चिकन करी

Submitted by मिनी on 18 May, 2010 - 21:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - पाव किलो, बोन्ससकट आणि हलाल मिट असेल तर उत्तम.
कांदा - ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन.
लसणाच्या पाकळ्या - ८-१०.
आलं - १/२ इंच.
सुकं खोबरं - ३ मोठे चमचे.
प्रत्येकी २/३ लवंगा, काळी मिरी
१/२ इंच दालचिनीचा तुकडा.
गरम मसाला - २ चमचे.
लाल तिखट - २ चमचे.
काजुची पेस्ट - २ चमचे.
जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं.
कोथिंबीर - आवडीनुसार.

ऐच्छिक जिन्नस:
टोमॅटो - १ लहान, अगदी बारीक चिरुन.

क्रमवार पाककृती: 

वाटण :-
१. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या.
२. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा.
३. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन कलरचं होई पर्यंत परतुन घ्या.
४. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन खुप बारीक वाटण करुन घ्या.

मुख्य कृती :-
१. चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.
३. लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं.
४. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.
५. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं.
६. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.
७. कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल.
८. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
९. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या.
१०. ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला.
११. चवी प्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.
१२. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या.

मी केलेल्या करीचा फोटो.
Chicken.JPG

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे २-३ लोकांसाठी होईल.
अधिक टिपा: 

१. माझ्या कुकरमध्ये जनरली ३ शिट्ट्यांमध्ये चिकन शिजतं.
२. चिकनचं सुप खुप टेस्टी होतं, लहान मुलांना द्यायला खुप चांगलं.
३. तिखट आणि गरम मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे बदलु शकता. मी शक्यतो कमी तिखट आणि कमी मसालेदार करते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान आहे रेसिपी.
अफलातून होते ही चिकन करी (आम्ही खाल्ली आहे मिनीकडे Proud ).
आणि चिकन सूप सुद्धा खूप छान होतं. पोरांनी अगदी आवडीने खाल्लं.

कसंल सॉलिड दिसतय चिकन मिने. तोंडाला पाणी सुटलं. यम्म्म्म....

माझ्याही आईची हिच रेसिपी आहे फक्त नो टॉमेटो. Happy ते सूप आम्ही पण प्यायचो मिने. जाम यम्मी लागतं. अगदी आईची आठवण झाली बघ.

एक प्रश्न आहे...चुकीच्या जागी विचारते आहे Wink
हलाल मीट तुम्ही कुठून आणता?? आणी ते साफ केलेले ( बाकी foster farm सारखं ) असते की आपल्याला करावे लागते.
मी foster farm किंवा Treder's joe च आणते पण बरेचदा माझं चिकन नंतर रबरासारखं होतं. Sad
काय चुकत असेल बर???

अमृता, मी पण कधी कधीच टोमॅटो टाकते. सुपला टोमॅटोमुळ्ये मस्त चव येते.
सामी, हलाल मीट + तुझा झीप कोड टाकुन पहा. ते साफ केलेलं असतं बर्‍यापैकी, फ्रोझन असतं तितकं स्वच्छ नसतं पण ४-५ वेळा नीट घुतलं की काही प्रॉब्लेम नाही.
माझं चिकन नंतर रबरासारखं होतं >> कधी कधी जास्त शिजवलं की होतं रबरासारखं. मला ते फ्रोझन चिकन कसंही शिजवलं की रबरासारखचं लागतं Proud

जबरी दिसतंय चिकन. टू गुड <<<
चव पण लै भारी होती. मिनी हेच ना ते?पोर सुगरण आहे हो!! पुढच्या वेळी हीच रेसेपी करून बघणार.

मिनी हेच ना ते? >> हो हो हेच ते.
पोर सुगरण आहे हो!! >> अटलांटाकंपू समोर नको म्हणुन, त्यांना खरं काय ते माहित आहे. Wink

भावना.. काल केलं हे चिकन.. ग्रील करायला ज्या तंगड्या आणतो त्या वापरल्या.. स्कीन काढावी लागली त्यांची पण ठिक होतं ते.. मला जमलं.. Happy
अत्यंत भारी रेसिपी आहे ही.. एकदम टेस्टी झालं होतं चिकन आणि सुप पण !!! रेसिपी इथे टाकल्याबद्दल धन्यवाद.. !

हा बघ फोटो..

IMG_7592.JPG

we are also invited!! >>>> Proud हाडं असलेलं चिकन पहिल्यांदाच केलं.. त्यामुळे कसं होईल माहित नव्हतं.. पुढच्या गटगला करू परत.. Happy

>>ग्रील करायला ज्या तंगड्या आणतो त्या Happy
त्याला 'ड्रमस्टिक्स' म्हणतात. bowl मध्ये काय आहे?

मिनी, फोटो नंतर टाकलास का? मस्त दिसते आहे करी!

लालू.. हां तेच.. मला नक्की काय म्हणतात ते आठवत नव्हतं.. Happy
बोल मधे सूप आहे. कूकर मधे चिकन शिजवल्यावर पाणी असतं ते.. खूप टेस्टी लागतं ते पण..

हाडासकट चिकन वापरून केलेल्या पदार्थाची जी चव असते ती बोनलेस वापरून केलेल्या पदार्थाला येत नाही हं . Wink ( आधी अजिबात चिकन न खाणार्‍या पण गेले ७ वर्षं चिकनप्रेमी असलेल्या अस्मादिकांचा सल्ला आहे हा . Happy )

या वेळी एकटे एकटे खाल्ले असलेस जरी Wink
Ultimate दिसतेय मीने तुझ्ही चिकन करी
एवढी "कंजूसी" नसते बरका तब्बेतीला बरी
आम्हाला हि बोलावत जा कधीतरी तुझ्या घरी Lol

मला एक प्रश्न आहे. चिकन शिजायला खरं तर फार वेळ लागत नाही, मग ही कुकरमधून का बरं शिजवून घ्यायची? मंद आचेवर direct शिजवली तरी चालेल ना? मी कधीच चिकन कुकरमधून शिजवलेली नाहीये.

रायगड, मी नेहमीच चिकन बाहेरच शिजवते. मला कुकरमधले नाहि आवडत. त्याला काहिच टेस्ट लागत नाहि हे माझे मत. बाहेर केलेल्या चिकनचे सुपहि जास्त छान लागते (हे पुन्हा माझेच मत). मी, माझी आई, आत्या वैगरे आम्ही सगळे जण चिकन, मटन सगळे बाहेरच करतो...कुकरमधले कोणालाच आवडत नाहि.

मी खरं तर नवर्याला आवडतं म्हणून शिकले करायला नॉनव्हेज. आधी पॅन मधेच शिजवायचे पण ईथली रेसिपी वाचून कूकरचा प्रयोग करून पाहिला. कूकरमध्ये शिजलेलं चिकन जास्त सॉफ्ट आणी चवदार वाटलं मलातरी. अर्थात हे माझं मत. मी काही प्रो. नाही सामिष आहारातली. पण वरील रेसिपीने खरंच छान होतं चिकन.

माझी आई पण शक्यतो कढई मध्येच शिजवते. ती नाही कुकर मध्ये शिजवत. मी २ कारणांसाठी चिकन कुकरमध्ये शिजवते. एक तर पटकन होतं. १० मिनिटांमध्ये शिजवुन होतं. आणि बाहेर शिजवायचं म्हटलं की सारखं हलवत बसा आणि शिजलं की नाही हे दर ५-१० मिनिटांनी चेक करत बसा. कारण चिकन जर चुकुन जास्त शिजलं की रबरासारखं लागतं. मग त्या पेक्षा कुकर मध्ये शिजवणं जास्त सोप्पं आणि सेफ ऑप्शन आहे. निदान माझ्यासाठी तरी.

मस्त! माझी पद्धत सेम टु सेम.. सुप नको असेल तर थोडेसे चि पीसेस आणि सुप ला थोडा मसाला टाकुन फोडणी द्यायची आणि रस्सा करायचा आणि उरलेल्याच सुक्कं चिकन. कोल्हापुरकडे रस्सा लागतोच थोडा का असेना म्हणुन. Happy

कालच हे चिकन केले होते. खुप छान झालय. रस्सा तर एकदम चविष्ट!!

चिकन चे पिसेस मऊ शिजलेत पण त्यांना चव काही खास आली नाही नुसतेच तोंडात टाकायला. रश्शाबरोबरच खावे लागतायत. काही बदलायला हवय का?

या कृतीत चिकन मॅरिनेट केलेले नाही. तसे केले तर पीसेसना चव येईल. आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, लिंबू/दही असे लावून कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचे.

Pages