ्या बुलबुलाचा वेगळाच आवाज यायचा. जणू, "ए थांबा रे....केव्हाची कलकल चाललीये" असं घरातलं वडीलधारं मध्येच दटावतं ना तसंच! बहुतेक बुलबुल जोडीला पिल्लं झाली होती.

DSC00855_1.JPG
हा अंगणातला कडुलिंब इतका गच्च आहे की लांबून या झाडाच्या अंतरंगात काय चाललंय काही कळत नाही. लांबून फ़क्त एक हिरवा गार घुमट दृष्टीस पडतो आणि हा हिरवा गार विस्तार भर उन्हाळ्यातही डोळ्यांना थंडावा देतो आणि अंगणावर थंड गार सावली! याच्या शेजारी पेरूचं झाड आहे. या पेरूच्या बुंध्यावरून निघून कुंपणाचा आधार घेत, या कडुलिंबावर, एक चांगला मनगटाच्या आकाराचा एक वेल चढला आहे. या वेलाने पेरूला अगदी मुळापासून छान विळखा घातला आहे. त्याला निळी पांढरी घंटाकृती आकाराची फ़ुलं येतात, कडुलिंबाच्या नाजुक फ़ुलांबरोबर याही फ़ुलांचा सडा या कडुलिंबाखाली पडलेला असतो. याच कडुलिंबाखाली मागील काही वर्षं पॅशन फ़्रुट्सचाही सडा पडायचा. कारण कडुलिंबावर पॅशन फ़्रूट्सचाही वेल चढला आहे. यंदा काही दिसत नाहीत‘ ही पॅशन फ़्रूट्स!. मागील वर्षी मान वर केली की या कडुलिंबातून लटकलेले हिरवे पिवळे चेंडू पाहून मजा वाटायची. असो...तर कावळे, चिमण्या, कबुतरं, भारद्वाज, कोकीळा, साळुंख्या, होले, फ़ुलचुखे आणि कित्येक पक्षीही या झाडाच्या आश्रयास येतात.
DSC00861.JPG

आता कडुलिंबात कलकल वाढायला लागली होती. पिल्लं मोठी होत असावीत.
परवा अचानकच मी दुपारच्या सुमारास वर आले आणि पाणी पिण्यासाठी सिटाउटमधल्या माठाकडे गेले तर मदनबाणाच्या कुंडीतून काहीतरी फ़डफ़डत उडून गेलं. मीही दचकले. नीट पाहिलं तर चार बुलबुल होते. बहुतेक बुलबुल कुटुंबीय! पुढे गेलेले दोन मोठे आणि मागून कमी गतीने उडणारे दोन छोटे!
नंतर दुसर्‍या दिवशी नीट लक्ष ठेवलं. आणि सगळं पाहून घेतलं.
आधी आई बाबा बुलबुल आपल्या पिल्लांबरोबर येतात. आणि सगळे त्या मदनबाणाच्या कुंडीत स्थिरावतात. मग आई बाबा पिल्लांना तिथेच ठेऊन स्वता: परत कडुलिंबात किंवा इतरत्र फ़िरत रहातात. मग पिल्लं हळूहळू काही तरी हालचाली करत रहातात. बर्‍याचदा चोचीने साफ़ सफ़ाई चाललेली असते. सारखं काय साफ़ करत असतात कोण जाणे. पण मान अगदी संपूर्ण खाली वाकवून गळ्याखालच्या पिसात चोच घालतात ते खूप गोड दिसते! कधी कधी तो मिटलेला जपानी पंखा वारा घेण्यासाठी उघडताना कसा दिसतो..... तशीच काहीशी आपल्या इवल्या पंखांची उघडझाप करत रहातात. कधी कंगव्याने केस विंचरावेत तसं चोचीने पिसं विंचरतात. हळूहळू छोट्या छोट्या भरार्‍याही मारत असतात. पण त्यांचा एरिया त्यांना बहुतेक आई बाबांनी डिफ़ाइन करून दिलेला असावा. आणि उडण्याचीही तितकीशी प्रॅक्टिस झालेली नसावी. म्हणूनच या मदनबाणाच्या कुंडीच्या परिसरातच ही पिल्लं फ़डफ़डत रहातात. आणि बराच वेळ कुंडीतल्या मातीत शांतपणे बसूनही राहलेली दिसतात. बहुतेक सकाळी घातलेल्या पाण्याने त्यांना कुंडीत थंड वाटत असावं! तर काही वेळा कुंडीतल्या मातीत आपल्या इवलाल्या चोची खुपसून काही तरी करत असतात. मी कुकरमधलं तळातलं पाणी, डाळ तांदुळ, भाज्या वगैरे धुतलेलं पाणी, फ़ेकून न देता ते एका बादलीत जमा करते. आणि या सार्‍या कुंड्यात टाकत असते. बहुतेक या बुलबुलांना ते खाद्य मिळत असावं.
पण हे सारं पाहिल्यावर असं वाटलं की आपण जसं आपल्या बालकांना ठराविक वेळी कुठे तरी........ मग अगदी ते घराच्या अंगणात असेल, ग्राउंडवर असेल किंवा पार्कमधे .......सोडतो, तसंच जणू हे बुलबुल आईबाबाही आपल्या पिल्लांना पार्कमधे घेऊन आले आहेत. आणि त्यांना जरा जबाबदारीची जाणीव व्हावी, हळूहळू त्यांनी नवीन गोष्टी शिकाव्यात, जग पहावं, म्हणून पिल्लांना एकटं सोडून लांबून त्यांच्यावर नजर ठेवतात. पिल्लंही छान अगदी निर्भय, निर्वेधपणे परिसराचा जायजा घेत असतात.
हो आणि माझा सिटाउटही त्यांना तिथल्या हिरवाईमुळे आवडला असेल. कारण भरपूर झाडं, वेली, रोपं, पाण्याने कायम काठोकाठ भरलेली कमळाची छोटी सीमेंटची टाकी, ज्यात सध्या भरपूर कमळं येताहेत, आणि हो...त्यात गप्पी मासेही सोडलेले आहेत. हॅंगिंग कुंड्यातून खाली झेपावलेले फ़र्न, आणि इतर वेली असं असल्याने माझा सिटाउट म्हणजे निसर्गरम्य ठिकाणच वाटत असेल त्या बुलबुलांना! बरं...एकदा सकाळची माझी कामं आटोपली की या सिटाउटमधे शांतताच असते. आणि माणसांची वर्दळ नाही. मला तर खात्री आहे की बुलबुल आईबाबांनाही इथे मनुष्यप्राण्याची किती वर्दळ आहे त्याची कल्पनाच नसावी. कारण ते ठराविक वेळीच येतात तिथे, जेव्हा खरंच अगदी शांतता असते.
मग काल या हा अचानक मिळालेला आनंद एकटीनेच अनुभवायला कसं तरीच वाटायला लागलं. मग पुतणीला बोलावलं. ती काय? दहावीच्या सुट्टीचा अगदी पुरेपूर उपभोग चालू आहे! ती लगेच आली. ती त्या पिल्लांना बघून खूपच एक्साइट झाली. मग स्वयंपाकघराच्या मोठ्या खिडकीत बसून आधी पहात राहिली. मग म्हणाली," काकू मी कॅमेरा घेऊन येते." सध्या नव्या कॅमेर्‍यावर हात साफ़ करणं चालू आहे तिचं! ज्याचे त्याचे फ़ोटो! आधी मेमरीच नव्हती शिल्लक. मग लुईचे बरेच फ़ोटो डिलिट केले. तेव्हा जरा जागा झाली फ़ोटोंसाठी.

आधी खिडकीतूनच प्रयत्न केला पिल्लांना कॅमेर्‍यात कैद करण्यायाचा, पण आमच्या पूर्ण घराला आता जाळी(डासांपासून संरक्षण) आहे त्यामुळे जाळीतून फ़ोटो काही स्पष्ट येईनात. मग तीही अगदी सराइत वन्य छायाचित्रकाराच्या आवेशात अगदी स्तब्ध हालचाली करत स्वयंपाकघराचं दार उघडून अगदी सावकाश बाहेर गेली आणि पिल्लांचे फ़ोटो घेतले.

DSC00864_0.JPG

तेच हे फ़ोटो! आणि आत्ता मात्र हे बुलबुल आईबाबा अगदी निवांतपणे अंगणातल्या दुसर्‍याच एका कढिलिंबाच्या फ़ांद्यात बसलेले आहेत.
मग त्यानंतर मी दोन दिवस परगावी गेले. परत आले तर हे कुटुंब काही परत आलेलं दिसलं नाही. मोठे बुलबुल दिसतात कडुलिंबावर. जेव्हा मी छोट्या बुलबुलांना सिटाउटमधे पाहिलं होतं तेव्हा बहुतेक त्यांच्या ट्रेनिंगचा अगदी शेवटचा सेशन चाललेला असावा. त्यामुळेच २/३ दिवसांनी मी परत आले तरी बुलबुल मात्र परत सिटाउटमधे आले नाहीत. आणि आता पिलंही मोठी झालेली असणार त्यामुळे आता परिसरात बरेच बुलबुल दिसतात पण त्यातले आपल्या "सिटाउट फ़्लाइंग इन्स्टिट्यूट"मधून शिकून गेलेले पास्ट स्टुडन्टस मी कसे ओळखणार?

गुलमोहर: 

छान लिहिलय मानुषी. ते कडुनिंबाच्या जागी कढीलिंब किंवा कढीपत्ता
करणार का ? दुव्याचे नंबर दिले तरी चालतात. त्यावरुन ते लेख शोधता येतात.

दोन मोठे बुलबुल आत्ता ज्याच्यावर बसलेत ते झाड कढीपत्त्याचंच आहे. पण मी ज्या झाडाबद्दल लिहिलंय ते मात्र कडुलिंबाचं आहे. ते खूपच मोठं आहे.

मानुषी छान लिहील आहेस. आता ह्यांचे कायमचे वास्तव्य राहील. म्हणजे त्यांची पुर्ण पिढी येईल. माझ्याकडेही हेच चालू आहे. सध्या अंड घातलेल आहे. नेमकी गणपतीच्या वेळीच ते फुटेल. गणपतीची जागाही नेमकी त्या झुंबराच्या बाजूलाच आहे.

मानुषी ह्या बुलबुलने सरळ आमच्या घरांमध्ये हक्क दाखवला आहे. माझे आणि माझ्या जावेचे झुंबर त्यांना घर म्हणून नेहमीच पसंत येते. मागच्या वर्षी माझ्या झुंबरावर बाळंतपण झाल ह्या वर्षी जावेच्या झुंबरावर आहे.

रात्री मच्छर येतात म्हणून आम्ही काचा बंद करतो तेंव्हा हे जोडपे काचे बाहेर थांबतात. काल मिस्टरांनी त्यांना घरट्यात याव म्हणून काच उघडली. पण मच्छर त्यांच्या तिपटीने आले. पण दोघांपैकी एकही बुलबुल आत आले नाही. शेवटी रागाऊन आम्ही परत खिडकी लावुन टाकली.

सुंदर लिखाण , "सिटाउट फ़्लाइंग इन्स्टिट्यूट" ला अनेक शुभेच्छा, असेच अनेक विद्यार्थी येथून शिकून जगात वावरो.

बाबू, धन्यवाद! लुईचे फोटो लुई द ओन्ली वन इथे बघू शकता.
प्रज्ञा आणि जिप्सी खूप खूप धन्यवाद!
फोटोचं क्रेडिट पुतणीला!

मस्त Happy