अँड दे लिव्ह्ड हॅपीली एव्हरआफ्टर!

Submitted by मंजिरी सोमण on 23 June, 2010 - 01:33

दोन दिवसांपूर्वी 'हिमगौरी आणि सात बुटके' ही सीडी पहात बसले होते (सध्या दुसर्‍या सीडीज बघण्याचा चॉईसच नाहिये) तर त्यात शेवटी तो राजपुत्र येतो, आपल्या प्रेमाने राजकन्येला जिवंत करतो, घोड्यावर बसवून घेऊन जातो, ते दोघे लग्न करतात.... मग त्यानंतरचं वाक्य........

............ AND THEY LIVED HAPPILY EVER AFTER.........!!!

माझ्या मनाने लगेच कुचकुच सुरु केली..... लग्नानंतर??? happily everafter??? कमालच आहे. परिकथेतली गोष्ट जिथे संपते तिथेच तर खर्‍या आयुष्यातली गोष्ट सुरू होते...

लग्न संकल्पनेबद्दल उत्सुकता, कुतुहल बाळगूनच प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्याच विश्वात रमलेली असते. स्वतःचं घर, संसार, मुलंबाळं या सगळ्याबद्दल एक चित्र उभं केलेलं असतं. प्रत्येकाने आपल्या मनातला आदर्शवाद अगदी पणाला लावलेला असतो. लग्न ठरतं आणि होतं त्यावेळी तो जोडीदार त्या आदर्शवादात अगदी चपखल बसलेला असतो.

लग्नानंतर सुरुवातीचे कोडकौतुकाचे दिवस संपतात, परत कामावर रुजू होणं उद्यावर येऊन ठेपलेलं असतं.... आणि सुरु होते खरी गोष्ट......

आदल्या रात्री दुसर्‍या दिवशीच्या पहाटेची तयारी करण्यात 'ती' मग्न आहे पाहून 'आत्ता मधे मधे करायला गेलो तर उगाच चिडचिड ऐकून घ्यावी लागेल' असा सूज्ञ(!) विचार करुन तो TV लावतो आणि त्या म्हणजे त्याच वेळी 'तो' काहीही न करता बसलेला असल्यामुळे तडकलेली शीर जोरजोरात उडायला लागते.....
"मी इथे मर मर मरून उद्याची तयारी करतीये. "
"जसं तुला ऑफिस आहे तसंच मला पण आहे.पण तुझ्या डोक्यात आलं का हे सगळं ??? "
"TV लावायला सुचतोच कसा? मला पण आवडेल पाय पसरून TV बघत बसायला, तू करणारेस का इथे काही??"
"बरं, काही मदत हवीये का वगैरे विचारायची काही पद्धत आहे की नाही?? "

तो अवाक् ! तोंडाचा आ वासलेला. हिला काय झालं अचानक सटकायला? उगाच काय ?...

"आरे कमाल आहे! तू तर सुपर वुमन आहेस ना?"
"सगळी कामं एकटीने efficiently हाताळू शकतेस असं तूच सांगत फिरतेस ना? "
"तिथे मधे मधे लुडबुड नको म्हणून......"
त्याचं वाक्य अर्धवटच राहतं कारण "माझी, तुझ्या सोयीची वाक्य बरी लक्षात ठेवतोस. तू असा असशील असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं" हे वाक्य आणि खोलीचं दार एकदम तोंडावर आदळतं

(राहतील ते 'happily everafter...'..... आत्ता तर कुठे संसाराला सुरुवात होतीये!)

आता एकमेकांचा स्वभाव थोडाथोडा, फार नाही, अंगवळणी पडायला लागलेला असतो. एकमेकांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात होते. तिला जाणवायला लागतं हळूहळू, आपलं फक्त याच्याशी नाही, याच्या अख्ख्या खानदानाशी लग्न लागलेलं आहे. त्यालाही यथावकाश, बायकोच्या माहेरचं महत्त्व जरा जास्तच जाणवायला लागलेलं असतं. दोघेही न पटणार्‍या गोष्टी नजरेआड करायला शिकत असतात, तरी केव्हातरी कुठेतरी ठिणगी पडतेच....

"तू आळशी आहेस, आणि तुला तुझ्या मातोश्रींनी भलताच लाडावून ठेवलाय याची मला पूर्ण कल्पना आहे, पण म्हणून स्वतःच्या पांघरुणाची घडी सुद्धा घालता येत नाही का?"
"टॉवेल वाळत घालणं तर दूरच राहिलं"
"माझ्या भावाला माझ्या आईने असलं फाजील लाडावून ठेवलेलं नाहीये कधीच"
"स्वावलंबनाने कुणी झिजत नाही"

"तुझा स्वावलंबी भाऊ जेव्हा भेटेल ना परत तेव्हा त्याला नाही परावलंबी केला तर...." (हे त्याचं वाक्य मनातल्या मनात) .... प्रत्यक्षात मात्र...

"तू हे प्रेमाने पण सांगू शकतेस ना?"
"आणि माझ्यात इतर अनेक चांगले गुण आहेत, ते तुझ्या भावात आहेत का?"
"प्रत्येक माणूस वेगळा असतो"
असा भलताच फिलॉसॉफिकल पवित्रा त्याच्याकडून नको त्यावेळी घेतला जातो की मग संपलंच! पुढचे ३-४ दिवस, कानाचे आणि पोटाचे हाल ठरलेले.
(अहो, असूदे, राहतील ते happily everafter...... हा.का.ना.का.!)

"तुला कधी वाटतं का, स्वतःहून म्हणावं की, आज तू दमली असशील. आज तू काही करु नकोस. आपण हॉटेलमधे जाऊ या???" ती
"तसं मला रोजच वाटत असतं ग, तुझ्या हातचं कसंबसं पोटात ढकलत असतो तेव्हा" (त्याला नको त्या वेळी थट्टा करण्याचा मूड आलेला असतो, आणि त्याला कल्पना नसते की तो आता अगदीच ज्वालामुखीच्या तोंडावर जाऊन बसलेला असतो)

"हो.... कसं बसं ढकलतो म्हणे! तुला काय जातय बोलायला?"
"कधी इकडची काडी तिकडे करावी लागलीये का कधी??"
"इथे मी ऑफिस करून परत घरात राब राब राबते, तुम्ही बसता TV समोर तंगड्या पसरून...." सुरुवात!

हे सगळं लक्षात ठेऊन तो दोन दिवसांनी संध्याकाळी ऑफिसमधून येताना surprise म्हणून मस्त गरमा गरम समोसे, वडापाव असं सगळं 'न कळवता' घेऊन येतो. घरात पाऊल ठेवल्यावर मात्र त्यालाच surprise मिळतं...

"आरे, हे सगळं आणणार होतास तर मग मला ऑफिसमधे फोन करून कळवता येत नाही का?"
"कंटाळा आलेला असून सुद्धा मी आज वाट वाकडी करून मंडईत जाऊन भाजी घेऊन एकतर सगळा स्वयंपाक केला"
"त्यापेक्षा भाजी घेऊन आला असतास तर गहिवरून आलं असतं मला"
त्याच्या चेहर्‍यावरचे भाव वर्णन न करण्यासारखे.

(संसार म्हटला की भांड्याला भांडं लागायचंच.... राहतील ते happily everafter...)

दिवस रोजच्या रुटीन मधे सरत असतात. एखादा दिवस ऑफिस मधे अगदी बेक्कार गेलेला असतो तिच्या. ती विचार करतच घरी येते... सकाळची भाजी-आमटी आहेच. पोळ्या आणि कूकर केलं की काम भागलं. चला, बरेच दिवस वाचायचं राहिलेलं पुस्तक तरी जरा वाचता येईल नवरा येईपर्यंत.
तो घरी येतो, तोच मुळी ४ मित्रांना घेऊन...
"अगं, हे लोक तयार नव्हते, मीच आग्रह कर करून तुझ्या हातचा पुलाव आणि गाजर हलवा खायला घेऊन आलोय त्यांना"
"खूप कौतूक केलंय हा मी तुझं मित्रांसमोर"... धुसपुसत स्वयंपाकघरात शिरलेल्या तिला तो हळूच कानात येऊन सांगतो.
"तुला एक फोन करून कळवता येत नाही का?? एवढा ४-४ जणांचा स्वयंपाक आयत्या वे़ळी करायला काय कमी कष्ट आहेत??"
"आण तुझा तो मोबाईल इकडे, जाळून टाकते शेगडीवर.... पुलाव छान smoky होईल, नाही??"

तो हतबल, तिचा जळजळीत कटाक्ष!
या सगळ्या गोष्टी अगदी क्षुल्लक वाटायला लागतात जेव्हा घरात नवीन बाळाच्या आगमनाचं डायमेन्शन येतं..

"एवढ्या सगळ्या बायकांना मुलं होतात, त्याचं किती दिवस कौतूक चाललंय"
"आमच्या आईने अतिशय कष्टाने आम्हा भावंडांना वाढवलंय"
"केवढं काम करायची आई, बाप रे!" तो.

"तुझ्या मातोश्रींनी कष्टाचे डोंगर उपसले आणि आमच्या आईने काय माशा मारल्या काय??" ती.

"तुझ्याकडे पाहून तरी तसंच वाटतंय..." परत एकदा त्याची भलत्या वेळी चेष्टा..

(राहतील ना ते happily everafter, त्यात काय एवढं)

दोघांचे एकमेकाशी बोलण्याचे हेच एकसूरी संवाद ठरून जातात. नाहीतर मग ८-८ दिवस बोलायचंच नाही. काय फरक पडतो. तेवढीच डोक्याला आणि मनाला शांतता. पण ते तरी किती दिवस चालणार? एखादा दिवस येतोच युद्धाला तोंड फोडणारा....
"हल्ली तू रोजच ऑफिसमधून उशीरा यायला लागला आहेस, पिल्लूचे हाल नकोत म्हणून मी नोकरी सोडली ते तुझ्या पथ्यावरच पडलेलं आहे" ती
"आरेच्च्या, कमाल आहे, तो निर्णय तुझा होता, मी काही सांगायला आलो होतो का?" तो.
"तू काय रे मला सांगणार? पिल्लूचे हाल करू का मग?" ती.
"तू कुठला विषय कुठे नेतीयेस? पिल्लूचे हाल व्हावेत असं मला वाटेल का??" तो.
"पिल्लू चं सोड रे, त्याची इयत्ता, तुकडी, अभ्यास, परीक्षा याच्याशी तुझा काडीचा संबंध आहे का? कधीतरी 'गणित घे' म्हटलं तर भलतंच काहीतरी गप्पा मारत बोलत बसतोस पिल्लूशी" ती.
"अगं, मी त्याचे concept clear करत असतो. आणि याचा माझ्या उशीरा ऑफिसमधून येण्याशी काय संबंध?? मी काही तिथे टाईमपासला जात नाही" तो.
"होsss, आणि मी इथे घरात टाईमपासच करत असते, नाही का?"
"२४ तास मुलं सांभाळून दाखव, मग बोल माझ्याशी"
"तिथे दिवसभर ACत बसून तुम्हाला तुमचं मेंदूचं काम चांगलं सुचेल नाहीतर काय?"
"आणि त्या PC ला स्वतःचे मूड्स नाहीयेत, इथे दिवसभर पिल्लूच्या तालावर, त्याचे मूड्स सांभाळत नाचून दाखव"
"परत त्याचं ग्राउंड, क्लास याला सोडा-आणा हे आहेच" ती.

त्याच्या चेहर्‍यावर आता निर्विकार भाव कारण इतक्या वर्षांची सवय आणि तिच्याही बोलण्यात आता पूर्वीसारखी तडफ राहिलेली नाही कारण 'पालथ्या घड्यावर पाणी' Proud

(असंच अडजस्ट करत राहतील ना ते happily everafter...)

पिल्लू आता होतं स्वतंत्र. तिलाही जरा मोकळीक मिळायला लागते. परत जुन्या मित्र-मैत्रिणींशी फोनाफोनी सुरू होते. 'नवर्‍याची त्याची त्याची व्यवधानं चालूच असतात, मग आपण का नाही आपलं जग वाढवायचं' असा विचार करून तिचे फोन्स, समस, मित्रमैत्रिणी, गप्पा, पार्ट्या, चॅटिंग, लायब्ररी एकटीने सुरू होतं.... आणि त्याला insecure वाटायला लागतं......

"हल्ली तुझं तुझं स्वतःचच चालू असतं काही ना काही. माझी काही गरज च राहिलेली नाहीये तुला आता" तो.
"हो का? हा प्रश्न ५-६ वर्षांपूर्वी पडला नव्हता वाटतं तुला? तेव्हा पूर्णवेळ पिल्लूच्या मागे करता करता माझ्या पण काही गरजा असू शकतात हे आलं होतं का डोक्यात?? " ती.

सीडी संपून बराच वेळ निघून गेला होता. माझ्या विचारांचं मला हसू आलं. कुठपर्यंत आले मी विचार करत. ती हिमगौरी आणि तिचा तो राजपुत्र कशाला भांडतील असे? त्यांच्या बुडाशी १०० नोकर चाकर असतील म्हणून ते बिनधास्त everafter happily राहू शकत असतील.

पण आपल्या आजुबाजुचे राजपुत्र आणि राजकन्या तरी दु:खी कुठे आहेत? एकमेकांशी जमवून घेण्यात त्यांना आनंद वाटला नसता तर त्यांनी इतकी वर्ष निभावलं असतं का? ४ भांडणाच्या प्रसंगानंतर प्रेमाने समजवायला गेले असते का एकमेकाला? खस्ता खात खात, अडजस्टमेंट्स करत, घर उभं केलं असतं का? आपलं पूर्णपणे कुणाशी पटतं? आपल्या आईशी सुद्धा पटत नाही. मग जोडीदाराचं थोडंसं न पटणारं वागणं नजरेआड केलं असतं का? त्यामुळेच लग्नानंतर, (टाळता न येणार्‍या divorce च्या केसेस सोडून) इतरांच्या बाबतीत नक्कीच म्हणावंसं वाटतं..................

............. AND THE LIVED HAPPILY EVERAFTER..........!!!!!!

उपरीविशेष.......(यासाठी कवि ला विशेष धन्यवाद Wink )
"आरे, १८जुलै ला मायबोलीचा वर्षाविहार आहे. कुटुंबीयांना पण अलाउड आहे. तू येशील माझ्याबरोबर???" ती.
"तिथे सगळे तुझे मित्र-मैत्रिणी असणार, मी काय करू तुमच्यात येऊन?? बोअर होईन मी" तो.
"का? मी नाही तुझ्या मित्र-मैत्रिणींशी जमवून घेत?? तुला काय झालं कधीतरी असं करायला??? " ती.........

life goes on.........

गुलमोहर: 

मंजिरी,

खूप छान मांडलयंस.
आपलं फक्त याच्याशी नाही, याच्या अख्ख्या खानदानाशी लग्न लागलेलं आहे. >>>> अगदी वास्तव Happy

मंजे अतिशय सुरेख आणि इथे येणार्‍या प्रत्येकाच्या अगदी मनातलं.
साध्या सोप्प्या शब्दात मांडून अगदी काळजाला हात का काय म्हणतात तोच घातलास. संसार करणं महाकठिण. Happy

मस्स्त लिहिलयस. Happy

बाकी, यातल्या 'तो' आणि 'ती' ला पुण्यात कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. Wink

खूप वर्ष झाली या गोष्टीला -
मंजे, तू आणि मी घरी सी.डी.वर अक्षय-बिपाशा-करीना-बॉबी देओल चा 'अजनबी' बघत होतो.
करीना आणि बॉबी लग्न करतात. लग्नानंतर करीना प्रथमच स्वयंपाकघरात कणीक भिजवायचं काम करत असते. त्याच वेळी बॉबी एकदम मूडमधे येतो. तिच्या सगळ्या अंगाला कणीक फासतो. मग ती स्वयंपाकघरातून पळ काढते. तर तो तिच्या मागे मागे जातो. कणकेची आख्खी परात तिच्या डोक्यावर पालथी करतो. असं करताना ते सगळ्या घरभर पळत असतात.
मग एकमेकांना मिठी बिठी मारून गाणं सुरू झालं.
आपण दोघींनी एकमेकींकडे एकाचवेळी पाहिलं. चेहर्‍यावर एकच भाव - ती कणकेची साफसफाई, आवराआवरी कोण करणार नंतर! Lol
तमाम संसारी लोकांच्या मनात आलेला तो विचार...

आणि हा लेखही तसाच.... तपभर संसाराचा परिपाक Happy

छानच Happy

लले, Lol अगदी ते सुद्धा टाकावं का काय विचारात होते, पण म्हटलं जाऊ दे, ही असली थेरं फक्त पिक्चरमधूनच घडतात. Happy

ती कणकेची साफसफाई, आवराआवरी कोण करणार नंतर!
>> Lol त्यांना असले प्रश्न नसतात.

पण मंजात्ये, सगळेच नवरे काही पांघरुणाची घडी,ओला टॉवेल कॉटवर टाकणारे नसतात. ह्या उलटही असू शकतं Wink Proud

दंतकथा ही हिमगौरी नाही, 'एवर आफ्टर' आहे, हे समजणे म्हणजे मॅच्युरिटीचे पहिले आणि आखरी लक्षण.>>.रैने तुलाही जिलब्या Happy

सगळेच नवरे काही पांघरुणाची घडी,ओला टॉवेल कॉटवर टाकणारे नसतात. ह्या उलटही असू शकतं
>>>

दीपुभाऊ, पण हे रेअर आहे Wink

मन्जे, काय आमच्या घरात छूपा वावर असतो का तुझा...... कसले सही सही जिवन्त डाय्लॉग्स.....
"घरोघरी मातिच्या चुली" हेच खरे...!

सगळेच नवरे काही पांघरुणाची घडी,ओला टॉवेल कॉटवर टाकणारे नसतात. ह्या उलटही असू शकतं>>>ये बात अगर मधुरा बोले तो जानू Proud

धन्यवाद निंबे, रैने, भ्रमरा,दक्षे,चिंगी, चिमुरी Happy

ये बात अगर मधुरा बोले तो जानू>>>>कवे, अगदी अगदी Lol

मला नंतर एवढा कंटाळा यायचा याच्या टोवेल चा की मी तो लपवुन ठेवु लागले तसाच ओला
आणि संध्याकाळी याची मजा बघायची
Happy

'येत नाहि' सांगण्यातला तुमच्या नवर्‍यांचा धुर्तपणा आणी धोरणीपणा असा आहे की, जेव्हा कधी मी माझ्या ग्रुपबरोबर जाइन तेव्हा बरोबर येते म्हणु नको आणी कट्कट करु नको... Wink असो..

आमच्याकडे शेवट जरा वेगळा झाला. येते म्हणाली लगेच. किति समजावलं ... तिथे तुझ्या ओळखिचं कोणी नसेल, विषय वेगळे असतील. कंटाळशिल दिवसभर तिथे. एक नाही नी दोन नाही.

हाफ व्हॉलिवर पुढे जाउन स्वतःच यॉर्क करुन घेतल्यासारखा किंवा ७व्या स्टंपवरच्या चेंडुला लोंबुन स्लिपमधे झेल दिल्यासारखं थोबाड झालं होत माझं. वर जखमेवर मिठ चोळायला म्हणालि.. मी येउ नये अस वाटतय का ? माझि अडचण होणार आहे का तुला तिथे ? तर सांग ना स्पष्ट तसं.

शेवटच्या दोन्ही प्रश्नंना, 'हो' अस खर उत्तर बायकोच्या तोंडावर फेकायचं धैर्य असलेला एक नवरा दाखवा आणी एक हजार रुपये घेउन जा... Proud

मंजे...... बाकी लिहिलयस उत्तम... मस्त... मला माहित होत तसं तु छान लिहितेस म्हणून.. पण बरेच दिवसांनि परत सुरुवात केलिस हे बघुन बरं वाटलं.
मस्त... !! मनापसुन शुभेच्छा !!!

पर्‍या Rofl

पण बरेच दिवसांनि परत सुरुवात केलिस हे बघुन बरं वाटलं. >>> Uhoh

ये बात अगर मधुरा बोले तो जानू >>> कर्रेक्ट! दिप्या, आता बोल, आता बोल Proud

पण बरेच दिवसांनि परत सुरुवात केलिस हे बघुन बरं वाटलं. >>> अ ओ, आता काय करायचं
>>

लले अग मधुनच आरकुटावर काहितरी ३-४ ओळी खरडुन पाठवत असे... एखाद्या पुस्तकबद्दल , घटनेबद्दल... ई ई ... बर असायचं लिहिलेलं... ते आठवल.

पहिल्या ४ लाईन्स वाचल्यावर "हापिसात वाचुन चालनार न्हाई!" हा साक्षात्कार जाहला.
सांच्याला निवांत वाचीन.

हाफ व्हॉलिवर पुढे जाउन स्वतःच यॉर्क करुन घेतल्यासारखा किंवा ७व्या स्टंपवरच्या चेंडुला लोंबुन स्लिपमधे झेल दिल्यासारखं थोबाड झालं होत माझं.>>>>>> पर्‍या Rofl

आणि आला कुणी माई का लाल एक हजार रुपये घ्यायला?? Wink

मला माहित होत तसं तु छान लिहितेस म्हणून.. पण बरेच दिवसांनि परत सुरुवात केलिस हे बघुन बरं वाटलं.>>>>> हे भूत किती दिवस टिकेल माहित नाही Proud

प्रिती, पौर्णिमा, वर्षे, विशल्या, जुई, नानबा, आरती, शैलजा, ऋयामा खूप खूप धन्यवाद Happy

ऋयामा, सांच्याला घरी निवांत वाचू देणारी बायको आहे का तुझ्या घरात की तुझं अजून लग्नच झालेलं नाहीये??? Uhoh

सांच्याला घरी निवांत वाचू देणारी बायको आहे का तुझ्या घरात >>> Lol

आमच्याकडे शेवट जरा वेगळा झाला. येते म्हणाली लगेच. >>> परेश, मंजीला शेवटच्या परिच्छेदातून तेच तर सांगायचंय - आम्ही बायका नवर्‍यांच्या मित्रपरिवारात लगेच सामावतो. पण नवरे मात्र भाव खातात. Proud

अजून तू नवीन नवीन नवरा आहेस... शिकशील हळूहळू. >>> Rofl हा देखिल अनेक वर्षांच्या संसाराचाच परिपाक Wink

Pages