अनोळखी....

Submitted by mayurlankeshwar on 7 April, 2008 - 02:51

मनातल्या मनात घाव सोसतो अनेकदा
कसे भले बुरे उठाव पेलतो अनेकदा

पुन्हा पुन्हा स्वतःस मी खणावयास लागता
उजाड प्राक्तनी भराव टाकतो अनेकदा

हयातभर रडतरखडत पाय चालले इथेतिथे
अता बळेच मी चढाव घालतो अनेकदा

कुणास मी स्मरू ? कुणास विस्मरू जराजरा...
पुसट स्मृतीतले अभाव वेचतो अनेकदा

मला तुझ्या मनातले खरे कधी कळेल का?
मनास हा तुझा लगाव जाळतो अनेकदा

अजूनही मलाच मी कितीकिती अनोळखी
जरी उधार जन्मनाव लावतो अनेकदा
- मयूर

(बर्‍याच दिवसांनी कविता / गझल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ब-याच चुकाही केल्या आहेत. मार्गदोषदर्शन करावे.)

गुलमोहर: 

वृत्त छान आहे.... मस्त चढ उतार वाटतात वाचताना.... Happy
जवळजवळ सारे शेर एकाच अर्थाचे आलेत...

पुन्हा पुन्हा स्वतःस मी खणावयास लागता
उजाड प्राक्तनी भराव टाकतो अनेकदा - हा सगळ्यात आवडला...

हयातभर रडतरखडत पाय चालले इथेतिथे
- इथे वृत्त बरोबर आहे, पण वाचताना धडपडायला होतंय...

बाकी गझल आवडली..

उजाड प्राक्तनी>> फार छान जमलाय रे

लगा लगा लगा लगा लगा लगा लगा लगा
मस्तं लय आहे, मयूर.

हयातभर रडतरखडत पाय चालले इथेतिथे

इथे मात्रांनी गुटले खाल्लीये.
भराव आणि अभाव - जाम आवडले

भराव चा शेर मस्त, मयुर.

हयातभर रडतरखडत पाय चालले इथेतिथे >>
ह्या ओळीत २ गोष्टी खटकतात. एक तर एक 'लगा' जास्त आहे. दुसरे म्हणजे गा=ल+ल ही सूट घेताना लय लयाला जात नाही ना ही काळजी घेतली पाहिजे. 'रडतरखडत पा' हा जो लगा क्रम आहे तिथे वाचताना अडखळायला होते.

'लगाव' आणि 'जन्मनाव' हे शेर जरा अस्पष्ट वाटले. म्हणजे दोन मिसर्‍यांमधला परस्पर संबंध थोड धूसर आहे असे वाटले.

पु.ले.शु.

'भराव' आणि 'अभाव' हे शेर फारच छान!
-सतीश