पाचट - श्री. योगीराज बागूल

Submitted by चिनूक्स on 22 March, 2010 - 00:21

बलुती संपली आणि नगर-बीड जिल्ह्यांतला मोठा दलित समाज ऊसतोडणीच्या कामाला लागला. या वर्गाला शिक्षणाचा गंध नव्हता. गाठीशी जमिनी नव्हत्या. असल्या तरी त्या बहुतेक निकस. पोट कसं भरायचं हा मोठाच प्रश्न उभा राहिला. अशातच सहकारी चळवळ उदयास आली. सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपेढ्या भराभर स्थापन झाल्या. हे सहकारी साखर कारखाने चालवण्यासाठी दारिद्र्यात खितपत असलेला, हाताला कामाची आणि पोटाला भाकरीची गरज आहे, अशा कामगाराची नितांत आवश्यकता होती. त्यामुळे अनायासेच साखर कारखान्याच्या अगदी पायरीतल्या कामात, म्हणजे ऊसतोडीत हा साराच्या सारा समाज अलगद ओढला गेला. मात्र या वर्गाचं दैन्य कायम राहिलं, शिवाय जोडीला अस्थिरता आली. अनेक मार्गांनी या कामगारांचं शोषण होऊ लागलं.

हे कामगार साखर कारखान्याच्या आश्रयानं राहतात. कामाचं स्वरूप हंगामी. शिवाय हा वर्गही असंघटित. त्यामुळे हे शोषण, दैन्य चव्हाट्यावर येत नाही. अंधश्रद्धा, कर्ज यांच्या विळख्यात हा समाज रोजच्या रोज भरडला जातो. कामाच्या शोधात हे कामगार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भटकत असतात. काम मिळालं तर जेवायला मिळतं. नाहीतर उपास. यातूनच कामगारांची मुलंही शाळेत न जाता पोटाची खळगी भरण्याच्या मागे लागतात. या बालमजुरीकडे कोणाचंच लक्ष जात नाही. किंबहुना राजकारणी मुद्दाम तिकडे लक्ष देत नाहीत.

श्री. योगीराज बागूल यांचा जन्म अशाच एका ऊसतोडणी कामगाराच्या कुटुंबात झाला. अनेक हालअपेष्टा सहन करत ते शाळा शिकले, पुढे पदवीधरही झाले. 'पाचट' हे श्री. बागूल यांचं आत्मचरित्र. कॉलेजात असताना बागूलांनी या आत्मचरित्राचा बराचसा भाग लिहिला होता. पुढे श्री. दया पवारांच्या आग्रहावरून त्यांनी हे आत्मचरित्र पूर्ण केलं. 'तमाशा-विठाबाईच्या आयुष्याचा' या चरित्रात्मक ग्रंथाद्वारे नावारूपाला आलेल्या श्री. बागूलांचं हे आत्मचरित्र 'उचल्या', 'उपरा', 'बलुतं', 'प्रवाहाचे पाणी पेटते आहे' या आत्मचरित्रांइतकंच सकस आहे. १९७२ सालच्या भयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या समाजाची होणारी पिळवणूक या आत्मचरित्रातून ठळकपणे समोर येते.

'आयुष्य असंही असतं' ही जाणीव करून देणार्‍या श्री. योगीराज बागूल यांच्या 'पाचट' या अप्रतिम आत्मचरित्रातली ही काही पानं...

pachat 013.jpg

रोजच्यासारखी आजही शाळा सुटली. सारी पोरं वाडग्याचं झाप काढताच धनगराची मेंढरं आरडत-ओरडत बाहेर पडावी तशी ओरडत वर्गाबाहेर पडली. मीही एका हातानं ढगळ चड्डी अन् दुसया हातानं दप्तर सावरीत खळवाडीच्या वाटाला लागलो. पहिली ते चवथीची शाळेची वेळ सकाळची. तोपर्यंत आई घरातलं सारं काम उरकी. काम उरकून जवळपासच्या एखाद्याच्या शेताच्या वळणबांधाला गवत घेऊन येई, अन् गावात विकी. पुन्हा आई अन् मी नेहमीच्या बायांच्या कळपासंगं लोकांच्या उलंगलेल्या बाजरीच्या, भुईमुगाच्या शेतात सरवा वेचत फिरे.

घरी आल्याबरोबर मी दप्तर नेहमीच्या खत्यात टाकलं, म्हणजे जवळजवळ फेकलंच! हातावर पाणी घेतलं-नाही घेतलं करून भाकरीच्या टोपल्याजवळ बसलो. टोपल्यातली बाजरीची मोठी अर्धी भाकर मिरचीच्या लाल ठेच्यासंगं हुसहुस करीत पोटात घातली. भाजलेल्या तोंडात पाणी ओतून राहिलेली भूक पाण्यानंच भागवली.

वर्गात जवळपास सारी सुध्या घरची मुलं. एक भीमा आमचा होता. पण आईबापाला एकुलता एक. त्यामुळे आजाआजी अन् आईबापाचा खूप लाडाचा. त्याची आई त्याला कुठे कामधंद्याला नेत नसे. एखाद्या वेळी त्यांची आई, मंडाबाई 'चल माझ्यासंगं' म्हणालीच, तर तो कुणीकडेही चाट मारून निघून जाई. पण मला मात्र तसं करता येत नसे. जराही आं-ऊं केलीच, तर झनकावून मार बसे.

माझ्या वर्गातली गावात राहणारी मुलं शाळेतून घरी आल्यावर चोपून जेवत. मग जरा वेळ खेळून अभ्यास करत. वस्त्यांवर, मळ्यात राहणारी मुलं घरी गेल्यावर जेवून शेतात असेल त्या कामाला जात. पोरी निंदणी-खुरपणीला आईला शेतात मदत करीत. मी शाळेतून आलो की टोपल्यात अन् तवलीत जे असेल ते पोटात टाकून आईबरोबर पांढरओहळ, चिराखाणी, बामणाचा मळा, गोईंदबुवांची आंबराई, खडखडी, खिल्लारबुवा, होळीचं टोक, भवरबेदं, चिंचमाळ, लेंडी, ठाकराचं खोरं, सावतावाडी, तळ्याची शेतं, लहानी-मोठी भवंदारी, रानमळा, बरमळा, बटाई अन् हाडुळे असा सारा खंडाळ्याच्या शिवारातला रहाळ फिरे. जानेफळला बामणाच्या शेतात, भिंगीला बारमोटीत अन् जानेफळची इतर शेतंही कधीकधी धुंडाळत असू.

आईनं आज असंच खंडाळ्याचं शिवार सोडून लोणवाच्या शेतात जायचं ठरवलं होतं. आईला गवताच्या भा‍र्‍याला गिर्‍हाईक उशिरा लागलं, त्यामुळं सार्‍या बाया निघून गेल्या होत्या. ज्वार्‍यांनी पोटरा काढला होता. कुठंमुठं निसावल्याही होत्या. आम्ही गाव सोडून लोणवाच्या वाटाला लागलो. आईमागं रस्त्यानं चालताना झाडा होऊन कुठेमुठे राहिलेली वाटाच्या कडेच्या बोरींची बोरं दगडानं पाडून खात, काही एखाद्याच्या शेतातला टहाळ उपटून खात आईमागं मागं चाललो होतो. आणलेल्या टहाळातून नको नको म्हणता आईला दोन-चार तोरम्या देई. वाटेनं चालताना दमलेला अन् घट्टे पडून खडबडीत झालेला मायेचा हात आई डोक्यावरून फिरवी. मनाला खूप बरं वाटे. आम्ही दोघं मायलेकरं गाव सोडून बरंच दूर आलो होतो. अजूनही चलत होतो. खंडाळ्याच्या शिवारातला सारा रहाळ पायवटी पडलेला. आजची ही वाट, हा रहाळ, हे शिवार, सारं नवीन होतं. पण आईला मात्र जुनं होतं. आई कित्येकदा या शिवारात बायांसंगं निंदणी, खुरपणीला अन् सोंगायला आली होती. चालता चालता मी 'अजून किती लांब जायचं?' म्हणून आईला विचारी. 'हे काय आलं, ह्या माथ्याच्या पुढे', म्हणत आई समजूत घाली. चालता चालताच आईची नजर बाजूच्या वावरात गेली. तिथं आमच्या नेहमीच्या कळपातल्या बाया काहीतरी वेचीत होत्या. वावर तर निखळ पडीक होतं. आईची पावलं तिकडे वळली. आईमागून माझीही. सारं शेत बरबड्यानं लधून गेलं होतं. शेतात घुसल्याब्रोबर आम्ही अधाशासारखं बरबडा वेचू लागलो. गरिबीला बळी पडलेलो आम्ही बरबड्याला बळी पाडीत होतो. ओट्या भरीत होतो. गोणीत टाकीत होतो. वेचताना कमराला रग लागली म्हणून उभा झालो, तशी शेताच्या बांधावर एक बाई दिसली. तीस-पस्तिशीची असेल. डोक्यावर नवर्‍याची न्याहरी नाहीतर दुपारचं जेवण असावं. विहिरीजवळच्या कोपीवजा झापात पाटी टेकून, पाठीशीच्या लेकराला झोळी बांधून तिनं त्याला झोळीत घातलं. मग पदर कमरेला खोशीत ती आमच्याकडे निघाली. येताना तिचा बडबडण्याचा अस्पष्ट आवाज आमच्यापर्यंत येत होता. ती जसजशी आमच्याजवळ येऊ लागली तसतशी तिची पावलं पटापट पडू लागली. आईचं ध्यान नव्हतं. खाली वाकून आई वेचीत होती. कमरेला कळ लागली म्हणून आई उभी झाली, ती बाई आईच्या समोरच उभी! मी आईजवळ गेलो तशी तिनं आईशेजारची बरबड्यानं गळहट भरलेली गोणी ताब्यात घेतली. मी आईजवळ जाऊन उभा राहिलो. कधी बाईकडे तर कधी आईकडे मी पाहत होतो, बिच्चारी आई तरी काय करणार? सत्तेपुढे शहाणपणा कामाचा नव्हता. आई गप्प उभी होती. आम्ही त्या बाईच्या तावडीत सापडल्याचं पाहून बाकीच्या सार्‍या बाया चोरपावलानं वावरातून पसार झाल्या.

ओढताण करून इथपर्यंत येऊन बरबड्याला लागलो होतो. गळहट गोणी होऊस्तर उनतहान, कशाचंच भान नव्हतं, आता गोणी बयानं बळकावली. वाटलं, एवढी धावधाव करून बरबडा वेच्चला, त्याचा काही सार झाला नाही. बरबडा गेला तर गेला, पण गोणीही जाते की काय असं वाटू लागलं. बाकीच्या बाया बरंच लांब गेल्या होत्या. आम्ही मात्र गुंतलो. मग आई त्या बाईजवळ जाऊन तिची मनधरणी करू लागली. बाई रागानं तापलेली होती. तोंडात येईल ते बोलत होती. आईनं एकदम नमतं घेतलं. मग त्या बाईचा ताप कमी होत गेला. तीही आता बरं बोलत होती. पण बोलण्यात रुबाब होता. मी अन् आई गप्प ऐकत होतो. आई फक्त 'हा', 'नाही' एवढंच बोलत होती. शेवटी आईनं लगट लावून गोणी तिच्याकडून घेतली. आईच्या चेहर्‍यावर लाचारीपणा दिसत होता. मला बरं वाटलं, बाईनं उरकून घेतलं - पण गोणी दिली म्हणून. मी ओटीतला बरबडा गोणीत टाकला. ओटी सुदरून बांधली. बाईला आमची कीव आली असावी. कारण तिनं आता स्वत:च बरबडा वेचायला सांगितलं. आई त्या बाईशी बोलत बाजूच्या वळणावर बसली. मीही बसलो. पण नीट बसता येईना. वळणाची कुसळं खालून टोचू लागली. तसाच कुलटेकणी बसलो.

जरा वेळानं आईसंगं मीही उठलो. नव्या दमानं बरबडा वेचू लागलो. दिवस माथ्यावर येऊपर्यंत बरबड्याची गोणी दाबून दाबून गच्च भरली. कमरेला वाकून वाकून बोंब लागली. मी वळणावरच्या झुरपुडाच्या सावलीत जरासा आडवा झालो. आईही विसाव्याला माझ्याजवळ येऊन बसली. तितक्यात वावरावालीनं विहिरीवरूनच पाणी प्यायला हाक मारली. आईच्या मागं मीही निघालो. ती बाई उसाच्या वरच्या बाजूच्या मिरच्या निंदीत होती. तिचा नवरा उसाच्या खाल्लाकडून बेल्हं टेकत होता. आम्ही विहिरीवर गेलो. पाणी प्यालो.
"बईस उन्हाचं घडीभर", बाई उठलेल्या लेकराला झोळीतून काढून पाजायला आडवं घेत आईला म्हणाली.
"नको बाई, काय बसती. तिसरापहरालोक आणखी दोन-तीन वाट्या तरी सांगळल्या पाह्यजी", आई पदरानं तोंड पुशीत म्हणाली.

त्या बाईनं बळंबळं आईला बसवलं. आईला भीड तुटेना, कारण तिच्याच वावरात बरबडा वेचीत होतो. आई बसली. आईजवळ मीही बसलो. मी नेहमीच चुळबुळा, एका जागी कधी गप्प न बसणारा. आईचं अन् बाईचं बोलणं चालू होतो. मी हळूच आईच्या कानाला लागलो.
"आई, ऊस आणू का?"
तसे आईनं माझ्यावर डोळे वटारले. पण त्या बाईनं ताडलं.

"काय म्हणतो, आई हा?" बाईनं विचारलं.
"का रे, ऊस पाह्यजी ना? जा ये घेऊन येखादं टिपरू", माझ्याकडे पाहत ती बाई म्हणाली.
मी आईच्या चेहर्‍यावरून अंदाज घेत पाहू लागलो.
"आन्, पण कडानंच मोड. मधी घुसू नको", आईनं जतावलं.
मी टनकन् उठून उसाकडे निघालो. लांगीनं होऊन आईच्या अन बाईच्या नजरेआड झालो. उसात घुसलो. दोन-चार शेलकी टिपरं मोडून उसातच बसून खाल्ली. मग बरोबर आईला घेण्यासाठी आणखी मध्ये घुसून एक जाड ऊस मोडला. त्याचा आवाज झाला. तसा -
"कोण हाय रे उसात...ऽऽ आं...ऽऽऽ" खालच्या बाजूनं आवाज आला. तो त्या बाईच्या नवर्‍याचा आवाज होता. मी चटकन उसाचं पाचट काढून डोक्याएवढं टिपरू घेऊन आईकडे निघालो. पळतच आईकडे आलो. जरा वेळानं औतकरी खांद्यावर चाबूक टाकून उसाच्या कटानं येताना दिसला. माझ्या काळजाची धडपड सुरू झाली. तो जरासा नेटकं आला, तसं त्या बाईनं आम्हाला जायला सांगितलं. आम्ही जिथं गोणी होती अन् ओट्या सोडून ठेवल्या होत्या तिथं आलो. पुन्हा कमराला ओट्या आवळल्या अन् बरबड्याला लागलो. बाईचा नवरा तिला आमच्याकडे हात करून काहीतरी बोलत होता. आम्हाला नीटसं ऐकू येत नव्हतं. ती लेकरू झोळीत टाकू लागली अन् त्यानं तिच्या पाठीत चाबकाचे दोन-चार फटके बसवले. तसा तिचा रडण्याचा आवाज येऊ लागला. माझ्या अंगाचाही थरकाप होऊ लागला. वाटलं, आता येतो तो इकडं. पण आला नाही.

"तरी नक्को म्हण्ले व्हते तुला", आई माझ्याकडे पाहत म्हणाली. मलाही आता कसंतरी वाटत होतं.
"अरे, ऊस ग्वड लागला म्हून का मुळासकट खावा का?" पुन्हा आई बोलली. तरीही मी गप्प होतो.

बाईनं मुकाट्यानं वाढून दिलं. तिच्या नवर्‍यानं जेवण उरकलं, अन् अर्ध्याशा तासात आल्या वाटानं निघून गेला. त्या बाईचा रडण्याचा आवाज कधीच बंद झाला होता. आम्ही बरबड्याच्या झाडाचा बरबडा वरमाडून ओटीत टाकू लागलो.

***

दुष्काळाचा एकेक दिवस मोठ्या मुश्किलीनं सरत होता, उद्याचा दिवस आपल्यासाठी काय दु:ख घेऊन उगवेल याचीच प्रत्येकाला धास्ती वाटत होती. आता तर सरकारनं आणि सरकारच्या योजनांनीही दुष्काळापुढं हात टेकले होते. सरकारी कामंही कमीकमी होत चालली होती.

माणसांच्याच पोटाचे हाल होऊ लागल्यामुळे शेतकरी आपल्या खुट्यावरची जनावरं दणादण मिळेल त्या किमतीत कसाबाला विकू लागला. पोटातल्या आगीनं खुट्यावर पाय खोडीत मरण्यापेक्षा हे पाप कसाबाच्या माथी गेलेलं बरं असं त्याला वाटू लागलं. कसाबआळीतल्या खाटीकखान्यात रोज सात-आठ जनावरं कटू लागली. खाटीकखान्याच्या पाठीमागच्या भिंतीतून बाहेर आलेल्या नळीतून रक्ताचा पाट वाहू लागला.
आम्ही पोरं मांगवाड्यात अन् महारवाड्यात फिरताना आम्हाला तो दिसत होता. जनावरांच्या मलमूत्राचा घाण वास आजूबाजूला स्वैर पसरु लागला. कसाब लोक तर जनावरांचं मांस खाऊनच दिवस काढू लागले. कसाबआळीतल्या प्रत्येकाच्या दारात चाण्यांची वलाणी दिसत होती. घरातली बारकी पोरं, म्हातारी माणसं कावळ्यांनी चाणी नेऊ नये म्हणून हातात काठी घेऊन राखण करीत होती.

एके दिवशी आमच्या घरात अन्न म्हणून असं काहीच नव्हतं. काही उलटंपालटं करायचीही सोय नव्हती. दुष्काळाचं साल असल्यामुळे जो तो हायहाय करीत होता. आई एक्-दोन ठिकाणी उसनंपासनं मिळतं का म्हणून पाहून आली. पण काही जमलं नाही. शेवटी न्याहारीवेळा आईनं भगुणं घेऊन मला कसाब आळीत पिटाळलं. मीही जायला विशेष आढेवेढे घेतले नाही. कारण खाण्याजोगं मिळेल ते खाऊन भूक भागवायची होती.
माझ्याअगोदरच खाटीकखान्याच्या तोंडाशी मांगा-महारांच्या पोरांची अन् म्हातार्‍या बाया-बापड्यांची गर्दी होती. प्रत्येकाच्या हातात भगुणं, घमिलं, मोठं ताट, असं काहीना काही होतंच. खाटीकखान्यातून जनावर कापताना त्याचा ओरडण्याचा आवाज आला की आपापल्या हातातली भांडी सावरुन सारा घोळका आत घुसे. मेलेल्या किंवा मरत असलेल्या जनावराच्या मानेतून भळभळ रक्त वाही. ते रक्त आपल्या भांड्यात जास्तीतजास्त धरण्याचा सार्‍यांचा आटापिटा असे. मीही त्या घोळक्यात जाऊन उभा राहिलो. जनावरांचा आवाज आला, तशी खाटीकखान्याच्या दारावरची गर्दी आत घुसली. माझी ही पहिलीच वेळ असल्यामुळे काहीच माहीत नव्हतं. तरीही गर्दीबरोबर आत घुसलो. खाटीकखान्यात चार-पाच जनावरांची धडं पडली होती. चार-चार कसाबं एकेका जनावराची चमडी सोयीसोयीनं उसवीत होती. कुणी खांद्यावर सुरा मारुन एकेक भाग वेगळा करीत होते.

कसाबआळीत आई मटन घ्यायला येई. आईच्या बरोबर मीही बर्‍याच वेळा येई. खाटीकखाना येता-जाता बाहेरुनच पाहत होतो. आज आतलंही दृश्य पाहायला मिळालं. गर्दी जशी आत घुसली, तशी जनावरांचं रक्त धरायला तुटून पडली. ज्याला जसं मिळेल तसं त्यानं आपल्याजवळच्या भांड्यात रक्त धरलं. मला त्या नुकत्याच कापलेल्या जनावरापर्यंत जायलाही मिळालं नाही. तेव्हा रक्त धरणं दूरच ! जनावराच्या शरीरातलं रक्त संपून थेंबानं टपकू लागलं, तसं कसाबांनी आम्हा सार्‍यांना खाटीकखान्याच्या बाहेर हुसकावलं. ज्यांना रक्त मिळालं ते घरी गेले. बाकी आम्ही पुन्हा खाटीकखान्याच्या दारात थांबलो. अर्ध्याशा तासानं पुन्हा जनावराच्या ओरडण्याचा आवाज आला अन् गर्दी पुन्हा आत घुसली. मी आता सार्‍यांच्या पुढे मुसंडी मारली अन् जनावराच्या मानेतून गळणारं ताजं ताजं रक्त धरलं. अर्ध्याच्या वर भगुणं भरुन घेतलं. जनावराचं रक्त जसं कमी झालं तसं कसाबानं पुन्हा आम्हाला बाहेर हुसकावलं. मी रक्ताचं भगुणं डोक्यावर घेऊन खळवाडीकडे निघालो.

मी गावाबाहेर पूर्वेला असलेल्या खळवाडीकडे चालत होतो. रस्ता धोबीआळीतून होऊन डोहरआळी अन् कुंभाराच्या घरासमोरून खळवाडीकडे वळतो, वाटेच्या कडेला असलेल्या घराच्या ओट्यावरुन बायका दारातून माझ्याकडे पाहत होत्या, नाकाला पदर लावीत होत्या. रस्त्यानं येणारी-जाणारी माणसं माझ्याकडे तिरसट नजरेनं पाहून दोन हात बाजूनं होऊन पुढे जात होती. माझ्या डोक्यावरच्या भगुण्याभोवती माशांचा घोळका घोंगत होता, माझ्याबरोबरच उडत होता. समोरून येणारा माणूस माझ्याकडे पाहून तोंड वेडंवाकडं करीत होता, त्याच्या कपाळावर आठ्या उमटत होत्या. मी अंग आकसून रस्त्यानं चालत होतो. माझ्या एक हात नेसलेल्या मागून फाटलेल्या चड्डीला होता अन् दुसरा हात डोक्यावरच्या भगुण्याला !

कुंभाराच्या घरासमोरुन पुढे आलो आणि खळवाडीकडे वळलो. आता जरा मोकळं-मोकळं वाटू लागलं होतं. जसजशी कोपी जवळ येऊ लागली तसतशी पायाची गती वाढली. घरी येताच आईनं डोक्यावरून रक्ताचं भगुणं घेतलं. अंगातल्या कपड्यावरही कुठंकुठं रक्ताचे डाग पडले होते. कपडे काढून दुसरे जुने कपडे घातले. आईनं रक्तीतून केस-कचरा काढला. चूल पेटवली. कांदा अन् जिर्‍याची फोडणी देऊन आईनं रक्ती चुलीवर
शिजू घातली. जरा वेळानं तापून तिचा बेसनासारखा बटबट आवाज येऊ लागला. मी अन् कमाताई चुलीभोवती घुटमळत होतो. पोटात कावळे ओरडत होते. चुलीवरच्या भगुण्यातल्या रक्तीचा आता चांगलाच बटबट आवाज येऊ लागला होता.

माझ्या नजरेसमोरून खाटीकखान्यातलं दृश्य जात नव्हतं. खाटीकखान्यात कापून पडलेली चार-पाच जनावरं अन् त्यांची कातडी सोयीसोयीनं उसवणारे कसाब सारखे नजरेसमोर येत होते. उघडीनागडी मांगवाड्यातली अन् महारवाड्यातली पोरं-पोरी, गरिबीनं अन् हालआपेष्टांनी पार खचून गेलेले; आणि चेहर्‍यावरचा नूर उतरलेला सहज जाणवत होता ! डोळ्यांतली लाचारी लपत नव्हती. कसाबही परिस्थिती जाणून होते. त्यामुळे जनावरांचा जीव कसाब घेत होते. प्रत्येक कसाबाच्या दारात दोन-चार जनावरं काशीत शेप घालून मरणाची वाट पाहत उभी होती. दोन-चार डाखळं पुढ्यात पडलेली, पण ते खाण्यावर त्यांची वासना नव्हती. खाटीकखान्यात कापल्या जाणार्‍या जनावरांचा आवाज कानी पडतात ती टवकारत होती. कदाचित आपलंही मरण जवळ आल्याचं त्यांना कळत असावं. खाटीकखान्यातले कसाब जनावरं उसवण्याच्या कामात मग्न झालेले. आतमध्ये एका कोपर्‍यात मोठा बारदाना अंथरलेला. त्याच्यावर जनावरांचा एकेक भाग कापून टाकला जात होता, अन् ढीग वाढत होता. आई घरात आठवड्यातून दोनदा तरी कसाबआळीतून ढोराचं कधी मटन, कधी फोपशा, कधी खुरा, कधी चाटीबोटी, कधी गुडसा, कधी चामाचीमा तर कधी नुसते पारखंड आणायची.

रक्ती आटूनआटून गाईच्या खरवसासारखी झाली. रंग मात्र गर्द तपकिरी होता. आईनं दोन-तीन वेळा पळीनं भगुण्यातली रक्ती खाली-वर केली. जराशी खाऊन चांगली शिजल्याची खात्री केली अन् भगुणं चुलीवरुन खाली घेतलं. तसं कमाताईनं अन् मी पराती घेतल्या आणि आईजवळ बसलो. दादा अन् भाउ आमच्याकडे हताशपणानं पाहत होते. वहिनी आटलेल्या आडातून तळाला जराजरा झिरपणारं पाणी ओंजळीएवढच पोहर्‍यात येई
ते हंड्यानं आणीत होती. वच्छाक्का झल्याएवढ्या डोक्याला पाणी चोपडून फणीनें केसांचा ताणूनताणून गुंता काढीत होती.

आईनं कमाला अन् मला शिजवलेली रक्ती वाढून दिली. जिभेला चव कळत नव्हती. पण पोटाला भूक कळत होती. चवीची पर्वा न करता घासामागून घास घशाआड जात होते. ताटातलं संपल्यावर आईनं आणखी दिलं. आमचं दोघांचं खाऊन झाल्यावर राहिलेल्या रक्तीत जरा वेळानं वहिनीनं, वच्छाआक्कानं अन् आईनं भागवलं. हे सारं पाहून भाऊंच्या मनात काय आलं कोण जाणे? वलाणीचं उपरणं खांद्यावर घेतलं अन् कोपरीवरच तडातडा
गावाकडे गेले. दादानं बैल सोडले अन् हाडूळ्यात उन्हाळखरड्याला निघून गेला. आई अन् वहिनी सरपणकाडीला मोठ्या भवंदारीकडे गेल्या. वच्छाआक्का एक गाय अन् एक कालवडीला घेऊन आमच्या माळाकडे जेसाभाऊसंगं चारायला घेऊन गेली. जेसाभाऊचीही चार-पाच जनावरं होती. मी अन् कमाताई घर सांभाळायला घरीच राहिलो. तासाभरानं गावात गेलेले भाऊ परत आले ते खांद्यावरच्या उपारण्यात तीन-चार पायल्या बाजरी घेऊन ! बाजरीचं गठुडं खाली ठेवताच मी अन् कमाताई मुठीनंच बाजरी घेऊन खाऊ लागलो. भाऊनं पसापसा बाजरी ताटल्यात आम्हा दोघांना दिली अन् गठुडं आवळून बांधून ठेवून दिलं. तांब्याभर पाणी पिऊन भाऊ वच्छाआक्काला घरी पाठविण्यासाठी जनावरांकडे माळावर गेले. दादा व भाऊ निरंकार होते.

***

मजल-दरमजल करीत माझी शाळा चालू होती. आवंदा मॅट्रिकचं वर्ष असल्यामुळे भाऊ कंपनीला गेले नव्हते. अन् वच्छाआक्काचं मागच्याच वर्षी लग्न झाल्यामुळे फक्त दादा अन् वहिनी ऊसतोडीला गेले होते. बोर्डाची परीक्षा असल्यामुळे आई मला कुठे कामाला किंवा सरव्यासाप्यालाही नेत नव्हती. दिवाळी आली अन् गेलीही. दिवाळीत बहिणी सासरहून आल्या अन् भाऊबीज करून गेल्या. दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मी जास्त मन लावून अभ्यास करू लागलो. कोपीत मधोमध धान्याची कोठी. ती सहसा रिकामी असायची. कोठीच्या बाजूला कमराएवढी शित. शितीच्या पलीकडून चूल म्हणजे कोठीच्या पलीकडे स्वयंपाकघर. शितीच्या अलीकडून जातं. जात्यावर माझी मॅट्रिक असल्यामुळे भाऊंनी नवीन घेतलेला कंदिल ठेवून मी पोतं टाकून अभ्यास करी. आई अन् कमाताई चुलीकडे झोपत. भाऊ जनावरांसाठी बाहेर ओट्यावर पडत. मी अभ्यास करून जात्याच्या पाळीजवळ टाकलेल्या पोत्यावर झोपे. अख्ख्या खळवाडीतून मी एकटा दहावीला होतो. भीमानं सातवीला नापास झाल्यावर शाळा सोडून दिली होती.

अभ्यासक्रम संपल्यावर शिक्षकांनी आमची सरावपरीक्षा घेतली. आम्हा सत्तेचाळीस मुलां-मुलींपैकी सरावपरीक्षेला फक्त तीन मुलं अन् दोन मुली असे पाचजण पास झाले. पैकी राजेंद्र पारळकर अन् मंगला पारळकर ही ब्राह्मण भावंडांची जोडी, कोंबडे सरांची मुलगी अंजली कोंबडे, संजय बाफना हे मारवाड्याचं पोरगं आणि पाचवा मी.

नववी इयत्तेच्या विद्यार्थांनी वर्गणी काढून आम्हाला सेंड ऑफ पार्टी दिली. नववीचे विद्यार्थी, मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकवर्ग व आम्ही दहावीचे मुलेमुली यांनी स्वयंपाक केला. दिवसभर एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमासारखी धांदल होती. संध्याकाळी जेवणं झाली. शाळेच्या मोठ्या व्हरांड्यात गाण्याच्या भेंड्या, आवडत्या कवितांचे, नाट्यप्रवेशांचे वाचन असे अनेक प्रयोग रात्री उशिरापर्यंत चालले. रात्री उशिरा कार्यक्रम संपला. आम्ही मुलामुलींनी एकमेकांचा निरोप घेतला. आता पुढील पूर्ण आयुष्यात ही शाळा मिळणार नव्हती. हे वर्गमित्र मिळणार नव्हते. पुढचं आख्खं आयुष्य प्रत्येकाला घडवायचं होतं. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही सार्‍या विद्यार्थांनी शिक्षकांचे आशीर्वाद घेतले. वर्गमित्र एकमेकांना भेटताना नकळत मन भरून आलं. गळा दाटून आला. मुलींच्या डोळ्यांतून तर आसवं टपकू लागली. आम्ही एकमेकांच्या नात्यागोत्याचे नसूनही असं का बरं व्हावं? यालाच का जिव्हाळा म्हणायचा?

बोर्डाच्या परीक्षेला तेव्हा आम्हाला सतरा किलोमीटरवर शिऊरला जावं लागे. वैजापूरला जाऊन एस. टी. बसचा अर्ध्या महिन्याचा पास काढला. परीक्षा झाली. पेपर मनासारखे गेले. पहिल्या वर्गापासून आतापर्यंत एका वर्गात असलेल्या मित्रांची परीक्षेनंतर फाटाफूट झाली.

परीक्षा झाल्यामुळे आता सुटी होती. दिवस उन्हाळ्याचे होते. जानेफळच्या रस्त्यानं बरमळ्यात फॉरेस्ट खात्यानं माळमाथ्यावर झाडं लावण्यासाठी दोन बाय दोन फुटाचे गड्डे खोदायचं काम काढलं होतं. किरकोळ तक्रार झाल्यामुळे भाऊंनी वच्छाआक्काला इकडे आणलं होतं. तशी ती दोन जीवाशीही होती. वच्छाआक्का अन् मी फॉरेस्टच्या कामाला जाऊ लागलो. सकाळी सायकलवर लवकर जाई. ऊन चटकूपर्यंत वीस-पंचवीस गड्डे खोदायचो. एक गड्ड्याला एक रुपया, दीड रुपया किंवा दोन रुपये असा भाव मिळे. भाव जास्त मिळवा, म्हणून लोक साहेबाच्या पुढे पुढे करीत. उन्हाची तलखी होऊ लागली की खोरीतल्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत जाऊन बसायचो. वच्छाआक्का मागून न्याहारी घेऊन येई. न्याहरी करून, दिवस तिरपीला झुकला की पुन्हा कामाला भिडायचो. संध्याकाळी उशिरापर्यंत माझं मातीशी झटणं चालू असायचं. मातीनं सारं अंग भुरकंटर्र होई अन आंबून जाई. घरी येऊन बादलीभर गार पाण्यानं अंघोळ केल्यावर बरं वाटे. जेवल्यावर पटकन झोप लागे. दुसर्‍या दिवशी पुन्हा टिकाव-फावडं अन् माती.

दर गुरुवारी म्हणजे बाजाराच्या दिवशी फॉरेस्टचा पगार होई. आलेल्या पैशांतून दहा-पाच मागे ठेवून सारा पगार आईला द्यायचो. अशातच वैजापूरच्या शरफुद्दिन बाबाचा उरूस आला. आई-भाऊला उरूसाला घेऊन गेलो. पेठात नेऊन दोघांचा एक मोठासा फोटो काढला अन् मढूनही घेतला. अजूनही शेतातल्या घरात तो फोटो आहे!

मातीकामात उन्हाळ्याचे दिवस भरभर जात होते. अशात वर्तमानपत्रातून मॅट्रिकच्या निकालाची तारीख घोषित झाली. ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी अगतिकता वाढू लागली अन् मनात धडकीही भरू लागली. पेपर तर चांगले गेले होते. पण तरीही नापास झालो तर! रात्री अंथरुणावर पडलो की हाच विचार डोकं पोखरू लागला.

निकालाचा दिवस उजाडताच बसस्टॉपवर गेलो. पेपर घेतला. जवळपास सारा पेपर निकालाच्या बातम्यांनी अन् उत्तीर्ण झालेल्या मुलांच्या नंबरांनी भरलेला होता. माझा परीक्षा क्रमांक शोधू लागलो. काही सापडेना. अस्वस्थ झालो. नापास झालो की काय वाटू लागलं. मन मनालाच खाऊ लागलं. पुन:पुन्हा नंबर शोधला. शेवटी एक सुशिक्षित तरुण उभा होता, त्याला विचारलं, त्याच्याकडे पेपर दिला. नंबर सांगितला. त्यानं किलकिल्या डोळ्यांनी पेपरात पाहून माझ्याकडे गंभीरपणे पाहिलं. तसं छातीत एकदम धस्सं झालं. वाटलं गेलो.

"अरे, तू चांगल्या मार्कांनी पास झालास. हा बघ तुझा नंबर." नंबराखाली अंडरलाईन करून त्यानं पेपर माझ्याकडे दिला. मी नंबराचा एकेक अंक निरखला. तेव्हा कुठे जीवात जीव आला. पेपर घेऊन धावत घरी निघालो. भाऊ वाटेतच भेटले. तेही निकाल पाहायला स्टॅण्डवर येत होते.

"पास झाला?" भाऊंनी माझ्या हातातून पेपर घेत अधीरतेने विचारलं.

मी 'हो' म्हणत भाऊंच्या पायाला लागलो. भाऊंचं उर भरून आलं. त्यांनी मला उराशी धरलं.

"नाव कमावलंस, पोरा" डोक्यावरून हात फिरवीत भाऊ म्हणाले अन् तिथूनच मागं फिरले. काही वेळातच मी मॅट्रिक पास झाल्याची वार्ता सार्‍या खळवाडीत पसरली. महारा-मांगाची मिळून आम्ही मॅट्रिकला सहा-सात पोरं होतो. पैकी मातंग समाजातील म्हस्केसरांचा अनिल अन् महाराचा मीच पास झालो होतो. आयाबाया आईला भेटायला येऊ लागल्या. भाऊंना भेटायलाही काही बाप्पे येऊ लागले. स्टॅण्डवर भाऊंनी अर्धा-पाव किलो पेढे माझ्याकडून आणवून घेतले. एक नारळ फोडला. एका पेढ्याचे चारचार तुकडे केले. नारळाचेही बारीक खांड केले. दोन्ही एकत्र करून घरी येईल त्याला भाऊ वाटू लागले. चहापाणीही होत होतं. आमच्या जवळच्या भावबंदात अन् खानदानीत मी पहिलाच मॅट्रिक पास झालो होतो. त्याचा सार्थ अभिमान भाऊंच्या तोंडावरून ओसंडत होता. दादालाही मी पास झाल्याची बातमी कंपनीला पाठवली. माझ्या थोरल्या लेकाचं शिक्षण माझ्या धाकट्या भावाच्या आडमुठेपणामुळे मला करता आलं नाही. पण धाकट्या लेकाचं शिक्षण कसंही करून करणारच. ही जणू खुणगाठच भाऊंनी मनाशी बांधली होती. तर गरिबीमुळं आणि इतर अडचणीमुळं आपलं शिक्षण झालं नाही, पण आपण आपल्या धाकट्या भावला त्याची इच्छा असेल तेवढं शिकवावं. मोठं करावं. आपणाला जे दिवस आलेत ते दिवस भावाच्या वाट्याला येऊ नयेत या तळमळीनं अन् कळकळीनं दादा मला वेळोवेळी शिकण्यासाठी प्रोत्साहित करत होता.

काही दिवसांनी कंपनीचा पट्टा पडला. दादा ऊसतोडीवरून घरी आला. उन्हाळा संपत आला होता. आकाशात कुठेकुठे ढग दिसू लागले. शेतकर्‍यांच्या मशागती झाल्या होत्या. झापं, कोप्या, सपरं अन करवंदही शेकारून झाले होते. सारे आता आकाशाकडे पाहत होते. मी मॅट्रिक पास झाल्यामुळे आमच्या घरात सारे खुषीत होते. मी कोणत्या कॉलेजात जावं यावर दादा अन्न भाऊ यांची अधूममधून चर्चा होत होती. दादाचं म्हणणं होतं की मी वैजापूरच्या कॉलेजात जावं. माझी इच्छा नव्हती. मी कुठल्या कॉलेजात जावं हे मला मात्र कुणी विचारत नव्हतं अन् धाकापायी मी स्वत: सांगूही शकत नव्हतो.

शेवटी मी आईला म्हणालो, "मला औरंगाबादला कॉलेजला जायचंय". आईनं भाऊंना सांगितलं. दुसर्‍या दिवशी जेवणानंतर भाऊंनी तोच विषय काढला. मला विचारलं. मी 'हो' म्हणालो. दादा गप्प.

"टुकार तर होणार नहीस ना? शहरात टुकारी लई असती. दोन माणसं नावं घेतील असं काहीतरी कर". भाऊ म्हणाले. मी नुसतं ऐकून घेतलं.

दुसर्‍या आठवड्यात दादानं पन्नासची नोट मला गाडीभाड्याला अन कॉलेजात अ‍ॅडमिशन घ्यायला दिली. स्टॅण्डवरून एसटी धरली अन् औरंगाबादला निघालो.

****

शब्दार्थ -

आठवाभर = शेराचा अर्धा भाग, आठ आठव्यांची किंवा चार शेरांची पायली असते.
कडसण = मुखवटा
काशीत = जनावरांच्या मागच्या दोन्ही मांड्यांतला भाग
कुलटेकणी = फक्त फोन्ही टिरी टेकून
खत्यात = खोलीत (भिंतीला सामान ठेवण्यासाठी केलेल्या)
गळहट = मोठी आर्धी
तलखी = घालमेल
पाचट = उसाचा वाळलेला पाला
पारगाचं = प्रहराचं
बरबडा = रानातलं एक रानटी पीक, ज्याचं बी विकलं जाई
भुईट्या = मैदानी
रक्ती = जनावराचं भांड्यात साठवून घेतलेलं रक्त
सागळला = साचला, जमला
सप्पर = छप्पर

********************

पाचट

लेखक - श्री. योगीराज बागूल
प्रकाशक - ग्रंथाली
पृष्ठसंख्या - २०२
किंमत - रुपये २५०

हे पुस्तक मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.
https://kharedi.maayboli.com/shop/Pachat.html

********************

टंकलेखन साहाय्य - साजिरा

********************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकातला भाग वाचून कसंतरीच झालं Sad कसं काढत असतील दिवस हे लोक? कधी होणार आपले डोंगर नेहमीसाठी हिरवे? कधी थांबणार हे पोटासाठी पशुधन कसायला विकणं, कधी थांबणार हे अस्थिपंजर झालेल्या गुराढोरांचं भेगाळलेल्या माळरानावर प्राण सोडण?

पण त्यातूनच परिस्थितीशी दोन हात करत मोठे होऊ पहाणारे अंकूर पाहिले की खरंच कौतुक वाटतं.

बापरे Sad !! कसतरीच झाल वाचुन.
आपण सगळी सुख दाराशी असतानासुध्धा रडत असतो...पण असेही असतात जे परीस्थितिशी झगडून न कुरकुर करता पुढे चालत राहतात.
hats off to them !!
ज्या प्रकारे लेखकाने दहावीच्या परीक्षेची तयारी केली आणि आपण आपल्या मुलांना परीक्षेच्या वेळेस देत असलेलो envoirnment ह्याची तुलना करणे अशक्य आहे....

चिनूक्स, साजिरा तुमचे दोघांचेही खूप आभार, हे पुस्तक आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी.
मागे मी जनार्थ या संस्थेच्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या साखरशाळा बघितल्या होत्या. त्या शाळांमधून केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल वाचला होता, त्यावेळी जाणिव झाली या मुलांना शिक्षण घेणं किती अवघड असतं. अर्धवर्ष शाळेत गेल्यावर, तोडणीसाठी आई-वडीलांबरोबर कारखान्यावर जायचं. त्या काळात शाळा नाहीचं. जर तिथे साखरशाळा असेल तरच पुढचं शिक्षण शक्य. आणि तिथल्या शाळेत शिकून परिक्षा पास झाली तरी पुढच्या वर्षी गावातल्या शाळेत परत त्याच वर्गात बसावं लागायचं. शासनाशी वेळोवेळी जनार्थ आणि इतर साखरशाळा चालवणार्‍या संस्थांच्या चर्चेमधून साखरशाळांमधून घेण्यात येणार्‍या परिक्षांना आता शासनमान्यता मिळाली आणि गावतली शाळा या साखरशाळांच्या निकालाला ग्राह्य धरायला लागली. अन्यथा अवघडच परिस्थिती होती.
आणि अशा परिस्थितीत शिकलेल्या / शिकणार्‍यांचं खरंच कौतूक.

पहिला भाग वाचला नव्हता, तो आता वाचला. खूपच टचिंग.
भाष वेगळी आणि वैशिष्ठ्यपूर्ण. Happy

शाळेला सुटी लागल्यावर मळ्या-खळ्यांत जाणं व्हायचं. 'पाचट' शब्दावरून त्याशी जोडले गेलेले अनेक प्रसंग आठवले.

मन नको म्हणत असत अशी पुस्तक वाचायला ... समाजाला विसरुन पुढची कार (3 BHK, Row House, जमिन .... काहीही किंवा सगळ ठेवा कार च्या जागी) कुठली घ्यायची ह्याची चिंता करणारे आपण गुन्हेगार आहोत ह्याची जाणीव होते. काय करता येईल? प्रत्येकाला अशा १० तरी शेतमजुरांना अन्नाला लावता येईल का? मला अस वाटत आपल्या उच्च जीवनशैलीत थोडा साधेपणा आणून त्या पैशांनी खेड्याकडे जमिनी घेण आणि त्या विकसित (म्हणजे सिमे'न्ट घालून नाही, शेणखत घालून) केल्या तर?
चार मजूर कुटुंब मार्गी लागतील.

उसतोडणी कामगार Sad माझा जिव्हाळ्याचा विषय. वडिल साखर कारखान्यात होते. त्यामुळे या लोकांच्या दु:खाशी खूप जवळुन परिचय आहे.
हे पुस्तक नक्की वाचणार. साजिरा आणि चिनुक्स धन्यवाद.

चिनूक्सा, शतशः धन्यवाद.. तू इथे अश्या अनेकविध पुस्तक-माणसांची ओळख करुन देत असतोस.. हे पुस्तक विश-लिस्टमध्ये नक्की..

मन नको म्हणत असत अशी पुस्तक वाचायला ... समाजाला विसरुन पुढची कार (3 BHK, Row House, जमिन .... काहीही किंवा सगळ ठेवा कार च्या जागी) कुठली घ्यायची ह्याची चिंता करणारे आपण गुन्हेगार आहोत ह्याची जाणीव होते. काय करता येईल? प्रत्येकाला अशा १० तरी शेतमजुरांना अन्नाला लावता येईल का? मला अस वाटत आपल्या उच्च जीवनशैलीत थोडा साधेपणा आणून त्या पैशांनी खेड्याकडे जमिनी घेण आणि त्या विकसित (म्हणजे सिमे'न्ट घालून नाही, शेणखत घालून) केल्या तर?
चार मजूर कुटुंब मार्गी लागतील. >>>>>>>.अनुमोदन. Sad

खरंच कसंतरी वाटलं ह्या लोकांच्या गरिबीचं, दारिद्र्याचं वर्णन वाचून. त्यातूनही चिकाटीने मार्ग काढून शिकणार्‍या लेखकाला सलाम.
पुस्तकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स.

भयानक आहे हे. खरेच ते रक्त आणून जेवणाचे वर्णन वाचवत नाही. अशातून शिकणार्‍या लेखकाचे खरच विशेष आहे.

धन्यवाद चिनूक्स या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल.

ह्म्म खरंच खूप वाईट वाटलं नुसतं वाचूनसुद्धा. चिनूक्सचे आभार हे जग जवळून दाखविल्याबद्दल. आपल्याला सगळ्या सुखसोयी मिळतात तरी आपल्याकडे काडीचं समाधान नसतं आणि ही लोकं कशी उन्हातान्हातून हिंडत पोटाला मिळेल ते खात दिवस काढतात त्यांनाच माहित.

बघुया या भारतवारीत हे पुस्तक मिळालं तर घेतेच विकत.

श्या! रक्ती शिजवून खाण्याचा प्रसंग अंगावर आला. Sad आणि आपण शहरी लोक किती साध्या सध्या गोष्टींबद्दल तक्रारी करत असतो... Sad

लले, मला ते सगळं वाचून होईस्तोवर गरगरायला लागलं होतं डोळ्यासमोर येऊन. 'उचल्या' मधेही थोड्याफार फरकाने असंच आहे. दोष कुणाचा? निसर्गाच्या कोपाचा आणि थोडाबहुत त्याकाळच्या समाजव्यवस्थेचा.

चिनूक्स धन्यवाद.
लेखकाचे खूप कौतुक वाटले इतक्या कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन मग स्वतःचे अनुभव लोकांपर्यंत पोहचवल्याबद्दल.
खर तर पुस्तकातले नुसते वर्णन वाचतांना आपल्याला इतके गलबलून येते, जे यातून गेले असतील, ज्यांनी हे जवळून पाहीले असेल त्यांची काय अवस्था होत असेल.

सुन्न !
अरे चिन्मय, हे नुसते उतारे वाचून सुन्न व्हायला झालंय तर पुस्तक वाचून काय होईल !
'बारोमास' ह्या पुस्तकाची आठवण झाली.

काय भोगल या समाजाने ? आजही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात खैरलांजी इथे २००६ साली अख्ख कुटुंब किरकोळ कारणावरुन गारद केल्याची घटना घडली. सांगा कुठे आहे सामाजीक न्याय ?