कविता

Submitted by VivekTatke on 25 March, 2008 - 02:12

शब्दांचे मनोरे जोडले जातात-
मालगाडीच्या लांबच्या लांब रांगेगत
यमकाला यमक जुळवले जाते
ओढून तानून निरनिराळे शब्द खेचल्यागत

कविता मनी कधी स्फुरते
कधी-कधी नाद मनी घुमवते
कधी-कधी शब्दांच्या आडोश्याला लपते
तर शब्दांशी गिरकी घेत कधी स्वतःच फसते

कविता कधी मनाला अलवारपणे हात घालते
कधी दुसर्‍याच्या भावनेला मोरपिसावानी जपते
कधी खपली निघालेल्या रक्ताप्रमाणे भळाभळा वाहते
कधी थांबलेल्या पाण्याप्रमाणे शेवाळ्याचे डबके होऊन जाते

कविता कधी गोजीरवाण्या बाळाचे रुप होते
कधी मनभावी सखीचे सुंदर स्वरुप होते
कधी निर्गुण निराकार अरूप होते
कधी मनाला वेदना देणारी भयावह कुरुप होते

कविता कधी हसते, कधी रडते,
कधी दुसर्‍याला रडवते,-कधी जमते
कधी जमता-जमता बिघडवते,एकेका शब्दासाठी छळते
कधी अखंड वाहणार्‍या झर्‍याप्रमाणे स्त्रवते
कधी खुपते,कधी सुखावते
कधी नादातच मग्न होते
कधी कल्पनेतच भग्न होते
कधी पाखरागत आकाशी घुमते
कधी आळीगत-कोषातच अडकते

कधी-कधी अधरांचा अधरांना स्पर्श होते
जीवनाच्या अस्तित्वाला वास्तवतेचे भान देते
कल्पनेच्या स्वप्नात कळ्याप्रमाणे उमलते
मृगाच्या जलधारामध्ये नाचणारा मोर होते
गुलाबी थंडीत दुसर्‍याचे दिल चोरणारे चोर होते

आणि
कधी-कधी बघता थरथरणार्‍या मांडीवरील
साश्रु नयनाचा नि कापर्‍या हाताचा
शेवटचा श्वास होते, शेवटचा श्वास होते.

गुलमोहर: