युरोपिअन भेदभाव

Submitted by पारिजात on 22 April, 2010 - 17:39

ह्या घटनेकडे केवळ एक अपवादात्मक घटना म्हणून बघायचे किंवा परदेशातील वस्तुस्थिती? मला सत्य माहित नाही. पण हि घटना ऐकून फार अस्वस्थ व्हायला झाला म्हणून तुमच्या समोर "मांडत" आहे. युरोपातील आमच्या (भारतीय) परिचितांच्या "office" मध्ये घडलेली घटना...

परिचितांचा एक मित्र भारतातून नुकताच आलेला असल्यामुळे अजून त्याला परदेशातील खाद्य संस्कृती पचनी पडली न्हवती. त्यामुळे तो घरून डब्बा घेऊन जात असे. आपली खाद्य संस्कृती वेगळी आणि युरोपातील खाद्य संस्कृती यात "जमीन- अस्मानाचा" फरक आहे. आपल्या भाज्या मसालेदार असतात. आणि भाजीच्या सुगंधानेच आपले आत्मे तृप्त होतात. पण त्याच गोष्टी येथील लोकांना सहन होत नाहीत. दुपारी जेवायच्या वेळेला सगळ्यांसाठी असलेल्या "कॅफेटेरिया" तो जेवायला जात असे. थोडे दिवसांनी त्याच्या "office" मधील काही लोकांनी त्याच्या "डब्बा" आणण्यावर आक्षेप घेतला. "तू किती मसालेदार खातोस, तुझ्या अंगातून मसाल्याचाच वास येईल" असे म्हणत "तुझ्या डब्ब्याचा वास आम्हाला सहन होत नाही त्यामुळे तू इथे डब्बा खात जाऊ नकोस" असे सांगितले. आणि ह्या सगळ्या प्रकारावर त्याच्या "boss" ने तुला "वेगळी कॅबीन देतो, तू तिथे बसून डब्बा खात जा", असा उपाय सुचवला. त्या दिवसानंतर तो आता "office“ मध्ये जेवायला थांबत नाही.

मला जेव्हा हा किस्सा कळला तेव्हा प्रचंड राग आला. स्वतःला पुढारलेले आणि जगाच्या "स्वातंत्राचे" रक्षणकर्ते म्हणवणाऱ्या तथाकथित पुढारलेल्या देशातील लोकांना इतराच्या खाद्य संस्कृती चा आदर करता येऊ नये ह्या इतकी लाजिरवाणी बाब काय असू शकते?

मागे एकदा "सकाळ" मध्ये अशाच आशयाचा लेख छापुन आला होता..त्यात आपण परदेशात "dirty asians" म्हणून हिणवले जातो असा उल्लेख होता. आणि असे टाळण्यासाठी भारतीय गृहिनेने "कोरडे खाद्य पदार्थ" द्यावेत असेही सांगितले होते. पण मला वाटते कि या "पुढारलेल्या " देशातील लोकांनी इतर लोकांच्या संस्कृतीचा आदर करणे शिकावे. कारण जर आपण "dirty“ आहोत तर "अळ्या, डुक्कर, कुत्रे" यासारख्या दिसेल त्या प्राण्याचे मांस खाणारे, हे लोक कसे काय शुद्ध? आस्ट्रेलिया मध्ये "वर्ण भेदातून" भारतीयांवर हल्याच्या घटना होत आहेतच. पण अशा प्रकारे मानसिक हल्ला करून इतरांचे "खच्चीकरण" करण्याचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे.

तुम्हाला काय वाटते? अशा गोष्टी आपण कशा थांबवू शकतो? तुम्हाला असे अनुभव आले का किंवा ऐकले का?

गुलमोहर: 

तसं बरेचशे युरोपीयन स्वतःला नेहमीच अतिशहाणे समजतात . अशा लोकाची उतरवायची असेल तर त्यांच्या खाण्यात काय काय भरलयं, डुकरं कुठे, कशी लोळतात, हे थोडं तिखट मीठ लावुन सांगा , परत तुमच्या वाटेला जाणार नाहीत ते . Proud
पण फक्त त्यांना बोलुन काय उपयोग , भारतातच बघाना नॉनव्हेज न खाणारा व्यक्ती नॉनव्हेज खाणार्‍या व्यक्तीला नावं ठेवतो . आपणही पाश्चात्यांच्या जेवणाला ( Pork , Beef ) ला नावं ठेवतोच ना ?
आणि तसही जास्त मसालेदार पदार्थ खाणं शरिरासाठी अपायकारकचं आहे.

भारतीय पदार्थांना मसाल्याचा प्रचंड वास असतो हे सत्य आहे. युरोपमधे कुठे घडले हे यावर खुप अवलंबून आहे. इंग्लंड, जर्मनीमधे हे घडणे शक्य नाही कारण त्यांना भारतीय पदार्थ माहिती असतात. आणि बंद ऑफिसमधे मायक्रोवेवमधे जर मसालेदार पदार्थ गरम केले तर अगदी सगळीकडे दरवळ पसरतो जो सगळ्यांनाच आवडतो असे नाही. त्यामुळे आपणही थोडे अ‍ॅडजस्ट करावेच लागते.

<< बंद ऑफिसमधे मायक्रोवेवमधे जर मसालेदार पदार्थ गरम केले तर अगदी सगळीकडे दरवळ पसरतो जो सगळ्यांनाच आवडतो असे नाही. >> अगदी अगदी . आमच्या ऑफिसमधले चायनीज लोक असे काही पदार्थ गरम करायचे की सगळ्या कॅफेटेरिया मधे भयानक वास सुटायचा ( अर्थात कदाचित फक्त आम्हा काही (शाकाहारी ) देशींनाच भयानक वाटत असेल )

ऑस्ट्रेलियातील हल्ले १००% वांशिक नाहीत. आपल्या लोकांचीही काही प्रमाणात चुक आहे हेही लक्शात घेतले पाहीजे. आपल्याच देशात नाही का येवढ्या मोठ्या प्रमाणावर वांशिक भेदभाव चालत? मिनोतीला अनुमोदन.

मृदुला चायनीज लोकांच्या जेवणाचा वास फक्त तुमच्या सारख्या शाकाहारीच नाही तर आमच्या सारख्या मांसाहारींच्या पण नाकातुन पार डोक्यात जातो . Proud
मध्ये १ महिन्यासाठी १ चिनी आमच्या हापीसात आला होता , त्याने सगळ्यांच्या नाकातले केसं पार जाळुन टाकले Proud

इतरांच्या जेवणाचा / पदार्थांचा त्रास होणे खुप विशेष गोष्ट नाही. आपल्याकडे पण यथेच्छ लसुन, कांदा खाल्ल्यावर तोंड व्यावस्थित स्वच्छ न केल्यास वास येतो.

या बाजुला कडाक्याच्या हिवाळ्यात खिडक्या-दरवाजे बाहेरचा वाराही फिरकणार नाही असे बंद असतात. स्वयंपाक केल्यावर आपल्या जॅकेट, कपड्यांना वास येतो.

ऑफिस मधल्या चायनीज लोकांपासुन त्यांचे जेवण झाल्यावर मी दुर रहाणे पसंत करतो... सर्व व्यावहार सकाळी अथवा e-mail.

मिनोतीला अनुमोदन. इथल्या अमेरिकेतल्या बंद अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या कॉरिडॉरमध्ये साधी डाळ कुकरला शिजवल्याचा इतका उग्र दर्प यायचा जो मी रोजच्या जेवणात तेच खाणारी असूनही मला असह्य व्हायचा. मायक्रोवेव्हमध्ये काही काही पदार्थ गरम केल्यास अतिशय 'अनप्लेझंट' म्हणावा असा गंध येऊ शकतो. इथे प्रश्न वांशिकतेपेक्षा जास्त मेजॉरिटीचा विचार करण्याचा आहे असं मला वाटतं. उद्या त्याच ऑफिसमध्ये एकाऐवजी वीस भारतीय काम करु लागले तर परिस्थिती बदलेल. माझ्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये अनेक भारतीय आहेत. ते अगदी आरामात पाहिजे ते पदार्थ डब्यात आणतात. त्यांच्या इतर वांशिक कलीग्जना त्याची सवय झाली आहे. पण त्यांच्यातही फिशकरी डब्यात आणलेल्या भारतीयाने दुसर्‍या शाकाहारी भारतीयाला वासाचा त्रास होऊ नये म्हणून आधी डबा गरम करु दिल्याची उदाहरणे मी ऐकली आहेत.

एक उदाहरण गम्मत म्हणुन देतेय. आम्ही घरे बघत होतो तेव्हा एका घरात इतका मसाल्याचा वास भरुन रहिला होता की मलाच ते घर अगदी छान असुनही घ्यावे वाटले नाही. हे आपलेआपले असताना इतका त्रास होतो तर ज्यांना सवय नाही अशांकडून काय अपेक्षा करायच्या.

>>हे आपलेआपले असताना इतका त्रास होतो तर ज्यांना सवय नाही अशांकडून काय अपेक्षा करायच्या.
अगदी अगदी मिनोती Happy सहमत आहे मी पण!

मी सुद्धा सहमत. ऑफिसमधे रोजच्या रोज उग्र वास जेवायच्या वेळी येत राहिला आणि तो सहन झाला नाही म्हणून असं सुचवलं त्यात खाद्यसंस्कृतीचा अनादर, वांशिक भेदभाव, लाजिरवाणा प्रकार असं काय आहे इतक? युरोपियनांचं जाऊ दे, काही विशिष्ट पद्धतीने बनवलेल्या भारतीय मसालेदार पदार्थांचा वास, साऊथैंडियन टॅन्गी करी मसाल्यांचा, त्यांच्या डब्यातल्या त्या दहीचटण्या आणि केळ्यांचा वास मलाही सहन होत नाही. रोजच्या रोज तो येत राहिला तर सांगायला नको? युरोप कशाला, मुंबईतल्या ऑफिसातही सांगायचो आम्ही. ( मासे तळणारे शेजारी असले की ते न खाणार्‍यांना कसा त्रास असतो आणि ते तो कसा रोजच्यारोज व्यक्त करतात त्याची दृष्य मुंबईच्या सोसायट्यांमधल्या मजल्यांवर जाऊन कधी पाहिली नाहीत का? त्यात नाही का होत दुसर्‍याच्या खाद्यसंस्कृतीचा अनादर? Proud

लन्चटाईम मॅनर्स आणि एटिकेट्स असाही एक प्रकार असतो. तो खरतर स्वतःहून पाळायला हवा. सुरुवातीला नाही कळलं तर काही दिवसांनी निरिक्षणानंतर तरी कळायला हवं. म्हणजे मग ऑफिसातल्या कलिग्जवर असं स्वतःहून सांगायची वेळच येणार नाही.

मला ऑस्ट्रेलियात असूनही हापिसात भारतीय पदार्थ प्रचंड आवडणारे काही सहकारी लाभलेत. समोसे/करी आणली की अगदी तुटून पडतात. गरम केले की माझ्या क्यूबिकलपर्यंत "काय आणलंय आज" म्हणत येतात. पण सगळ्यांनाच हे वास आवडत नाहीत.

वरच्या पोस्टशी सहमत. काही जेवणांचा प्रचंड वास येतो.

वरच्या पोस्टशी सहमत. काही जेवणांचा प्रचंड वास येतो. माझा ऑफीसमधला कलीग वर्किंग टेबलावरच मचक मचक खात बसला कि मी पळुण जातो बाहेर्....अन त्याचा अन त्याच्या खाद्य अन वाद्य संस्कृतीचा प्रचंद अनादर होतो! Happy

गंमत वाटली हे सगळे वाचुन..

इथे मुंबईत माझ्या ऑफिसात एक बाई डब्ब्यात असे काही वासवाले आणायची की शेवटी आम्ही तिला सांगितले की बाई, आमच्याबरोबर नको बसुस, आम्हाला जात नाही जेवण...

ट्युलिपशी सहमत.

आम्ही भारतात, मुंबईत राहतो. आमच्या ऑफिसात मांसाहारी पदार्थ डब्यातून आणायला बंदी आहे. तरीही काही लोक आणतात, पण मग तो डबा त्यांना कॅफेटेरियातल्या मायक्रोवेवमध्ये गरम करू दिला जात नाही. इथला हाऊसकिपिंग आणि सिक्युरिटी स्टाफ ह्याबाबतीत खुपच स्ट्रिक्ट आहे Happy

सहमत ट्युलिप,

माझ्या हपिसात ऑडिटिन्ग चालू होते तेव्हा तो क्लार्क व तेलंगणा मुलगी काहीतरी डब्यात आणत त्याचा सडका वास येत असे व त्या मुलीचा बॉडी ओडर लै ब्याकार खोलीत भरून राहत असे. दहा दिवस सहन केले.

पण मग तो डबा त्यांना कॅफेटेरियातल्या मायक्रोवेवमध्ये गरम करू दिला जात नाही.

मावेच्या दरवाजावर तशी स्पष्ट सुचनाच लिहिली - नो नॉनवेज Happy

युरोप कशाला, मुंबईतल्या ऑफिसातही सांगायचो आम्ही.>> हो, मी जय टॉवरला असताना डब्यातून (ज्याचा इतरांना वास येइल असे) नॉन व्हेज आणायचे नाही असे अ‍ॅडमिनकडून मेल आलेले होते. ऑफिसमधे पेण पनवेल मधले बरेचसे आगरी कोळी लोक होते.. ते रोज सुके बोंबील व इतर मासेच आणायचे. त्याचा बर्‍याच लोकाना त्रास व्हायचा.

इथे खाद्यसंस्कृतीबद्दल अनादर वगैरे पेक्षा दुसर्‍याच्या मताला आदर देणेदेखील लक्षात घ्यायला हवेच ना... वरील प्रसंगात तर बॉसने उलट समजूतदारपणा दाखवून जेवणासाठी वेगळी रूम देखील दिली होतीच की.. म्हणजे त्याने तरी कसला अनादर वा अपमान केला नाही.

श्री, मृदुला, वत्सला, उदय, अगो, मंजिरी, ट्युलिप, भाग्यश्री, चंपक, साधना, मंजूडी, अश्विनिमामी, नंदिनी प्रतीक्रीयाबद्दल धन्यवाद. तुम्हा सगळ्याच्या प्रतीक्रीयामुळे या घटनेकडे मला नव्या पद्धतीने बघता आले. @ मिनोती, हा प्रकार "जर्मनी" मधेच घडला आहे. पण इथल्या काही लोकांना भारतीय जेवण फार आवडते ह्याचा मलाही अनुभव आलाय. मी ज्या "office" मध्ये इंटर्नशिप करत होते तिथल्या boss ला जेव्हा कळले कि मी शाकाहारी आहे, तेव्हा मला व इतर जर्मन सहकाऱ्यांना "भारतीय शाकाहारी" जेवण करायला घेऊन गेले. आणि त्यांनी माझ्यापेक्षा आनंदाने "ताव" मारत ते जेवण संपवले. Happy

अग न्युजवीक मधील प्रतिक्रीया वाचल्या ना तर कळते त्यांना खरेच एशिअन/ आफ्रिकन लोकांशी अड्जस्ट करत येत नाही. मला ही पहिले खूप राग आलेला पण मग वाट्ले त्यांचाही एक द्रुष्टिकोण असू शकतो. जो मला समजला नसेल. पण मॅनर्स ला चोख असतात ते.

>> ऑफिसमधे रोजच्या रोज उग्र वास जेवायच्या वेळी येत राहिला आणि तो सहन झाला नाही म्हणून असं सुचवलं त्यात खाद्यसंस्कृतीचा अनादर, वांशिक भेदभाव, लाजिरवाणा प्रकार असं काय आहे इतक?
अनुमोदन!
>> स्वतःला पुढारलेले आणि जगाच्या "स्वातंत्राचे" रक्षणकर्ते
याचा इथे काहिच संबंध नाही. बाकिच्या लोकांना त्रास होत असेल तर बॉसनी उपाय पण सुचवलाच ना...
आता हेच बघा, एखादा युरोपिअन भारतात आला, इथे कँटिनमधे भारतिय कलिग बरोबर तो युरोपिअन जेवणाचा डबा उघडुन बसला तर किती भारतिय याबरोबर जेवण करु शकतिल?
[युरोपिअन पदार्थ म्हणजे पिझ्झा/बर्गर नाहीत... माझ्या फ्रेंच कँटिनमधे मिळणारे पक्के युरोपिअन पदार्थ म्हणजे कच्चे बीफ / आख्खा उकडलेला झिंगा / आख्खा उकडलेला मासा-तोंड आणि खवल्यांसकट / गोगलगाई वै वै वै]

या घटनेवरुन लगेच "युरोपिअन भेदभावाचा" नि:ष्कर्ष काढू नये
आमच्यात कुणी मुळ्याची भाजी/कोशिम्बीर आणली तरी बाकी लोक त्या मुळ्याच्या पादर्‍या वासाने हैराण होतात, तर युरोपिअनान्चे काय होत असेल? Proud
तेव्हा चार लोकात चार लोकान्सारखेच रहावे हे उत्तम!
अन्यथा वेगळेपण जपायचेच असेल, तर त्यामागुन येणारे भलेबुरे परिणाम कसल्याही तक्रारी न करता सहन करता आल्याच पाहिजेत!