रन बुवा रन!

Submitted by वैद्यबुवा on 2 May, 2010 - 16:48

मध्यंतरी आपले माननीय अ‍ॅडमीन महोदय (समीर) यांचा "माझी १/२ मॅरॅथॉन यात्रा" हा लेखा वाचला. मनात विचार चमकून गेला की आपण सुद्धा एखाद्या हाफ मॅरॅथॉन मध्ये भाग घेऊन बघितला पाहिजे. खरंतर हाफ मॅरॅथॉन हा प्रकार मला पहिल्यांदा समीरच्या लेखामुळेच कळला. एकंदरीत पूर्ण मॅरॅथॉन चे २६ मैल वगैरे अंतर बघूनच मी त्या प्रकाराचा नादी लागलो नाही कधीच. १३.१ मैल हा आकडा खुप जरी असला तरी जमेल असं एकदा वाटून गेलं. एरवी मला दररोजच्या व्यायामात थोडी फार पळायची सवय आहे. थोडीफारच सवय या करता की, पळायचा प्रचंड कंटाळा पण आहे त्यामुळे अधूनमधून जास्तीत जास्त १-२ मैलच पळणं होतं. लेख वाचुन सुद्धा मी काही लगेच चौकशी वगैरे केली नाही (आळस, दुसरं काय?). त्या नंतर परागचा (२५ मार्चला) "वेगे वेगे धावू.." हा लेख वाचला. तिथे प्रतिसादांमध्येच चर्चा करत असताना "सायो"नी न्यु जर्सी मॅरॅथॉन बद्दल सांगितलं. या वेळी मात्र मी लगेच एन जे मॅरॅथॉनच्या वेबसाईट वर जाऊन माहिती वाचुन काढली. तिथे कळलं की फुल आणि हाफ असे दोन्ही इंवेट्स न्यु जर्सी रनर्स असो. दर वर्षी करते. आता मात्र राहवेना!

मी विचार करत होतो, म्हंटलं काय आपलं दररोजचं रुटिन? उठलं की कामावर जायचं, ते झालं की घरी येऊन थोडा फार व्यायाम अन मग टिव्ही! शनिवार-रविवार एकदची तिकडची कामं आणि जमले तर एखादा सिनेमा, थोडं बाहेर जेवायला जाणं बास! अजुन काय? हेच चक्र आपलं वर्षानुवर्ष अविरत सुरु आहे! पूर्वी कसा डोक्याला काहितरी भुंगा असायचा, शाळा, कॉलेजला असताना परिक्षा असायच्या, क्रिकेटच्या मॅचेस असायच्या, नंतर इथे शिकण्याकरता यायला परिक्षा, अ‍ॅडमिशन नंतर शिक्षण झाल्यावर नोकरी करता धडपड असं सतत काहीनाकाही पुढे लक्ष्य असायचं जे गाठण्याकरता आपण तयारी करायचो. तेव्हा कधी कधी ही धडपड सुरु असताना कंटाळा यायचा पण इतके वर्ष झाल्यानंतर आपल्याला तो कंटाळा का नाही लक्षात राहिला? सारखे ते दिवस बरे होते असं का वाटतंय? मग ट्यूब पेटली! एखाद्या गोष्टीच्या मागे हात धुवून, जीवाचं रान करत मागे लागल्यावर जेव्हा नंतर ती गोष्ट एकदाची मिळते, तेव्हा जो आनंद होतो त्याला जवाब नसतो! झालं! मॅरॅथॉन मध्ये भाग घ्यायचा म्हणजे घ्यायचा!!मनाशी नक्की केलं.

पक्कं करे पर्यंत पण एक आठवडा मध्ये गेला होता. तारिख आली १ एप्रिल! म्हंटल तयारी करायला सुद्धा अवघा एक महिनाच उरलाय, काय करावं? परत खुणगाठ बांधली की जे होईल ते होईल, भाग घ्यायचाच! प्रयत्न करायला काय हरकत आहे? खरंतर अजुन दोन गोष्टींमुळे माझ्या दृढ निश्चयाची नैया आधी थोडी डुगडुगत होती. पहिली गोष्ट म्हणजे, तिथे एन जे मॅरॅथॉनच्या वेबसाइट वर एक सूचनाअशी होती की 'जर तुम्हाला कमीत कमी अर्धा तास न थांबता पळता येत नसेल तर तुम्ही १/२ मॅरॅथॉन मध्ये भाग घेण्याबद्दल फेरविचार करावा'. दुसरी गोष्ट, मॅरॅथॉन करता लाँग ब्रँच सिटी मधले दररोजचे वाहतुकीचे रस्ते वापरले जाणार असल्यामुळे मॅरॅथॉन सुरु झाल्यावर बरोबर साडेतीन तासांनी पोलिस बॅरिकेड्स टाकून अडवलेले रस्ते रहदारी करता खुले करणार होते. त्याच बरोबर मग फिनिश लाइन वर मॅरॅथॉन पूर्ण केल्याबद्दल दिले जाणारे मेडल आणि टोपी मिळेल की नाही यात पण शंका होती. मी तीन एक महिन्यापूर्वी पर्यंत न थांबता ४० मिनिटं पळु शकत होतो पण नंतर कंटाळा आल्यामुळे मी ते बंदच केलं. ह्याऊपर इतकी तयारी करुन जर फिनिश लाइनलामेडल मिळालं नाही तर जाम वैताग येणार होता. शेवटी विचार केला की आपण पळायला सुरवात करुयात, हवं तर रेजिस्ट्रेशन लगेच नको करायला.

कामाहून संध्याकाळी घरी आल्यावर इथे माझ्या नेबरहुड मध्येच पळायच ठरवलं. साधारण एक महिना म्हणजे ४ वीकेंड हातात होते. वीकेंड चा हिशोब ह्याकरता, की वीकडेज ला ४-५ मैल अंतर पळून वीकेंड ला २ मैल जास्त पळायचं असा प्रोग्रॅम ठरला होता (ऑनलाइन थोडं वाचन करुन ह्या पद्धतीबद्दल कळलं). थोडक्यात ४,६,८, १० असे मैल ४ वीकेंड ला पळून त्यानंतरच्या वीकेंडला मॅरॅथॉन मध्येच पळायचं असा बेत होता. पहिल्या सोमवारी कामाहून घरी आलो, मस्त आयपॉड वगैरे घेऊन पळायला सुरवात केली. अगदी पाव मैल संपायच्या आतच दमछाक व्हायला लागली. जरा खचल्यासारखं झालं. अजुन पाव मैल नाही पार पडला, १३ मैल आपण कसे पार पाडणार? विचार झटकून मी फक्त पळायचं ठरवलं. पुढे थोडं अंतर गेल्यावर लगेचच दोन्ही तळपायांमधून कडेच्या बाजुनी दुखायला लागलं. माझ्या तळपायाची ठेवण अगदीच पसरट (फ्लॅटफुट) असल्यामुळे हा त्रास काही मला नवीन नव्हता. माझ्या अपार्टमेंटपासूनपुढे ज्या रस्त्यावर मी पळत होतो तिथे लगेचच चढ होता त्यामुळे हे दोन्ही त्रास जास्तच जाणवत होते. पायाचे बाकी स्नायु सुद्धा किंचीत दुखायला लागले, एकंदरित परिस्थिती जरा अवघड होती. आयपॉड वर गाणी चालु होती पण मला काही ती ऐकु येत नव्हती. दुखणार्‍या स्नायु अन मनातल्या विचारांच्या काहुरानी गाणी पार झाकोळून टाकली होती. मी अक्षरशः आता थांबतो की मग थांबतो अशा अवस्थेत पळत होतो. थोड्या अंतरानी रस्त्याचा चढ संपला, मी नि:श्वास टाकला. जरा बरं वाटलं. थोडं अंतर सरळ रस्त्यावर पळाल्यावर जरा ताण कमी पडल्यामुळे स्नायु कमी दुखत होते आणि बहुतेक आता बॉडी वॉर्म अप झाल्यामुळे सुद्धा त्रास कमी जाणवत असावा. थोड्यावेळानी पेवमेंट संपलं आणि मी सरळ रस्त्याच्या कडेला आखललेल्या पांढर्‍या पट्टीवरच पळायला लागलो. पळताना जरा त्रास कमी व्हायला लागल्यामुळे थोडं आजुबाजुला लक्ष पण जायला लागलं. ही आजुबाजुची घरं मी खरंतर आधी पाहिली होती पण आज मी गाडीत नसल्यामुळे ती भरकन न सरकता डोळ्यासमोरुन सावकाशपणे मागे सरत होती. थोडच पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजुला गोल्फ कोर्स सुरु झालं अन त्याच बरोबर रस्त्याला एकदम उतार लागला. उतार असल्यामुळे मला मागुन कोणीतरी लोटत असल्यासारखा भास होत होता, पळायचा वेग आपोआपच वाढला. आता दुखणं तर थांबलच पण श्वास घेण्यात सुद्धा एक प्रकारची लय आली. धावण्याच्या वेगानी आणि ह्र्दयाच्या ठोक्यांनी संगनमत केलं. पुढे रस्त्यात एका ठिकाणी ऊंच झाडी आहे (गोल्फ कोर्स मधेच), तिथे झाडांच्या पानांमधून जागा शोधून सोनेरी सूर्यकिरणेरस्त्यावर पडली होती. माझी पळताना हळूहळू जणु तंद्रीच लागायला लागली होती. तेवढ्यात वार्‍याची एक छानशी झुळुक रस्त्यावरच्या पाचोळ्याची नुसती कूस बदलून गेली अन केव्हाच्या सुरु असलेल्या गाण्यांमधली ही ओळ पहिल्यांदाच ऐकु आली "किस्सा तेरा, तेरी दास्तां, चेहरा तेरा खुद करे बयां, किसीसे प्यार तुझे हो गया, तू मान जा, हां मान जाssss" अन त्या नंतर जी गीटार वाजली..... जे वातावरण तयार झालं त्याचे वर्णन करायचा मी फक्त प्रयत्नच करु शकेन. अंगावर सरकन काटा आला. थकवा वगैरे सगळं मी आता विसरलो होतो. पुढे दोन्ही बाजुला एकदम गर्द रान (हो रानच) आणि त्यात स्थित घरं. सुर्य आता मावळतीला आल्यामुळे किंचित अंधार पडायला लागला होता. घरांच्या बाहेर दारात, पांढरट उजेडाचे दिवे नुकतेच लागले होते. थोडं पुढे गेल्यावर एकदम पांढरी फुलं असलेल्या झाडांची रांग सुरु झाली. जवळ जवळ अर्धा मैल पेवमेंट वर पांढर्‍या फुलांचा अक्षरशः सडा पडलेला होता आणि त्यातून मी पळत होतो. दिव्यांचा तो पांढरट मंद उजेड आणि संधिप्रकाशात रस्त्याच्या दोन्ही बाजुंची घरं उजळून निघाली होती. अगदी स्वप्नात असल्यासारखा मी आजुबाजुचं वातावरण न्याहळत पळत होतो. नंतर तो अद्भुत प्रवास संपला पण त्याचे पडसाद इतक्या खोलवर उमटले होते की मी अजुन जरा भारावलेल्याच अवस्थेत होतो.

ह्या पहिल्याच "रन" नंतर एक मात्र नक्की झालं की मॅरॅथॉन मध्ये भाग घ्यायचा, ती पार पाडण्याचं लक्ष्य साधण्याकरता तर घ्यायचाच पण त्याही पेक्षा ते गाठण्याकरता कराव्या लागणार्‍या प्रवासाकरता! परत कधी पळण्याकरता बाहेर पडलो की कंटाळा आला नाही. उलट पळायचं असलं की काम संपवून घरी कधी जातो असं व्हायचं. एका मागून एक दिवस पुढे सरकत होते. ११ तारखेला आपलं महागटग झालं. तेव्हाच्या वीकेंडला ८ मैलाचा माइलस्टोन पार करायचा राहिला. त्या पुढच्या आठवड्यात भारतातून मित्र आला, अन त्याला इकडे तिकडे नेण्यात अजून एक माइलस्टोन हुकला. २६ तारिख उजाडली, रेस २ तारखेला होती. आता पर्यंत पार पाडलेला सर्वात लांबचा पल्ला फक्त ६.५ मैलाचा होता. आता इथून पुढे खूप जास्त पळून उपयोग नव्हता. उगाच पायाच्या स्नायुंवर जास्त ताण आला असता आणि मग रेसच्या दिवशी कदाचित त्रास होऊ शकला असता. मी फक्त ४-५ मैल पळायचं असं ठरवलं. सोमवारी ५ मैल पूर्ण केले आणि धीर करुन रात्री रेसचं रेजिस्ट्रेशन करुन टाकलं.

गुरवारी पळायला सुरवात केली तेव्हा चांगला स्टॅमिना जाणवत होता. जरा अजून स्टॅमिना आजमावून बघुयात म्हणून नाही नाही म्हणता गुरवारी ७.५ मैल पुर्ण केले. थकवा अजिबातच जाणवत नव्हता. ७.५ मैल जरी खूप असले तरी १३ मैल म्हणजे अजून ५.५ मैल! रुखरुख होतीच. अब जो होगा सो देखा जायेगा!

रेस डे! मी उगाच पार्किंगचं लफडं नको म्हणून घरातून सकाळी सहालाच बाहेर पडलो. लॉंग ब्रँच घरापासुन एक तासावर होतं, त्यामुळे मी ९ च्या रेस ला अगदी ७ लाच पोचणार होतो. सुदैवानी काहिच ट्रॅफिक लागलं नाही आणि मी खरंच ७ च्या ठोक्याला रेस च्या पार्किंग लॉट मध्ये येऊन ठेपलो सुद्धा. बाहेर ऊन फारसं नव्हतं, पण गाडी ८२ डिग्री तापमान दाखवत होती. चांगलेच हाल होणार असं दिसत होतं. पार्किंग लॉट ओलांडून पुढे रिसॉर्ट आणि ते पार केलं की पुढे बोर्ड वॉक आहे अशी माहिती आदल्या दिवशी मिळाली होती. ह्या बोर्ड वॉक वरच रेस सुरु होणार होती. तिथुन सुरु होऊन लाँग ब्रँच सिटी मधे साधारण ११.५ मैल आणि मग परत बोर्ड वॉक वर शेवटचे १.५ मैल अशी आखणी होती. रनर्स करता रिसॉर्ट मध्येच रेस्ट रुम्स वगैरेची व्यवस्था केलेली होती असंही कळलं. आत गेल्या गेल्या एकंदरीत नीटनेटकी व्यवस्था बघून जरा जीव भांड्यात पडला. दिलेला नंबर मी एकदम निवांतपणे पिना वापरुन शर्टाला टांगला. मॅरॅथॉन किती वेळात पुर्ण केली ह्याची अचुक नोंद व्हावी ह्याकरता एक मायक्रोचिप असलेली केशरी रंगाची पट्टी देण्यात आली होती. ती पट्टी बुटाच्या लेसमधून घालून त्याची दोन टोकं एकमेकांना डकवायची. म्हणजे ती पट्टी डकवल्यावर वर्तुळाकार घेऊन त्या लेस वर अडकून राहते. मी चिप बुटांना लावून घेतली, अन म्हंटलं आता बघुयात धावपट्टीवर काय चाललंय.

रिसॉर्टचं दार उघडून बाहेर पाऊल टाकलं तर एकदम गार वारं अंगाला लागलं. दार सरळ बोर्ड वॉकवरच उघडत होतं. थोडं पुढे सरकलो तर समोर पसरलेला अथांग अ‍ॅटलांटिक महासागर दृष्टीस पडला. इतकं सुंदर दिसत होतं. रिसॉर्टच्या इमारतीचा तळ समुद्रकिनार्‍यापासून पुष्कळ ऊंचावर होता आणि त्यामुळे दारातून बाहेर पडेस्तोवर इतकं लगेच पुढे बोर्डवॉक आणि त्यापुढे समुद्र दिसेल ह्याचा अजिबात अंदाज नाही आला. मी एक क्षणभर ते दृश्य बघत तिथेच रेंगाळलो.

हळूहळू लोकांची गर्दी जमायला लागली होती. रेस सुरु व्हायला अजुन दीड तास होता. मी आपलं इकडे तिकडे फिरायला सुरवात केली. काही लोकं स्टार्टलाइनपाशीच घुटमळंत होती. तर काही शेजारच्या गवतावर पाहुडली होती. थोडं फिरल्यावर मला जरा थंडी वाजायला लागली होती. हा एक अजब प्रकार होता. बोर्ड वॉक वर उभं राहिलं की रिसॉर्टच्या बाजुनी बर्‍यापैकी कोमट वारं अन समुद्राच्या बाजुनी गार वारं येत होतं. गाडी तशी बोर्ड वॉक पासुन लांब लावलेली होती.परत जाऊन गाडीत बसावं असं एकदा वाटून गेलं पण म्हंटलं इथे आपण गेल्यावर गर्दी उसळायची अन नंतर आतच येता नाही आलं तर? परत गाडीत जायचा विचार सोडुन मी तिथेच फिरायला सुरवात केली. सकाळी निघताना काही फार खाल्लं नव्हतं त्यामुळे रेस सुरु व्हायच्या आधी थोडं काहितरी खाणं गरजेचं होतं. एका बेगलस्टॉलमधून एक बेगल बटर आणि क्रीम लावुन खाल्ला. खरंतर आजिबात भूक नव्हती, पण एकदा पळायला सुरवात केली की मग काही खाणं शक्य नव्हतं म्हणुन थोडं जबरदस्तीनीच बेगल खाल्ला.

आता फक्त एकच तास उरला होता. चांगलीच गर्दी जमायला लागली होती. पट्टीच्या पळणार्‍या लोकांनी आपआपला खास गियर(कपडे) घालायला सुरवात केली. काही काही लोकं हळूहळू वॉर्म अप सुद्धा करायला लागले. मला ही खरं तर वॉर्म अप ची खूप गरज होती. थंडीनी माझे हात पाय पार गार पडले होते. नुसतं स्ट्रेचिंग करुन वॉर्म अप होणं शक्य नव्हतं पण नुसतं वॉर्म अप करता सहज १-२ मैल पळण्याची माझी तयारी नव्हती. तो ही बेत रद्द करुन मी गवतावर कडेला फतकल मारली.

थोड्याच वेळात धावपट्टीवर तोबा गर्दी जमली होती. रेसची वेळ जवळ येत असल्यामुळे जरा वातावरणात उत्साह शिरला होता, अन तीच संधी साधून व्यवस्थापकांनी ढणाण आवाजात स्प्रींग्स्टीनचं "बॉर्न इन द यु एस ए" लावलं. एकुण दहा हजार लोक मॅरॅथॉन मध्ये भाग घेणार होते. सगळ्यांचे वॉर्म अप जोर धरायला लागले. रेस सुरु व्हायच्या आधी डर्बी मधले घोडे कसे एक एक पाय झाडायला सुरवात करतात तसे सगळे धावपटूंचे पाय झाडणं सुरु झालं. सगळ्यांच्या वॉर्म अप च्या एक एक तर्‍हा. कोणी हात वर करुन माकडा सारख्या टणाटण्ण उड्या मारत होतं, तर कोणी हात लांब करुन, दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर गराग्गर एकशे ऐंशी च्या कोनात फिरवत होते. एका ठेंगण्या धावपटूचा वॉर्म अप बघून तर मी चाटच पडलो. आपल्या हिंदी सिनेमात कसं हिरॉइनच्या भावनांचा उद्रेक झाला की त्या समोरच्याला १,२,३,४ अशा सलग दोन्ही हातानी थोबाडीत मारत एकदम खाली वगैरे कोसळतात, तसा हा भाऊ त्याच्या स्वतःच्या मांड्याना थोबाडीत (किंवा मांडीत) मारत होता, वॉर्म अप म्हणुन! वरुन मारताना तोंडानी प्रत्येक झापडीला "हुं" असा हुंकार देत तो एकदम हुं हुं हुं हुं (४ झापडा) करत एकएका मांडीचा समाचार घेत होता.

टाइम टू रेसः टेन मिनीट्स . माझीही धडधड जरा वाढायला लागली होती. तसं काही कारण नाही पण कुठली ही रेस म्हंटलं की शेवटी शेवटी धडधड वाढतेच. धावपट्टीचे दोन भाग केले होते. एका बाजुला ताशी आठ मैल किंवा त्या पेक्षा जास्त वेगानी धावु शकणार्‍यांकरता आणि दुसरी बाजु त्या पेक्षा कमी वेगानी धावणार्‍यांकरता होती. जास्त वेगात धावु शकणार्‍यांना बरोबर ९.०० च्या ठोक्याला आणि दुसर्‍या बाजुच्या लोकांना ५ मिनीट उशिरा सोडणार होते. हे ह्याच्या करता की जास्त वेगानी धावणार्‍या लोकांना हळू धावणार्‍या लोकांचा अडथळा होऊ नये. मी आपला कमी वेगाच्या धावपट्टी वर येऊन उभा राहिलो. नवाला ७-८ मिनीटं कमी असताना अमेरिकेचं राष्ट्रगीत गायन सुरु झालं जे ३-४ मिनीटात संपलं. अनाऊंन्सर नी सज्ज व्हायची सुचना दिली. "आर यु रेडी टु रेस?" सगळी गर्दी एका आवाजात "येssssस" ओरडली, अन फायनल काऊंट डाऊन सुरु झाला.

माझी काही ५ मिनीटं थांबायची तयारी नव्हती, मी काऊंटडाऊन सुरु असतानाच पटकन दोन बाजुंमध्ये विभागणी करायला ठेवलेल्या दोन लोखंडी ग्रीलांमधे जागा करुन जास्त वेगाच्या धावपट्टीत शिरलो. "थ्री, टु, वन" धाडकन बंदुकीचा बार झाला अन सगळा लोंढा धावता झाला. मी पण सुरवात तशी जोमानेच केली पण आपला वेग नेहमीपेक्षा जास्त वाटतोय हे लगेचच लक्षात आलं आणि मी वेग मंदावला. मी माझ्या ठरलेल्या वेगात धावायला सुरवात केली आणि माझ्या भोवतालून पळ्णार्‍यांचे लोंढेच्या लोंढे पुढे जायला लागले. ही सगळी मंडळी ताशी आठ मैल वाली होती त्यामुळे हे होणं तसं साहजीकच होतं.

बोर्ड वॉक पार करुन आम्ही समुद्रालगत असलेल्या शहराच्या रस्त्याला लागलो. सुदैवानी ऊष्णता जाणवत होती पण सूर्य ढगांनी झाकला गेल्यामुळे खुप ऊन नव्हतं. रस्त्याच्या दोन्ही बाजुनी मस्त टुमदार घरं होती, मॅरॅथॉन निमीत्त सगळे रस्ते रहदारीला बंद केले होते. दोन्ही बाजुनी लोक मॅरॅथॉनर्सना प्रोत्साहन द्यायला गर्दी करुन उभे होते. दोन मैल होत आले पण सुरवातीला नेहमीच पोटर्‍या आणि तळपायाला होणारा त्रास काही कमी होइना, ऊष्णते मुळे किंवा कदाचित मी सुरवातीला थोडा जोरात पळाल्यामुळे अस होत असावं. तीन साडेतीन मैल होत आल्यावर सुद्धा त्रास कमी होइना आणि मी जरा बेचैन व्हायला लागलो. थांबायची इच्छा नव्हती पण उगाच दुखापत नको म्हणुन मी पळणं थांबवुन जरा जोरात चालायला सुरवात केली. अचानक १३ मैल आता खुपच अवघड वाटायला लागले. एक वळण ओलांडून आम्ही हमरस्त्यावर आलो, तिथे एका कुटूंबानी त्यांच्या लॉन वर मोठे स्पीकर आणुन रिपीट मोड वर "रॉकी" चं थीम साँग लावलं होतं. रॉकी सिनेमा ज्यानी मनापासुन बघितलाय त्या माणसाला ह्या गाण्यात असलेली "गेटिंग स्ट्राँगर, गेटिंग फास्टर" ही त्याच्या ट्रेनिंग रुटिन च्या वेळी वाजणारी बिबुल्/ट्रंपेट वाजली की खरच असला हुरुप येतो! मी आधी थोडा पायाचे तळवे, पोटर्‍या दुखत असल्यामुळे पळताना पायाच्या चवड्यांएवेजी मुद्दाम पायाच्या टाचा आधी जमिनीवर टाकत होतो, ते सगळं सोडुन मी अगदी दुखर्‍या भागांवर जोर देत थोडं आणखी वेगानी पळायला सुरवात केली. समीरला मारे, "आता मोहिम फत्ते झाली तरच जीवाचं नाव बुवा!!!" असं सांगून आलो होतो, रेस वेळेत पुर्ण नाही करता आली तर नाव वगैरे बदलून बुवाच्या नामाचा "पंचा"नामा होऊ द्यायची माझी इच्छा नव्हती. मी थोडा वेग वाढवला तरी माझ्या मागून येऊन सतत लोकं पुढे जातच होते. सहा मैल पार पडले आणि आता पाय आजिबात दुखत नव्हते, आता जाणवत होतं ते ऊन. सुर्यानी ढगांमधून डोकं वर काढलं होतं. रेस सुरु होऊन नुकताच एक तास झाला होता. पाय दुखत नसले तरी चार मैलांपासुन सहा मैलांपर्यंत येऊस्तोवर जो वेग मी स्थिर ठेवला तो काही आता पाळणे शक्य होत नव्हतं. धाप लागायला लागली होती. अधूनमधून ड्रिंक्स स्टॉप वर थांबूनमी थोडं गेटरेड आणि पाणी प्यायलो होतो, तरी वेग वाढवणं तर दूरच पण सध्याचा वेग टिकवणं सुद्धा अवघड जात होतं. मी शेवटी परत चालायला सुरवात केली. सुदैवानी चालताना काही त्रास जाणवत नव्हता. अजुनही लोक माझ्या मागून येऊन पुढे जातच होते. मी त्यातल्या त्यात भरभर चालायला सुरवात केली. त्रास जाणवत नसल्यामुळे थोडा हुरुप आला होता पण आपण वेळेत रेस पूर्ण करु की नाही ह्याची चिंता वाटायला लागली होती. चालता चालता शेजारुन एक बर्‍यापैकी वयस्कर बाई माझ्या डाव्या बाजुनी जरा भरकन पुढे गेल्या, त्यांनी तांबड्या रंगाचा टी शर्ट घातलेला होता. शर्टाच्या मागे मोठ्ठ्या पांढर्‍या अक्षरात " Watch My Back Bitch" आणि खाली बारिक अक्षरात "While I race to the finish line" लिहीलेलं होतं. ह्या युक्तीवादावर हसावे की रडावे तेच कळेना. चरफडत मी परत पळायला सुरवात केली. पळण्याचा जोर काही जास्त वेळ टिकला नाही. सराव करताना साडेसात मैलापेक्षा जास्त अंतर मी कधीच पूर्ण केलं नव्हतं, त्यामुळे तेवढं अंतर पळाल्यावर त्या पुढे आपलं शरीर कसं "रिअ‍ॅक्ट" करेल ह्याची काहिच कल्पना नव्हती. नऊ मैल होत आले होते. पळताना आता मला आपले खांदे दुखतायत असं जाणवायला लागलं. पळताना आपण आपले हात अगदीच मोकळे न सोडता कोपरांमध्ये दुमडून आपआपल्या सवयीनुसार ते एका लयीत हलवत असतो. थोडक्यात हात खांद्यंचे स्नायु आणि दंडांमुळे (बायसेप्स) आपण वर तरंगत ठेवलेले असतात आणि खुप वेळ पळाल्यावर नुसते हात वर तरंगत ठेवुन सुद्धा खांदे आणि दंड दुखायला लागतात. छाती पण पुष्कळ भरुन आली होती. हे सगळं मला नविन होतं.

दहा मैलाचा दगड येऊस्तोवर माझे प्राण पार कंठाशी आले. दहा मैलाच्या दगडापाशी मी पोहोचलो तेव्हा तिथलं घड्याळ दोन तास बारा मिनीट दाखवत होतं (रेस सुरु होऊन झालेला वेळ). थोडं हायसं वाटलं. आता मात्र बरेच लोकं माझ्या बरोबरच धावताना, चालताना दिसत होते. जरा एक मिनीट थांबावं असं सारखं वाटत होतं. मी आता जमेल तसं पळत होतो आणि धाप लागली की चालत होतो. रेसचा शेवटचा टप्पा असल्यामुळे रस्त्याच्या आजुबाजुला पण लोक गर्दी करुन उभे होते. ड्रिंक्स स्टॉप पाशी गेटरेड च्या कपांचा अक्षरशः खच पडला होता. त्या कपांवर आणि रस्त्यावर गेटरेड सांडल्यामुळे पाय घसरत होते. मी जरा जपूनच चालत एक कप गेटरेड घेऊन प्यायलो. पुढे एक मोठ्ठा कप पाणी सरळ डोक्यावर ओतून घेतलं. जरा तरतरी आल्यामुळे चालण्यापेक्षा पळण्याकरता मी जरा पावलं झपाट्यानी उचलली आणि काही कळायच्या आत माझ्या डोळ्यांसमोर सगळं गरकन फिरलं. मी जरा थबकलोच. जागेवर उभा राहून मी डोळे मिटून मान वर केली तर आणखीनच गरगरायला लागलं. आपण पडतो की काय असं वाटलं म्हणुन मी पटकन डोळे उघडून पायातलं अंतर वाढवुन जरा त्यातुन सावरायचा प्रयत्न केला. गरगरायचं थांबलं. ह्या मॅरॅथॉनरुपी कोंढाण्याचं लगीन लावता लावता मी धारातीर्थी पडणार की काय असं एकदा वाटून गेलं.

मी आपलं परत हळूहळू चालायला सुरवात केली. समोर बोर्डवॉक दिसत होता म्हणजे आता फक्त दीड मैल उरला होता. इथे पोलिस, अँब्युलन्स वगैरेंची पुष्कळ गर्दी होती. काही लोकांना स्ट्रेचर वर घेऊन जाण्यात येत होतं. एक चिनी बाई तर मोठ्यानी ओरडत होती, पायात गोळा आला असावा कदाचित. काही लोकं बोर्ड वॉक च्या शेजारी असलेल्या मातीतच आडवे पडले होते डिहायड्रेशन झाल्यामुळे. फिनीश लाइनच्या इतक्या जवळ येऊन असं काही होणं म्हणजे जरा तापदायकच होतं. मी डोकवू पाहणार्‍या भलभलत्या विचारांना "हुडूत हुडूत" करत जमेल तसं पळत होतो.

आता साधारण एक मैल राहिला होता, समोर लांब पांढरी कमान दिसत होती. म्हंटलं "बुवा, This is it". मी पळायचा वेग आणखीन वाढवला. आता मात्र पळताना दोन्ही गुढग्यांमधून सूक्ष्म कळ येत होती,छाती प्रचंड भरुन आली होती. कशाची पर्वा न करता मी वेग वाढवला. आजुबाजुचं काहीच दिसत नव्हतं , दिसत होती फक्त ती पांढरी कमान. मागच्या अर्ध्या मैलात मी किमान ५० जणांना तरी मागे टाकलं होतं, सगळी शक्ती एकवटून मी बुंगाट पळत होतो. पांढरी कमान आता खुपच जवळ आली होती, त्याच्यावरची काळी अक्षरं आता स्पष्ट दिसायला लागली होती "Finish Loop". फिनीश लूप? म्हणजे ही फिनीश लाइन नाही?....... शप्पत सांगतो माझ्या डोक्यात "कशी नशिबानं थट्टा आज मांडली.." हे गाणच वाजायला लागलं. हाफ मॅरॅथॉन १३.१ मैलाची होती आणि शेवटाचा ०.१ मैल हा फिनीश लूप असतो. एरवी असतो ते ठीक होतं पण आज तो फिनीश लूप का आहे असं काहीसं वेड्यासारखं बडबडत , व्यावस्थापकांच्या सात पिढ्यांचाउद्धार करत मी पांढरी कमान ओलांडली. आता पुढे अजून एक कमान दिसत होती. हा ०.१ मैल आहे? अबाबाबाबा..... चुकीच्या कमानी आधीच अ‍ॅक्सलरेटर वर पाय दिल्याने माझ्या ताकदीचे मिटर -५० चा आकडा दाखवत होतं अन त्यामुळे तो ०.१ मैल मला एक मैलाहून लांब वाटत होता. आपण ह्या वेगानीच जर पळत राहिलो तर कदाचित ती फिनिश लाइन यायच्या आधीच कोसळू अशी भिती मला वाटायला लागली होती.

अगदी जीव खाऊन मी पळत सुटलो. कपाळावरुन घामाच्या धारा वाहत होत्या, वाहता वाहता घाम माझ्या डोळ्यात जाऊन मला समोरचे नीट दिसत पण नव्हतं. डोक्यावरची टोपी कानपट्टीवर घट्ट बसली होती, अन मिनीटाला १५० च्या वर पडत असलेल्या ह्रुदयाच्या ठोक्यानी माझ्या कानपट्टी खालीची शीर थाड थाड ऊडत होती. "Steady buvaaaaa! steady! Don't you die on me now" एक .... दोन ...... तीssssssन......... मी कमान ओलांडली...........

गुलमोहर: 

तसा हा भाऊ त्याच्या स्वतःच्या मांड्याना थोबाडीत (किंवा मांडीत) मारत होता, वॉर्म अप म्हणुन! वरुन मारताना तोंडानी प्रत्येक झापडीला "हुं" असा हुंकार देत तो एकदम हुं हुं हुं हुं (४ झापडा) करत एकएका मांडीचा समाचार घेत होता >>>

Rofl त्या कद्रुला मसल वेक अप व्हायला पाहिजेत असे कोणीतरी सांगीतले अन तो वेकअप करत होता !

बुवा तुमच्या तयारीचे व्रुत्तांत पार्ल्यात रोज वाचत होते. वैयक्तिक द्रुष्ट्या हा एक मोठा माइल स्टोन आहे. किती त्रास झाला असेल पळताना. पण पार केलेत अगदी जिद्द आहे. आता तड्क कुठल्यातरी स्पामध्ये आरामाची रिजुविनेशन ची अपॉईंट्मेन्ट घ्या यू रीअली डीझर्व इट. कोणते शूज वापरलेत? पुढील फिट्नेस उपक्रमांसाठी शुभेच्छा. अगली बार फुल मॅरेथॉन. Happy

बुवा मस्त लिहिलंय.
पळतांना जो काही स्ट्रगल आपण आपल्याशीच करत असतो ना तो फार मजेशीर असतो. पळतांना एनर्जी लेव्हल राखण्यासाठी मी जो काही विचार करतो किंवा स्वतःशीच जे काही बडबडतो तो अविर्भाव मी हजार प्रयत्न करूनसुद्धा दिवसभरात इतरवेळी आणू शकत नाही. आणि एवढे सग़ळे केल्यानंतर फिनिशलाईनला काय भावना असतात ते मला चांगलं माहितीये.
स्वत:चं कौतुक वगैरे वाटायच्या आधी 'च्यायला हे काही तेवढं अवघड नव्हतं बरका, आपण उगीचच.... वगैरे' असं एकदा वाटून जातं.
पुन्हा घरी ड्राईव करतांना काय सही वाटत असेल.

अभिनंदन बुवा. great accomplishment! a job well done. पुढची फुल मॅरेथॉन पळा आता.

खूप मस्त लिहिलंय. खरंच सराव चालू केल्यानंतरचा तो सगळा प्रवास उभा राहिला डोळ्यांपुढे.
Success is a journey, not a destination हे पटलं परत एकदा Happy

धन्यवाद रे सगळ्यांना! Happy
मामी, एकदा सहज म्हणुन चौकशी केली होती मसाज वगैरे ची २०० डॉ का असच काहितरी म्हंटले. मी बापडा गपचुप दुसर्‍या दिवशी कामावर हजर. सराव झाला होता बर्‍यापैकी त्यामुळे खरच काही दुखलं वगैरे नाही आजिबात.
चमन, कुठली ही सवय वाईटच मग ती पळण्याची का असेना. एकदा पळायला सुरवात केली की खरच अ‍ॅडिकशन होतं. उतार वयात गुढघ्यांनी काही काम काढु नये आणि मुख्य म्हणजे चालणे फिरणे बंद होऊ नये म्हणुन अगदी कटाक्षानी मी जास्त पळणं टाळतो. आत दर वर्षी भाग घेणार, हाफ मधेच पण वेळ सुधारायला बघणार. दोन तासा पेक्षा कमी चं टारगेट! बघु आता जमतय का.
मॅरॅथॉन आधी आणि नंतर एकंदरित पार्ले, बारा वर फारच धमाल आली. पबलीक तिथे येऊन विचारपुस करत होतं अगदी, फार भारी वाटायचं. मायबोली आणि त्यातल्या त्यात पार्ले-बारा रॉक्स!!!
सगळ्यांचे परत मनःपुर्वक आभार! Happy

छानच लिहिलं आहेस रे. अगदी मॅरथॉन उभी केलीस डोळ्यासमोर. तुझ्या चिकाटिला सलाम. मी दरवर्षी March of Dimes walk करते. पूर्वी सात मैल असायचा. शेवटचा ०.१ मैल काय म्हणतोस ते अगदी छान समजल.

लोकं महिनोंमहिने तयारी करत असतात मॅरथॉनसाठी. तू फारच पटकन तयार झालास. कौतुक वाटल. आता पूर्ण मॅरथॉनसाठी शुभेच्छा!

तुझ्या त्या मॅरथॉन कॅप आणि मेडलचा फोटो टाक न.

अभिनंदन बुवा वन्स अगेन,
सही लिहीलय , तरी म्हंटल बुवाला एवढा वेळ का लागतोय वर्णन लिहायला , पण बर झालं , थोडं उशीरा लिहिलसं पण मस्त लिहिलसं ! Happy

Pages