उपजतच असलेली कला - कितपत सत्य?

Submitted by स्थितप्रज्ञ on 5 April, 2010 - 06:42

नमस्कार!
अलीकडेच माझा एक मित्र गप्पा मारता मारता म्हणाला की, संगीताचा गंध आपल्या अंगी उपजतच असावा लागतो (Born musician). गप्पांच्या ओघात या विषयावर जास्त बोलता आले नाही. पण मनात एक किन्तु घर करून राहिला. खरेच एखादी कला किंवा एखादा गुण उपजतच असू शकतो का? जगभरातील बऱ्याच मोठ्या संगीतकारांची (vocalists , instrumentalists) माहिती जेव्हा आपण वाचतो तेव्हा लक्षात येते की त्या सर्वांनी आपापली कला शिकण्यासाठी फार फार लहानपणीच सुरुवात केलेली होती. अशी बरीच मंडळी आहेत की जी लहान वयातच फार प्रसिद्ध झाली आहेत - ह्या सर्व गोष्टी "संगीतकार जनामालाच यावा लागतो" किंवा "कलाकार जन्मालाच यावा लागतो " ह्या उक्त्या सार्थ करण्यासाठी कितपत समर्थ आहेत???
वैयाक्तिकली, माझे मत ह्या सर्वांच्या अगदी ठाम विरुद्ध आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे त्यांच्या एक भाषणात म्हणतात - "तानसेन जन्मालाच यावा लागतो ह्यापेक्षा तानसेन घडावा अशी परिस्थिति निर्माण व्हावी लागते...". आणि मी त्यांच्या ह्या वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे.
कुठचिही कला आपल्याला आत्मसात करण्यासाठी ती लहान वयात शिकणे हे जितके कमी महत्वाचे आहे, तितकेच जास्त महत्वाचे हे आहे की आपण ती कला किती जिद्दीने आणि चिकाटीने शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. योग्य मार्गदर्शन, प्रबळ इच्छाशक्ति, सातत्य, संयम आणि आत्म विश्वास यांच्या जोरावर तुम्ही पन्नाशीत सुद्धा एखादी कला आत्मसात करू शकता.
यात दुमत अजिबात नाही की, लहान वयात आपली शिकण्याची क्षमता जास्त प्रभावी असते. परन्तु तीव्र इच्छाशक्ति ही शारीरिक क्षमतान्वर केव्हाही मात करू शकते ही गोष्ट तितकीच खरी!

तुमचा,
संदीप खांदेवाले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजणे आणि उमजणे यात जो फरक आहे तोच शिकून येणे आणि उपजत असणे यात आहे. याविषयी "कट्यार काळजात घुसली " या नाटकात कविराज बाकेबिहारी यांच्या तोंडी खूप छान वाक्य दिली आहेत जे वास्तव आहे. त्यात मूळ फरक हा "विद्या आणि कला" असा आहे. विद्या आत्मसात करता येते परंतु कला ही आत आधीच असावी लागते. ती आत असलेली कला केंव्हा कशी प्रकट होईल ह्याला कुठलीही काल अथवा वयाची मर्यादा नाही. फक्त त्याठिकाणी "तानसेन जन्मालाच यावा लागतो ह्यापेक्षा तानसेन घडावा अशी परिस्थिति निर्माण व्हावी लागते...". हे लागू पडतं. संगीताची सरगम आणि आरोह अवरोह कळाले, रागांचे स्वरसमूह कळाले तरी ते त्या व्यक्तीच्या कंठातून निघतीलच असे नाही. किंवा एखाद्याला रागमालिका न कळूनही अचूक वाजवता अथवा गाता येऊ शकते. त्यावेळी त्याला स्वरांचे ज्ञान असते परंतु स्वरांची ओळख नसते असे म्हणता येईल. "ओळख असणे" ही विद्या आणि "ज्ञान असणे" हे उपजत असे म्हणता येईल. त्यालाच सुकृताचे अधिष्ठान असेही म्हटले जाते.

उपजत कला आणि मग बाजूची परिस्थिती, कलेचे संस्कार, कलाकाराचे कष्ट यातून कलाकार तयार होतो.
पण उपजत काही गोष्टी असल्याशिवाय ते शक्य नसते.

उपजत असते ती कला आणि शिकून येते ते कौशल्य. कला नसेल तर नुसते कौशल्य पुरेसे नाही. नाहीतर नुसती संगणक प्रणाली लिहून नव्या साहित्य/संगीत रचना करता आल्या असत्या.

तीव्र इच्छाशक्ति ही शारीरिक क्षमतान्वर केव्हाही मात करू शकते>> शिकून येते ती क्राफ्ट. आपणहून येते ती आर्ट - कला. साहित्य, संगीत, कला, नाट्य न्रुत्य एवढेच नव्हे तर खेळातील, गणितातील प्राविण्य, अनॅलिटिकल कपॅसिटी हे ही जन्मजात असते. ते गूण नीट पारखून त्यात पारंगतता मिळविण्यासाठी मात्र कष्ट व इच्छा शक्ती, पोषक वातावरण आवश्यक आहे. तेच सात स्वर पण अनू मलिक व रहमान यांच्या रचनातील फरक बघावा. एशर ची पेंटिन्ग्स, रविशंकर ची सतार, शिवामणी ची तालवाद्ये कितीतरी उदाहरणे आहेत.

गायन , चित्रकला या सारख्या कला उपजतच असाव्या लागतात असे वाटते. जसा बुध्यांक हा साधारण उपजत असतो (शिक्षणाने किंवा इतर प्रय्त्नानी फारसा फरक पडत नाही ). तसेच कला ( कलेचा बुध्यांक म्हणता येइल का ? ) ही उपजतच असावी.

मुळात कला आणि कौशल्य दोन्ही उपजत असू शकतं.
हातात/ गळ्यात/ शरीरात असतं ते कौशल्य आणि डोक्यात/ मनात असते ती कला... समज आणि संवेदनशीलतेशी कलेचं नातं आहे.

कवितेच्या बाबतीत मी तर असे ऐकले आहे की "Poetry is 10% inspiration and 90% industry"
म्हणजे १०% ही "उपजत कला" असली तरी त्याला ९०% अभ्यासाची जोड द्यावी लागते. Happy

शरद

I know poetry is the purest expression of a human mind. The industry is involved in the marketing of it for financial gain. But the moment it leaves the poet's mind and is on paper is the perfect creative moment. If we see it in the correct context and the correct frame of reference the poem or creative expression of any other kind will hit us with a force. As in the case of some installations and some art. It is the product of the artist's mind.

अभ्यास म्हणजे सराव या अर्थी असेल तर हो लिहित राह्यलं तरच आपली प्रतिभा वाढत राहील ना.

समहाउ लिखाण आणि अभिनय या दोन कलांमधे उपजत गुणांपेक्षा सराव आणि मानसिकता, संवेदनशीलता याचा मोठा वाटा मला तरी जाणवतो.

पण गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला व इतर दृश्य कला या कलांच्याबाबतीत उपजत गुणांशिवाय काही घडणे शक्य नसते.

हम्म्म, कोणत्या कलेत उपजत गुणांना जास्त महत्व आणि कोणत्या कलेत सरावला हे सांगणं अवघड आहे. लेखन,अभिनयाच्या बाबतीत सराव नक्कीच जास्त महत्वाचा आहे अन्यथा एकसूरीपणा यायला वेळ लागत नाही.
मात्र गायन,नृत्य यात उपजत गुण आणि सराव दोन्हीही महत्वाचे,पण उपजत गुण जरा जास्त मह्त्वाचे. ह्रितिक रोशन आणि शाहिद कपूर यांच्या नाचातला हाच फरक असावा!

लेखनाचा अभ्यास लेखनापेक्षा निरीक्षण, मनन यातून होईल नाहीतर नुसतेच शुद्धलेखन. शाळेत ना.सी.फडक्यांचा प्रतिभासाधन हा निबंध की पुस्तकातला उतारा अभ्यासाला होता. (तेव्हा तर त्या धड्याचीच धास्ती घेतली होती इतका जड होता.)
आगाऊ ह्रितिक आणि शाहिद यात उपजत कोण आणि सरावाचा कोण?

मूर्तीकाराला दगडात आधी मूर्ती दिसते, ते उपजत :मग घडवता येते ते कौशल्य.
दोन्ही ही हवेच .दिसलेली मूर्ती घडवता आली नाही तर काय?

ओह,मला वाटलं की ते स्पष्टच आहे! अर्थातच ह्रितिक नॅचरल टॅलेंट आहे आणि शाहिद सरावाचा! नुसतेच टॅलेंट असेल आणि त्याला सराव मिळाला नाही तर त्याचा 'गोविंदा' होतो Happy

मी उदय अन नीरजाशी सहमत Happy
कोणतिही कला उपजत असावीच लागते
उपजत: काहीच नसेल ज्ञान, तरी आत्मसात करता येतिल काहीज्ञान्/कलाकौशल्ये, पण ते महाकष्टदायक व अपवादात्मक्च!
अन जे काही उपजत आहे, ते आम्ही ज्योतिषी लोक कुन्डली वा हस्तरेषा यान्चे माध्यमातून बघू शकतो.
तसेच जे काही उपजत आहे, त्याचे सन्गोपन संवर्धन होण्याचि परिस्थिती असेलच असे नाही, व ते अडथळे देखिल दिसून येतात कुन्डलीत.
कलाकौशल्ये याच बरोबर प्रत्येक माणसास सिक्स्थ सेन्स उपजत: अस्तोच अस्तो, मात्र तो सेन्स ती ती व्यक्ति मूळात समजुन घेईल की नाही, घेतल्यास डेव्हलप करेल की नाही वगैरे अनेक बाबी बाह्य परिस्थितीवर अवलम्बुन अस्तात!

प्रत्येक कलाकृती ही कला आणि कौशल्य या दोघांची मिळूनच बनलेली असते. वर अज्ञातने म्हटल्याप्रमाणे कला अंगभूत असते तर कौशल्य मिळवता येते. याचे सर्वात महान उदाहरण म्हणजे लता मंगेशकर.
तिचा आवाज जो एकमेवाद्वितीय आहे तो तिला जन्मतःच मिळाला. तसे नसते तर मेहनत करून आत्तापर्यंत कमीतकमी एक तरी गायिका तिच्या तोडीची बनायला हवी होती. (मला आशा तिच्याहून काकणभर जास्तच आवडत असली तरी 'लता ती लता' हे मी पण मान्य करतोच).
पण लताला 'लता' बनायला तिची प्रचंड साधना पण तेवढीच गरजेची होती. हृदयनाथांनी सांगितल्याप्रमाणे 'बाबा गेले म्हणूनच आपल्याला लता मंगेशकर मिळाली नाही तर आज दिदी कोणाची तरी बायको होऊन संसारात रमली असती' हीच ती तानसेन घडवणारी परिस्थीती - नियती!
लताने आपल्या अपार मेहनतीने जे उच्चारतंत्र, ध्वनिक्षेपकतंत्र, श्वासाचे नियंत्रण इ. मिळवले ते तिचे कौशल्य!
विहिरीतून पाणी काढण्याकरता आधी आडात पाणी असावे लागतेच पण त्या बरोबर त्या आडात पोहरा सोडणे हे पण तितकेच महत्वाचे असते.

माझ्या तुटपुंज्या माहितीनुसार या विषयावर खूप संशोधनही झालेले आहे व मेंदूच्या डाव्या व उजव्या बाजूच्या घडणीशी सॄजनशीलता व तर्कशुद्धता निश्चितपणे जोडली गेली आहेत. त्यामुळे, मूलतः कलेकडे
किंवा गणितादी विषयांकडे असणारा कल जन्मतःच असावा. पण सभोवतालचे वातावरण, बालपणीचे संस्कार, मानसिक जिद्द, आत्यंतिक आवड इत्यादी अनेक घटकांमुळे कुणीही , कोणत्याही वयांत एखाद्या क्षेत्रात प्रगति करू शकतो, हेही आपण पहातो. त्याचबरोबर, स्वाभाविक कल असलेल्या क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतिमध्ये जी एक सहजसुंदरता जाणवेल ती केवळ जिद्दीने केलेल्या प्रगतिमध्ये जाणवणं मात्र अशक्य नसलं तरी जरा दुर्मिळच वाटतं.

गायन , चित्रकला या सारख्या कला उपजतच असाव्या लागतात असे वाटते. जसा बुध्यांक हा साधारण उपजत असतो (शिक्षणाने किंवा इतर प्रय्त्नानी फारसा फरक पडत नाही )
>> जेव्हा आपला मेंदू विकसित होत असतो, त्या सुरुवातीच्या वर्षातल्या योग्य शिक्षणानं फरक पडू शकतो बुध्यांकामधे.. आपला कलही ठरू शकतो..

मला स्वतःला असे वाटले की कला या उपजतच येतात. पण त्यांची गोडी लावण्याचे काम आपण नंतर करू शकतो, त्याने त्या कलेत पूर्णपणे पारंगत होता येईल की नाही हा वेगळा भाग.

बाकी, 'वैयक्तिकली' हा शब्द भारी आवडला! Proud

सभोवतालचे वातावरण, बालपणीचे संस्कार, मानसिक जिद्द, आत्यंतिक आवड इत्यादी अनेक घटकांमुळे कुणीही , कोणत्याही वयांत एखाद्या क्षेत्रात प्रगति करू शकतो, हेही आपण पहातो. त्याचबरोबर, स्वाभाविक कल असलेल्या क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतिमध्ये जी एक सहजसुंदरता जाणवेल ती केवळ जिद्दीने केलेल्या प्रगतिमध्ये जाणवणं मात्र अशक्य नसलं तरी जरा दुर्मिळच वाटतं.>>> मस्त लिहलयं...