ग्लोबल विपश्यना पॅगोडा

Submitted by जिप्सी on 25 May, 2010 - 23:50

=================================================
=================================================
मायानगरी "मुंबई"
इथले जीवन घडाळ्याच्या काट्यावर चालणारे. इथे जशा टोलेजंग इमारती बघायला मिळतात तशाच झोपड्याही, एसी कारमधुन फिरणारे उच्चभ्रु श्रीमंत दिसतात तसेच भर उन्हात हातगाडी ओढुन गुजराण करणारे सुद्धा, डिस्को-पब मध्ये रमणारा इथला तरूणवर्ग मंगळवारी तासनतास सिध्दिविनायकाच्या मंदिरासमोर रांग लावतानाही दिसतो. अशी हि परस्पर विरोधी दृष्य दिसणार्‍या मुंबईत असेच एक विरोधाभास दर्शवणारी घटना घडली आहे मुंबई येथील गोराई गावाजवळ. एकीकडे फक्त आणि फक्त मौज मस्ती, स्वतःला विसरून मस्तीत डुंबायचे ते एस्सेल वर्ल्ड आणि वॉटर किंगडममध्ये जाऊन तर दुसरीकडे त्याच्याच शेजारी उभे रहात असलेल्या पॅगोडात स्वतःला विसरून ध्यानधारणेच्या सहाय्याने मनःशांती शोधत अध्यात्मिक आनंद मिळवायचा.

मुंबईत उभे राहत आहे जगातील पहिले "ग्लोबल विपश्यना पॅगोडा". बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी २००० वर्षात प्रथमच गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडा बांधण्यात येत आहे. दगडांनी बनलेल्या आणि कुठचाही आधारस्तंभ नसलेला हा भव्य स्तूप जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. याचे वैशिष्ट्य असे कि, यात बुद्धांच्या स्मृतीचिन्हांचा समावेश केला आहे. भारतातील कुठल्याहि पॅगोडामध्ये अशाप्रकारे स्मृतीचिन्हांची जपणुक केल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे आणि हि भारताने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे.

सम्राट अशोकने स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून उभारला आहे. ज्यामुळे कसलाही क्षय न होता वर्षानुवर्ष हा सुस्थितीत राहील. एकुण १२ एकर जागेत उभारण्यात आलेल्या ३६० फूट उंच अशा या ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये ९० फूट उंच आणि २८० फूट व्यासाच्या ध्यानकक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. येथे एकावेळेस जवळ पास ८ हजार पेक्षा जास्त साधक बसून ध्यानधारणा करू शकतात. येथे १० दिवस व १ दिवसाच्या शिबिराचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये राहण्याची, जेवणाची सोय विनामूल्य असते. साधकाने स्वखुशीने दिलेल्या देणगीवर शिबिराचे आयोजन केले जाते. सदर पॅगोडा हा विजापूर येथील "गोल गुंबज" मधील आजवरच्या सर्वात मोठ्या पॅगोडापेक्षाही आकाराने दुप्पट आहे. येथे भगवान गौतम बुद्धांचा जीवनक्रम दाखविणारे अतिशय देखणे कलादालन आहे. तेथे बुद्धांच्या जीवनक्रमांवर आधारित अतिशय रेखीव असे छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. पॅगोडा संपूर्ण होण्यास अजुन काही वर्ष लागण्याचा अंदाज आहे.

विपश्यना म्हणजे ध्यान-धारणा, बाह्य जगाचा विसर पडून मनुष्याने स्वतःच्याच मनाचा शोध घेणे. आज सर्वत्र क्रुरता, हिंसाचार, दहशतवाद उफाळला असताना विपश्यनेची गरज मानवजातीला आहे. विपश्यना हि एक ध्यान प्रक्रिया असुन हि साधना मनाची मलीनता दूर करते. क्रोध, द्वेष, घृणा, अहंकार, लोभ यासारख्या विकारांना दूर करून मैत्री, करूणा, सद्भावना आणि बंधुभावाच्या स्वभावाला जागृत करते. ही कुठच्याही धर्माशी संबंधित नसुन शास्त्रीय पद्धतीवर आधारीत असा हा ध्यानाचा प्रकार आहे. यामध्ये सांप्रदायिकता किंवा जातीपातीचा कोणताही भेदभाव नाही. सर्व संप्रदाय आणि जातीचे लोक यामध्ये सहभागी होऊ शकतात. होऊन लाभान्वित होतात. कुणालाही एखाद्या संप्रदायाची दीक्षा दिली जात नाही. दहा दिवशांचे विपश्यना शिबीर केल्यानंतर पॅगोडाच्या विशाल ध्यानकक्षात भगवान बुद्धांच्या पवित्र शरीरधातुंच्या सान्निध्यात करू शकाल. पॅगोडामध्ये असलेल्या गौतमबुद्धांच्या स्मृतीचिन्हातून परावर्तित होणार्‍या तरंग लहरी विपश्यना करणार्‍या साधकांना त्यांच्या ध्यानधारणेत सहाय्य करतील आणि मनःशांतीच्या शोधात असणर्‍या साधकांना अध्यात्मिक आनंद देतील.

असे हे कुठलाही आधारस्तंभ न घेता उभा करण्यात आलेले "ग्लोबल विपश्यना पॅगोडा" कदाचित जगातील आठवे आश्चर्य ठरू शकते!!
=================================================
=================================================

गुलमोहर: 

येथे फक्त बाहेरून फोटो काढावयाची परवानगी आहे. त्यामुळे आतील ध्यानकक्षाचे फोटो काढता आले नाही. विपश्यनेसंबंधीत माहिती "ग्लोबल विपश्यना पॅगोडा" यांच्या सौजन्याने.

बुध्दं शरणं गच्छामि |
धम्मं शरणं गच्छामि |
संघं शरणं गच्छामि |

ह्या पॅगोडाच्या निमित्ताने जगातील लाखो लोक एकत्र येऊन ध्यानसाधना करू देत व एकत्र, संघटित होऊन जगात शांतीप्रसाराच्या कामात अग्रणी राहू देत.

योग्या तुझी समुद्रातली बोट जमिनीवर आली म्हणायची
अचानक गोराई बेटावर कसा काय आलास....अच्छा समुद्रात लैला आली ना...... मग बरोबर

बापरे... एवढे भव्य डोम... पहायला पाहिजे....
फोटोबद्दल... लाकडी नक्षीकाम आणि शेवटचा फोटो चांगला आहे. बांधकाम पुर्ण झाल्यावर फोटो घेतले असते तर अजुन चांगले वाटले असते.

अतिशय सुरेख!!!!!!!!!!
धन्यवा!!!!!!!!!!!!!!!!

धन्यवाद!!!
बांधकाम पुर्ण झाल्यावर फोटो घेतले असते तर अजुन चांगले वाटले असते.>>सॅम बांधकाम पुर्ण होण्यास अजुन ३-४ वर्ष सहज जाणार असे सांगितले Sad

छान वर्णन. आतुन जोडलेल्या दगडांचे बांधकाम मला वाटते इन्का संस्कृतीत होते. ते अजूनही सुस्थितीत आहे.