श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ६

Submitted by बेफ़िकीर on 25 June, 2010 - 02:23

लहानशी वॉटरबॅग घेऊन प्लेग्रूपमधे निघण्याचा पहिला दिवस होता गट्टूचा आज! कोण कौतूक वाड्याला! समीर सारखा म्हणत होता की मी खूप आधीच प्लेग्रूप वगैरे सगळे करून बसलेलो आहे. राजश्री मात्र कौतुकाने गट्टूची विचारपूस करत होती. प्रमिला आपल्या मुलाला म्हणजे समीरला समजावून सांगत होती की अरे तो अजून लहान आहे. तू आता पहिलीत जाशील, पण त्याला नीट सांभाळून समजावयला पाहिजे वगैरे! पवार मावशींनी सकाळीच खास रव्याचे लाडू करून दोन लाडू एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून गट्टूकडे देऊन ठेवले होते. हे आपण लगेच का खायचे नाहीत हे गट्टूला समजत नव्हते.

दोन वाडे सोडून पलीकडच्या एका वाड्यात साने नावाच्या एक आजी एक लहान मुलांचे संगोपन व संस्कार केंद्र चालवत. किती लांब नाही? हा हा! पण इतक्याश्या अंतरावर तीन तासांसाठी गट्टू लाणार हेही श्रीनिवासला सहन होऊ शकत नव्हते.

सकाळपासूनच श्रीनिवासला घरात एकटे एकटे वाटू लागले होते. गट्टूला उठवून तयार करायचे, त्याला सगळे त्याच्या भाषेत समजावून सांगायचे आणि जाताना तो रडू नये म्हणून त्याला अभिमान वाटेल असे इतके बोलायचे की त्याला आपण घरापासून काही काळ एकटेच राहणार आहोत ही भावना त्याच्या मनात येऊच नये.

आधीच समीरदादा आणि राजश्रीताई शाळेत जातात आणि आपण जरा लहान आहोत याचे त्याला थोडेसे वाईट वाटायचेच. समीरदादाला युनिफॉर्म वगैरे मस्त दिसायचा. राजश्रीताईही रडक्या चेहर्‍याने का होईना पण एक प्रकारचा रंगीबेरंगी युनिफॉर्म घालून जायचीच सिनियर केजीत! आपल्याला असे काहीच नाही याचे गट्टूला आधी वाईट वाटायचे.

पण दोन दिवसांपासून सगळे लोक काहीतरी म्हणायला लागले होते. मधूकाका मांडीवर खेळवताना म्हणाला की आता गट्टू शाळेत जाणार! कोण अभिमान वाटला. खरे तर लाजच वाटली. पण समीरदादा तिथेच होता. त्याच्यासमोर लाजण्यापेक्षा त्याच्याकडे अभिप्रायार्थ बघणेच योग्य वाटले गट्टूला! कदाचित तो म्हणेल, 'वा, आता गट्टू पण शाळेत जाणार का? मग आम्हीबरोबरच जात जाऊ'! गट्टूच्या दृष्टीने शाळा हा प्रकार एकच असायचा. शाळेत जाणे म्हणजे सगळे एकाच ठिकाणी जायचे असे त्याला वाटायचे. वेगवेगळ्या शाळा असतात, माध्यमे असतात वगैरे ज्ञान अर्थातच त्याला नव्हते. त्यामुळे समीरकडे बिचारा अपेक्षेने बघताना समीर म्हणाला..

"शाळा नाही काही, प्लेग्रूप आहे.. समोरच्या वाड्यात... अजून याला शाळेत थोडीच घेणार आहे कुणी"

किंचित हिरमुसला गट्टू! पण निदान समीरदादा काहीतरी बोलला तरी होता. की शाळा नाही पण निदान हे तरी आहे! ते जे काय 'हे' आहे ते समीरदादाच्या दृष्टीने काहीच नसण्यापेक्षा नक्कीच जास्त होते याचाच आनंद झाला गट्टूला! 'शाळाच आहे, तुला काय माहीत' वगैरे म्हणण्याचा स्वभाव नव्हता गट्टूचा! तो आपला आनंदाने समीरदादाकडे पाहात होता.

गट्टू - राजच्ची ताई शालेत जाते ना?
समीर - ह्या.. सिनियर केजी..
गट्टू - तू?
समीर - मी शाळेत..

'मी शाळेत' म्हणताना समीरच्या चेहर्‍यावर 'अर्थातच, मी शाळेत जाणारच, मी कितीतरी मोठाय' असे भाव येतील हे गट्टूला अपेक्षितच होते. आणि खरे तर त्याला ते भावच पाहायचे असल्यामुळे त्याने तो प्रश्न विचारला होता. समीरदादा त्याचा हिरो होता. आपला समीरदादा कितीतरी मोठा आहे आणि तो अर्थातच शाळेत जात असणार ही भावना गट्टूला सुखावून जात होती.

निरागसता.. एक दुर्गुण आहे या जगात जगतानाचा!

राजश्रीच्या बाबांना सगळे बेरी काकाच म्हणत! बेरी काका हा एक सद्गृहस्थ होता. कधीही मान वर करूनही पाहणार नाही. आणि त्याची पत्नी त्याच्यासारखीच! सगळ्यांशी हसत खेळत अन मनमिळाऊपणे राहणार! कानडी कुटुंब होते ते, पण दोन पिढ्यांपासून पुण्यात असल्यामुळे मराठीच बोलायचे! राजश्री दिसायला किंचित सावळी अन बारीक होती. ती दिसायला फारशी गोंडस नसल्यामुळे कुणी तिला खेळायला घरी वगैरे घेऊन जायचे नाही पण समीरदादा अन गट्टू यांच्याशी खेळता खेळता ती समीर, गट्टू अन पवार मावशींकडे मात्र जायची.

समीर - तुला शाळेत जायला अजून.. एक, दोन, तीन, चार.. अं.. किती हो बाबा?
मधू - चार कसली?? महाराज तीन वर्षांनी पहिलीत जाणार...

पुन्हा गट्टूने लाजून आनंदाने समीरकडे पाहिले. समीर बॉल खेळत होता आणि गट्टू मधूकाकाच्या पोटावर बसला होता. मधूकाका पलंगावर झोपलेला होता अन गट्टूला आपल्या पोटावर ठेवून खेळवत होता.

समीर - तेव्हा मी चौथीत असेन..

काहीतरी दरी आहे हे त्याही वयात गट्टूला समजले. समीरदादाला सतत हे सिद्ध करायचे आहे की तो आपल्यापेक्षा बराच पुढे आहे आणि आपण त्याला गाठूच शकत नाही इतके समजले, पण तो एक किरकोळ खेळ होता गट्टूच्या दृष्टीने, शिवाशिवीसारखा!

समीर - आई म्हणत होती की श्री काकाला इंग्लिश मिडियम नाही परवडणार..
मधू - आं.. असं बोलायचं नाही हं समीर.. पुन्हा असलं बोलू नकोस..
गट्टू - काय म्हनाला?
मधू - तो म्हनाला.. गट्टू वेदा आहे.. मी म्हनालो.. आमचा गत्तू साना आहे.. हो की नाही???

खुष झालेल्या गट्टूला वरून पवार आजींनी हाक मारल्याचे कळताच तो उतरून धावत वर गेला.

दोन दिवस नुसतेच कौतुकात गेले. आणि दोन दिवसांनी...

गट्टूच्या आयुष्यातील तो पहिला दिवस होता जेव्हा त्याला कुणीतरी झोपेतून उठवले.. जागे झालो की लोक येऊन आपल्याशी लाडाने बोलतात हाच अनुभव होता आजवरचा! पण मुद्दाम जागे करून उठवले जाते हे नवीन होते.. त्याला उठवत नव्हते... पण शाळा की काहीतरी आहे या उत्साहात महाराज उठून बसले..

श्री - चला.. हुषार बाळ शाळेत जाणार आज?? हो की नाही?? आता मोठ्ठे होणार बाळ.. अभ्यास करणार.. मस्तपैकी पहिले येणार वर्गात.. आणि मग?? संध्याकाळी बाबांबरोबर भूर येणार.. हो की नाही?? चला.. चूळ भरा.. आज वेगळे मित्रमैत्रिणी भेटणार गट्टूला..

गट्टू - मला कोण सोडनार शालेत?
श्री - बाबा सोडणार.. चला चला..
गट्टू - समीरदादाला आई सोडते..

खट्टकन हालचाली थांबल्या श्रीनिवासच्या! डोळे भरून यायला फार वेळ लागत नसतो. आपल्याला वाटते आपण काही रडणार नाही वगैरे! सब झूठ है.. तितक्यात मावशी प्रवेशल्यामुळे ती वेळ टळली इतकेच..

पवार मावशी - ए वाटाण्या.. उठलास का?? चल आता उदरभरण करून घे.. दिवसभर त्या सानीटलीच्या डोक्याला त्रास द्यायचाय ना? .. शाळेत चालला गट्टू अन वाडा झाला खट्टू.. चला.. बाबा आवरतायत तोवर आपण इकडे आवरून घेऊ आपले..

पवार मावशींना गट्टू हा मुळात आपल्याकडे राहणारा मुलगा असून झोपण्यापुरता श्रीनिवासकडे जातो असे काहीतरी वाटायचे.

आणि अर्ध्या तासाने जेव्हा गट्टू पुन्हा घरी आला तेव्हा अंगावर छानसे बाहेर जायचे कपडे, सगळ्या अंगाला पावडर चोपडलेली आणि खांद्याला एक वॉटर बॅग! ही वॉटर बॅग कालच हट्टामुळे आणण्यात आली होती. समीरदादासारखे दप्तर नाही तर नाही निदान वॉटरबॅग तरी! आणि वॉटरबॅग केवळ चार रुपयांचीच असल्यामुळे आणि आपल्यालाही आपला मुलगा असा दिसायला आवडत असल्यामुळे फारसा हट्ट न होताच वॉटरबॅग आणली होती श्रीनिवासने! पण.. पण.. काही झाले तरी हे 'पण' असतातच सगळीकडे...

'पण' शिवाय आयुष्य असलेला माणूसच नसतो..

आपला गट्टू शाळेत जावा, शिकावा, भरपूर मोठा व्हावा... सगळी सगळी स्वप्ने खरी असली तरीही आज..

त्याला तसे पाहिल्यावर मात्र श्रीनिवासच्या मनात हजार लाटा निर्माण झाल्या समुद्रासारख्या..

निघाला.. निघाला गट्टू घराबाहेर.. आता.. आता रोज असेच.. आता... लहानपण संपले..

या.. या शाळा जरा दहा वर्षाच्या वयापासून का सुरू होत नाहीत?? का इतकी लवकर मोठी होतात मुले?? का त्यांना इतक्या लवकर मोठे करायचे?? का??

सुक्ष्मपणे बघितल्यावर श्रीनिवासला आणखीनच मोठे दु:ख झाले..

कारण आज 'जावे लागणार' या दु:खाने .. गट्टूच्याही डोळ्यात किंचित ओलावा आलेला दिसला त्याला..

पण.. पुन्हा 'पण'..! ... पण गट्टूने बाबांना वाईट वाटू नये म्हणून बहुधा तो ओलावा तिथल्यातिथेच मुरवला असावा..

पुढे यायला बंदी पाण्याला डोळ्यातल्या.....

गट्टू.. आजपासून नियमीत घराबाहेर जाणार होता..

श्रीनिवास - व्वा! किती मस्त दिसतायत महाराज? काय काय खेळणार आज? खाऊ घेतला का बरोबर?? अरे काही नाही... मस्त तीन तास खेळायचं आणि घरी परत... परत संध्याकाळी आपण दोघे आहोतच की?? हो की नाही?? वा वा! किती छान दिसतीय वॉटरबॅग..! आजीने काय दिले?? अरे?? अरे वा? लाडू? मग तर मजाच आहे महाराजांची.. हे कधी खायचे माहीत आहे ना?? साने आजी म्हणाल्या की खायचे.. आणि.. इतर मित्र मैत्रिणींना पण विचारायचे की थोडासा लाडू खाणार का म्हणून... बर का?? आपण सगळ्यांशी प्रेमाने वागायचे हां?? आणि स्वतःहून दुसर्‍याच्या डब्याला हात लावायचा??? ... नाही... ! कुणी काही 'घे' म्हणाले तर एक दोनदा नको म्हणायचे... तरी म्हणत बसले तरच थोडीशी चव घ्यायची बर का?? आणि संध्याकाळी सांगणार ना मला.. काय काय खेळ होते ते?? अं?? चला... आता आईच्या फोटोला अन बाप्पाला नमस्कार करा...

गट्टूने दोन्ही ठिकाणि नमस्कार केला..

श्री - आता आजीला नमस्कार करा...

गट्टू पवार मावशींच्या घरी पुन्हा गेला. मावशींना श्रीचे सगळे बोलणे आधीच ऐकू आलेले होते. गट्टू आजपासून शाळेत जाणार म्हणून त्याच श्रीपेक्षा दु:खी झालेल्या होत्या. आता दुपारपर्यंत करायचे काय?? आणि.. मुख्य म्हणजे.. तो कसा राहील तिथे आपल्याशिवाय??

समोर नमस्कार करायला आलेला छोटासा गट्टू पाहून मात्र मावशींच्या डोळ्यांचा बांध फुटला. मागून आलेल्या श्रीनिवासने मावशींच्या पाठीवर थोपटले. गट्टूला आजी का रडत असावी याचा अंदाज आलेला होता. तोही किंचित पाणावला होता. पण तेवढ्यात श्री म्हणाला..

श्री - बघ.. तू आजपासून बाहेर जाणार म्हणून आजी रडतीय.. तिला म्हणाव रडू नकोस.. लवक्कर येतो आम्ही..
गट्टू - नको रडू... लवक्कर येणारे मी..

मावशींनी सरळ पाठच फिरवली. गट्टूला उचलून श्रीनिवास मागे फिरणार तोच मावशी म्हणाल्या..

मावशी - आई झाली, बाप्पा झाला, आजी झाली.. बापाच्या पाया नाही का रे पडणार दाणगटा..???

आणि तो प्रसंग मात्र श्रीनिवासला झेपला नाही. गट्टूने आजीचे ऐकून खाली उतरून वडिलांच्या पायांवर डोके ठेवले तेव्हा श्रीनिवास आपल्या दोन्ही हातांनी स्वतःचेच तोंड झाकून मूकपणे रडत होता.

पुन्हा त्याला उचलून घेत श्री खाली उतरला.

समीर - चालला का प्लेग्रूपला.. नुसता खेळतो.. अभ्यास वगैरे सुरू झाला की कळेल..

श्री हसत होता ते ऐकून जिना उतरताना! त्यामुळे गट्टूही हसत होता. राजश्रीताई आणि समीरदादाची शाळा दुपारी असायची! त्यांना आता सकाळी गट्टूशी खेळणे जमणार नव्हते त्यामुळे!

चितळे आजोबा - अरे वा वा वा वा! चालले का शाळेला महाराज? हे घ्या... आमच्याकडून दोन श्रीखंडाच्या गोळ्या..

राजश्रीताई - लवकर ये हं? मग खेळू.. क्काय?

निगडे काकू - ही घ्या कॅडबरी.. अर्रे?? आवडते ना? ठेव खिशात..

बेरी काकू - कित्ती छान दिसतोय.. भावजी.. संध्याकाळी दृष्ट काढून टाका हां..

माने काका - नालायक शिक्षण प्रणाली आहे आपल्याकडची.. एवढ्याश्या पोराला शाळेत?? अरे जरा खेळू तरी देत... हे घे रे बाबा.. ही मिंटची गोळी ठेव जवळ.. वॉटरबॅगमधलं पाणी संपलं की खा.. हं??

घाटे बाई - काय पोरं मोठी होतात नाही? कुठे दिवस जातात कळतच नाही.. रमा.. हवी होती... असो..

प्रमिला - गट्टूराव, हा मोदक घ्या.. उकडीचा.. दुपारी बाईंनी सांगीतल्यावर खायचा.. बर का??

समीर - मला आवडतात म्हणून कालच केलेवते.. हो की नाही आई??

वाड्यातून बाहेर पडताना श्रीनिवासला कोण अभिमान वाटत होता.

महेश श्रीनिवास पेंढारकर - दास्ताने वाडा - २०१ शनिवार पेठ - पुणे

हातानेच कागदावर लिहून प्लॅस्टीकमधे रॅप केलेली आयडेंटिटी झळकत होती गट्टूच्या खिशावर!

आणि आजवर आपापल्या मुलांना शाळेत सोडणारे आईबाप पाहणार्‍या श्रीनिवासच्या हातात आज स्वतःच्या मुलाची दोन नाजूक कोवळी बोटे होती. येणारे जाणारे आपल्याकडे पाहात आहेत हे पाहून तो खुष झाला होता. 'मी बाप आहे आणि माझा मुलगा आता शाळेत जातो' ही भावना कोणत्याही प्रमोशन आणि इन्क्रीमेंटपेक्षा मोठी होती. आज त्याने हाफ डे काढलेला होता. सकाळी दहा ते दुपारी एक असा तो संस्कार वर्ग होता. दुपारी आणायला अन उद्यापासून सोडायला अन आणायला दोन्ही वेळा पवार मावशीच जाणार होत्या. मात्र आज पहिला दिवस म्हणून श्रीनिवासने खास हाफ डे घेतला होता.

शनिवार पेठ पोलीस चौकी पार करून आपटे घाटाकडे वळल्यावर लगेचच दोन वाडे सोडून तो वाडा होता.

साने आजींकडे पावणे दहालच पोचल्यावर आजींनी पाच एक मिनीटे गट्टूचे खूप कौतूक केले. तोवर बाकीची मुले त्यांच्या आई वडिलांसोबत आलीच होती. सगळी मुले आनंदाने आपल्या आई वडिलांना 'टाटा' करत होती. काही तर एकमेकांशी खेळण्यात आल्याआल्याच इतकी गढून गेली की आइ वडिलांना विसरूनही गेली. एकंदर बारा मुले होती गट्टू धरून! श्रीनिवास सगळ्याच मुलांकडे आणि सगळ्यांना सोडायला आलेल्यांकडून केल्या जाणार्‍या कौतुकाकडे खूप आनंदाने पाहात होता. सौ. गोडबोले नावाच्या एक बाई त्याच्या परिचयाच्या झालेल्या होत्या. कारण त्यांच्या खानावळीतून काही वेळा त्याने भाजी आणलेली होती. त्यांचाही मुलगा प्रसाद तेथे आलेला होता त्यांच्याबरोबर! मात्र सौ. गोडबोलेंचा परिचय केवळ पाहूनच होता. बाकीची काहीच माहिती नव्हती.

श्री त्यांच्याकडे बघून हासला. 'तुमच्या मुलाप्रमाणेच आता माझाही मुलगा इथे येणार' असे एक निरागस हसू होते ते!

सौ. गोडबोले - हा तुमचा मुलगा का? काय नाव त्याचे??
श्री - गट्..आपलं.. महेश..
गोडबोले - हा प्रसाद! आला की विसरूनच जातो मला... टाटाही करत नाही.. वहिनी नाही आल्या??
श्री - अं.. नाही.. .. नाही आली ती...

गट्टूचा पापा घेऊन ज्या क्षणी श्री निघाला त्यावेळेस मात्र गट्टूने हंबरडा फोडला. आणि मग श्रीच्याही डोळ्यात पाणी आले.

सानेआजी - अरे? शूर मुलगायस की नाही तू? अशी रडतात का शूर मुलं? ही बघ.. ही कल्पना किती लहान आहे तुझ्याहून ... तरी रडतीय का?? अं?? ये.. आंधळी कोशिंबीर खेळायची ना आपण??

त्याची श्रीनिवासकडे पाठ करून साने आजी एका हाताने श्रीला जायच्या खुणा करत होत्या. आणि श्री गट्टुकडे बघत बघत एक एक पाऊल वाड्याबाहेर टाकत होता..

महेश श्रीनिवास पेंढारकर.. आजपासून यांना नवी क्षितीजे लाभलेली होती.. बाबा, समीरदादा, राजश्रीताई, प्रमिलाकाकू, मधूकाका, चितळे आजोबा, माने आजोबा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आजी.. यांच्या बाहेर एक जग असते हे त्यांना आजपासून समजणार होते...

अत्यंत महत्वाची वेळ होती ती... आजवरचे संस्कार घेऊन इथे यायचे आणि.. इथले संस्कार घेऊन घरी जायचे.. अचाट वैविध्य.. कुणातून कोण निर्माण होईल याची काहीच शाश्वती नाही.. शाळा.. !

बर्‍याच वेळाने गट्टू रडणे थांबवून खेळात सामील झाला. हळूहळू खेळात रमलाही. हसू लागला, ओरडू लागला, उत्साहात पळू लागला.. प्रसाद, चिंगी, कल्पना, रेखा, विशाल आणि दौलत असे नवीन मित्र मैत्रिणी लाभले होते.. डबा खाताना गट्टूच्या लाडवाची चव सगळ्यांनी घेऊनही गट्टू रडला नव्हता.. 'आपण सगळ्यांशी चांगलेच वागायचे' हा संस्कार नेमका त्या वेळी आठवला होता त्याला.. आणि त्यालाही कुणी कुणी आपापल्या डब्यातले काही ना काही दिलेच होते... पण प्रसादच्या डब्यातील सँडविच त्याला सगळ्यात जास्त आवडले होते.. उघड आहे.. त्याच्या आईची खानवळ होती म्हंटल्यावर तिच्या हातांना चव असणारच.. !

एक बाळ! आज वडील आणि नेहमी सांभाळणार्‍या आजीपासून वेगळे राहायला शिकले होते. यातच पुढच्या सर्व वादळांची नांदी सामावलेली होती. आणि हे कुणालाच माहीत नव्हते.

आणि त्याचवेळेस..

कंपनीत पोचलेल्या श्री ला आत बोलवून सप्रे म्हणत होते..

सप्रे - पेंढारकर, देअर इज अ‍ॅन अपॉर्च्युनिटी फॉर यू.. बेळगावला जो नवीन प्लॅंट येतोय त्यात स्टोअर इनचार्जसाठी तुमचे रेकमेंडेशन केलंय मी.. यू विल गेट अल्मोस्ट ट्रिपल ऑफ द पॅकेज हिअर.. ही संधी दवडू नका.. कारण इथे इतकी स्पर्धा आहे की इथे इतकी ग्रोथ होणे फार फार अवघड आहे.. आणि तुम्हीच का असे विचाराल तर एक म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटचा सगळाच अनुभव आहे आणि.. मुख्य म्हणजे तुमचा संसार.. आय मीन.. सॉरी टू से दॅट.. पण लहानही आहे.. तिकडे शाळा वगैरे सगळं आहेच.. आय थिंक यू मस्ट नॉट लूज धिस चान्स.. व्हॉट से मॅन?? मी तरी गेलो असतो..

श्री - सर्..खरच, मी अन रमा.. आम्ही दोघेच असतो तर.. एका दिवसात शिफ्ट झालो असतो..मी तर.. खरं म्हणजे .. अशा संधीची वाट पाहत होतो सर.. पण आता.. महेश मोठा झालाय.. त्याचं सगळं लागीलाग लागू लागलय.. आजच बालवाडी सुरू झाली.. तरी हरकत नाही खरे तर.... पण.. आता इथे इतकी माणसं आहेत मदतीला की.. मला काही काळजीच नसते... संध्याकाळी उशीर झाला तरी बिनदिक्कत असतो मी.. तसं बेळगावला.. नाही होणार सर.. खरच सॉरी सर.. पण.. मला.. नाही घेता येणार ही संधी..

२१०० रुपये मासिक वेतन आणि राहायला चार खोल्यांची क्वार्टर ही प्रगतीची स्वप्नवत पायरी गट्टूसाठी धुडकावून श्रीनिवास पेंढारकर, एक बाप घरी पोचले तेव्हा..

पवार मावशी किंचाळत ओरडत होत्या..

"नालायक तो दास्ताने.. बांधून ठेवले वाडे अन आमची मढी गाडे.. कुठे पोचेल मेल्यावर सांगता येत नाही मला टोळ नुसता.. ६४ रुपये भाडं होतं आजवर.. थेट १३० रुपये केलंय.. कुठून आणायचे इतके पैसे?? मला तर वाटत पुणं सोडूनच द्यावं"

आणि वाड्यातले सगळे जण गोल करून सचिंत मुद्रेने बसलेले होते आणि ..

समीर गट्टूला म्हणत होता..

"आमच्या बाबांना खूप पगार आहे.. आम्ही सहज राहू इथेच.. तुझ्या बाबांना किती पगार आहे??"

गट्टू बावळटासारखा समीरकडे पाहात असतानाच प्रमिलाने समीरला धपाटा घातलेला होता. आपले नक्की काय चुकले हे न समजल्यामुळे अपमानीत समीर तिच्याशी झोंबाझोंबी करत घरी निघून जात असताना गट्टू म्हणाला..

"बाबांना खूप कमी पगारे.. पन मला हव ते सगलं आनतात ते.. हो की नाई आजी??"

गुलमोहर: 

केन्द्रे_परेश, तुमचे प्रतिसाद छान असतात...पण एक विनंती...तुम्ही देवनागरी मध्ये प्रतिसाद द्या ना प्लिज! असं रोमन लिपीत मराठी टाईप केलेलं वाचायला त्रास होतो . अर्थात, तुम्हाला मराठी टायपिंग आवडत नसेल तर तुमची इच्छा!

बेफिकीर, तुम्ही ही कादंबरी किमान ३० भागांची करणार हे वाचून खुप आनंद झाला आणि तुम्ही त्याद्वारे तुमचेच बालपण दाखवणार आहात हे वाचून तर अत्यंतिक आनंद झाला. मी ठरवलंच होतं की तुम्हाला एक दिवस विचारणार... तुम्ही लिहिलेली पात्र किती काल्पनिक आणि किती खरी आहेत? आणि त्यातलं एखादं तुम्ही पण आहात का म्हणून...बरं झालं तुम्हीच सांगितलंत ते...

अहो आम्हाला (मा.बो. करा॑ना) सगळ॑ कबुल आहे....३० भाग करा नाही तर १००....पण नवीन भाग तर टाका.....आणखी कीती वाट बघायला लावणार आहात Sad
आता त्याची भरपाई म्हणुन २ भाग एकसाथ टाका बॉ..... Happy

माझा मुलगा २ आठवडेपासुन शाळेत जायला लागला. एवढ्याशा त्या बाळाला असा स्वताहुन आपल्या मदतिशिवाय जाताना पाहिला आनि भरुन आल. १ जिव ज्याला आपल्या शिवाय इन्च भर पन हलता येत न्व्हते तोच आज मोठा झाला याचा खुप अभिमान वाटला. खरच दिवस कसे पाखरासारखे उडुन जातात नाहि. पण हे क्शन नाहि विसराता येणार कधि.

आज मी "रमा" माझी मुलगी- तीला शाळेत सोडायला गेले तर म्हणते की गेट पासुनच जा तु. शाळा तशी बंगल्यातच आहे पण तरी वाटलं ती एवढी मोठी झालीये. आत्ता २ आठ्वडे तर झाले शाळा चालु होउन. १५ दीवसां पुर्वी हात धरुन चालणारी ती आता तु जा म्हणुन सरळ न सांगता टाटा करत होती सकाळी.

सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनाचे आभार मानण्याची कुवत नाही. महिनाअखेरीमुळे काम अधिक असल्यामुळे नाही लिहीता आला पुढचा भाग! पुन्हा अनेक आभार!

बेफिकीर.......अप्रतिम..........

तुमच्या सगळ्या कादंबर्‍या वाचल्या.

प्रत्येक कादंबरी वाचताना कळतचं नाही की कुणाला थांबायला सांगावं हातांना की डोळ्यांना? तुमच्या लेखणीत जादु आहे. तुमच्या प्रभावशाली लेखणीमुळे कादंबरीच्या माध्यमातुन या एकाचं आयुष्यात अनेक आयुष्य जवळुन अनुभवता आली.

धन्यवाद............!!

पू. ले. शु............ !!!!!

Hi,
Ajunparyant goshta khupach sundar rangawali ahe... I am touched...atta paryant eka stri chya sangharshachya goshti aaiklya wachalya...pan wadilanahi similar problems asu shaktat he khup chan dakhawala ahe....

Gattu khup shahana baal ahe :-)...Pawar kaku cha character nantar hopefully rangwala asel... mhanje tya asha ka wagtat etc kalel...

Pudhachi goshta wachun mazi comment thewinach...

-
Ek marathi Mulgi

Pages