जटायू

Submitted by pulasti on 2 April, 2008 - 00:30

का पुन्हा खोटे हसावे वाटते?
चेहर्‍यामागे लपावे वाटते...

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

चार दाणे आज कोणी टाकले
पाखरांना किलबिलावे वाटते

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

प्रश्न माझा वाल्मिकीला एवढा -
का जटायूला लढावे वाटते?

काय त्याचा दोष? कसली ही सजा?
...काय त्यालाही जगावे वाटते?

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

हे असावे ते नसावे वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?

जाणतो होणार नाही जे कधी
ते अचानक आज व्हावे वाटते...

गुलमोहर: 

आवडली गझल ,
शेवटचे तीन शेर खास एकदम

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

waah !

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

चांगली आहेच, जटायूला लढावं वाटणं आणि कवीला कविता लिहावं वाटणं हे आपापल्या 'स्व-भावानुसारच' आहे नाही का?

पण खरं तर 'पुलस्ति' यांची नाही वाटली.

-सतीश

नमस्कार सतीशजी,
कुठल्याही कृतीमागे "स्वभाव" हे महत्वाचे कारण असतेच. पण तेवढे एकच असते का? तसे असेल तर बाकी सर्व कार्य-कारण मीमांसेला काहीच अर्थ उरणार नाही. "अमुकने अमुक केले" याचे एकमेव कारण नेहमी केवळ "त्याचा स्वभाव" असू शकत नाही. आणि जरी काही वेळा तसे असले तरी "स्वभावां"चीही चिकित्सा करणे महत्वाचे असते. त्यातूनच शिकता येते आणि पुढे जात राहता येते. नीतीमत्ता (morality) म्हणजे काय आणि का यावर जटायूचे वागणे हे एक महत्वाचे पण काहीसे दुर्लक्षित असे भाष्य आहे असे मला वाटते. उपयुक्ततावाद, आंतरीक कर्तव्य-भाव (innate deontological sense of duty), संस्कार आणि परंपरा ई. नीतीमत्तेवरची सर्वसाधारण स्पष्टीकरणे तत्ववेत्त्यांनी केली आहेत. morality encompasses but still escapes all these! जटायूचे रावणाशी लढणे हे असेच उदा. आहे. ही नि:संशय नैतिक मूल्य असलेली कृती आहे. पण तो असे वागलाच का? त्याचे मरणे अटळ होते. त्याच्या मरण्याने तसा काही उपयोग होण्याचीही शक्यता नव्हती. जटायूचा रामायणात इतर कुठे उल्लेख मला तरी माहीत नाही, मग त्याच्या मूळ स्वभावाबद्दल कळणेही शक्य नाही. जसे हनुमानाबद्दल आपण नक्की म्हणू शकतो की तो वीर, निर्भय, चतुर ई.ई. होता, तसे जटायूबद्दल काय म्हणावे? रामाची दूरची ओळख / नाते हे काही कारण होऊ नये. मग कारण काय? वाल्मिकीला मला हेच विचारायचे आहे. या महाकवीची नैतिकते बद्दलची भूमिका सखोल जाणून घ्यायची आहे.
कविता शेरावरही थोडेफार लिहिता येईल पण ते जटायूइतके महत्वाचे नाहिये (आणि मला स्वतःलाही आता कविता शेर फारसा आवडत नाहिये:) तांत्रिक अंगानेही - लिहावे / लिहावी - फसलेला शेर आहे)

तुम्हाला ही गझल एकंदरीत जरा ढिसाळ वाटली हे कळवल्याबद्दल खूप धन्यवाद. मी सर्वच शेरांवर नक्की विचार करीन. प्रतिक्रिया, सूचना, मतं जरूर कळवत राहा!

-- पुलस्ति.

पुलस्ति,
मी तरी 'जी' लिहिलं नाही :).
सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद. पुन्हा या विषयी थोडं लिहेन. पण नंतर.
तुम्ही वापरलेला 'ढिसाळ' शब्द माझा मनातही नव्हता हो, पण तुमच्या नेहमीच्या लिखाणाइतकं हे भिडलं नाही एकदम इतकंच.

नव्या संवत्सराच्या शुभेच्छा.
-सतीश

मस्त गझल...
खूप आवडली..

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते! - सुंदर!!

प्रश्न माझा वाल्मिकीला एवढा -
का जटायूला लढावे वाटते? - या शेरात "वाटले" हा रदीफ असता तर जास्त छान वाटलं असतं का?

बाकी तबियतीची गझल वाटली... सहज जमून आलेली...

पुलस्तिजी,
नेहमीप्रमाणेच ही गझल पण सुंदर. पण मला वाचतांना काहीतरी अडतयं.

वळावे, लढावे पेक्षा वळावेसे, लढावेसे पर्याप्त होऊ शकेल का?

"वाटले" ही चालले असते. पण असे जटायू आपल्याला काळाच्या वेगवेगळ्या वळणावर भेटतच असतात. म्हणून मला - त्या जटायूच्या अनुषंगाने पण - अशा सर्व "जटायूं" बद्दल हा प्रश्न विचारायचा आहे. म्हणून "वाटते" योग्य आहे असं मला वाटतं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

चिन्नु,
बरोब्बर पकडलंस!! "वळावे असे वाटते" अशी रचना १००% अचूक झाली असती. या गझलेत हा "असे" गाळण्याचा दोष आहे. मी यावर विचार केला होता... पण हा दोष टाळणे जमले नाही Sad
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
-- पुलस्ति.

सुंदर!
मतला, जटायू , कविता, शेवटला शेर खास.

मस्त!!!!!

सरळ माहाकवि वाल्मिकिला प्रश्न वा! आवडलं बुवा.
पण पुलस्तिजि जटायुला का लढावे वाट्ले? हे मला वरिल स्पष्टिकरणातुनहि समजले नाहि कॄपया समजावताका?

पुलस्ति,
स्वभाव = स्वधर्म अशा अर्थी मी ते म्हटलं होतं. जसं, पाण्यावर तरंगणे हा लाकडाचा स्वभाव आहे. पण तुम्ही म्हटलं तसं परिस्थितीवशात त्याची अभिव्यक्ती बदलते. जर एखादा धोंडा बांधला तर तेच लाकूड बुडूनही जातं आणि कुणा माणसाने जर बुडताना त्याचा आधार घेतला तर ते स्वत: तरंगताना त्या माणसालाही तारतं. म्हणजे स्वभाव आणि कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. स्वभावाची चिकित्सा जेव्हां केली जाते तेव्हां बुद्धी आपलं काम करते. नैसर्गिक गुणच – स्वभाव – जेव्हां एखाद्या कृतीचं कारण असतं तेव्हां त्या कृतीचा ना अभिमान असेल ना पश्चात्ताप. किंबहुना कर्तृत्वभावच नसेल. आणि असा स्वभाव सोडता आला तर तो व्यक्तिविशेष वेगळेपणानं उरणारच नाही. दाहकतेशिवाय अग्नीचं अस्तित्व कसं राहू शकेल? असा स्व-भाव त्या ‘स्व’ च्या ताब्यात नसतो. त्या अनुषंगानं जटायूचं लढणं (आणि कवीचं कविता लिहिणंही) मला स्वाभाविक वाटतं.
जटायूचं लढणं ही कृती नव्हे तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ‘त्याला लढावं वाटणं’ हा चिकित्सेचा भाग आहे, आणि मला वाटतं ते त्याचं स्वाभाविक वाटणं आहे.
रामायणाचा तपशील मलाही सखोल माहिती नाही. पण जटायूचं रावणाशी युद्ध हे केवळ नैतिकतेवरचं एक भाष्य नसावं – कारण रामकथेतलं प्रत्येक पात्र हे नैतिकतेच्या मर्यादांचं दिग्दर्शनच करतं, नाही का? जटायूनं लढणं हे निष्ठेचंही कृत्य आहे असं मला वाटतं. आणि ती निष्ठा ‘राम’ या व्यक्तीशी नसून राम हे ज्या उदात्त मूल्यांचं साकार रूप आहे त्या मूल्यांशी असलेल्या निष्ठेचं कृत्य आहे. अशा मूल्यांची धारणा ही सुद्धा अवघड गोष्ट आहे आणि रामानं केवळ धारणा नव्हे तर आचरणही केलेलं आहे. त्यामुळे रामाला जटायु किती ओळखीचा आहे यापेक्षा जटायूला राम किती परिचित आहे यामुळे आणि त्यामुळे असलेली निष्ठा, श्रद्धा, यांचा परिणाम हाच त्याला लढावंसं वाटण्याचा प्रेरक असावा. ‘प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति’.
-सतीश

.

आहा क्या बात हॅ!!!!!!!!

आत्यंत सुंदर स्पष्टिकरण मांड्लत.मला हेच उत्तर पुलस्तिजि कडनं हवं होत. "निष्टावंत" या स्वभावा मुळं.....

नमस्कार ;
गजल आवडली. तुमच्या आणखी रचना वाचायला मिळ्तील का?
तुमची परवानगी असेल तर या रचना सन्गीत्बध्ध कराव्या असे मनात आले. तो माझा छ्नन्द आहे.

सन्जीव जोशी

पुलस्ती

कोणते ओझे उरी मी वाहतो
मोकळे व्हावे, रडावे वाटते!

नेहमी नाकापुढे तो चालतो
नेहमी त्याला वळावे वाटते!

तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते?

जाणतो होणार नाही जे कधी
ते अचानक आज व्हावे वाटते...

>>> आवडले

बहुतेक 'वाटते' ह्या रदीफ मुळे काही बंधने आली आहेत त्यामुळे तुमची नेहमीची सफाई थोडी दिसत नाहीये असे 'वाटते'य.. तेच सतिश आणि चिन्नू ला ही खटकले असावे...

का नवे काही लिहावे वाटते असा बदल करुन लिहावी चा व्याकरण दोष काढता येइल का?
चु. भु.दे.घे.

visit http://milindchhatre.blogspot.com

नमस्कार !
मी आपल्या मायबोली वर नविनच आहे,
पुलस्तिजी, आपल्या गझल खुप आवडल्या.
मला रतिफ्..किन्वा तत्सम गझलेतील व्याकरणाविषयी काहिच माहित नाहि,
माझ्यासाठि हे सारे नविनच आहे...आपल्या गझले सोबतच आपल्यातील व सतिशजी यान्च्यातील सन्वाद खरच आवडला....मी असा इतका खोल विचार कधी केलाच नव्हता.
SO, Tthnx 2 both of u, 4 giving a new dimension to my thinking!
hv a gr8 life!

" तोच मी अन त्याच या संवेदना
का नवी कविता लिहावे वाटते? "

मनाला फार भिडली तुमची गजल !