मनातले थोडेसे..

Submitted by प्राजु on 5 May, 2010 - 12:27

९ मे २०१०. खूप मोठा दिवस. का?? नेमके काय आणि कोणत्या शब्दांत सांगावे समजत नाही.
स्वप्नं असतात म्हणून जगण्याला दिशा असते असं म्हंटलं चुकीचं ठरू नये. कधी स्वप्नं खरी होतात, तर कधी घडून गेलेलं काहीतरी, हे आपलं स्वप्नं होतं का असा विचार आपण करू लागतो. आज मागे वळून पाहताना असा विचार येतो की, ४ वर्षापूर्वी मी कोण होते? पुणे आकाशवाणीच्या मराठी चॅनेल ची निवेदिका होते. कार्यक्रमाची संहिता लिहिताना खरडलेल्या चार ओळी, कधी एखादी कविता, आणि त्या अनुषंगाने येणारं निवेदन.. साहित्यिक लेखानाचा इतकाच काय तो संबंध!
आणि आज माझ्या नावावर एक कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. हे स्वप्नवत वाटतं आहे..
नक्की कशा शब्दांत माझ्या भावना व्यक्त करव्यात समजत नाहीये. कवितेशी जवळीक तशी लहानपणीच झाली होती. आईने रूजवलेलं ते कवितेचं बीज काही वर्षं सुप्तावस्थेत राहूनही मेलं नाही.. तग धरून राहिलं. आणि थोडंसं खत पाणी मिळताच अंकुरलं आणि जोमाने वाढलं सुद्धा. मी कविता लिहायला, माझं अमेरिकेत येणं जरूरी होतं का ?? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये मला. गेल्या ४ वर्षात माझी बाळबोध कविता प्रगल्भ होऊ लागली आहे. कित्ती प्रकारे मी कवितेवर प्रेम केलं असेल! काही कविता तर रात्री अडीच वाजता उठून लिहिलेल्या आठवतात मला.
सुरूवातीच्या काळात ज्यांनी ज्यांनी माझ्या कविता सहन केल्या, त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे कदाचित माझ्या नावापुढे 'कवयित्री' लावायची संधी मला मिळाली. गझल शिकण्यासाठी उत्तम गझलकार आणि विडंबन सम्राट अनिरूद्द अभ्यंकर उर्फ केशवसुमार यांना मी किती त्रास दिलाय.. ते फक्त त्यांना आणि मलाच माहिती! संदीप चित्रे.. !आम्ही दोघेही मायबोलीच्या गझल कार्यशाळेमध्ये सामिल झालो होतो.. आणि त्यानंतर लिहिलेली प्रत्येक गझल एकमेकाला पाठवून पॉलिश करत होतो. इतकं होऊनही अजूनही मी गझलेसाठी धडपडते आहेच. मीनल..!! हीच्या सहनशक्तीची तर कमालच आहे. हिच्याकडे कुठून इतकी सहनशक्ती आली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! असो.. तिची सहनशक्ती अशीच दिवसेंदिवस वृद्धींगत होऊदे अशीच प्रार्थना करते.
"फुलांची आर्जवे" .. हो! माझा.. या प्राजक्ताचा ..पहिला वहिला कविता संग्रह! पुस्तक जेव्हा माझ्या हातात पडलं... इथे .. अमेरिकेत, तेव्हा प्रचंड खळबळ चालू होती मनांत. का? नाही सांगता येणार. हे चित्र.. माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरचं आहे., हे मनोगत.. मी, माझ्या पुस्तकासाठी लिहिलेलं आहे, ही अर्पण पत्रिका.. मी लिहिलेली आहे, मलपृष्ठावरचा हा फोटो.. माझा आहे! या कविता... मीच लिहिलेल्या.. माझ्या मित्रमैत्रीणिंनी कौतुक केलेल्या आहेत. हे.... हे.. माझं पुस्तक आहे!! या सगळ्यांवर विश्वास बसायला फार वेळ लागला.
गेल्या वर्षी जुलै मध्ये आई भारतात परतताना माझ्या ५० -६० कविता एका सिडीवर कॉपी करून घेऊन गेली होती. सप्टेंबर मध्ये तीने त्याच्या प्रिंट्स काढून दिलिपराज प्रकाशन, पुणे, यांच्याकडे पाठवून दिल्या.. २ महिने इतके अशक्य गेले!! काय सांगू?? वाटलं प्रकाशकांनी कवितांना कचरापेटी तर नसेल ना दाखवली..! आणि एकेदिवशी समजलं प्रकाशक कविता संग्रह काढणार आहेत. त्या दिवसापासून आजपर्यंत काय काय झालं असेल ते फक्त मलाच ठाऊक आहे.
९ मे २०१०, माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे,आणि ते ही माझ्या अनुपस्थितीत. चालयचंच! इतकी मोठी गोष्ट देवाने पदरात घातलीये.. तर छोट्याश्या गोष्टीसाठी उदास कशाला व्हायचं!

आजच्या घडीला, मी माझ्या सर्व मित्रमैत्रीणींना फक्त इतकीच विनंती करते की, या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला आणि माझ्या पुस्तकाला सन्मानित करावं.

स्थळ :
चित्तरंजन वाटिका,
"जिव्हाळा", वसुंधरा वाचनालय हॉल,
मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे

वेळ : ९ मे २०१०, सकाळी १०.०० वाजता.

मान्य आहे मला, रविवार सकाळ आहे.. उशिरा उठण्याचा हक्काचा दिवस आहे.. पण तुमच्या या मैत्रीणीसाठी हा एकच दिवस थोडंसं लवकर उठून नक्की उपस्थित रहा... अशी मी विनंती करते. कोणाला शक्य असेल तर, इथे वृत्तातही लिहावा. मला वृत्तांत तरी वाचायला मिळेल.
आणखी काय मागू मी ?

- प्राजु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्राजु? अरे ही तर माझी माबो कर मैत्रीण
तुझं खूप खूप अभिनंदन.. प्रत्यक्षात भेटली असतीस तर तुला घट्ट मिठी मारून तुझं अभिनंदन केलं असतं. तुझ्या आनंदात सहभागी आहे मी. आणी पुढच्या भारत भेटीत तुझा कविता संग्रह नक्की विकत घेणारे मी.. Happy
आणी कवितासंग्रहाचं नांव पण खूप गोड आहे

अरे मस्त Happy पुण्यात असतो तर गेलो असतो..

<<मी कविता लिहायला, माझं अमेरिकेत येणं जरूरी होतं का ?? या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाहीये मला>> कवितांबद्दल अभिरुची होतीच, अमेरिकेत येऊन वेळ मिळाला + ब्लॉग / मायबोली सारखी माध्यमं मिळाली आणि मग स्वतः देखिल लिहावं असं वाटुन प्रवास चालु झाला असावा असं वाटतं..... (बर्‍याच जणांचं असंच होत असावं, पण शेवटी प्रत्येकाच्या प्रतिभेत फरक असतोच...)

शुभेच्छा तुम्हाला Happy

प्राजु अभिनंदन गं. मी पुण्यात राह्यले त्या दिवशी तर नक्की जाईन. काहीच नाही तर चक्कर मारून तुझ्या आईला भेटून तरी येईन. राजूकाकापुढे(राजीव बर्वे) जाऊन मैत्रिणीचा कवितासंग्रह म्हणत कॉलर ताठ करून तर नक्कीच येईन. Happy

प्राजु..मनापासुन आभिनंदन..संग्रहाचं नाव अतिशय उत्तम आहे..खुप मस्त!!! लिहीत रहा Happy

अरे वा! अभिनंदन. BMM च्या शिकागो च्या अधिवेशनात कवी संमेलन करायचा प्रस्ताव मांडला आहे. जरूर सामील हो.

प्राजु.........तुझी मनःस्थिती काय असेल ह्याची पूर्ण कल्पना आहे Happy
तुला मनापासून शुभेच्छा Happy

Pages