Submitted by desh_ks on 4 April, 2008 - 03:33
भावनांच्या देवघेवी गिरवलेल्या
ओळखीच्या हास्यरेषा ठरवलेल्या |
थंड अन् फेसाळता प्याला हवासा,
स्निग्ध सायीच्या स्मृतीही हरवलेल्या |
मत्त जे पायातळी रगडून नीती,
मिरवण्या त्यांनी सभा या भरवलेल्या |
त्या तिथे कोणी उभा धनदांडगा तो,
सर्व टोप्या त्या दिशेला फिरवलेल्या |
कोडगे लाचार जे निर्लज्ज हुजरे,
मस्तकी त्यांनी शिव्याही मिरवलेल्या |
-सतीश
गुलमोहर:
शेअर करा
छान गझल,
छान गझल, सतीशजी!! मतला आणि दुसरा शेर आवडला.
टोप्यांच्या शेरात 'वळवलेल्या" चालेल का? 'Xरवलेल्या' यायला पाहिजे तिथे! फिरवलेल्या??
अभिनंदन व पु.ले.शु.
- नचिकेत
धन्यवाद
धन्यवाद नचिकेत,
अभिप्रायाबद्दल आणि चूक निर्देशित केल्याबद्दल ही. सुचवल्याप्रमाणे सुधारणा केली आहे.
टाईप करताना काहीतरी चूक अनवधानानं झाली खरी. माझ्याजवळील या गजलच्या स्थळ प्रतीमधे खरं तर 'फिरवलेल्या' असंच लिहिलेलं आहे मी.
-सतीश
वा
वा वा!
मस्तच आहे गझल सतीशजी!! टोप्या शेरात काही भरीचे तो / त्या टाळता आले तर आणखी छान होईल.
स्निग्ध सायीच्या स्मृतीही हरवलेल्या | फार फार आवडला हा शेर आणि विशेषतः हा मिसरा!! क्या बात है.
भरीचे शब्द
भरीचे शब्द टाळता आले तर चांगलंच या मताशी मी पूर्ण सहमत आहे आणि तुमचं मत वाचल्यापासून त्या दिशेने विचारही करतो आहे.
‘त्या तिथे’ हे लिहिताना माझ्या मनात विचार होता तो असा की ‘त्या तिथे’ म्हणताना एक सुदूरत्व (remoteness) आणि अनिश्चितता असं दोन्ही निर्देशित व्हावं. आणि ‘तो’ म्हणताना कुणी एक विशिष्ट व्यक्ति नव्हे तर आज हा, उद्या तो असं जरी असेल तरी जे स्वार्थी तथाकथित ‘अनुयायी’ असतात ते ज्या दिशेला असा कुणीही ‘क्ष’ असतो त्या दिशेला आपला स्वार्थ साधेपर्यंतच जातात.
मस्त गजल
मस्त गजल सतीशजी
स्निग्ध सायीच्या स्मृतीही हरवलेल्या >>> फार आवडले
visit http://milindchhatre.blogspot.com
थंड अन्
थंड अन् फेसाळता प्याला हवासा,
स्निग्ध सायीच्या स्मृतीही हरवलेल्या
अप्रतिम....