कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे?

Submitted by बेफ़िकीर on 29 March, 2010 - 15:34

कंटाळा यावा इतका उत्साह कुणाला आहे?
कंटाळ्याचाही आता कंटाळा आला आहे

ही लाजत लाजत हसते, ती केस विंचरत बघते
प्रत्येक कुटुंबाचा मी अर्धा घरवाला आहे

मृत्यूचा खमंग दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच मसाला आहे

रस्त्यावर अस्तित्वाला मी कडेकडेने नेतो
हा पुढे निघाला आहे तो पुढे निघाला आहे

बघ मदिरा खराब आहे हे सांगण्यास आला हा
ही गोष्ट वेगळी आहे की नशेत आला आहे

हा कविकट्ट्यावर 'गेला' तो कविकट्ट्यावर 'गेला'
गेलोही असतो मीही पण वेळ कुणाला आहे

ठरवाच द भी कुलकर्णी की कुठे बघावे आता
इकडे मधुबाला आहे तिकडे मधुशाला आहे

लाचार धोरणे तुमची गोत्यात आणती तुम्हा
माझ्याशी वैर धरे तो मासाच बुडाला आहे

ती चामर वृत्तावरती पाऊल उचलते हल्ली
बघतात लोक हा मुद्दा नुकताच कळाला आहे

होकारार्थी हलणार्‍या लोकांच्या माना सार्‍या
एकाला समजत नाही हा काय म्हणाला आहे

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे

गुलमोहर: 

>>मृत्यूचा खमंग दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच मसाला आहे

व्वाह !

>>या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे

बढीया !

रस्त्यावर अस्तित्वाला मी कडेकडेने नेतो
हा पुढे निघाला आहे तो पुढे निघाला आहे

बघ मदिरा खराब आहे हे सांगण्यास आला हा
ही गोष्ट वेगळी आहे की नशेत आला आहे

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे ....... मस्त, मतलाही आवडला !

मृत्यूचा खमंग दरवळ हृदयाला पाणी सुटले
सध्याचे जीवन म्हणजे नुसताच मसाला आहे >>>>क्या बात है!!! एकदम सुपर्ब!!

या दोनच प्रश्नांवरती मी जन्म खर्चले लाखो
ही दुनिया का आहे अन 'बेफिकिर' कशाला आहे>>>> जीयो!!

मस्त गझल!!

सहीच Happy