हाफ राईस दाल मारके - क्रमशः भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2010 - 05:35

नाशिकच्या हॉस्पीटलमधे पंधरा दिवस अबू अन बावीस दिवस चाचाची सर्वांनी अत्यंत मनापासून सेवा केली. सर्वच जण नाशिकला सतत येऊन जाऊन होते. वैशालीची सासू, अंजना अन झिल्या हे कायमस्वरुपी वास्तव्यास होते चाचाच्या घरी! नाशिकमधेही चाचा सुपर लोकप्रिय होता. अमितला हा धक्काच होता की बाबा अन अबूकाकाचे भांडण झाले. त्याने स्पष्ट सांगून टाकले की काजलशी लग्न वगैरे करून तो उगाचच दिपूला दुखावणार नव्हता अन अबूचाचा जे म्हणत होता ते बाबांनी ऐकायला हवे होते.

सोळाव्या दिवशी पोटाला बँडेज असलेला अबू ढाब्याच्या गेटमधून स्ट्रेचरवर आत आणण्यात आला तेव्हा त्याने शब्दानेही विचारले नाही की त्याला पुन्हा ढाब्यावर का आणले... आणि तेवीसाव्या दिवशी अमित अन वासंती बरोबर चाचा जेव्हा तसाच स्ट्रेचरवरून ढाब्याच्या गेट मधून आत आला तेव्हा त्यानेही शब्दाने विचारले नाही की अबूला पुन्हा इथे का आणले..

या हॉस्पीटलायझेशनच्या दोन तीन आठवड्यांमधे दोघे जो समोर येईल त्याला 'दुसरा कसा आहे आणि मला त्याला भेटू का देत नाही इतकेच विचारत होता. मात्र त्यांची या अवस्थेत भेट होऊ द्यायची नाही हे वासंती अन पद्याने ठरवून टाकलेले असल्यामुळे ढाब्यावर परत गेल्यावरच त्यांची भेट होणार होती.

या तेवीस दिवसांमधे जसजशी त्यांची प्रकृती सुधारू लागली तसतसे ढाब्यावरील वातावरण जराजरा बरे होऊ लागले. तरीही, जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतील तेव्हा पुन्हा भांडणे होतील का ही काळजी होतीच.

एक मात्र झालं होतं! यशवंत अन सीमाला अमितचा नादच सोडावा लागला होता. जर नवरा मुलगा स्वतःच म्हणत असेल की मी लग्नाला उभा राहणार नाही तर मुलगी देऊन करायचे काय?

तरीही दिपू आणि काजलचा जीव नेमका भांड्यात पडला होता असे मुळीच नाही. कारण अमित आऊट याचा अर्थ दिपू इन असा नव्हताच.

ढाबा व्यवस्थित चाललेला होता. पद्याने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नव्हती. काशीनाथने सख्ख्या भावाप्रमाणे पद्याची साथ दिलेली होती.

दिपू अन काजल एकमेकांशी बोलू शकत नव्हते. फार तर येता जाता एकमेकांना दिसू शकायचे इतकेच. नाश्त्याला काजलला आणायचेच नाहीत सीमा अन यशवंत! दिपूच्या वेदनाही कमी झालेल्या होत्या. एकदा महुरवाडीला जाऊन यावे असे त्याला वाटत होते. पण तिकडे गेलो तर तेवढ्या दोन दिवसात इथे काय होईल ते सांगता येत नव्हते. तसेही, अबू अन चाचा नसल्यामुळे अन झिल्या नाशिकला बसल्यामुळे ढाब्यावरचे कामही करायलाच हवे होते.

आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्यावरून दोघात कधी नव्हे ती भांडणे झाली अन आपण गावाला जायचे हे त्याला पटतच नव्हते. अबू अन चाचाच्या नुसत्या सुधारण्याच्या बातम्याच तो आजवर ऐकत होता. त्या दोघांना प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला. सगळेच साश्रू नयनांनी दोघांना भेटले होते.

अजून आठवडा गेला. काजलबाबत यशवंतचाचा अन सीमा काही निर्णय तर घेत नाहीत ना याची दिपूला मनात भीती होती. अजूनही अबू अन चाचाला अन्न त्यांच्या खोलीतच जात होते. जितका वेळ वासंती चाचाजवळ बसायची तितका वेळ चाचा तिला अबूकडे जाऊन बसायला सांगायचा. अन अबूकडे गेले की तो म्हणायचा तू तुझ्या नवर्‍याकडे आधी बघ, मी पहिलवान आहे, मला काय होणार??

हळूहळू अबू बाहेर यायला लागला. स्वतःच्या पायांनी चालत! लोकांना भेटू लागला. आत्तापर्यंत गुजरातपासून संगमनेरपर्यंत असा एक ड्रायव्हर किंवा कंडक्टर नव्हता अन पंचक्रोशीतला ढाब्यावर गिर्‍हाईक म्हणून येणारा एक माणूस नव्हता जो या दोघांना आत येऊन भेटून गेला नव्हता. ढाब्यावरची सुतकी कळा हळूहळू मावळून दोघे सुधारत आहेत हे पाहून आनंदी होऊ लागली होती.

हळूहळू सगळ्यांनाच अंदाज आला होता की बरे झाल्यावर दोघे पुन्हा एक होणार, दिलजमाई होणार आणि राम रहीम ढाब्याला पुन्हा तेच दिवस येणार!

आणि बाहेर पडायला लागलेला अबू चार दिवस झाले तरी चाचाच्या खोलीत त्याला भेटायला कसा गेला नाही यावर सगळ्यांचा कुजबूजत काथ्याकूट चाललेला होता. मात्र अबूला ते विचारायचे धाडस कुणातच नव्हते.

दिपू या सगळ्या प्रकाराला आपण कारणीभूत आहोत हे मानून चालला होता. पण वयाने लहान असल्यामुळे आपण माफी वगैरे मागायला गेलो अन आपल्यावरच दोघे चिडले तर काय घ्या अशी त्याला भीती वाटत होती.

अबू आता सकाळच्या नाश्त्याला येऊन बसायला लागला. आहार तसाच होता. पिणं वाढलंच होतं! फक्त... बोलणं बंद झालं होतं! वासंती त्याला खुलवायचा खूप प्रयत्न करायची, पण तो बोलायचाच नाही. त्याने 'नको' म्हणून हात करेपर्यंत पद्या त्याच्या पानात ऑम्लेट्स वाढायचा.

आणि शेवटी वासंतीने सगळ्यांदेखत एक दिवस अबूला विचारले...

वासंती - दोस्त दोस्त म्हणता.. यांना पाहून आलायत का एकदा तरी आल्यापासून.. नुसत्या चौकश्या करता ते??

सगळे सुनसान गप्प! चाचीने हात तर घातला होता विषयाला! प्रत्येकाच्याच मनात तोच प्रश्न होता. पण.. अबूला असला प्रश्न विचारायची भीती वाटत होती प्रत्येकाला.. पण चाचीने विचारला होता.

यशवंतही थबकून अबूकडे बघत होता... पद्या मागे वळून स्तब्धपणे अबूकडे बघत बसला होता..

आणि अबू....

एक अवाक्षर न बोलता खाली मान घालून ऑम्लेट खात होता..

वासंती - क्या पूछती मै?? जुबान नय हय मुंहमे??

जुबान नही है?? अबूला असे बोलायचे कुणाचे धाडसच नव्हते. वासंतीचाचीने केले होते धाडस!

अबू शांतच!

आता पद्याला धीर आला.

पद्या - अबू.. आप नय बोलेंगे तो ढाबेपे मन नय लगता... आप दोनो एकदुसरेसे बातां बी नय करेंगे तो... राम रहीम ढाबा चलानेका काय को??

राम रहीम ढाबा चलानेका कायको?? राम अन रहीम जर एकमेकांशी बोलतच नाहीत तर ढाबा हवाच कशाला??

अजूनही अबू शांतच! आता पद्याला जास्तच धीर आला. अबू जखमीही होता. म्हणजे सगळ्यांसमोर एकदम कानाखाली वगैरे काढून आपली बेइज्जती करणार नाही इतपत अंदाज होता पद्याचा!

पद्या - मै जाता मालेगाव.. ऑम्लेट, भुर्जी का टपरी लगाता.. आहिस्ता आहिस्ता अपनबी अच्छासा हॉटेल शुरू करेंगे वैशाली..

पोरे हादरलीच! पद्या जाणार? मग आपल्याकडे कोण बघणार? अबू अन चाचा बोलत नाहीत. एकमेकांशीही अन आपल्याशीही! मग आपण काय करायचे? ढाबा कोण चालवणार? कॅप्टन कोण आपला??

पण वैशालीचे नवे रूप दिसले सगळ्यांना..

वैशाली - आप जाना तो जावो.. मै नय आती..

बाळू आपल्या वहिनीकडे बघतच बसला.

पद्या - तुम नय आती बोले तो?? तुम क्या करेंगी इधर?
वैशाली - क्या करेंगी मतलब? अबू और चाचा आपके भरोसेपे ढाबा रखरहे हय.. और आपच जानेकी बातां कररहेय! तो आप यहांपे जो काम करते वो मै करुंगी.. आप लगाना मालेगावमे हॉटेल अपना अपना...

मनीषाताईने वैशालीच्या डोक्यावरून हात फिरवला. पद्याला प्रचंड शरम वाटत होती.

पद्या - मै क्या सचमुच जायेंगा?? ये दोनो बातांच नय करते तो यहां कैसे रह्येंगे??

तेवढ्यात अंजनाने नेहमीप्रमाणे चांगल्या मनाने परंतू चुकीचे वाक्य टाकले अन भडका उडाला.

अंजना - ऐसी दोस्ती बी नय देखी मैने.. अन ऐसी दुष्मनी बी...

दुष्मनी! अबू अन चाचात थोडीशी दुष्मनी निर्माण झाली आहे हे अंजनाने मनाशीच कबूल करून टाकले होते. एकच क्षण! एकच क्षण ऑम्लेट खाताखाता अबूचा हात थबकला. सगळ्यांनी पाहिले. अन दुसर्‍याच क्षणी...

"***** कौन बोला ऐसे दोस्त नय देखे... आं?? कौन बोला.. साला इस ***के साथ कौन दोस्ती करेंगा?? .. खुदका ढाबा है और छोडके जारहाथा.. मेरे दुनियामे होते हुवे बोतल तोडके डालता खुदकेच पेटमें.. कौन दोस्ती करेंगा इससे... इससे तो गधे अच्छे.. ये खुदकोच माररहा... "

जवळपास सव्वा महिन्याने स्वतःच्या पायावर चालत आलेला गणपतचाचा दारात उभा राहून अबूकडे बघत हातवारे करत जोरात ओरडत होता..

आणि...

रंगच बदलला नाश्त्याचा...

पद्या खुदकन हसला.. वासंती अपेक्षेने अबूकडे पाहू लागली.. पोरे.. सीमा यशवंत.. सगळेच पाहू लागले.. झरीनाचाची आपले काम सोडून उभी राहून उत्सुकतेने पाहू लागली.. आणि.. दैत्य अबूबकर मागे वळून चाचाच्या दसपट आवाजात ओरडले..

"स्साले ***.. मेरे दुनियामे होते हुवे तू इधर छुरी काय को ढकेला फिर खुदकेच पेटेमे.. आं.. मरगया था क्या मै?? ****** शरम नय आता तेरेको बालबच्चोंके सामने खुदखुशी करते हुवे??? अब बच काय को गया हय जिंदा.. मरच जानेका था ना... ****"

चाचा - तो ढाबा छोडके कैसे जा सकता है तू... शरम नय आती??
अबू - बेशरम तेरा बाप.. तेरा खानदान बेशरम रे.. मेरेको बोलता है *** के तेरा कुछबी हिसाब नय बनता
चाचा - तो कायको पयलेच बोला... (वेडावून दाखवत) मेरा बी हिसाब कर डाल किट्टू..
अबू - तो क्या बोलेंगा?? मिनिस्टरांजैसां बातां करता कुर्सीपे बैठके..
चाचा - हा मिनिस्टरच हय मै.. अध्यक्ष है.. तू कोन बोलनेवाला..
अबू - ऐसे लाथ मारुंगा ना **** मे.. मै कोन बोलनेवाला हय ये पता चलजायेंगा..
चाचा - मेरेको उठाके पटका कायको उस दिन??
अबू - कुचलनेचवाला था मै.. तेरे जैसा पापी जिंदा नय रयनेको होना..
चाचा - तो अब कायको बैठके बातां कररहा है?? अब क्यों नय कुचलता??
अबू - ऑम्लेट खा रहा है... पयले खाने दे...

अख्खा ढाबा महास्फोट झाल्यासारखा हसू लागला. पद्याने ऑम्लेटचाच तवा साणशीने धरत उलत्न्याने टणाटणा वाजवला अन दिलजमाईची तुतारी वाजली..

राम.. रहीम.. एक होगयेले थे... फिरसे...

बायकांच्या चेहर्‍यावरून आजवरची सुतकी कळा जाऊन मांगल्याचे हसू आले होते. सगळ्याजणी कौतुकाने दोघांकडे बघत होत्या...

झिल्या, बाळ्या, विकी, दादू, दिपू, मन्नू अन साखरू एकमेकांकडे हसून बघत होते. झरीनाचाची अबूच्या जोकवर खदाखदा हसत होती..

रमण आपले किडलेले दात बिनधास्त दाखवत पद्याकडे बघत हसत होता..

काजलच्या चेहर्‍यावर रंगपंचमी उमटली होती..

फक्त...

वासंतीचा चेहरा आजवर कुणालाच दिसला नसेल असा झाला होता...

अबूकडे बघताना संपूर्ण चेहरा भरून स्मितहास्य होतं.... आणि.. दोन्ही डोळ्यांमधून संततधार लागलेली होती..

आणि चाचा आणि अबू एकमेकांकडे पाहात असताना गेल्या आठ वर्षात कुणीही कधीही पाहिली नव्हती ती घटना घडली...

अबूच्या त्या जोकवर....

त्याचा जीव की प्राण किट्टू... गणपतचाचा ...

.... हासला.. अगदी... अगदी तोंडभरून हासला..

चाचा हासला ही बातमी शिरवाड अन पिंपळगावच नाही तर चांदवडपर्यंत पोचणार होती..

आणि चाचाला हसताना बघून वयाचा, पोझिशनचा कसलाही विचार न करता मन्नू डायरेक्ट म्हणाला..

मन्नू - पद्यादादा.. आजसे सबके पगार बढगये देखो.. दस दस टक्का... चाचा हसरहे...

हे वाक्य त्याने उच्चारले मात्र...

हसण्याचे रुपांतर झाले अश्रूंमधे... आजवरच्या भयानक आठवणींचे अश्रू पाझरू लागले..

चाचाने अबूला घट्ट मिठी मारली .. दोघांच्याही पोटाला जखमा असूनही ती मिठी इतकी घट्ट अन इतकी प्रदीर्घ होती की सगळे बघतच बसले होते..

वासंती उठली... तिने त्या दोघांच्या मिठीला मिठी मारली...

मग पद्या पुढे झाला... पद्याने दोघांच्याही खांद्यांवर एकेक हात ठेवला..

तेव्हा सगळ्यांचे लक्ष गेले..

अबू अन चाचा एकमेकांच्या मिठीत स्फुंदून स्फुंदून .. हमसून हमसून रडत होते...

राम रहीम ढाब्यावरील झाडांची पाने सुद्धा रडली त्या क्षणी..

आणि आजवर घोषणा करण्याची अबूची सवय अन अधिकार डावलून चाचाने घोषणा केल्या..

सबका पगार दस नय.. पंधरा टक्के बढ्या रे मन्नू...

पद्या.. आज अगर एक गिर्‍हाईकबी दिखा ना ढाबेपर... तेरी नौकरी गयी...

झिल्या, बाळ्या.. भागो पिंपळगाव... सब सामान खरीदके लावो.. लायटींग करनेका..

आज पार्टी है रे... ये नालायक बचगया और परेशान करनेके लिये जिंदा रयगयाय.. इसलिये ..

इसलिये... मै पार्टी दे रहा हय आज.. एक बी गिर्‍हाईक नय लेनेका अंदर.. क्या रमण...

ओ झरीना.. लडकेको बोलो... बस्तीसे जो मिलेगा वो चीज लावो.. क्या.. आज पुरी रातभर तुम दोनो इधरच..

और.. और एक बात.. तुम्हारी जागा ओढ्यापाशी होती ना.. पंधरा दिवसात एक खोली बांधायची..

झरीनाचाची हक्काच्या घरात राहणारे रे प्वाराओ.. ए वासंती.. अमितला बोलाव नाशकाहून..

यशवंत.. तेरा दुकान आजके लिये बंद है.. यहा सिर्फ पार्टी होएंगी.. और..

और... काशीनाथ... शिरवाडसे ढाबेपरके हर बाईकेलिये दो दो साडी खरीदके ला...

मै पैसे देरहा.. क्या.. जिसको जो चाहिये वो आज मिलेंगा..

राम रहीम ढाबा है ये... क्या.. मज्ज्जाक नय हय...

दोघांचेही शर्ट अश्रूंनी पूर्ण भिजलेले होते.. एकमेकांच्या...

आणि...

त्याक्षणी दिपूकडे पाहताना काजल आणि आणि काजलकडे पाहताना दिपूच्या चेहर्‍यावर जे रंग होते...

त्यांचे मात्र वर्णन नाही करता येणार.. अजिबात नाही करता येणार...

:::::: आज राम रहीम ढाबा बंद है... कल आना.. गणपतचाचाके हुकूमसे::::::

अब्दुलच्या मोडक्या दुकानालाही लायटिंग करण्याइतके मोठे मन होते चाचाचे..

आणि नेहमीच्या जागी सगळे गोल करून बसलेले असताना नुसता धिंगाणा चाललेला होता. दुपारी चारपासूनच...

आधी साखरूने ओढ्यावरून उगाचच कारण नसताना दोन बादल्या भरून आणल्या अन वैशाली अन मनीषाताईच्या डोक्यावर उपड्या केल्या. पद्या अन बाळू बघतच बसले. मग त्यांनी साखरूला धरला अन मागच्या हौदात बुचकळून काढला.

मग चाचाने दारूची एक भरलेली बाटली अबूच्या डोक्यावर उलटी केली .. तोपर्यंती वासंतीने सीमाच्या वेणीला मोठी दोरी बांधून ठेवली. ती जिकडे जाईल तिकडे लोक हसत होते..

अंजनाने पद्याचा हात धरला अन वैशालीला वेडावून दाखवत पद्याला स्वतःकडे ओढले.. काशीनाथही हासला... वैशाली म्हणाली.. 'लेकेच जा.. भोत परेशान करते..' अन मग स्वतःचीच चूक कळून लाजली.. काजलही हसायला लागली...

भिजलेल्या मनीषाने अन वैशालीने मग बाळूच्या डोक्यावर गार झालेले दाल फ्राय उपडे केले.. तो ओढ्याकडे धावला.. मागून मन्नू जाऊन त्याने ओढ्याबाहेर ठेवलेले त्याचे कपडे हळूच घेऊन आला..

दिपूने काजलच्या आजीची नक्कल केली.. यशवंतने खोटे खोटे डोळे वटारून त्याच्याकडे पाहिले.. मात्र सीमाने त्याला शाबासकी दिली.. मग दिपूने तिला तिच्या वेणीत दोरी आहे हे सांगीतले..

तोपर्यंत झिल्याने पाठमोर्‍या दादूची पँट मागून खाली ओढली ... तो तसाच धावत खोलीच्या पलीकडे गेला..

कुणीही काहीही करत होते.. थोड्या वेळाने अर्धनग्न अवस्थेतील अन पाण्याने गारठलेला बाळु एकदम सगळ्यांच्या समोर आला. धावाधावी झाली.. मग विकीने कुठून तरी मनीषाताईचीच साडी आणली अन बाळुच्या अंगावर गुंडाळली.. ती बाळूने काढून फेकेपर्यंत मनीषाताई हसून हसून अर्धमेली झाली होती..

सहा वाजता अमित नाशिकहून पोचला... तो आल्यावर काजल एकदम कॉन्शस झाली.. पण अमितने सरळ तिला सगळ्यांच्या समोर जाऊन सांगीतले.. धाडस बघा... म्हणे झाले ते झाले.. विसरून जा.. माझ्या मनात तसे काही नाही.. मग काजलही मोकळेपणाने त्याच्याशी वागू लागली...

अबूचे आधीच चालले होते... पण काशी आणि चाचाचे पिणे सात वाजता सुरू झाले... तोपर्यंत झरीनाचाचीचा मुलगा आईबरोबर तिथे आला होता.. आज त्याला दोन मोठे मासे मिळाले होते...

दौर-ए-जाम शुरू होगया... हळूहळू वातावरण कसं हलकं हलकं झालं... काजलच्या गाण्याचा प्रोग्रॅम झाला अर्धा तास.. मग कुणीही गायला लागलं.. झरीनाचाचीने नेहमीचे तेच एक गाणे म्हंटले..

काशीनाथ पीत असला तरी सतर्क होता.. मागच्या वेळेस त्याने फारच बडबड केलेली त्याला आठवत होती...

आणि कधी नव्हे ते अबू अन चाचाच्या हक्काच्या आग्रहाखातर यशवंतही प्यायला तयार झाला.. झरीनाचाची किती पीते हे पाहून वैशालीच्या सासूने तोंडात बोटे घातली होती.. नाकही मुरडले होते.. पण तिच्याकडे लक्ष देणार कोण???

सीमा यशवंतच्या पिण्याकडे लक्ष ठेवत होती... पण वासंती तिला समजावत होती...

मग चाचा गायला लागला.. भसाड्या आवाजात गात असला तरी ठेक्यात गात होता..

मग प्रथम झिल्या उठला अन त्याने वैशालीच्या सासूला धरून उठवले अन तिला नाचवू लागला.. सगळे हसत असतानाच अचानक अंजना उठली अन काशीनाथला उभा करून त्याच्याबरोबर नाचू लागली.. बेहोष होऊन टाळ्या पिटल्या सगळ्यांनी.. हे दृष्य कल्पनातीतच होते... झरीनाचाचीचा मुलगा अन रमण नाचू लागले... पोरांना काय?? सगळीच उभी राहून नाचू लागली..

मग वासंतीने सीमाला उठवले.. सीमा आपली लाजत लाजत कशीबशी नाचू लागली.. तर यशवंत म्हणाला.. कधीच सांगतोय जरा बारीक हो... आता नाचताना कसं दिसतंय.. सीमा डोळे वटारून पाहात असताना सगळे हसू लागले.. मग काजलला मनीषाने उठवले.. काजलला फारसे नाचता बिचता यायचे नाही.. पण ती दिसायलाच अशी होती की तिचा नाच दोन तीन मिनिटे सगळे नुसतेच बघत राहिले..

चाचा अजून गातच होता... यशवंतला हा दारू नावाचा प्रकार बरा वाटत होता.. हळूहळू त्याला सीमा फारच सुंदर भासू लागली..

साडे आठ वाजता गाण्याच्या भेंड्या चालू झाल्या... स्त्री व्हर्सेस पुरुष.. अर्थातच.. स्त्रिया सहज भेंड्या चढवत होत्या...

वैशाली अन मनीषाची मुले सांभाळण्याचे काम आता अंजना करत होती.. झरीनाचाचीच्या मुलाने आणलेल्या रस्सा वाट्या क्षणार्धातच संपल्या...

अबू पेग वगैरे सिस्टीमने पिणारा माणूस नव्हता.. तो बाटलीतूनच एकेक घोट ड्राय घ्यायचा...

सगळ्यांनाच एकेकदा अब्दुलची आठवण येऊन गेली.. ...

दहा वाजता जेवणाची पहिली फेरी झाली..

तिखट जाळ लालभडक माशाचा रस्सा.. सुखे मटन.. वालाची उसळ.. दाल... मसाला राईस... पोळ्या.. आणि वर मिठाई..

आता पेंगुळलेल्या डो़ळ्यांनी बायका बसल्या होत्या. वैशालीची सासू झोपायलाही गेली...

मात्र आता खरा पिण्याला रंग चढला...

चाचाने मालेगावच्या आठवणी सांगायला सुरुवात केली.. लहानपणच्या... अबू अन त्याचे किस्से ऐकून सगळेच हसत होते...

मग स्टाफपैकी एकेक जण ढाब्यावर नवीन आल्यावर काय काय चुका करायच्या याची पुन्हा उजळणी झाली.. हसणे सारखे चाललेच होते...

यशवंत आता गाऊ लागला होता... बरा गात होता.. शेवटी काजलचा बाप होता म्हणा...

सव्वा अकराला कॅशमधे वाढीव पगार सगळ्यांना वाटला गेला.. एकच हल्लकल्लोळ झाला.. अगदी झरीनाचाचीच्या मुलालाही बक्षीस म्हणून काहीतरी मिळाले...

मग साड्यांची वाटणी झाली.. कोणाला कोणती साडी आहे हे सरप्राईझ ठेवलेले होते... आता एकमेकींच्या साड्या पाहण्यात अन त्यांची स्तुती करण्यात जवळपास बारा वाजले..

सगळ्यांनाच चांगलीच चढलेली होती...

आता दिपू अन काजल बिनधास्त एकमेकांकडे पाहात होते.. एखादे वाक्य बोलतही होते.. हसत होते.. मन अगदी सुखाने भरून गेले होते..

आणि मध्यरात्री पाऊण वाजता अत्यंत जड झालेल्या जीभेने यशवंत चाचाला म्हणाला....

ते वाक्य.. ऐकू सगळ्यांनाच गेलेलं होतं.. पण होतं चाचासाठी..

यशवंत - आखिर... मेरी बेटी के मनके साथ खिलवाडच किया ना गणपतभाई आपलोगांने??? कल दोपहर हम लोग ढाबा छोडके जारहे हय... हमेशा... हमेशा के लिये....

गुलमोहर: 

माफ करा, पण 'धन्स' म्हणजे काय? मी बरेच ठिकाणी वाचले मायबोलीवर! आणखीन एक शब्द बहुधा वाचला आहे मी! मोदक! मोदक म्हणजे काय?

माझा जीव पड्ला भांड्यात एकदाचा.
ध्न्स म्हणजे thanks. मोदक म्हणजे अनुमोदन (असं मला वाटतं).. जाणकारांनी सांगा Happy

मला वाटत 'धन्स' म्हणजे धन्यवाद असाव....
कथा अप्रतिम...मी office मधे वाचते हि कथा पण खर सांगते, घरी असल्यावर मनात हा प्रश्न नेहमी येतो कि कथेचा पुढचा भाग आला असेल का? आणि office मधे आल्या आल्या पहिल 'मायबोली' तच घुसते. इतक तुमच्या कथेने गुंतवुन टाकलय......पु. ले. शु...

निकिता म्हणतीये ते बरोबर आहे..निकिताला मोदक Happy

कथा तर मस्तच चाललीये...बरंच टेंशन कमी केलं ह्या भागाने..पण as usual पुन्हा एकदा ट्विस्ट...पुढे काय...लवकर कळुदे आता Happy

बेफिकिर....परत एकदा तुमचा खास टच
सुरुवातीला आले डोळ्यात पाणी..
आणि मग हसु......
आणि शेवटी अनपेक्षीत धक्का....

बेफिकीर,
हा भाग लवकर पाठवल्याबद्दल धन्यवाद......फार सुंदर लिखान केले आहे आपन ........वाचताना डोळ्यात पाणी आले.....खरच या कादंबरी बरोबर आम्हा सर्व वाचकांचे नाते जुळलेत.....आयुष्यात पुढेही असेच छान लिहत रहा हिच आम्हा सर्वांची अपेक्षा............

काही चुक झाली असेल तर क्षमस्व.........

मला वाटतं, धन्स हा मिंग्लिश (मराठी + इंग्लिश) भाषेतला शब्द आहे. धन्यवाद + थँक्स = धन्स Happy

बाकी, आजचा भागही मस्तच...
तुमच्या लेखनाचं एक खास वैशिष्ठ्य म्हणजे पूर्ण भागात जर दु:खाच्या प्रसंगाचं वर्णन केलं असेल, तर शेवटची पंचलाईन आनंदाची नांदी घेऊन येते...आणि पूर्ण भागात जर आनंदीआनंद असेल, तर शेवटची पंचलाईन दु:खाची झालर लावूनच येते...
छान शैली आहे ही. जीवनात काहीच शाश्वत नाही....सगळंच क्षणभंगुर आहे, हे तत्वज्ञानंच सांगता जणू दरवेळी... Happy

व्वा.. अमेझिंग..२१वा भाग इतक्या पटकन आला..धन्स जास्त वेळ वाट पाहू दिली नाही म्हणून्..पुढे काय होणार त्याची उत्सुकता आहेच ..

बेफिकीर,

तुमच्या तडका मारलेल्या दाल न राईस प्लेट्ची चटकच लागलीय बघा. या मस्त, वेगळ्या, आणि अमेझिंग कादंबरीला फक्त १०-१२ च प्रतिक्रिया का आहेत? असो पण die hard फॅन क्लब आहे राईस प्लेटचा. टायटल बघून असेल कदाचित पण इतके दिवस माझ कुतुहल चाळवल गेल नाही. बर मायबोलीवर दुसर्‍या बाफ वरती वगैरे उल्लेख-(मार्केटिंग हाईप हो) नाही.

काल मात्र मी झपाटल्यासारखी स्टार्ट टू फिनिश वाचून काढली. चार तास वेगळ्याच दुनियेत होते मी. तुमची शैली इतकी अप्रतिम आहे की प्रसंग, व्यक्तिरेखा ठ्सठ्शीत डोळ्यासमोर उभ्या राहतात. आणि कहाणीमधील ट्विस्ट तर अफलातून. नेल बाइटिंग! आता मी पण फॅनक्लब ची मेंबर झाले बर का!

महत्वाच, तुमची आई कशी आहे आता? Hope she is doing better! २२ व्या भागाची वाट पहात आहे.

छान हा भाग पण!! आता बहुतेक अमित सोडवेल हा यशवन्तचा राग - त्याला समजावून?
वाट बघतोय आमच्या तर्कान्सकट!!!

मस्त Happy
इतक्या लवकर पोस्ट केल्याबद्दल धन्स हं...खरंच अगदी गुंतून गेले आहे या कथेत आणि ढाब्यावर.
खूप छान लिहिता तुम्ही....असेच लिहित राहा....आणि इतकी सुंदर कादंबरी दिल्याबद्दल खरंच खूप खूप thanks Happy