एक होतं गाव...

Submitted by लाल्या on 25 June, 2010 - 08:41

माझ्या वयाचे ज्या ज्या लोकांचे वडील कोकण सोडुन मुंबईला स्थायिक झाले, त्या सर्वांच्या लहानपणी, मे महिन्याच्या सुट्ट्या या बहुतेक करुन आजी-आजोबांच्याकडे कोकणातच असायच्या. यात सारे कोकणी जीव एकमत असतील असं गृहीत धरतो. एरवी कोकणी माणुस कोणाशी एकमत असण्याचा योग विरळच.

तर माझ्याही उन्हाळ्याच्या सुट्ट्या कोकणातच असायच्या. या सुट्टीची पहिली आठवण म्हणजे मुंबई ते मालवणचा लाल डब्याचा(म्हणजे एसटीचा) प्रवास. सहसा आम्ही दादरला गाडी पकडायचो. सामानात लिमलेटच्या गोळ्या आणि बस लागु नये म्हणून आवळा सुपारी यांचं खास स्थान होतं. साधारण संध्याकाळच्या सुमारास सुटणारी गाडी रात्री कधीतरी कोकणाच्या हवेत शिरायची. पण तोपर्यंत आम्ही मुलं आईच्या मांडीवर डोकं ठेउन गाढ झोपलेलो असायचो. आणि बसच्या धक्क्यांनी जाग आली तरी बाहेर फ़क्त अंधार असायचा.

याच्यामुळे व्हायचं काय कि पहाट होताना हळुहळु प्रकाश कोकणाच्या लाल मातीवर पडायचा - ते बघायला मजा यायची. एखादं सुंदर चित्र हळुहळु प्रकट व्हावं तसं. पहाटेच केव्हातरी आम्ही आमच्या छोट्याश्या गावी उतरायचो - काळसे! त्याला "काळसे धामापुर"ही म्हणत! माझ्या वडिलांचे सारे बालपण तिथे गेलेले. त्यामुळे "भाई इलो रे" च्या गजरातच आम्ही सारे आमच्या पुर्वजांच्या वास्तुत पाय ठेवायचो.

वडिल धरुन ती पाच भावंडं! म्हणजे वडील, काका, आणि तीन आत्या! या सर्वांची कुटुंबं, म्हणजे आजी पकडुन(आजोबा मी खूप लहान असतानाच वारले) एकुण २१ जणांनी काळश्याचं ते जुनं घर उजळुन जायचं. त्यात आणि २ म्हशी, १५-२० कोंबड्या, त्यांची पिल्लं, अर्थात १-२ कोंबडे, आणि आमचा ईमानी कुत्रा मोती यांची भर.

दिवसभर धिंगाणा! विहिरीवर आंघोळ, आजारावर जाउन कडक उन्हात थंडगार नारळाचं पाणी प्यायचं, वहाळ्यात म्हशीला धुवायचं, आणि स्वत:सुद्धा रेड्यासारखं डुंबायचं, आजीची नजर चुकवुन तीने आपल्याचसाठी बनवलेला खाऊ चोरुन धुम पळायचं आणि सगळ्या भावंडांनी तो वाटुन खायचा, दुपारी सड्यावर जाउन आंबे, रतांबे, पेरु, काजी काढायच्या, कधी असंच मळ्यावर पडून रहायचं, कधी तारकर्लीच्या नदीत डुंबायचं..... असे मस्तपैकी दिवस जायचे. दुपारी उन जास्त असेल तर घरची मोठी लोकं बाहेर पडू द्यायची नाहित. अश्यावेळी मग बाहेर सारवलेल्या अंगणात चटई घालून पत्ते खेळायचे. जेवायला दररोज मासे. कधी सुळे, कधी बांगडा, कधी सरंगा! आमटी मध्ये वरायटी असायची. कडवे वालाची रस्सा उसळ, कैरीची आमटी, चण्याच्या गोळ्यांची आमटी. चुलीवर केलेल्या भाकरीबरोबर वालाची, फणसाची भाजी.... नाहितर नुसता कांदा आणि मिरचीचा ठेचा...मजा मजा असायची! आणि या सार्याला कोकणी नारळाची सार्थ संगत.

पण कधीही कोणालाही एसीडिटी नाही कि काही नाही! सबकुछ हज़म! गावाची हवाच तशी छान! आणि जेवणाला चवच वेगळी. साधी तांदळाच्या पेजेत सुद्धा मजा यायची!

संध्याकाळ झाली कि गाव शांत व्हायचा...म्हणजे.... आम्ही शांत व्हायचो. दमलेलो असायचो, पण थकवा नसायचा! शारिराला लागतो तो "दम", आणि मनाला येतो तो "थकवा". त्यामुळे झोप येत असली तरी मन ताजेतवाने असायचे. मग रात्री लालटेनच्या मंदं दिव्यात आजी गोष्ट सांगायची. गोष्टीत चेटकीण ही असायचीच. ती मेली की गोष्ट संपली!

कोकणाच्या लाल मातीत आणि हापूस आंब्याच्या गोड चवीत मे महिन्याच्या सुट्ट्या कधी संपायच्या कळायचं सुद्धा नाही.

आता माझ्या राहुलला एअर-कंडिशन्ड गाडीने कुठल्याश्या रिसॉर्ट ला "टू नाईट्स एंड थ्री डेज" सुट्टीसाठी नेताना ती मुंबई-मालवण एसटी दिसते….तशीच आहे! फ़क्त काळाने "लाल्या" चा “मिस्टर आजगांवकर” केला.

आज पुन्हा एकदा तो लाल डबा, ती लाल माती, ती तोंडावर पदर घेउन खुदकन हसणारी आजी, ती विहीर, तो मळा, तो सडा, ते आजार, ते वहाळ....सारं सारं काही आठवलं.

आयुष्याच्या प्रवासात ते गाव फ़ार लांब राहिलं. आणि पैश्याच्या या रेसमध्ये त्याचा विसरही पडला. पण आजही.....दीड हजार रुपये डज़न हापूस घेउन सुद्धा त्याला त्या गावच्या हापूसची चव येत नाही हे खरं!carst.jpg

गुलमोहर: 

लाल्या अगदी सगळे असेच माझ्या लहानपणी. (माझेही कॉलेजमधले टोपणनाव लाल्या च.)
फक्त माझे आजोळ, कोल्हापूर जिल्ह्यात. आणि मालवणच्या काहि वार्‍या चौगुलेंच्या बोटींनी केल्या. मग मालवणचा प्रवास, व्हाया कोल्हापूर ... पण बाकी सगळे असेच. (मासे सोडून )

छान आठवणी! मस्त वाटलं वाचुन. आमची आजोळं पण तशी शहरात (आता नगर ला तुम्ही काय म्हणता त्याच्यावर अवलंबून आहे म्हणा), त्यामुळे गावाकडच्या ह्या सगळ्या मजांना आम्ही पारखेच. Happy

धन्यवाद, वैद्यबुवा आणि शैलजा...मी आजच मायबोलीचा सदस्य झालोय....तुम्हा सर्वांचं प्रोत्साहन खरोखर हुरूप आणणारं आहे! मनापासून आभार!

एकदम मनाला भिडले हे लिखान
आणी ही आपली गोष्ट फक्त कोंकणापुरतीच मर्यादित नाही..
मी मराठवाड्यातला आहे आणी माझे बालपण आपल्या सारखे सेम २ सेम गेले..

आता पैशाच्या रेस मधे सगळ हरवले आहे .. Sad

थैन्क्स, हसरी, अरुंधती, प्रसाद, sad, साजिरा...मी लेखक नाही....जे मनात येतं ते लिहितो... तुमच्या सर्वांच्या कमेंट्स बद्दल मनापासून आभार.

- लाल्या.

गावाची हवाच तशी छान! आणि जेवणाला चवच वेगळी. साधी तांदळाच्या पेजेत सुद्धा मजा यायची!>>>>>> अगदी अगदी पटलं Happy

पुलेशु. बनशील तु लेखक. माबोवरच्या प्रोत्साहनांमुळे तसेच उलट सुळट प्रतिक्रियांना पुरुन उरलास की नक्की बनशील लेखक.

खरच वाचताना कोकणात जाऊन आले Happy ,
पण या आठवणी मनाच्या कोपर्‍यात आहेत. नेहमी मे महिना आला की आणि आंबे दिसायला लागले की या आठवणी जाग्या होतात. आज तुम्हि त्या जाग्या केल्यात.

<<आयुष्याच्या प्रवासात ते गाव फ़ार लांब राहिलं. आणि पैश्याच्या या रेसमध्ये त्याचा विसरही पडला. >> Sad

<<दीड हजार रुपये डज़न हापूस घेउन सुद्धा त्याला त्या गावच्या हापूसची चव येत नाही हे खर .. >> अगदी बरोबर

लाल्या.. मला वाटते हे वाचल्यावर (काही वर्षांपूर्वी) आपले काही बोलणे (लिहिणे) झाले होते.
मी अजून एक 'आजगांवकर' कुटुंबाला काळश्यामधे ओळखतो वगैरे.. (आज पुन्हा आठवणी जाग्या झाल्या).

विनय (एक खरो कोकणी माणूस)...