तसा तो मला नेहमीच भेटायचा….
कधी परसातल्या कडुनिंबावरून हलकेच ओघळताना.
कधी अंगणात फुललेल्या निशिगंधेला रडवताना….
तर कधी घराच्या छतावर जोराजोरात थापा मारुन मी आलोय रे…., म्हणून सांगताना !
लहानपणी शाळेत जातानाच्या पाऊलवाटेवर आपोआपच उगवून आलेल्या दगडफुलांना गोंजारताना…
उघड्या पायांनी (पादत्राणाशिवाय) रस्त्यावरच्या डबर्यात साचलेले पाणी
एकमेकांच्या अंगावर उडवीत सवंगड्यांबरोबर मस्ती करताना…
तो नेहमीच भेटायचा….
सख्ख्या मित्राप्रमाणे…., सख्ख्या मित्रासारखा …
डोळ्यातली आसवे लपवताना….
तो माझ्यासवे बोलायचा, खेळायचा, बागडायचा क्वचित रडायचाही…
पण रडू नको म्हणून नाही सांगायचा, तर स्वतःच माझ्याबरोबर रडायचा…
मग त्याच्या रडण्यात माझी आसवेही लपून जायची…, धुवून जायची…
ती तशी धुवून गेली की तो हलकेच मिस्कील हसायचा…
एखाद्या खोडकर पण समंजस मित्रासारखा !
त्या दिवशी शेजारच्या काकुंनी सांगितले…
चल आपल्याला आईकडे जायचेय दवाखान्यात, तुला छोटा भाऊ झालाय…
केवढा आनंद झाला होता त्याला…
एखाद्या नाचर्या मोरासारखा, किं माझ्या मनमोरासारखा?
………पण तो बेभान होवून नाचला…!
आमची दोस्ती तेव्हापासूनची.. कीं त्याही आधीची….
आई सांगायची तिला म्हणे एकाच वेळी दोन दोन लेकरे सांभाळावी लागली होती..
माझ्या जन्माच्याही आधी…
आत ‘मी’ आणि बाहेर ‘तो’….
तो खुप जुना आहे, आदि आहे, अनंत आहे.. पुरातन तर आहेच पण चिरंतनदेखील आहे…
पण मी मात्र त्याला बरोबरीचाच मानतो…. जुळं भावंडच जणू..!
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा बोलका साक्षीदार….
सांगितलं ना…! तो बोलतो माझ्याबरोबर…, मग….?
कुठल्याही सच्च्या मित्रासारखा तो रुसतो देखील खुप लवकर…
मित्रांचा अधिकारच असतो तो.., मग कुठेतरी दडून बसायचा…
त्या वेड्याला कुठे माहीत होतं…
अरे राजा.., तू कुठेही लपलास, कितीही लपलास…
तरी माझ्यापासुन कसा लपणार आहेस?
आपल्याच सावलीपासुन कधी लपता येतं का? वेडा कुठला….
तो कायम मनातच असायचा…
असला लपाछपीचा खेळ त्याच्या अगदीच आवडीचा…
पण माझ्याबरोबर खेळताना नेहमीच हरायचा…
मग कधी माझ्या डोळ्यांतून तर कधी कवितेतून बरसायचा…!
तो असाच अमनधपक्याने कधीही यायचा…
मग हळुहळु धरा सारी धुरकट व्हायला लागायची…
त्याच्या येण्यानं तिच्या शरीराला सुटलेला तो मादक गंध ….
हलकेच गात्रा गात्राला भिजवत वेडंपिसं करायचा…
मला भेटायचा तो नेहमीच…
नदीतीरावर संथ लाटांशी खेळताना…
पाण्याशी खेळणार्या लाजर्या लव्हाळ्याशी बोलताना…
वेशीबाहेरच्या मंदीरात ….
तिच्या नजरेत हलकेच हरवून जाताना…
तो कधी बराचसा लाजरा वाटायचा …
तिच्या बटेवर रेंगाळताना हळुवारपणे ओघळून जायचा…
मी हलकेच त्याला स्पर्श करायचा…
आणि तो लाजाळूच्या झाडासारखा लाजुन बसायचा…
मला भेटायचा तो…
आईच्या कुशीत हलकेच विसावताना…
तिच्या डोळ्यातली ममता शोषताना…
कधी बरसायचा बेभान…, उन्मुक्त समीरासारखा…
हलकेच स्पर्शायचा …
अंगांगावर उठलेल्या गारेगार शिरशिरीसारखा…
मग मी वेड्यासारखा त्याला वेचू पाहायचा…
गात्रा गात्रातून मनसोक्त साठवू पाहायचा…
तो मला नेहमीच भेटायचा…
तो मला नेहमीच भेटतो …
आमच्या भेटीला ॠतूंची बंधने नसतात…
आम्हाला भेटायला काळाच्या चौकटी नसतात…
तो कधी आईच्या वात्सल्यात भेटतो…
कधी प्रियेच्या केशसंभारात भेटतो …
कधी कधी नकळत माझ्याच कवितेत हरवतो ….
कधी हुलकावण्या देत खोडकरपणे हसायचा…
कधी हसता हसता…
हलकेच डोळ्यातल्या आसवांना वाट करून द्यायचा..
सखाच तो….
येता जाता माझ्यावर हक्क गाजवायचा,
तुझ्या माझ्या प्रायव्हसीचाही त्याला मत्सर वाटायचा
तू माझ्या जवळ असलीस की मग त्याला चेव यायचा…
मग मला चिडवत…, कधी हलकेच तूला खिजवत…
आपला एकांत मोडत तो बेफ़ाम बरसायचा…….
तो असाच आहे….
तुझ्यासारखा !
आपल्या हक्कावर आक्रमण नाही रुचत त्याला ….
तुझ्या माझ्या स्वप्नातल्या…
कळ्या फुलवणारा..,
पाऊस… माझा सखा !
विशाल.
विकु आणि सुकि...खुप
विकु आणि सुकि...खुप छान..
आहेच तो तसा अल्लड,खट्याळ,मदमस्त..........सखा
सख्या आता तुझे भय मला वाटू
सख्या आता तुझे भय मला वाटू लागले,
बघ ना रे कसे तुझ्या आक्रोशाने आभाळ फाटू लागले,
सागराने सुद्धा घेतलीये कोलांटी उडी,
तू तर हसत हसत म्हणतोयस.. ही तर रंगीत तालीम आहे..
होईल कधी तरी खरी खुरी जगबुडी....
खरं सांगु..... तू कितीही भिती
खरं सांगु.....
तू कितीही भिती दाखव...
मी पण पक्का आहे...
कारण मला माहीत आहे...
मला तुझी सोबत आहे...
२६ जुलैच्या प्रलयात अनुभवलंय ते मी ...
तुझी प्रलये तुझी वादळे तू
तुझी प्रलये तुझी वादळे तू एकट्यानेच अनुभवलीस,
दोस्ती विसरला होतास ना रे तेव्हा..?
ढगाआडून पाणवताना हुंदका काढत बडबडलासं..
आता तरी दूर निघून जा मला सोडून नको येऊस माझ्या वलयात पुन्हा...!
अगदी मनातलं वाचल्यासारखं! मला
अगदी मनातलं वाचल्यासारखं!
मला कळतय तेंव्हापासून मी त्याच्या(पावसाच्या) प्रेमात आहे
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो मलाही भेटत आलाय!
छान लिहीलत!
पानाफुलांवरून हळूवार
पानाफुलांवरून हळूवार नितळताना,
सगळ्यांनाच वाटे तुझा हेवा...
वाटे मग सार्यांनाचं दु:खामधे असाच कोणीतरी ओघळावा..
दूर दूर क्षितीजापार प्रवास तूझा..
थेंबाथेंबातूनी फक्त वाढंतचं जावा , वाढतचं जावा.....
(No subject)
विशल्या आता तुझी बारी...
विशल्या आता तुझी बारी...
मला नाही वाटत कधी तुझा असा
मला नाही वाटत कधी तुझा असा हेवा..
तेवढा कधी आलाच नाही तुझ्या-माझ्यात दुरावा...
वा!!!! विशाल आणी सुकि , लगे
वा!!!! विशाल आणी सुकि , लगे रहो
माझाही सखा हाच . खुप छान आठवनी जाग्या केल्यात तुम्ही , धन्यवाद !!!:स्मित:
धन्स गं नुतन
धन्स गं नुतन
नुतन धन्यवाद... विशल्या
नुतन धन्यवाद... विशल्या मुसळधार पाऊस आहे इथे.. मी आपली उगाच चार थेंबाची भूरभूर..
दुर दुर माळरानी आंथरले हिरवे हिरवे गालीछे,
त्यावर चमचमती मोती एवलूष्या थेंबाचे..
असे तुझे रुपडे पाहूनी जीव जडला तुझ्यावरी,
अरे सख्या का लपून बसतोस तू निल्या अंबरी...
सुक्या..सेम हिअर.. मघाशी
सुक्या..सेम हिअर..
मघाशी सुमाच्या ओंजळीवर मी दिलेला प्रतिसाद...
सुमा...
हा पाऊस... ना असाच असतो...
अगदी त्याच्यासारखा .....
येतो येतो म्हणताना अलगद हुलकावणी देतो..
गेला गेला म्हणताना अचानक समोर येतो ...
खरे तर तो मुळी गेलेलाच नसतो...
तो रुजतो...
मनाच्या खोलवर गेलेल्या मुळांमधून...
गात्रा गात्रांच्या हळुवार स्पंदनांतून...
एकदा का तो आला ...
किं रिकामी झोळी शिगोशिग भरुन टाकतो...
इतकी की रितेपणाची जाणिवच संपून जाते...!
मस्तचं रे विशालं ... अरे
मस्तचं रे विशालं ...
अरे वेड्या तुझ्या येण्याची चाहूलसुद्धा,
मनाला सुखावून जाते...
पुन्हा एकदा ठरलेली भेट होणार,
या उत्कंठेने मनमीत मयुर नाचून जाते..
तू येशील, सोबत राहशील, आनंद देशील
जे काही देशील अगदी भरभरून देशील..
पण माझ्याजवळ तुला देण्यासाठी असं काहीच नाही..
पाहीलसं ना तु सगळं देवूनही.. माझी झोळी फक्त तुझ्यासाठी..
का बरं रिकामी राही... ?
मस्त रे पाऊस माझा आणि
मस्त रे
पाऊस माझा आणि सानुचाही मित्र आहे
म्हणजे माझा होताच पण सानुला पाऊस आणि मित्र कल्पना काही मी बोलून दाखवली नव्हती कधीच. गेल्या शनिवारी ती अचानकच म्हणाली मला "आई पाऊस माझा मित्र आहे. छोटासा टप टप पडला तरी आणि धो धो पड्ला तरी
तुझापण आहे ना तो मित्र...!" हा प्रश्न नव्हता तिला माहितच आहे अशा अर्थाच वाक्य होत तिचं 
धन्स गं कवे !
धन्स गं कवे !
दोस्ता, तुला आठवतोय का
दोस्ता, तुला आठवतोय का रे..
आपला तो शिवणा पाणीचा खेळ..
काय हे तुझ्यावर राज्य आलं होतं..
तेव्हा मी तुला जाम चिडवलं होतं...
तु माझ्यामागे धावत होतास अन
तुला दमवून मी चार पावले
तुझ्या पुढेच धावत होतो...
तेव्हा तुझ्यावर राज्य असूनही
मी उन्हात अन तू मात्र सावलीत..
का रे असं का होत होतं.. सांगशील..?
आज सहजचं ते आठवलं.. अन मग उत्तर सापडलं..
वळवाच्या सरींसोबत जेव्हा तू आलास,
तेव्हा वातावरणात असाच शिवणापाणीचा खेळ रंगला होता..
अन राज्य संपल्यावर वर आकाशी सात रंगाचा पडदा पडला होता...
क्या बात है
क्या बात है
वाटलं नव्हत मला...कधीच...
वाटलं नव्हत मला...कधीच... :अओ:,
विश्रांतीच्या नावाखाली तु सुद्धा...:राग:
काळाला फितूर होऊन... दुष्काळाचा मुखवटा घालशील...:अरेरे:
पाहतोयस ना आता तुझ्या त्या विश्रांतीने,
किती तडफड होतेय.. मुक्या जनावरांची..
माणसांची.. सगळ्यांचीच..
जमीनसुद्धा इतकी फाटलीये की
ठिगळं सुद्धा कमी पडतील...
एवढा तळतळाट का घेतलास..
अरे मुळातच गर्भश्रिमंत आहेस ना रे तू,
मग तु कसल्या हव्यासाला भाळलास...
वाईट वाटलं मला .. जेव्हा निरागस बळी घेवून,
तू फक्त ऐकमेव प्रेषकाच्या भुमिकेत ऑस्कर मिळवलास...
व्वा! सही रे
व्वा! सही रे
सुर्या तो असं काही वागतो आणि
सुर्या तो असं काही वागतो आणि सगळंच उलटंपालटं करुन टाकतो...
त्याच्या असं वागण्याचे किती गंभीर परिणाम होतात याचं एक ज्वलंत उदाहरण इथे पाहायला मिळेल.
खरे साहेब माफ करा
विशाल.. अमर्याद साम्राज्य
विशाल..
अमर्याद साम्राज्य गाजवणारा एकमेव आहे तो.
विशाल, पाऊस मस्तच! खूप छान
विशाल, पाऊस मस्तच! खूप छान वर्णन केलंय!... अगदी प्रत्येकाच्या मनातलं! सहज आणि अप्रतिम!
पाऊस हा हळव्या मनांचा सखाच असतो ना... सगळ्या मूड्स मध्ये साथ करणारा सखा...
सु. कि.. तुमच्याही चारोळ्या छान... संग्रहीत करून ठेवा... प्रतिक्रियांमध्ये वाहून जाईल...
पु.ले.शु. दोघांनाही... आणि हा पावसाळा संपेपर्यंत पावसाच्या कविता लिहीण्याची सक्ती
धन्यवाद, ड्रिम्स.. माझा दोस्त
धन्यवाद, ड्रिम्स.. माझा दोस्त आहे ना तो करतोय ह्याचा संग्रह.. विशाल कुलकर्णी

सक्तीच झालं की कंटाळा येतो,
असा तो नेहमीच म्हणतो..
हलकीशी डुलकी घेतली की
मग सुसाट बेभान होऊन धावतो..
स्वतःशीच अशी स्पर्धा करून,
थोड्या फार फरकाने
अगदी मनभरून बरसतो...
दिवसही त्याला प्यारा,
अन रात्रही तितकीच प्यारी...
दोघांच्या संगतीनं मग सफल ती स्वारी...
उडाणटप्पूसारखी रानवनं पिंजूण काढायची,
दर्या खोर्यातून नवी वाट शोधायची..
नित्याचचं झालयं त्याचं अस वागणं..
तूला आवडत असेल असं नागडं
तूला आवडत असेल असं नागडं होऊन
मनसोक्त नाचायला, हुंदडायला...
पण मग मलाही त्याची सवय का लावतोयस..
काल तुझ्यामूळे माझी कापडं वल्लीच राहीली,
अन आज घालायसाठी फक्त एवढी लंगोटच शिल्लक राहीली..
तूला बरं वाटत असेल ना मला असं पाहून..
मी मात्र बसलोय इथे कुडकुडत अगदी अंग चोरून...
अरे वेड्या, नग्नतेबद्दल चोरी
अरे वेड्या,
नग्नतेबद्दल चोरी कशाला?
काम-क्रोध-मद-मोह-मत्सरादि कपडे हवेत कशाला?
सगळे कपडे उतरवून तू भेटतोस ना..
तेव्हा होते अनुभूती..खर्या खुर्या सख्याची !
मस्त आवडले
मस्त आवडले
विशाल, सूर्यकिरण - काय
विशाल, सूर्यकिरण - काय अप्रतिम लिहिता तुम्ही दोघेही.........हॅट्स ऑफ...
मला काय वाटतं या सख्याबद्दल........इथे लिहिलं तर चालेल ?
पावसाचे एक कधीच कळत नाही
मैत्र जुळुनही अनोळखपण संपत नाही
सौम्य -रौद्र स्वरूपातून अरूपाची ओळख देत नाही
सरसर दरदर कोसळूनही मौन काही सोडत नाही
सप्तरंगी खेळ कधी नजर उचलून पहात नाही
हिरवे लेणे लेववून धरा कवेत घेत नाही
अंगाखांद्यावर हात ठेवतो सखा कधी होत नाही
स्पर्शून जातो मनामनाला आठव कधी ठेवत नाही
विसंवादी सूर याचे ताल मेळ जमत नाही
मल्हाराशी याचे नाते तोडूनही तुटत नाही
भरभरून आला तरी शोष काही संपत नाही
दंवावाटे कधी उतरून नातं कधी तोडत नाही
मनातून पुसायचा म्हटला तरी जात नाही
आंसूवाटे कधी ओघळेल सुख-दु:ख याला नाही
- शशांक.
विकु..खूपच सुरेख.. सुकि..
विकु..खूपच सुरेख..
सुकि.. सुंदर..
अहाहा, शशांकजी खुप सुंदर !
अहाहा, शशांकजी खुप सुंदर ! धन्यवाद अॅडिशनसाठी...
आता पुन्हा पावसाची चाहूल लागेल...
लिहा मनसोक्त.. अजुन येवु द्या !!
Pages