सोहळा...... एका जीवनाचा (भाग ३)

Submitted by अ. अ. जोशी on 22 April, 2010 - 15:07

( एके दिवशी उत्तररात्री कसल्यातरी आवाजाने अचानक आप्पा जागा झाला. नेहमीप्रमाणे बाहेर ओसरीतच वडीलांबरोबर झोपला होता. शेजारी वडील दिसले नाहीत. आत दिवा मात्र दिसला. इतक्यात उजाडण्याची वेळ झालीसुद्धा? एवढ्यात आप्पाला घराच्या दिशेने काही लोक येताना दिसले. त्यात बायकाही होत्या इतकेच त्यांच्याकडील कंदिलाच्या उजेडात कळू शकले. )

दचकून आप्पाने अंदाज घेतला. घरातून बारीकसा रडण्याचा आवाज येत होता. आप्पा चटकन उभा झाला. काहीतरी विचित्र झाले आहे असे त्याला कळले. तोपर्यंत कंदिल घेतलेले लोक घराजवळ आले. बायका आत गेल्या. त्यांच्याबरोबरचे दोन पुरूष बाहेरच थांबले. आप्पाच्या पाठीवरून हात फिरवू लागले. इतक्यात हनुमंतराव डोळे पुसत बाहेर आले. आप्पाच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला आणि इतकेच म्हणाले "आप्पा, तुझी आजी गेली रे !" हनुमंतरावांचा त्यावेळचा झालेला स्पर्श आप्पाला फार वेगळा आणि गूढ वाटला. "कुठे?" असा प्रश्न चटकन आप्पाच्या मनात आला. पण अर्धवट झोपेतून जागा झालेला असला तरी काही सेकंदातच आप्पा बरेच काही समजून चुकला होता. हनुमंतरावांचे शब्द समजल्यावर कोणाला कळण्याच्या आतच तो माईंच्या खोलीत पोचला होता. आप्पाचे विस्फारलेले डोळे माईंकडे बघतच राहिले. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. एखाद्या लाकडी पुतळ्याप्रमाणे आप्पा स्थिर उभा होता. आप्पाच्या आयुष्यात प्रथमच आलेला हा प्रसंग प्रथमच त्याला निरूत्तर करून गेला होता. आप्पाची ही स्थिती पाहून आईने त्याला जवळ घेतले. अशा पद्धतीने रडणारी आई आप्पाने कधीच पाहिली नव्हती. आप्पा त्यावेळी 11 वर्षांचा असेल. सुमी आईजवळच होती. बंडा अर्धवट मांडी घालून पलिकडे बसला होता. झोप पूर्ण न झाल्याने पेंगतही होता. नऊ वर्षांचा तात्या मात्र जागा होता. आप्पा आणि तात्या दोघेही अजिबात हालचाल न करणार्‍या माईंकडे पहात होते. आप्पा हळूच तात्याच्या शेजारी जाऊन बसला. याक्षणी लहान असला तरी त्याचाच आधार आप्पाला वाटला. आजपर्यंत कोणत्याही मयतीला न गेल्याने दोघेही स्तब्ध झाले होते. मात्र मृत्यू म्हणजे काय याची दोघांनाही थोडी जाणीव होती. इतर बायका आईचे सांत्वन करीत होत्या, रडत होत्या, विचारपूस करीत होत्या. कालपर्यंत आपल्याशी बोलणारी माईआजी अचानक अशी कशी झाली. एकदा तिला हलवून पहावे असाही विचार आप्पाच्या मनात आला. मात्र, इतक्यात आप्पाच्या शेजारी सखुताई आल्या. त्याच्या आणि तात्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणाल्या "तुमची आजी देवाघरी गेली. किती चांगली होती." आप्पाच्या डोक्यात ही गोष्ट शिरली नाही. आप्पा विचार करू लागला. आपली आजी उठत नाही. मग इतके सगळे का रडत आहेत? आपली आजी उठत नाही. सगळेच म्हणताहेत आपली आजी देवाघरी गेली. आपली आजी मरण पावली आहे...... या शेवटच्या विचाराने आप्पाला घटनेची खरी जाणीव झाली. ही जाणीव झाल्यावर आप्पाचा चेहरा पार उतरला. त्याच्या नाकावाटे श्वासांची वाढत जाणारी पुनरावृत्ती सखुताईंच्या लक्षात आली. त्यांनी लगेचच आप्पाला जवळ घेतले. इतकावेळ असणार्‍या असमंजसपणाचे समंजसपणात रूपांतर होऊन आप्पाच्या विस्फारलेल्या डोळ्यातून पहिला अश्रू आला आणि पुढे येतच राहिले. आप्पाची स्थिती पाहून तात्याही कावराबावरा झाला. बंडा अजूनही पेंगतच होता. सुमी झोपेतच होती.

जमलेल्या लोकांमधून आप्पाला एवढेच कळले की 'माई झोपल्या तेंव्हाच त्यांना बरे वाटत नव्हते. आईने 12 वाजता माईंना झोप येत नाही का? असे विचारलेही होते. त्यावर "होतं असं म्हातारपणी" असे म्हणत त्यांनी आईलाच झोपायला सांगितले होते. 3 वाजता अचानक माईंना उचकी लागल्यासारखे झाले. त्या कशातरीच करू लागल्या. डोळे फिरवू लागल्या. आई हनुमंतरावांना उठवायला गेली. हनुमंतराव आले तोवर जवळजवळ सर्व संपले होते. त्यांनी माईंचा हात हातात घेतला आणि माईंनी प्राण सोडले. माई गेल्या आहेत हे कळायलासुद्धा आई आणि हनुमंतरावांना काही सेकंद गेली होती. माईंच्या उघड्या डोळ्यांना अलगद मिटवून स्वत:च्या डोळ्यातून अश्रू ढाळण्यापलिकडे आता काहीच उरले नव्हते. या गडबडीत तात्या जागा झाला होता. आप्पा बाहेर असल्याने त्याला तेंव्हा काहीच कळले नव्हते. हनुमंतराव बातमी द्यायला शेजारी जाऊनही आले. पण आप्पा जागा झाला नव्हता. आत तीन-चार महिला जमल्यानंतर आप्पा जागा झाला होता.'

हळूहळू लोक जमायला लागले. नातेवाईक येऊन धाय मोकलून रडत होते. हा सर्व प्रकार आप्पाच्या आता पूर्णपणे लक्षात आला होता. माई आता पुन्हा कधीही बोलणार नाहीत याची जाणीव आप्पाला झाली होती. जमलेल्या लोकांनी साहित्य आणले. ताटीची तयारी पूर्ण झाली. इतरही सोपस्कार झाले. आता माईंना न्यायचे. तसे रिवाजानुसार हनुमंतरावांना विचारताच महिला पुन्हा ओक्साबोक्षी रडू लागल्या. माईंना उचलून ताटीवर बांधू लागले. बांधणारे अनुभवी तसेच तरबेज असल्याने सर्वप्रकारची काळजी घेत होते. ताटी बांधणार्‍यापैकी एकाला दोरी थोडी सैल वाटली तशी त्याने ती जोरात ओढून माईंच्या अंगावरून घट्ट करून घेतली. त्याचक्षणी "हळू..." असा श्वास रोखलेला अस्फुट आवाज आप्पाच्या तोंडून निघाला. परिस्थितीची जाणीव झाल्यावर 'हळू' म्हणताना पुढे गेलेला हात आप्पाने कोणालाही कळणार नाही असा मागे घेतला. ताटी बांधून झाली. आप्पाचे श्वासांचे प्रमाण वाढले होते. डोळ्यातील अश्रू कधी नव्हे ते मोकळे झाले होते. आप्पा घरात सर्वात मोठा म्हणूनच वाढला होता. 5 वर्षांचा असेपर्यंतच हवे तेंव्हा रडू शकत होता. त्यानंतर "आप्पा बघ कसा शांत बसला आहे." असे रडणार्‍या इतर लहान भावंडांना सतत आप्पाचेच उदाहरण दिल्याने, आप्पा रडू आले तरी रडू शकत नव्हता. सुमी झाल्यानंतर तर आप्पा कधी रडलाच नव्हता. पडला, लागलं तरी "आई गंss" सुद्धा मनातल्या मनातच. मात्र आत्ताची परिस्थिती वेगळी होती. आप्पा रडणे थांबवू शकत नव्हता. तरीही संयम ठेवण्याचा प्रयत्न करीत होता.

एव्हाना सुमीला पूर्ण जागे केले होते. उजाडतही होते. सर्वांचे अखेरचे दर्शन झाले. मोठ्याने रडणार्‍या महिला आता फक्त मुसमुसून रडत होत्या. आप्पाही थोडा शांत झाला होता. आता माईंना उचलायचे. तशा महिला पुन्हा मोठ्याने रडू लागल्या. माईंना उचलून ताटी पुढे जाऊ लागली. आप्पाबरोबर त्याच्या वयाचे कोणीही नव्हते. आप्पाला नेण्याचा निर्णय हनुमंतरावांचाच होता. रडत रडत महिलाही काही अंतर आल्या. त्यानंतर रडणे नाही. ताटी उचललेले लोक खांदे बदलत चालू लागले. सूर्य उगवतीला आलेला. पक्ष्यांचा आत्तापर्यंत न ऐकू आलेला किलबिलाट आता आप्पाला ऐकू येत होता. त्याचबरोबर ऐकू येत होते फक्त "श्रीराम जय राम जय जय राम". बस्स. अत्यंत गंभीर आवाजातला हा मंत्र आप्पाच्या मनावर क्षणोक्षणी परीणाम करीत होता. नेहमी माई करायच्या तो 'श्रीराम जय राम'चा जप आणि आत्ताच्या वातावरणातील 'श्रीराम जय राम' यातील टोकाचा फरक आप्पालाही गंभीर करीत होता. सर्वांबरोबर आप्पा चालत होता. मात्र असून नसल्यासारखा. माईंना नेमके कुठे घेऊन चालले आहेत हे आप्पाला थोडे माहीत होते. मात्र तेथे काय करणार आहेत याची कल्पना नसलेला आप्पा स्वत:ही "श्रीराम जय राम जय जय राम" असे म्हणू लागला होता. खांदा देणारा प्रत्येकजण किती काळजीने माईंना नेतो आहे इतकेच आप्पा बघत होता. सर्व स्मशानी पोचले.

तीन गावचे मिळून एकच स्मशान. बाकी दोन गावे फारच लहान आकाराची असल्याने तिरगावलाच यायचे. स्मशानी पोहोचल्यावर काहींची लगबग सुरू झाली. तेथे बांधलेली ताटी सोडल्यावर आप्पाला फार बरे वाटले. किरवंत आला. त्याने सर्वत्र नजर फिरवली. हनुमंतरावांना बोलावले. नाव वगैरे विचारून घेतले. त्यानंतर होणार्‍या विधींचे कोणतेच भान नसलेला आप्पा मूकपणे ते पाहत होता. मधुनच कोणी काही सांगितले तर करीत होता. इतक्या लहान वयात आप्पा तिथे असणे काहींना रुचले नव्हते, तर काहींना तो आप्पाच्या मानसिक तयारीचा भाग वाटत होता. एक एक गोष्ट आप्पाला विचार करायला लावत होती. एरवी नदी किनारी खेळायला येणारा आप्पा आज वेगळाच अनुभव घेत होता. अशी एखादी घटना घडली की मुलांना घराच्या आसपासच थांबायची ताकीद असायची. त्यामुळे असे काही आप्पाने कधी पहिलेच नव्हते. नदी म्हणजे खेळण्याची जागा इतकेच त्याला माहीत होते.

गोळा केलेली लाकडे, गोवर्‍या, त्यांची मांडामांड असे अनाकलनीय प्रकार आप्पाच्या डोळ्यासमोर घडत होते. चिता रचताना इतक्या बारकाईने सर्व का चालले आहे हेही आप्पाला कळत नव्हते. गंभीरपणे परंतु पायाखालील वाळूत पायाच्या अंगठ्याने रेघोट्या मारत, एकटक बघत होता. पुन्हा माईंना उचलले गेले आणि आप्पा सावध झाला. रचलेल्या चितेवर माईंना ठेवताना आप्पाच्या पायाखालची वाळूच सरकली होती. काय होणार आहे याची थोडीशी कल्पना आप्पाला यायला लागली होती. कुठेतरी सहज गंमत म्हणून वाचलेल्या गोष्टी आप्पाला आठवायला लागल्या. त्यावरून काय घडणार आहे याची कल्पना यायला लागली. समोर काय घडते आहे ते आप्पाला आता दिसतच नव्हते. त्याचे डोळे माईंवरच्या प्रेमाने भरून गेले होते. डोळ्यातील अडवलेला थेंब जसा खाली पडला तसे आप्पाला जळते लाकूड-गोवरी घेऊन हनुमंतराव उभे असलेले दिसले. कोणीतरी "आप्पा..." असे हळूच म्हणाले आणि आप्पा अनवधानाने दोन पावले पुढे सरकला. अनुभवी मंडळींना आप्पाच्या तयारीचे कौतुक वाटले. हनुमंतरावांनी माईंच्या चितेला दिलेला अग्नि आप्पाला फारच कठोर वाटला. नकळतपणे केवळ हात जोडून उभा असलेला आप्पा भडकणार्‍या ज्वाळांकडे पहात तसाच उभा होता. मृत्यू म्हणजे देवाघरी जाणे, स्वर्गात जाणे या आप्पाच्या मनातील गोडशा कल्पनेला चितेच्या ज्वाळांनी पूर्णपणे कवटाळले होते. माई आता पुन्हा कधीही बोलणार नाहीत, पुन्हा कधीच दिसणार नाहीत या विचारात असलेला आप्पा इतर लोकांच्या पुढील तयारीच्याही गोष्टी ऐकत होता. हनुमंतराव जळणार्‍या चितेकडे पहात नुसतेच बसले होते. काहीवेळाने आप्पाला कोणीतरी हनुमंतरावांच्याजवळ बसायला सांगितले. हनुमंतराव आणि आप्पा दोघेही एकमेकांशी कोणताही शब्द न बोलता पूर्णपणे भडकलेल्या चितेच्या समोर नुसते बसून होते.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *

दहावा - तेरावा झाला. सर्व आपापल्या रोजच्या कामाला लागले. मात्र आप्पाच्या मनातून भडकलेली चिता काही केल्या जात नव्हती. तो प्रसंग त्याच्या मनात घर करून होता. आप्पा नेहमीसारखे प्रश्न विचारीत नव्हता. आईलाही आप्पाच्या वागणुकीत झालेला बदल लक्षात आला होता. आईने एकदा हनुमंतरावांजवळ हा विषय काढला.
"अहो, मला जरा आप्पाबद्दल बोलायचय."
"हं"
"म्हणजे जरा वेगळं आहे."
"हं"
"तुमच्या काही लक्षात आलं का?"
"काय?"
"आप्पाचं हल्ली वागणं..."
"काय झाल?"
"आप्पा हल्ली ....म्हणजे माई गेल्यापासून जरा विचित्रच वागतो आहे."
"काय केलं त्यानं?" हनुमंतरावांनी जरा नाराजीनंच विचारलं.
"त्याचं प्रश्न विचारणं कमी झालंय. फारसा बोलत नाही."
"हं. वाढतं वय आहे."
"तसं नाही. पण...."
"आणखी काय?"
"हल्ली..... हल्ली तो देवाला नीट नमस्कार सुद्धा करीत नाही."
आईचे हे बोलणे हनुमंतरावांना रुचले नव्हते.
"करतो ना पण...?" हनुमंतरावांनीच उलट प्रश्न विचारला.
"नाही.... म्हणजे देवाचं नाव घ्यायला सांगितलं की तो नाराज होतो हल्ली. पूर्वी लगेच तयार व्हायचा."
"हं. म्हणजे हे सगळं माई गेल्या म्हणून?"
"तुम्ही आप्पाला उगाच नेलंत."
"कुठे?"
"स्मशानात.."
"म्हणजे?"
"त्याला ते सगळं सहन नसेल झालं?"
"कधी तरी येणारंच होता ना तो?"
"पण अजून लहान आहे तो."
"म्हणजे त्यामुळे असं होतंय?"
"म्हणजे तसं नसेल कदाचित. पण साधारण त्याच काळापासून...."
"समजावलं पाहिजे."
"तुम्ही समजवाल आप्पाला?" आईने आशेने विचारले.
"बघतो." नेहमीप्रमाणे हनुमंतरावांनी उत्तर दिले.

रात्री जेवल्यावर हनुमंतरावांनी आप्पाला बोलावले. आप्पा आला.
"काय बाबा?"
"येतोस का?"
"कुठे?"
"काही नाही रे! मी चाललोय शतपावली करायला. येतोस का?"
"आत्ता ? रात्री ?" आप्पाने जरा आश्चर्यानेच विचारले.
"का? घाबरतोस का काय?"
"नाही."
"मग चल की.."
"पण..."
"तुला काय वाटलं एखादा राक्षस येईल म्हणून? अरे, देव वाचवेल की !" हनुमंतरावांनी मुद्दामच अंधारात तीर मारला होता.
आप्पाचा मूकपणा ताडून हनुमंतरावांनी फक्त "चल" असे म्हटले.
दोघेही चालू लागले. दोन-तीन मिनिटे कोणीच काहीच बोलले नाही. मग हनुमंतरावच म्हणाले.
"आप्पा, बरं वाटंत नाहीये का?"
"बरंय की"
"आज देवळात नाही गेलास?"
"देवळात? "
"हं ?"
"गेलो होतो. "
"बंर. काय म्हणाला देव?"
चार-पाच सेकंद स्तब्धतेत गेल्यावर आप्पा अचानक म्हणाला
"तुम्ही असं कसं केलंत बाबा?"
अचानक या प्रश्नाने हनुमंतरावांना कळेनासे झाले.
"काय?" ते जोरात बोलले.
"दुसर्‍या कोणालातरी सांगायचेत की ! असं होतं सगळ्यांचं?" हे विचारताना आप्पा शहारला होता हे हनुमंतरावांच्या लक्षात आलं.
"अरे, काय बोलतोयस तू?"
"माई....." एवढ्या अर्धवट उच्चाराने हनुमंतरावांच्या सर्व एकदम लक्षात आले की आप्पा हे काय प्रश्न विचारत होता. एक दीर्घ स्वास घेऊन ते म्हणाले..
"हं. हे डोक्यात आहे होय तुझ्या. तरीच..."
हनुमंतरावांच्या अर्धवट उच्चारलेल्या 'तरीच'मुळे आप्पा जागच्या जागीच थांबला.
"का रे? थांबलास का? माणसाने चालत रहावे."
हनुमंतराव काय बोलत आहेत ते पटकन आप्पाच्या लक्षात आले नाही. मग त्यांनीच समजावले.
"जीवनात अशा गोष्टी घडतच असतात. आपले काम आपण सोडून कसे चालेल?"
आपल्या बोलण्याचा आप्पावर परीणाम होतोय हे पाहून हनुमंतराव बोलत राहिले.
"आई-वडीलांचे सर्व म्हणजे तिलांजलीसुद्धा मुलांनीच करायला पाहिजे."
"पण... आग..?"
"ते सुद्धा आपलंच कर्तव्य आहे."
"मग आपण खोटं का बोलतो?"
"खोटं?"
"की देवाघरी जातात म्हणून?"
यावर आप्पा खो-खो हसले. आप्पाच्या मनात नेमका कोणता गोंधळ चाललेला होता हे पूर्णपणे लक्षात आले होते.
"अरे आप्पा, कोणीही खोटं बोलत नाही."
"मग?"
"माईसुद्धा देवाघरीच गेली."
"नाही. आपण माईंना... तिथे.... तुम्ही...." आप्पाला रडू कोसळले. माईंना चितेवर आपण अग्नि दिला हेच आप्पाला रुचले नाही हे आता हनुमंतरावांच्या लक्षात आले होते. चिता प्रकरणाचा काहीतरी परीणाम आप्पाच्या मनावर झाला असणार याची हनुमंतरावांना खात्री होतीच. पण याचा इतका जास्त परीणाम आप्पाच्या मनावर झाला असेल असे त्यांना कधी वाटलेही नव्हते. दोघेही एका दगडावर शांतपणे बसले. आप्पाचे रडणे थोडे कमी झाल्यावर हनुमंतराव म्हणाले..
"आप्पा, तू सगळ्या भावंडात मोठा आणि समंजस म्हणून मी तुला नेले. अरे, चितेला अग्नि मुलानेच द्यायचा असतो. तसे शास्त्रच आहे. प्रत्येक मुलाचे ते कर्तव्यच आहे. उद्या तुलाही हेच करायचंय...." हे हनुमंतराव बोलून गेले मात्र....एकदम मान फिरवून आप्पाने त्यांच्याकडे बघितले. तसा त्यांनी विषय थोडा फिरवला.
"आकाशात बघ आप्पा. हे सर्व तारे स्वत: जळत असतात. म्हणून आपल्याला दिसतात."
अतिशय तटस्थपणे आप्पा आकाशाकडे बघायला लागला. आप्पाला या क्षणी काहीच नको होते. उगाच बघायचे म्हणून तो आकाशाकडे बघत होता. त्याचे हे अलिप्तपण पाहून हनुमंतराव म्हणाले..
"माई रात्रीच देवाघरी गेली होती तिचा देह सोडून. आपण फक्त पुढचं काम केलं."
आप्पाला पटत नव्हतं. कारण समजत नव्हतं. नुसतेच "हं" म्हणून आप्पा तसाच पुढे गेला. काहीतरी समजल्यासारखे मान हलवत पुढे जाऊन थांबला. त्याने हनुमंतरावांना विचारले "चलायचे का आता घराकडे..?"
"हो. जाऊया की." हनुमंतराव पटकन म्हणाले.
आप्पा परत फिरला. तसे त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मिस्कील चेहर्‍याने हनुमंतराव म्हणाले...
"आपण सर्वच एक ना एक दिवस परत जाणार आहोत बरं..!"
या त्यांच्या वाक्याने हळूच गालातल्या गालात हसत आप्पाने त्यांच्याकडे बघितले.
दोघेही आणखी काही न बोलता झपाझप घराकडे परत आले. आई इतर मुलांना झोपवून उंबर्‍यातच वाट पहात बसली होती. लांबूनच दोघे दिसले तशी पदर डोक्यावरून घेत उभी राहिली. दोघांच्याही चेहर्‍यावरचे भाव बघून हलकेच हसत आत गेली. दोघांनाही बाहेरच झोपायचे होते. पायावर पाणी मारून दोघेही झोपी गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * *

आप्पा पहाटे लवकरच उठला. सकाळ व्हायच्या आतच सर्व उरकले. आज उठल्यापासूनच काहीतरी निश्चय केल्यसारखा आप्पा वाटत होता. बर्‍याच दिवसांचे ओझे उतरल्यामुळे झोपही चांगली लागली होती. आज त्याच्या कामात वेगही जाणवत होता. आप्पाचे एकंदर वागणे पाहून काल रात्रीची शतपावली खरोखरच पावली असल्याची जाणीव झाली. आप्पाच्या विचारसरणीतच काहीतरी बदल झाल्यासारखा वाटत होता. कितीतरी दिवसांनी आप्पा आज शाळेला जाणार होता. त्या उत्साहातच शाळेचे दप्तर भरता भरता अचानक "माईsss... भूssक..." असे शब्द आप्पाच्या तोडून निघाले.... मात्र लगेचच "आई" म्हणून त्याने वेळ मारून नेली. आईच्या ही गोष्ट लक्षात आलीच होती. पण तरीही काहीही न ऐकल्यासारखे करीत ती म्हणाली "खाऊन जा थोडं."
"हो." म्हणून आप्पा लगेचच बसला. थोडे खाऊन झाल्यावर पाणी पिऊन हातालाच तोंड पुसत आप्पा निघाला तो थेट शाळेत जाण्यासाठी. जाताना घरातील देवाला नमस्कार करायला विसरला नाही आप्पा.
"तात्या, चल रे.." आप्पाने तात्याला हाक मारली. तात्या नेहमीप्रमाणे तयारच होता. तात्याला अभ्यासाची विशेष आवड नव्हती. पण शाळेतील वातावरण त्याला आवडायचे.

दोघेही शाळेत गेल्यावर 7 वर्षांचा बंडा आई समोर बसला.
"आई, मलापण.."
"काय?" उत्सुकतेपोटी आई म्हणाली.
"भूssक."
"बंssरs" असं म्हणून बंडालाही काही दिले. खाऊन बंडा जो उठला तो धावलाच बाहेर. आज हा काहीतरी खट्याळपणा करणार हे आईला समजून चुकलेच होते. फक्त 7 वर्षांचा असला तरी तब्येत चांगली असल्याने बंडा सरसर झाडावर चढू शकत होता. त्याच उत्साहात त्याने पिंपळाच्या झाडाला कैर्‍या लावल्या होत्या. लहान मुलांना भीती दाखवणारे स्वत:च त्यादिवशी दचकले होते. बंडा काही आता लवकर घरी येणार नाही असे समजून आईने सुमीचे आवरायला घेतले. 5 वर्षांची सुमी केस विंचरताना एका जागी स्थिर न बसल्याने कितीतरी वेळा धपाटे खात होती. मात्र हातातील दगड उडवून ते खेळण्यातच ती मग्न असल्याने तिला ते सर्व चालत होते. एवढ्यात घाईघाईने हनुमंतराव घरी आले. अचानक आल्याने आईलाही आश्चर्य वाटले.

"काय हो?" आश्चर्याने आईने विचारले.
त्यांच्या हातातील पिशवी घेतानाच ती म्हणाली.
"आज कोणी मिळाले नाही का कामाला?"
शेतावर राबायला रोज कोणालातरी बोलवायला लागायचे. तशी शेती होती थोडीच. पण घरात एकच मोठा पुरूष. जवळच्या वस्तीवरचे काही मजूर हनुमंतरावांसाठी नेहमीच येत असत. हनुमंतरावंनी डोक्यावरची टोपी काढून ठेवली. अतिशय रागाने म्हणाले..
"आज कोणीही येणार नाही."
"नाही? का?"
"आज सगळे आंदोलन करणार आहेत म्हणे!"
"आंदोलन? कसले?"
"स्वतंत्रता आंदोलन." मस्करी केल्यासारखे हनुमंतराव म्हणाले. "कामे सोडून द्या. शेते वाळू द्या. सगळा देश उपाशी राहू द्या. पण आंदोलन महत्वाचे."
"अहो, पण हे देशासाठीच करताहेत ना?"
"देशाची किंमत आहे कुणाला? उद्या समजा देश हे म्हणतात तसा स्वतंत्र झाला... खायचे काय? रहायचे कुठे? देश स्वतंत्र झाला म्हणून काय चिकूच्या झाडाला आंबे लागणार आहेत का?"
"तुम्हीच तर म्हणायचात ना गुलामगिरी नको म्हणून?"
"बरोबर आहे. इंग्रज नकोच आहे. पण नुसता इंग्रजाला हाकलला म्हणजे आपण स्वतंत्र झालो का?"
हनुमंतरावांचे हे बोलणे आईला कळलेच नाही. हनुमंतरावांना एकदम आप्पाची आठवण झाली.
"आप्पा कुठांय?"
"आप्पा आणि तात्या दोघेही शाळेत गेलेत."
"अरे वा! " हनुमंतराव कौतुकाने बोलत आहेत असे समजून आईने पदर डोक्यावरून पुन्हा पुन्हा ओढून घेतला आणि आणखी बोलण्यासाठी तोंड उघडले मात्र...
"शाळेच्या मास्तरांना नाही वाटतं स्वतंत्र व्हायचं?" या हनुमंतरावांच्या वाक्याने फक्त सुस्कारा टाकला. इतक्यात आप्पा आणि तात्या दोघेही हातात हात घालून घराकडे परत येताना दिसले.

क्रमश:

गुलमोहर: