एक अंत आत

Submitted by kunjir.nilesh on 27 May, 2010 - 09:42

एक अंत आत ' म्हणजे एकांत.. आयुष्यात काही क्षण इतके हळवे असतात की तेव्हा माणसाला एकांत हवा असतो... बर्‍याचवेळी हा एकांत आपल्या जवळच्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यानेच हवा असतो हे न पचणारे न पटणारे तथ्य...
एखाद्या व्यक्तीचे विचित्र वागणे, मन दुखावणे, सोडून जाणे या आणि अश्या असंख्य गोष्टी ज्याने मन बेचैन होते आणि मग आपल्याला हवा असतो तो फक्त आणि फक्त एकांत...

एकांत चांगला की वाईट?? यावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असु शकते... पण तो सर्वांना हवा असतो हेही तितकेच खरे... कधी कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी, त्रास देणारे क्षण विसरण्यासाठी... आयुष्यातली न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी...तर कधी सार्‍याचाच कंटाळा येऊन फक्त आणि फक्त एकट राहण्यासाठी.. अश्या असंख्य कारणांसाठी प्रत्येकाला एकांत हवा असतो...भारताची लोकसंख्या पाहिली तर अशी किती कारण असतील याचा विचार न केलेलाच बरा नाहीतर त्यासाठी सुद्धा एकांत शोधावा लागेल...

जेव्हा कधी आपल्याला वाटेल की एखादी आपल्या जवळची व्यक्ती दु:खी आहे त्यावेळी तिला एकटे राहू द्या... तो अनुभव त्या व्यक्तीला खूप काही देऊन जातो सांत्वन करण्यापेक्षा त्या व्यक्तीला थोडासा वेळ देणे जास्त योग्य... एकांत आणि एकाकिपणा यात खूप फरक आहे... वपूंच्या भाषेत सांगायचे तर 'एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा, एकांताची माझी व्याख्या फार वेगळी आहे. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण. जेव्हा कधी दु:ख होईल तेव्हा एकांतात जा, मनसोक्त रड. जमिनीला अश्रू हवे असतात. मातीचं देणं चुकवलं की हलका होशील. वर चढशील, आकाशाजवळ पोहोचशील.असचं कोणतं तरी दुःख पार केल्यावर तुकाराम, 'तुका आकाशाएवढा' असं लिहून गेला असेल.’

आयुष्य जगताना खूप खाचखळगे होते, असणार आणि कायम राहणार...चालताचालता लागलं तर कोणी चालणे सोडत नाही.... आयुष्यात जवळचे कोणी गेले तर कोणी जगणे सोडत नाही.. तसेच कोणी बरोबर असो वा नसो एकांत हा सुद्धा कोणीच सोडू शकत नाही...

एकदा असच एकट बसून विचार करत होतो ...आपण काय कमावले आणि काय गमावले याचा.... आपल्याला आठवेल की किती दिवस आपण गाभूळलेल्या चिंचा खाल्या नाहीत.. आकाशात उडणार्‍या पक्षाकडे एकटक पाहिले नाही... जत्रेत मिळणारी शिट्टी वाजवली नाही... रात्री अंगणात झोपून काळ्याकुटट आकाश्यातल्या चांदण्या मोजल्या नाहीत... कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म आता उरला नाही... ती उडू शकते कारण तिचे पंख तिने कधीच बांधले नाही.. आपण मात्र अजूनही आपले पंख बांधून उडण्याचा प्रयत्न करतोय...मनसोक्त हसण्यासाठी सुद्धा आपल्याला लोक काय बोलतील याचा विचार करतो.. लहानपण देगा देवा हे वाक्य अजूनही हवेहवेसे वाटते ते या कारणांमुळेच...

'एकांत' इतर अनुभवांसारखाच हा सुद्धा एक प्रकृतीचा आणि मनाचा भाग आहे आणि तो फक्त अनुभवायचा कधी दु:खात तर कधी सुखातही...

http://nkunjir.blogspot.com/

गुलमोहर: