अचानक जाग आली
कुशीवर वळायला गेले
तर जाणवला फरक
पिसासारखं हलकं झालय शरीर....
डोळे किलकिले करुन
कानात सगळी शक्ती एकवटून
अंदाज घेतला...
हे काय केव्हडा जनसमुदाय जमलाय...
अहाहा... खमंग वास येत आहेत
माझ्या आवडीचे सगळे पदार्थ
कुणी आणि का बरे बनवले असतील?
हळुच उठले अंथरुनातुन
तर जाणवले कुणीतरी मला
झोपेत असतानाच छान गजरा माळलाय
आवडते अत्तरही शिंपडलेय
मागे पाहिले तर मला माझ्यासारखीच
आकृती दिसली माझ्या जागेवर
खटकले मनाला.. पण आले तरी बाहेर
माझे आवडते मंद संगीत लावलेय
कुणी माझ्या कविता वाचतेय
कुणी जुने फोटो न्याहाळतेय
आणि जे-ते फक्त माझ्याविषयीच बोलतोय
मी बोलायला गेले तर
माझ्याकडे दुर्लक्ष..
माझी हसतमुख आईही
चेहरा हसरा ठेवण्याच्या प्रयत्नात
जाउन बिलगले तिला
पण का कुणास ठाउक
तिनेही नेहमी प्रमाने जवळ घेतलेच नाही
इतक्यात कुणीतरी म्हणाले
चला निघुयात....
नेत्रदान-देहदानाला उशीर नको
आणि आतून माझ्यासारखेच
दिसणारे ते शरीर उचलुन आणले...
हम्म.. आत्ता प्रकाश पडला
आपला हा फेरा पुर्ण झालाय तर...
आपणच तर ईच्छा दर्शवली होती
साश्रुनयनांनी नाही तर हसतमुख
अंतिम निरोप देण्याची...
जेष्ठांना वंदन करुन
लेकराचा पापा घेउन
निघाले मीही...
दारात यमराज तयारच होते
मी दिसताच डोळे मिचकावुन म्हणाले
झाले ना सगळे मनासारखे?
आता पुढच्या फेर्याची तयारी करुयात !