एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 15 June, 2010 - 00:30

''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे.

कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी. तेव्हा चुभूदेघे )

तर ही एस्पेरांतो भाषा नक्की आहे तरी काय?

बोलायला अतिशय सोपी, सरळ व समूहासाठी निर्माण केली गेलेली ही एक कृत्रिम भाषा आहे. कृत्रिम एवढ्याचसाठी, की तिचे मूळ अनेक इंडो-जर्मॅनिक भाषांमध्ये, युरोपीय भाषांमध्ये आहे. कदाचित त्यामुळेच ज्यांना संस्कृत व लॅटीन भाषांची थोडीफार जाण व ज्ञान आहे त्यांना ही भाषा जवळची वाटते. त्यात अनेक स्पॅनिश, जर्मन, इटालियन धर्तीचे, त्यांतून घेतलेले किंवा मूळ असलेले शब्दही आहेत. थोडक्यात, युरोपियन व आशियाई भाषांच्या अभ्यासकांना ही भाषा अवगत करणे अजिबात कठीण नाही. मात्र ह्या भाषेचा उद्देश जगातील सर्व समूहाला एका सामायिक पर्यायी भाषेत एकमेकांशी संवाद साधता यावा हा आणि हाच आहे. आज जगातील लाखो लोक तरी ही भाषा आपल्या स्थानिक भाषेगत सफाईने बोलतात. पुण्यातील ह्या भाषेचे अभ्यासक व एस्पेरांतोच्या भारतातील संघाचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम म्हणतात त्याप्रमाणे ही काही परिषदांमध्ये, अभ्यासकांच्या मेळाव्यात काथ्याकूट करायची भाषा नव्हे; तर ही जनसमूहाची - सामान्य माणसाची भाषा आहे.

भाषेचे जनक

427px-1908-kl-t-zamenhof.jpgएल. एल. जामेनहोफ

(छायाचित्र स्रोत : विकिपीडिया)

पोलंडच्या वॉरसा प्रांतातील (तेव्हा तो रशियाचा भाग होता) जामेनहोफ या सद्गृहस्थांनी इ‌. स. १८७७ ते १८८५चे दरम्यान ह्या भाषेची निर्मिती केली. त्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक व प्रांतिक भेदांचे मूळ लोकांचा आपापसात परस्पर संवाद नसण्यात आणि तो संवाद करण्यासाठी एखादी सामायिक भाषा नसण्यात आहे याबाबतीत त्यांचे ठाम मत होते. त्यांना स्वतःला रशियन, यिडिश, जर्मन, फ्रेंच, पोलिश, ग्रीक, स्पॅनिश, लॅटीन, हिब्रू, इंग्रजी, इटालियन व लिथ्वेनियन भाषा अवगत होत्या. स्थानिक लोकांच्या आपापसातील भांडणांना, प्रांतवादाला, हिंसेला आणि गैरसमजुतींना जामेनहोफ महाशय कंटाळले होते. त्यातूनच त्यांना एस्पेरांतो ही जागतिक उपभाषा निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांच्या तीन मुलांपैकी लिडिया ही एस्पेरांतो प्रशिक्षक म्हणून युरोप व अमेरिकेत बराच प्रवास करून ह्या भाषेला प्रचलित करत असे. दुर्दैवाने जामेनहोफ यांच्या तिन्ही मुलांची होलोकास्टमध्ये हत्या झाली.

भाषेच्या नावामागील इतिहास

जामेनहोफ यांनी एस्पेरांतोविषयीचे पहिले पुस्तक डोक्तोरो एस्पेरांतो (डॉक्टर एस्पेरांतो) या नावाखाली इ. स. १८८७ साली प्रकाशित केले होते. एस्पेरो शब्दाचा अर्थ ''आशा बाळगणारा'' असा होतो. ह्या भाषेचे मूळ नाव ''ल इंतरनॅशिया लिंग्वो'' (द इंटरनॅशनल लॅन्ग्वेज) असे होते. जामेनहोफ यांच्या सन्मानार्थ आज ही भाषा एस्पेरांतो नावाने ओळखली जाते.

एस्पेरांतो भाषेची वैशिष्ट्ये

१. आंतरराष्ट्रीय भाषा> : जेव्हा वेगवेगळ्या मातृभाषा बोलणारे लोक एकत्र येतात तेव्हा एस्पेरांतो भाषेचा खरा उपयोग होतो. जगात ही भाषा बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंगणिक वाढतच आहे. आज एस्पेरांतो भाषा प्रामुख्याने बोलणाऱ्या कुटुंबांमध्ये वाढलेल्या व आपल्या मातृभाषेसह एस्पेरांतोला सफाईने बोलणाऱ्या मुलांची संख्या हजारांच्या वर आहे.

२. समानता : ही भाषा सर्व लोकांना एकसमान पातळीवर नेऊन ठेवते. येथे भाषेच्या जोरावर कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही. सर्वांनीच ही भाषा शिकण्यासाठी समान परिश्रम घेतले असल्यामुळे ही समानतेची पायरी परस्परसंवादात फार कामी येते.

३. तटस्थ : ही भाषा कोण्या एका जातीचा, देशाचा वा संप्रदायाचा मक्ता नसल्यामुळे एक तटस्थ भाषा ह्या अर्थी काम करू शकते.

४. सोपेपणा : ही भाषाच मुळी सोप्यात सोप्या पद्धतीने शिकता यावी, बोलता यावी अश्या प्रकारे तयार केली गेली असल्यामुळे त्या तुलनेत ती शिकण्यासाठी कमी कष्ट पडतात.

५. जिवंत भाषा : इतर भाषांप्रमाणेच ह्याही भाषेचा कालपरत्वे विकास होत गेला आहे आणि ह्या भाषेतही आपण आपले विचार व भावना प्रभावीपणे मांडू शकतो हे तिचे वैशिष्ट्य.

आज ह्या भाषेत कित्येक हजार पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे, संगीत व काही प्रमाणात चित्रपटांची निर्मिती झाली आहे. तसेच जगभरातील नामवंत साहित्यिकांचे साहित्य ह्या भाषेत रुपांतरित झाले आहे. संपूर्ण दुनियेत ह्या भाषेला आत्मसात केलेली मंडळी तिचा उपयोग जगभरात प्रवास करताना, पत्रमैत्रीसाठी तर करतातच! जगातील एस्पेरांतो बोलणारे लोक एकमेकांच्या घरी आतिथ्याचा विनामूल्य लाभ घेतात. शिवाय एकमेकांच्या भेटीगाठीत फक्त एस्पेरांतो बोलण्यावर भर, परस्पर संस्कृती-पाककला-परंपरा-विचार इत्यादींची एस्पेरांतोच्या माध्यमातून देवाणघेवाण ह्याही गोष्टी आठवणीने पाळल्या जातात. ह्या भाषेसंदर्भातील वेगवेगळ्या परिषदा, संवाद, स्नेहसंमेलनांतून निरनिराळ्या ठिकाणी एस्पेरांतो बोलणारे लोक एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करतानाच ह्या भाषेचा मूळ उद्देश जपण्याचे काम करतात.

भाषेचा उद्देश

ह्या भाषेला निर्माण करण्यामागे जगातील सर्व लोकांना आपली भाषा सोडून, परस्परांशी बोलण्यासाठी एक समान भाषा असावी... ती भाषा प्रांतमुक्त, जातिमुक्त, देशमुक्त, वर्चस्वमुक्त असावी हा उद्देश होता. त्यात स्थानिक भाषेला ही भाषा पर्याय म्हणून गणणे, भाषावैविध्यात खंड पाडणे हे उद्देश अजिबातच दिसत नाहीत. एक तटस्थ, कोणतीही विशिष्ट संस्कृती नसलेली व स्वतःची वेगळी ''वैश्विक'' संस्कृती असलेली ही भाषा तिच्या ह्या वैशिष्ट्यांमुळेच अनेक टीकाकारांचे लक्ष्य बनली आहे. तसेच ह्या भाषेतील शब्द प्रामुख्याने युरोपियन धाटणीचे असल्याचा आरोपही तिच्यावर केला जातो. मानवी इतिहासातील एक समृद्ध, विचारपूर्वक आणि ऐतिहासिक - क्रांतिकारक पाऊल म्हणून ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.

ह्या भाषेतील काही शब्द उदाहरणादाखल :

हॅलो : सालूतोन : Saluton
येस : जेस : Jes
नो : ने : Ne
गुड मॉर्निंग : बोनान मातेनोन : Bonan matenon
गुड आफ्टरनून : बोनान वेस्पेरोन : Bonan vesperon
गुड नाईट : बोनान नोक्तोन : Bonan nokton
ऑल राईट : बोने : Bone
थॅंक यू : दांखोन : Dankon
प्लीज : बोन्वोलू : Bonvolu

भाषा कशी शिकायची?

इंटरनेटच्या जमान्यात काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही ही भाषा शिकू शकता.

त्यासाठी http://www.lernu.nethttp://www.ikurso.net या संकेतस्थळांवर नजर टाका.

मराठीत ह्या भाषेवरील पुस्तकाची निर्मिती डॉ. अनिरुद्ध बनहट्टी यांनी केली आहे. मला इंटरनेटवर पुस्तक मागवण्यासाठीचा त्यांचा मिळालेला पत्ता हा असा : बी ३, कांचन नगरी, कात्रज, पुणे - ४६.
ईमेलः anibani@rediffmail.com

तसेच ह्या विषयावर तेलुगू व इंग्रजी भाषेत डॉ. रंगनायकुलू यांनी पाठ्यपुस्तकनिर्मिती केली आहे.
त्यांचा मिळालेला पत्ता असा :

P V RANGANAYAKULU
(ranganayakulu@hotmail.com , pvranga@rediffmail.com)
asista profesoro, 46 Junior Officers' Quarters, Behind TTD Admn Bldgs, KT Road, Tirupati 517 501, Andhra Pradesh.

(वरील पत्ते हे इंटरनेटवर मिळालेले असून त्यांची लेखिकेने खात्री करून घेतलेली नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी! )

चित्रफितींच्या लिंक्स

तसेच ह्या विषयावर यूट्यूबवरही काही चित्रफिती उपलब्ध आहेत. त्याही जरूर पाहाव्यात!
त्यांच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :

http://www.youtube.com/watch?v=1yiQHymMRAQ&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=Hsb4Jf8f4BI&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=ybyAF0nsHZk&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=-CwJ9I8q-L0&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=jqXRYS4QUSs&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=b_dMGO1vFdA&feature=player_embedded

http://www.youtube.com/watch?v=VXJbFHh6fKk&feature=player_embedded

या भाषेविषयी काही बातम्या स्थानिक वृत्तपत्रांमध्येही छापून आल्या आहेत. त्यातीलच ही एक बातमी :

http://www.thehindu.com/2008/02/13/stories/2008021359100400.htm

माझे शिक्षक

माझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांच्याविषयी दोन शब्द लिहिल्याखेरीज हा लेख संपवता येणार नाही. त्यांच्या माध्यमातूनच मला या भाषेची सुरेख ओळख झाली. अनेक विद्यार्थ्यांशी, समाजातील विविध स्तरांतील लोकांशी सुसंवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. उत्साह, नैपुण्य, विनम्रता, सौहार्द आणि कार्यनिष्ठा यांचा अपूर्व संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहावयास मिळतो. अनेक वर्षे समाजकल्याण खात्यातील महत्त्वपूर्ण अधिकारपद निभावल्यावर निवृत्तीनंतरही समाजहितासाठी झटणारे डॉ. अब्दुल सलाम ज्या सफाईने, सहजतेने वावरतात, बोलतात त्यावरून त्यांना दृष्टीचे सुख नाही हे कोणाला कळणारही नाही! पण कदाचित त्यामुळेच त्यांच्या कार्यातले झपाटलेपण, त्यांची तळमळ समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेते. त्यांचे मोकळे हास्य, वागण्यातील सुसंस्कृतता त्यांच्या विश्वनागरिकत्वाचीच प्रचीती देते. डॉ. सलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!

(लेखातील बरीचशी माहिती विकिपीडियामधून साभार!
विकीपीडियाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Esperanto)

डॉ. अब्दुल सलाम यांना आपण खालील पत्त्यावर संपर्क साधू शकता :
HELPO FOUNDATION

India Office:
5, Archana Corner, Saluke Vihar Road, Pune - 411 048, India.
Tel.: +91-20-26855632, 26855644. Fax: +91-20-26855644.

Email: helpo@vsnl.com
http://www.helpo.in/index.htm

-- अरुंधती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान गं.. मागे एकदा बहुतेक चिनुक्सने या भाषेचा उल्लेख केला होता.
भाषा शिकाविशी वाटली. सगळ्या जगाची एक समान भाषा ही कल्पना किती सुरेख आहे!

धन्यवाद अरुंधती या लेखासाठी.
मीही डॉ. अब्दुल सलाम यांच्याकडूनच ही भाषा शिकलो. अतिशय सोपी आणि मस्त भाषा आहे ही.

अरे वा ! छानच माहिती. अगं शक्य असेल तर तुझे शिक्षक डॉ. अब्दुल सलाम यांचा काही कॉन्टॅक्ट सांगशील ? म्हणजे आम्हालाही शकता येईल ही भाषा.

फार अभ्यास करता बुवा तुम्ही. हर्दिक अभिनंदन, शुभेच्छा आणि धन्यवाद लिंक दिल्याबद्दल, नाही तर ह्या माहितीला मुकलो असतो मी. पुनश्च आभार.

................अज्ञात

डॉ. कलामांना माझे ह्या लेखाद्वारे विनम्र अभिवादन!
आणि या प्रतिक्रियेद्वारे आमचं .......तुम्हाला विनम्र अभिवादन !
कलामनां तर मी नेहमी सलाम करतो ...घरी त्यांच चित्र तर लावल आहेच ...

ह्या भाषेची किमान ओळख करून घेणे प्रत्येकच 'ग्लोबल' नागरिकाच्या फायद्याचे ठरणारे आहे. इ. स. १९५४ मध्ये युनेस्कोने ह्या भाषेला औपचारिक मान्यता बहाल केली आहे.

>>>

भाषा म्हणून शिकत आहेत त्यांचे कौतूकच.

पण अनाधिकृत (खरेतर बर्‍याच देशात अधिकृत) ग्लोबल भाषा ही इंग्रजी आहे, अनेक देशांनी मान्यता दिली आहे, जगातील सर्व घडामोडी इंग्रजीत होतात, अश्यावेळी आणखी एक नविन भाषा ग्लोबल म्हणून निर्माण करने मला तरी अजब वाटते.
शिवाय १९५४ पासून हि भाषा ग्लोबल भाषा म्हणून मान्यताप्राप्त आहे असा उल्लेख आहे. किती देशांच्या शालेय अभ्यासक्रमात ती अनिवार्य आहे? कुठल्याही देशाने १९५४ वा त्या आधि / नंतर ह्या भाषेला अधिकृत म्हणून मान्यता दिली नाही. Happy उलट इंग्रजी भाषा अनेक देशात (आता तर चिन / रशिया सारख्या देशातही) अधिकृत आहे. शाळेत ग्लोबल नागरिक होण्यासाठी शिकविली जाते.

मध्ये भारतात आर्यसमाजी म्हणून एक समाज निघाला होता. हट्टाने काही कुटूंबियांनी आंतरधर्मिय / जातिय विवाह केले, जात नष्ट व्हावी म्हणून व बाकी उदिष्ट्ये पण वर मांडल्याप्रमाणेच होती, एकास्तरावर जिवन जगने वगैरे. जात किती नष्ट झाली हे आपण पाहत आहोतच. तसेच काही एस्परांतो किंवा तत्सम भाषेचे होईल असे वाटते. इंग्रजी भाषेला उगाच पर्याय निर्मान करन्यापेक्षा तीला आपले म्हणावे. Happy

तुझ्या लेखाला विरोध नाही हे कृपया लक्षात घे. फक्त इंग्रजी असताना आणखी नविन कशाला हेच मांडायचे बाकी काही नाही. नविन काही वेळ देऊन शिकने हे कौतुकास्पदच यात शंका नाही.

केदारशी सहमत.
अकु. खरच उत्तम माहिती. अजिबात माहित नव्ह्ते ह्याबद्दल.

अनेक जण आपापल्या ध्येयासाठी पूर्ण आयुष्य वेचतात. कधी कधी काही पिढ्या, समाजाचा भाग प्रेरित होऊन त्यात झोकून देतात. मात्र काही उद्दिष्ट्ये समाजाच्या हिताची असूनदेखील त्या साध्य करायला लागणार्‍या पायर्‍या समाजाला त्रासदायक असू शकतात. अशा वेळी समाजाने त्यात साथ दिली तर अशा व्यक्तींची ओळख 'समाजसुधारक' अशी होते, अन्यथा 'बंडखोर'!

ह्या मताचा वरील पोष्ट किंवा ह्या भाषेशी संबंध नाही पण सहज सुचले म्हणून लिहावेसे वाटले.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

अरुंधती, भाषा हा खास आवडीचा विषय दिसतोय. या भाषेबद्दल अजिबातच माहिती नव्हती.
जगातील सगळ्यांनी एका भाषेत बोलायचे, हि कल्पनाच किती रम्य आहे !!
मी केवळ आवड म्हणून फारसी लिपी शिकलो. (जून्या मायबोलीवर, ऐसी अक्षरे मेळवीन, असा लेखही लिहिला होता. )

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! Happy

दिनेशदा, फारसी भाषा शिकणे सोपे काम नाही.... तुम्हाला विपूमध्ये लिहित आहे! Happy

केदार, किरण अनुमोदन!
मी देखील ही भाषा शिकायला गेले तेव्हा माझा थोडासा असाच दृष्टीकोन होता. आज इंग्रजी अवगत असल्यामुळे आपले फारसे अडत नाही. पण ही भाषा (एस्पेरान्तो) मुख्यत्वे बोलीभाषा आहे. त्यामुळे ज्याला इंग्रजीचा गंधही नाही असा माणूसही ही भाषा 'बोलू' शकतो. त्याला फक्त त्याच्या मातृभाषेतून कोणत्या शब्दाला एस्पेरान्तो मध्ये कोणता प्रतिशब्द आहे हे कळाले व काळाची रुपे कळाली तरी तो बरीच बाजी मारू शकतो. इंग्रजी भाषा ही आपल्याकडे शाळेपासून सक्तीने शिकवली जाते म्हणून आपल्याला ती कळते. ज्या देशांमध्ये इंग्रजीमधील शिक्षण सक्तीचे नाही त्या देशातील लोकांना परदेशी लोकांशी संवाद साधताना, एवढेच काय आपल्याच देशातील अन्य मातृभाषा असणार्‍या लोकांशी संवाद साधताना प्रश्न येतो. त्यामुळे एका परीने ही भाषा ''भाषाप्रश्ना''चे उत्तर होऊ शकते.

अर्थात ह्यावरही मतभिन्नता असू शकते, नव्हे, आहेच!

मला त्या भाषेमागचा उद्देश फार आवडला आणि त्या तुलनेत इतर भाषांपेक्षा ती शिकायला सोपी वाटली. ज्यांना ह्या भाषेमागचे विचार पटतात ते लोक अगदी मुद्दामहून ती भाषा शिकून घेतात असा अनुभव आहे!

प्रांतवाद, भाषावाद, जातिवाद, देशवाद यांपासून मुक्त अशी भाषा..... आजूबाजूला पाहिले की त्याची फार गरज आहे असे वाटते!

मागे अशाच धर्तीवर मराठी आणि ईंग्लिश ह्याची सांगड घालून ग्लोबिश का अशी काहीतरी भाषा मधुकर गोगटे ह्यांनी तयार केली होती. मला फारसे आठवत नाही पण असाच विषय आहे म्हणून आठवण झाली. चुभूदेघे.

Bona. Gratulojn por alportanta ni tia belaj informoj. Dankon! Dibenojn al vi!!!