सूर्य पाहिलेला माणूस.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लहानपणी मालाडला असताना, हनुमान जयंतीला, आई आणि शेजारच्या काकू, सकाळीच मारुतीच्या
देवळात घेऊन जात असत. मालाड पश्चिमेला स्टेशनसमोरच, पूर्वापार मारुतीचे देऊळ होते. आणखीही
काहि ठिकाणी होती. त्यावेळी मारुतीला पडद्याच्या आड ठेवत असत. काकू म्हणायच्या, जन्मल्याबरोबर
मारुती सूर्य गिळायला गेला होता ना, म्हणून ही तजवीज. सुर्याची काळजीच वाटायची त्यावेळी..

***

भूगोलाच्या पूस्तकात होते का आमच्या बाईंनी सांगितले होते हे आठवत नाही. पण जर पृथ्वी वाटाण्या एवढी मानली तर शनी संत्र्याएवढा आणि गुरु मोसंबीएवढा आहे म्हणे. आणि हे सगळ्या नवग्रहांचे आकारमान १ मानले तर सूर्याचे आकारमान आहे ९९ !!
त्यावेळी टिव्हीवर वगैरे असे काही कार्यक्रम नव्हते. पण पुढे लिव्हींग प्लॅनेट वगैरे बघताना, पृथ्वीच्या
आकाराची कल्पना आली.
सूर्याची किरणे आपल्यापर्यंत पोहोचायला ८ मिनिटे लागतात. म्हणजे या क्षणाला जो सूर्य आपण बघतो,
तो ८ मिनिटांपूर्वीचा.

***

आम्हाला नववीला कुसुमाग्रजांची, "पृथ्वीचे प्रेमगीत" हि कविता होती. पृथ्वीचा अटळ शेवट आहे तो सूर्यात
विलिन होण्यात. आणि तिलाही ते माहीत आहे. या कवितेचे मूर्त रूप, नेहरू प्लॅनेटोरियम मधल्या एका
कार्यक्रमात बघायला मिळाले. साधारण ५ लाख वर्षानी सूर्याचे प्रसारण होऊन, पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्यात
विलिन होणार आहेत. (ते बघायला आपण नसू, पण त्या आधीच पृथ्वीवरील सर्व जीवन नष्ट झालेले
असेल. कदाचित आपण, आपल्या कर्माने ती वेळ थोडी काय बरीच आधीच ओढवून घेऊ.)
ही वेळ जसजशी जवळ येत जाईल तसे काय होईल, याची मी नेहमी कल्पना करत असतो.
सर्वात आधी एखादा इंग्लीश सिनेमा येऊन जाईल. बायबलमधे तसे लिहिले आहे, असा दावा केला
जाईल. भारतात एखादा बाबामहाराज, त्यापासून बचाव करण्यासाठी एखादे पदक विकायला काढेल.
एखाद्या तीर्थक्षेत्री एखादा विधी करायचे फ़ॆड निघेल. चायना, बंकर्स खोदून ठेवेल. विनोदाचा भाग
सोडा, पण आपल्याला दिसतो तो सूर्य आकाराने मोठा होत जाईल. सगळीच ग्रहणे कंकणाकृति
असतील. नद्याच काय समुद्र पण आटू लागेल. ढगांचे प्रमाण वाढेल, पाऊस वाढेल, ध्रुवीय प्रदेशातला
बर्फ़ वितळेल. आणि बहुतेक सर्व जीवन नष्ट होईल, अर्थात तोपर्यंत काही जीवन उरले असेलच तर.
जाऊ द्या हो, जे बघायला आपण असणार नाही, त्याची का काळजी करा.

***
रोमराज्य मधे मीना प्रभूंनी लिहिलेय, कि जसा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा असतो, तसा सुर्यदर्शनाचा
पण असावा. सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याच चंद्र मोजताना, ग्रहणे सुद्धा धरलेली असतात. पण मला
वाटते, एखादा (म्हणजे एखाद दिवशीचा ) अपवाद सोडल्यास चंद्रदर्शनात, रंगाचे नर्तन नसते. पण सूर्य
मात्र रोज, नवनवे खेळ खेळत असतो. मला बरीच वर्षे, सुर्योदय वा सुर्यास्त बघायचा छंद आहे. कधी
कधी राहते घर असे असते, कि यापैकी एकच काही बघता येते. सध्याच्या घरातून मात्र दोन्ही
दिसतात.
आणि क्षणाक्षणाला हा देखावा बदलत राहतो. यात ढगांची भुमिका महत्वाची असते. खरे तर ते
नसतील तर जरा विरसच होतो. पण त्यानी असावं ते कसं, जेवणातल्या मीठासारखं, अगदी
नेमकं आणि नेमक्या आकारात. कधी कधी दांडगाई करुन, ते सगळा अवकाशच व्यापतात,
मग मूख्य नटाला मात्र, पुढच्या गावी, पुढचा शो करायला जायचे असते ना !
केनयामधल्या किसुमू या गावी माझे वास्तव्य होते, ते घर पण जरा उंचावर होते. पण त्याचा
दरवाजा उत्तरेला होता. पूर्व पश्चिमेला भिंति होत्या. पण तरीही किसुमूच्या भौगोलिक स्थानामूळे
अप्रतिम देखावा दिसायचा. उत्तरायण वा दक्षिणायन पूर्ण झाले, (म्हणजे २२ जून आणि २२ डिसेंबरला) कि मला काहि दिवशी, एकाच खिडकितून सूर्योदय आणि सुर्यास्त दिसायचा.
(याचे कारण किसुमू, विषुववृत्तापासून जवळ आहे.)
घराच्या या अश्या रचनेमूळे, माझ्या घराच्या अंगणातली बाग सहा महिने बहरायची
तर बाकिचे सहा महिने, परसातली !!
***
भारतवासीयांना, तसे सूर्यदर्शनाचे अप्रूप नाही. (जसे लंडनवासीयाना आहे तसे.) आपण
तसे त्याला गृहितच धरतो. पण कदाचित ध्रुवीय प्रदेशातून आलेल्या, आपल्या पूर्वजाना
त्याचे अप्रूप असावे. म्हणूनच त्यानी सूर्याच्या स्तोत्रांबरोबर उषासूक्ते रचली.
उषा म्हणजेच बहुतेक, अरोरा. म्हणजे ध्रुवीय प्रदेशात, सहा महिन्यांची रात्र संपून
ज्यावेळी सूर्य उगवतो. त्या पूर्वी आकाशात रंगाचे अनेक खेळ दिसतात. हे खेळ
म्हणजे एक नयनरम्य सोहळाच असतो. नेहमीच्या लाल पिवळ्या रंगांशिवाय, हिरव्या
जांभळ्या रंगाचे पण खेळ चालतात. डोळे कायमचे मिटण्यापूर्वी हा सोहळा बघायची
खूप इच्छा आहे.
***
खरे तर चंद्र, सूर्यापेक्षा आकाराने कितीतरी पटीने लहान पण त्या दोघांचे पृथ्वीपासूनचे
अंतर इतके तंतोतंत आहे, कि आपल्या डोळ्यांना ते सारख्याच आकाराचे दिसतात.
आणि या दूष्टीविभ्रमामुळेच आपल्याला ग्रहण दिसते.
लहानपणी आई अजिबात सूर्यग्रहण बघू द्यायची नाही. पण मोठा झाल्यावर तिची
बंधने जुगारण्याइतका निर्ढावलो. तरीपण एक ग्रहण आठवतेय, ज्यावेळी दूरदर्शनवर
सिनेमा दाखवत, ग्रहणाचे थेट प्रक्षेपण केले होते. त्यावेळी डायमंड रिंग पण दिसली
होती.
एका ग्रहणाच्या वेळी, मस्कतला होतो, तिथे पण सुट्टी दिली होती. पण आपल्यासारखे
अवडंबर माजवले नव्हते.
एका ग्रहणात पहाटे पाच वाजताचे फ़्लाईट पकडून मी गोव्याला गेलो होतो. दाभोळी
विमानतळाच्या बाहेरचा जो मस्त वळणाचा रस्ता आहे, तिथल्या रेल्वेच्या पूलावरून
मला खास सूर्यदर्शन झाले होते. गेल्या ग्रहणात नायजेरियातल्या एका छोट्या गावात
होतो. तिथे तर सर्व दिवसभर दाट ढग असल्याने, त्या दिवशी सूर्यदर्शन झालेच नव्हते.
मला वाचल्याचे नीट आठवत असेल, तर आपल्या कोणार्कचे जे सूर्यमंदीर आहे, ते कधीही ग्रहण
छायेत येत नाही.
***
त्या गोव्याच्या ग्रहणाच्या वेळी, गोमेकॉ (म्हणजेच गोवा मेडीकल कॉलेजचे ) काहि विद्यार्थी
माझ्याबरोबर होते. त्यांच्या गप्पंतून ग्रहणाबद्दल किती गैरसमजूती, त्यांच्या मनात आहेत
ते समजल्याने, वाईट वाटले.
ग्रहणात खायचे नाही, प्यायचे नाही. ग्रहण सुटल्यावर अंघोळ करायची. दान करायचे (दे दान
सूटे गिरान, असे ओरडत भिकारी फ़िरत असतात ) हे परवडले. पण गरोदर बाईवर तर
अनेक बंधने आहेत. (तिने श्वास तरी का घ्यावा. ) आणि काहि वावगे केल्यास, म्हणे
होणार्‍या बाळाला त्रास होणार. नाहि पटत मला.
***
आफ़्रिकेत बर्‍याच वेळा, आभाळ ढगांनी व्यापलेले असते. त्यामुळे तिथे सुर्योदय
आणि सुर्यास्त, बघायची संधी तशी कमीच असते. आणि पावसाचे ढग नसले तर
इतके दाट धूके असते, कि बराच वर आलेला सूर्य पण चंद्रासारखाच शीतल दिसत
राहतो.
मस्कत मधे मात्र उन्हाळ्यात, सूर्य सहन करण्याच्या पलिकडे असतो. पण तिथल्या
हिवाळ्यात मात्र तोच हवाहवासा वाटतो. मस्कत ते सलालाह या १२०० किमी
रस्त्यापैकी, जवळजवळ ८०० किमी अथांग वाळवंट आहे. त्या वाळवंटातून केलेल्या
प्रवासात, मी मुद्दाम गाडी थांबवून, अथांग वाळवंटातल्या भर दुपारच्या, शीतल
सूर्याचा आस्वाद घेतला होता. क्षितिजापर्यंत पसरलेली शुभ्र वाळू. त्याला चिरत
जाणारा सरळसोट रस्ता. दिवस का रात्र कळू नये इतका शीतल शुभ्र प्रकाश.
तिथली मऊशार वाळू मूठीत घेतली तर कणाकणाने झरुन गेली. वाटले कि
आपणही असेच, कणाकणाने तिथे विलिन होऊन जावे. अगदी अलिकडे पण
दुबईला, डेझर्ट सफ़ारीच्या वेळी, असाच देखणा सुर्यास्त बघितला.
***
मी ज्या कंपनीत काम करत होतो, त्यांचे एक ऑफ़िस ट्यूनीस (ट्यूनिशिया)
ला होते. ते ठिकाण पण वाळवंटातील टुरीस्ट स्पॉट आहे. तिथला सुर्यास्तपण
खास असतो, असे त्या ऑफ़िसमधली सहकारी म्हणत असे. तो बघायला
ये असे कायम म्हणत असे ती. नाही जमले कधी, पण एका सिनेमात मात्र
तो बघितल्याचे आठवतय. (आणि तिथे जायची इच्छा होतेय. दिन्या, बाबा
किती रे इच्छा त्या. मेल्यावर भूत होणार तूझे, हे नक्की )
असा एक सूर्योदयाचा देखणा शॉट, ओंकारा सिनेमात आहे. नेहमी सिनेमात
बहुदा, सुर्यास्ताचा असतो, पण त्या सिनेमात सुर्योदयाचा आहे.
पण असे खास पॉंईटावरून बघायचे, सुर्यास्त खूप बघितले. त्याच्याही ढीग
आठवणी. सातवीत असताना, महाबळेश्वरला गेलो होतो. त्यावेळि असेच, तिथल्या
सनसेट पॉइंटवर गेलो होतो. पण त्यावेळी नेमके ढग आल्याने विरसच झाला होता.
ऐन विशीत असताना, मित्रांबरोबर माथेरानला गेलो होतो. सगळे मित्र दारुने तर्र
झालेले. मी एकटा शुद्धीवर. सनसेट पॉइंटवरून पायी परतताना, काळोख झाला
आणि रस्ता चुकलो. त्या मित्रांपैकी कुणाला भानच नव्हते. त्या सगळ्याना
हाकारत, चुचकारत परत आणताना माझ्या नाकी नऊ आले होते.
असेच एकदा मायबोलीकरांसोबत (जी एस, सई, गिऱ्या, क्षिप्रा, आरती,
सोनचाफ़ा, मिहिर असे बरेच जण होतो. ) सिंहगडावरुन सुर्यास्त बघितला. पहाटे
२ पर्यंत गप्पा मारल्या, आणि धडपडत पहाटे ५ वाजता सुर्योदय बघायला गेलो
होतो.
अंबोलीच्या सनसेट पॉईटवरुन पण अनेकवेळा सुर्यास्त बघितला. कधी गिऱ्या होता
तर कधी दुसरे कुणी. तिथे सगळे जण त्या देवळाच्या पुढे जातात, पण रस्त्याच्या मागे, जरा
उंचावर, जेमतेम ४ जण बसू शकतील, असा एक बाक आहे. निदान त्यावेळी तरी फ़ारसा
कुणाला तो माहित नव्हता. तिथून मी अनेकवेळा सुर्यास्त बघितला आहे. पण आता मात्र
तिथे जायचे धाडस होणार नाही, कारण माझा एक मित्र आणि मी तिथे बराच वेळ, गप्पा
मारत होतो, आणि त्यानंतर एक दोन महिन्यातच, त्याने गळफ़ास लावून आत्महत्या केली.
त्याला तर मी आजही विसरु शकत नाही. (मी मायबोलीवर, प्रिय विशाल, असे स्फ़ूटही
लिहिले होते.)
***
डिंपलचा सागर सिनेमा आला होता. त्यावेळी माझा एक मित्र सांगत आला, कि त्यात असे
गाव दाखवलेय, कि जिथे सुर्योदय आणि सूर्यास्त, दोन्ही समुद्रातच होतात. त्यावेळी आम्हाला
असे वाटले होते, कि समुद्रातला सुर्योदय बघायचा तर आपल्याला भारताच्या पूर्व किनायावर
जायला हवे. पण मग लक्षात आले, कि दूर कशाला ? मुंबईतच हे शक्य आहे. साधारणपणे
आपण, पश्चिम किनाऱ्यावर सुर्यास्त बघायला जातो. पण मुंबईच्या पूर्वेलाही समुद्रच आहे की.
एकदा पहाटे, फ़ेरी वार्फ़ वरुन, रेवदंड्याला जाताना, हा अप्रतिम देखावा बघितला होता.

***
विमानातून सुर्योदय आणि सुर्यास्त खुपवेळा बघायचा योग आला. मुंबई गोवा मार्गावर, मी
अनेकवेळा पहाटे ५ चे विमान पकडत असे. हा प्रवास उत्तर दक्षिण. त्यामूळे, पुर्वेची बाजू
धरून बसले, कि सुर्योदयाचा पूर्ण देखावा बघायला मिळतो. नेहमी दोन मितींमधे असणारे
ढग, या वेळी, त्रिमितीमधे असतात. त्यांचे आकार, रंग बघण्यात मी नेहमीच हरवून जातो.
या नाट्याच्या आधीची प्रकाशयोजना पण अप्रतिम असते. अश्यावेळी क्वचित एक निळसर
हिरव्या रंगाची छटा पण दिसते.
आतंराष्ट्रिय प्रवासात मात्र, खुपदा सुर्योदय वेळेपूर्वीच झाल्यासारखे वाटते. खास करुन जर
तूम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करत असाल, तर कायमच असे होते. (आणि या प्रकाराचा
खूप मानसिक त्रास होतो.)
***
सुर्यास्त बघताना, कधी कधी भान हरपायला होते. आपण एकटक त्याच्याकडे बघत बसतो,
आणि मागे वळून बघितल्याबरोबर, एकदम खुप अंधार झाल्याचे लक्षात येते. अरे आजचा
दिवस संपला कि, काहितरी योजले होते, राहूनच गेले, असे वाटते. एकदा दिल्लीहून मुंबईला
येताना, असे सुर्यास्तानंतरचे विमान पकडले, आणि मजा म्हणजे विमान वर उडल्यावर
परत सुर्य दिसला. मला खुप आनंद झाला होता. आजचा दिवस थोडा परत मिळाला असे
वाटले होते.
हा अनुभव मी एकदा, सलालाह च्या किनाऱ्यावर बसलेलो असताना, मित्राला सांगितला.
तिथल्या किनाऱ्यावर लाटांचे उडणारे कारंजे बघत, खुप वेळ बसलो होतो आणि सुर्यास्त
झाला. माझ्या बोलण्यावर, माझ्या मित्राला काय वाटले, कुणास ठाऊक, तो म्हणाला
चल तूला परत आजचा सूर्य दाखवतो. आणि तिथल्या किनाऱ्यावर असलेल्या, प्रचंड
डोंगरावर, भन्नाट गाडी हाकत तो मला घेऊन गेला. या थरारक प्रवासानंतर खरेच सूर्य दिसला.
तिथला देखावा काय वर्णू, समोर खूप खोलवर अथांग समुद्र, मागे वाळवंट, त्यावर उमललेली, आणि
गुलाबी फ़ुलांनी डवरलेली नैसर्गिक बोनझाय. भन्नाट वारा.
काय खूष झालास कि नाही ? या मित्राच्या प्रश्नाला, उत्तर द्यायचे सुचलेच नव्हते.
आयूष्यातला प्रत्येक दिवस असा परत ना मिळो, पण असा प्रत्येक मित्र, मात्र परत एकदा
भेटायला हवा.
***
खुपदा माझ्या आयुष्यात सुर्योदय किंवा सुर्यास्त, हा अनेकदा मित्रमैत्रिणींचा, आईचा, घरच्यांचा
निरोप घेण्याशी निगडीत होता. त्यावेळी, त्यांच्या नजरेतला परत कधी ? हा सवाल
मला घायाळ करत गेला. पण त्यावेळी देखील या सुर्याने, मला कधी उदास वाटू दिले नाही.
पण एक सुर्यास्त मात्र आजही लक्षात राहिलाय. वडीलांची एकमेव इच्छा होती, कि त्यांच्या
अस्थि, मालवणच्या समुद्रात सोडाव्यात.
मी त्या सोडल्या, आणि काकाना घेऊन राजकोटात गेलो. (मालवणच्या किनाऱ्यावरून सुर्यास्त
दिसत नाही, कारण सिंधुदूर्ग किल्ला, मधे येतो.) सुर्यास्त नेहमीसारखाच छान होता, पण
त्या परिसरातील, प्रत्येक गोष्ट मला, बालपणाकडे घेऊन गेली, तिथल्या खडपावरुन (खडकावरून
नाही ) उसळणाऱ्या लाटा, प्रत्येक सातवी लाट मोठी असते, असे मानत लाटा मोजण्याचा खेळ,
महापुरुषाची घुमटी, तिथे नैसर्गिक रित्या तयार झालेली एक आरामखुर्ची, दूरवर दिसणारे एक
पडके चर्च, आडवा झालेला एक माड, भोवरे असणारी आणि म्हणूनच पोहायला धोकादायक
असणारी तिथली वेळ (किनारा), ब्रम्हदेशाच्या राजाचे थडगे, गडग्याजवळची चाफ़्याची झाडे,
त्याच्या केलेया अंगठ्या, वाळूत वेचलेले आवळे आणि या सगळ्याची ओळख करुन देणारे ते.
या सगळ्यातून ते मला परत भेटले. सूर्य जसा परत परत भेटत राहतो, तसेच.

****
माझ्या संग्रहातील सुर्योदय सुर्यास्ताचे हे काही(च) फ़ोटो. त्यावरची टिप्पणी केवळ संदर्भासाठीच.
सूर्य तोच, मीही तोच, पण ..

नायजेरियात बदागिरि नावाचे गाव आहे. गुलामांच्या व्यापारासाठी ते कुप्रसिद्ध होते. तिथून जवळच, अगबारा नावाचे गाव आहे, तिथला हा एक सूर्यास्त.

agbara suryast.jpg

त्याच अगबारा गावातून ...

agbara suryast2.jpg

गोवा ते मुंबई विमान प्रवासात काढलेला हा फोटो. त्रिमितीतले ढग..

Bombay to Goa.jpg

दुबईजवळच्या वाळवंटातून दिसलेला सूर्यास्त.

dxb suryast.jpg

मालदीव मध्यल्या एका बेटावर वसलेल्या, फूल मून रिसॉर्ट मधून ..

male suryast.jpg

माझे आजोळ, मलकापूर ( तालूका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर ) इथल्या तूर्‍यावर आलेल्या उसाच्या शेतातून.

Malhapur.jpg

घारापुरी बेटांवरुन मुंबईला येताना. मुंबईची स्कायलाईम...

Mumbai.jpg

नैरोबी, केनया मधून दिसलेला सुर्योदय. (हिरव्या रंगाची एक क्वचित दिसणारी छटा )

Nairobi.JPG

पणजी, गोवा, इथल्या पाट्टो भागातून दिसलेला एक सूर्यास्त.

Panji Goa.jpg

पणजीतला एक सुर्योदय. मांडवीचा पूल आणि एक बार्ज पण.

Panjim Goa.jpg

प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार, पर्वरी, गोवा.

Parwari Goa.jpg

आणि हि आमची मुंबई. वरळीच्या एका मॉलच्या तिसर्‍या मजल्यावरुन काढलेला.

Worli Mumbai.jpg

विषय: 
प्रकार: 

व्वा!! सुरेख फोटो,सर्वच खूप आवडले आणी लेख वाचतांना तंद्री लागली अक्षरशः
सुंदर लेख!!
मागच्या वर्षी २२ जुलैचं खग्रास सूर्यग्रहण पाहायला म्हणून शांघाय ला घाव घेतली होती मीना प्रभूंबरोबर. खूप ढगाळ हवेमुळे ग्रहण दोनच मिनिटं पाहायला मिळालं पण सूर्याचं ते अद्वितीय रूप मनात घर करून बसलंय. आणी त्यावेळी निसर्गात होणारी उलथापालथ अनुभवताना आलेला थरार अजून कायम आहे.

सुंदर लेखन. व फोटो. माझ्या घरातून पण सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन चांगले कळते. माझे पण सूर्याशी काहीतरी कनेक्षन आहे मेंटली, इमोशनली. रोज काम संपवून घरी आल्यावर मी सूर्यास्त बघतेच.

व्वा!! सुरेख फोटो ..
दिनेशदा, मी कोल्हापुरहुन मलकापुरला खुप वेळा कामानिम्मित गेलो आहे ..तिकडे गेलो की
पावसाळ्यात कोकणात गेल्याच,वेगळच समाधान वाटायचं ...

दिनेशदा सुर्यास्त मस्तच,

एकाच ठिकाणावरून पाहिला तरी रोजचा सुर्योदय किंवा सुर्यास्त वेगळाच असतो.
ज्यावेळेस ऑफिस मधुन घरी लवकर येतो तेव्हा न चुकता सुर्यास्ताचे फोटो टिपल्याशिवाय रहावत नाही.

दिनेशदा, सुंदर लेखन. तुमचे सुर्यनारायणाशी असलेले कनेक्षण आवडले. सुर्य काय दररोजच दिसतो, पण आपले सुर्याशी असलेले नाते कधी लक्षात येत नाही. तुम्ही तर अनेक देशातील सुर्योदय व सुर्यास्त अनुभवलेत व ते अनुभव वाचून मलापण तो अनुभवता आला Happy

>>अरोरा. म्हणजे ध्रुवीय प्रदेशात, सहा महिन्यांची रात्र संपून ज्यावेळी सूर्य उगवतो. त्या पूर्वी आकाशात रंगाचे अनेक खेळ दिसतात. हे खेळ म्हणजे एक नयनरम्य सोहळाच असतो. नेहमीच्या लाल पिवळ्या रंगांशिवाय, हिरव्या जांभळ्या रंगाचे पण खेळ चालतात. डोळे कायमचे मिटण्यापूर्वी हा सोहळा बघायची
खूप इच्छा आहे.<< अगदी सहमत, अरोरा केवळ चित्रपटात व डिस्कवरी वरच पाहिलेय, पण प्रत्यक्षात पहायचे आहे.

त्रिमितीतले ढग आवडले.

दिनेश भाई उत्तम लेख.
पहिल्यान्दा वाटले साक्रेटीसच्या नाटकाची काही भानगड आहे की काय Happy
फोटोत सूर्योदय की सूर्यास्त कळत नाही. मानले तर सूर्योदय, मानले तर सूर्यास्त. कसे ओळखावे? काही ट्रिक?

दुधाची तहान ताकावर भागवायची म्हटले तर ऑरोराचे चित्रीकरण यू ट्युबवर आहे बरेच..

मला वाचल्याचे नीट आठवत असेल, तर आपल्या कोणार्कचे जे सूर्यमंदीर आहे, ते कधीही ग्रहण
छायेत येत नाही.

मला वाटते १९८० च्या दरम्यान झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा प्रदेश कोणार्कमध्ये होता . चुभू देघे.

एकन्दरीत सुन्दर लेख....

आभार दोस्तानो.
माझ्या ४,५ आणि ६ क्रमांकाच्या फोटोमधेच सूर्य आहे. बाकीत नूसते त्याचे खेळ.
आणि हो लिहायचे राहिलेच, अगदी पहिल्या आणि दुसर्‍या फोटोतही, मी काहीहि एडीटींग केलेले नाही.
(दोन्ही फोटो एकाच खिडकीतून काढले आहेत. दुसर्‍यावेळी, पामचे झाड नव्हते, एवढाच फरक.)
दोनचार मिनिटे, खरेच इतके विलोभनीय रंग दिसले होते. कदाचित तिथल्या प्रदूषणमुक्त हवेचाही परिणाम असेल हा !
टोणगा, मला वाटते त्यावेळी देखील ते मंदीर ग्रहणछायेत आले नव्हते. (असे पेपरमधे वाचल्याचे आठवतेय.) आपल्या पूर्वसूरीना, हे साधणे सहज शक्य होते. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळातील चमत्कार माहीत असेलच.

सर्वांनाच सुर्याविषयी एक प्रकारचे आकर्षण असते,अगदी वेदकाळापासून. आपले जीवन हे सूर्यशक्तीवरच अवलंबून आहे.वनस्पती या शक्तीद्वारेच अन्न तयार करतात.आपण मानसीक शक्तीदेखील अशीच मिळवतो. असो .फोटो छानच आहेत.

छान लेख आहे. आवडला.

(म्हणजे २२ जून आणि २२ डिसेंबरला) कि मला काहि दिवशी, एकाच खिडकितून सूर्योदय आणि सुर्यास्त दिसायचा.>> हे नीट कळाले नाही.

रोजचा सुर्योदय ज्या खिडकितून दिसतो, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेच्या खिडकीतून त्या दिवशीचा सुर्यास्त दिसतो. पण उत्तरायण वा दक्षिणायन पूर्ण झालेल्या दिवशी, अनुक्रमे उत्तरेच्या व दक्षिणेच्या खिडकीतून हे दोन्ही दिसत असत. म्हणजे उत्तरेच्या खिडकिच्या उजव्या कोपर्‍यातून सुर्योदय व डाव्या कोपर्‍यातून सुर्यास्त.

छान लिहिलय! फोटो पण मस्तच... रोजच भेटणार्‍या सुर्याबद्दल कधी एवढा विचार केला नव्हता.
सुर्याचे महत्व खरच भारतात राहुन नाही कळत. युरोपात राहिल्यावर, ६/८ महिने थंडी अनुभवल्यावर मग समजतं.

>> आपल्या कोणार्कचे जे सूर्यमंदीर आहे, ते कधीही ग्रहण छायेत येत नाही.
मंदिर बांधताना ही दक्षता घेतली होती का? (हे आपल्या पुर्वजांना शक्य आहे) का हा फक्त एक योगायोग आहे?... भारतात अशी बरीच गावं आहेत जिथुन खग्रास सुर्यग्रहणाचा मार्ग गेला नाहीये.

दिनेशदा, काय हातोटी आहे हो तुमची लिखाणाची. तुमचे लेख वाचायला सुरूवात केली की संपूच नयेत असे वाटते.

दिन्या, बाबा
किती रे इच्छा त्या. मेल्यावर भूत होणार तूझे, हे नक्की

तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा आणि इथे मायबोलीवर लिहा... म्हणजे ते वाचून तरी मायबोलीच्या बर्‍याच लोकांचा भूत व्हायचा प्रॉब्लेम टळेल

आहाहा!!! परत पाहताना आणी वाचतानाही पुन्हा पहिल्यांदाच वाचत असल्याचा आस्वाद घेतला!!!
माझ्या आवडत्या दहात!!! Happy

छान

Pages