कालच्या "डोम्बिवली गटग" मध्ये डुआय ने केलेल्या request मुळे माझा manogat.com वर ३ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला लेख इथे पुनर्प्रकाशित करीत आहे. ज्यांनी manogat.com वर वाचला आहे, त्यांनी पुनर्वाचनाचा आनंद घ्यावा आणि ज्यांच्यासाठी नवीन आहे, त्यांनी enjoy करावा. हा लेख मी manogat वर ३ भागांमध्ये लिहिला होता. इथे एकाच भागात देत आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-१
सासरची कोकणस्थ असले तरिही माहेरची मी देशस्थ. विदर्भातली देशस्थ. कारण माझे वडील मूळचे विदर्भातले. त्यामुळे घरी बोलल्या जाणारया मराठी मध्ये अधून मधून विदर्भीय फोडणी हमखास असायची.
आता आताच मनोगता वर खास पुणेरी भाषेतील मजेशीर वाक्प्रचार वाचनात आले. वाटले आपणही आपल्याला माहीत असलेले काही गमतीशीर विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द मनोगती ना सांगुया.
झांबल झांबल करणे : धांदरटपणा करणे/ नक्की काय करावे ते नीट न सुचणे
(उदा. काय झांबल झांबल करतो आहेस?? पटकन काय ते काम उरक.)
रुंगळ रुंगळ करणे : एखाद्या च्या आगे मागे सतत रेंगाळणे
(उदा. ती आई वेडी असल्याने सतत आईच्या मागे रुंगळ रुंगळ करत असते.)
कुईटला वास : घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. काय कुईटला वास आहे तुझ्या मोज्यांचा !)
घुरट वास : गाई-गुरांच्या अंगाला येणारा घाणेरडा वास/दुर्गंधी
(उदा. तबेल्यात जाऊ नकोस. घुरट वास येतोय.)
कुईटला आणि घुरट हे दोन्ही तसे दुर्गंधी व्यक्त करणारे शब्द असले तरिही नक्की कुठे कोणता शब्द चपखलपणे वापरायचा ते फ़क्त एक विदर्भीयच जाणे.
चाटु ("च" चा उच्चार "चमचा" मधील "च" प्रमाणे) : तव्यावर डोसा टाकताना वापरावयाचा डाव
ठुनी : आधार/टेकू
जागा करणे : जेवण झाल्यानंतर जमीन पुसून घेणे
भणभण माश्या मारणे : काहीच उद्योगधंदा न करता नुसते स्वस्थ बसणे
लोळलाळ करणे : दुपारची वामकुक्षी करणे
या खेरीज पुष्कळ शब्द आहेत, पण आता या क्षणी आठवत नाहीयेत. माझ्या लग्ना आधी, मी आणि माझ्या धाकट्या बहिणीने गमती गमतीत एका वहीत असे सर्व विदर्भीय वाक्प्रचार आणि शब्द व त्यांचे अर्थ जमा केले आहेत व त्या शब्दसंग्रहाला "विदर्भीय शब्दसूची" असे नाव दिले आहे. माझा प्रेमविवाह असल्याने आणि भावी नवरा कोकणस्थ असल्याने माझ्या बहिणीला चिंता होती की आमच्या घरात बोलले जाणारे काही शब्द माझ्या नवरयाला समजतील की नाही. त्यामुळे अशी शब्दसूची लिहून मी ती माझ्या नवरयास द्यावी आणि त्याने ते शब्द पाठ करून मगच मला मागणी घालण्या साठी माझ्या वडिला समोर यावे, असे ती गमतीने म्हणे.
पुढच्या वेळी माहेरी जाणे जेव्हा होइल तेव्हा ती शब्दसूची शोधून अन्य काही शब्द पुढच्या भागात देईन. तोवर तुम्ही तुम्हालाही असे कही "हटके" विदर्भीय शब्द माहीत असल्यास कळवा.
याशिवाय विदर्भीय भाषेची एक लक्षात येण्या सारखी खासियत अशी की विदर्भीय लोक हिंदी शब्दांचा वापर फार करतात.
उदा. तो तिथून वापस (परत) गेला. या बाबतीतली अजून उदाहरणे आता आठवत नाहियेत. आठवल्यास पुढच्या भागात कळवेन. त्याच पमाणे आपण जसे "वाघ-बिघ, काम-बिम, दात-बित" असे शब्दप्रयोग करतो, तसे विदर्भीय लोक "वाघ-गिघ, काम-गिम, दात-गित" असा शब्दप्रयोग करतात. ("बि" ऐवजी "गि").
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-२
नमस्कार!
भाग १ मध्ये कबूल केल्या प्रमाणे या भागात मी आणि माझ्या बहिणी ने तयार केलेली विदर्भीय शब्दसूची इथे देत आहे. या शब्दसूचीत जवळ जवळ ९० शब्द/ वाक्प्रचार / म्हणी आहेत. पण वेळे अभावी आणि जागे अभावी ते सर्व इथे देणे शक्य होणार नाही. पण जमतील तितके देते आहे. बाकीचे ३ ऱ्या भागात देइन.
म्हणी :
बाप तशी लेक, मसाला एक (खाण तशी माती)
हालो मालो दिव्यात तेल घालो (इकडून तिकडे फिरत वेळ काढणे/timepaas करणे/ रवटाळणे)
खायला लागलं गोड आणि बुदूबुदू झोड (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
ढुई ढुई पाणी, घाल पाणी चिंचोणी (खूप पाणी घालून पदार्थ पातळसर बनवणे/ जरूरी पेक्षा जास्त पातळ करणे)
मला पहा आणि फुलं वाहा. (आपण स्वतः काही काम न करता बसून राहणे आणि लोकानी आपली खातिरदारी करावी अशी अपेक्षा करणे)
म्हाली पणा आणि घोडा हाणा (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
पेंड पुंडका आणि हिऱ्याचा मुंडका (याचा अर्थ कोणास माहीत असल्यास कृपया सांगावा.)
आंधळा डोळा पाण्याला गेला (डोळ असून नीट न दिसणे)
पैसा ना अदला भप्पुला गडे (घरात नाही दाणा आणि हवालदार म्हणा)
शब्द :
बिरवांगं = टोमॅटो
पोपट = वाल
बरबटी = चवळीचे दाणे
घोळणा = मेथी वगैरे पालेभाज्यांची कच्ची पाने धुवून त्यात मीठ व तिखट घालून बनवलेले सॅलड
डेमणा = छोटासा
चिलमी गप्पा = वायफळ बडबड
चीपीची तब्येत = कृश तब्येत (दोन्ही "च" च उच्चार "चष्मा" मधील "च" प्रमाणे)
फैलते ताट = पसरट ताट
ढामी = आळशी
पतली चादर = पातळ चादर
आशुक माशुक = मस्तपैकी तूप / तेल वगैरे लावून (उदा. आज थालिपीठं आशुक माशुक कर)
बहिरं टप्पर = एकदम बहिरा
दादोडा = मोठी पुळी
धगुरडा = वयाने मोठा / निबर
भगुनं = पातेलं
संगीन = साधे नसलेले
लेंडार = लवाजमा
गुगाळणा = खराब (हा शर्ट गुगाळणा झाला आहे.)
वाक्प्रचार:
नाकाच्या सुताने = कशाचीही पर्वा न करता / बिनधास्त (उदा. काय नाकाच्या सुताने पंखा लावून ठेवला आहे. किंवा नाकाच्या सुताने वरण्भात खा.)
फकाफका लाईट लावणे = कारण नसताना वीज जळवणे (प्रखर उजेड करणे)
पोट्टातून हसणे = मनापासून हसणे
पोट्टातून आवडणे = मनापासून आवडणे
पूसपास करणे = पुसून घेणे
फतंफतं करणे = काम नीट न उरकणे
झुलीला हात लावणे = कामाला नुसते हात लावणे पण प्रत्यक्षात काहीच काम न करणे (काम केल्याचा आभास निर्माण करणे)
वाळूचुळू घालणे = वाळत घालणे (कपडे वगैरे)
पाणी पडणे = पाऊस पडणे
धसणे = घुसणे
हनननं होणे = आर्थिक परिस्थिती हालखीचे होणे
इगरणे = इतरावणे (उदा. आंब्याचा रस खाऊन ह इगरला आहे.)
घोणे घेणे = ज्या गोष्टीतून काहीही निष्पन्न होणार नाही अश्या गोष्टीसाठी कष्ट घेणे
कळंगणे = मळणे (हा शर्ट कळंगला आहे.)
धमंधमं कामे करणे = पटापट कामे आटपणे
पुढचे शब्द ३ ऱ्या भागात देईन.
या भागा वरील तुमच्या प्रतिक्रीया कळवा.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
भाग-३
हे घ्या अजून काही विदर्भीय शब्द आणि वाक्प्रचार:
शब्द :
अंगारपेटी = काडेपेटी
शष्प = पालेभाज्यांचा पाने काढल्या नंतर उरणारा टाकून देण्याचा भाग
चिमणी चे तेल = रॉकेल
तोंडाचे चवणे = जीभेचे चोचले
फोतरं = टरफले
माकोडा = मुंगळा/डोंगळा
आसणीच्या घासणीवर = स्वत: च्या मर्जीने कुठेही कसेही
विस्कट-वास्कट/ विस्कळ-वास्कळ = अस्ताव्यस्त
हागोडं काम = अर्धवट काम
आळशी ढोणी = खूप आळशी
फकडी = फुलपाखरू
रपसप = मजबूत/ दणकट
मरतांगडं = मरतुकडं
मांजोळी = रांजणवाडी
ओंगळ = ओघळ
वाक्प्रचार:
पाटपाणी करणे = जेवायला बसण्याची पूर्वतयारी करणे
लेडंबेडं होणे = लडबडणे
लोळती वळणे = जीभ टाळ्याला चिकटणे (बोलती बंद होणे)
ओलंगट्टं होणे/ ग़टग़ट ओले होणे = खूप ओले होणे
कानांत भेंडं जाणे = काहीच ऐकू न येणे
थुक्याला थुका लावणे = काम नीट न करणे
फणकी सारखी नाचणे = आकांडतांडव करणे
डोळा पाणी हाणणे = डोळ्यातून पाणी येणे
लसूण निसणे = लसूण सोलणे
लगर लगर करणे = घाई गडबड करणे
डुल राहणे = खाऊन पिऊन खुशाल राहणे
पोटात खलंलंलं होणे = खूप भूक लागणे
झोप पडुन चेव येणे ??
झोप पडुन चेव येणे ??
मृण्मयी
मृण्मयी
आमच्या गांवी 'देविदास सोटे'
आमच्या गांवी 'देविदास सोटे' नांवाचे एक वर्हाडी कवी होवुन गेले . ते वर्धेला मराठीचे ( वर्हाडीचे) प्राद्यापक होते.
त्यांनी 'मी सोटे बोलतोय' ( मी अत्रे बोलतोय सारखे) या नांवाचा एक कविता संग्रह लिहीलेला.
त्यातल्या काही कवितेंचे शिर्षक
१) घेन्न रे बाबु खेयशीन गोया , आता कावुन म्हणत फुटला डोया
२) सोनी मांगीणन गलबला गांवभर केला , रामभाउ पाटलाले केसतोड झाला
३) वो भाउ जरा वाले व्हाना , कापसाचा गाडा म्हाहा जावु द्या ना
४) गाई म्हशी घेऊनशान चंद्रावर चालले अरामान अरामान
५) बायको चोरीले गेली
वर्हाडी टोन मधे , हेल काढुन म्हणाले अन आईकाले खासच
>>घेन्न रे बाबु खेयशीन गोया ,
>>घेन्न रे बाबु खेयशीन गोया , आता कावुन म्हणत फुटला डोया
हि कविता पुर्वी माबोवर कोणीतरी पुर्ण दिलेली होती.
मि एकलेलि , येनरं शामराव
मि एकलेलि , येनरं शामराव घेनरं चहा, आता काउन करतं ट्यहा ट्यहा
महेश , अस्मादिकांनीच रतन ,
महेश , अस्मादिकांनीच
रतन , तसेच , येनरं शामराव घेनरं खांड , तेही गेली बांड अन माहीही गेली बांड , असं पण आहे .
अथक त्याची लिन्क असली तर इकडे
अथक त्याची लिन्क असली तर इकडे दे ना.
मी विदर्भातली , घरी बरीच
मी विदर्भातली , घरी बरीच शुध्द भाषा बोलत असू. बहिनिची बदली विदर्भातल्या एक खेड्यात होण्याचा अवकाश तर तिच्या लहान मुलीने बरीच भाषा /शब्द आत्मसात केली.
अवो माय लई गाड़न हाय . गाड़न म्हणजे चिखल
कावुनशान तू माझ्याबरोबर झगडा करते. कावुनशान म्हणजे का म्हणून
माय वो दव लगते कवाड बंद कर (थंडी वाजते आहे दार बंद कर ).
पाढे (tables ) यानां बरेच लोक फाड़े म्हणतात .
वन्ग्याला =वान्गुड , साराटा = एक प्रकारचा डाव .
मी लहान आसताना,आमच्या घरासमोरील प्लाट वर बांधकाम चालू होते, तेथे आदिवासी जोडपे रहायचे. एकदा सकाळी बाहेर ती दोघे भांडू लागली आम्ही सगळ्या मित्रिणी एक सतरंजी टाकुन जणू काही नाटक बघतो आहे असे तिथे बसलो होतो . ती बाई नवर्याला सारखी "कह्हाले " म्हणजे क़ा म्हणून असे विचारत होती अणि जरा वेळाने एक लाकड़ाने तिने नवर्याला फटके मारले .खुप वेळ अगम्य आदिवासी -मराठी भाषेत भांडन चालू होते. या संपूर्ण भांडणत "कह्हाले " इतकाच शब्द समजला . काही वेळाने दोघे काही न घडल्या प्रमाने गुन्यागोविन्दाने बाजारात गेले.
थोडक्यात विदर्भातही नागपुरी चन्द्रपुरी, आदिवासी यांच्या भाषेत थोडाफार फरक जाणवतो .
अजून एक आठवली : लाव लिजावी
अजून एक आठवली : लाव लिजावी टिमकी बजावी (थोडेसे 'उचलली जीभ लावली टाळ्याला' असे! किंवा 'स्वतःत काहीच गुण नसताना स्वतःचीच टिमकी वाजवणे')
साराटा = एक प्रकारचा डाव
साराटा = एक प्रकारचा डाव .
माझे बाबा सराटाच म्हणतात. 
>>>
वेब, सराटा म्हणजे कालथा किंवा उलथनं
आम्ही खास वऱ्हाडी .. आमच्या
आम्ही खास वऱ्हाडी ..
आमच्या इकडे न चा ण आणि ण चा न करतात.
उदा. दवाखान्याला दवाखाणा, आणि पाण्याला पानी, वरणाला वरन ई.
तसच ळं चा ड आणि ड चा ळं करतात. उदा: पेढा -- पेळा, गळ्यात -- गड्यात पण इथे ळं आणि ड याच्या मधला कुठला तरी स्वर येतो.
आणखीन काही शब्द:
१. काऊन?? -- का?
२. चेंगड (उच्चार: चेन्गळ) : गोंगाट किंवा धिंगाणा.
(घरी सगळे भावंड जमलो कि खूप चेन्गळ होते)
३. तिर्री मारणे / फोक्या मारणे/फोकनाड्या ताणणे : खोटं सांगणे,वाढवून सांगणे
तिर्र्या नको मारू बे ! काऊन फोकनाड्या तानून राहिला बे?
४. सरका - सरळ : सरका चाल ना !! -- सरळ चाल
५. नीरा: निव्वळ या अर्थाने किंवा खूप या अर्थाने हा वापरतात.
उदा: नीरा पांचट -- खूप पाणचट आहे.
किंवा नीरा भैताळ आहे ते . -- ती खूप मूर्ख आहे.
६. बीन/बीईन: हा शिवी दर्शक शब्द आहे. कदाचित हा बहिण (बहिणी वरून शिवी) या अर्थाने वापरतात.
७. स्त्रीवाचक सर्वनाम ती ही, वऱ्हाडात ते किंवा हे असं वापरतात.
उदा. ते गाडी , हे गोटी.
पण एक मात्र खरा वऱ्हाडी भाषा ऐकणार्याला जरी फटकळ वाटली तरी तिरकस बोलणं त्यात विशेष नसतं.
आणि बरेच शब्द आहेत. आठवतील तसे लिहीन.
ह्या धाग्याबद्दल धन्यवाद !!
विदर्भात क्रियापद पण वेगळ्या
विदर्भात क्रियापद पण वेगळ्या पद्धतीने वापरले जाते कधी कधी. असं ऐकलं आहे.
जाणकारांनी खुलासावे.
मी ऐकलेली उदाहरणे म्हणजे देऊन दे, घेऊन घे इत्यादी<<<<< नीधप बरोबर आहे तुझं ...
मी पण मुळची विदर्भातली त्यामुळे लग्नानंतर पुण्याला आल्यावर खुप वेगळेपण जाणवलं, शाळेत शिकवतांना तर देऊन द्या, लिहुन घ्या असे क्रियापदांचे उच्चार एकुन सगळे बघतच बसायचे, पण अजुनही ती सवय पूर्णतः गेली नाही... आज पुन्हा या चर्चेतुन सगळ्या शब्दांची उजळ्णी झाली...
धन्यवाद......निंबुडा
बम सहि लिवल ह्या लेख यक्दम
बम सहि लिवल ह्या लेख यक्दम वह्राडि
Pages