अफगाण स्टार

Submitted by मो on 5 April, 2010 - 13:22

काही दिवसांपूर्वी एचबीओ वाहिनीवर 'अफगाण स्टार' ही डॉक्युमेंटरी पाहिली. आपल्याकडचे 'सा रे ग म प' किंवा अमेरिकेतले 'अमेरिकन आयडॉल' ह्यासारखा टॅलेंट हंट शोजची अफगाणी आवृत्ती म्हणजे अफगाण स्टार. २००९ मधली ही डॉक्युमेंटरी अफगाण स्टारच्या तिसर्‍या सिझनचा आढावा घेते. ह्या डॉक्युमेंटरी मधली मुख्य पात्र म्हणजे ४ स्पर्धक रफी, हमीद, लेमा आणि सेतारा आणि स्पर्धेचा सुत्रधार दाऊद. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गाणारे हे तरुण खरच स्फुर्तीदायक आहेत. हो, स्वतःच्या जिवाची पर्वा, कारण धर्माच्या नावाखाली गाण्याबजावण्यावर बंदी आणणार्‍या तालीबान्यांकडून मृत्यूच्या धमक्या त्यांना मिळल्या, त्या न जुमानता आपले गाणे लोकांपर्यंत पोहोचण्याकरता गात राहून प्राणाची बाजीच ह्या स्पर्धकांनी लावली असे म्हणायला हवे. तिसर्‍या सिझनच्या ऑडीशन्सकरता ३ स्त्रियाही सहभागी झाल्या आणि त्यातल्या २ स्पर्धेत पोहोचल्या. सद्यपरिस्थितील्या अफगाणिस्तानमध्ये हा एक चमत्कारच म्हणायचा! ह्या मुलींच्या जिवाला तर मुलांपेक्षाही जास्त धोका होता. वारंवार धमक्या मिळूनही त्यांना बळी न पडता त्या गात राहिल्या आणि गुणवत्तेच्या आणि लोकांच्या प्रतिसादच्या (एसएमएसच्या द्वारे) जोरावर अंतिम पाचांमध्ये पोहोचल्या!

टोलो नावाच्या वाहिनीने २००५ साली ही टॅलेंट हंट सुरु केली. तालीबान आणि देशातले बरेच मुल्ला मौलवी ह्यांचा रोष पत्करुन हा कार्यक्रम अजून चालूच आहे. (मला वाटते ह्याचे एक कारण म्हणजे वर नमुद केलेल्या लोकांमधले बरेच जणही ह्या कार्यक्रमाचे चे फॅन्स आहेत :)) अफगाणिस्तान मध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम देशातल्या खेड्यापाड्यातही पाहिला जातो.

डॉक्युमेंटरीची सुरुवातच कार्यक्रम सुरु झाला म्हणून घाईघाईत घरी पळणार्‍या दोन छोट्या अफगाणी मुलांनी होते. थोडीफार ऑडीशन्स आणि मग स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांना घेऊन ही डॉक्युमेंटरी पुढे सरकते. ४ मुख्य स्पर्धकांपैकी सर्वात पहिल्यांदा बाहेर पडणारी स्पर्धक आहे सेतारा! हेरत नावाच्या पश्चिमेकडील शहरातली सेतारा ही एक आधुनिक तरुणी आहे. चांगले कपडे घालायला, मेकअप करायला तिला आवडते. स्टेजवर गाताना ती थोडी नाचते ही! तिच्या शेवटच्या गाण्याच्या सादरीकरणाच्या वेळेला ती थोडीशी नाचते, तिच्या डोक्यावरची ओढणीही खाली सरकते. पाहणारे इतर स्पर्धक अवाक! एक जण म्हणतो, ती जे काय करतेय ते फार चुकीचे आहेत, तुम्ही इस्लामीक राज्यात त्यांच्या कायद्यानुसारच रहायला पहिजे. एक जण म्हणतो सेताराचे आयुष्य आता धोक्यात आहे. मुलीने असे नॅशनल टिव्हीवर गाणे आणि त्यातही थोडेसे डोलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रणच!! संगीत सेताराच्या नसानसात आहे. ती म्हणते गाताना माझ्या भावना उचंबळून येतात. खरंच आपल्यापेक्षा काय वेगळ्या आहेत तिच्या भावना! स्पर्धेदरम्यान ती काबूलमध्ये घर भाड्याने घेऊन रहाते. तिच्या शेवटच्या गाण्या-नाचण्यानंतर हेरत मध्ये तिचे आयुष्य धोक्यात आल्या कारणाने ती परत जाऊ शकत नाही. तिच्या गावातली लोकं तिला लूज कॅरेक्टरची, वाईट वळणाची वगैरे म्हणतात. एक जण म्हणतो की तिला मारुन टाकायला हवे, हेरत सारख्या सांस्कॄतीक वारसा असलेल्या गावातल्या मुलीने तिच्या वर्तनाने गावाला लाज आणली आहे. तिचे स्पर्धेत जाणे आणि त्याउपर नाचणे ह्या २ गोष्टींमुळे तिचे आणि तिच्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात येते. तिचा काबूलचा घरमालक तिला घर सोडायला सांगतो. तिच्याकडे हेरतला परतण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. तिला खूप एकाकी वाटायला लागते. सेताराचे आई वडिल तिच्या स्पर्धेत जाण्याबद्द्ल पाठीशी होते, त्यांचे तिच्यावर प्रेमही आहे पण आताच्या परिस्थितीत तिच्या परतण्याबद्द्ल ते फारसे आनंदी नाही आहेत. आई म्हणते की सेतारा विमानतळवरुन घरी येण्याच्या आतच तिला कोणी शूट करु शकेल किंवा गळ्यावर सुरी ठेवून मारुन टाकेल. ह्या भीषण परिस्थितीची सर्वांना पूर्ण कल्पना आहे. सेताराची मनावरचा अतीव ताण, त्यानंतरची कुटुंबीयांबरोबरची भेट सगळेच हेलावून सोडते!

शेवटी उरलेले तीन स्पर्धक लेमा, रफी आणि हमीद हे तिन वेगवेगळ्या जमातींचे आहेत. लेमा पश्तुन, हमीद हझारा आणि रफी उत्तरेकडचा. पण वोट्स मात्र पुर्ण देशातून सगळेजण आपल्या आवडत्या स्पर्धकांना पाठवतात. मध्येच तालीबान पत्रक काढतात की मोबाईल फोनमुळे अमेरिकन्स त्यांचा माग घेत आहेत त्यामुळे अंधार पडला की सगळ्या मोबाईल कंपन्यांनी ट्रान्समिशन थांबवायचे नाहीतर त्यांच्यावर हल्ला होईल. अफगाण स्टारची टीम काळजीत पडते कारण त्यांचा कार्यक्रम एस एम एस वरच चालतो. दाऊद हा कार्यक्रमाचा सुत्रधार हा ही एक आधुनिक अफगाणी आहे. इतर अफगाणी लोकांप्रमाणे त्यालाही युद्ध आणि दबावाखाली जगण्याचा कंटाळा आलाय. टोलो वाहिनी कुठल्याही दबावाला बळी न पडता कार्यक्रम सुरू ठेवण्याचे ठरवते. एकदा तालीबानबद्दल प्रश्न विचारल्यावर दाऊद म्हणतो "Who's Taliban? Let's not talk about them. They are not important. Taliban is finished...". दाऊद त्याच्या लहानपणीच्या सुंदर काबूलबद्दल सांगतो. तेंव्हा वाटते, खरंचे हे लोक कोणत्या मनस्थितीतून जात आहेत त्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा देश बेचिराख झाला. सगळे जग जेंव्हा तुलनेने शांतीमध्ये जगत आहे तेंव्हा त्यांचे दुर्दैव हेच की ते अफगाणिस्तान मध्ये जन्मले आणि अजूनही राहतात! पण त्यातही ते अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वतःकरता आनंद निर्माण करत आहेत.

पुढची बाहेर पडणारी स्पर्धक म्हणजे लेमा. ही पश्तून जमातीची आहे ज्यात अफगाणिस्तानमधली बहुसंख्य लोकं मोडतात. तिची आई (किंवा आजी, लक्षात नाही) तिच्या स्पर्धेत जाण्याबद्दल पुर्णपणे पाठीशी आहे. तिला लेमाचे खूप कौतुक आहे, आणि अभिमान पण वाटतो. तिचा १५ वर्षाचा मुलगा मारला गेल्यानंतर लेमाच्या गाण्यामधूनच आता तिला आनंद मिळतोय. लेमाला शिकवायला एक गुरु येतो ज्याची माहिती पुर्णपणे गोपनिय आहे कारण कोणाला कळले की ही व्यक्ती कोण आहे तर त्याचा जीव जाउ शकतो. मुलीला गाणे शिकवणे हा तालिबान्यांच्या नजरेत मोठा गुन्हा आहे. लेमा आणि तिचे कुटुंबही रात्री लपून छपूनच राहतात. शेवटी जेव्हा लेमा स्पर्धेबाहेर जाते तेंव्हा ती म्हणते मी नेहेमी गात राहणार. कोणी माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरीही.....

वेगवेगळ्या शहरातून हा कार्यक्रम जेंव्हा लोक पाहतात तेंव्हा त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहून भरुन येते. त्यांच्याकरता हा कार्यक्रम पाहणे म्हणजे एक महोत्सव आहे. संगीतात अशी जादू असते की काही क्षणांकरता का होईना ती माणसाला सगळी दु:खं विसरायला भाग पाडते. तुम्हा आम्हा सारखीच ती अफगाणी माणसं, त्यांच्या आयुष्यात हा कार्यक्रम आनंदाचे क्षण घेऊन येतो! रशियन्स, मुजाहीद्दीन, तालीबान ह्यांच्यामध्ये गेल्या ३० वर्षांपासून होरपळून निघालेली ही जनता! ह्यांच्या तरुण पिढीने शांती, सुव्यवस्था, व्यक्तीस्वातंत्र्य काय असते हे पाहिलेच नाही आहे. त्यांच्यासाठी हा आनंद फार मोठा आहे, आणि त्याच्या साठी ते प्राणाचे मोल द्यायला निघालेले आहेत. ह्या कार्यक्रमात गाणी ऐकताना ते सगळी दुःखं, दैना विसरतात. ह्या लोकांच्या चेहेर्‍याकडे पाहताना आपल्यालाच एका प्रकारची शांती वाटते.

खान आडनावाचे एक कुटुंब हे ह्या डॉक्युमेंटरीमध्ये अधुन मधुन दाखवले आहे. हे 'अफगाण स्टार' चे खूप मोठे चाहते आहेत. खान दांपत्याचे कॉलेजमधले, लग्नातले फोटो ते दाखवतात आणि जाणवते की काबूल ८० साली किती वेगळे होते. ८० सालच्या काबूलमधल्या कॉलेजातला एक छोटासा व्हिडिओ दाखवलाय त्यात मुली छोटे केस, स्कर्ट्स आणि मुलं जॅकेट, टी-शर्ट, बेलबॉट्म्स अशा पश्चिमी पेहेरावत दिसतात. एका पॉप ग्रूप मध्ये एक मुलगीही गाणे गाताना दाखवली आहे. ३० वर्षात जेंव्हा बाकीचे जग पुढे गेले तेंव्हा अफगाणिस्तान तेवढेच मागे गेले! खान कुटुंबात आई वडिलांनी जेवढे स्वतंत्र, आधुनिक आयुष्य त्यांच्या तारुण्यात उपभोगले, त्याच्या विरुद्ध आता त्यांच्या मुलींचे आयुष्य आहे. 'अफगाण स्टार' च्या शेवटच्या शो ला सगळे कुटुंब अगदी लग्नाला निघाल्यासारखे नटून सजून जाते :). कार्यक्रमाला जायचे म्हणून त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो.

शेवटच्या २ स्पर्धकांमधला हमीद हा हझारा जमातीचा आहे. अफगाणिस्तान मधली अल्पसंख्यांक असलेली ही जमात पार पूर्वी पासून शोषीत आहे. तालीबान राजवट सुरु झाल्यावर तर त्यांनी 'एथनीक क्लिंजिंग' च्या नावाखाली मझार-ए-शरीफ ह्या ठिकाणी जवळपास ८००० हझारांची कत्तल केली होती. त्यांच्यातला एकजण ह्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत जाणं हझारा लोकांकरता फार अभिमानाची बाब आहे. सगळे कंबर कसून त्याची जाहिरात करण्याच्या मागे लागतात. हमीद गातो पण छान.

अंतिम फेरीतला दुसरा स्पर्धक रफी हा खूप जणांचा फेव्हरेट आहे. १८ वर्षाचा रफी म्हणतो की त्याची लोकं ह्या युद्धामुळे, आपापसातल्या भांडणांमुळे खूप खचून गेली आहेत, त्याला फक्त चांगले गाऊन ह्या लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा आहे. रफीचे मित्र, नातेवाईक त्याच्या पब्लिसिटीसाठी भरपूर प्रयत्न करत असतात. मृदूभाषी रफी अफगाणिस्तानमधल्या बर्‍याच लोकांचा आणि मुलींचा आवडता आहे.

अफगाण स्टार रफी जिंकतो का हमीद ह्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटरी पहा!

ही डॉक्युमेंटरी मला सर्वात जास्त आवडली ती तिच्यातल्या पॉझिटिव्ह टोन करता. आतापर्यंत मी अफगाणिस्तानातल्या आजकालच्या परिस्थितीवर अनेक डॉक्युमेंटरीज पाहील्या, पण त्या तालीबान, युद्ध, भ्रष्टाचार, लोकांची होरपळ ह्या विषयांवरच असायच्या. किंबहुना अफगाणिस्तान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हेच विषय येतात. पण ह्या देशाला एक संस्कॄती आहे आणि संगीत, कला ह्याकरता हा देश प्रसिद्ध होता हे बरेचजण आता विसरले आहेत. जगातल्या इतर लोकांसारखी अफगाणी लोकंही संगीताची चाहती आहेत, पण सद्यपरिस्थितीत ह्या आनंदाला मुकली आहेत. एक कार्यक्रम लोकांच्या आयुष्यात किती आनंद निर्माण करतो, एकी निर्माण करतो, बेडरपणा निर्माण करतो हे ह्या डॉक्युमेंटरीत दिसून येते.

तालीबानच्या धमक्यांनंतरही हा कार्यक्रम अजूनही चालू आहे.... हिंसेने पोळून निघालेल्या अफगाणी लोकांच्या आयुष्यात आनंदाचा शिडकाव करीत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला दिसतोय मुव्ही...नेटफ्लीक्स वरती आहे का बघायला हवं....

छान लिहीले आहे. एका जमातीतील लोक दुसर्‍या जमातील 'स्टार' ला मते देत असतील तर ते फार महत्त्वाचे आहे. तेथील आत्तापर्यंतच्या माहितीत हे लोक आपल्या जमातीपलिकडे बघत नाहीत असे वाटले होते.

कोणती गाणी म्हंटली या स्पर्धकांनी?

गाणी सगळी अफगाणी होती. बहुदा जुनीच होती. सबटायटल्स वरुन काही काही गाण्यांचे अर्थ चांगले वाटले. एका गाण्यात मी मुस्लीम आणि माझी मेहेबूबा हिंदू वगैरे असे काही तरी होते, म्हणजे बरेच जुने गाणे असावे जेंव्हा हिंदू तिथे राहायचे त्या काळातले. (तालीबान आल्यावर जेवढे राहिले होते त्यातलेही बरेच सोडून आले). एका गाण्यात अफगाणिस्तान मधल्या वेगवेगळ्या प्रांतांची नावे होती आणि तरी आपण सगळे एक आहोत वगैरे होते.
एका जमातीतले लोक दुसर्‍यां जमातीतल्या स्पर्धकाला मते देतात (असे सांगितले तरी आहे). खान कुटुंब जे शेवटचा शो लाईव्ह बघायला जाते त्यांच्यातसुद्धा, नवरा, बायको आणि मुली वेगवेगळ्या (रफी किंवा हमीद) स्पर्धकांकरता चिअर करत होत्या.

एकदम झकास...

ह्याच बाबतीत अजून एक पाऊल म्हणजे यंदाच्या T-20 विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ खेळणार आहे..

छान लेख. अफगाणिस्तान मधे असे काहि होत असेल, यावर विश्वास ठेवणेच कठीण आहे आता.
तालिबानपूर्वीच्या अफगाणिस्ताबद्दल वाचले आहे बरेच. तेही आता त्यानाच काय आपल्यालाही स्वप्नवत वाटते.

अरेन वा.. छानच लिहिले आहेस.. भारतात मिळाली तर नक्की पाहू..

असेच मागच्या आठवड्यात सौदीमधल्या आयडॉल स्पर्धेबाबत वाचले.. फक्त गाण्या-नाचाच्या ऐवजी तिथे स्पर्धक कविता वाचून दाखवतात.. त्यात एका स्त्री-स्पर्धकाने महिलांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात एक कविता म्हटली.. त्याबद्दल तिलाही जीवाचा धोका उत्पन्न झाला आहे..

छान माहिती. ही डॉक्युमेंटरी पाहिली तेव्हापासून डोक्यात घोळत होती पण असा लेख लिहावा असे सुचले मात्र नाही!! त्याबद्दल मो चे अभिनंदन.. Happy

अफगाणिस्तानला संगीताचा वारसा आहे. मात्र तालिबान्यानी ते सर्व संपवण्याचाच सपाटा चालवला होता.

अफगाण स्टार चा होस्ट दाऊद सेदीकी ह्याची फ्रेंच टीव्हीवर मुलाखत झाली त्याची लिंक. नोव्हेंबर २००९ मधला व्हिडिओ आहे. दाऊदला डेथ थ्रेट्स मुळे अफगाणिस्तानच्या बाहेर पडावे लागले, त्यानंतरची त्याची मुलाखत.
इंटरेस्ट असल्यास पहा -
http://www.france24.com/en/20091126-daoud-sediqi-afghan-star-pop-idol-af...

काल रात्री बघीतली डिव्हीडी.

अफगाणी तरूण पिढी किती प्रामाणीकपणे समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करतेय हे पाहून खूप कौतुक वाटलं.
आणि असा सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संगीतापेक्षा प्रभावी साधन दुसरे कुठले असुच शकत नाही.
पूर्ण डॉक्युमेंटरीत हा पॉझिटिव्ह टोन ठळकपणे पुढे येतो.

आणि शेवटी ... तालीबान सारख्या राजवटीत आपला जन्म झाला नाही ह्याबद्दल देवाचे आभार मानायचे की अफगाणी लोकांच्या दुर्भाग्याबद्दल कीव करायची... हेच कळत नाही.

मो,

>> काबूल ८० साली किती वेगळे होते.

१९७७ च्या आसपास (चूभूदेघे) माधव गडकरींनी अफगाणिस्थानाचा दौरा केला होता. त्यावर एक पुस्तक लिहिले आहे. त्यात वाचल्याचं आठवतं की कबूल विमानतळावर सुरक्षाविभागात बायका काम करीत असंत. तसेच इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी स्त्रिया बिनधास्त वावरीत. तालिबानची राजवट सुरू झाली आणि बायका कोंडल्या गेल्या.

आ.न.,
-गा.पै.

हा माझा जुना लेख वर आणते आहे. २०१० साली अफगाण स्टार ही डॉक्युमेंटरी पाहिल्या पाहिल्या लगेच लिहिला होता. ... जे वाटतंय ते त्याक्षणी लिहून काढण्याची तीव्र इच्छा झाली होती
मीच या लेखाबद्दल याबद्दल विसरले होते. पण सद्यपरिस्थितीत सतत अफगाणीस्तानाबद्दलच्या बातम्या पाहून आठवण आली.
I just hope कुठल्यातरी प्रकारे या लोकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येवोत.

कुठल्यातरी प्रकारे या लोकांच्या आयुष्यात सुखाचे क्षण येवोत. >>> +१

डॉक्युमेंटरी बघायला हवी. छान ओळख करुन दिली.