माझे मला

Submitted by दाद on 7 April, 2008 - 00:11

(किती किती दिवसांनी गजल लिहितेय. )

माझे मला

ठरवुनी आधीच भेटी, टाळणे माझे मला
साधले जे एकटेपण, साहणे माझे मला

अजुन झाली सांज नाही, एकटे का वाटते?
’या वयाला ठीक हे’, समजावणे माझे मला

प्रश्न साधे नजर माझी रोखते, पलिते जणू
विखुरलेली बिंब जळितें वेचणे माझे मला

घाव एकच घालुया, पण रोजचा संगर नको
’उचल चापा, सज्ज हो’, दरडावणे माझे मला

'दंशताजे वीष पी, अन कातही टाकून दे
हो तुझे गारूड तू’, हे सांगणे माझे मला

हा किनारा सोड! मग आहेच साहिल भेटणे
शापणे माझे मला, उ:शापणे माझे मला

गे नको धाडूस कायेच्या वनी माये अता
रंग पांचा पासुनी मग, झाकणे माझे मला

(त्या 'अता' साठी गुर्जींची आधीच मापी मागत्ये. इतुका भावला तो शेर की त्या 'चुकी'सह द्यायचा गुन्हा करतेय.)
-- शलाका

गुलमोहर: 

सांज आणि घाव दोन्ही शेर कळले आणि आवडले. आणि हो मक्त्याचा शेरही. दंशताजे हा एक शब्द म्हणूनच लिहायचा होता का गं ? का टायपो आहे ?

मला शेवटचे दोन शेर खूप आवडले. मनाला भिडले.
-अनिता

ठरवुनी आधीच भेटी, टाळणे माझे मला
साधले जे एकटेपण, साहणे माझे मला

अजुन झाली सांज नाही, एकटे का वाटते?
’या वयाला ठीक हे’, समजावणे माझे मला

प्रश्न साधे नजर माझी रोखते, पलिते जणू
विखुरलेली बिंब जळितें वेचणे माझे मला

घाव एकच घालुया, पण रोजचा संगर नको
’उचल चापा, सज्ज हो’, दरडावणे माझे मला

'दंशताजे वीष पी, अन कातही टाकून दे
हो तुझे गारूड तू’, हे सांगणे माझे मला

हा किनारा सोड! मग आहेच साहिल भेटणे
शापणे माझे मला, उ:शापणे माझे मला>>>फारच सुंदर शेर सगळे Happy जबरदस्त आवडलेत, अगदी आरपार

गे नको धाडूस कायेच्या वनी माये अता
रंग पांचा पासुनी मग, झाकणे माझे मला>>हा कळलाच नाही ग Sad म्हणजे पहिली ओळ समजलीये पण दुस-या ओळीचा त्याओळीशी जुळणारा अर्थ शोधताना चाचपडायला झालं जरा. सांगणार का जरा ?

मस्त!
सांज, चापा आणि साहिल (माझा अतिशय लाडक्या अमराठी शब्दांपैकी हा एक) हे शेर खूप आवडले! गारूड आणि माये शेर नीटसे समजले नाहीत.. पुन्हा वाचीन एक्-दोन दिवसांनी.
-- पुलस्ति.

धन्स रे बाबांनो.... कुठे मात्रांत गुटली खाल्लीये का, ते कुणीतरी परत एकदा तपासा रे.

दंशताजे हा एकच शब्दं. वीष दंश करण्या अगदी काही क्षण आधी दातांत उतरतं म्हणतात.... तितकं ताजं! वृत्ती अनावर होऊन (विशेषतः राग अन अनुराग दोन्ही)... आपण वागतो तेव्हा 'दंश' करतो... त्या अनावर वृत्तींना आधी स्वतः पी, आवर घाल. ह्या शरीराची जी बंधनं आहेत ती तोड.... पण कोणत्या पुंगीवर डोलायचं ते ही तूच ठरव.... बाहेरच्या की तुझ्या आतल्या... गारूड बाहेरचं की आतलं? तर आतलं!

साहिल मिळणे अन त्याने धारेतून काढून 'योग्य' त्या किनार्‍याला लावणे... सगळं ठीकय... त्यासाठी आधी आहे तो किनारा सोडायला हवा.
'हा किनारा सोड' ह्या शापासोबत... घाबरू नकोस तुझा 'साहिल' तुला योग्य वेळी मिळेलच हा उ:शापही आहेच!

आपल्यातला हर एक जण पाच आणि पाचच वृत्तींचा गुलाम आहे.... एकदा शरीर धारण केलं की त्या पाच रंगांची उधळण टाळणं जवळ जवळ अशक्य! शेवटचा शेर त्या आदीशक्तीला कळवळून सांगणं आहे, की माये, तुझ्यापाशी राहूदे मला... कायेच्या रानी पाठवू नकोस... मग त्या पाच रंगांपासून झाकीत फिरावं लागेल... हे 'मी' पण खूप खूप प्रयत्नांती मिळवलय.. नको धाडूस आता!

ज्ञानेश्वरांची अशी एक रचना आहे... पूर्णपणे माहीत नाही... पण हे स्पष्टीकरण ऐकून कुणाला आठवल्यास नक्की नक्की इथे द्या...

पहिले दोन्ही शेर जाम आवडले.

घाव एकच घालुया, पण रोजचा संगर नको
’उचल चापा, सज्ज हो’, दरडावणे माझे मला
ये हुई ना बात! रोखठोक शेर.

हा किनारा सोड! मग आहेच साहिल भेटणे
शापणे माझे मला, उ:शापणे माझे मला
दोन्ही ओळी स्वतंत्रपणे छान आहेत. पण परस्परसंबंध उमजला नाही.
बाकी मस्त गझल Happy

'शापणे - उ:शापणे' चा शेर छानच! आणि 'दरडावणे' चा वापरही.
'जळिते वेचणे' मात्र कळालं नाही.

-सतीश

ही गज़ल नक्की दुर्बोध झालीये. त्यावर काम कधीतरी करू (म्हणजे करेन... कदाचित बहुतेक). पण इथे अशीच राहूदे. शिकणार्‍यांसाठी दुर्बोधतेचं उत्तम उदाहरण म्हणून. मला लिहिताना मजा आली.... वाचताना तुमचं जे होतय ते होतय... नाही का?
ही म्हणजे लपाछपी झाली... मी अर्थं दडवायचा आणि तुम्ही आटापिटा करून शोधायचा....
गजल किंवा कोणत्याच कला प्रकाराचं सादरीकरण/प्रकटीकरण असं असू नये. असो....
आता जळीताचा शेर - साधे प्रश्नंच जेव्हा आपण पलित्यांत विचारतो तेव्हा आलेली उत्तरं.... जळितात येतात... ती विचारणार्‍यालाच वेचायची असतात.

दाद पहिले दोन आणि चापा थेट पोचले आणि आवडले..

बाकीचे थोडे क्लिष्ट झालेत असे वाटतेय
किंवा तुझे मराठीचे ज्ञान आणि शब्द्संपदा उच्च आहे(च) आणि ती आम्हाला झेपत नाहीये...

ह्या गजल वर वैभव, स्वाती, सारंग, बैरागी ह्यांची मते ऐकायला फार आवडेल...

मनोगत वर टाकली आहेस का ही?

visit http://milindchhatre.blogspot.com

मिलूभाऊ, अगदी आणि अगदी नाही. तुझ्या - 'क्लिष्टं' ला अगदी आणि 'शब्दसंपदा' वगैरेला अगदी नाही.

मी म्हटलं तशी दुर्बोध झालीये - लपाछपी रे. पण मलाही वैभव, स्वाती, सारंग, बैरागी ह्यांची मतं ऐकायला आवडेल... आजकाल ह्यातलं कुणी इथे फारसं दिसत नाहीये... 'असा मी काय गुन्हा केला' Happy

मनोगतवर नाही पण मराठिगजल्.कॉम वर टाकलीये. मनोगतवर मी कधीच काही टाकलं नाहीये.... 'मत'ही नाही Happy
असो... पण चर्चा व्हायल हवी नाही.... जुन्या दिवसांसारखी?

वाह!!! बोलेतो दाद देनी पडेगी...

दाद,
ते पाच रंग कोणते? किंवा त्या ५ वृत्ती नक्की कोणत्या ज्यांचे आपण गुलाम आहोत असं म्हटलंय? पंचमहाभूतं का?

खूप विचार करूनही नाही लागला अर्थ....

पंचेंद्रिये असावीत. पाच ज्ञानेंद्रियांद्वारे जे मिळते ते 'सत्य' नाही, सत्य हे या पाचांच्या आवाक्यात नाही. कायेला या पाचांची मर्यादा आहे. ही पंचेंद्रिये अशाश्वताची भूल पाडतात अन् मी जाणण्याच्या प्रवासात अडथळा बनतात... म्हणून त्यांच्यापासून बचाव...ज्यांना 'मी'त्व कळले त्यांना या पाचांच्या संकुचित जगात वरकरणी राहणेसुद्धा वेदनादायी असणार. निवृत्तीनाथांकडे 'मला जाऊ दे' असं कळकळून साकडं घालण्यामागे हीच वेदना असावी...

*** जगात तीन प्रकारचे लोक असतात... मोजू शकणारे आणि मोजू न शकणारे. ***

आनंदयात्री, माफ करा. आजपर्यंत वाचलाच नाही तुमचा अभिप्राय.
स्लार्टींचं उत्तरही छान आहे. चपखल बसतय.
मला पाच वृत्ती अभिप्रेत आहेत - आपल्या चित्तवृत्ती पाच समजल्या जातात - प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, आणि स्मृती. इथे त्याची चर्चा नको. पण आपल्या मूळ रूपाचा (ब्रम्ह रूपाचा) शोध घेण्यासाठी मनाची जी अवस्था येणं आवश्यक आहे... वृत्ती सांडलेली - निवृत्त... नितळ... त्यात ह्या वृत्तींचा म्हणजे सगळ्याच वृत्तींचा 'त्याग' आवश्यक मानला आहे.

पण माझ्या ह्या उत्तरापेक्स्।आ स्लार्टींचं अधिक जवळचं आहे नाही?

नेहमीप्रमाणे जबरदस्त.....
आताश्या मी फॅन व्हायला लागलीये तुझ्या कवितांची Happy

दाद,
बहोत खुब, एकच म्हणेन,

"दंश ताजे जहाले, भरभरुन वीष प्याले,
न जागा नव दंशास, हे सांगणे माझे मला"