निलगिरी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माझ्या मित्रमैत्रिणीप्रमाणेच वृक्षही माझे सवंगडीच आहेत. काहिवेळा या दोघांची एक मजेशीर संगति माझ्या मनात बसलेली असते, ग्लिरिसिडिया म्हणजे गिरिपुष्पाचा फ़ुलोरा बघितला कि मला गिरिराज आठवतो आणि निलगिरीचे झाड बघितले कि मला मायबोलीकर भाग्य म्हणजेच भाग्यश्री आठवते.
तिच्या आवडीचे हे झाड. रोजच्या वाटेवरच्या झाडांच्या पानांचा वास घेतल्याशिवाय ती पुढे जात नाही. ती भेटली होती त्यावेळी अवचित निलगिरीचेच झाड समोर दिसले होते, आणि त्याच्या फ़ळांचे भोवरे करुन, मी तिला एक बालिश खेळ दाखवला होता.

nilgiree_fulora.jpg

या झाडाच्या नावापासून सावळा गोंधळ आहे. निलगिरी हि भारताच्या दक्षिणेकडील एक पर्वतराजी आहे, हे आपल्याला माहित आहेच. आता या दोघांचा संबंध काय ते बघु.
सह्याद्रीच्या पर्वतावर कारवी नावाचे एक झाड वाढते. ही कारवी दर सात वर्षानी भरभरुन फ़ुलते. गुलाबी जांभळट रंगाची सुवासिक फ़ुले अवघा डोंगर सुगंधी करून टाकतात. ( २००७ साली हि फ़ुलली होती, पण माझी वेळ चुकल्याने, नॅशनल पार्कात बरीच पायपीट करुन मला ती दिसली नव्हती, आता आणखी ७ वर्षानी, दिसेल ) फ़ुलली कि कारवीचे झाड मरुन जाते.
साधारण अशीच एक वनस्पति, निलगिरी पर्वतावर वाढते. पण ती मात्र १२ वर्षानी एकदा फ़ुलते. फ़ुलली कि अवघा डोंगर निळा करुन सोडते. या अप्रुपाच्या निळाईमूळेच या पर्वताला निलगिरी म्हणतात.
अरे पण आपण तर निलगिरीच्या झाडाबद्दल बोलत होतो ना, ती कथा अजुन वेगळीच आहे. कागद निर्मीतीसाठी भराभर वाढणारे झाड म्हणुन इंग्रजानी या पर्वतांवर ऑस्ट्रेलियन युकॅलिप्टस झाडांची भरपुर लागवड केली. या झाडाना भारतीय भाषेत नावच नसल्याने आणि इंग्रजी नावाचा अपभ्रंश करणेहि जरा अवघडच असल्याने, या झाडाला निलगिरी हे नाव चिकटले. ( अगदी शोले मधल्या बसंति च्या नावाचा इतिहास वाटतो ना हा. )
Eucalyptus melliodora असे याचे शास्त्रीय नाव. या नावाचा अर्थ वेल कव्हर्ड, म्हणजे नीट झाकलेले असा आहे. ऑस्ट्रेलिया हे खर्‍या अर्थाने याचे माहेर. संपुर्ण खंडात हे झाड तिथे आढळते. तिथे याच्या सुमारे ७०० प्रजाती आढळतात. संपुर्ण देशभर एकाच कुळातील वनस्पति असणे, हे जरा दुर्मिळच.
या झाडाचे नाव घेतले कि आपल्याला उंच वाढलेले, एकाच मुख्य खोडाचे झाड आठवते. पण ऑस्ट्रेलियामधे मात्र याच्या झुडुपासारख्या आणि मोठ्या अनेक फ़ांद्या फ़ुटणार्‍या पण जाती आहेत.
आपल्याकडे साधारणपणे हिरवट पांढरी फ़ुले येणारीच जात दिसते, पण तिथे मात्र सुंदर गुलाबी फ़ुले येणारीही जात आहे. निलगिरीच्या कळ्यांवर शंकूसारख्या आकाराचे एक आवरण असते. या झाडाला फ़ुले यायला लागली कि झाडाखाली या टोप्यांचा सडा पडलेला असतो. या टोप्या म्हणजे या कुळाचे मुख्य लक्षण आहे. त्या आधी इतर भारतीय झाडांप्रमाणे, याची पुर्ण पानगळ झालेली दिसत नाही.

nilgiree_fal.jpg

हि थोडीशी वेगळी फ़ुले येणारी जात. यात जी बोंडे दिसताहेत त्याची पुढे छोटीशी फळे होतात. जेमतेम अर्धा सेमी व्यासाची वाटाण्यासारखी फ़ळे होतात. वरती पाच ते आठ पाकळ्यांच्या कमळासारखे कोरीवकाम असते, आनि बुडाशी पिटुकला देठ. चुटकीत हा देठ फ़िरवुन जर हे फ़ळ खाली सोडले तर भोवर्‍यासारखे बराच वेळ फ़िरत राहते.
निलगिरी या झाडाबरोबर आपल्याला निलगिरीचे तेल आठवते. याच्या पानावर मोठ्या प्रमाणात तेलग्रंथी असतात. हे तेल थोड्या प्रमाणात जंतुनाशक असले तरी जास्त प्रमाणात पोटात गेल्यास विषारीही आहे. साधारणपणे सर्दी झालेली असली कि याचा वास आपल्याला सुखावह वाटतो, सर्दीवरच्या अनेक मलमात वासासाठी ते वापरलेले असते पण त्याचा थेट औषध म्हणुन तितकाचा उपयोग होत नाही.
साधारणपणे माकडे वगैरे या झाडाची पाने खात नाहीत, पण कुआला बेअर मात्र या झाडाचा पाला आवडीने खाते. याच्या फ़ुलातला मध खायला काहि किटक आणि मधमाश्या येत असतात.
या झाडाची विविध कारणासाठी आता जगभर लागवड झालीय. सरळसोट वाढणारे खोड म्हणुन लाकडाला मागणी आहे तसेच यापासुन कागद उद्योगासाठी कच्चा माल मिळतो. या झाडाचा कोळसाही चांगला होतो. पण या झाडाची पाण्याची गरज जास्त असते. या झाडांमुळे भूपृष्ठाखालच्या पाण्याची पातळी खाली जाते. खरे तर जिथे अशी पातळे खाली जाणे आणि पर्यायाने जमिनीचे क्षारीकरण थांबवणे गरजेचे असते, तिथे याची लागवड केली जाते.
आपल्याकडे एकेका झाडाची साथ येते. कोल्हापुर भागात याची मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे. परदेशी वाण इथे लावताना, केवळ भराभर वाढ हाच निकष ठेवुन चालत नाही.
या झाडाच्या पानाच्या तेलकटपणामुळे, वणवा देखील या झाडांच्या सानिध्यात लवकर पसरतो.
या झाडापासून काहि रंग मिळवता येतात. पिवळ्या पासून तपकिरी पर्यंतच्या छटा त्यात असतात आणि कापड रंगवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

nilgiree_khod.jpg

या झाडाचे खोडही कायम असे बेंगरुळ. काहि झाडांचे खोड मुलायम असते खरे पण साल सारखी सुटुन येत असते. अधुनमधुन गाठी येतात, आणि मग निखळुनहि पडतात.

भाग्यश्री वाचते आहेस ना ?

विषय: 
प्रकार: 

सरळसोट वाढणारे खोड म्हणुन लाकडाला मागणी आहे तसेच यापासुन कागद उद्योगासाठी कच्चा माल मिळतो. या झाडाचा कोळसाही चांगला होतो. पण या झाडाची पाण्याची गरज जास्त असते. या झाडांमुळे भूपृष्ठाखालच्या पाण्याची पातळी खाली जाते. खरे तर जिथे अशी पातळे खाली जाणे आणि पर्यायाने जमिनीचे क्षारीकरण थांबवणे गरजेचे असते, तिथे याची लागवड केली जाते>>>>>>>>>
सरळसोट वाढते म्हणून बांधावर लावत होते आधी. घर बांधताना बांधावरची झाडं तोडुन त्याचे वासे आणि बॅटन पट्ट्या काढत असत.
शेतकर्‍याला लाकडाचे पैसे वाचतात म्हणून ह्या झाडाचे बांधावर अप्रुप Happy
पाण्याची जास्त गरज हे मात्र खर हा.
अर्थात कोल्हापुरात उसाला पाणी मुबलक असते म्हणून हे झाड बांधावर लावणे त्रासाचे नाही.
मला वाटत जिथे गटर तुंबुन राहते आणि पुढे जायला रस्ता नसतो अशा ठिकाणी हे झाड मुद्दाम लावत असत.
दिनेशदा छान माहिती देत आहातच.
इथे प्रतिक्रिया प्रत्येक वेळी लिहित नाही पण आवर्जुन मी ही लेखमाला वाचत आहेच Happy
त्याचा भोवरा आणि त्या पानांचा वास दोन्ही मस्त असतात Happy

एखाद झाड जिवाला चटका लावेल अस काधिच वाटल नव्हत..माहेरि सोसायटिच्या आवारात ३ निलगिरीची उंचच उंच झाड, २ बुचाची झाड.. गच्चित अभ्यास करताना साथ देणारी ...वार्‍यावर झुलणारी ,सळ्सळणारी पान ,सरळसोट वाढलेल झाड मोहरावर असेल तर येणारा किंचित उग्र दर्प सगळ सगळ आठवल...
कचरा होतो, अंधार पडतो म्हणुन १८ पैकी १६ जणांनी सगळ तोडुन फ़ेकुन द्यायच ठरवल.. काही करता आल नाही.. (एक बुचाच झाड मात्र वाचल..)
असो, या लेखाच्या निमित्ताने आठवण झाली.

मेहंदी भिजवताना जर निलगिरीचे तेल टाकले तर रंग तर छान येतोच शिवाय सर्दीचा त्रास(मेहंदी थंड असल्याने) होत नाही..

वा! अज्ञातवासातून बाहेर यायलाच लागेल आता.

दिनेशदा, पुन्हा गावाला जातेय. सध्या खुप प्रवास सुरु आहे. पुढचा आठवडा परत बाहेर आहे. तिथुन आल्यावर मी पण यात थोडी भर घालीन.

दिनेशदादा,
तुमच्या लेखातून हमखास नवीन काहीतरी शिकायला मिळतेच. नीलगिरीला नीलगिरी का म्हणतात हे कळले. धन्यवाद.
अमेरिकेत, कॅलिफोर्नियातही ही झाडे दिसतात. पण त्यातून लागणारी आग विझवणे भयंकर अवघड. पेटलेला नीलगिरीचा वृक्ष, जोरात फुटतो आणि आग दूरवर पसरवतो असे ऐकले आहे.
पण कुठल्याही झाडाचे गुणवैशिष्ट्य तुमच्या लेखातूनच वाचावेसे वाटते.
ह्या झाडावरून ऐकलेला एक विनोद:
राष्ट्रपती बुश कॉलेजात असताना त्याचा मित्र अचानक चक्कर येऊन पडला आणि खूप गंभीर स्थितीत होता. बुशने ९११ फिरवून इमर्जन्सीला फोन केला. ऑपरेटरने उचलला. तिने विचारले "तुमचा मित्र कुठे आहे?" बुश म्हणाला, " २५१ युकॅलिप्टस स्ट्रीटवर", ऑपरेटर म्हणाली, "नीट ऐकू येत नाहीये. स्पेलिंग सांगता का जरा?". आता बुश गडबडला. थोड्यावेळ विचार केल्यावर बुश म्हणाला, "मी माझ्या मित्राला ओढत जवळच्या ऍश स्ट्रीटवर नेले तर चालेल का? त्याचे स्पेलिंग मला नक्की सांगता येईल".

प्राजक्ता - वाचुन वाईट वाटले. झाडे तोडायला १/२ दिवस पुरतो, पण तेवढी मोठी व्हायला वर्षे लागतात.

दिनेश - मी सुद्धा निलगिरीबद्दल वाचले होते की ते जमिनीतील पाणी शोषून घेते म्हणून. काही वर्षांपुर्वी, वनीकरणासाठी निलगिरीची झाडे लावणार असे वाचले तेव्हा आश्चर्य वाटले. तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अशा वेळी घेतला जातो की नाही माहित नाही. कोल्हापुरच्या आजूबाजूला बरिच झाडे बघितलीत याची. माझ्या शाळेतही एक होते. आम्ही सर्दी झाली कि पाने चुरगाळून त्याचा वास घ्यायचो सर्दी जावी म्हणून.

साधना.

खुपच उपयोगी आहे हे झाड. बरिच माहिती पुन्हा आठवली. माहित नसलेले उपयोगही समजले. दिनेशदा चित्रांसह अचुक माहिती देता हे खुपच बरे आहे समजायला. योग्य ठिकाणी योग्य छायाचित्र. धन्यवाद.

दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे, मीठ पुठलेल्या (अतिपाण्यामुळे क्षारमय झालेल्या) जमिनीवर निलगिरीची झाडे लावतात. पण मग जमिन बरेच वर्षे त्याच्याखाली ठेवायला लागते. तसेच ह्याच्या लाकडाला फारशी किंमत येत नाही (इतर बांधकामाच्या लाकडांसारखी)..

पण निलगिरीचे बुंधे नेहेमीच बेंगळुर नसतात. माझ्या लहानपणी आमच्या घराच्या शेजारी २ मोकळ्या प्लॉट्स मध्ये १०० एक निलगिरीची झाडे होती. त्यातल्या जवळपास सगळ्यांचे बुंधे सरळसोट व गुळगुळीत होते. अर्थात काहींना गाठी होत्या अधेमधे..

सर्वांच्या छान प्रतिक्रिया. मला याचे इंग्रजी नाव जरा उच्चारायला कठिणच वाटतय.
बाहेरुन आणलेल्या बर्‍याच झाडांबद्दलचा आपला भ्रम आता दूर झाला असावा. शोभेसाठी, बोटॅनिकल गार्डनमधे लावायला ठिक पण सर्वदूर लागवड करताना, आपले वड, पिंपळ, उंबरच योग्य.
अर्थात हा नियम नाही. टेकडीवरच्या मातीची धूप होवु नये म्हणून पोर्तुगीजानी गोव्यात आणलेल्या काजुचे, गोवेकरानी, फेणी करुन सार्थक केले आहे, ते विसरुन कसे चालेल.