कवितेची प्रसृती

Submitted by टवणे सर on 25 March, 2008 - 18:29

ग्रीष्म सरला, वसंत आला
गुलमोहराला फारच मोठा बहर आला ||धृ||
(च्यायला यमक जुळ'ला'???)

इकडे कविता खूप गोड लाजली
तिचा पाय जड झाला
मग एकेदिवशी तिनी
लाखो शब्दांना जन्म दिला ||१||
(कवितेची मनुष्य किंवा म्हैस ह्या प्रकारातील प्राण्यांशी तुलना न करता उंदीर, डास अथवा तत्सम अंडी घालण्यार्‍या अळ्यांशी करावी.. म्हणजे लाखो शब्दांना जन्म घालणे ह्याला स्पष्टीकरण मिळेल..)

पण मग भूतलावर सगळीकडे
शब्द शब्द पसरले --(इथे पसरलेच्या जागी प्रसवले असेही बसु शकते.. तुमची इच्छा असल्यास तसे वाचा.. कवीचा ह्याला मुळीच आक्षेप नाही)
गण, मात्रा, वृत्त
कोपर्‍यात जाउन बसले ||२||
(ह्याचा अर्थ काय, तर तुम्हाला जसा वाटेल तसा)

दुसर्‍या दिवशी सकाळी रवि'किरण' पृथ्वीकडे निघाले (ह्यांना पोचायला साधारण आठ मिनीटे लागतात)
पण आता सर्वदूर मळभ पसरले (सर्वदूर शब्दामुळे कवितेला जागतिक आयाम प्राप्त होतो)
'ड' जीवनसत्त्वाच्या अभावे
शब्दांना मुडदूस झाले ||३||
("मुडदूस झाला"च्या ऐवजी "मुडदूस झाले" अशी शब्दरचना यमक जुळवण्यासाठी केली आहे. तसेच अश्या रचनेमुळे 'शब्दांना' हे बहुवचन अजुनच अधोरेखीत होते)

त.टी.: ... .... .... (गाळलेल्या जागा भरा)

गुलमोहर: 

आपल्या कवितेची उंची बरीच आहे, त्याच उंचीने तिने मळभ निर्माण केले आहे; हे लगेच जाणवते.
पण कवितेने शब्दांना जन्म दिला म्हणजे कवितेचे शीर्षक "कवितेची प्रसूती" असे हवे ना?
तुम्ही स्पष्टीकरणेही दिल्यामुळे कविता सुलभ झाली आहे.

पण तुम्ही ही कविता "कविता" विभागात का टाकलीये? त्याने तिचा साहित्यप्रकार लोकांना स्पष्ट होऊन, कवितेवरचे धुक्याचे रहस्यमयी अवगुंठन दूर झाल्याने तिच्यातला रस कमी होतो.

असेच लिहित रहा (कविता.) आम्ही वाचक आहोतच. Proud :-))

गुलमोहरावराला सध्या आलेला बहर पाहता काल रात्री मला आवरले नाही. आणि मग ही कविता ओघळली. कळेल त्याला कळेल.. मी काही कवी नाही (आणि मला कविता समजतही नाहीत.. ).. पण इथे आजकाल माझ्यासारखे बरेच कवी जमल्याने मी देखील प्रयत्न केला..

प्रसूती पेक्षा प्रसृती वापरले की उगाचच सं'स्कृ'त शब्द वापरल्याचा आभास निर्माण होतो. :ड

टण्या 'कवीतेची प्रस्रुति' लय भारी. Happy

श्र, श्यामली !
:):)

खरच काय ओघळ आलाय पण. Happy सहीच. काहीच्या काही मधे हलवा पण.

अहो आजकाल गुलमोहरावर योग्य बीबीवर लिहायचेच नसते मुळी..

टण्या तुमच्या बहू 'आयामी' व्यक्तित्वाला (व्यक्तीमत्वपेक्षा हा शब्द वेगळा आहे हे लक्षात घ्या.(बरं मग?..) ) साजेशीच प्रसृती आहे ही.
गुलमोहोरावरचे तर्‍हेतर्‍हेचे बहर पाहून प्रत्येक संवेदनशील माणूस वेगवेगळा व्यक्त होईल यात संशय नाही. आम्ही दुर्लक्ष(पलायन सुद्धा चालू शकेल) केले (आता इथं आम्ही म्हन्जे फक्त मीच पण रणछोडदास नावाच्या देवाच्या या देशात असे माझ्यासम बरेच असतील), कुणी वैताग व्यक्त केला, कुणी (कवचकुंडलांसारख्या जन्मजात मिळालेला ) शाणपणा शिकवला तर कुणी असे ओघळाचे पाट काढले.
तुम्ही मी कवी नाही म्हणताय पण एकूण इथली परिस्थिती पहाता खूपच वाव आहे तुमच्या कवितेला. तेवढी हिम्मत धरून नेट (साधा नाही एकदम ब्रॉडबँडच लावावा लागेल) लावलात तर....
आता इथं पुढं एक खदाखदा हसणारा(कविता वाचून) आणि एक दात विचकणारा (मी लिहीलंय ते कुणाला दुखवायला नाही हे सिद्ध करण्यासाठी ) असे चेहरे काढायचेत पण कसे ते माहीत नसल्यानं यावर भागवतेय :))))))))))
आता इथं नक्की कोणकोण दुखावलं जाऊ शकतं हे माहीती आहे पण यादी लिहायचा कंटाळा आल्यानं ज्यांना आपण दुखावले गेलोय असं वाटत असेल त्यांना दिवा आणि आबूदोस (ही एक मोठ्ठीच सोय अज्जुकानं करून ठेवलीय त्याबद्दल आभार पण इथंच मानून टाकते :))) )
पण कविता खरंच चांगली आहे. तुझी भाषा जोरदार असल्यानं चेष्टेचा सूर न लावता कविता केलीस तरी चांगली उतरेल. लिहून बघ.