आम्रपाली

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 8 April, 2010 - 06:06

आज एक लेख लिहिताना आम्रपालीच्या उल्लेखापाशी नजर थबकली. बौध्द काळातील एक सौंदर्यवती, अभिसारिका, गणिका, नगरवधू आणि तिची ही अनोखी कहाणी!

buddha_and_the_courtesan_amrapali_bi39.jpg

इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली. प्रतिष्ठित घराण्यांतील अनेक सरदार, नामदार तरुणांना तिचे आकर्षण वाटू लागले. तिच्यावरून वैशाली नगरीत अराजक नको म्हणून मग तिला वैशालीच्या प्रमुख गणिकापदी नियुक्त करण्यात आले.

अनेक राजपुरुष, सरदार, धनवान तिच्या महाली पाहुणचार घेत. आपल्या रसरशीत लावण्याने व अदाकारीने आम्रपाली सर्व लब्धप्रतिष्ठितांची हृदये काबीज करत असे.

amrapali.jpg

तिच्या सौंदर्याची कीर्ती ऐकून वैशालीशी शत्रुत्व असलेल्या मगधाच्या बिंबिसार राजालाही आपले कुतुहल आवरता आले नाही. त्याने वैशालीवर हल्ला केला आणि काही दिवस आम्रपालीच्या महाली पांथस्थाच्या छद्मवेषात आश्रय घेतला. बिंबिसार राजा हा एक उत्तम कलावंत, कलासक्त व संगीतज्ञ होता. बघता बघता बिंबिसार व आम्रपाली एकमेकांच्या प्रेमात पडले. पण जेव्हा आम्रपालीला त्याचे खरे रूप कळले तेव्हा तिने त्याला तिथून जाण्याची व चालू युध्द समाप्त करण्याची विनंती केली. प्रेमात बुडालेल्या बिंबिसाराने खरोखरीच आम्रपालीच्या इच्छेचा मान राखून युध्द संपवले. त्याच्या ह्या कृतीने वैशाली नगरीच्या नागरिकांनी त्याची भ्याड राजा म्हणून हेटाळणी केली.
ह्या सर्व प्रकारात आम्रपालीने आपल्या नगरीशी इमान राखले.

amrapali bimbisar.jpg

पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला.
एकदा आम्रपालीने रस्त्यातून एका तेजस्वी, देखण्या बौध्द भिख्खुला इतर भिख्खुंच्या समवेत जाताना पाहिले. असे रूप, असे तेज, असा डौल तिने अद्याप पाहिला नव्हता. बर्‍याच काळाने आम्रपालीच्या हृदयात त्या भिख्खुच्या केवळ दर्शनाने चलबिचल झाली, मनात त्याच्याविषयी अभिलाषा उत्पन्न झाली.
तिने त्या भिख्खूला आपल्या महाली भोजनाचे आमंत्रण धाडले. साहजिकच इतर भिख्खूंचा थोडा जळफळाट झाला. ''तो एका क्षुद्र गणिकेच्या घरी कसे काय भोजन करू शकतो?'' त्यांची मने कुरबुरली.
काही काळाने तो बौध्द भिख्खु परत येऊन आपल्या साथीदारांना म्हणाला की आम्रपालीने त्याला वर्षाविहारासाठी, म्हणजेच वर्षाकाळात निवास करण्यासाठी आपल्या महाली राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सर्व बौध्द भिख्खु वर्षाकाळात चार महिने मठांमध्ये किंवा सलग एकाच ठिकाणी निवास करत असत. आम्रपालीचे निमंत्रण त्या तेजस्वी भिख्खूने स्वीकारले नाही. गौतम बुध्दाला विचारूनच, त्याची परवानगी घेऊनच तो हे निमंत्रण स्वीकारेल असे उत्तर त्याने आम्रपालीला दिले.

जेव्हा बुध्दाला ह्या आमंत्रणाविषयी कळले तेव्हा त्याने तक्रार करणार्‍या इतर भिख्खूंना गप्प बसवले व त्या तरुण भिख्खूस पाचारण केले. बुध्दाने विचारल्यावर त्या तेजस्वी तरुणाने सर्व वृत्तांत कथन केला व आम्रपालीने आपल्याला वर्षाविहाराचे निमंत्रण दिल्याचेही सांगितले. बुध्दाने काही क्षण त्याच्या डोळ्यांत खोलवर डोकावून पाहिले व त्याला तसे करण्याची परवानगी दिली. इतर उपस्थितांना ह्याने जबर धक्का बसला आणि लवकरच आम्रपाली व बौध्द भिख्खूच्या संदर्भातील अफवांचे पेव फुटले.

चार महिने होत आले तसे लोक उत्सुकतेने भिख्खू परत येण्याची वाट पाहू लागले. आणि काय आश्चर्य! भिख्खू परत आला पण त्याच्या पाठोपाठ आम्रपालीही भिख्खुणीच्या वेषात चालत येत होती. तिने गौतम बुध्दाची भेट घेतल्यावर आपण कसे त्या तरुण भिख्खूला भुरळ पाडण्याचा, आकर्षित करण्याचा, अनुरक्त करण्याचा वृथा प्रयत्न केला याचे त्यांच्यापाशी वर्णन केले.
बुध्दाने नंतर आपल्या शिष्यांना सांगितले की त्याने तरुण भिख्खूस आम्रपालीच्या घरी राहण्याची परवानगी दिली कारण त्याला त्या भिख्खूच्या डोळ्यांत कसलीही कामवासना दिसली नाही. त्याच्या आत्मभानाने, मनोनिग्रहाने व तेजोबळाने त्याने आपली जागृतावस्था कधीच त्यागली नाही. परिणामवश आम्रपालीचे स्वतःच्या सौंदर्याविषयीचे गर्वहरण झाले व तिला वेगळ्या प्रकारे आयुष्य व्यतीत करण्याची ओढ लागली.

assam-59.jpg

अशा प्रकारे संन्यस्त जीवनाकडे आकृष्ट झालेल्या आम्रपालीने बुध्दाला आपल्या प्रासादात भोजनास बोलावले. बुध्दानेही ते आमंत्रण स्वीकारले. त्यानंतर तिने राजगणिकेच्या आपल्या पदाचा त्याग केला व बौध्द धर्म स्वीकारला. बौध्द धर्माच्या प्रसाराचे काम करता करता तिला आत्मसाक्षात्कार झाला.
बौध्द संप्रदायात तिच्या योगदानाचे, कार्याचे महत्त्व कायम आहे. वयात आल्यावर विमल कौंडिण्यही बौध्द भिख्खू झाला. आम्रपालीच्या अंबपाली आम्रवनात वैशाली मुक्कामी बुध्द राहायचे आणि तिने पुढे हेच आम्रवन बुध्दांना अर्पण केले. ह्याच ठिकाणी बुध्दांनी प्रसिध्द अंबपालिका सूक्त सांगितले.

Buddha_in_Sarnath_Museum_Dhammajak_Mutra.jpg

आम्रपालीच्या जीवनावर आधारित ह्याच नावाचा हिंदी सिनेमा बर्‍याच वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. वैजयंतीमाला व सुनील दत्त ह्यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या.
त्यातील एका गाण्याचा हा दुवा :

http://www.youtube.com/watch?v=LOaTT1McMPw

एक अनोखे आयुष्य जगणारी, सर्व भोगविलास भोगून झाल्यावर जेव्हा आत्मभान येऊ लागले तेव्हा तो प्रवासही धैर्यपूर्वक करणारी, सर्व सुखांचा -मान मरातब - प्रतिष्ठेचा परित्याग करून खडतर वाट पत्करणारी, ज्ञान व भक्तीच्या मार्गात लीन होऊन साक्षात्कारापर्यंत पोहोचलेली, अरहंतपद प्राप्त केलेली ही निश्चयी स्त्री! तिचा हा जीवनप्रवास नक्कीच वेगळा व स्फूर्तीदायी आहे.

--- अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

[ फोटो आंतरजालावरून ]

गुलमोहर: 

खुप सुंदर..

फोटो कुठले आहेत??

मी हल्लीच आम्रपालीची कथा वाचली होती. सुरवात थोडी वेगळीय पण शेवट मात्र सारखाच आहे Happy

आम्रपाली चित्रपटातली सगळी गाणी अतिशय सुंदर आहेत... चित्रपट मात्र आठवत नाहीये आता पुर्ण.

लेख सुरेख आहे. Happy

आमच्या घरमालकानी टिव्ही घेतलेला तेव्हा आम्रपाली हा चित्रपट शनिवारी की रविवारी पाहिल्याच अंधुकस आठवतय.
आम्ही हा त्यांच्या टिव्हीचा पहिला पिक्चर अस म्हणत होतो. Happy

अरुंधती, तुझी स्तुती करावी तेवढी कमी आहे. हिन्दी सिनेमात "पुढे आम्रपालीने बिंबिसाराच्या पुत्रास, विमल कौंडिण्यास जन्म दिला. बिंबिसाराचा पुत्र अजातशत्रू याने वैशालीवर कब्जा मिळवून पूर्वीच्या अपमानाचा सूड घेतला"" हा भाग दाखवलाच नाही. त्या सिनेमात अजातशत्रू हा आम्रपालिच्या प्रेमात पडतो. मग तिला जेंव्हा हे कळते की अजातशत्रू हा आपला शत्रू आहे तेंव्हा ती आणि अजातशत्रू दोघेही बुद्धाला शरण जातात. हिन्दी सिनेमा कितीतरी वेगळा दाखवला आहे.

आम्रपाली हा सिनेमा नृत्यासाठी अवश्य पहावा. काय नाचली वैजयंतीमाला!!!!

लेख आवडला. Happy
आम्रपाली मध्ये लता मंगेशकरने गायलेली ३ अप्रतिम गाणी. शंकर-जयकिशनने दिलेलं संगीत.
तुम्हे याद करते करते....
तडप ये दिन रात की....
नील गगन की छांव मे.......

बी, नानबा, आशुतोश, शैलजा, चिन्नु..... प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आम्रपाली व बिंबिसाराबद्दल चित्रपटामुळे बर्‍याच जणांना माहिती असते परंतु त्यानंतरच्या तिच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल अनेकांना माहित नसते. येथे तो प्रवास फारच अपुर्‍या शब्दांमध्ये मांडायचा प्रयत्न केलाय. Happy