परदेशातली संमेलने एक उहापोह

Submitted by निरन्जन्_लिमये on 19 June, 2010 - 15:13

गेल्या काही वर्षात परदेशांमधील संमेलने आणि भारतातील मराठी सीनेनाट्य कलाकारांची उपस्थिती हा विषय अगदी ठळक बातम्यांमध्ये येऊ लागला आहे. भारताबाहेरील महाराष्ट्र मंडळांनी केलेले संमेलनाचे आयोजन आणि त्या निमित्ताने भारतीय कलाकार आणि त्यांचे संच यांचे होणारे तत्कालीन परदेशभ्रमण हा आता आश्चर्याचा विषय न राहता एक नित्याचा उपक्रम होऊ लागला आहे. अमेरिकेतील बृहन-महाराष्ट्र मंडळाचे २००९ मधले convention , ऑस्ट्रेलियातील अखिल मराठी बांधवांचे झालेले संमेलन. दुबई येथील साहित्य संमेलन, नुकतेच पार पडलेले पहिले विश्व मराठी नाट्यसंमेलन आणि आता जुलैमध्ये होऊ घातलेले अखिल युरोपिअन मराठी संमेलन अशी काही ठळक नावे या सदरामध्ये घेता येतील. यामधील काही संमेलनांना दशकांची पार्श्वभूमी आहे, तर काही नवीन परंपरा म्हणून सुरु झाली आहेत किंवा होत आहेत. यातील प्रत्येक संमेलनाला एक किंवा जास्ती मराठी कलाकारांची लक्षवेधी उपस्थिती राहिली आहे आणि या कलाकारांनी, तेथील स्थानिक कलाकारांसमवेत कार्यक्रमसुद्धा सादर केले आहेत. त्यामुळेच परदेशातील त्या त्या ठिकाणी वसलेल्या स्थानिक मराठी प्रेक्षकांकडून अशा संमेलनांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असे मानण्यास हरकत नसावी.

जशी नारळाशिवाय मुलगी दिली जात नाही, तसे वादाशिवाय जर संमेलन झाले तर ते रजिष्टर लग्न केल्यासारखे होईल. अशा संमेलन प्रती भारतात तसेच त्या त्या देशात देखील विविध मतप्रवाह व्यक्त झाले आहेत. तरीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये अशा मेळाव्यांचे प्रमाण भारतीय लोकसंखेप्रमाणेच वाढत जाणार आहे हे निश्चित. अगदी प्रतिपद चंद्रलेखेव म्हणावे तसे. आता नमनाला walmart चे डबाभर तेल न घालता थेट मुद्द्यालाच हाथ घालूया, तर अशा परदेशातील सामुहिक मेळाव्यांचे प्रयोजन काय? त्यातून होणारी फलनिष्पत्ती काय? ह्यामुळे भारतातील तसेच परदेशातील स्थानिक मराठी लोकांच्या आयुष्यात काय भर पडली? किंवा असे मेळावे भरवावेत का, आणि भरवले तर भारतातील कलाकारांनी तेथे गेलेच पाहिजे का वगैरे वगैरे..!

साधारण सत्तर, ऐंशीच्या दशकात किंवा त्याआधी स्वतंत्र भारताच्या विविध राज्यातून (तरुण पिढी..!) उच्च शिक्षणासाठी, संधी मिळेल तशी, किंवा अन्य काही निमित्ताने जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत गेली. त्यातूनच मग परदेशात व्यक्तिगत छंद जोपासले गेले, वाढवले गेले, रुजवले गेले. कालानुरूप भारतातून येऊन त्या त्या देशात स्थायिक झालेल्या पुढच्या पिढीने ते मंडळे, बृहनमंडळे, उपक्रमाच्या माध्यमातून पुढे वाढवत नेले आहेत. आज विविध देशांमधील महाराष्ट्र मंडळांमध्ये त्या त्या देशात स्थायिक झालेल्या दोन पिढ्या आणि भारतातून नुकतीच आलेली नवीन पिढी यांचा मिलाफ दिसून येतो. मुख्य म्हणजे परदेशात वाढलेल्या पिढीला मराठी भाषा, मराठी संस्कृतीबद्दल जाणीव आहे. ती समजून घेण्याबद्दल एक curiosity आहे. तसेच दशकापासून कार्यरत असलेली विविध महाराष्ट्र मंडळे आज स्वताच्या पायावर उभी राहिली आहेत, ती आकार घेत आहेत. विविध शहरामध्ये छोट्या छोट्या नाटक कंपन्या आकार घेत आहेत. पुढील काळात जसजशी नवीन पिढी परदेशात स्थायिक होईल तसतश्या या संस्था वाढत जाणार आहेत.

महाराष्ट्रात मराठी नाटक कंपन्या काहीश्या बिकट अवस्थेतून जात असल्या तरी मराठी सिनेमा पुन्हा एकदा स्थिरस्थावर होतो आहे. मराठी प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळु लागला आहे. मराठी विषयीची (अस्मिता, स्वाभिमान वगैरे शब्द गाळून) मातृभाषेविषयीची जाणीव पुन्हा एकदा वाढू लागली आहे. नवीन दमाचे कलाकार, दिग्दर्शक, आणि संच दिसू लागले आहेत. विविध विषय हाताळले जात आहेत आणि ते सादर करताना आत्मविश्वास दिसून येतो आहे.

याचाच अर्थ मराठीचे अंकुर जगभरातील मातीत रुजत आहेत. आज जरी ते शिशुवस्थेत असले तरी स्थानिक हवामान, पाणी, सिंचन, जमिनीची मशागत जशी असेल तसे ते तेथील संस्कृती बरोबर समरस होत उमलत आहेत. मृग नक्षत्रावर आकाशात मळभ दाटून आलं कि शेतकरी जसा जमीन कसायला घेतो तसेच आज जागतिक मराठी रंगमंचाची परिस्थिती आहे. हे शेत नांगरून, उत्तम बी बियाणे पेरून मराठी संस्कृतीचा मळा संपूर्ण विश्वात फुलवायचा कि नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे या ढगांना संकुचिततेच्या वाऱ्यांनी पळवून लावायचे हे तमाम जागतिक मायबाप मराठी जनतेच्या हातात आहे. त्यानंतर मग पुन्हा आम्ही लखोबा आणि टाकोबांच्या नावाने उद्धार करायला मोकळे.

जर आपण परदेशातील साम्मेलानांमधील कार्यक्रमांवर नजर टाकली तर मेन attraction हे भारतातून आलेली/ल्या प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांचे कार्यक्रम हेच असते. कारण आजही परदेशातील प्रेक्षक हा मूळ मराठी मातीतून आलेला maharashtrian आहे. परंतु त्याचबरोबर गणेशोत्सव, वसंतोत्सव अशा विविध स्थानिक कार्यक्रमांमधून स्थानिक कलाकार निर्माण होत आहेत, त्यांची ओळख वाढत आहे/निर्माण होत आहे. तर परदेशातील संमेलने अशा स्थानिक कलाकारांना संधी तसेच प्रोत्साहन मिळण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात आणि यातूनच पुढे मराठी विश्वाची/कलेची बाजारपेठ वाढण्याची/विस्तारण्याची उत्तम संधी आज चालून आली आहे.

आज महाराष्ट्रात मराठी शाळांची (त्यात संगीत, नाटक वगैरे सगळ्या धरून ) परिस्थिती बिकट होत असताना, परदेशात मात्र मराठी शाळा स्थापन व्हायला सुरुवात झाली आहे. परदेशातील पालक आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये सहभागी करतात आणि आपल्या पाल्याची मराठीशी ओळख व्हावी म्हणून अगदी प्रयत्नशील असतात. ह्या शाळा उद्याच्या मराठी जगताच्या आधारस्थंभ आहेत. ह्या शाळा वाढल्या पाहिजेत, रुजल्या पाहिजेत. परदेशातील मराठी सृष्टी निर्माण करण्याच्या प्रकल्पातल्या ह्या कोनाशिला आहेत. ह्यातूनच पुढे मराठीकरणाच्या इमारती उभ्या राहतील. परदेशातील संमेलनांमुळे या शाळात शिकणाऱ्या मुलांना मराठी संस्कृतीशी नाळ बांधण्याची संधी मिळते.

महाराष्टात राहून मराठीपासून दूर गेलेले कित्येकजण परदेशात येऊन मराठीची नाळ शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कारण त्यातून त्यांना स्वताची ओळख करून घ्यायची असते. त्यामुळेच मग आसपास राहणाऱ्या मराठी माणसांचा शोध किंवा मराठी मंडळे जॉईन करणे, अशा कार्यक्रमाना उपस्थित राहणे वगैरे प्रयत्न सुरु होतात. परदेशातील संमेलनांमुळे येथील मराठीचे सक्षमीकरण होण्यास हाथभार लागेल. त्यातूनच पुढे अशा कित्येकांना परदेशातील मराठी मंडळांच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी प्राप्त होते. ह्यामुळे मराठी वान्ग्मायाविषयी आवड, मराठीविषयी आस्था निर्माण होण्याची शक्यता आहे.

आज तांत्रिक प्रगतीमुळे माहितीचे आदान प्रदान खूप सहज झाले आहे. इंटरनेट, संगणक आणि विविध क्षेत्रे पुढे येत आहेत. परदेशातील संमेलने हे केवळ कला आणि वांग्मय एवढेच मर्यादित न राहता, त्याची व्याप्ती उद्योग-धंदे आणि इतर क्षेत्रांमध्ये ही विस्तार करता येईल. अशी साम्मेलानामधून मराठी उद्योगपतींसाठी अतिशय उत्तम व्यासपीठ निर्माण करता येऊ शकेल. विविध देशातस्थित असलेल्या मराठी उद्योगपतीमधील आदान प्रदानातून मराठी माणसांचे उद्योग विस्तारित होण्यास मदत मिळू शकेल. ह्याचा महाराष्ट्रालासुद्धा फायदा करून घेता येऊ शकेल. नवीन उद्योगपतींना - मराठी तरुणांना संधी देण्यासाठी ह्यातून एक हक्काचे सभागृह निर्माण होऊ शकते.

आता प्रश्न असा उभा राहतो कि ह्या सर्वाचा महाराष्ट्राला काय फायदा? एक मुख्य गोष्ट लक्षात आपण सर्वांनी घेतली पाहिजे, कि ती म्हणजे ह्या सर्व जागतिक वारकऱ्यांची पंढरी ही महाराष्ट्र आहे. ! विश्वात मराठीचा विस्तार आणि प्रचार करण्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले पाहिजे. ह्यातून महाराष्ट्राचा विकास साधता येऊ शकेल. जसजश्या मराठीच्या कक्षा परदेशात रुंदावत जातील, तसतसे महाराष्ट्रात त्याचे फायदे अनुभवास येऊ लागतील. Jew माणूस जसा जगात कुठेही असला तरी तो इस्रायेलशी संबंध ठेवून असतो तसा. गुजरातचे तसेच दक्षिणेच्या राज्यांचे उदाहरण डोळ्यासमोर आहे. गुजराती समाज जसजसा जगात पसरत गेला, वाढत गेला, तसा त्याचा फायदा गुजरातला होत गेला. कारण त्याची नाळ गुजरातेत आहे आणि राहील. अगदी स्पेसिफिक उदाहरण म्हणजे आज दक्षिणेचे फिल्म मार्केट संपूर्ण जगात पसरले आहे. मग एक दिवस नक्कीच मुंबई- न्यूयोर्क-मुंबई असा सिनेमा निघेल.

आज विविध देशात (अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, मिडल-इस्ट, आफ्रिका, पूर्वेकडील देश), राज्यात अनेक मराठी मंडळे कार्यरत आहेत, ती सर्व मंडळे एका समन्वयाच्या माध्यमातून एकत्र यावीत, मराठीचा जागतिक गजर व्हावा. पेशव्यांनी अटकेपार रोवलेला मराठी झेंडा, आता संपूर्ण जगात मिरवला जावा. त्यातून मराठी माणूस राज्यांच्या / देशांच्या सीमा ओलांडून पलीकडे जावा आणि मराठी माणसाला हक्काचे व्यासपीठ प्राप्त व्हावे हे विश्वाची माझे घर होऊन जाईल आणि एक दिवस खरोखरच एक मराठीचे वैश्विक, जागतिक संमेलन व्हावे. . त्या दिवशी आपण सर्व खरोखरच ९०० वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहिलेले हे मराठीचा वेलू गेला गगनावेरी असे म्हणण्यास पात्र होऊ.

गुलमोहर: