ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.
त्यावर आपल्या स्पर्शाचा ठिपका उमटवणं अगदी गरजेच होऊन बसतं.
हे खूप पूर्वीपासून.

मग कधीतरी एका सुट्टीतल्या उन्हाळी वर्कशॉपमधे त्या कागदावर काळ्या शाईत निबचं टोकं बुडवून अक्षराचा देखणा फराटा मारायला पालवकाकांनी शिकवलं होतं.
त्यांच्याकडे खूप रंगाच्या शाया होत्या.
मला दाट काळीच फक्त आवडली.
मावशी लिहायची काळ्या शाईनी. टपोर्‍या अक्षरात. मग ते पेपरमधे छापून यायचं. त्या छापून आलेल्या काळ्या अक्षरांवर सुद्धा मी बोटं फ़िरवायचे.

चायनिज काळी शाई दाटसर. प्रवाहीपणा कमी असलेली. त्याचा ठिपका छान उमटायचा पण त्या ठिपक्याची रेघ व्हायची नाही.
निबवर पाण्याचा ठिपका घे. किंवा ब्रश वापर पाण्यात बुडवून. आणि मग अक्षर रेखाटलं जाईल.
अनेकदा अनेकांनी सांगूनही मी शाईत पाणी मिसळायला नाकारायचे आणि ठिपक्याची रेघ होत नाही म्हणून नाराज व्हायचे.

ठिपका चालायला लागला की त्याची रेषा बनते. पुढे एकदा कोलटकरांनी त्यांच्या भिजक्या वहीतून वाचून दाखवलं.

माझा प्रवास ठिपक्यापासून सुरु झाला खरा पण तो पुरा नाही झाला.
अपूर्ण प्रवासाची सुरुवात मीच केली. तो पुरा न झाल्याची जबाबदारीही माझीच आता.
जितके ठिपके कागदावर उमटले तितकाच प्रवास.
डोक्यावरच्या अपुर्‍या अवकाशाचा आणि तुटक वेळांचा तो एक हिस्सा.

मग कुठलीही एक वेळ. कोणत्याही अवकाशातली. काहीच फरक नाही.
समोरच्या आवडत्या फ़िक्कट पिवळसर काहीशा खडबडीत कागदावर मन एकाग्र.

कागदच अवकाश.
त्या अवकाशावर दाट काळ्या शाईचा एक ठिपका.
रेष व्हायचं नाकारणारा.
शाईत पाणी मिसळायचं नाकारणारा माझा हात.
ठिपका चालणार कसा?
रेष अपूर्णच.
तरी नीबमधून दुसरा ठिपका, मग तिसरा, चौथा....

ब्रश कधीच सुटलाय. उन्हाळी वर्कशॉप सुद्धा संपलय.
शाईचीही गरज नाही.

मी स्वत्:च ब्रश आणि नीब. आणि काळी शाई.

एकटं. एकाग्र मन.
आजूबाजूला काय चाललय? माहीत नाही.

मग कधीतरी समोरच्या घड्याळाची थांबलेली टिकटिक. म्युझीक सिस्टीम पॉजवर.
बाहेरच्या झाडावरचा कावळा आणि खिडकीच्या दारावर बसलेली चिमणी शांत.
सोफ्यावरचं मांजर निष्प्राण झोपल्यासारखं.
कुंडीतल्या झाडाची पानं आणि सिलिंग फॅनची पाती सुद्धा संथ.
ह्या कुठल्यातरी वेगळ्याच शहरातल्या सातशे स्क्वेअरफ़ीट फ़्लॅटमधे काळ गोठून राहिलाय.
मग तुम्हाला जाग येते.

कागदावरची नजर हलते तेव्हां तिथे अजून एक ठिपका उमटलेला.
तो पाहून तुम्ही आनंदून जाता.

आनंद, दु:ख, एकटेपणा, सोबत, परदेश, देश, उत्साह दमणूक कशावरही मात करुन तुम्हाला ठिपका उमटवता येतो ह्याचा आनंद सर्वात जास्त.
त्याची रेष बनणार नसते तरी.
ठिपक्याचा प्रवास अपूर्णच रहाणार तरी .

म्युझीक सिस्टीमवर गाणं सुरु होतं मगाशी जिथे थांबलं होतं तिथूनच. अंगना फ़ुल खिलेंगे...
तुम्हीही रशिदखान सोबत गाता आओगे जब तुम साजना... अंगना फ़ुल खिलेंगे..

कोणी ऐकणारं नसतं.
तरी.
स्वत्:चा आवाज ऐकून झालेला विलक्षण आनंद..
आरशात स्वत्:ला पहाताना स्वत्:च्याच रुपाचा वाटलेला अभिमान..
आणि कागदावरच्या ठिपक्याकडे पाहून दाटलेला आनंद...
नार्सिसिस्ट तुम्ही.
आनंद त्याच एकाच प्रकारचा. स्वत्:ला खुश करणारा.

ते खुश होणं गरजेच असणारा.
तुमचा स्वत्:चा असा खास आनंद.
आवडत्या कागदावर बोटं फिरवताना मनावर उमटलेले ते रोमांच तुम्हाला परत परत आठवत रहातात.

अपूर्ण रेषेच्या प्रवासाला लिहिणं म्हणायचं असतं? कदाचित...

तुम्ही म्हणता.

Tulips in Twilight..... ....

विषय: 
प्रकार: 

काय काय अधोरेखित करायच ग???? पहिल्याच परिच्छेदातल एक वाक्य उचललं होतं मी, मग लगेच वाटलं ,
अंह ! त्यापेक्षा आत्ता हे वाचत्ये ते उचलु या सगळंच परत लिहाव लागेल बहुतेक मला..... ......... सुपर्ब

अपूर्ण रेषेच्या प्रवासाला लिहिणं म्हणायचं असतं? कदाचित.. >>>>>व्वा वा..

छानच लिहिले आहेस ट्युलिप.. वाक्यन वाक्य सुंदरच!!!!

एखाद्या सुंदर कवितेसारखं लिहीतेस ट्यु. संपूच नयेसं वाटतं आणि संपलं की पुन्हा वाचू वाटतं.

वा वा.. आज अगदी मेजवानीच.
मस्त लिहिलंय. कसं सुचतं कोण जाणे !
- सुरुचि