http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_15.html
मी 'स्लमडॉग मिलिनियर' प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच पहिला होता. कारण खूप ऐकलं होतं त्याबद्दल. आणि मांजरेकरचा आक्रस्ताळेपणा आणि शेवटी 'जितेंद्र-जयाप्रदा'च्या जुन्या चित्रपटांसारखं हातपाय विचित्र हलवत केलेलं प्लॅटफॉर्म वरचं 'जय हो' गाणं (तेच ते ऑस्करवालं ) सोडलं तर मला चित्रपट प्रचंड आवडला होता. 'ओ साय्या' सोडलं तर संगीतात विशेष दम नव्हता. यापेक्षा कैक सुंदर सुंदर गाणी रहमानने यापूर्वीच देऊन ठेवली आहेत. पण कथा, पटकथा, संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय आणि एकूणच दिग्दर्शन यात मला हा चित्रपट खुपच उजवा वाटला. सर्वात मुख्य म्हणजे नायकाच्या बालपणात, तरुणपणात घडलेले विविध प्रसंग आणि त्याला त्या शो मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांशी त्यांचे जुळलेले संदर्भ, ती वीण, तो एकूणच प्रकार मला फार भावला. अर्थात तो ऑस्कर मिळवण्याच्या लायकीचा होता का हा निराळा मुद्दा झाला. माझं वैयक्तिक मत म्हणजे तो ऑस्करच्या योग्यतेचा नव्हता. पण असो. त्याविषयी नंतर बोलू. चित्रपट गाजला तो मुख्यत: त्यात दाखवलेली भारतातल्या दारिद्र्याची, विषमतेची, झोपडपट्ट्यांची, गरिबीची, अस्वच्छतेची, बाल-गुन्हेगारीची दृष्य किंवा ते एकूणच चित्रण यामुळे. अनेकांना ते सगळं आक्षेपार्ह वाटलं. भारताची आणि भारतीयांची गरिबी मुद्दाम जगापुढे मांडण्याचा एका ब्रिटीश दिग्दर्शकाचा धूर्त अट्टाहास आणि त्यायोगे ऑस्कर पदरात पडून घेण्याचा एक डाव असंही नाव त्याला दिलं गेलं. असो.
अचानक 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल एवढी बडबड करून त्यावर आत्ता पोस्ट लिहिण्याचं कारण काय असं कोणाच्या मनात येत असेल तर आधीच सांगतो आजची पोस्ट 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल नाही. 'स्लमडॉग मिलिनियर' वरून एवढं घडाभर तेल वाहून झाल्यावर पोस्ट त्याबद्दल नाही हे ऐकल्यावर अनेक भुवया उंचावल्या गेल्या असतील. पण आज मी लिहिणार आहे ते 'स्लमडॉग मिलिनियर'सारख्याच एका पुस्तकाच्या संदर्भात. नाही. नाही. विक्रम स्वरूप यांच्या मूळ 'Q and A' या पुस्तकाबद्दलही नाही. मी म्हणत असलेल्या पुस्तकात आणि 'स्लमडॉग मिलिनियर' मध्ये दोन मुद्दे समान आहेत. एक म्हणजे दोन्हीत भारतातली सामाजिक विषमता, गरिबी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दाखवलं आहे आणि दोन्ही त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आहेत. आणि अर्थातच त्यामुळे त्या दोघांवरही 'भारताचं दारिद्र्य ग्लोरिफाय करून' पुरस्कार हडपल्याचे आरोप झाले. ते आरोप कितपत खरे आहेत ते पुढे बघूच. तर हे पुस्तक आहे अरविंद अडिगा यांचं २००८ सालचं बुकर पारितोषिक विजेतं 'द व्हाईट टायगर'.

मी जेव्हा सुरुवातीला या पुस्तकाविषयी वाचलं होतं तेव्हा 'बंगलोरमधला एक छोटा उद्योजक भारताच्या राजकीय दौर्यावर येणार्या चीनच्या पंतप्रधांनांना उद्देशून पत्र लिहून त्यात भारतात येताना कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खबरदारी घ्यायची असल्या काहीतरी सूचना करतो' असल्या काहीतरी मुद्द्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे असं वाचल्याचं आठवत होतं. ते वाचून तेव्हाच मी मनात म्हटलं होतं की 'छे. हा कसला विषय? काहीतरी विचित्र आणि निरस असणार हे पुस्तक.'. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावरही सुरुवातीची काही (१०-१५ च) पानं मी अशा कंटाळवाण्या मूड मधेच वाचत होतो. किंबहुना सुरुवातीलाच मला 'अनेकांना स्लमडॉग मिलिनियर पाहिल्यावर दिग्दर्शक डॅनी बॉयलचा जसा राग आला होता' तसाच अरविंद अडिगा या पोरगेल्या लेखकाच्या भारताविषयक उद्दाम आणि अपमानास्पद (भासणार्या) लेखनाचा चांगलाच राग आला होता. किंबहुना लेखकाचा भारताला, आपल्या रुढी-परंपरांना, सामाजिक व्यवस्थेला, मागासलेपणाला, आर्थिक/सामाजिक/वैचारिक विषमतेला तिरकस नजरेने पाहून त्यांना करड्या छटेत रंगवण्याचा (पुरेपूर यशस्वी) प्रयत्न मला अजिबात रुचला नव्हता. पण हळूहळू जसं पुढे वाचत गेलो तसतसा अडिगा यांना सलाम ठोकावासा वाटायला लागला. लेखक सुरुवातीलाच म्हणतो की 'आमच्याइथे दोन भारत आहेत. एक 'अंधारलेला' भारत आणि दुसरा 'चमकणारा' भारत'. हे वाक्यही मला सुरुवातीला तसंच नकारार्थी वाटलं होतं. म्हणजे ते नकारार्थी आहेच पण पुढे सरकता सरकता लेखकाचा भारतातील सामाजिक विषमता आणि जातीभेद इ. वर प्रहार करण्यासाठी त्या वाक्याचा चपखल वापर करताना बघून आपल्याला ते वाक्य मनोमन पटतं आणि थक्क व्हायला होतं. आणि लक्षात यायाल लागतं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हळू हळू अडिगांबद्दलचा मनात असलेला आकस, राग निवळून जायला लागतो आणि त्याची जागा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दलचं कौतुक घेतं. कारण लेखक सांगत असतो त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नसते. हे असं खरोखर घडतंय आपल्या इथे. पण कोणी हे आत्तापर्यंत अशा गडद शैलीत दणादण शालजोडीतले हाणत अशा प्रकारे कधी सांगितलंच नव्हतं. पुस्तकातला गरीब अशिक्षित नायक जेव्हा स्वतःचा उल्लेख करताना पशु, किडा किंवा टेबलाखाली रांगत जाणार कोळी अशा उपमा अगदी सहजपणे जेव्हा वापरतो तेव्हा त्यातली गडद भीषणता जाणवते. म्हणजे अन्याय होतोय हे तुम्हाला कळण्याइतपत तरी तुमची पंचेंद्रिय जागृत असतील तर तुम्ही त्या घटनांना स्वतःवरील अन्यायाचं लेबल लावू शकणार ना. पण इथे मुळातच हे जातीभेद, वर्णव्यवस्था, गरिबी, शोषण, माणुसकीला ठायी ठायी पायदळी तुडवणं हे अनंत काळापासून असंच चालत आलेले आणि त्यामुळेच आपोआपच तेच योग्य आहे असा सगळ्यांचा समज करून दिलं जाणारे अनेक अन्यायाचे प्रसंग वाचले की मनावर अपार नैराश्याची एक काळी छटा पसरते.
मला वाटतं पुस्तकाचं मोठ्ठं यश म्हणजे लेखकाची सर्वोत्कृष्ठ तिरकस शैली. मला वाटतं सध्याच्या काळात तरी फार कमी लेखकांना इतक्या हलक्या हाताने, सहज रीतीने पण धारदार तिरकस वाग्बाण मारून मंत्री, पुढारी, पोलिस, निवडणुका, न्यायव्यवस्था, गरिबी, उपासमार, धर्मांधता, राजकारण, आर्थिक आणि सामाजिक विषमता, जातीभेद, भ्रष्टाचार या सर्वांचा वेध एका पुस्तकात एवढ्या सहजतेने घेता आला असेल. अशी उदाहरणं फार विरळा. उगाच आगखाऊ भाषणं ठोकून, जडजंबाळ अग्रलेख लिहून, मोठमोठे लेख लिहून कुठल्याही संपादक, विरोधी पक्षनेता नेत्याला जे करता आलेलं नाही ते अडिगा यांनी एका जेमतेम तीनशे पानांच्या या छोटेखानी पुस्तकात अगदी सहजतेने करून दाखवलं आहे. आणि या तिरकस शैलीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे पान ८९ वरचा 'सर, सर' वाल्या वाक्याचा पूर्ण परिच्छेद. तो काय आहे हे मी इथे सांगणार नाही. तो परिच्छेद किंबहुना हे पुस्तकच प्रत्यकाने मुद्दाम आवर्जून वाचलंच पाहिजे असं आहे. तो वाचल्यावर लेखकाच्या भयंकर चिमटे काढण्याच्या शैलीला दाद दिल्यावाचून राहवत नाही.
या तिरकस शैलीत लिहीत लिहीत लेखक जेव्हा जाता येता आपल्या प्रवृत्तीवर, समाजव्यवस्थेवर (एवढंच कशाला, अगदी पोलीस,न्यायालय आणि निवडणुकाही सुटत नाहीत त्याच्या तावडीतून) असंख्य प्रहार करून चिमटे काढत, लाथा घालत घालत पुढे पुढे सरकतो तेव्हा तर आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत जाते. किंबहुना काय होणार आहे, शेवट काय आहे ते लेखक पहिल्या पन्नास-साठ पानांतच सांगून टाकतो. पण उलट त्यामुळे ते कसं होईल याची प्रचंड उत्सुकता लागत जाऊन आपण अधिकाधिक हावरटासारखं तुटून पडतो पुस्तकावर. एक मात्र मान्य केलं पाहिजे की शेवटच्या काही पानांत लेखकाची पुस्तकावरची पकड ढिली झाल्याचा भास होतो (मला तरी झाला) आणि उगाच ते ताणलंय आणि उगाच थोडंसं भरकटलंय असंही वाटून जातं. पण आधीच्या दोन-अडीचशे पानांत जो उत्कृष्ठ अनुभव मिळालेला असतो त्यापुढे शेवटची थोडी गडबड नजरेआड करायला हरकत नाही.
तर भारतावर, आपल्या एकूणच व्यवस्थेवर एवढे प्रचंड आसूड ओढून जगाच्या मनात भारताबद्दलचं चुकीचं चित्र भरवलं गेलं असल्याचे आरोप या पुस्तकावर झाले. अनेक ब्लॉग्स, चर्चा यांमध्येही 'भारताबद्दल काहीतरी वाईटसाईट लिहा आणि पुरस्कार कमवा' अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं मी वाचलं. मला त्यांचा मुद्दा, त्यांचं म्हणणं, त्यांची मतं काही खोडून बिडून काढायची नाहीयेत. ती प्रत्येकाची स्वतंत्र वैयक्तिक मतं आहेत आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. म्हणून मी फक्त मला दिसलेला व्हाईट टायगर माझ्या नजरेने सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लेखकाने आपल्या वृत्तीवर, भ्रष्टाचारावर, गरीबीवर, व्यवस्थेवर असंख्य हल्ले केले आहेत हे नाकारणं शक्यच नाही पण ते असत्य आहे का? कपोलकल्पित आहे का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारल्यास त्याचं उत्तर खचितच नाही असं द्यावं लागतं. त्यामुळे या अशा भीषण व्यवस्थेवर, खोटेपणावर हल्ला करणार्यावर आपण हल्ला करायचा की त्या मूळ समस्येवर हल्ला करायचा हे आपलं आपण ठरवायचं. तसंही बेगडी देशप्रेमाचा बाजार मांडणार्या चोपडा, जोहरांची आपल्या देशात काही कमतरता नाही !!!
म्हंजे! पुस्तक एकदा वाचलेच
म्हंजे! पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे ... धन्यवाद!
मी घेतलेलं(वाचलेलं नाही)
मी घेतलेलं(वाचलेलं नाही) आहे.....कुणाला हवे असेल तर फुकटात घेवून जाणे. वर एका बाजुचे गाडीभाडे देण्यात येईल
अरे वा.. हे पुस्तक मुंबई
अरे वा.. हे पुस्तक मुंबई एअरपोर्ट वर पाहिल्यासार्खं वाटतय.. घेतलं मात्र नाही.. पण आता घ्यायची गरज नाही ना??तुझ्याजवळ आहे ना
चंपक, नक्की वाच. खुपच सुंदर
चंपक, नक्की वाच. खुपच सुंदर आहे.
प्रकाश काळेल,
>> मी घेतलेलं(वाचलेलं नाही) आहे.....कुणाला हवे असेल तर फुकटात घेवून जाणे. वर एका बाजुचे गाडीभाडे देण्यात येईल.
म्हंजी? कळलं नाही. का घेतलंत, का वाचलं नाहीत आणि का फुकट देताय (ते ही गाडीभाड्यासकट) असे किरकोळ प्रश्न पडले.
वर्षू नील, एकदा वाचाच नक्की..
खर आहे ते मान्य करावच लागेल.
खर आहे ते मान्य करावच लागेल. आपणाला खुपच बदलावे लागेल. या आर्थिक मंदीच्या आधी भारत हा महासत्ता बनेल असे भाष्य करणार्या प्रत्येकाला विचारा की आर्थिक सुबत्ता आल्याने का देश महान होतो ? आधी सुबत्ता फक्त शहरामधेच येणार. शेतकरी आत्महत्या करणार याला सुबत्ता म्हणायचे का ? आणि हेच घडवायचे असेल तर नियोजनाशिवाय घडेल का ?
हेरंब, मलाही हे पुस्तक
हेरंब, मलाही हे पुस्तक पहिल्यांदा वाचले तेव्हा अजिबात आवडले नाही. थोडेफार अमिताभच्या दशकातल्या हिंदी चित्रपटासारखे वाटले..खूप अन्याय..पिळवणूक.. आणि एकदम कलाटणी मिळाल्यासारखा त्याचा बदला..इत्यादी.
पण नंतर पेशन्स ठेऊन पुन्हा एकदा वाचायला घेतले आणि त्यातील बारकावे उलगडत गेले.
नितीनचिंचवड, ashuchamp, आभार.
नितीनचिंचवड, ashuchamp,
आभार. खूप विचारपूर्वक आणि अभ्यास करून लिहिलेलं पुस्तक आहे हे. आणि हे सगळं करताना उगाच कुठे अन्याय आणि शोषणाविरुद्ध थेट हल्ला केलाय असं नाही. पण तिरकस शब्दांचे आसूड ओढून आपल्या अंध परंपरा, जातीभेद, भ्रष्ट सरकार, पोलीस, ठायी ठायी आढळणारी विषमता यावर शालजोडीतले ठेवून दिले आहेत. आणि हे जे आहे ते खरोखर घडतंय.. काल्पनिक वर्णन नाहीये हे. त्यामुळे वस्तुस्थितीपासून डोळेझाक करण्यात काहीच अर्थ नाही.. धन्यवाद..
हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं
हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेंव्हा अजिबात आवडलं नव्हतं,बहुतेक इथे पुस्तकावरच्या चर्चेत तशी प्रतिक्रियाही दिली होती.
पण हे पुस्तक,विशेषतः त्याचा मुख्य प्लॉट हा शब्दशः घेण्याची गोष्ट्च नाहीए असं वाटते. असं केलं तर हे अत्यंत एकांगी वाटू शकतं. ते एका पद्धतीचे रुपक आहे आणि लेखकाचे अचूक निरिक्षण आणि धारदार कॉमेंट्स याचे श्रेय द्यायलाच हवे.
आपल्या देशात एवढेच आहे काय? हा प्रश्न लगेच विचारला जातो पण हे 'आहे' हे नाकारण्याने काहीच भले होणार नाही.