एकलव्य शिक्षण आणि आरोग्य न्यास

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
<1’

"तुला रेणु ताईंना भेटायचय?" वाडेश्वरच्या कोपर्‍यातल्या टेबलवर माझ्या समोर बसलेल्या यशोदा न(अवचट) मला विचारल. हा प्रश्न विचारला जाइपर्यंत मी रेणुताईंना भेटु शकते/भेटण्याचा प्रयत्न करायला हवा हे माझ्या लक्षातच आल नव्हत.'आमचा काय गुन्हा?' ने इतक झपाटुन टाकल होत कि बाकि काहि सुचलच नाहि. त्यामुळे यशोदाने विचारल्यावर उगाच त्यांना भेटुन त्यांचा वेळ घेण योग्य आहे का हा प्रश्न मनात आला. पण त्यांना भेटु शकले हि माझ्या दृष्टिने माझि ह्या भारतवारितलि सगळ्यात महत्वाचि उपलब्धि. रेणुताईंनि मायबोलिकरांसाठि एक मुलाखत देण्याच कबुल केलय, त्यामुळे त्यांचि ओळख वगैरे करुन देण्याचा माझा प्रयत्न नाहि. मी एकलव्य न्यासात घालवलेल्या ३/४ तासात मला खुप काहि मिळाल तो आनंद फक्त मायबोलिकरांबरोबर वाटुन घेतेय.

रेणुताई इतक्या पराकोटिच्या सौम्य आहेत कि कुठलहि दडपण त्यांना बघितल्यावर मिनिटभर देखिल टिकत नाहि. एखादि लाडकि मावशि किंवा आवडत्या शेजारच्या काकु ज्या सहजतेने आपल्याशि बोलतिल त्या सहजतेने त्या बोलायला लागल्या. त्यांच 'आमचा काय गुन्हा?' चा उल्लेख केल्यावर अगदि सहज पणे त्यांनि "मग तु "निशब्द झुंज" वाच तुला नक्कि आवडेल अस म्हणुन ते पुस्तक माझ्या हातात ठेवल. तुम्हि कशाला देताय, मी घेइन विकत अस म्हणताच " तु इतका संकोच का करतेयस?" अस त्यांनि इतक्या लाघविपणे विचारल कि पुढच्या आमच्या संभाषणात औपचारिकता उरलिच नाहि.

पुण्यात वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या संस्था ना भेट देउन तिथे चालणार काम व्यवस्थित समजावुन घेण्याचि संधि ह्या भेटित मला मिळालि. त्या निमित्ताने आपापल्या क्षेत्रात तुटपुंज्या आर्थिक बळावर (हे दुर्दैवाने सगळिकडच समान सुत्र), संस्थेचा भार हसतमुखाने पेलणारि सगळिच मंडळि बघुन दिपुन जायला व्हायच, तरिहि " हि सगळि माझ्या मुलांसारखि आहेत अस न म्हणता माझिच मुल आहेत त्यामुळे ती अनाथ नाहितच मुळि अस म्हणणार्‍या रेणुताईंना बघितल्यावर फरक जाणवलाच.

बोलण्याच्या ओघात त्यांनि सांगितल कि सामान्यपणे देणगिदारांचि पॅसिव्ह भुमिका (पैसे किंवा गरजेच्या वस्तु संस्थेला भेटहि न देता परस्पर पाठवण) त्यांना मनापासुन मान्य नाहि. कारण हे लोक निव्वळ स्वतःच्या मनातली टोचणि कमि करण्यासाठि मदत पाठवतात. पण रेणुताईंच्या मते हा अपराधच आहे, कारण त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या मंडळिंना गैरव्यवहार करण्याच धाडस होत आणि भ्रष्टाचाराचि मुळ रुजतात. त्यांच्या संस्थेला देणगि देउ इछ्छिणार्‍यांना त्यांचि कळकळिचि विनंति आहे कि नुसति देणगि देउन थांबु नका, पैसे देण्यापुर्वि आणि दिल्यावर वेळोवेळि माझ्या संस्थेला भेट द्या, दिलेल्या पैशांचा उपयोग मुलांसाठिच होतो आहे ह्याचि खात्रि करुन घ्या.

आमच अस बोलण सुरु असताना भाग्यश्री तिथे आलि आणि चुळबुळत उभि राहिलि. मग तिथे संस्थेच काम करणार्‍या तिच्या दोन तायांनि रेणुताईंना सागितल कि त्यांनि तिला आणलेला नविन ड्रेस दाखवण्यासाठि ती सकाळपासुन त्यांचि वाट बघतेय. रेणुताईंनि कौतुकाने तिच्याकडे बघितल्यावर ती खुप गोड लाजलि. मग रेणुताईंनि सांगितल कि आमचि भाग्यश्री खुप सुरेख लिहिते बरका आणि तिने नुकताच त्यांच्यावर लिहिलेला निबंध मी मायबोलिकरांसाठि मागितला म्हणुन त्याचि हस्तलिखित प्रत आणुन द्यायला भाग्यश्री निघुन गेलि.

ह्या हसतमुख मुलिकडे पाहुन कल्पना येणार नाहि इतकि तिचि कहाणि चटका लावणारि आहे. भाग्यश्री चि आई तिच्या लहानपणिच वारलि. पुढे वडिलांच निधन झाल्यावर तिच्या आजीने तिला 'अनाथ' म्हणुन संस्थेत आणुन सोडल. त्याच आजिचि आजारपणात सेवा करण्यासाठि भाग्यश्री गेल्या उन्हाळ्यात घरि गेलि आणि तिथुन परत आल्यावर थोड्याच दिवसात तिच्या मावशिचा फोन आला कि त्यांनि तिच लग्न ठरवल आहे आणि जर भाग्यश्रीने लग्नाला नकार दिला तर आई वडिलांबरोबर मावशि आणि इतर नातेवाईक हि तिला मेले अस तिने खुशाल समजाव. १५-१६ वर्षाच्या भाग्यश्री सारख्या मुलिंना अश्याच पध्धतिने मानसिक दबाव आणुन किंवा जबरदस्तिने लग्नाला उभ केल जात. आपल्या प्रगत म्हणवल्या जाणार्‍या महाराष्ट्रातल्या पुण्यासारख्या शहरातल हे चित्र आहे! पण भाग्यश्री ने मात्र विलक्षण ठामपणे पण आवाजाचा तोल जराहि न ढ्ळु देता मावशिला सांगितल कि हरकत नाहि आजपासुन मला ह्या जगात फक्त रेणुताई आहेत अस मी समजेन, आणि फोन ठेवल्यावर रेणुताईंना म्हणालि "आज मी खर्‍या अर्थाने अनाथ झाले!". १५-१६ वर्षांच्या लेकिला इतक सुजाण आणि मानसिक दृष्ट्या कणखर बनवणार्‍या रेणुताईंमधल्या आईच वर्णन नेमक्या कुठल्या शब्दांनि करायच?

मला भेटायला शाळेतुन परत आलेलि छोटि मंडळि, मी फोटो काढायचि इछ्छा व्यक्त करताच शाळेचे कपडे बदलुन हातपाय तोंड धुवुन नीटनेटकि होउन परत आलि. मला खरतर मुलांचे त्यांच लक्ष नसतानाचे फोटो हवे होते पण फोटोज, त्यांच्या पोझेस, ते काढतांना अवतिभवति असणारि मंडळि ह्यांच्याबद्दल त्यांच्या स्वतंत्र कल्पना होत्या त्यामुळे मी फक्त आदेशाच पालन केल. मंडळिंचा माझ्यावर (किंवा नविन टेक्नॉलॉजिवर) फारच विश्वास दिसला कारण "तुम्हि मघा माझा हसताना फोटो काढला पण तोंड उघडे असलेला माझा फोटो मला आवडत नाहि तेन्व्हा फोटो (प्रिंट कॉपिज) जेंव्हा पाठवाल तेंव्हा त्यात माझ तोंड बंद आहे असे पाठवा" अशिहि एक आग्रहवजा विनंति माझ्या कानांवर आलि :).

फोटोसेशन झाल्यावर मग आम्हि झकास पैकि गप्पा मारल्यात. आधि मला आणि मी येत नाहि हे कबुल केल्यावर ८-१० वर्षांच्या आफरिन ला तिच्या 'चिटभर चिटा' (अंगठ्याएवढा मुलगा) हया मानस्पुत्राचि गोष्ट सांगण्याचा आग्रह झाला. आफरिन पाच भावंडातलि सगळ्यात मोठि, तिचे आई वडिल कोण आहेत्/होते तिला माहिति नाहि, संस्थेत ती साधारण चार वर्षे आहे त्याआधि ती कुणाकडे होति हेहि तिला निटस आठवत नाहि, ह्या पार्श्वभुमिवर चिटभर चिट्याच्या गोश्टितल्या आईच जे वर्णन मला ऐकायला मिळाल ते नक्किच तिच्या अवतिभवति तिने बघितलेल प्रातिनिधिक चित्र असणार. आपल मध्यमवर्गिय कोशातल सुरक्षित आयुष्य आणि ह्या मुलांच्या वाट्याला येणार आयुष्य ह्यातला फरक मला 'चिटभर चिट्याने' समजावुन सांगितला. हि चिट्भर चिट्याच्या गोष्टितिल सुरुवातिचि काहि वाक्ये वानगि दाखल देतेय, "एका जोडप्याला मुल होत नसत, कुणितरि त्यांना सांगत कि सात डोंगर आणि सात जंगल पार करुन गेल कि तिथे एक साधु नेहमि बसतो, तो सगळ्यांना बाळ वाटतो म्हणुन हे दोघ सात जंगल आणि सात डोंगर पार करुन साधु महाराजांच्या दर्शनाला जातात. पण ते तिथे पोहचत पर्यंत साधु महाराजांकडचि सगळि बाळ संपुन गेलेलि असतात, ह्यांनि खुप गयावया केल्यावर साधु महाराज हवेतुन मुठ फिरवुन (तिने अ‍ॅक्शन करुन दाखवलि साधारण भोंदु बाबा हवेतुन अंगारा वगैरे काढतात तशि) त्यांच्या हातावर एक तळहाताएवढा मुलगा ठेवतात तोच चिटभर चिटा. हे दोघ मग त्याला घेउन घरि येतात. दुसरे दिवशि आई चिट्याला अंगण झाडायला फर्मावते, त्याच्या शक्तिला मानवेल अशि झाडणिचि काडि घेउन तो जीव तोडुन झाडतो पण त्याच्याच्याने फक्त थोडिशिच जमिन झाडलि जाते. थकुन भागुन चिटा आईला काम केल्याच सांगायला येतो, पण अंगणातला जवळ जवळ सगळा कचरा तसाच पडलेला बघुन आई वैतागते आणि त्याच काडिने त्याला बदडुन काढते. त्यानंतर आई त्याला चुलिसाठि काटे आणायला पाठवते. (काटे? मी विचारल, कारण चुलिसाठि लाकड हे असोसिएशन माझ्या डोक्यात फिट्ट होत, हो काटे ती ठामपणे म्हणालि. बाकि मुल माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागलि कारण एवढ्या साध्या गोष्टित मला प्रश्न काय पडला ते त्यांना कळत नव्हत.) तर चिटा प्रचंड मेहनत करुन कसाबसा एक काटा तेव्हढा आणु शकतो. ते पाहिल्यावर आई अजुनच वैतागते आणि त्याच काट्याने त्याला खरपुस चोप देते. मग रात्रि आई बाबांना म्हणते, कसल आपल फुटक नशिब की असला कार्टा नशिबात आलाय एका कामासाठि त्याचा उपयोग नाहि हे संभाषण चिटा ऐकत असतो, तो घरातुन पळुन जातो! गोष्ट पुढे बरिच रंगलि, चिटभर चिट्याने आपल्या बुध्धिच्या जोरावर बरेच पराक्रम केलेत पण मी मात्र ह्या पहिल्या काहि वाक्यांतच अडकले होते.

मला दरवाज्या पर्यंत सोडायला सुनिल, कोमल आणि प्राचि आले होते. त्यांचि दहाविचि परिक्षा सुरु होति. रेणुताईंनि सांगितल कि दहाविच्या मुलांच्या पालकांना त्या अगदि वारंवार विनंत्या करतात कि दहाविचि परिक्षा हि मुलांसाठि खुप महत्वाचि गोष्ट आहे, निदान पहिल्या पेपरच्या दिवशि तरि मुलांना आशिर्वाद द्यायला संस्थेत या. पण त्याचा काहि उपयोग होत नाहि. इतक्या साध्या गोष्टि देखिल ह्या मुलांना मिळु शकत नाहित. "परिस्थितिशि झगडत, गरिबिचे चटके सोसत...." अशि वर्णन आपण नेहमि ऐकतो पण ह्या उदाहरणांतुन पहिल्यांदाच मला त्या शब्दांचा अर्थ कळला . अस असल तरि मुलांच्या हसर्‍या चेहर्‍यांमध्ये अपेक्षाभंग कुठेहि नव्हता. माझ्या अर्ध्या वयाचि हि मुल माझ्यापेक्षा खुप मोठि वाटलित मला!

ह्या मुलांकडुन मी बरच काहि शिकले त्यामुळे त्यांना मदत वगैरे पोकळ शब्द मी वापरणार नाहि, पण रेणुताईंनी आपल्या सगळ्यांना काहि गोष्टि सुचवल्या आहेत. संस्थेला आर्थिक मदत करु शकलात तर खुपच छान कारण २०१२ पर्यंत 'स्वतःच घर' देण्याचि रेणुताई.चि इछ्छा आहे. थोड्याफार फरकाने भाग्यश्री सारखि सगळ्याच मुलांचि स्थिति आहे, परिस्थितिमुळे कितिहि मॅच्युअर्ड झालि असलि तरिहि लहान वयात एवढ सोसायला लागल्यामुळे मुल खुप इन्सेक्युअर आहेत. आज रेणुताई आहेत पण उद्या त्यांच्यानंतर आपल काय हा प्रश्न त्यांच्या मनात सुप्तावस्थेत असला तरि रेणुताइंमधल्या आईला जाणवतोच आणि सतत अस्वस्थहि करतो. जिथुन कुणि काढु शकणार नाहि अस घर मिळण ह्या मुलांच्या मानसिक स्थैर्याच्या दृष्टिने खुप गरजेच आहे अस रेणुताईंना वाटत. जर शक्य झाल तर फंड रेझिंग साठि अमेरिकावारि करण्याचि रेणुताईंचि इछ्छा आहे. तुम्हि जर महाराष्ट्र मंडळाशि संबंधित असाल किंवा इतर कुठल्या संस्थेशि संबंधित असाल आणि रेणुताईंचि ट्रिप अरेंज करु शकत असाल तर प्लिज मला कळवा, रेणुताईंशि थेट बोललात तरि चालेल. त्यांचे फोन न. मी खालि देतेय.

ह्या व्यतिरिक्तहि बर्‍याच गोष्टि आहेत करण्यासारख्या, ह्या मुलांचे ताई/दादा, मावशि/काका बनुन आपण त्यांना पत्र लिहु शकतो. ह्या पत्रांतुन आपण त्यांना बर्‍याच नविन गोष्टिंचि उदा. परदेशातल्या जीवनाचि ओळख करुन देउ शकतो. भाग्यश्री ला इंग्लिश भाषा खुप आवडते, तिला इंग्लिश वर प्रभुत्व मिळवायचय. तु मला इंग्लिश मध्ये पत्र लिहलस तर मला त्यातुन खुप काहि शिकायला मिळेल अस ती स्वतः मला म्हणालि (अर्थात पत्रातल इंग्रजि मुलांना कळेल अस हव, त्यांना क्लिष्ट वाटेल अस नको अस रेणुताईंनि बजावल). दुसर अस कि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअर च्या संधिंबद्दल तुम्हि मुलांना सांगु शकता, तुम्हि ज्या क्षेत्रात काम करता त्या बद्दल, संस्थेला भेट देउन तुम्हि मुलांना सांगु शकता. मेडिकल, इंजिनिअरिंग च्या पलिकडे मुलांना फारशि माहिति नाहि. आपल्याला कुणि भेटायला आलय ह्याचा मुलांना भयंकर आनंद होतो, म्हणुन तुम्हाला जर शक्य असेल तर त्यांना जरूर भेटा.

ह्या चाळिस मुलांचि काळजि घेताना अवतिभवति असलेल्या ४००० मुलांपर्यंत पोहचु शकत नसल्याचि जाणिव रेणुताईंन्ना अस्वस्थ करते, "हा जगन्नाथाचा रथ आहे, हजार हात लागल्याशिवाय ओढल्या जाणारच नाहि" असा विलक्षण सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन त्या प्रसन्न हास्यासह एकलव्य न्यासातल्या मुलांमध्ये वावरत असत्तात. त्यांना तस बघण म्हणजे "आनंदाचे डोहि, आनंद तरंग" चि अनुभुति.

एकलव्य न्यास ह्या तीन चार तासांच्या भेटित पुर्ण्पणे समजुन घेण शक्य नाहि ह्याचि जाणिव मला आहे, पण ओझरति का होइना मायबोलिकरांचि ह्या न्यासाशि भेट घडवाविशि वाटलि म्हणुन हा लेखन प्रपंच.

एकलव्य शिक्षण आणि आरोग्य न्यासाचि वेबसाईट : http://www.ekalavyapune.org/renutai.htm
संस्थेचा फोन न. 02065215386
रेणुताईंचा मोबाइल न. 9850894504
(वेबसाईट वर दिलेला फोन न. बदलला आहे.)

काहि क्षणचित्रे : http://picasaweb.google.com/mayureshoke/EkalavyaNyas#

विषय: 
प्रकार: 

रमा,

या उपक्रमाची व रेणुताईंच्या कामाची ओळख करून दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद. Happy

रमा, छान माहिती दिलीस, धन्यवाद!
तु दिलेली पिकासा ची लिंक चालत नाहिये, ती दुरुस्त करशील का?

छान माहिती मिळाली रमा. रेणुताईंचे विचार आवडले. मुलांना स्वतःचे घर हवे हे अगदी खरे आहे.

रमा, खूप छान लिहिलंयस.
रेणूताईंचे आम्हा स्कूल सायकॉलॉजिस्टच्या अभ्यासात 'गोष्ट कशी सांगावी' याबद्दल व्याख्यान झाले होते. ती गोष्ट एवढ्या वर्षानंतरही अशी समोर दिसते..
आता पुण्यात गेल्यावर त्यांना भेटायला नक्की जाईन. Happy

रेणूताई गावसकर हे नाव ऐकले होते, या धाग्यामधे काही माहिती मिळाली,
अर्थात हे व्यक्ति / संस्था चित्रण नाही तर त्यांच्या एका भेटीचा तपशील आहे,
पण तो सुद्धा तुम्ही असा लिहिला आहे की जो वाचकांना अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त करू शकेल. _/\_