सोहळा..... एका जीवनाचा - भाग २

Submitted by अ. अ. जोशी on 18 April, 2010 - 14:26

हेमू, वश्या, जग्या आणि टिकू पाटी बनवायला गेले शेजारच्याच लबेगावात. लबेगाव हे अगदी साधे गाव. राजकारणाच्या नकाशावर या गावाला तशी फारशी किंमत नव्हतीच. आपण बरे आणि आपले काम बरे अशी साधारण वृत्ती होती या गावातल्या लोकांची. तरीही काही टारगट लोक होतेच या गावात. शेतीचे सात-आठ महिने सोडले तर कट्ट्यावर बसून इकडच्या-तिकडच्या गप्पा मारणे, येणार्‍या-जाणार्‍याला उगाचच प्रश्न विचारून हैराण करणे, कोणी नवीन दिसला तर त्याला काहितरी भाकडकथा सांगून हे लोक पिटाळूनही लावायचे. हे या लोकांचे रिकामपणाचे उद्योग. शेती मात्र प्रामाणिकपणे करायचे. अशा या लबेगावात चौघेही पोहोचले. हे चौघे नवीन कोणीतरी आलेले पाहून कट्ट्यावरच्या माणसांना लहर आली. त्यांनी बोलावले. विचारपूस केली.
"एss. इकडे या." चौघे तिथे गेले. "कुठुन आलाय ?"
"तिरगावातनं."
"तिरगावातनं आलाय होय.."
"हो."
"काय काम ? कुणाकडं ?"
"हे... आपलं.... पाटी बनवायचीय ना ! त्यासाठी आलो होतो. "
"पाटी ? की ताटी ? अन ताटीला इतक्या लांबवर कशाला ? "
"अहो, ताटी नाही, पाटी बनवायचीय." वश्या बोलला.
"पाटी काय, ...हां." वाकड्या वाक्यालासुद्धा सरळ उत्तर मिळालेले पाहून विचारणारा थोडा गप्प झाला. त्याने पुन्हा विचारले "काय लिहिणार त्यावर?"
"म्हणजे नावाची पाटी बनवायचीय. ते बनवणारे कुठे राहतात सांगितलेत तर बरे होईल." जग्याने धीर धरून विचारले.
"अहो, त्याला सांगितलं काय नि मला सांगितलं काय... एकच. काय लिहिणार ?"
आता चौघांना काय करावे समजेना. तरी वश्याने सांगितले. "नाव लिहिणार. आणखी काय ?"
"कुणाचं ?"
"श्रीssराssम" वश्याची विनोदबुद्धी अचानक उफाळून आली.
"नुसते नावंच का ? वडिलांचे नाव काय ?"
"हनुमंत" इथेच काम होतंय असे वाटल्यामुळे हेमू भाबडेपणाने म्हणाला.
कट्ट्यावरचे सर्वजण खो-खो हसायला लागले. एकमेकांकडे आणि या चौघांकडे पाहून खाणाखुणा करू लागले.
"हनुमान भक्त होता श्रीरामाचा असं ऐकलं होतं. आता श्रीरामाला हनुमानाचा भक्त होण्याची वेळ आली. " असे म्हणून पुन्हा हसायला लागले. पुन्हा टिगल-टवाळी सुरू झाली.
"तुम्ही काय त्या पुराणिकाचे काय ?"
"नाही. " असे म्हणून टिंकूने सर्वांची ओळख करून दिली.
नुसत्याच माना हलल्या, पण हसणं अजूनही चालू होतं.
"आम्ही आप्पांसाठी आलो होतो. आप्पा तिरगावकर." जग्याने मुद्द्याचं काढलं.
"आप्पा..?" विचारणारे सावरून बसले. "आप्पांचं काय ?"
"आप्पांची एकसष्ठी आहे ना, त्यासाठी पाट्या बनवायच्यात. या गावात ते आहेत ना पाट्या करणारे त्यांच्याकडे जायचे होते" पुन्हा जग्याच बोलला.
" आप्पा म्हणजेच 'श्रीराम हनुमंत तिरगावकर'... नाही का ?" जग्याला आता धाडस आलं होतं.
कट्ट्यावर एकदम शांतता पसरली. चेहर्‍यावरचे मस्करी हावभाव बदलून क्षणार्धात एकदम गंभीर वगैरे झाले होते. थोडे खाकरून कट्ट्यावरच्या एकानं तोंड उघडलं.
"हां हां" पुन्हा खाकरला. "तो आपला रघु आहे ना, जा त्याच्याकडे.." कट्ट्यावरचे आता लायनीवर आले होते.
"रघु म्हणजे"
"रघुनाथ दिवडे." कट्ट्यावरच्या एकाने माहिती पुरवली. "तुम्ही असं करा... तुमच्याकडे मोबाईल असेल ना ? त्याला फोन करा अगोदर. तो फिरता माणूस. फार काम त्याच्याकडे. त्याच्यासारखं अक्षर नाही कुणाचं ! तुम्ही आधी फोन करा. म्हणजे तो घरी आहे का दुकानी ते कळेल."
जग्याच्या मोबाईलवरून रघुला फोन लावला. रघु घरातच होता. चौघेही कट्ट्यावरच्यांना राम-राम करून रघुच्या घरी गेले.

* * * * * * * * * *

रघु उर्फ रघुनाथ दिवडे याचे घर अत्यंत साधे. अनेक प्रकारचे रंग, ब्रश, कापडी फलक, चौकटी यांनी भरलेले. म्हणजे केवळ 6-7 चौकटी आणि त्यासाठी लागणारे कापड यांनीच त्याचे घर भरलेले होते इतके छोटे घर. एक स्वयंपाकघर आणि एक बाहेरची खोली. बस्स. बाहेरच्या खोलीच्या बाहेर छोटीसी मोकळी जागा. जिथे त्याने आता शेड केली होती. या शेडमध्येच त्याचे काम चालायचे. शेड म्हणजे तरी किती? फक्त 6 बाय 10. छोट्या संसारासाठी इतके पुरेसे होते. बायको, दोन मुले आणि म्हातारी आई या तिघांचा भार त्याच्या पाट्या करण्यावरच होता. गावात इतर कोणीही या कलेत निपुण नसल्याने घराला रंग देणे ही कलासुद्धा त्याने आत्मसात केली होती. त्यामुळे आणखी हातभार लागला होता. वाडवडिलार्जित शेती होती. पण ती तरी कितीशी? फक्त 1 एकर. जी वाटणीनंतर त्याच्या वाट्याला आली होती. तशी 1 एकरसुद्धा त्याच्या दृष्टीने मोठीच होती. कारण हे सर्व काम शेतीपेक्षाही त्याच्या आवडते होते.

हे चौघे आले तेंव्हा रघु शेडमधेच होता. दुरूनच त्यांना येताना पाहिले आणि थोडे आवरून त्यांना बसायला जागा करून ठेवली.
"या. बसा." गोणपाट अंथरत त्यांनी न विचारताच रघु म्हणाला. चौघांनाही आश्चर्य वाटले.
"तुम्हाला कसे काय कळले की आमचे तुमच्याकडेच काम आहे ते?" जग्याने विचारले.
"आता सवय झालीय. आपल्याकडे येणारा माणूस बरोबर कळतो. बोला काय करायचंय ?" रंगवायला घेतलेल्या पाटीवर रंग उमटवतच रघु बोलला. एव्हाना रघुच्या धाकट्या मुलीने पाणीही आणून दिलं होतं. कट्ट्यावरच्या लोकांनी नुसतीच चौकशी करीत वेळ घालवल्यामुळे पाणी हवेच होते. चौघांचेही पाणी पिऊन झाल्यावर टिंकूने विचारले "एकावेळी किती पाट्या करता? " लहानशीच शेड दिसल्याने टिंकूला शंका आली.
"किती म्हणून काय विचारता? कितीही. म्हणजे दिवसाला दोन-तीन. लहान असतील तर पाच-सात सुद्धा होतात."
"एवढ्या? इतक्या छोट्या गावात?" वश्याला जरा आश्चर्यच वाटले. तसे चौघांनाही वाटले होते. पण वश्याने बोलून दाखवले.
"आश्चर्य वाटलं ना? कुणालाही वाटेल. आता फक्त आजूबाजूच्या गावचे नाही. तर तालुक्याच्या गावातल्याही पाट्या येतात. कधी-कधी शहरातल्यापण येतात."
"शहरातल्या? पण तिथे तर हल्ली फ्लेक्स वापरतात ना? इतर ठिकाणीही वापरायला लागलेत." टिंकूने महिती पुरवली. त्याला इतर तिघांनी अनुमोदनपर मान हलवली. कारण त्यांच्यापैकी कोणीच शहरात न गेल्यामुळे तशा पाट्या पाहिलेल्या नव्हत्या.
"बरोबर आहे तुझे." वयाच्या अंतरामुळे रघूकडून आपसुकच बोलले गेले. "शहरात माझे एक-दोन मित्र आहेत. त्यांनी ओळख करून दिली होती फ्लेक्स करणार्‍याची. पण त्यासाठी काम्प्युटर आणि काय काय लागते. आपल्याला ते काय परवडनार आहे होय? मी शिकलेला सातवीपर्यंत. मला काय ते जमणारे होय? तरी माझ्या कलेवर खुष होवून आप्पांनी तालुक्याच्या गावातल्या सदाशेठची ओळख करून दिली आणि माझा धंदा मार्गाला लागलाय. आपलं काम एकदम चोख. जी ठरली ती मजूरी. त्यात कमी जास्त नाही. बर्‍याचवेळा लोक काम करून घेतात नि नंतर उगाचच भांडत बसतात. म्हणून मी पहिलेच बोली ठरवतो आन निम्मे पैसे घेऊनही ठेवतो. उरलेले पैसे दिले की काम घेऊन जायचे. त्यामुळे कोणाचाच घोटाळा होत नाही. तुम्ही पोरं तरूण दिसताय. मगाशी काय ते फ्लेक्स म्हणालात. ते नुसतं ऐकलंय की पाहिलंय? तुम्ही पाहिलंय का फ्लेक्स?"
"हो." टिंकू लगेच म्हणाला " माझं आजोळ आहे ना शहरात."
"तुम्ही आप्पा म्हणालात ते कोण?" हेमूने न राहवून विचारले.
"अरे, आप्पा म्हणजे तिरगावचे आप्पा तिरगावकर. माहित नाहीत होय तुम्हाला? आख्ख्या पंचक्रोशीत नांदी आहे त्यांची."
"अहो, त्यासाठीच तर आलो आहोत ना आम्ही..." जग्या म्हणाला.
तसे हातातला ब्रश तसाच ठेवून रघू ने विचारले "म्हणजे?"
"आम्ही तिरगावातूनच आलो आहोत." हेमूने माहिती पुरवली.
"आप्पांची एकसष्ठी आहे ना? त्यासाठी पाट्या बनवायच्यात मोठाल्या. तुम्ही चांगल्या बनवता म्हणून आलो." जग्या बोलला.
त्यावर ब्रश खाली ठेवून कापडाला हात पुसत रघु म्हणाला....
"आप्पांसाठी होय ! बनल्याच म्हणून समजा. काय लिहायचंय काय त्याच्यावर? का आपलं नेहमीचंच?"
"मजकूर आहे तसा आमच्याकडे. पण... ते..... पहिल्यांदा निम्मे...... तेवढे नाहीत आमच्याकडे आत्ता." हेमूने मूळ गोष्टीला हात घातला.
"हा.... हा.... हा.... त्यामुळे चेहरे असे होते होय? ते काय तुम्ही विचार करू नका. पाट्या बनणार एवढं निश्चित. अरे, आप्पांनी इतकं केलंय माझ्यासाठी. मी साधी पाटी बनवणार नाही होय? तुम्ही काय लिहायचं सांगा. झकासपैकी पाटी बनवू. फ्लेक्सा करून पाहिजे असतील तर तेही करून देईन शहरातून."
"मजकूर आम्ही उद्या दिला तर चालेल ना? उद्या भेटाल ना?"
"अरे, नक्कीच. तुम्ही फक्त मजकूर द्या. बाकी मी बघतो."
आप्पांच्यावरचे लोकांचे प्रेम आणि आप्पांचा लौकीक पाहून चौघेही भारावले. आपण तिरगावचे आहोत याचा कधी नव्हे तो अभिमान वाटायला लागला चौघांना. आता काम उत्कृष्टच करायचे असा मनोमन चौघांनीही निर्णय करून टाकला.

* * * * * * * * * *

चौघेही गावात आले. गावातल्या काही मंडळींना घडलेला किस्सा सांगितला. सर्वच खूष झाले. आप्पांचे नाव कसे लिहावे यावर चर्चा सुरू झाली. कुणी म्हणाले 'आप्पा तिरगावकर' एवढं पुरे होईल. त्यावर भैरूनाना म्हणाले "खुळा की काय तू? असं कधी लिहितात का?" असे म्हणून त्यांनी पर्याय सुचविला "आप्पासाहेब तिरगावकरजी - असे लिहा."
"जी काय जी? ते काय पुढारी आहेत का?" अशोकपंतांनी आपला प्रश्न काढला.
"पुढार्‍यांनाच जी लावतात असे कोणी सांगितले?" नानांचा उलट सवाल.
"तरीही जी नको." अशोकपंतांनी 'जी'वर जोर देत 'जी' प्रकरण संपल्याचीच घोषणा केली.
"ठीक आहे. आणखी काही सुचतंय का बघा." अण्णांनी नेहमी प्रमाणे समजुतीचा हुकमी एक्का काढला.
"आपण त्यांचे पूर्ण नावच लिहिले तर? श्रीराम हनुमंत तिरगावकर." कोणीतरी मधेच तोडगा सुचवला.
"‍हॅ. हे काय म्हणजे न समजणार्‍या नाटकाचं नाव वाटतंय.त्याला ना आगा ना पिछा." नानांनी ही संधी सोडली नाही.
"आपण आप्पा उर्फ श्रीराम हनुमंत तिरगावकर - असे लिहिले तर?" कोणीतरी मार्ग सुचवला.
"बरोबर आहे. नावात 'उर्फ' पाहिजेच. त्याने भारदस्त वाटते." आणखी कोणीतरी पुष्टी जोडली.
"आप्पा उर्फ श्रीरामपंत हनुमंतराव तिरगावकर..." आणखी कोणीतरी मार्ग सुचवला.
इतक्यात अनुभवी म्हणजे एक-दोन छोटे कार्यक्रम केलेले भिकाबाबा आले.
"काय नाव ठरलं शेवटी?" भिकाबाबा
"आप्पा उर्फ श्रीरामपंत हनुमंतराव तिरगावकर..." पटकन कोणीतरी म्हणाले.
"छेछे ! हे अर्धवट होईल." असे भिकाबाबांनी बोलल्यावर इतकावेळ विचार करणारे दचकलेच.
"एवढं नावसुद्धा अर्धवट?" नाना म्हणाले.
"अहो नाना ! आपण मोठ्या व्यक्तीला काहितरी मागे लावतो की नाही? नुसतंच आप्पा कसं चालेल? नाना, तुम्हीतरी सांगायचंत यांना."
भिकाबाबा बोलल्यावर दहा हत्तींचं बंळ आल्यासारखे नाना म्हणाले " बघा ! मी सांगत नव्हतो?"
"अरे नाना, पण लिहायचं काय मागे आता?" वयस्करांना प्रश्न पडला.
"हे बघा" भिकाबाबा पुन्हा बोलू लागले. आता सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच होते. "हे बघा, आप्पा आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, मानाने, कार्याने, ज्ञानाने आणि कीर्तीने खूपच मोठे आहेत. तेंव्हा मला असे वाटते की आपण पूज्य लिहावे. "
"पूज्य? म्हणजे एवढं सगळं करून पूज्यच का?" कोणीतरी अनवधानाने म्हणाले.
"पूज्य म्हणजे पूजनीय, वंदनीय" भिकाबाबांनी न ताणता खुलासा करून टाकला.
"म्हणजे 'पूजनीय आप्पा उर्फ श्रीरामपंत हनुमंतराव तिरगावकर' - असे होईल." नानांनी अनुमोदन दिले.
"इतकं सगळं मावणार का त्या पाटीवर?" कोणीतरी पुटपुटले होते. बहुतेकांनी ते ऐकले होते. पण, नेमके कोण ते न समजल्यामुळे उंचावलेल्या भुवया आणि संशोधनात्मक नजरा पुन्हा आपापल्या जागी आल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष करीत विषय पुन्हा सुरू झाला.
"पण, भिकाबाबा ! पूजनीय तर हल्ली कोणालाही लिहितात. कपाळावर गंध दिसलं की झाला पूजनीय." अशोकपंत नाराजीने बोलले.
"अशोक, असे आपण कशाला म्हणावे?" इतक्या समजुतीने कोण बोलणार अण्णांशिवाय.
"पण तरी अशोकचे बरोबर आहे." इतकावेळ गप्प असलेले अशोकपंतांचे बालमित्र चिंतोपंत म्हणाले. "आपण परम पूजनीय असे लिहू." चितोपंतांनी आणखी एक तोडगा सुचवला.
"आपण 'श्री' असे का लिहीत नाही नावाच्या आधी या पाटीवर?" आणखी एक बदल कोणीतरी सुचवला.
"लिहूया की. सर्वांच्या मनाप्रमाणेच होईल." अण्णांनी अचानक पुढार्‍याच्या आविर्भावात सांगितले.
"म्हणजे - परम पूजनीय आप्पा उर्फ श्री. श्रीरामपंत हनुमंतराव तिरगावकर." जबाबदार असलेल्या तरुणांपैकी हेमू उत्साहात म्हणाला. योग्य पर्याय सापडला यापेक्षा इतकं सगळं एका दमात म्हटल्याचे समाधानच त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते.
शेवटी पाटीवर काय लिहायचं याचा प्रश्न मिटला होता.
तो सुटणारच होता म्हणा. कारण नाव आप्पांचच लिहायचं होतं ना !

* * * * * * * * * *

आप्पा उर्फ श्रीराम हनुमंत तिरगावकर. मूळ गाव तिरगावच. सध्या वय 82 वर्षे. अजूनही तब्येत चांगली. 3-4 किलोमीटर सहज पायी जाऊ शकतात.खूप उंच नाहीत. पण बर्‍यापैकी उंची. काटक. वर्णाने सावळेसे. इतर भावंडांच्या मानाने आप्पा वर्णाने सावळे म्हणून त्यांची आई त्यांना सावळाच म्हणायची. लहानपणापासून आप्पांचा स्वभाव हट्टी. सगळं त्यांना हवं असायचं. मात्र एखादी गोष्ट देण्याची वेळ आली तर तितक्याच तातडीने द्यायचेसुद्धा. आप्पांना भावंडे तीनच. आप्पा सर्वात मोठे आणि पुढे दोन वर्षाने लहान तात्या उर्फ मोरेश्वर, तात्यापेक्षा दीड वर्षाने लहान बंडा उर्फ विष्णू आणि बंडापेक्षा दोन वर्षाने लहान सर्वात धाकटी सुमी उर्फ सुमन.

आप्पांच्या लहानपणी घरात हनुमंतराव, आप्पांची आई 'नलिनी' ज्यांना माई नलू म्हणायच्या आणि हनुमंतरावांची आई म्हणजेच माई इतकेच मोठे. हनुमंतरावांचे वडील आणि वडीलभाऊ एका अपघातात वारले. माई आणि हनुमंतराव दोघे वाचले. त्यावेळी हनुमंतराव 2-3 वर्षांचे असतील. त्यामुळे हनुमंतरावांचा सांभाळ त्यांच्या आईने एकटीनेच केला. हनुमंतरावांचे वडील त्यांच्या वडीलांशी घरात भांडून बाहेर पडल्यामुळे माई आणि हनुमंतराव यांच्याखेरीज इतर कोणीही घरात नव्हते. हनुमंतरावांच्या वडीलांच्या मृत्यूनंतर या दोघांचे सांत्वन करायलाही हनुमंतरावांच्या वडीलांच्या घरून कोणी आले नव्हते. खरेतर हनुमतरावांना दोन आत्या आणि एकच काका. हनुमंतरावांचे वडीलच मोठे. त्यामुळे हनुमंतरावांचे वडील प्रथम वारस होता त्या घराला. तरीही कोणी आले नाही. वडीलांच्या धाकाने काका आणि आत्यांनीही पाठ फिरवली होती. इतर नातेवाईक मात्र न चुकता आले होते. "आतातरी सुनबाईला आसरा द्या." असे सांगायला काहीजण गेले होते. मात्र, "मला एकच मुलगा आहे. त्याचे अजून लग्न व्हायचे आहे. दुसरा मुलगाच नसल्याने सुनेचा प्रश्नच येत नाही. आमच्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा ठेवू नका." असे उत्तर मिळाले होते. मात्र, आजुबाजूच्यांनी आणि इतर नातेवाईकांनी वेळच्यावेळी मदत केल्यामुळे माई आणि हनुमंतराव याचे पुढील जीवन बर्‍यापैकी सुखकर झाले होते.

आप्पा निरनिराळे प्रश्न विचारण्यात लहानपणापासूनच तरबेज. आप्पा 8-9 वर्षांचे असतील.
एके दिवशी त्यांनी आईला विचारले "आई, मृत्यू म्हणजे काय?"
या प्रश्नावर काय बोलावे आईला कळेना झाले. तरी तसे न दाखवता म्हणाली "हं. तुला काय करायचंय सावळ्या? कालचा दिलेला अभ्यास झाला का?"
"तेच तर करतोय आई. एका चिमणीचा मृत्यू झाला असं आहे ना पाठात!"
"अरे, मृत्यू म्हणजे देवाघरी जाणे. प्रत्येकजण तिथूनच येतो आणि तिथेच जातो. तुला समजेल हं हळूहळू." आई समजावण्याच्या सुरात म्हणाली. पण समजून गप्प बसेल तर तो आप्पा कसला?
"देवाचं घर केवढं मोठं असेल ना आई? गोरे आजोबा पण तिथेच असतील ना?" या प्रश्नाने मात्र आईच्या डोळ्यात नकळत पाणी आले. पण ते आप्पाला दिसू न देता कसेतरी पदराला पुसले आणि "हं" इतकंच कसंबसं म्हणाली. गोरे आजोबा म्हणजेच हनुमंतरावांचे वडील. इतर भावंडांच्या मानाने ते खूपच गोरे असल्याने गावातले लोक त्यांना गोर्‍या म्हणायचे. जे अपघातात वारले होते. त्यांची कथा अनेकवेळा माईंकडून ऐकल्यामुळे जरी पाहिले नसले तरी ते माहित असल्याप्रमाणेच वाटत होते. जेंव्हा जेंव्हा त्यांचा विषय निघायचा तेंव्हा तेंव्हा आईचे डोळे भरून यायचे.

एक दिवस आप्पाने विचारले "आई, स्वातंत्र्य म्हणजे काय गं?"
या प्रश्नाने मात्र आई चांगलीच चपापली होती. हा आता स्वातंत्र्यलढ्यात भाग वगैरे घेणार आहे की काय असे तिला वाटू लागले.
"सांग ना आई. स्वातंत्र्य म्हणजे काय?"
"अरे, आपल्याला हवे तसे जगणे म्हणजे स्वातंत्र्य. कळलं?"
"आपण तर आपल्याला हवं तसंच जगतो आहोत ना?"
"हो. बरोबर आहे." आईला वाटले विषय इथेच संपतोय बहुतेक. त्यामुळे विषय मिटवण्याच्या उद्देशाने आईने 'हो' म्हणून टाकले.
"म्हणजे आपण स्वातंत्र्यात आहोत ना?"
"हो हो."
"मग, इतके लोक कशाला भांडत आहेत की स्वातंत्र्य हवे म्हणून?" आप्पाच्या या प्रश्नावर आई निरुत्तर झाली.
"आपण पारतंत्र्यात आहोत असं म्हणताहेत."
"अरे, इंग्रजांचं राज्य आहे ना? म्हणून म्हणत असतील."
आप्पा नुसताच आईकडे बघत राहिला.
"आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य आहे. ते सांगतील तसेच आपल्याला करायला लागतं."
"पण, आपण तर सगळे बाबा सांगतील तसंच करतो ना ! मग आपल्यावर कुठंय इंग्रजांचं राज्य?"
या आप्पाच्या बोलण्यातून त्याची जिज्ञासा आणि बालिशपण दोन्ही दिसत होते.
"अरे, घरात नसलं तरी बाहेर आहेच ना इंग्रजांचं राज्यss." माई पाठीवर हात ठेऊन हळूहळू चालत येत म्हणाल्या. "ते इंग्रज आले नसते तर वागले असते का अण्णा असे?" माईंना जुन्या प्रसंगांची आठवण झाली. अण्णा म्हणजे हनुमंतरावांचे आजोबा, माईंचे सासरे. इंग्रजांनी दिलेले धान्य घरात घ्यायचे की नाही यावरून हनुमंतरावांचे वडील आणि अण्णा यांच्यात वाद झाला होता. ते धान्य घरात आले तर मी घरात राहणार नाही - असे हनुमंतरावांच्या वडीलांनी ठणकावून सांगितले होते. तरीही अण्णांनी काही धान्य घरात आणलेच. त्यामुळे अण्णांवर रागावून हनुमंतरावांचे वडील घरातून अवघ्या विसाव्या वर्षी माईला घेऊन घराबाहेर पडले होते. नशिबाने पडका वाडा अण्णांनी यांच्याच नावे केला होता. त्यामुळे तेथेच स्वत:चे दुसरे घर त्यांनी थाटले. आता या पडक्या वाड्याचे सुंदर घरात रूपांतर झाले होते.
"वादच झाला नसता. स्वतंचं शेत असताना इंग्रजाला विचारून कशाला घ्यायचं? म्हणून लोक भांडताहेत बर..! हा इंग्रज आपल्या देशातला नाही. तरी आपल्यावर राज्य करू लागलांय." आप्पाला परिस्थिती समजावण्यासाठी माई म्हणाल्या.
"आपण कशाला करू द्यायचं राज्य?" अनवधानाने आप्पा म्हणाला खरा. पण, त्यामुळे माई आणि आई दोघींना एकमेकांकडे पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही.
"खरंय. खरंय." हनुमंतराव दारातून आत येतानाच म्हणाले. स्वातंत्र्यसैनिकांना हनुमंतरावांचा विरोध नव्हता. पण, केवळ आरडा-ओरड करून काही साध्य होणार नाही असे त्यांना वाटत होते.
"नुसती धोतरं नाचवून काही होणार नाही म्हणो. त्यासाठी पहिले आपल्या लोकांना शिक्षण द्या. नाहीतर उद्या स्वातंत्र्य मिळाल्यावर हिशोब तपासायला पुन्हा इंग्लंडातच जावे लागेल." हनुमंतरावांनी एकदम भाषणच सुरू केले. इंग्रज पूर्वी आपल्या देशात नव्हते आणि नंतर आले. इतकेच आप्पाला कळाले. म्हणून त्याने पुन्हा प्रश्न विचारला तो थेट हनुमंतरावांनाच....
"बाबा! इंग्रजांच्यापूर्वी आपण हिशोब कुठे तपासायचो?" हनुमंतरावांचे डोळे मोठे झाले.
आता पुढे काय होणार आहे याचे वेळीच जाणीव झाल्याने "पुरे ! पहिल्यांदा हात-पाय धुवून घ्या. मी जेवायला वाढते. नंतर हात धुवायला जा कुठे जायचे तिथे." असे निर्वाणीचे वाक्य बोलून आईने विषय संपवला.
माईंनीही "माझ्या वाती तशाच राहिल्या की गं बोलता-बोलता." असं म्हणत हळुच पळ काढला.
हनुमंतराव मात्र हात-पाय धुवत असतानादेखिल विचार करीत होते ते आप्पाच्या भवितव्याचा. इतका हुशार मुलगा. शिक्षणाविना रहायला नको. असेच त्यांना वाटून गेले.

आप्पा जितका प्रश्न विचारण्यात तरबेज तितकाच बंडा खोड्या करण्यात.
एके दिवशी बंडाने जवळजवळ सगळा गाव गोळा केला होता. "आता काय केले बंडाने?" म्हणत आई हातातले काम तसेच टाकून धावली होती. इतकी गर्दी पाहून ती जरा चपापलीच. पण बंडा दिसल्यावर तिला हायसे वाटले. नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नव्हते. पण चमत्कार - चमत्कार असे म्हणत गावातली काही मुले दवंडी पिटल्यागत फिरल्यामुळे सगळा गाव जमा झाला होता तो पिंपळाच्या झाडाखाली.
"काय आहे?"
"काहीतरी चमत्कार झालाय म्हणे !"
"म्हणजे काय झालंय?"
"ते काय माहित नाही. पण कळेल हळूहळू."
"अहो मग तुम्ही कशाला आलात?"
"तुम्ही आलात तसेच."
अशा पद्धतीने अडाणीपणे चर्चा चालली होती. बरेच मुले वर बघत होती म्हणून सर्वांनी वर पाहिले. आणि .... चमत्कार नेमका काय? म्हणून सर्वच चकित झाले. पिंपळाच्या झाडाला चक्क कैर्‍या लागल्या होत्या एका फांदीला. एक-दोन जणांच्या चटकन लक्षात आले आणि त्यांनी वेडावाकडा हात दाखवून काढता पाय घेतला. हळूहळू इतरही लोकांना कळाले आणि आपापल्या मुलांना ते ओढून घेऊन जाऊ लागले. आईनेही हे पाहिले आणि बंड्याला कानाला धरून घरापर्यंत आणले. दोन धपाटे घालून म्हणाली "तरीच म्हटलं, गोंद संपला कसा इतक्यांत. तूच केलंस की नाही सगळं?" घ्ररातला गोंद वापरून बंडा आणि त्याच्या मित्रांनी पिंपळाच्या झाडाला कैर्‍या चिकटवल्या होत्या आणि गावात आवई उठवली होती की पिंपळावरच्या मुंजाने कैर्‍या खाल्ल्या. गावातली मुले हेच सांगत घरोघर फिरली. नेमके काय झाले आहे हे पहायला खरेतर गावातली मंडळी जमली होती. कारण कित्येकांना फक्त चमत्कार झाला आहे इतकेच कळले होते. आई आणि बंडाचे बोलणे चालू असताना माईंनी ऐकले.
"काय झालं नलू?"
आईने हकीकत सांगितली.
"जाऊ दे ना नलू. मी सांगते त्याला." माईंनी रागावलेल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न केला.
"माई, याने खोडी केली म्हणून मला इतका राग नाही आलेला. इतक्या उंच हा चढला आणि पडला असता तर?" आईने पदराने डोळे पुसत आपले गार्‍हाणे मांडले. आईचेही बरोबरच होते. कारण बंडा पोटात असतानाच आईचे वडील आणि आई त्याच महिन्यात लगोलग गेले होते. त्याचे दु:ख असल्यामुळे तब्येत थोडी खराब झाली होती. त्यातच आठव्याच महिन्यात झालेला बंडा जगेल का? अशा विचाराने अनेकांनी त्रस्त केले होते. बंडा जगावा म्हणून एक वर्षभर देवाची आराधना आणि व्रत-वैकल्ये सातत्याने करणार्‍या आईला असे वाटणे साहजिकच होते.

एके दिवशी उत्तररात्री कसल्यातरी आवाजाने अचानक आप्पा जागा झाला. नेहमीप्रमाणे बाहेर ओसरीतच वडीलांबरोबर झोपला होता. शेजारी वडील दिसले नाहीत. आत दिवा मात्र दिसला. इतक्यात उजाडण्याची वेळ झालीसुद्धा? एवढ्यात आप्पाला घराच्या दिशेने काही लोक येताना दिसले. त्यात बायकाही होत्या इतकेच त्यांच्याकडील कंदिलाच्या उजेडात कळू शकले.

क्रमश:

गुलमोहर: