विहिर

Submitted by टवणे सर on 17 March, 2010 - 09:03

उद्याच्या शुक्रवारी (१९ मार्च) विहिर हा उमेश कुलकर्णीचा (वळु चित्रपटाचा दिग्दर्शक) सती भावे-गिरिश कुलकर्णींच्या कथा/पटकथेवरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मी जानेवारीमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बघितला होता. त्याच दिवशी हे टिपण लिहिले होते पण इतके दिवस इथे डकवायचे राहून गेले. आता चित्रपट प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने आज इथे पोस्ट करत आहे.

------------------------------------------------------------------------------

कठोपनिषद:

बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यम:
किंस्विद् यमस्य कर्तव्यं यन्मयाऽऽद्य करिष्यति
-- कधी मी सर्वोत्कृष्ट, तरी कधी सामान्य असतो. माझ्या असण्यातून काय साध्य होत आहे?

येयं प्रेते विचिकित्सा मनुष्ये
अस्तीत्येके नायमस्तिती चैके
एतद् विद्यामनुशिष्टस्त्वयाऽऽहं
वराणामेष वरस्तृतीय:
-- माणूस मेल्यावर काही लोक म्हणतात की तो मेला नाहिये तर अस्तित्वातच आहे आणि काही म्हणतात की सगळे संपले. हे यमा, तिसरा वर म्हणुन तू मला हा माणसाला पडलेला जो गहन प्रश्न आहे त्याचे उत्तर दे.
---------------------------------------------------------------------------------

आपण असतो म्हणजे काय? आणि का असतो? असेच का असतो? का जगतो? माणुस मेल्यावर काय होते? तो असतो की नसतो? असला तर कुठे असतो? नसेल तर मग असण्याला अर्थ काय? कठोपनिषदात नचिकेताने यमाला हे प्रश्न विचारुन भंडावून सोडले. प्रत्येकालाच कधी ना कधी पडणारा हा एक खराखुरा वैश्विक प्रश्न आहे जो भाषा, संस्कृती, शि़क्षण ह्यांच्या पलिकडे जाउन प्रत्येकाच्या मनात वावरत असतो. कुणामध्ये ह्या प्रश्नाची तीव्रता जास्त तर कुणात ती अगदीच किरकोळ, कुणास हा प्रश्न अगदी लहान वयातच लख्खपणे दिसतो तर कुणी हा प्रश्न मरेपर्यंत विचारात बांधूच शकत नाहीत (मग शब्दात तर दूरच), कुणी आत्म्याला चिरंतन मानून देवाचे अस्तित्व नाकारतात तर कुणी चिरंतन आत्म्याला अद्वैताच्या आधाराने विश्वाशी एकरुप करतात.
जन्मण्यामागचे कारण, जगत राहण्याचा उद्देश आणि मरणाचे गूढ ह्यावर आदीम मानवापासून आजचे आघाडीचे उत्क्रांतीशास्त्रज्ञ विचार करत आहेत, करत राहतील. अनेक महान साहित्यकृतींनी ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा वा प्रश्नांच्या प्रवासाचा पाठपुरावा केलेला आहे. विहिर हा चित्रपट ज्यांना अर्पण केलेला आहे त्या जी. ए. कुलकर्णींनी आणि आरती प्रभुंनीसुद्धा आपापल्या मार्गाने अनेक कथांमधून/कवितांमधून ह्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न केला. पण दृक-श्राव्य माध्यमातून ह्या विषयाला थेट हात घालण्याचे प्रयत्न विरळेच झालेले आहेत. उमेश विनायक कुलकर्णी ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाने ह्या विषयाला पूर्णपणे प्रामाणिक राहून विहिर ह्या चित्रपटाची निर्मिती केलेली ही फार कौतुकास्पद (आणि खरे तर अवघड) गोष्ट आहे.

नचिकेत आणि समीर ही दोन मावस भावंडे पत्रांमधून एकमेकांशी बोलताना चित्रपट सुरु होतो. ह्या नचिकेत आणि समीरचे नाते फारच सुंदरपणे निर्माण झाले आहे. अनेकांच्या बालपणात एक असा मोठा दादा असतो ज्याच्याकडे आपण तो जणु सर्वकाही असल्यासारखे पाहत असतो. समीरचा हा नचिकेतदादा अगदी पुर्णपणे उतरला आहे. पहिल्या थोड्या प्रसंगातून संपूर्ण पार्श्वभूमी (समीरचे कनिष्ट-मध्यमवर्गीय घर, नचिकेतची ब्राह्मणी गरिबी, एक मावशी अजून लग्न रहिलेली असणे वगैरे वगैरे) ठळकपणे उभी राहते. सगळ्यात धाकट्या मावशीच्या लग्नाला सुट्टीत सगळी भावंडे एकत्र येतात. समीर साधारण आठवी-नववीतला तर नचिकेत नुकतीच बोर्डाची परिक्षा दिलेला. आजोबांनी शेतात नुकतीच बांधलेली विहिर, तिथे पोहायला गेले असताना नचिकेतला जगण्याबद्दल, जगाबद्दल, नातेवाईक, त्यांचे परस्पर संबंध, त्यामागची कारणे अश्या आणि इतर अनेक विविध गोष्टींच्या पुढे प्रश्नचिन्हे दिसत असतात ते पुढे येते. त्याचवेळी समीरला मात्र अपेक्षित असणारा, सुट्टीत आपल्याशी खेळणारा नचिकेतदादा काय बोलतोय, असा का वागतोय ते कळेनासे होते. नचिकेत आणि समीर मधले संवाद ह्यातून इथे नचिकेतचा शोध, त्याला पडणारे प्रश्न, त्याचे समीरवर उमटणारे पडसाद आणि ह्या सगळ्याची इतर कुटुंबीयांबरोबर सांगड असे विविध पदर घेत चित्रपट मध्यांतरापर्यंत पोचतो. मध्यंतरात ह्या न समजण्याच्या ताणाने समीर आणि नचिकेतात छोटेसे भांडण होते. माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे उमेशच्या सिनेमात तो आपल्याला एका मुख्य रस्त्यावरुन पुढे नेतो. पण तसे जाताना अधे-मधे ज्या गल्ल्या, रस्ते लागतात त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता, त्या आड रस्त्यांवर थोडेसे पुढे डोकावून, चाहूल घेउन मग पुढे नेतो.

मध्यंतरानंतर हा चित्रपट नचिकेताचे प्रश्नांच्या मागाने समीरचा प्रवासाच्या मार्गाने जातो. इथून पुढचे मात्र मला शब्दात मांडणे कठिण. ते बघण्यातच खरा अनुभव आहे. तसेच काही लिहिल्यास हा चित्रपट बघण्यार्‍यांना उगाचच सगळी कथा आधीच सांगितल्यासारखे होईल.

चित्रपटातल्या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. पण समीरचे काम मदन देवधर ह्या गुणी कलाकाराने अचाटच केले आहे. उमेशच्या गिरणी ह्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त लघुचित्रपटातला गिरणीशेट म्हणजेच हा मदन. नुकत्याच आलेल्या एक कप च्या ह्या सुमित्रा भावे-सुनिल सुखथनकर ह्यांच्या चित्रपटातसुद्धा त्याचे चांगले काम केले आहे. नच्यादादाबद्दल असलेले ते आकर्षण, त्या वयात तोच एक आदर्श असणे, नच्यादादा मात्र सापडत नाहिये – तो जे वागतोय ते झेपत नाहिये हे थोडंफार कळणं आणि दुसर्या अंकात जो प्रवासाचा वेग समीरने पकडलाय ते अप्रतिम आहे.

समीरची विहिरीतली पहिली उडी ही केवळ अचाट. जो कोणी विहिरीत पोहायला शिकलाय त्याला माहिती आहे की उडी ही पाण्यावर आदळताना येणार्या अनुभवाचे एक साधन आहे. ते खाली येणे, त्यासाठी मनाचा हिय्या करणे हे सगळे पाण्यावर आदळायचा जो अनुभव आहे त्यासाठी आहे. मुख्य गोष्ट आहे ती म्हणजे ते विहिरीवर आदळने. तो इसेन्स जसाच्या तसा त्या दृश्यात उतरला आहे. असेच अजून एक प्रभावी दृश्य म्हणजे नाक दाबून जेव्हा समीर जलतरण तलावात बुडण्याच्या अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो ते. पाण्यातून दिसणारे ते त्याचे हालणारे (रिफ्रॅक्टेड) शरीर, त्याच्या हातांची होणारी आणि पाण्याबाहेरून अजून जास्त वेडीवाकडी भासणारी हालचाल सगळे काही सांगून जाते.

सुधिर पलसाणेने – सिनेमॅटोग्राफरने - कमालच केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील हा भाग अगदी जिवंत उभा केला आहे त्याने. आणि कुठेही उगाचच केलेल्या चमत्कृती नाहियेत. एक दीर्घकथा उलगडत वाचावी त्याप्रमाणे त्याने हा चित्रपट आपल्यासमोर उघडलाय. संपूर्ण चित्रपटभर कॅमेरा प्रवासाला निघाल्यासारखा फिरतो. शेवटी शेवटी तर जो वेग येतो तो अगदी मस्त पकडलाय.

चित्रपटाच्या कलाटणीच्या प्रसंगात कुठेही अति-नाट्यमयता न आणल्यामुळे ती घटना केवळ एक घटना होते. चित्रपटाचा संदर्भबिंदू (सेंटर) होत नाही. त्यामुळेच जवळच्या व्यक्तिचा मृत्यु, त्याचा बसलेला धक्का, त्यामुळे कोलमडलेले भावविश्व आणि त्यातून सुरु झालेला प्रवास एव्हड्याच पुरता हा चित्रपट मर्यादित राहत नाही, मानसशास्त्रावरची डॉक्युमेन्ट्री होत नाही. तसा तो होवू शकला असता. समीर, सिनेमाचा नायक – मध्यवर्ती विचार (फोकस)– व्हायचा धोका होता. पण चित्रपटाची मध्यवर्ती भुमिका (फोकस) ही ते प्रश्न, त्यातून निर्माण झालेला प्रवास हीच राहिली आहे. आणि माझ्या मते हा खरा मास्टरस्ट्रोक आहे.

बाकी सगळ्या कलाकारांनी अतिशय नैसर्गिकपणे, साधा अभिनय केलाय. ज्योती सुभाष, डॉ. आगाशे, गिरिश कुलकर्णी आणि इतर छोट्या कलाकारांनी आपापल्या भुमिका चपखल निभावल्या आहेत. नचिकेतच्या आईने दारुड्या नवरा असलेली, घर चालवणारी पण मनातून पार पिचलेली बाई सुरेखच उभी केली आहे. लपंडाव, पत्ते, कानगोष्टी ह्या खेळातून सगळेच मस्त उभे राहिलेत. अश्विनी गिरी तर मस्तच. मी ह्या अभिनेत्रीच्या प्रेमातच पडलेलो आहे. वळुमध्ये हिची छोटीशी भुमिका होती. पण ’एक कप च्या’ आणि आता ’विहिर’ ह्या दोन चित्रपटात मात्र तिने अफलातून काम केलेले आहे. एका प्रसंगात ती साडी नीट करता करता फोनवर बोलत असते तो म्हणजे नैसर्गिक अभिनयाचा सुंदर नमुना आहे.

काफ्काचा के, दस्तोयव्हस्कीचा रास्कालनिकॉव्ह, कुठल्यातरी एका प्रखर क्षणी बंदिस्त झालेला बळवंतमास्तर, निराशेच्या टोकाला पोचलेला चांगदेव – कित्येक उदाहरणे आहेत जिथे मृत्यु आणि जगण्याच्या उद्दिष्टांच्या वा त्यांच्या गाभ्याच्या शोधात होणारा प्रवास हा रुढार्थाने अपयश-निराशा आणि दुर्दैवाच्या मार्गावर जाउन पोचतो. अगदी असे वाटावे की असा प्रवास हा निराशेतच संपणे हे स्वाभाविकच आहे. दुसर्या टोकाला ज्ञानेश्वर, विवेकानंदांपासून घरबार सोडून जाणार्या संन्याश्यांपर्यंत सर्वजण एका अतिशय व्यक्तिसापेक्ष (आणि म्हणुन शास्त्रीय व तार्कीक कसोट्यांवर पडताळून न पाहता येण्याजोग्या) पण कदाचित काल्पनिक (सेल्फ-डिसिव्ह्ड) सुखाच्या मागे लागून सर्वच सोडून देतात. हा चित्रपट मात्र पॉझिटिव्ह नोटवर येतो. माझ्या मते सती भावे आणि गिरिश कुलकर्णींच्या पटकथेचे हे सगळ्यात मोठे यश आहे.

चित्रपटाची लांबी काही जणांना अधिक वाटेल तर काहींना तो संथ वाटेल. मला काही प्रसंगात त्या प्रसंगांतील भावनांची घनता/गंभिरता काही कलाकरांना पेलत नाहिये की काय असे वाटले. पण ही सर्व चर्चा चित्रपट बघितल्यावर सगळेजण करतीलच. माझ्या परीने मी मूळ कथेबद्दल वा प्रसंगांबद्दल कमीत-कमी लिहायचा प्रयत्न करीत मला काय वाटले ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे परिक्षण नक्कीच नाहिये आणि हा विषय मला जवळचा असल्याने मी पार्श्यालिटी अंपायर झालो असण्याची शक्यता आहे.

तर चू.भू.दे.घे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलाचे भूत??? Uhoh अरेरे!

तुमच्या मनात घर करून राहिलेली अनेक माणसे असतील- असा विचार करून बघा.
जास्त कीस पाडण्यासारखे नाही. त्यातली गंमत जाते.

असो. अप्रतिम सुंदर सिनेमा. जितका पडद्यावर दिसायला सुंदर, तितकाच मनाचाही ठाव घेणारा. उत्तरार्धात सम्याचा नच्यादादाचा शोध, आणि त्याचे विश्व अतिशय अंतर्मुख करणारे. संवाद फक्त गरजेपुरते. त्यानेच कितीतरी गांभीर्य साकारते आणि आपणही त्या दृष्याचाच भाग होऊन जातो!

पूर्वार्धातले संवाद चटपटीत आहेत खूपच Happy नर्म विनोद म्हणतात- तसे.

सुंदर कलाकृती. एकदाच काय, अनेकदा बघितली, तरी प्रत्येक वेळी एक नवीन अनुभव देऊन जाईल, अशी.

(मात्र ज्यांना सीरीयस कल्पना/ सिनेमा झेपत नाहीत, असे लोक चित्रपटगृहात ह्या सिनेमाच्या गांभीर्यात समरस होऊ शकत नाहीत. उलट ते कंटाळतात आणि अनावश्यक कमेन्ट्स करून इतरांचाही रसभंग करतात :()

***स्पॉयलर***

गणपतीचे विसर्जन आणि मृत्यू ह्यांची घातलेली सांगड, नंतर रिकाम्या महिरपीचे लायटिंग आणि जोरात निघालेली मिरवणूक, काहीही झालं (प्रत्यक्ष नातवाचा मृत्यू) तरीही मुलीला उजवण्याची असहायता, जलतरण तलावात सम्याचे जीव घुसमटेपर्यंत पाण्यात डुंबणे आणि नच्यादादाच्या मरणाची अनुभूति मिळवण्याचा प्रयत्न करणे, सगळ्यांचंच सुरळित झालेलं जीवन आणि सर्वात शेवटी चुकलेलं कोकरू आणि विहीरीतच भेटलेला नच्यादादा!! त्यातला सम्याला पडलेलं घरातले सगळेच लपाछपी खेळत आहेत आणि नच्याला शोधत आहेत, आणि त्याला हाकारे देत आहेत तो सीन तर त्यातल्या कोलाहलासकट अंगावर येतो! बापरे! एकसे एक दृष्य आहेत. साजिरा म्हटला तसं, चित्रपट शोषून घ्यायलाच बराच वेळ जावा लागेल!

अक्षरशः! पूनमच्या पोस्टीतल्या शब्दाशब्दाला अनुमोदन!
विहीर! अंतर्मुख होऊन एक खोल श्वास घ्यायला लावणारी कलाकृती. प्रत्येक वेळी जे जे वाटतं ते शब्दातूनच व्यक्त करावं असं नसतं. एका ठराविक लयीनं, काही समान सूत्रानं बांधलेली चित्र डोळ्यापुढून सरकली तरी त्याच्याशी 'रिलेट' करु देण्याचं स्वातंत्र्य प्रेक्षकाला देणार्‍या काही मोजक्याच चित्रपटांपैकी एक. एखादी कल्पना, वास्तव केवळ दिग्दर्शकाला /लेखकाला वाटते म्हणून ती ठासून प्रेक्षकाच्या मनावर बिंबवणं वेगळं आणि ती गोष्ट केवळ समोर मांडून 'यातलं काय हवं ते घ्या' असा भाव प्रकट होणं त्याहून उच्च! विहीर हा चित्रपट म्हणजे एखादी कविता.. एखाद्या वाचकाला त्यातलं शब्दमाधुर्य आवडेल, एखाद्याला त्यातली लय, त्यातली विशिष्ट ओळच कुणाची तरी दाद घेऊन जाईल तर कुणाला त्यामागची फिलॉसॉफीही आकळून येईल. हे स्वातंत्र्य कवीकडून आपोआपच वाचकाला बहाल केलं जातं. कदाचित कवीला ही कविता स्फुरण्याचं कारण , प्रेरणा निराळीही असेल, त्या कल्पनांमागचा दृष्टीकोन वाचकाच्या वैचारिक पातळीशी संधान बांधेलच असं नाही. आणि म्हणूनच जे जे हवं ते ते उचलण्याचा आनंद देणारी ही कविता कवी आणि वाचक दोघांनाही आपापल्या पातळीवरच्या आनंदाची अनुभूती देऊन जाते.
'विहीर' मधल्या प्रत्येक कलाकाराचं काम इतकं सुरेख साकारलं आहे की प्रेक्षक त्याचा हात धरुन कधी तळाशी पोहोचतो आणि अपेक्षित असलेला गाभा नकळतच हाती गवसतो.. त्यामुळेच कलाकारांच्या (यात अभिनेते, दिग्द. लेखक , टेक्नि. टीम सगळेच) नामांकित वलयापलीकडे जाऊन एक उत्कृष्ट कलाकृती नाटकाचा पडदा सरकून रंगमंचाचं दृष्य स्पष्ट होत जावं तशी अलगद साकारते! या सर्वांचचं अत्यंत मनापासून अभिनंदन!
टण्या, विशेषतः तुला धन्यवाद. तू जर इतकी सुंदर प्रस्तावना केली नसतीस, तर चित्रपट बघतानाही 'रिडींग बीटवीन द लाईन्स' इतकं सुस्पष्ट झालं नसतं. धन्स रे!
पूनमच्या पोस्टीत लिहीलेल्या सीन्स मध्ये एक अजून, गळणार्‍या छतातून वारंवार भरलेले भांडे रिकामे करण्याचा सीन. पुन्हा पुन्हा भांडे रिकामे होणे म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन. विचारमंथनाची प्रोसेस, इतक्या सहजपणे खचितच मांडता आली असेल! असे अजून बरेच सीन आहेत .. हॅटस ऑफ टू टीम विहीर!

पूनम, आशू.. Happy

लहाणपणी लपाछपी खेळत असू, तेव्हाची आठवण आली. भिडूंना शोधत फिरताना प्रत्येक लपण्याच्या ठिकाणी शोधत असलेल्या सवंगड्याचा चेहेरा दिसे. आहे, इथेच आहे म्हणता म्हणता लक्षात यायचं- इथे तर तो नाहीच. पण तो इथे नाहीये, हे कळतानाच 'कुठेतरी आहे खासच!' ही मनाशीची खुणगाठ आणखीच पक्की व्हायची!

अल्लड, कुमारवयातला समीर आणि युवावस्थेच्या उंबरठ्यावरला नचिकेत यांच्या भावविश्वाचा आरसपानी तळ दाखवणारी ही विहिर. आयुष्याला पाने तीनच- आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स.. अशा नर्मविनोदी पत्रसंभाषणातून आपल्यासमोर उलगडायला सुरुवात झालेले या दोघांमधले मैत्र; नचिकेताला जेव्हा 'आपण आपल्या मनाप्रमाणे, आवडते तसे वागलो, तर इतरांना वाईट का वाटावे?', 'वार्‍याचा आवाज ऐकलास कधी? नीट ऐक.. घुगरांच्या बोलांनी बोलतो की नाही?' 'या सार्‍यांतून मी निघूनच गेलो, पळून गेलो, तर काय होईल?' असे- लौकिकार्थाने वेडसर म्हणता येतील- असे प्रश्न पडतात, आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधात, मागात तो अस्वस्थ होतो तेव्हा समीर, त्याचे भावविश्व आणि नचिकेताशी असलेले त्याचे जगावेगळे मैत्र या सार्‍यालाच ठेच लागते. तशी ती आपल्यालाही लागतेच, पण नचिकेताच्या शोधाला निघालेल्या समीरच्या रस्त्यातले हे पहिले पाऊल- हे आपल्याला जेव्हा कळते तेव्हा कथालेखक दिग्दर्शकाला साष्टांग घालावासा वाटतो.

***स्पॉयलर***
त्यानंतर पुन्हा आजोळी आलेल्या समीरला कळते, की नचिकेताने जगावेगळाच डाव सुरू केला आहे, लपाछपीचा. कुणालाच सापडत नाहीये, त्याअर्थी शोधायची जबाबदारी आपलीच आहे! हे सार्‍यांचं रडणं-भेकणं म्हणजे काही खरं नाही. आपण तर मुळीच रडता कामा नये. त्याला शोधायलाच हवा.

मग पुन्हा तोच खेळ- लपाछपीचा. कुठे लपला असेल, ते धुंडाळण्याच्या जागा आता बदलतात, इतकेच. आधी धान्याच्या कणग्या, माजघर, वाड्याच्या तुळया-खांब, सोपे-कवाडे-झुले ह्या होत्या; त्या आता मैलोनमैलाची माळराने, शेते, वारा, तळे, अन दोघांच्या मैत्राची सर्वात मोठी साक्षीदार असलेली विहीर. नाट्यपदं ऐकताना घरदार, व्यवहार आणि शारिरीक जाणीवा ओलांडून एका तरल पातळीवर जाणारा दारूडा भावशामामा बघताना नचिकेताला कोणता रस्ता, कोणतं जग खुणवत होतं त्याचा थोडासा अंदाज समीरला येऊ लागतो. मग पुढल्या प्रवासात भेटलेला एक अडाणी धनगर समीरला 'कालजाच्या डोल्यांनी बगायचं पोरा. मग लख्ख दिसतंय बग सारं!' अशी अफाट दृष्टी देऊन जातो आणि समीरला आपला शोध पूर्ण होणार अशी आशा वाटू लागते.

समीरचा हा शोध आत्मानुभूतीच्या एका प्रचंड, प्रखर क्षणी संपतो. आणि या प्रखरतेमुळे दीपलेल्या डोळ्यांनी आपण या दृष्टीचा, शोधाचा अंदाज घेत, चाचपत आपण उठतो..

********

जवळजवळ अर्धा काळ संवादरहित असलेल्या या सिनेम्यावर संथतेचा शिक्का बसण्याची शक्यता आहे. तसा मीही तो मध्यंतरापर्यंत मारून टाकला होताच. पण नंतर मात्र विषय, त्याचा आवाका लक्षात आला आणि ही संथता मनोमन जस्टिफाय करून टाकली.

समीरचे काम अफाट झाले आहे. इतक्या अवघड आणि नाजूक विषयात या पोराने दाखवलेल्या प्रगल्भतेचे कौतूक करायला हवे. हेच मुख्य पात्र आहे असे आधी कुणी सांगितल्याने मध्यंतरापर्यंत तर मी या समीर नावाच्या पात्रापुढे प्रश्नचिन्हच टाकून ठेवले होते.

नचिकेताचे पात्र मात्र समर्थपणे उभे झालेले नाही, असे वाटते. मध्यंतरापर्यंतच तो आहे, त्यामुळे तसे वाटले का, हे मला सांगता येणार नाही. पण मध्यंतरानंतरच्या समीरच्या शोधाचा प्रवास बघता, नचिकेत आणखी अचाट दाखवायला हवा होता, असं वाटून गेलं. मुर्तामूर्ततेचा किचकट शोध असला तरीही सारी पात्रे वास्तव दिसली पाहिजेत, असं उमेशला वाटल्यामुळे तसं असेल का? तेही सांगता येणार नाही.

हा शोध, प्रवास पुढे नेताना उमेश मुख्य रस्त्यावरून थोडे आत नेऊन मधले गल्लीबोळ फिरवून आणतो - असे जे टण्याचा मित्र म्हटला आहे, ते खरोखर पटले. ही कथा पुढे जाताना वापरलेल्या छोट्या घटना-पात्रा-प्रसंगांचा वापर अतिशय कल्पक आहे. विशेषतः जीवनमृत्युतली अत्यंत अस्पष्टशी असलेली सीमारेषा दाखवण्यासाठी वापरलेले- गणपती विसर्जन, लोकल ट्रेनमधली त्या गुंडाची दांडगाई आणि तेवढ्या दोन क्षणांत समीरने घेतलेली अनुभूती, विहीरीत पाण्यात बुडून त्याने रोखलेला श्वास, कापलेल्या धान्याच्या गंजीत लपलेली छोटी मुलगी- हे प्रसंग.. वाह!

बाकी, वरती टण्याने लिहिलेले इतके नितांतसुंदर आहे, की त्यापुढे लिहायची गरज वाटू नये. 'पॉझिटिव्ह नोट' बद्दल टण्याला अनुमोदन. कमीत कमी त्यासाठी तरी सार्‍यांनी बघाच. Happy

कालचे सकाळमधले परीक्षण वाचून मात्र जरा निराशाच झाली.

पूनम्,आशु,साज्या सगळ्यांचेच परिक्षण सुरेख...

या चित्रपटाबद्दल काही लिहिलेले वाचण्यापेक्षा स्वतः पाहुन अनुभवण्याचा हा चित्रपट आहे.. कारण तेव्हाच त्यातली खोली,अथांगता जाणवते .. आणि एक सुंदर अशी कलाकृती अनुभवल्याचे समाधान मिळते.. वरवर साधे वाट्णारे कथानक आपल्याला विचारांच्या एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाते आणि अंतर्मुख व्हायला लावते . यातले काही काही प्रसंग तर अक्षरशः अंगावर येतात.चित्रपटातले शेवटचे प्रसंग कळस गाठतात.

पण पूनम म्हणते तसे हा `मास' चित्रपट नाहीये.. या चित्रपटात अनेक सौंदर्यस्थळे आहेत.. पण त्यांना अनुभवायला तशी वैचारिक नजर हवी..ती नसेल तर हा चित्रपट बोअर होण्याची शक्यता आहे.. शेवटचा तासभर तर चित्रपट बर्‍याच जणांना झेपत नाही.. त्यामुळे आपली आवड जोखुनच हा चित्रपट पहावा अन्यथा भ्रमनिरास होऊ शकतो..

टण्याचे परिक्षण उत्तम Happy
आशुडी, पूनम आणि साजिर्‍याचे समिक्षण वाचून विहिर बद्दलची उत्सुकता आणि अपेक्षा वाढली आहे...

आपण असतो म्हणजे काय? आणि का असतो? असेच का असतो? का जगतो? माणुस मेल्यावर काय होते? तो असतो की नसतो? असला तर कुठे असतो? नसेल तर मग असण्याला अर्थ काय? कठोपनिषदात नचिकेताने यमाला हे प्रश्न विचारुन भंडावून सोडले. प्रत्येकालाच कधी ना कधी पडणारा हा एक खराखुरा वैश्विक प्रश्न आहे जो भाषा, संस्कृती, शि़क्षण ह्यांच्या पलिकडे जाउन प्रत्येकाच्या मनात वावरत असतो. कुणामध्ये ह्या प्रश्नाची तीव्रता जास्त तर कुणात ती अगदीच किरकोळ, कुणास हा प्रश्न अगदी लहान वयातच लख्खपणे दिसतो तर कुणी हा प्रश्न मरेपर्यंत विचारात बांधूच शकत नाहीत (मग शब्दात तर दूरच), कुणी आत्म्याला चिरंतन मानून देवाचे अस्तित्व नाकारतात तर कुणी चिरंतन आत्म्याला अद्वैताच्या आधाराने विश्वाशी एकरुप करतात. >>> मयुरेश ज्या व्यक्तीला हा उतारा समजला त्यानेच विहिर अनुभवावा... Happy

पुढल्या प्रवासात भेटलेला एक अडाणी धनगर समीरला 'कालजाच्या डोल्यांनी बगायचं पोरा. मग लख्ख दिसतंय बग सारं!' अशी अफाट दृष्टी देऊन जातो आणि समीरला आपला शोध पूर्ण होणार अशी आशा वाटू लागते.

आता लख्ख दिसलं बघा.... Happy मला ही ओळ बघितल्याचे आठवत नाही... म्हणूनच कळला नव्हता शिनेमा....

धनगर का बोलू शकत नाही? अ‍ॅट्रासिटी लावू का तुला? Proud

धनगर शेकडो मेंढ्यांतनं त्याचं एखादं विशिष्ठ कोकरू कसं शोधतो? स्टॅटिस्टिक्स? ऑपरेशन्स रिसर्च? सीपीएम पर्ट? लॉजिस्टिक्स? प्रोजेक्ट मॅनेजमेंट? परम्युटेशन्स्-काँबिनेशन्स? कशानं?

अख्खा वाद घालून झाल्यावर मागे एकदा हुडाने 'तो शिन्मा म्या पाह्यलाच नाय' असलं रॉकेट सोडलं होतं. तू त्याचाच भाऊ दिसतोस. आधी सिनेमा बघ. मग बोलू. Happy

मी हा चित्रपट पाहीला, माझ्या फेसबुकावर त्याचे छोटेसे परिक्षण आणि review पण लिहीला, आणि मग इथे आले आणी टण्ण्याची पोस्ट वाचली.
टण्ण्या अप्रतिम लिहीले आहेस परिक्षण.

मला चित्रपटाचे मर्म, metaphor, सर्वांचा अभिनय, गावातील वाडा आणि ते वातावरण, अप्रतिम कॅमेरा (ह्या चित्रपटातील सर्वात जमेची बाजु) हे सर्व आवडले.

" माणुस आपल्यात असुन देखिल आपल्यात नसु शकतो आणि आपल्यात नसुन देखिल आपल्यात असु शकतो." म्हणजे शरिराने जरी आपल्यात असला तरिही मनाने आत्म्याने तेव्हा तो आपल्यापासुन खुप दूर असु शकतो आणि शरीरानी जरी आपल्यात नसला तरीही तो आत्म्याने आपल्यात असु शकतो.
हे झाले चित्रपटाचे मर्म.

मेंढपाळ जेव्हा समिर ला सांगतो कि हरवलेले वासरु सापडते त्यासाठी त्याला खुप आतुन हृदयातुन साद घालावी लागते. समिर तेच करतो, त्याच्या नचादादाला खुप आतुन साद घालतो आणि नचादादा त्याला भेटतो. आता भेटतो म्हणजे त्याला तसा भास होतो.पण त्या भासातुनच त्याला खरेखुरे भेटल्याची अनुभुती मिळते. शेवटी सगळे मानण्यावरच तर असते ना, आस्तित्व आहे कि नाही ते. आपल्याला जे दिसते तेव्हडेच सत्य नसते तर त्यापलिकडेही सत्य असु शकते.

पण.... तरिही मला तो उत्तरार्धात (नचिकेतच्या मरणानंतर) थोडासा slow झाल्यासारखा वाटला. लांबी जास्त वाटली. लांबी थोडी कमी केली असती तर हा चित्रपट अजुन प्रभावी झाला असता.
म्हणजे तुम्ही बर्‍याच लोकांनी लिहील्याप्रमाणे अनेक शॉट्स हे symbolic आहेत, जसे गणपतीची मिरवणुक, किंवा छपरातुन गळणारे पाणी. पण खुप कमी प्रकाश आणि repitition करुन वापरलेले symbolic शॉट्स जरा जास्तच वाटले. छपरातून गळणारे पाणी हा शॉट कितीही symbolic असला तरीही किती वेळा आणि किती वेळ तो screen वर दाखवायचा?

का अशा पद्धतीने शुटींग किंवा slow घेतले तरच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बक्षिस मिळते?
हि techniques , 70-80 च्या दशकात जे खुप समांतर चित्रपट निघाले होते त्यांत खुप वापरली गेली आहेत. आताच्या दशकात थोडे जरा वेगळ्या पद्धतीने technique वापरले तर काय हरकत आहे?

असे केल्याने चित्रपट जास्तीत जास्त लोकांना समजेल, appeal होईल आणि तो फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील जाण्याकरिता बनविलेला एक चित्रपट असे लेबल त्याला लागणार नाही.

इतकी छान परीक्षणे केली आहेत तुम्ही सर्वांनी! आता त्यात मी काय भर घालू? Happy

पण हे सर्व कौतुक मदनपर्यंत आणि मदनच्या आई- बाबापर्यंत नक्की पोचवेन! मदनला तो अगदी चिटकुलासा होता तेव्हापासून बघत आहे. आता हाच का तो पोर असा अचंबा वाटतो! Happy

इतके दिवस हा बीबी मी जाणीवपूर्वक वाचला नव्हता.

आताच आम्ही हा चित्रपट पाहून आलो आणि घरात आल्यावर बाकी काहिही न करता इथलं सगळे वाचू काढले. टण्या खुपच छान आणि सर्वकष परीक्षण लिहीले आहेस.

> विहीर हा चित्रपट म्हणजे एखादी कविता.. एखाद्या वाचकाला त्यातलं शब्दमाधुर्य आवडेल, एखाद्याला त्यातली लय,
> त्यातली विशिष्ट ओळच कुणाची तरी दाद घेऊन जाईल तर कुणाला त्यामागची फिलॉसॉफीही आकळून येईल. हे स्वातंत्र्य > कवीकडून आपोआपच वाचकाला बहाल केलं जातं. कदाचित कवीला ही कविता स्फुरण्याचं कारण , प्रेरणा निराळीही
> असेल, त्या कल्पनांमागचा दृष्टीकोन वाचकाच्या वैचारिक पातळीशी संधान बांधेलच असं नाही. आणि म्हणूनच जे जे हवं > ते ते उचलण्याचा आनंद देणारी ही कविता कवी आणि वाचक दोघांनाही आपापल्या पातळीवरच्या आनंदाची अनुभूती
> देऊन जाते.

आशूडी तुझ्या प्रत्येक शब्दाशी सहमत.

टण्या छान लिहिले आहेस.

आजच आम्हि पाहिला. यमाला प्रश्न विचारणार्या न. प्रमाणेच समीर (=वारा) पण आवडला. साजिरा, नचिकेतच्या वागण्यामुळे समिरला जरी प्रश्न पडु लागले असतात तरी नचिकेतचे सर्व व्यवहार सुरळीत सुरु असतात (इतरांबरोबर खेळणे वगैरे) - आणि तेच योग्य वाटले. नात्यांमधील तणाव वगैरे मात्र गल्ल्या-बोळी न वाटता मुख्य प्रश्नांइतकेच महत्वाचे वाटले. ७०-८० टक्के सिनेमा झाला असतांना याचे क्लोजर सर्वांना रुचेल अश्या पद्धतीने करणे अशक्य आहे असे वाटत होते. पण साधण्याजोगे होते तितके छान साधले आहे.

काळजाने पहा म्हणणे सोपे आहे - जमणे कठीण.

थोडा कमी असलेला वेग कथानकाकरीता योग्यच वाटला.

आमच्याबरोबर जय देखिल होता (वय १५) त्यालाही आवडला. त्याने त्याची मते शब्दात उतरविली तर इथे टाकीनच.

Pages