निसटून गेलेलं बालपण

Submitted by एस अजित on 16 April, 2010 - 10:33

परवा पुण्याला गेलो होतो. बायकोच्या भावासाठी फ्लॅट बुक करायला. म्हणायला फक्त पुणे. फ्लॅट आंबेगांवला आहे. कात्रज सर्पोद्यानापासुन बरचं आतमध्ये. शहरीकरणांचं वारं अजुन तिथे पोहोचले नाहीये. आंतमध्ये असल्यामुळे एखाद्या लहानश्या गांवात जातो आहोत असंच वाटतं होतं. अगदी माझ्या गांवाची आठवण होत होती. परत येत असतांना एक मस्त दृष्य दिसलं, दोन अगदी लहानं मुलं (साधारणत: ६-७ वर्षांची असतील) एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवुन छान रमत गमत चालली होती. त्या दोघांची मैत्री बघुन मन अलगदपणे बालपणात गेले. अनेक सुखद गोष्टी आठवायला लागल्या. ती मुलं होती तेवढा लहान नाही पण थोडा पुढचा काळ सलग आठवायला लागला.

जळगांव जिल्ह्यातील भडगांव हे गिरणा नदीच्या काठावर वसलेलं माझं छोटसं, शांत गांव. साधारणतः ६ वीत असतांना आम्ही गांवाबाहेरच्या नवीन घरी रहायला आलो होतो. त्याकाळी निसर्ग आपल्या वेळेच्याबाबतीत अगदी चोख होता. तीनही ॠतु विलक्षण सत्ता गाजवत असत. पावसाळा खुप सुंदर असे. घराभोवती बरीच मोकळी जागा असल्यामुळे आईने तिथे खुप कष्ट करुन बाग फुलवली आहे. पाऊस सुरु झाला की उन्हाळ्यापासुन साठवुन ठेवलेल्या सगळ्या भाज्यांच्या बी पेरण्याचा कार्यक्रम असायचा. अगदी सुरुवातीला तर एरंडं सुद्धा पेरायचो. सोबत फुलझाडं देखिल असायची. एकदा गुलाब एवढा बहरला होता की त्यावर एके दिवशी सकाळी ५२ फुलं उमलली होती. त्यादिवशी त्या गुलाबावर फक्त फुलंच दिसतं होती. फुलांच्या खाली दुसर्‍या कळ्या उमलण्याची वाट बघत होत्या. आई त्या वेळी गुलाबाच्या पाकळ्यांचं गुलकंद करित असे. साखर घालुन त्या पाकळ्या काचेच्या बरणीत दिवसभर उन्हात ठेवल्या की झालं गुलकंद. त्याची चव अजुन जिभेवर आहे.

८वी पर्यंत सकाळची शाळा असायची. शनिवारी फक्त दुपारी १२ वाजता. शनिवारचा दिवस विशेष आठवतो कारण सकाळी ११ वाजता आई गरमगरम स्वयंपाक करुन जेवायला वाढत असे. अगदी तव्यावर भाजलेली पोळी पानात. जोडीला बागेतलीच एखादी ताजी भाजी, काकडी, केळाचं शिकरण किंवा दही, शेवटी तोंड भाजणारा वरणं भात. अशा वेळी आईने रेडीयो लावलेला असायचा. ११ वाजता मुंबई केंद्रावर सुरु असलेला कार्यक्रम, त्यातली गाणी ऐकत ऐकत जेवण व्हायचं. त्यावेळीचं 'डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस' हे गाणं तर अजुन आठवतय.

गावात करंदिकर म्हणून एक गृहस्थ फिरते वाचनालय (गायत्री फिरते वाचनालय)चालवत असत. वाचनालयाच्या प्रत्येक सभासदाकडे ते आठवड्यातील एका दिवशी जात असत. सोबत त्यांची सायकल आणि सायकल ला असलेली लाल रंगाची पत्र्याची पेटी. त्या पेटीत मासिक आणि कथासंग्रह, कादंबर्‍या असत. त्यांचा आमच्याकडे येण्याचा वार शनिवार असायचा. आठवड्यासाठी १ मासिक आणि १ पुस्तक असा त्यांचा नियम असायचा. दर शनिवारी दुपारी ३ वाजता ते घरी हजर व्हायचे. लांबुनच 'अजि~त, मी आलोय रे' अशी आरोळी ठोकायचे. शाळेतुन घरी आल्यावर मी त्यांची वाटच बघत असायचो. वाचुन झालेली पुस्तके गोळा करुन तयार असायचो. ते आले की त्या पुस्तकांची त्यांच्या नोंदवहीत नोंद करुन ते मला नवीन पुस्तकं दाखवायचे. त्यांचा नियम मी धाब्यावर बसवुन हावरटासारखी ३-४ पुस्तकं आणि ३-४ मासिकं ढापायचो. ते अगदी अग्निहोत्रं सिरियल मधल्या महादेव सारखी आरडाओरडं करायचे. पण त्यांचा राग लगेच जायचा व ते म्हणायचे 'वाचा, शक्य तेवढं वाचा, जे मिळेल ते वाचा' त्यांच्या मजेशिर बोलण्याचं आम्हाला फार हसु यायचं.

आईला कुठेही नवीन प्रकारचे रोप दिसले की ती ते घेऊन यायची. एकदा जळगांवहुन तीने बुचाचं रोप आणलं. उंचच उंच वाढ्णारं हे झाड, हिवाळ्यात अंगणात फुलांचा सडा घालतं असे. दुसर्‍या वर्षी बागेत बरिच बुचाची रोपं उगवली होती. निसर्गाला जिथे जागा मिळाली तिथे त्याने नवीन रोपांना जन्म दिला होता. एकदा बागेला पक्क कुंपण करायचे ठरले, बुचाचं एक झाडं तसं लहानच होतं पण साधारणत: १०-१२ फुट वाढले असेल, अगदी रस्त्यात येत होते. आईने ते मला काढून (म्हणजे तोडून) टाकायला सांगितले. (आमच्याकडे कुर्‍हाड देखिल होती आणि झाडांना आकार देण्याचे काम माझ्याकडेच असायचे) एवढं वाढलेलं झाडं काढून टाकणे माझ्या अगदी जीवावर आले होते, मग मी प्रयत्न करुन झाडाभोवती बराच मोठा आणि खोल खड्डा केला. फुट दिड फुट मुळं असलेलं झाड मी उपटून काढलं. विचार केला एवीतेवी ते तोडणारच होतो. बघुया जगतय का? दुसर्‍या मोकळ्या जागेवर ते झाडं उभं केलं त्याला आधाराला दोन्ही बाजुने बांधुन ठेवले. रोज त्याची प्रगती बघु लागलो. आधी त्याची सगळी हिरवी पाने झडून गेली. माझ्या आशा संपत चालल्या होत्या. शेवटी ते वाळलेले झाडं काढुन टाकण्याचे ठरविले. पावसाळा सुरु होताच. झाडं काढायला गेल्यावर मला झाडावर अगदी नाजुक कोंब आलेले दिसले. खुप आनंद झाला. वाटले आपले प्रयत्न सफल झाले. ८-१५ दिवसांत कोवळी पाने दिसायला लागली. झाड जगलं होतं. खुप छान वाटलं. परवा ई-टी व्ही वर राजु परुळेकर एका पर्यावरणवाद्याची मुलाखत घेत होता. त्यात मुंबई नासिक महामार्गाच्या चौपदरी करणासाठी वडाच्या झाडांची भरमसाठ कत्तल झाली. त्याबाबत हळहळ व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की 'चीन मध्ये अशी समस्या उद्भवते त्यावेळी तिथे मोठमोठ्या क्रेन्सच्या सहाय्याने जिवंत झाडं मुळापासुन काढली जातात आणि दुसर्‍या सुरक्षित ठिकाणी लावली जातात.' हे ऐकुन मला वरचा प्रसंग आठवला होता त्यावेळी मनं विलक्षण समाधानाने भरुन गेले होते. ते झाडं अजुनही बागेत आहे.

हिवाळा म्हणजे चैन असायची. अक्षरश: हाडं फोडणारी थंडी पडायची. दसर्‍याला सगळी बाग शेवंती आणि झेंडुच्या फुलांनी केशरी पिवळी झालेली असायची. त्यावेळी आमच्याकडे स्कुटर होती. दसर्‍याला सकाळी स्कुटर स्वच्छ धुवायची, तिला बागेतल्या झेंडुच्या फुलांचा हार घालायचा. नंतर सिमोल्लंघनाला जायचे. मस्त मजा असायची. दिवाळी या सगळ्या आनंदाचा परम बिंदु असायची. आसपासची ८-१० घरे मिळुन एका ठिकाणी दिवाळीचा फराळ तयार करित असे. चांगला महिना दिड महिना पुरेल एवढा फराळ प्रत्येकासाठी बनविला जात असे. दिवाळीच्या दिवसांत पहाटे लवकर उठुन अभ्यंग स्नान आटोपुन फटाके वगैरे सोपस्कार पार पडले की मग हातात फराळाचे ताट (ताटच, कारण एवढे पदार्थ असायचे की ताटली पुरायची नाही.) आणि सोबत एक मस्तसं पुस्तक. बागेतल्या कट्ट्यावर मग जी बैठक बसायची ती उन्हाचे चटके जाणवे पर्यंत. हिवाळ्यातली रात्र चमेली आणि पारिजातकाच्या सुवासात न्हाऊन निघत असे.

उन्हाळ्यात परिक्षेच्या शेवटच्या दिवशी घरी आलो की 'सु~टलो, म्हणून ओरडायचं आणि भर उन्हात आईच्या रागवण्याकडे दुर्लक्ष करुन बाहेर हुंदडायला जायचो. दिवसभर क्रिकेट एके क्रिकेट. दुपारी जेवायला घरी. वडील माध्यमिक शिक्षक होते. शाळेचं संमॄद्ध वाचनालय होतं. सुटी लागली की दुसर्‍या दिवशी सकाळी स्कुटर आणि एक मोठ्ठी नायलॉन ची पिशवी घेऊन मी शाळेत जात असे. दादांच्या म्हणजे वडीलांच्या नावावर शाळेतुन पिशवीभर पुस्तकं घेऊन येत असे. त्यात सगळे देशी परदेशी लेखक असायचे. मग काय दुपारचे जेवण झाले की एक पुस्तक घ्यायचे आणि मान पाठ डोळे दुखेपर्यंत ते पुस्तक वाचुन काढायचे. संध्याकाळी क्रिकेट किंवा नदीवर पोहायला जाणे एवढाच उद्योग असायचा. त्यावेळी नदीला उन्हाळयातसुद्धा पाणी असायचे, आता नदीवर ठिकठिकाणी धरणं झाली. पाणी असं कधी येतच नाही. उन्हाळ्यात रात्री घराच्या गच्चीवर झोपायचे. अंधार पडल्यावर लवकर जाऊन गाद्या घालुन ठेवायच्या. जेवणं वगैरे होऊन झोपायला जाईपर्यंत त्या गारेगार झालेल्या असायच्या.

आठवणी भरमसाठ आहेत. लेख फारच लांबेल म्हणून इथेच थांबतोय. कंटाळ्वाणा वाटणार नाही अशी अपेक्षा करतोय. या विचारांनंतर मनाला निराश करणारा विचार सुद्धा येऊन गेला. 'मी यातलं कोणतं सुख पुढच्या पिढीला देऊ शकणार आहे?' उत्त्तर आलं एकही नाही. काळाचा महिमा.

गुलमोहर: 

चांगलं लिहिलेसं. आमच्याकडेही बुचतरु आहे पण कडूनिंबाची जशी जागोजागी रोपे उगवलीत तसे अजून एकही रोप बुचाचे नाही उगवले. बुचतरुच्या खोडावर तळहात फिरवला की त्याचा एक वेगळाच स्पर्श जाणवतो.

लहानपण इतक्या बारीक सारीक डिटेल्स मधे रंगवता येणं ही सुध्धा बालपण खुप छान गेलं ह्याची पावती असते. तुझ्या आईनी पण तुझ्यात हे सगळे इंटरेस्ट्स निर्माण व्हावेत म्हणून खूप कष्ट घेतलेत.

खूप आवडलं.

.............८वी पर्यंत सकाळची शाळा असायची. शनिवारी फक्त दुपारी १२ वाजता. शनिवारचा दिवस विशेष आठवतो कारण सकाळी ११ वाजता आई गरमगरम स्वयंपाक करुन जेवायला वाढत असे. अगदी तव्यावर भाजलेली पोळी पानात. जोडीला बागेतलीच एखादी ताजी भाजी, काकडी, केळाचं शिकरण किंवा दही, शेवटी तोंड भाजणारा वरणं भात. अशा वेळी आईने रेडीयो लावलेला असायचा. ११ वाजता मुंबई केंद्रावर सुरु असलेला कार्यक्रम, त्यातली गाणी ऐकत ऐकत जेवण व्हायचं. त्यावेळीचं 'डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस' हे गाणं तर अजुन आठवतय.

११ वाजता मराठी गाणी मुंबई केंद्रावर लागायची मजा यायची जेवता जेवता ऎकायला. त्या नंतर विवीध भारती. आपल्या आठवणी वाचून छान वाटले. काय साधे व सोपे आपले आयुष्य होते - आता असे वाटते आपण हल्ली खुपच कॉम्प्लीकेटेड करुन ठेवले आहे. ह्याची काही गरज नाही खरे म्हणजे.

"'डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस" हे गाणं अनेक वर्षांनी आठवलं, ते गुगल वर शोधायला गेलो. मूळ गाणे कुठे मिळाले नाही पण हा लेख गुगलने काढून दिला. अगदी असेच माझे बालपण. किरकोळ फरक पण बाकी हुबेहूब Happy ते गाणे मुंबई आकाशवाणीवर सकाळी ११ वाजता कामगार विश्व मध्ये सारखे लागायचे. आमच्या इथे मुंबई आकाशवाणी अत्यंत क्षीण ऐकायला यायची. तरीही कानात जीव आणून ऐकायचो. तीच गोष्ट पुणे आकाशवाणी वरच्या लहान मुलांनी सादर केलेल्या "आपली आवड" कार्यक्रमाची. महिन्याच्या चौथ्या कि कोणत्या एका रविवारी दुपारी साडेबारा वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचा. पुण्याचे बाकी सगळे कार्यक्रम सहक्षेपित करणारी आमची सांगली आकाशवाणी नेमका हा कार्यक्रम सहक्षेपित करत नसे. त्यामुळे थेट पुण्याहून प्रचंड खरखर टरटर करत प्रक्षेपण ऐकू यायचे. तरीही ऐकायचो. सगळी लहान मुलांची गाणी लागायची. "असावा सुंदर चोकलेट चा बंगला" वगैरे. घरी टेपरेकॉर्डर नव्हता त्यामुळे सलग अर्धा तास बालगीते ऐकायची सुवर्णसंधी अशी महिन्यातून एकदाच यायची Happy ती सुद्धा नीट नाही. आता तासनतास टीव्ही समोर कार्टून नेटवर्क बघणारी मुले पाहिली कि हे दिवस हटकून आठवतात. काळ खूप बदलला राव. कधी कधी वाटते च्यायला म्हातारे झालो आपण Biggrin