स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत
परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.
(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)
====================================
स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.
सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचे
समीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.
सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचे
अनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.
कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील
प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.
विचार विनिमय नीट करोनि,बहूमताने सर्व ठरवूनि
चाकू दिसता कुणा खिशातुनि,उत्तरे प्रोफेसर सांगती.
मुलीहि कांही मागे नसती,नोटस ओढणीआड आणती
सम हक्काची तालिम करिती,धन्य हो आमुची युनिव्हरसिटी.
(१९८३ साली प्रकाशित माझ्या " एप्रिल फुले" ह्या माझ्या विडंबन काव्य संग्रहात तसेच त्याच शिर्षकाच्या स्वतंत्र कार्यक्रमात समाविष्ट असलेले गीत , E-TV मराठी वरील "साहित्य दरबार" मध्ये सादर)
प्रा.सुरेश खेडकर (M.Tech. DBM. LL.B.),नागपूर.
कॉपी, विडंबन
सुरेशजी, हे पूर्वप्रकाशित आहे तेव्हा आम्ही काय मूल्यमापन करणार, पण ते बाजूला ठेवून एक वाचक म्हणून सांगतो.
पहिली दोन कडवी एकदम झकास आणि मूळ गाण्यातील ओळींची आठवण करून देतात. बाकी कडवी सुद्धा विनोदी कविता म्हणून नक्कीच चांगली आहेत पण त्यात मूळ गाण्याची आठवण होत नाही. तशी असेल तर जरूर लिहा, कदाचित माझ्या लक्षात आली नसेल. विडंबनात असे असायला पाहिजे का माहीत नाही. पण कविता स्वतंत्रपणे बघितली तर धमाल आहे.
"आज ते पहिल्यांदा वाचती" या ओळीचे उदाहरण असलेले "विद्यार्थी" पाहिलेले आहेत त्यामुळे एकदम चपखल