सोलापूर सेक्स स्कॅंडल - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 2 April, 2010 - 09:57

पहिल्या चहापासून आईने वितंडवाद काढला होता. कुठे गेली होतीस, का गेली होतीस, इतका उशीर झाल्याची लाज वाटत नाही का, आपल्यावर काय प्रसंग गुदरलेले आहेत, त्याचे काहीच वाटत नाही का, हे उद्योग करायला सांगीतले कुणी, यापुढे घरात बसायचे, आता सगळं बंद! आईने नुसते तोंड सोडले होते. मीना तिच्या प्रश्नांची जुजबी उत्तरे देण्याशिवाय काहीही करत नव्हती. मीनाच्या या शांतपणामुळे तर आईने घर डोक्यावर घेतले होते. शेवटी अती झाले अन तिने मीनाच्या चक्क कानसुलात मारली व स्वत: रडायला लागली.

मीनाने तिला उठवले.

मीना - ऊठ आई. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते.
आई - मला उत्तरे बित्तरे नको आहेत. आजपासून तुझे बाहेर जाणे बंद.
मीना - घराच्या दारात खुनाच्या धमकीचे पत्र पोचले. उद्या खून करणारा स्वत: पोचेल. मग आपण दोघीही मरून जाऊ. होय ना?
आई - जास्त बोलू नकोस शहाणपणाने.. तुला वाटते तसे लोक जगात नसतात.
मीना - आपले आत्तापर्यंत जे झाले आहे त्यापेक्षा वाईट काय होऊ शकेल आई?
आई - तू मला प्रश्न विचारायचे नाहीस.
मीना - ठीक आहे. नाही विचारत. पोलिसात जाऊ? तक्रार करू?
आई - मीना, पोलिसांनी त्या भाऊला फ़ाशी दिली तरी आपल्याला काय गं त्याचे? आपले दुर्दैव म्हणायचे.
मीना - बरोबर आहे तू म्हणते आहेस ते. गप्प बसलेले बरे.
आई - अशीच विचारपुर्वक वागत जा गं पोरी! का माझ्या जीवाला घोर लावतेस?
मीना - नक्की अशीच वागेन आई. उद्या पुन्हा कुणी माझ्यावर जबरदस्ती केली तरी गप्पच बसेन
आई - मीना...
मीना - का ओरडतीयस आई? तो नालायक मला म्हणलाच आहे. केव्हाही बोलवेन तुला म्हणून. सी.डी. आहे त्याच्याकडे माझी. ती आता तो सगळ्या जगाला दाखवत असेल. लोक मला तसली मुलगी समजू लागले असतील. नाहीतरी उद्या तुला सोलापुरात तोंड दाखवता येणारच नाही. त्यापेक्षा आजपासूनच घराबाहेर पडणे बंद करूयात. (हे बोलताना मीना रडत नव्हती. तिच्या डोळ्यांतून अंगार बरसत होता.)
आई - मीना.. असलं बोलू नकोस गं! (आई पुन्हा रडायला लागली.)
मीना - मग एक दिवस तो नंदनपण बोलवेल. मग नंतर मला आणखीन कुणाकडेतरी....
आई - मीना... गप्प बस (आई किंचाळली)
मीना - ऐकवत नाही ना? मग यावर उपाय सांग बरं?
आई - मीना, मला हे सगळे सहन होत नाही. तू कशी सहन करतीयस समजत नाही.
मीना - सहन त्यांना करावे लागणार आहे आई. तू बघच मी काय करते ते.
आई - तू काय करणार आहेस ते मला सांगीतल्याशिवाय काहीही करायचे नाही.
मीना - सांगेन आई, पण सगळे झाल्यावरच सांगेन! तुला अभिमान वाटेल माझा! विश्वास ठेव. काळजी सोड.
आई - नाही... मला सांग तुझ्या मनात काय आहे ते...
मीना - आई, तुला आत्ता सांगीतले तर तुला हजार शंका येतील.
आई - काहीतरी वेडेवाकडे..
मीना - नाही आई.. अजिबात नाही. मी योग्य तेच करते आहे.
आई - मीना ... माझे ऐक बाळ... आपण लातूरला जाऊ... हे सगळे विसरून जाऊ.
मीना - लातूरला जायचंच आहे आई, पण सन्मानाने जायच आहे. तुला माहेरी जाताना अभिमान वाटायला हवा.

तेवढ्यात दार वाजले. सकाळी नऊ वाजता कोण आले असेल याचा विचार करत आईने दार उघडले. दारात भाऊंचा नोकर सदू उभा होता.

आई - कोण आपण?
सदू - नगरसेवकांचा निरोप द्यायला आलो आहे.

हे वाक्य ऐकून मीनाही दारात आली. सदूला पाहून तिच्या डोक्यात चमका निघाल्या. पण चेहरा शांत ठेवला होता तिने.

आई - कसला निरोप? (आईचा चेहरा भेसूर झाला होता.)
सदू - साहेबांनी ताईंना घरी बोलवलंय.. आत्ता अकरा वाजता

आई भयानक चिडली. तिने हातात चप्पल घेतली व सदूची गचांडी धरली.

आई - आई बहिणी नाहीत का तुझ्या नगरसेवकाला? तुझ्या आईला का नाही सांगत जायला त्या हरामखोराकडे...

आई शिवराळ भाषा वापरायला लागली तसे मीनाने तिला झटक्यात आत ओढले. सदू गडबडला होता. त्याच्या कल्पनेप्रमाणे मीनाच्या घरात काहीच माहिती असणार नव्हते अन ती अजिबात इच्छा नसताना का होईना पण निरोप ऐकून भाऊंना भेटायला येणारच होती.

मीना - आई.. गल्लीत तमाशा होईल.
आई - सोड मला... याचा मुडदाच पाडते.

सदू अजूनही न घाबरता मात्र गडबडून उभा होता.

मीना - भाऊ, तुम्ही आत या.
आई - मीने... या नालायकाने पाय ठेवला दारात तर पाय मोडून टाकेन त्याचा.
मीना - तुम्ही आत या. आई, तू जरा गप्प बस.

अचानक आईला आठवले की मीना काहीतरी योजना करत होती. अजिबात इच्छा नसूनही ती सदूकडे जळजळीत नजरेने पाहात गप्प झाली.

मीना - बसा भाऊ.

सदूला ’भाऊ’ हा शब्द फ़क्त साहेबांसाठी वापरला जातो इतकाच अनुभव होता. आपलाच उल्लेख भाऊ असा झाल्यावर तो आणखीनच बावचळला. मीनाने दाखवलेल्या ठिकाणी बसून तो जरा पळायच्या तयारीत असावे असाच ऎलर्टपणे बसला.

मीना - मी अकराच्या ऐवजी रात्री आले तर चालेल का त्यांना?
सदू - मला ते अकराला यायला सांग असे म्हणाले.
मीना - मला आत्ता जरा काम आहे. माझं लग्न ठरलं होतं! तेथे जाऊन सांगायचं आहे की आता लग्न करण शक्य नाही. कारण मी आता त्यांच्या लायकीची राहिलेली नाही.
सदू - म्हणजे?
मीना - मला वडील असते तर वडिलांनीच हे जाऊन सांगीतले असते. आधीच या गरिबीत कसेबसे लग्न ठरले होते.
सदू - ते मला काय सांगू नका...
मीना - आणि आज कुत्रा सोडू नका हां माझ्यावर! मी तयार आहे यायला.

या वाक्यावर मात्र सदूचा चेहरा जरासा बदलला. त्याने मान खाली घातली.

सदू - मी निघतो. तुमचा निरोप सांगतो साहेबांना.
मीना - आई तुम्हाला वाट्टेल तशी बोलली याचा राग मानू नका हां! तिला माहीत नाही की तुमची काहीच चूक नव्हती. तुम्ही फ़क्त भाऊंची मदत केलीत. तेही नोकरी आहे म्हणून. तिला आपलं मुलीबद्दल प्रेम वाटतं म्हणून वेड्यासारखी वागली ती...

हे मात्र सदूला ऐकवलं नाही. त्याचा चेहरा खूपच बदलला.

मीना - तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं?
सदू - अं?
मीना - इथलेच आहात का आपण मूळचे?
सदू - अं? नाही.. मी विजापूरचा आहे. बायको अन एक मुलगा, एक मुलगी
मीना - तुम्हाला मुलगी आहे? (मीनाने निरागसपणे त्याच्याकडे हात करत आश्चर्योद्गार काढले.)

आता मात्र सदूला भयंकरच पश्चात्ताप झाला. त्याने खाडकन मान खाली घातली.

मीना - ठीक आहे. येईन म्हणाव मी भाऊंना. अकरा वाजता. तुम्ही पण थांबा खोलीत तुम्हाला थांबायचं असलं तर...मजा बघायला...

सदूच्या डोळ्यात पाणी आले. तो उभा राहिला. त्याने हात केविलवाणा चेहरा करत हात जोडले.

सदू - ताई.. माझी फ़ार मोठी चूक झाली हो... फ़ार मोठी चूक झाली.
मीना - नाही हो.. तुम्हाला भाऊंचे ऐकायलाच लागणार... तुमची चूक नाहीये ती...
सदू - असे नका बोलू ताई.. (सदू रडू लागला.) नका असे बोलू. मी फ़ार चुकलो. माफ़ी द्या मला...
मीना - नाही हो... गरीबाच्या अब्रूचे काय एवढे?
सदू - आई? तुम्ही मारा मला. खरच मारा. या ताईंचा फ़ार मोठा अपराध झाला माझ्याकडून

सदूने मीनाच्या आईचे पाय धरले. ती माउली बिचारी कोसळल्याप्रमाणे रडू लागली. मीना निश्चल भिंतीच्या आधाराने टेकली होती.

सदू - ताई.. माझे चुकले... फ़ार चुकले माझे...

मीनाने सदूला उठवले.

मीना - खरे सांगू? जे झाले, जे होत आहे ते तुम्हालाही मनापासून नकोसे वाटते ना? हो ना?
सदू - ताई.. अहो काय सांगू तुम्हाला... काय काय चाललेले आहे बंगल्यावर...
मीना - नोकरी सोडत का नाही?
सदू - ऐकायचंय? मी भाऊंचा अनैतिक मुलगा आहे. त्यांच्या कामवालीला त्यांच्यापासून झालेला. त्यांच्यापेक्षा आई सात वर्षांनी मोठी होती.
मीना - भाऊंचा...???
सदू - मला त्यामुळेच त्यांनी विजापूरला जागा घेऊन दिली आहे. पण त्यावर त्यांचेही नाव आहे माझ्याबरोबर! आई कधीच गेली.
मीना - फ़ार विचित्र आहे हे सगळे...
सदू - साहेबांचे प्रताप पाहून मी माझी फ़्यामिली कधीच इकडे आणायची नाही असे ठरवलंय.
मीना - अहो पण तुम्ही काम सोडत का नाही?
सदू - ताई... मला केसेसमधे मदत केली म्हणून अटक करवेन अशी धमकी दिलेली आहे.
मीना - क्काय? पण त्यात तेही अडकतीलच ना?
सदू - अहो तो ***** अडकला काय नाही अडकला काय... माझी वाट लागेल ना? त्याच्याकडे पैसा आहे. तो कसाही सुटेल.
मीना - तुम्हाला पगार वगैरे देतात ना?
सदू - फ़ेकतात तोंडावर! हल्ली मी त्यांना नकोसा झालोय. पण बाहेर पडलो तर कदाचित मी बोलेन काहीतरी म्हणून ठेवलंय मला घरात.
मीना - म्हणजे त्यांनाही तुमची भीती वाटते?
सदू - अहो त्या भीतीला काय अर्थ आहे ताई? पैसा काय आहे नालायकाकडे! एका रात्रीत सुटेल***
मीना - म्हणजे तुम्ही असेच वागत राहणार? साध्या घरातल्या मुलींना नासवताना बघत राहणार?
सदू - नाही हो ताई नाही.. असे बोलू नका... मला नाही हे सहन होत. एखाददिवशी साल्याला खलास करणारे मी...
मीना - भाऊ.. शांत व्हा.. फ़क्त एक सांगा.. मला साथ द्याल?
सदू - तुम्ही फ़क्त सांगा ताई.. मी जमेल ते काहीही करेन...
मीना - आत्ता काहीच करायचे नाहीये.. वेळ आली की सांगेन. अन जे काम सांगेन ते तुम्हाला सहज जमेलही..
सदू - अर्ध्या रात्री हाक मारा ताई.... अन आजपासून बंगल्यावर यायचं नाही... मी बघतो कसं हाताळायचं ते..
मीना - चुकताय तुम्ही... मी बंगल्यावर येणार आहे... तुम्ही निघा
सदू - आज येऊ नका ताई..
मीना - त्यांना म्हणाव मीना यायला कशीबशी तयार झाली. पण ती दुपारी दोन वाजता येणार आहे म्हणाव...
सदू - तुम्ही येणार आहात?
मीना - होय.. आणि तुम्ही त्यावेळेस आधीच्यासारखेच वागणार आहात. संशय येईल असे काहीही करायचे नाही.
सदू - अन त्या नालायकाने हात टाकला म्हणजे?
मीना - मी स्वत:च्या इच्छेने येत आहे भाऊ तिथे.... ते मला काही करू शकणार नाहीत.

सदू निघून गेला तेव्हा आई थक्क होऊन मीनाकडे पाहात होती. आपल्या एवढ्याश्या मुलीने एका माणसाचे विचार इतके बदलले याचे तिला आश्चर्य वाटत होते.

परिसंवादाचा दुसरा दिवस सुरू झाला अन शासनाला सोलापुरातून मिळणारा औद्योगीक महसूल १० टक्क्यांनी कसा वाढवावा यावर सोलापूरमधील नामांकित उद्योजक, सर्वपक्षीय पुढारी, इतर शहरांमधील काही एक्सपर्ट्स एकेक करून आपापले मुद्दे मांडू लागले. आमदारसाहेब अननुभवी होते. ते कालपासून ऐकणे जास्त अन बोलणे कमी हेच धोरण राबवत होते. तसाही, कोणताच निर्णय त्यांच्या हातात नव्हता. महसूल मत्र्यांना सेमिनारमधील चर्चेचा अहवाल पाठवण्याचे काम मुंबईच्या एका अनुभवी अभ्यासकाकडे होते. त्यामुळे आमदारसाहेब ’मीही उपस्थित आहे’ हे दर्शवण्यासाठी मधेमधे एखादे वाक्य बोलणे किंवा कुणालातरी अनुमोदन देणे एवढेच करत होते.

डोळ्यांमधे अजूनही लालसरपणा होता. मीना निघून गेल्यावरही आमदार कितीतरी वेळ पीत बसले होते. पहाटे अडीच वाजता त्यांचा डोळा लागला तेव्हाही मिटलेल्या पापण्यांमधे मीनाच्या कोवळ्या शरीराच्या आकृत्या नाचत होत्या. नऊ वाजता उठलेले आमदार दहाला अजिबात इच्छा नसताना सेमिनारमधे दाखल झाले होते. आज त्या पोरीला कुठे व कसे बोलवावे याचा विचार सोलापुरच्या महसुलाहून कितीतरी जास्त पटीने त्यांचे मन व्यापून होता. बहुधा तिला जिल्हा उपप्रमुख म्हणून जाहीर केल्यावर आपोआपच कालच्यासारखे समर्पण ती स्वत:हून करायला इच्छूक असेल असा कौल त्यांच्या मनाने त्यांना दिला. हा नंदन लेकाचा कोण आहे ते बघायला हवे असे त्यांना वाटले. त्यांनी मधेच सहाय्यकाला बोलवून भाऊंना फ़ोन करायला सांगीतले. पाचच मिनिटात ’भाऊ फ़ोनवर आहेत’ असा मेसेज आल्यावर साहेब बाहेर गेले व फ़ोन घेतला.

बंडा - भाऊ
भाऊ - साहेब... नमस्कार... मी येणारच होतो... पण आपला सेमिनार चालला आहे म्हणून म्हं...
बंडा - हा नंदन कोण आहे? (आमदारांनी भाऊंची बडबड मधेच तोडून विचारले.)
भाऊ - काय झालं साहेब?
बंडा - नंदन कोण आहे नंदन? आपल्या पार्टीत?
भाऊ - इथलाच पोरगा आहे साहेब. पार्टीचे काम करत असतो माझ्याबरोबर...
बंडा - काय लेव्हलला आहे?
भाऊ - काही नाही साहेब... कार्यकर्ताच आहे..काही प्रॊब्लेम झाला का साहेब?

नंदनची चौकशी करण्यामागे आमदारांचे एक विशिष्ट कारण होते. त्याच्या पत्नीला आपण हवे तसे वागवणार, तोही कार्यकर्ता, ती पण एका पदावर, उद्या तो बाहेर पडला अन काहीतरी बरळला तर?

तसेच, ज्या अर्थी त्याचा तिच्या पार्टीत येण्याला विरोध होता, तो नक्कीच आपल्यावर डूख धरणार होता हे आमदारांनी ताडले होते. नंदनला खूष ठेवायला हवे हे त्यांनी पक्के केले होते.

नंदनला काहीतरी जरा वरच्या दर्जाचे काम द्यावे या विचारात आमदार होते. उस्मानाबादला त्याला नेण्यात अर्थच नव्हता. तेथे आधीच आमदारांची लफ़डी अनेक होती. त्यात त्याची बायको तिथे आल्यावर ती आमदारांबरोबर राहू शकलीच नसती. सोलापुरात त्याला ठेवला तर त्याचा बायकोवर सतत अंकुष राहणार होता. तसेच, अचानक काहीच कारण नसताना आपली बायको कशी काय उपप्रमुख झाली हा संशय आपल्या बदनामीला कारणीभूत ठरला असता. लातूरमधून पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होत होती की एक नवा पुढारी आम्हाला मिळावा. कारण तेथील स्थानिकांमधे चाललेल्या वादावादीमुळे कुणाचाच फ़ायदा होत नव्हता.

बंडा - त्याला जरा पाठवा इथे... मला भेटायला
भाऊ - होय साहेब.. पण काही चुकले का साहेब त्याचे?
बंडा - अंहं! जरा वेगळे काम आहे.
भाऊ - होय साहेब, दोघेही येतो...
बंडा - तुम्ही रात्रीच्या बैठकीला आहात ना?
भाऊ - हो आहे ना साहेब?
बंडा - मग आत्ता हेलपाटा नका मारू... रात्री बोलू आपण
भाऊ - ठीक आहे साहेब...

फ़ोन ठेवताना भाऊ एकाचवेळेस प्रचंड घाबरलेही होते अन जळफ़ळतही होते.
आमदारांना कुणाकडून किंवा मीनाकडूनच नंदनबद्दल काही समजले वगैरे असेल तर पंचाईतच होणार होती. अर्थात, नंदन स्वत:च अडकणार असल्याने तो भाऊंचे नाव घेणार नव्हता. पण आमदारांसमोर ततपप मात्र होणार होते त्याचे. आमदारांना काही संशय आला की काय? तसे असले तर सगळे संपलेच म्हणायचे.

पण ती शक्यता वारंवार भाऊ खोडून काढत होते. कारण, सांगायचेच झाले तर मीना भाऊंबद्दल जास्त सांगणार होती. नंदनची गोष्ट वेगळी होती. जर साहेबांनी नंदनला तिच्याशी लग्न करण्याचा हुकूम दिला असता तर ते दोघे नवरा बायको झाले असते किंवा नंदनची पक्षातून हकालपट्टी झाली असती. पण आपले रहस्य कळले तर साहेब आपल्याला माफ़ करणार नाहीत अन वर आरोग्यमत्र्यांना सांगतील हीच शक्यता जास्त होती.

मुळात मीनाचा अन साहेबांचा संबंधच काय पण? ती कशी काय अचानक काही सांगेल? अन तिला सी.डी. ची भीती वाटणारच की? की इतर कुणाकडून तिने सांगवून घेतले असेल? पण अशा सांगण्याला काय आधार?

की असे काही नसेलच? नंदनशी काहीतरी वेगळेच काम असेल? पण साहेबांना तर नंदन कोण हेही माहीत नव्हते? मग अचानक नंदनला का बोलवून घेतले असावे? तेही.. आपल्या अनुपस्थितीत? भानगड काय आहे? नंदन हे नावच मुळात साहेबांना कसे समजले? च्यायला हा सद्या तर मीनाकडे जाऊन आल्यावर म्हणतोय की ती यायला तयार आहे अन कॊलेज असल्यामुळे दुपारी येईल. म्हणजे तिच्या आघाडीवर तर सगळे आलबेल आहे! मग झालंय काय? या नंदनने काहीतरी इतर उपद्व्याप केलेला आहे की काय?

भाऊंनी सद्याला पुन्हा नंदनला बोलवायला पाठवले. ताबडतोब बंगल्यावर ये असा निरोप दिला होता.
शर्मिलाने जाता जाता केलेला अपमान अजून मनातून जात नाही तोवर नंदनला एकट्यालाच बोलवून साहेबांनी आणखीन एक वार केला.

भाऊंच्या डोक्यातील विचारांचा वेग तुफ़ान वाढलेला होता.

नंदनने शर्मिलाचे सगळे ऐकून घेतल्यावर तो हतबुद्धच झाला. दिड अन तीन टक्के, शर्मिलाचा आता एक टक्का वाढलेला होता म्हणजे चार टक्के इतक्या किरकोळ प्राप्तीवर आपण असली साहसे करतो? त्याला सी.डी.चे काय हो्ते हे व्यवस्थित माहीत होते. त्याच्यासाठी आश्चर्याची बाब ती नव्हती. आश्चर्याची बाब ही होती की चंदीगडचा कॊन्टॆक्ट समजला तर शर्मिला ते काम स्वत:च करायला तयार होती अन त्यात नंदनला फ़ार म्हणजे फ़ारच मोठा वाटा द्यायला तयार होती. तो प्लॆन सफ़ल झाला तर कदाचित नंदनला आजवर जे एका केसचे बत्तीस एक हजार मिळायचे त्याजागी आता लाखभर रुपये मिळू शकले असते.
आणि हे सगळे शर्मिला दोन कारणांसाठी करणार होती. मूळ सहभाग शर्मिलाचा असल्यानेच भाऊंना इतकी प्राप्ती होत होती तर मग शर्मिलाने स्वत:च ते का करू नये हे एक कारण आणि भाऊ तिला वाघमारेसारख्याकडेही पाठवतात व धमक्या देतात हे दुसरे कारण!

मात्र या योजनेत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक तरुण वयाचा मुलगा लागणारच होता अन नंदन असताना उगाच असा मुलगा शोधत बसणे हे जिकीरीचेही होते अन वेळ घालवणारेही!

नंदन शर्मिलाकडे बावळटासारखा चेहरा करून पाहात होता. ज्या बाईला भाऊ तिच्या अपरोक्ष शिव्या देतात अन आपणही तिचा वाटा भाऊंकडे मागतो ती तर भलतीच उडी मारणार म्हणतीय! आता असे काही पैसे मिळणार असतील तर आपल्याला तरी भाऊंची काय गरज आहे खरे तर?

शर्मिलाने नेहमीप्रमाणेच आणखीन एक पुरुष जाळ्यात ओढला होता. गालातल्या गालात जॊभ घोळवत ती इनोसंट चेहरा करून नंदनकडे अपेक्षेने पाहात होती.

नंदन - मला चालेल..
शर्मिला - मग झालं तर? आता तो कोण माणूस आहे त्याचा पत्ता काढायचा प्रयत्न करायचा. तू तुझ्या परीने, मी माझ्या परीने..
नंदन - चालेल...येतो मी....

नंदन जात असताना शर्मिलाने शेवटचा एकदा त्याचा चेहरा नीट निरखून पाहिला. नंदनच्या तोंडावर ’भाऊंना फ़सवतेस काय’ अशा स्वरुपाचे कोणतेही भाव नव्हते. उलट ’ही कल्पना भारीच आहे की’ असे भाव होते. शर्मिला आता निवांत झाली होती.

बारा वाजता तिने आवरायला घेतले. एक वाजता ती तिच्या बंगल्यातून बाहेर पडली तेव्हा आमदारावर मोहिनीअस्त्राचा वापर क्षणार्धात होतो याची आठवण काढून मनातच हसत होती.

आणि बराच आधी बाहेर पडलेला नंदन वाटेतच सदू भेटल्यामुळे लगोलग भाऊंकडे गेला होता. आमदारसाहेबांनी ताबडतोब बोलावले हे ऐकून त्याला भीतीच वाटू लागली. तो भाऊंकडून ताबडतोब आमदार जिथे होते ते त्या सेमिनारच्या जागी पोचला. दोन वाजता लंच टाईम होणार होता अन त्यावेळेसच त्याची साहेबांशी गाठ पडणार होती. भाऊंनी ’मीनाने काही सांगीतले की काय’ अशी शंका व्यक्त केल्याने तर त्याची पाचावर धारणच बसली होती. पण भाऊंना न बोलवता आपल्यालाच बोलावले ही बाब काही त्याला समजत नव्हती.

इकडे मीना आपल्या घरातून भाऊंच्या बंगल्याकडे निघाली.

आणि आमदार दोन कधी वाजतात याची वाट पाहात होते. एकदा नंदनला सोलापुराबाहेर पिटाळले की काम झाले या विचारात त्यांना सेमिनारमधील एक वाक्यही ऐकू येत नव्हते.

नंदन साहेबांची वाट पाहात लॊबीमधे चुळबुळत बसलेला असताना त्याला एक जोरदार धक्का बसला. आज सकाळी इतके बोलणे होऊनही नेमके हेच शर्मिलाने का सांगीतले नव्हते की तीही साहेबांना भेटणार आहे हे त्याला समजेना. अत्यंत आकर्षक वेशभुषा करून अचानक शर्मिला तेथे प्रकटली. आता ते एकमेकांच्या शेजारी बोलत बसले. शर्मिलाने सांगीतले की भाऊंना मीनाची भीती वाटत आहे म्हणून माहिती काढण्यासाठी त्यांनी तिला साहेबांकडे पाठवले आहे. हे सांगताना आजवर कितीही रंगढंग केलेले असले तरी नंदनसमोर तिची मान खाली गेली होती. नंदनने त्यालाही साहेबांनी बोलवले असल्याचे सांगीतल्यावर मात्र शर्मिला घाबरली. भाऊंना न घेता याला कसे बोलवले, हा साहेबांना कसा माहीत झाला, खरच मीना कातगडे ही मुलगी आतवर पोचलेली आहे का या शंकांनी ती हैराण झाली. पण नंदनने त्यालाही त्याच शंका भेडसावत असल्याचे सांगीतल्यावर तिला इतके निश्चीत कळले की भाऊ, नंदन अन साहेब मिळून आपल्याबाबत वगैरे काहीही बनाव नाही आहे.

सव्वा दोन वाजता झालेला प्रकार मात्र शर्मिलासाठी मोठाच धक्का होता. आजवरच्या आयुष्यात असा अनुभव तिला आलेला नव्हता. निवांतपणे चालत चालत बाहेर आलेल्या आमदारांना त्यांच्या सहाय्यकाने ’हा नंदन’ असे सांगीतले तेव्हा शेजारीच शर्मिलाही होती. तिने दिलखुलास अभिवादन केले. मात्र आज आमदारांनी किंचित मान लववण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांच्या नजरेत आज वासनेचा लवलेषही नव्हता. त्यांनी सरळ नंदनला बोटांनी खुण करून एका छोट्या केबीनमधे नेले.

आयुष्यभर पुरुषांना खेळवून गब्बर होत असलेल्या व स्वत:च्या सौंदर्याचा अती अभिमान असलेल्या शर्मिलाचा आज केवळ एका क्षणात अपमान झाला होता. सहाय्यकाने तिच्यावरून फ़िरवलेली दृष्टी बघून तिला स्वत:च्या शरीराचीच किळस आली. याच माणसाने आजवर दोन वेळा तिला आमदारांच्या कक्षात पोहोचवले होते. त्यावेळेस तिच्याकडे असे पाहायची त्याची हिम्मत नव्हती. आज साहेबांनी तिच्याकडे केलेले दुर्लक्ष बघून त्याने चांगलेच लक्ष दिले. शर्मिला तोंडावर अत्यंत हिडीस भाव घेऊन तिथेच लॊबीतील एका खुर्चीवर बसून राहिली.

आपल्याला बघून साहेबांना मागच्या वेळेसची आठवण येईल याचा तिला विश्वास होता. भाऊंच्या सांगण्यावरून एकदा उस्मानाबादला अन एकदा मुंबईतील एका हॊटेलात शर्मिलाने त्यांच्याबरोबर रात्र घालवलेली होती. त्यावेळेसचे त्यांचे हपापलेपण बघून तिला आमदार कधीही खुळावता येईल असा गर्व होता. मात्र ती स्वत:हून कधी त्यांच्याकडे गेली नव्हती. त्याचे कारण वेगळेच होते. सहज प्राप्त होणारे आहोत ही इमेज तिला बनवायची नव्हती. भाऊंचे तीन तीन निरोप आल्यावर चवथ्या वेळी भाव खात गेल्यासारखे ती दाखवायची. तसेही त्या भेटींमधून होणारा सगळा फ़ायदा भाऊंचाच राजकीय फ़ायदा होता. एकदा तिने पद धारण करण्याची इच्छा दाखवली तेव्हा ’जरूर’ असे म्हणून आमदारांनी रात्रभर तिचा उपभोग घेतला होता. पण त्यानंतर त्यांच्याशी संपर्कच होणे शक्य झाले नव्हते. अन भाऊंना काही विचारण्याची सोयच नव्हती.

आज आपले दर्शन झाल्यावर सेमिनार वगैरे गुंडाळून आमदारसाहेब आपल्याला कुठेतरी घेऊन जातील या आत्मविश्वासाने ती नंदनशी विशिष्ट पोझिशन घेऊन बोलत होती, पण तिचा पार कचरा झाला होता.

तब्बल अर्ध्या तासाने नंदन बाहेर पडला. शर्मिलाला एक वेगळीही उत्सुकता होतीच. मीना कातगडे हे प्रकरण कितपत गंभीर आहे हे नंदनच्या चर्येवरून तो बाहेर आल्याआल्याच समजेल ही तिची अटकळ होती. पण इकडे नंदनचा चेहरा तर कधी नव्हे इतका फ़ुललेला होता. म्हणजे मीना कातगडे हा इश्यू नाही इतके शर्मिलाला समजले.

नंदन पाठोपाठ दोनच मिनिटांनी बाहेर आलेले आमदार जणू कुणाकडे लक्षच नाही अशा पद्धतीने सरळ बाहेर गेले अन गाडीत बसून निघून गेले.

शर्मिलाची व्हॆल्यू संपली होती. हे शर्मिलाला तीव्रपणे जाणवले होते. आपण केवळ एक वेश्या आहोत ही भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. आजवर अनेक भल्या घरच्या पुरुषांना नादी लावून श्रीमंत झालेली शर्मिला आता स्वत:चा तिरस्कार करत होती. नंदन तिला ’ नंतर भेटतो, आज जरा लातूरला जावे लागत आहे’ इतकेच सांगून हवेत संचारल्यासारखा निघून गेला. सेमिनार सुरू झाला होता. शर्मिला लॊबीत आता एकटीच होती. सुन्नपणे बसलेली शर्मिला!

आणि इकडे वेगळेच नाट्य घडत होते.

मीना बंगल्यावर आली तेव्हा जळजळीत नजरेने भाऊ तिच्याकडे पाहात होते.मीनाला घाबरल्यासारखे नाटक करणे भागच होते. अत्यंत अगतिक व दयनीय चेहरा करून ती त्यांच्यासमोर बसली होती.

भाऊ - साहेबांना काय म्हणलीस?
मीना - कोण सर?
भाऊ - आमदार साहेब? काल हार घातलास तेव्हा?
मीना - सर.. ते म्हणाले तू नर्स आहेस का? मी नाही म्हणून सांगीतलं
भाऊ - तू स्टेजवर कशी आलीस?
मीना - त्यांना नर्सिंगचा कोर्स करणारी मुलगी नेमायची होती त्या कामाला
भाऊ - कुणाला?
मीना - त्या संयोजकांना...
भाऊ - कोण संयोजक?
मीना - मला नाही माहीत, मला एक दळवी म्हणून सर भेटले होते आमच्या कॊलेजमधे येऊन. प्रिन्सिपॊलकडे होते. प्रिन्सिपॊलने मला बोलावले व उद्या स्वागत समारंभात साहेबांचे स्वागत करायचेस असे सांगीतले.

मीनाने ’दळवी’ हे एक बोगस नाव फ़ेकले होते.

भाऊ - कोण दळवी?
मीना - तिथे सांस्कृतिक समीतीवर आहेत ते..
भाऊ - हॊस्पीटलमधे इतक्या नर्स असताना कॊलेजमधील मुलगी कशाला?
मीना - तुमच्याच पार्टीकडून सूचना आली म्हणाले ते...
भाऊ - पार्टीकडून? म्हणजे?
मीना - नंदननेच सांगीतले होते असे म्हणाले... सर.. मला या चक्रातून बाहेर काढा.. मला आमदार साहेबांनी पण त्याच नजरेने पाहिले सर... मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही सर... पण मला असे अडकवू नका सर... प्लीज...

मीनाला अभिनय कधीच जमायचा नाही. त्यामुळे डोळ्यांत पाणी आणणे शक्य नव्हते. म्हणून तोंड दोन्ही हातात खुपसून ती स्फ़ुंदल्यासारख्या हालचाली करत राहिली.

भाऊ अवाक झालेले होते.

नंदन आपला बाप निघाला की काय या शंकेने त्यांचे डोके फ़ुटायची वेळ आली.
आत्ता तास दिड तासापुर्वी इथे आला तेव्हा म्हणालाही नाही की त्याने हिचे नाव सुचवले. कालपासून डोके पिकवतोय हा प्रश्न पण लेकाचा बोलला नाही की या सगळ्यामागे तोच आहे. साला प्रेम बिम करतो की काय हिच्यावर? तसे असले तर आपले काय होणार? पितळ तर उघडे पडणार नाही? पण इतका काळ आपल्याबरोबर निष्ठेने राहणारा नंदन असा कसा वागेल? ही पोरगी खोटे बोलत आहे.

भाऊ - नाटकं केलीस तर निकालात निघशील तू...
मीना - नाही हो सर... दळवी सरांनी त्यांचेच नाव घेतले.
भाऊ - हा दळवी आहे कोण पण?
मीना - तेच मुख्य आहेत सर... समारंभाचे
भाऊ - ते कधी आले होते कॊलेजला?
मीना - काल सकाळी
भाऊ - तेरवा रात्री तू इथे होतीस... अन कॊलेजला जायलाही लागलीस?
मीना - परिक्षा जवळ आल्यात सर..
भाऊ - अन त्या दळवीने तुझेच नाव कसे घेतले?
मीना - सर मला प्रिन्सिपॊलांनी बोलवलं होतं...
भाऊ - पण तुलाच कसे निवडले?
मीना - तेही यांनीच सांगीतले असले तर माहीत नाही.
भाऊ - कोणी?
मीना - नंदन!
भाऊ - अन तू लगेच हसत हसत गेलीस... नाही का?
मीना - सर मला तुमची भीती वाटली.

प्रकरण फ़ारच किरकोळ वाटू लागले. भाऊंच्या मनावरचे मणाचे ओझे उतरले. पण एक ओझे उतरले अन दुसरे ओझे आले. हा नंदन खोटा कसा काय वागला? ही घटनाचक्रंच समजेनाशी झाली होती त्यांना! खोदून खोदून विचारले तर नंदन म्हणतो ही पोरगी स्टेजवर कशी आली माहीत नाही. ही म्हणते त्यानेच हिला यायची सूचना पाठवली. त्यात आमदारसाहेब त्याला एकट्यालाच बोलवतात. काहीतरी मोठा घोळ आहे. आणि आपण आहोत पूर्ण अंधारात!

ही मुलगी त्यादिवशी लाथ मारू शकत होती. आता मुळूमुळू रडतीय! नंदन विचारतो ’माल कसा वाटला भाऊ’? म्हणजे त्याचे तर काही प्रेम नसणार हिच्यावर! बर एवढी सुरक्षा असताना अनोळखी मुलगी एकदम स्टेजवर येते अन कुणालाच काही वाटत नाही हेही भलतेच! म्हणजे ती येणार हे ठरलेलेही असू शकत होते. तसे असलेच तर मग हे कुणी ठरवले? कार्यक्रमाचं तर सगळं राठी बघत होता. त्याला माहिती असणारच कुणी ठरवले ते! काहीतरी विचित्र घडत आहे.

पण मीना अजूनही निराश तोंड करून जमीनीकडे बघत होती. मात्र मधेमधे हळूच इकडे तिकडे बघत होती. सी.डी. कुठे ठेवली असेल ते तिच्या लक्षात येत नव्हतं!

मीना - सर... मी गेले तर चालेल का?

भाऊंना झटक्यात जाणवले की आपण हिला बोलावले कशाला होते अन चर्चा काय चालली आहे. काय असेल ते असो, परवा हिने लाथ मारली, आज हिचा असा उपभोग घ्यायचा की पुन्हा तसा विचारही तिच्या मनात यायला नको. नंदनकडे नंतर बघता येईल.

त्याचवेळेस शर्मिलाने काल रात्री जाताना केलेला अपमान भाऊंना आठवला. आपल्या पौरुषत्वाची एखादी दिड दमडीची बाई निंदा करून जाते हे आठवल्यावर तर त्यांनी तो सगळा सूड मीनावरच घ्यायचे ठरवले.

भाऊ - चाललीस कुठे?

असे म्हणत भाऊ उठले. तिच्याजवळ गेल्यावर ती तटकन उभी राहिली.

मीना - सर... आत्ता नको सर... हवे तर रात्री बोलावून घ्या...
भाऊ - का?
मीना - आई खूप आजारी आहे सर, स्वैपाक राहिलाय, मी कॊलेजमधून इकडेच आलीय थेट सर... प्लीज

ती हे बोलेपर्यंत भाऊंनी तिला खेचली होती. त्यांच्या डोक्यावर भूत सवार झाले होते. तिची कारणे अन बडबड कानापर्यंत पोचतच नव्हती त्यांच्या. अगदीच वेळ आली तर मीना पुन्हा लाथ मारून पळून जाणार होती. पण दोन, चार मिनिटे झोंबाझोंबी चाललेली असतानाच खाडकन सदू येऊन दारात उभा राहिला.

त्याचे आधीपासूनच लक्ष होते. त्यामुळे मीना वाचली. मात्र भाऊ भयानक चिडले.

भाऊ - काय रे नरसाळ्या?
सदू - साहेब नंदनसाहेबांचा फ़ोन आला होता, इकडे येतायत दहा मिनिटात..
भाऊ - कशाला? (अजून त्यांनी मीनाचा दंड धरूनच ठेवला होता.)
सदू - अर्जंट काम आहे म्हणाले..

भाऊंना नंदनला साहेबांनी एकट्यालाच बोलवले होते हे आठवले. ती प्रायॊरिटी जास्त होती. त्यांनी मीनाला सोफ़्यावर ढकलले.

भाऊ - रात्री पार्टीची मीटिंग आहे, ती आठ पर्यंत चालेल. साडे आठला त्यादिवशी सारखी पुन्हा ये.. काय?

मीनाने मान खाली घालून होकारार्थी हलवली. ती दरवाज्याकडे निघाली तसा सदू बाजूला झाला. ती जिना उतरू लागल्यावर भाऊ कडाडले.

भाऊ - नालायक? आत ये...
सदू - काय झालं साहेब?
भाऊ - बोलावल्याशिवाय वाट्टेल तेव्हा येत जाऊ नकोस...

सदू मान खाली घालून खाली निघून गेला तेव्हा मीना रस्त्याला लागून झटझट पावले उचलत होती. वाटेत नंदन दिसू नये इतकीच तिची इच्छा होती.

नंदनने फ़ोन केलेला नसता तर सदू इतर काहीतरी कारण काढून भाऊंच्या महत्कार्यात व्यत्यय आणणारच होता. सुदैवाने नंदनचा फ़ोन हे कारण त्याला मिळाले.

भाऊ शिकार हातातून फ़ुकट गेल्याच्या दु:खात बसून राहिलेले होते. शर्मिला आता साहेबांच्या खोलीत गेलेली असेल असा त्यांनी अंदाज केला. शर्मिला अन नंदन यांना दोघांना तर साहेबांनी बोलवले नसेल ना असाही विचार त्यांच्या मनात आला अन ते आणखीनच अस्वस्थ झाले. एकंदर ग्रहस्थिती विचित्रच होती.
पापकृत्ये करणारे कायम सर्वांवर अविश्वासच दाखवतात या तत्वाचे प्रत्यंतर भाऊंच्या मनस्थितीकडे पाहून आले असते.

आमदारांना भेटून आपल्या जुन्या फ़ियाटकडे नंदन वळला तेव्हा फ़ियाटची कंडिशन बघून त्याला हसू आले. आता गाडी बदलणे शक्य होईल या विचाराने तो खुष झाला होता. सकाळपासून मनात असलेल्या भीतीचे रुपांतर झाले होते स्वप्नपुर्तीत! भाऊंच्या हाताखाली काम करत करत मोठे होण्याचे ध्येय होते त्याचे. पण त्या प्रगतीचा वेग अत्यंत कमी होता. आधी भाऊ मोठे झाले पाहिजेत. मग ते आपल्याला वर घेणार. आणि आज जीवनाने असे काही वळण घेतले की जे स्वप्नातही नव्हते. लातूरच्या शहर शाखेचा सहप्रमुख? मी? मी सहप्रमुख? त्याला आमदारांबरोबर झालेली चर्चा आठवली.

आमदार भाषण देण्यात हुषार होते. तब्बल वीस मिनिटे त्यांनी नंदनला पक्षाच्या निर्मीतीमागची आरोग्यमंत्र्यांची शुद्ध भावना, पक्षाने आजवर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात केलेले कार्य, आजच्या सरकारला असलेला पार्टीचा महत्वाचा टेकू, पक्षातील ग्रोथ प्रॊस्पेक्ट्स, पदाप्रमाणे पक्षाकडून मिळणारे ’अर्थातच व्हाईट’ लाभ वगैरे वगैरे पढवले. ब्रेन वॊश! वीस मिनिटात नंदनला एक मोठाच पर्स्पेक्टिव्ह आला होता. भाऊंबरोबर राहून त्याला पक्षाबद्दल इतके माहीतच नव्हते. त्याची स्वप्ने होती की एखाददिवशी तोही नगरसेवक वगैरे बनू शकेलही. पण आता ते स्वप्न बालीश वाटत होते.

आमदारांनी भलतीच हुषारी केली. आम्ही आमच्या सोअर्सेसकडून तुझे कार्य गेली दोन वर्षे तपासत आहोत. तुझ्यात तळमळ आहे, निष्ठा आहे वगैरे वगैरे! भाऊंना न बोलवता तुला एकट्यालाच बोलवण्याचे कारण हे आहे की तूच तयार नसशील तर भाऊंना उगाचच मी ढवळाढवळ केल्यासारखी भावना निर्माण होईल. तू तयार असशील तर आपण भाऊंना समजावून सांगू शकू.

पुढे साहेबांनी सांगीतले की घरातल्या, नात्यातल्या, मित्रांमधल्या, ओळखीच्यांमधल्या कुणालाही कसलीही आडकाठी करायची नाही. ज्याला ज्याला पक्षात निस्वार्थीपणे काम करायचं आहे त्याला करू द्यायचं! यातच आपली निष्ठा सिद्ध होते. चुकूनही साहेबांनी नंदनच्या बायकोचा विषय काढला नाही. त्याला साधा सुगावाही लागू नये असा त्यांचा हेतू होता.

शेवटी आणखीन सुखद धक्का असा दिला की आज सायंकाळी तुला आणखीन एक अतिशय आनंदाची बातमी मिळेल. मात्र, ती बातमी काय हे बघायला तू इथे थांबायचे नाहीस. तू आत्ताच्या आत्ता आमची ऒर्डर घेऊन लातूरला जा आणि सकाळी चार्ज घेऊन टाक. एक मिनिटही वाया घालवायचे नाही.

भाऊंची तडफ़, वेग, वक्तृत्व अन दुसरी चांगली बातमी मिळणार या सर्व गोष्टींनी अती उत्साहात नंदन भाऊंकडे पोचला मात्र...

भाऊंच्या डोळ्यातील आग बघून दारातल्या दारातच थिजला.

भाऊंनी काय करावे?

त्यांनी सरळ जाऊन नंदनच्या कानसुलात भडकावली.

नंदन बधीर होऊन त्यांच्याकडे बघत होता.

भाऊ - हरामखोर? तू धाडलस त्या पोरीला स्टेजवर?

हा डायलॊगच नंदनला समजेना. कुठली पोरगी, कुठले स्टेज हे संदर्भ लक्षात येईपर्यंत अन गालाची वेदना कमी होईपर्यंत तो नुसता बघत राहिला होता. या सिच्युएशनमधे एक तिढा होता. नंदनला पक्षांतर्गत पद देण्यात आलेले आहे याची भाऊंना कल्पना नव्हती. पक्षांतर्गत पद आपल्या पार्टीत महत्वाचे आहे व खरे तर नंदन इंटरनली आपल्याहीपेक्षा महत्वाचा आहे हे त्यांना माहीत व्हायचे होते. ते माहीत असते तर ते नंदनला मारू काय, त्याच्यावर ओरडूही शकले नसते. अन इकडे नंदनला वाटत होते की आपण साधे एका शाखेचे सहप्रमुख! भाऊ किती मोठे...

घाबरत घाबरत नंदन उद्गारला:

नंदन - भाऊ? अहो काय बोलताय? मी कशाला तिला पाठवीन स्टेजवर? कोण म्हणाले हे तुम्हाला?
भाऊ - (अजून ते ओरडतच होते) ***** ती स्वत: म्हणाली. तू त्या दळवीला सांगीतलं होतस!
नंदन - कोण दळवी?
भाऊ - तो हॊस्पीटलातला..
नंदन - मी? मी काय सांगीतलं?
भाऊ - साहेबाला हार घालायला या पोरीला धाडा म्हणून?
नंदन - अहो काहीही काय भाऊ? मी पाच वर्षे तुमच्याबरोबर आहे. मी कसे असे करीन?

भाऊ हाही एक मुरलेलाच माणूस होता. नंदनच्या तोंडावरील भाव खरे आहेत हे त्यांनी क्षणात ताडले.
खोलीत पंधरा मिनिटे सुन्न शांतता होती.

पंधरा मिनिटे भाऊ शुन्यात बघत होते अन नंदन खिडकीतून बाहेर!

पंधरा मिनिटांनी नंदनने तोंड उघडले.

नंदन - भांडणं लावतीय ती... आपल्यातच..
भाऊ - तिला ओढून आण आत्ता बंगल्यावर
नंदन - तीन वाजलेत भाऊ
भाऊ - आत्ता आण तिला तू...
नंदन - मला गावाला जावं लागतंय भाऊ
भाऊ - काय गावाला बिवाला नाही. ती पोरगी आत्ता अर्ध्या तासात बंगल्यावर पाहिजे मला...
नंदन - साहेबांनी जायला सांगीतलंय...
भाऊ - कोण साहेब?
नंदन - बंडाभाऊ..
भाऊ - तुला?
नंदन - हं!
भाऊ - कुठे?
नंदन - लातूर
भाऊ - का?
नंदन - तिकडचं काम बघायला सांगीतलंय
भाऊ - कसलं?
नंदन - पार्टीचं!
भाऊ - पार्टीचं म्हणजे?
नंदन - लातूरच्या शहर शाखेचं!
भाऊ - तुला?
नंदन - हं!
भाऊ - का?
नंदन - जा म्हणाले तिकडे, तिकडेच राहायचं म्हणाले...
भाऊ - तिकडेच राहायचं म्हणजे? तू पार्टीत आलास?
नंदन - पार्टीत आहेच की मी भाऊ...
भाऊ - पार्टीत आहेस म्हणजे? मीच आणलंय ना तुला?
नंदन - हो
भाऊ - मग?
नंदन - पण हायकमांड म्हंटल्यावर मी काय करणार?
भाऊ - पण माझ्याशी बोलून सांगतो का नाही म्हणालास?
नंदन - आता साहेबांना असं कसं सांगायचं?
भाऊ - पण काम काय आहे लातूरला?
नंदन - हेच आपलं...
भाऊ - काय हेच आपलं?
नंदन - ते ह्याचं.. आपलं.. शहर शाखेच्या सहप्रमुखाचं!

भाऊ ताडकन उभे राहिले. त्यांच्या पायाखलची वाळूच सरकली होती.

भाऊ - तू? शाखाप्रमुख?
नंदन - प्रमुख नाही भाऊ... एक आपला सहप्रमुख आहे मी
भाऊ - तुला प्रमुख केलं? कस काय?
नंदन - कार्य बघितलं म्हणले तुझं?
भाऊ - ********* त्या साहेबाच्या अन तुझ्या... तुझं कसलं ******** कार्य रे *******?
नंदन - शिव्या नका देऊ भाऊ... त्यांनी स्वत:च बोलवून सांगीतलं...
भाऊ - अरे ******* त्या स्वत: बोलवणायाच्या... आम्ही इथे २० वर्षं ** घासतोय... ***** त्या आमदाराच्या
नंदन - मला जायला पाहिजे भाऊ
भाऊ - असा कसा जाशील?
नंदन - म्हणजे?
भाऊ - या सी.ड्या करतो आपण त्याचं काय करायचं?
नंदन - ते आहेच ना भाऊ! लातूरला तेही करणारच ना मी...
भाऊ - थोबाड चालवू नकोस... काय हिकमती करताय तुम्ही सगळे ते समजायला पाहिजे मला
नंदन - कसल्या हिकमती?
भाऊ - तू त्या पोरीबरोबर लग्न करणारेस का?
नंदन - मीना? छे? का?
भाऊ - मग ती स्टेजवर आली, इथे मला सांगते तूच स्टेजवर पाठवलं होतंस, आमदार तुला लातूर शहर प्रमुख करतात..
नंदन - साहेबांनी मला लातूरला पाठवायच स्वत:च सांगीतलं भाऊ, बाकी मीनाचं मला काहीच माहीत नाही.
भाऊ - तू लातूरला जायचं नाहीस...
नंदन - का?
भाऊ - या प्रकरणात असा अडकवीन तुला की बोंबलत पाय धरत येशील माझे
नंदन - तुमचे पाय धरायला तुमचे पाय जागेवर असतील का?
भाऊ - म्हणजे?
नंदन - तुम्हीच नाही का अडकणार आधी?

भाऊ जमेल तितके डोळे मोठे करत असतानाच नंदन त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार करून ताडताड निघून गेला. जाताना ’साहेबांना उगीच शिव्या द्यायला नको होत्यात तुम्ही भाऊ’ असे म्हणाला. झालं! आता याने हे सांगीतलं तर आणखीनच सत्यानाश!

आजवर इतके हतबुद्ध व्हायला झाले नव्हते भाऊंना...

त्यात सदू आला. तो मुद्दाम या परिस्थितीत त्यांना खिजवायला आला होता. त्याचे सगळ्या संवादांकडे लक्ष होते.

सदू - कुत्रा बागेत सोडू का बांधलेलाच असूदेत साहेब?

भाऊंनी उठून त्याला अर्वाच्य शिव्या दिल्या. तो धावत खाली निघून गेला.

इकडे मीना वेगळ्याच काळजीत घरी पोचली होती.

ज्याक्षणी त्या नालायक आमदाराला समजेल की आपण नंदनची बायको नाही... काय होणार आपलं?
आत्ताच समजलं तर उपप्रमुख जाउदेत, आपले धिंडवडे निघतील. अशा वेळेस काय बोलायचं याचा अर्धवट विचार आमदारांना हार घालायच्या आधीच तिने करून ठेवला होता.

ज्याक्षणी आमदार असे विचारतील त्याक्षणी त्यांना कर्मकहाणी सांगायची अन वर सांगायचे की तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणूनच त्या दिवशी मी तुमच्या गेस्ट हाऊसवर आले तर तिथे हे असे झाले. त्याला आपण हवे असलो तर भाऊंना अन नंदनला चांगला धडा शिकवेल. अन तोही नालायक सामीलच असला तर सोलापूर कायमचे सोडून लातूरला निघून जायचे. मात्र जाण्याआधी सरळ पेपरवाल्यांकडे जाऊन भाऊंचे भांडे फ़ोडायचे. मात्र आमदाराला आपण हवे असलो अन भाउंना शिक्षा करण्याची त्याची इच्छा नसली तर मात्र नुसतेच आपले शरीर भोगत राहील नालायक!

चार दिवसांच्या कालावधीत बिचारीला तीन जणांना आपले शरीर सोपवावे लागले होते. पहिल्या वेळेस भावी पती समजून नंदन बरोबर, दुसया वेळेस सी.डी वर स्वत:ला व नंदनला बघून धक्का पचवेपर्यंत भाऊंबरोबर अन तिसया वेळेस काही विशिष्ट हेतूने आमदाराबरोबर!

तिची योजना केवळ एकाच गृहीतावर यशस्वी होण्याची शक्यता होती. ते म्हणजे, आमदार तिला पाहून पाघळणे! तो जर सत्शील असता तर हे सगळे झालेच नसते. मग नुसतेच भेटून ती त्याच्याकडे वैयक्तिक पातळीवर तक्रार नोंदवणार होती. पण त्या समारंभानंतर तो न जेवता गेस्ट हाऊसवर गेल्यामुळे पुढे काय काय झाले हे भाऊंना किंवा कुणालाच कळले नव्हते. कळणारही नव्हते. अन याचमुळे त्याला आपल्या रुपाने भुलवण्याचा डाव तिने हार घालताना टाकला होता. तरुण सत्ताधीश आमदार फ़सला होता. जाळ्यात अडकला होता.

सगळं झाल्यानंतर आमदाराकडे कसे बघायचे याचाही अस्पष्ट विचार तिने केलेला होता. पण ती वेळ खूप दूर होती.

अत्यंत अपमानित मनस्थितीत शर्मिला थेट भाऊंकडे पोचली तेव्हा नंदनची फ़ियाट बाहेर बघून ती निघून गेली. वीस मिनिटांनी पुन्हा तिने बंगल्यावरून चक्कर मारली तेव्हा फ़ियाट नव्हती. मग ती बंगल्यात गेली.
सकाळपासून होईल ती घटना विरोधातच जात होती. भाऊंना क्षणोक्षणी बाटली काढून दोन पेग मारायची इच्छा होत होती. पण संध्याकाळी सात वाजता पार्टी मीटिंग होती. आमदारांच्या जवळपासच बसावे लागणार होते. त्यांना तोंडाचा वास आला असता तर जिल्हा उपप्रमुखपद आणखीन काही वर्षे, पुन्हा त्यांचे मत सुधारेपर्यंत लांब गेले असते. त्यात परत जिल्ह्याचे पक्षप्रमुख स्वत: आमदारच होते. ते तीन जिल्ह्यांचे प्रमुख होते. उस्मानाबाद, सोलापुर अन लातूर! जरी अगदी आज त्यांनी घोषणा केली असती तर नवे उपप्रमुख येतानाच लावून आले आहेत हे पाहून कार्यकर्ते आधीच नाराज झाले असते. त्यामुळे दारूची मदत रात्री नऊनंतरच मिळणार होती. नंदनची मदत नष्ट झालेली होती. उलट नंदनलाच मदत वगैरे करण्याची वेळ भविष्यात येण्याची शक्यता होती. भाऊ सोलापुरचे उपप्रमुख होईपर्यंत तरी निदान नंदन त्यांच्या पेक्षा सिनियरच ठरला असता. त्यामुळेच आजची मीटिंग फ़ार महत्वाची होती. त्यात मीना या सद्यामुळे ऐनवेळेस तावडीतून सुटली होती.

डोक्यावर मुठीने प्रहार करत भाऊ डोळे विस्फ़ारून शुन्यात बघत बसले होते. अन त्यात कालच वर्मावर बोट ठेवून चालती झालेली शर्मिला उपटली. खरे तर तिचे म्हणणे खरे होते. हल्ली भाऊ तिला सॆटिस्फ़ाय करू शकत नव्हते. तिच्या रिस्पॊन्सेसमधूनही त्यांना एकंदरीत निरुत्साहच जाणवायचा. पण त्याचे कारण आपली अक्षमता आहे हे जेव्हा तिने बोल्य़्न दाखवले तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली होती.
मात्र याक्षणी तिचे रूप बघून भाऊ एका क्षणात सगळे विसरले.

अडतिसाव्या वर्षी ती अठ्ठाविशीची वाटत होती. पण तिच्या प्रत्यक्ष असलेल्या व दिसत असलेल्या वयातील फ़रक जोखण्याची आत्ता भाऊंची मनस्थिती नव्हती. त्यांच्या डोक्यावर टेन्शन होतं नंदनचं! हा कसा काय एकदम प्रमुख झाला तिकडचा....

भाऊ - नंदनला लातूरचा प्रमुख केलाय...

शर्मिलाला आपण साहेबांकडे जायला सांगीतले होते अन ती तिथून इथे आलेली असणार हे त्यांच्या डोक्यातही नव्हते. ते आपले त्यांच्याच विचारांमधे गुंग होते. त्यांना शर्मिलाकडून हवा होता मानसिक आधार!

शर्मिला - कोण नंदन?
भाऊ - वेड लागलं का? (भाऊ खवळल्यासारखे ओरडले.)
शर्मिला - ते लातूरचे शाखाप्रमुख का?
भाऊ - तुला माहितीय हे सगळं?
शर्मिला - तुमचे वरिष्ठ आहेत ते.. नंदनजी म्हणायला पाहिजे...

शर्मिला स्त्री होती, या एकाच कारणाने भाऊंनी तिच्यावर उगारलेला हात खाली केला होता असे नाही. शर्मिलाच्या डोळ्यांकडे बघून त्यांना आज भीती वाटली होती. आजचा दिवस आपला नाही. आता ही बाई काय सांगायला आलीय कोणास ठाऊक, या विचारांनी त्यांनी झटकन हात खाली घेतला.

पुढच्याच क्षणी त्यांना आठवलं की शर्मिला साहेबांकडे जाऊन आलेली असणार.

भाऊ - तू? तू सुचवलंस हे? (भाऊ पुन्हा खवळले. शर्मिलामुळे हे झाले असणार असे त्यांना वाटू लागले.)
शर्मिला - काय?
भाऊ - त्याला लातूरला पाठवायचं?
शर्मिला - तुम्ही आज घेतली नाहीयेत का?
भाऊ - नीट बोल शर्मिला...
शर्मिला - आवाज वाढवायचा नाही.
भाऊ - दिड दमडीची रांड आहेस तू... कोणासमोर बोलतेस?
शर्मिला - त्याच दिड दमडीतल्या अर्ध्या दमडीवर जगणाया दलालाशी...

आपण हिचा गळा का दाबत नाही आहोत हे भाऊंना समजत नव्हते. आजवर त्यांच्या आयुष्यात एकाच दिवसात इतक्या प्रतिकूल घटना घडलेल्या नव्हत्या. एक येतो अन तुमच्याच माणसाने मला स्टेजवर पाठवलं म्हणतो. दुसरा येतो जो आपल्याच हाताखाली असतो अन म्हणतो की मी आता तुमचा साहेब झालोय. तिसरा येतो अन आपल्याला आपल्याच घरात दलाल म्हणतो अन निवांत बसतो. चवथा उस्मानाबादहून येतो अन आपल्याच हाताखालच्या माणसाला डायरेक्ट बोलवतो अन आपल्याला काहीही न सांगता त्याची बदली करतो.

प्रचंड प्रयत्नानंतर भाऊ मुद्दाम शांत झाले. सर्व भावना त्यांनी मनाच्या एका कप्प्यात तुर्त झाकून ठेवल्या.

भाऊ - साहेब काही बोलले का? त्या कातगडे मुलीबद्दल?
शर्मिला - साहेब मला भेटले नाहीत.
भाऊ - का?
शर्मिला - मी पसंतीस उतरले नाही आज त्यांच्या.
भाऊ - म्हणजे?
शर्मिला - माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी आज
भाऊ - त्याचा मला अंदाज होताच.
शर्मिला - म्हणजे?
भाऊ - तुला आता वाढत्या वयामुळे असली कामं पेलायची नाहीतच म्हणा..

भाऊंनी काल रात्रीचा वचपा असा काढला.

शर्मिला मात्र शांत होती.

भाऊ - काय सांगायला इथे आलीयस?
शर्मिला - आमदारांनी ज्या अर्थी माझ्याकडे दुर्लक्ष केलं त्या अर्थी..
भाऊ - त्या अर्थी काय?
शर्मिला - तुमचे वाईट दिवस चालू झाले आहेत.

आजही शर्मिला कालच्या सारखाच ’न पेलणारा’ डायलॊग टाकून जायला निघाली. भाऊंनीही नेमका कालचाच डायलॊग टाकला.

भाऊ - कुठे चाललीस?

शर्मिलाचा अंदाज होताच की तिच्याशी खेळल्याशिवाय भाऊ तिला सोडायचे नाहीतच. अन मग त्यावर तिने असे म्हणायचे ठरवले होते की माझ्यावर तर म्हातारेही लट्टू होतात तर आमदार तर तरुणच आहेत. पण भाऊ कमालीचे शांत झालेले होते.

शर्मिला - घरी.

शर्मिला त्यांच्या लाळघोटेपणाची वाट पाहात असताना भाऊ म्हणाले:

भाऊ - एक लाख दे
शर्मिला - कसले एक लाख? (ती चक्रावली होती.)
भाऊ - काल नेलेले. काम जमलं नाही तुला.
शर्मिला - ते आजवरच्या कामांचे होते.
भाऊ - उद्या सकाळपर्यंत माझ्याकडे त्याच नोटा पोचायला हव्यात.
शर्मिला - ’उद्याची सकाळ’ या शब्दांवर किती आशा लावतो नाही माणूस?
भाऊ - म्हणजे?
शर्मिला - उद्या मी दिल्लीला चाललीय. पुण्याहून संध्याकाळी पाचची फ़्लाईट आहे. सकाळी निघणार इथून पुण्याला. (ती चंदीगडला जाणार होती.)

भाऊ - खासदार पटवायला?
शर्मिला - अंहं!
भाऊ - मग?
शर्मिला - तुमचे एक वडील तिकडे राहतात असे कळले. त्यांना सोलापूरला घेऊन यायला.

हार्ट ऎटॆक यायचा बाकी होता. किमान एक तास भाऊ एकाच जागी खिळल्याप्रमाणे बसले होते. शेवटी न राहवून त्यांनी रमची क्वार्टर ड्रायच तोंडाला लावली. तीन घोटच घशाखाली गेले तेव्हा घसा जाळल्यासारख्या वेदना झाल्या. भाऊंचे डोके काम देऊ लागले.

एक तासानंतर नंदन लातूरच्या बसमधे बसला होता. शर्मिलाच्या नोकराने पुण्याच्या ट्रेनचे रिझर्व्हेशन करून आणले होते.

अन त्याचवेळी......

पार्टी मीटिंगसाठी तीन महत्वाची माणसे तयार होत होती.

आमदारांनी सफ़ारी घातला होता.

भाऊंनी झब्बा, पायजमा व त्यावर जॆकेट घातले होते.

आणि......

पुन्हा शोभाकडून उधार आणलेल्या निळ्या साडीत मीना इतकी खुलून दिसत होती की आई तिच्याकडे बघतच राहिली होती.

शक्ती विभागली गेली की कमी होते.

मीनाच्या आहुतीमुळे....

सोलापूर सेक्स स्कॆंडलमधील महत्वाचे मोहरे एकमेकांपासून विखुरले होते... भौगोलिकरीत्या व मनानेही

गुलमोहर: 

विषय असा असल्यामुळे कथेला 'छान, सुंदर' वगैरे म्हणता येत नाहीये मात्र तुमच्या लेखन कौशल्याला अगदी १००% दाद.. असेच पटापट पुढचेही भाग टाका.

बेफिकिर मस्तच रंगवली आहे तुम्ही कथा. मी स्वत: कादंबरी इतक्या उत्सुकतेने कधीही वाचत नाही. पण तुम्ही पोस्टलेले पहिले ३ भाग तर मी एका दमात वाचून काढले. अप्रतिम ओघ अहे तुमच्या भाषेला... आता लवकर संपवा कादंबरी...
कान्ट वेट Happy