भी(शि)क्षा

Submitted by हेरंब ओक on 22 April, 2010 - 00:06

http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_20.html

१. एकेक करत हातापायाची सगळी बोटं तोडून टाकणे आणि हळूहळू एकेक अवयव तोडत जाणे.

२. डोळ्यांच्या पापण्या कापून गरम चरचरीत सळई किंवा धारदार चाकू डोळ्यांच्या आत फिरवणे.

३. जाड बांबूने मारत जात जात एकेक अवयव निकामी करून तडफडून मारणे.

४. अंगावरची चामडी सोलून काढून चौकात टांगून ठेवणे.

५. नागडं करून बांधून ठेवून भुकेल्या कुत्र्यांना अंगावर सोडणे.

६. 'पुरुष' नाटकात दाखवलेली शिक्षा जशीच्या तशी भर चौकात देणे

मनोरुग्ण, सायकोपाथ, सेडिस्ट असा काय काय वाटतोय ना मी? पण रोजच्यारोज सकाळी पेपर उघडल्यावर बलात्कारांच्या घटनांनी बरबटलेली पानं (की मनं) वाचताना डोक्याचा पार भुगा होतो.

निम्म्यापेक्षा (कितीतरी) जास्त गुन्हे दाखल होत नाहीत, दाखल झालेल्या गुन्ह्याताल्या अनेक आरोपींवरचे आरोप सिद्ध होत नाहीत, सिद्ध झाले तरी वरच्या कोर्टात अपील केलं जातं, आणि त्या कोर्टातून आरोपीला सोडवण्यासाठी कायद्याच्या बिळात लपून बसलेले वकील कायद्यातले बग्स बरोब्बर हेरून आरोपीला शाही लवाजम्यानिशी घरी पोचवण्याची व्यवस्था करतात.............................

आणि पुढच्या बलात्काराची बातमी येते........ वर्तुळ पूर्ण. अशी कित्येक वर्तुळं तासागणिक पूर्ण होत असतील.

भलेही व्यक्ती तीच नसेल, पण प्रवृत्ती तीच असते, हेतू तोच असतो, नशा तीच असते, वखवख तीच असते.

कधी अपमानाचा बदला म्हणून तर कधी दिलेल्या नकाराचा राग मनात धरून, कधी नवर्‍याने केलेल्या एखाद्या गुन्ह्याची (?) शिक्षा (?) म्हणून तर कधी दहशत बसावी म्हणून, कधी दलित म्हणून तर कधी नुसतीच मादी म्हणून.

कारणं काहीही असोत पण परिणाम एकच, शिक्षा एकच, निकष एकच, निकालही एकच. बाईला नासवली की झाला सूड पूर्ण, झालं पौरुषत्व सिद्ध.

आणि हे प्रकार वाढते, अनेक पटींनी वाढत जाणारे. manifold.. परवापेक्षा कालची संख्या जास्त. कालच्या पेक्षा आजच्या बातम्या जास्त. आजच्या पेक्षा उद्याचा हैदोस अजून जास्त.. आणि उद्यापेक्षा परवाचा अजूनच !!!! हे संपतच नाही कुठे. संपेल अशी चिन्हही दिसत नाहीत.

हे का संपत नाही किंवा काय केलं की अशा सडक्या जनावरांना जन्मभराची अद्दल घडेल, कायमची दहशत बसेल असा विचार करत होतो तेव्हा वरच्या सगळ्या शिक्षा सुचल्या. अ‍ॅक्च्युअली अजूनही भयंकर सुचल्या होत्या. पण त्या इथे देणं प्रशस्त नाही. यातली निदान एखादी तरी शिक्षा निदान एकदा तरी प्रत्यक्षात अंमलात आणली गेली ना तरी पुढच्या वेळी त्या नुसत्या कल्पनेनेच ती जनावरं कापू लागतील. कारण शेवटी मानापेक्षा, बदल्याच्या आगीपेक्षा, वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.

...................... पण अचानक जागा झालो. मी पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सीधासाधा, दबलेला, नश्वर (आणि निर्लज्ज कोडगा) मनुक्ष आहे याचं भान आलं आणि ............
"साधी चौकशी आणि सुटका, ३ महिने साधी कैद आणि २००० रुपये दंड, १०,००० रुपयाच्या जामिनावर सुटका, चौकशीत गुन्हा सिध्द झाला नाही, घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार (eye-witness) नसल्याने आणि ठोस परिस्थितीदर्शक पुरावे नसल्याने निर्दोष मुक्तता, परस्पर संमतीने संबंध ठेवले गेले असल्याने बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला नाही, फिर्यादीच्या पूर्वायुष्यातल्या घटना पाहता तिने केलेल्या तक्रारीत संशयाला नक्कीच वाव आहे" वगैरे वगैरे वाल्या बातम्या पुन्हा निमूटपणे वाचायला लागलो.

गुलमोहर: 

Angry
न्यायालय... शिक्षा.. यावरचा माझा विश्वास कधिच उडालय...
मला नेहमी प्रष्ण पडतो, गुन्हा सिद्ध झाला नाही तरी त्या अपराध्याला आणि त्याच्या जवळच्या लोकांना कल्पना असेलच न कि त्याने काय केलंय ते? या अपराध्यांना समाजात वागणुक कशी मिळते... त्यांच्या घरचे, नातावाइक, शेजारचे त्यांच्याशी कसे वागतात... तो निर्दोष आहे असं 'मानुन' वागतात (असं वागणं शक्य आहे?) का तो दोशी असुनही त्यांना काही फरक पडत नाही (बापरे!)
... जाउदे ...

Sad