सोहळे

Submitted by desh_ks on 27 March, 2008 - 23:20

रात्र सरली, दूर तम झाले कुठे पण?
जाणतेपण जाणता आले कुठे पण?

माजलेली यादवी चोहीकडे ही
ते तृणांचे आजला भाले कुठे पण?

ही कुणाची पाउले रेंगाळणारी?
मार्ग जाणारे खुले झाले कुठे पण?

अंतरंगी वादळे घोंघावणारी
निग्रही ती पापणी हाले कुठे पण?

सर्व काही आज बाजारीच झाले
हे खरे नाणे अरे चाले कुठे पण?

दु:ख होते गिळत माझे सर्व असणे
संपलो मी, ते तरी धाले कुठे पण?

जन्मवेरी या जगाला भोगले की
भोगण्याचे सोहळे झाले कुठे पण?

सांगुनी झाली कहाणी सर्व माझी
नांव बघ ओठी तुझे आले कुठे पण?

गुलमोहर: 

>>सर्व काही आज बाजारीच झाले
हे खरे नाणे अरे चाले कुठे पण?

अगदी सही!

>>जन्मवेरी या जगाला भोगले की
भोगण्याचे सोहळे झाले कुठे पण?

छान वाटला शेर. जन्मवेरी हा शब्द आधी ज्ञात नव्हता मला.

>>सांगुनी झाली कहाणी सर्व माझी
नांव बघ ओठी तुझे आले कुठे पण?

खूप छान. सतीश फार दिवसांनी लिहिलत.

जन्मवैरी असं आहे का?

आवडली गझल.

दु:ख होते गिळत माझे सर्व असणे
संपलो मी, ते तरी धाले कुठे पण?>>>हा शेर नाही समजला.

सांगुनी झाली कहाणी सर्व माझी
नांव बघ ओठी तुझे आले कुठे पण?>>>एकदम मस्त

"वेरी = पर्यंत" आजन्म अशा अर्थी तो शब्द वापरला आहे. 'भोगणे' आणि सोहळा साजरा करणे यातला फरक लक्षणीय आहे नाही का?

"धाले = तृप्त झाले". आपलं असणेपण ज्या ज्या प्रकारातून व्यक्त होतं, सिद्ध होतं, त्या त्या सार्‍यालाच दु:खानं ग्रासलं तर एक वेळ त्या असण्याचंच निरर्थक असं ओझं होतं. त्या बधीरपणात असण्याचा आपला अनुभव जणु संपतोच. पण निर्दयी दु:ख तरीही भुकेलेलंच राहतं.

चिन्नू, शामली - अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

-सतीश

छान!
पापणी आणि कहाणी हे शेर विशेष आवडले!!
"धाले" शब्दही आवडला...