जावे त्याच्या वंशा (ललित लेख मालिका): २. टीप

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

टीप

टीप, तीच जी तुम्ही आम्ही कधी हॉटेल, कधी लॉज, टॅक्सी, विमानतळ किंव्वा इतर कुठेतरी कधी हसत हसत, भीत भीत, कष्टाने, किंव्वा बरेच वेळा नाईलाजाने लोक-लाजेखातर देतो. कधी प्रश्ण प्रेस्टीजचा तर कधी खिश्यात किती सुट्टे आहेत त्याचा किंव्वा कधी हातातून किती सुटतायत त्याचा. घेणारा म्हणतो अपने अपने नसीब की बात है. देणार्‍यासाठी मात्र एक नियम म्हणून दिलेली टीप तर कधी जाणीवेतून दिलेली टीप, एक वातावरणातून जन्मलेली दुसरी अनुभवातून सहज आलेली.

मनू. तुमच्या आमच्या सारखाच हुषार आणि महत्वाकांक्षी. मुंबईतील मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेला, जगलेला. आई वडीलांची नियमानुसार बँक व शाळेत नोकरी अन याचं स्वप्नं मात्र अमेरीकेत आपला झेंडा रोवण्याचं. अर्थात त्याच्या पालकांच्या दृष्टीने ते स्वप्न म्हणजे, सकाळी त्यांच्या बरोबर चहा घेताना बील गेट्स ने मराठी वर्तमान पत्र चाळावं इतकं अप्राप्प्य. अतीरेकचा भाग सोडला तर, थोडक्यात मनू मोठा घास घेतोय ही एक टीपीकल मध्यमवर्गीय भिती.

अर्थात सर्व कष्ट, मेहेनत घेवून व येन केन प्रकारेण पैशाची जुगाड करून मनू उच्चशिक्षणासाठी अमेरीकेत आलेला. कर्म धर्म संयोगाने आम्ही सहा महीने एकत्र राहीलो अन तुमच्या आमच्यातला हाच मनू मला टीपेचं गणीत अगदी हसत शिकवून गेला.

मनूला दुर्दैवाने कुठलीही शिष्यवृत्ती मिळाली नाही, थोडक्यात हुकली असावी. मग कँपस वर कुठेतरी इकडे तिकडे छोटे मोठे काम करता करता पठ्ठ्याने जवळच्याच देशी हॉटेल मधेही काम मिळवलं. दिवसभर शाळेत व लॅब मधे राबायचं मग घरी येवून दोन घटीका अंग टेकायचं की संध्याकाळी लवकर हॉटेल मधे कामाला लागायचं. शनिवार, रविवार जेव्हा आम्ही बाकी सुदैवी लोकं थोडा आराम किंव्वा मजा करत असू तेव्हा हा दिवस रात्र त्या हॉटेल मधे काम करत असे. एकदा गमतीने आम्ही म्हटलही होत, तुझी लेका कामवाली बाई झालीये, तू डॉलर मधे कमावतोस इतकच. पण एक दिवस गम्मत म्हणून त्याच्या बरोबर हॉटेल चं गिर्‍हाईक म्हणून नव्हे तर त्याच काम कसं असतं हे बघण्यासाठी गेलो.

प्रत्त्येक टेबल वरची चादर साफ़ करून बदलायची. काटे, चमचे, ग्लास सर्व व्यवस्थीत लावायचे. एखादी मन्द सुवासाची मेणबत्ती ठेवायची अन कुणी आलं की हसून स्वागत करायचं. मग तत्परतेने गिर्‍हाईकाची ऑर्डर घ्येवून आत स्वयंपाघरात त्याची नोन्द करायची. पुन्हा सर्व टेबलांवर लक्ष ठेवून काय हव नको ते पहायचं. कुठे पाणी कमी पडलं, कुठे चमचा हवाय, कुठे मेनू कार्ड हवय, तर कुठे प्लेट्स उचलायच्या, सर्वावर लक्ष ठेवायचं. पुन्हा त्याला दोनच हात आहेत किंव्वा तो हॉटेल व्यापी भगवंत नाही हे गिर्‍हाईक सोयीस्कर विसरतो. येणारा भुकेने वखवखलेला असतो अन जाणार्‍याला बील देण्याची घाई असते. त्यातूनही देशी हॉटेल अन अमेरीकेतील छोट्या शहरात म्हटलं की स्वागतापासून, टेबल लावायला, वाढायला, ऑर्डर घ्यायला, पाणी द्यायला, पुसायला, अगदी शेवटचं बिल फाडणेपर्यंत सर्व काम करावी लागत असत. तेही एकवेळ खपलं असतं पण इकडे मात्र शेवटची उष्टी, खरकटी, काढायला व भांडी धुवायलाही मनूच. मनूबरोबर असेच ईतर एक दोन काम करणारे विद्यार्थी.
स्वताचं उष्त, खरकटं न काढणारे, किंव्वा कीळस करणारे महाभाग असतात, अशात इतरांचं उरलं सुरलं काढायचं म्हणजे सोप काम नव्हे. पुन्हा प्रत्त्येकाच्या खाण्या पिण्यच्या सवयी वेगळ्या, काही स्वच्छ तर काही निव्वळ गबाळे, अमेरीकेत येवूनही आपला गबाळा वंश न सुटलेले.

दर शनीवारी व रविवरी सकाळी नऊ पासुन रात्री अकरा पर्यंत असा पिट्टा पडल्यावर मग पुन्हा सोमवारपासून युनिव्हर्सिटी मधे अभ्यास सुरू. पुन्हा हे सर्व करताना हॉटेल मधे कुणावरही राग काढायची वा चढ्या आवाजात बोलायची मुभा नाही. ईतकं करूनही समजूतीने वर टीप देणारा गिर्‍हाईक विरळाच. गिर्‍हाईकाची काय चूक म्हणा तो मग्न असतो बिल अन टॅक्स चं गणित करण्यात किंव्वा शेळी गेली जीवानिशी खाणारा म्हणतो वातड कशी त्यातला प्रकार.

आमचे शनिवार रविवार जेव्हा सिनेमागृहात जायचे तेव्हा मनू असाच दिवसभर हॉटेल मधे राबायचा. दिवाळी वगैरे सणा सूदीला तर त्याची ही ड्यूटी नेहेमी पेक्षा जास्तच. एकाच घरात राहूनही आमचं जग व याचं जग पार पार वेगळं होवून जायच. तरी कधी त्याला कुणापुढे हात पसरलेला मी पाहीलं नाही, की घरी भारतात जास्त फोन करता येत नाही, किंव्वा मॉल्स मधे खरेदी परवडत नाही, किंव्वा सुट्टीच्या लाँङ विकेंडला ना सुट्टीवर जायला मिळत नाही अशी तक्रारही त्याच्या तोंडून ऐकली नाही. मनूची हॉटेल मधील दिनचर्या बघून आम्हालाच आश्चर्य वाटायचं की याला काही कमीपणा, लाज वाटत नसेल? कधितरी अहंकार दुखावत नसेल आपल्याच मित्र मैत्रिणींना गिर्‍हाईक म्हणून सेवा देताना? कसलीच बोच लागत नसेल? आणि वर टीप मिळाली नाही तर मनाची चराफ़ड होत नसेल?

मनूचं उत्तर तयार होतं : अरे घरी बाई येत नाही तेव्हा आईच भांडी घासते, किंव्वा बाबा मदत करतात त्यान्ना तर टीपही मिळत नाही. आपल्याच कुटुंबात काम करायची कसली लाज? हे हॉटेल , इथले इतर काम करणारे लोक, नेहेमी येणारी माणसं, हेही माझ एक कुटुंबच आहे, अन टीपेचं म्हणशील तर देणार्‍याने माझ्या प्रयत्नाला व मेहेनतीला केलेला तो सलाम आहे असे मी मानतो. दोस्ता सलाम मागायचा नसतो किंव्वा त्यावर हक्क सांगायचा नसतो ती असते एक जिवंत दाद, आतून आलेली, जी मिळेल तीच आपली.

आमचा मनू मला कितीतरी हॉटेल्स मधे असाच सहज भेटतो. त्याला सलाम करताना माझा हात आखडत नाही, तुमचा?

*****************************************************
(पूर्व प्रकाशितः २४ मार्च, २००५)

विषय: 
प्रकार: 

मस्तच लिहिलंय योग... !

आमचाही सहसा हात आखडत नाही....पण काही लोकांसाठी वर उल्लेखलेली जिवंत दाद आतून येतच नाही इतकी गचाळ वागणूक त्यांच्याकडून मिळालेली असते.

पूर्वी आणखीही कारणे होती. ती मी माझ्या ब्लॉगवर या लेखात नमूद केली आहेत.
http://avipune.blogspot.com/2006/07/blog-post_23.html

योग हे आत्ता वाचलं. मस्तच लिहीले आहेस.
आमचा मनू मला कितीतरी हॉटेल्स मधे असाच सहज भेटतो. त्याला सलाम करताना माझा हात आखडत नाही, तुमचा? >>> मस्त. आमचा देखिल हात आखडत नाहीच तिप देतांना पण हा गोष्टीत भेटलेला मनु आता पुन्हा कधिच मला माझा हात आखडु देणार नाही.

छान जमलं आहे व्यक्तीचित्रण योग. लगे रहो.

छान