संगणक आणि मी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

मी काहि आय टी वाला नाही. प्रोग्रॅमिंग माझा विषयही नाही. हौस म्हणून मी अनेक प्रोग्रॅमिंग लॅग्वेजेस
शिकलो असलो, तरी त्यात मी करियर केले नाही. पण तरिहि, त्या पासून अलिप्त राहू शकलो नाहीच.
तूमच्यापैकी बरेचसे जण या क्षेत्रातले व्यावसायिक आहात, याची कल्पना आहेच, तरिही हे लिहायचा
आगाऊपणा करतोय.

मला वाटते संगणकाचा पहिल्यांदा उल्लेख मी ऐकला, तो शाळेय जीवनात. आमचे परिक्षेचे पेपर आता
संगणक तपासणार, अशी भिती आम्हाला घातली जायची. ती भिती बागुलबुवा म्हणून आमच्यावर
वापरण्यात आली.
साधारण माझ्या वयाचे जे लोक आहेत ( on the wrong side of 40s ) त्यांची आणि भारतातील संगणकाच्या प्रगतीची वाटचाल, साधारण बरोबरच झाली. या निमित्ताने संगणकाच्या आणि साधारणपणे आपण ज्याला Office equipments म्हणतो, त्याच्या या आठवणी.

कुठेतरी वाचल्याप्रमाणे १९८१ च्या सुमारास डेस्क्टॉप कम्प्यूटर्स आले. पण आमच्या पाठ्यपुस्तकात त्याची चाहूल लागल्याचा उल्लेख होताच. आम्हाला शेजवलकरांचे एक पुस्तक ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षी होते.त्यामधे व्होल्टासमधल्या कम्प्यूटर्स चा उल्लेख होता. माझे वडील तिथेच असल्याने, मला तो बघायची संधी मिळाली. त्यावेळचे संगणक म्हणजे एक वेगळेच प्रकरण असायचे. त्या रुममधे जायच्या आधी चप्पल बूट काढावे लागायचे. त्याचे दृष्यरुप जरा घाबरवणारेच होते. मोठमोठी स्टिलची कपाटे ठेवल्यासरखी दिसायची. आत मोठ्या थाळ्याएवढया टेप्स गरगरत असायच्या. कोपऱ्यात एखादा अगडबंब प्रिंटर खडखडत असायच्या. हिरव्या वा निळ्या पट्ट्या असणार्‍या फ़ॅनफ़ोल्ड स्टेशनरीवर काहीतरी रिपोर्ट्स निघत असायचे.
त्या काळातले, व्होल्टासमधले सिनियर अकाउटंट्स त्याची टिंगलच करायचे. त्याला कारणही तसेच होते. त्यातून निघालेला ट्रायल बॅलन्स कधी टॅलीच व्हायचा नाही, आणि त्या लोकाना त्यासाठी रात्री जागवाव्या लागत. त्यांच्या मते, त्यांची जुनी पद्धतच जास्त विश्वासार्ह होती.

व्होल्टासमधे गेल्यावर, तिथल्या वेगवेगळ्या कॅलक्युलेटर्सशी खेळणे, हे एक आकर्षण असायचे. पण ते सगळे असायचे टेबल कॅलक्युलेटर्स. खिश्यात ठेवण्याजोगे कॅलक्युलेटर्स अजून बाजारात यायचे होते.

पुढे मी आर्टिकलशिप करायला लागल्यावर तर ते रोजचेच काम झाले. हाताने चालवायचा फ़ॅसिट कंपनीचा
एक मॅन्य़ुअल कॅलक्युलेटर्स मला खूप आवडायचा. हवी ती संख्या बटनांद्वारे नोंदवली, आणि एक हॅंडल आपल्या दिशेने ओढले कि ती कागदावर प्रिंट व्हायची. अश्या संख्याची बेरीज करता येत असे. वजाबाकी करण्यासाठी वजा चिन्ह दाबायचे. एखादि संख्या परत परत मिळवायची असल्यास, ती रिटेन करता येत असे. सबटोटल्सचे एक बटन होते आणि फ़ायनल टोटलचे दुसरे. (पण यात फ़क्त बेरिज आणि वजाबाकी करायचीच सोय होती. भागाकार आणि गुणाकार मात्र करता येत नसे ) मोठमोठ्या लेजर्सच्या अश्या बेरजा करुन, आम्ही ते रोल्स जपून ठेवायचो. त्यावर देखील आमचे खेळ चालायचे. एखादी संख्या दाबली कि काही बार्स वर यायचे आणि ते प्रिंटींग रिबीनीवर आपटायचे. ते आपटताना, जर बोटानी खाली दाबले तर वेगळीच संख्या प्रिंट व्हायची आणि बेरजेत मात्र वेगळीच संख्या यायची. तसेच प्रिंट होताना मधेच एखादा कागदाचा तूकडा घातला, तर एखादी संख्या प्रिंटच व्हायची नाही. आणि ती जादू म्हणून आम्ही एकमेकाना दाखवायचो.

भागाकार व गुणाकार करण्यासाठी, एक वेगळे मॉडेल असायचे. याला एक फ़िरवण्याजोगे हॅंडल असायचे. ते विरुद्ध दिशेने फ़िरवले कि ती संख्या एकदा अधिक व्हायची आणि आपल्या दिशेने फ़िरवले कि वजा व्हायची याला दोन काऊंटर्स असायचे. एक ते हॅंडल किती वेळा फ़िरवले ते दाखवायचे तर दुसरे त्याचे उत्तर. एकदा नोंदवलेल्या संख्येत आणखी शून्य मिळवायची (म्हणजे त्याला दहाने गुणायची ) वेगळी सोय होती. असे करत करत गुणाकार व भागाकार करायचे. या बाबतीत मोठ्या संख्येचा गुणाकार करताना. कमीत कमी वेळा हॅंडल कसे फ़िरवता येईल, यासाठी आम्ही डोके लढवत असू. म्हणजे एखाद्या संखेला ८९२ या संखेने गुणायचे असेल, तर ती संख्या एकम स्थानी दोन वेळा, दशम स्थानी नऊ वेळा आणि शतम स्थानी आठ वेळा फ़िरवावी लागे. म्हणजे एकंदर एकोणीस वेळा ती फ़िरवावी लागे. याचा शॉर्टकट म्हणून आम्ही ती शतम स्थानी नऊ वेळा आणि एकम स्थानी ९ वेळा उलटी फ़िरवून, एक फ़ेरी वाचवत असू. त्याहून डोकेबाज लोक, सहस्त्रम स्थानी एकदा सुलट, शतम स्थानी एकदा उलट, आणि एकम स्थानी आठ वेळा उलट फ़िरवून, आणखी फ़ेऱ्या वाचवायचे. भागाकार करताना याच्या उलट. जर भाग जात नसेल आणि उरलेली संख्या वजा असेल तर एक छोटिशी बेल वाजायची. दशांश चिन्ह हाताने सरकवून घ्यावे लागे. पण याला प्रिंट करायची सोय नसायची.

मग पुढे वीजेवर चालणारी मॉडेल्स आली. केलट्रॉन कंपनीचे एक मॉडेल असायचे. त्याला चमकणाऱ्या
अंकांचा डिसप्ले असायचा. पण त्याला की इन करताना आणि ती संख्या प्रिंट होताना अनुक्रमे क्लक
क्लक आणि कर कट असे मजेशीर आवाज यायचे. अनेक रकमांची बेरीज करताना, जर वीज गेली
किंवा वायर सटकली, तर सगळी मेहनत पाण्यात जायची. पुढे हातावर मावणारे, जास्त करुन
कॅसिओ कंपनीचे कॅलक्युलेटर्स बाजारात आले. पहिल्यांदा ते तसे महागच होते. पण आम्हाला
परिक्षेमधे ते वापरायची मुभा होती (म्हणून मी गणितात कच्चा तो कच्चाच राहिलो )
( कुणाला असे एक जूने मॉडेल अजून कार्यरत असलेले बघायचे असेल तर फ़ोर्ट मधल्या खादी ग्रामोद्योगच्या कॅशियरकडे बघायला मिळेल. त्यांचे कॅश रजिष्टर असेच आहे. )

ऒफ़िसमधला टाईपराईटर हा आमच्या कुतुहलाचा विषय. गोदरेजचे टाईपराईटर खूप लोकप्रिय होते. आम्हाला अनेक रिपोर्ट्स तयार करावे लागत. पण त्यात बर्‍याच संख्या असल्याने, शॉर्टहॅंडचा फ़ायदा आम्हाला मिळत नसे. (तो फ़ायदा फ़क्त बॉसला, लेटर्स डिक्टेट करण्यासाठी !! ) आम्हाला ते सुवाच्य अक्षरात आधी लिहून काढावे लागत. आणि टाईपिष्टच्या बाजूला बसून टाईप करून घ्यावे लागत. त्या टाईप करताना अर्थातच चुका व्हायच्या. त्या दुरुस्त करण्यासाठी एक गोल चकतीसारखे खास खोडरबर असायचे. ते दोऱ्याने टाईपरायटरलाच बांधलेले असायचे. त्याने प्रत्येक कॉपीवर वेगवेगळी खोडाखोड करावी लागे. पुढे पुढे व्हाईट आऊट बाजारात आले.

टाईपरायटर वर आडवी रेघ मारण्यासाठी अंडरस्कोअर चा वापर करता येत असे, पण उभी रेघ मारण्यासाठी, त्या विशिष्ठ जागी पेन टेकवून, रोलर फ़िरवावा लागे. नपेक्षा कागदच आडवा टाकून, अंडरस्कोअर चा वापर करावा लागत असे.
पण एकावेळी टाईपराईटरवर किती कॉपी काढायच्या यावर बंधनं असायची. चार ते पाचच्या वर कॉपीज काढणे शक्य नसायचे. त्यापेक्षा जास्त कॉपीज हव्या असतील तर खास स्टेन्सिल कटींग करावे लागे. (आमच्या शाळेच्या परिक्षेचे पेपर्स असेच स्टेन्सिल केलेले असत ) त्यावर वरती खास मजबून पेपर. मधे एक कार्बन आणि खाली साधा पेपर असे. हे सर्व वरती खास पट्टीला जोडलेले असे, व हि पट्टिच स्टेन्सिल प्रिंटरला अडकवायची असे.
यावर अतिशय काळजीपूर्वक टाईप करावे लागे. पण त्यातही चुका झाल्याच तर एकदा कट केलेला स्टेन्सिल परत जोडण्यासाठी, एक खास गुलाबी रंगाचे नेल पॉलिशसारखे दिसणारे सोल्युशन असायचे.
टाईपरायटर्सची आठवण आजही ठेवावीच लागेल कारण आपल्या समोरच्या की बोर्डवरची अक्षरे आजही त्याच क्रमाने आहेत. टाईपरायटर च्या किज नवख्या माणसाने दाबायचा प्रयत्न केल्यास त्या फ़ार जड जायच्या, पण त्या काळच्या नाजूक दिसणार्‍या मुली लिलया टाईप करत असत. (एका मिनिटात किती शब्द अचूक टाईप, करता येतात, त्यावर त्यांचे कौशल्य जोखले जायचे ) जूना टाईपरायटर असला, तर त्याच्या कीज काहीवेळा अडकून बसायच्या. त्या हाताने सोडवाव्या लागत. ओळ संपली एक बेल वाजत असे आणि मग एक खास हॅंडल ओढून परत ओळीच्या सुरवातीला यावे लागे.

त्यावेळी एका टाईपरायटरमधे एकच फ़ॉन्ट असायचा. पुढे गोदरेजच्याच एका टाईपरायटरमधे वर येणार्‍या
किज च्या जागी, एक छोटा चेंडू असायचा. तोच रिबिनिवर आपटायचा. हा चेंडू बदलून, फ़ॉन्ट बदलायची
सोय होती. पुढे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक टाईपरायटर्स पण आले. त्याना थोडीफ़ार मेमरी पण असायची.
पण जुन्या मॉडेल्सवरती देखील, अत्यंत सुवाच्य असे टाइपिंग करणारे लोक मी बघितले आहेत. त्यापैकी
एक जण तर चक्क, टाईपरायटरवर उत्तम चित्र काढत असे.

(मी हे मुद्दाम सगळे सविस्तर लिहिलेय, कारण या संगणकाने या सर्व गोष्टी इतिहासजमा करुन टाकल्या
आहेत )

या काळात अचानकपणे आम्हाला प्रोग्रॅमिंग शिकायची संधी मिळाली. आम्हाला बी. कॉमच्या शेवटच्या वर्षी
हा विषयच होता. संगणकांची प्राथमिक माहिती, आणि दोन भाषा आम्हाला होत्या. कोबॉल (कॉमन बिझिनेस ओरिएंटेड लॅन्वेज ) आणि फ़ोर्ट्रान (फ़ॊर्म्यूला ट्रान्स्फ़ॊर्मेशन ) या मी घेतल्या होत्या. शिवाय बेसिक (बिगिनर्स ऒल पर्पज स्टॅन्डर्ड इनस्ट्र्क्शन कोड ) हा पण पर्याय होता.
सुरवातीला, संगणकाचे भाग म्हणून इनपुट विभाग, सी पी यू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ) आणि आऊटपुट विभाग शिकावे लागले. त्यातही सी पी यू मधला डेटा विभाग आणि ए एल यू (अरिथमॅटीक आणि लॉजिकल युनिट )
हे विभाग, अर्थातच थिअरीमधे शिकावे लागले. यात पंच्ड कार्ड्स पासून लाईन प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर असे सगळे शिकावे लागले. या सगळ्यांचा आम्हाला सखोल अभ्यास करावा लागला. आणि आज जे घटक, प्राथमिक वाटतात, त्यांच्या वेगाचा आम्हाला त्याकाळी विस्मय वाटायला. त्यावेळी टेप हीच जास्त वापरात होती, पण एक वेगळ्या प्रकारच्या डिस्क्स, रॅंडम अक्सेस मेमरी, म्हणून वापरात आल्या होत्या. (पण सीडीज जन्माला यायच्या होत्या )

दुसर्‍या विभागात या वरील दोन भाषा होत्या. त्या वेळी आम्हाला फ़्लो चार्ट्स शिकवले गेले. अत्यंत शास्त्रशुद्ध रित्या शिकवलेले हे फ़्लो चार्ट्स मला आजही उपयोगी पडतात. (यावावतीत आमच्या प्राध्यापिका रिटा डिसोझा आणि माला स्वामिनाथन, यांची मला आजही आठवण येते. रिटा डिसोझा या नावाशी पुर्ण विसंगत असे त्यांचे रुप होते. खास मराठी साड्या, भले मोठे कुंकू आणि गुडघ्या पर्यंत वेणी, असे रुप होते त्यांचे ) पुढे सी ए च्या अभ्यासक्रमात सिस्टीम अनालिसिस अँड डाटा प्रोसेसिंग याशिवाय ऒपरेशन्स सिसर्च अँड स्टॅट्स्टिकल अनालिसिस, असे दोन विषय होते. पण ते मला सोपे वाटण्याचे सर्व श्रेय, या दोन प्राध्यापिकाना आहे.

आम्हाला प्रत्यक्ष प्रोग्रॅम पण लिहायला सिकवले गेले. दिलेल्या संख्येतून महत्तम संख्या शोधणे. त्यांचा क्रम लावणे, दिलेल्या डेसिमल संख्येचे बायनरी मधे रुपांतर करणे, असे काहि प्रोग्रॅम आम्ही फ़ोर्ट्रान मधे लिहिले. पण ते लिहिताना, प्रत्येक कमांडचा जो सखोल विचार शिकवला गेला, त्याला तोड नव्हती. (मी पुढे अनेक भाषा शिकलो, पण इतके समरसपणे कुणीच शिकवले नाही.) ही भाषा अगदी प्राथमिक होती. पण म्हणूनच सोपीही होती. त्यावेळी आम्हाला मशीन लॅंग्वेजची नुसती तोंड ओळख करुन दिली होती.

पुढे मला हार्डवेअर मधे स्कॊलरशिप मिळाली, व आणखी एका थोर शिक्षिकेकडून शिकण्याची संधी मिळाली. वसुधा पै, असे त्यांचे नाव. संगणकाच्या अंतरंगाची ओळख त्यानी करुन दिली. माझा शालेय शिक्षणानंतर शास्त्र या शाखेशी काहि संबंधच उरला नव्हता. पण तरीहि हा गहन विषय, त्यानी ज्या तर्हेने आम्हाला शिकवला, त्याला तोड नाही.

उदा. धातूच्या वायरचा रेसिस्टन्स हा तिच्या लांबीच्या आणि जाडीच्या समप्रमाणात असतो, हे समजावताना त्यानी इलेक्ट्रॊन्सना बोगद्यातून जाणाऱ्या मुलांची उपमा दिली होती. जर बोगदा कमी लांब असेल आणि अरुंद असेल, तर मुले, पटकन त्यातून निघून जातील, पण तोच जर लांब रुंद असेल, तर इथे लात लाव, तिथे रेंगाळ असे करत तो पार पाडायला वेळ घेतील. इंटरप्ट्सना तापत ठेवलेल्या दूधाची, रिसिव्हर काढून ठेवलेल्या फ़ोनची, अशी रोजच्या व्यवहारातली उदाहरणे देत, त्या प्रत्येक कॉन्सेप्ट सोप्या करायच्या. (पुढे अनेक वर्षे, त्यांचा माझा पत्रव्यवहार होता.)

या काळात मला रेसिस्टन्स, कपॅसिटर, ट्रान्स्फ़ॉर्मर, सर्किट प्रत्यक्ष शिकता आले. ट्रांझिस्टर्स, डायोड, गेट्स हे पण शिकता आले. मशीन लॅंग्वेजची ओळखही झाली. दोन लोकेशनमधला डेटा, इंटरचेंज करणे अशक्य आहे, असे त्यावेळी कळले. (आता हे शक्य आहे का, याची कल्पना नाही )

पुढे प्रत्यक्ष नोकरीला लागल्यावर देखील संगणक आमच्यापासून जरा दूरच असायचा. त्या वेळचे प्रोग्रॅम असायचे डिबेसमधे. त्यांचे रिपोर्ट् पण आम्हाला अगम्य असायचे. कधीमधी मी त्या खात्यात जायचो, पण काम करण्यासाठी नव्हे तर. पॅकमॅन खेळण्यासाठी. त्रिकोणी तोंड आणि आकाराने गोल असलेला तो, फ़टाफ़ट दुसरे गोळे गिळत जायचा. (आजही मोबाईलवरच्या स्नेक मधे तो अवशेष रुपात उरलाय,)

सध्या आपली रेल्वे यशस्वी रित्या राबवत असलेले रिझर्व्हेशन मोड्यूल, सी एम सी या कंपनीत तयार झाले होते. त्या काळात मी पण त्या कंपनीशी संलग्न होतो. पण त्या कामात आमचा सह्भाग नव्हता.

प्रत्यक्ष संगणक वापरायची संधी मिळाली ती परदेशी गेल्यावर. आणि नंतर आम्ही लोटसच्या प्रेमातच पडलो.

ट्रायल बॅलन्स टॅली करणे, चूटकीसरसे होऊ लागले. त्यावर आधारीत फ़ायनल अकाऊंट्स तयार करणे, बाये हाथ का खेल झाला. लोटस १२३ चे आम्ही डाय हार्ड फ़ॅन्स बनलो. (हाच शब्द रुढ होता ) खरे तर आजच्या विंडोज पुढे तो अगदीच प्राथमिक होता. शिवाय त्या काळचे सिंगल कलर मॉनिटर्स (पांढरा, निळा, हिरवा, भगवा असा एखादाच रंग असायचा ) त्याने डोळ्यांवर पण फ़ार ताण यायचा. शिवाय त्यात प्रिंटर च्या काहीच सोयी नव्हत्या. फ़िट टू वन पेज, असा प्रकारच नव्हता. म्हणून आम्हाला प्रिंटरच्या हिशेबातच रिपोर्ट टाईप करावे लागत.

पण तरीही लोटसमधे, खुपच सोयी होत्या. फ़ॊर्म्य़ुला तर होतेच पण त्या मॅक्रोज, विंडोजपेक्षा हाताळायला
सोप्या होत्या.
लोट्समधे फ़ाईलच्या नावावर खुपच बंधने होती. मला वाटते केवळ आठ अक्षरे वापरता यायची. आणि
ती तयार करताना डोकेफ़ोड करावी लागे.
पत्रे तयार करण्यासाठी, वर्डस्टार नावाचा एक प्रोग्रॅम होता. त्यात स्पेल चेक वगैरे असायचे. फ़ाइंड रिप्लेस
पण होते. मी मस्कतमधे असल्याने, अरेबिक रिपोर्ट्स पण तयार होत, आणि त्यासाठी वर्ड्स्टारचा, अरबवर्ल्ड नावाचा अवतार होता. तोच किबोर्ड वापरून अरेबिक टाइपिंग करता येत असे. त्यावेळी आपली बॅकस्पेस की नेमकी उलटी चालताना बघून मजा यायची. (मी मागे ऐसी अक्षरे मेळविन, असा एक लेख इथे लिहिला होता त्यातली एक गंमत परत इथे लिहितो. अरेबिक लिपित, अक्षरे उजवीकडून डावीकडे लिहित असले, तरी संख्या मात्र आपल्याप्रमाणेच लिहिल्या जातात. म्हणजे एक हजार चारशे सत्तावन्न, १४५७, असेच लिहिले जाते, पण हाताने लिहिताना वा टाईप करताना, १ पासून सुरवात न करता, ७ पासून सुरवात करतात.)

करमणूकीसाठी गेम्स वगैरे नव्हते, पण हारवर्ड ग्राफ़िक्स नावाचा एक प्रोग्रॅम असायचा. माऊस नसताना, केवळ अप, डाऊन, राईट, लेफ़्ट कीज वापरत मी त्यावर चित्र काढायचो. लेबनानी मित्रासाठी, खास त्याच्या देशाचा नकाशा आणि त्याना प्रिय असलेले सायप्रसचे झाड, वगैरे काढून दिल्याचे आठवतेय. पण असे काहितरी तिरपगडॆ प्रिंट करताना, प्रिंटरची धांदल उडायची.

काहि प्राथमिक अवस्थेतली अकाउंटीग पॅकेजेस, मी त्या काळात वापरली होती. ती आमच्या सोयीपेक्षा
प्रोग्रॅमर्सच्या सोय़ीने लिहिलेली होती. आम्हाला अत्यावश्यक असणारे, नरेशन त्यात अगदी संक्षिप्त रुपात
असायचे. शिवाय कोडींग (म्हणजे अकाउंटसचे कोड लिहिणे ) हा अत्यंत किचकट प्रकार असायचा. त्यात
अनेकदा चुका व्हायच्या. मोठ्या कंपनीत बहुदा ते खाते वेगळेच असायचे. आणि आमच्यात आणि त्यांच्यात
ताळमेळ राखणॆ कठीण व्हायचे.

माऊस आणि विंडो यांची ओळख एकदमच झाली. गंमत म्हणजे मी विंडोज शिकलो, ते फ़्रेंच मधून. म्हणजे
मला ती भाषा नीटशी न येताना, मी थेट शिकलो. सगळी हेल्प असायची ती फ़्रेंचमधे.

टूल बार फ़्रेंचमधे, ड्रॉप डाउन मेनू फ़्रेंचमधे, पण मला त्यावेळी, आयकॉन्सने खूप मदत केली. पण तरीहि
लोटसची आठवण येत होतीच. लोटसचे एक विंडो व्हर्जन बघितल्याचे आठवतेय. पण तोपर्यंत एक्सेल ने
आमचा कब्जा घेतला होता.

आता एक्सेल आणि वर्ड वरती मी बर्‍यापैकी प्रभुत्व मिळवलेले असले, तरी लोटसच्या मायक्रो ची आठवण
अजूनही येतेच.

टॅली ने मात्र आम्हाला वरदान दिल्यासारखेच झालेय. परदेशातसुद्धा भारतीय कंपन्या तेच वापरतात. त्यात
प्रॉब्लेम्स येत नाहीत असे नाही. (रिराईट करणे नित्याचेच ) तरीपण दिलासा मात्र भरपूर.
नेट आणि ईमेल्स हा तर वेगळ्याच लेखाचा विषय आहे.

विषय: 
प्रकार: 

ओह्हो, बर्‍याच "जिव्हाळ्याच्या" आठवणीन्ना उजाळा मिळतोय या लेखामुळे ! Happy
टेलेक्स नावाचा प्रकार असायचा, व प्रुफ म्हणून त्याची एक भोकाभोकान्ची टेप निघायची, आठवते?
ती परत लावली, तर प्रिण्ट मिळायचा!
वर जे काही लिहीलय, त्या घटना उण्यापुर्‍या वीसेक वर्षातल्या! ऐन्शी ते दोन हजार सालादरम्यान्च्या!
अन आमच्या व आमच्या आधीच्या पिढीला त्याच्या वेगाशी जुळवुन घेताना परिस्थितीसापेक्ष भयन्कर कसरत करावी लागली! तुलनेत नन्तरच्या पिढ्या खरेच नशिबवान!
ज्यान्ना या वेगाशी जुळवुन घेता आले नाही ते बाहेर फेकले गेले.
ज्यान्नी जुळवुन घेतले, ते आमच्यासारखे "नग" अजुनही रडतखडतच, पण सन्गणकाच्या या भासमान वा आभासी दुनियेत वावरताहेत!
हे असे केवळ सन्गणकच नव्हे, तर जवळपास प्रत्येक क्षेत्रात झाले.
मग ती वाहतुक असो, वा फोटोग्राफी वा अजुनकाही.

हायला,

ह्या तर आदिमानवाच्या काळातील गोष्टी वाटत आहेत. Proud

खरच चांगले लिहिलय. Happy
मी संगणक प्रथम पाहिला तो १९९४-९५ साली. आमच्या शाळेत दोन संगणक होते.
अर्थात त्यासाठी वेगळी फी (वार्षिक ४०० रु) होती. त्यावेळ आम्हाला एम एस डॉस शिकवायचे. त्यातले कमांड सिंटॅक्स पाठ करताना फारच वाइट वाटायच.

सुंदर लेख दादा! वाचताना शाळेतले टाईपरायटर डोळ्यासमोर आले. खुप शाळा शिकलेलो असल्याने असे अनेक टाईपरायटर अन टायपिस्ट नजरेसमोर तरळले! Happy

बाकी संगणक अन मी अजुनही एकमेकांना भितोच! हे वाचताना पण झोप येत होती!

कॅसिनो कंपनीचे कॅलक्युलेटर्स >>>>> कॅसिओ असेल! कॅसिनो त गेले कि सगळे गणिते चुकणार मग काय डोंबल कॅलक्युलेट करणार!

दिनेशदा, लेख छानच. पण ह्यातल्या बर्‍याच गोष्टी बघितलेल्यासुद्धा नाहित पर्यायाने माहितही नाहीत.

अतिशय छान लेख. माझाही प्रवास हा असाच झाला आहे. ४-५ पानी कॉपी टाइप करत असे. ती रबरे व व्हाइटआउट. नाहीच तर ब्लेड ने कोरून करेक्षन करणे! मी तर लोट्स डीबेस व वर्डस्टार चा एक सर्टिफिकेट कोर्स पण केला होता. काय येडेपणा ना! ते टायपिस्ट शेजारी बसून काम करून घेणे. २८६- ३८६ करता करता पेंटियम आले तर मला काही तरी आउटर स्पेस मधुन आल्याइतका आनंद झाला होता. मी काम करत असलेल्या एका कंपनीत चक्क मिश्राजी नावाचा टेलेक्स ऑपरेटर होता. पॅक मॅन, स्पेस, डिगर अजुन खेळते मी रिट्रो गेमसाइट वर.
कलर मॉनिटर तर अशक्य वाट्त असे. तेव्हा साधी पत्रे खड्खड टा.रा. वर व बॉसची फक्त इले. टा. रा. त्या टायपिस्ट चा पण रुबाब असे. मी प्रत्येक वाक्याला अगदी अगदी म्हणू शकेन. मी पहिले ब्रोशर कॉपी वर्ड मध्ये लिहिले १९९७ मध्ये तेव्हा मला काय प्रिविलेज्ड वाट्ले होते. कोणी बघत नसताना उगीच डिलीट कर, फॉण्ट बदल ब्याकग्राउन्ड दे असे गुपचुप करून बघितले होते. आता टॅली झिन्दाबाद. साधे नाही इआर्पी. आता मुलगी अजुन भुइत आहे अन म्हणते आय पॅड घेतेस का लॅपटॉप.

जाने कहां गये वो दिन. कहते थे तेरी याद में तुम को न भूल पायेंगे.

छान लिहिलय... आम्ही अगदी हातानं चालवलेले कॅल्कुलेटर नाही वापरले. पण त्यानंतरच्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. ते स्टेनसिल वापरुन पेपर आमच्या शाळेत पण छापत... काही चालू मुलं त्या स्टेनसिलचा कार्बन कचर्‍यातुन शोधुन प्रश्ण फोडायची!!
आम्ही अभियांत्रिकीला येइपर्यंत संगणकाचा एकच उपयोग माहिली होता... तो म्हणजे गेम्स... पॅकमॅन, प्रिंस आणि नंतर वुल्फ!!! आताकाय दिवसातले १६-१८ तास संगणकासमोरच... ऑफिसात काम म्हणुन.. घरी (TV नाही त्यामुळे) मनोरंजन आणि टाइमपास म्हणुन...

अरे वा, मला वाटले मीच काय तो म्हातारा झालो !!

चंपक, चूक सुधारली रे (डॉ मीना प्रभूंचे, रोमराज्य वाचतोय ना, म्हणून कॅसिनो, झाले बहुतेक )

जी एस ने रेझिस्टन्स बद्द्ल पण मला वि पू त लिहिले आहे, पण माझा गोंधळ कायम आहे.

टेलेक्सचा खरा वापर बँकात होत असे. एल सी वगैरे सगळे टेलेक्स वर असे. आणि दुसरा महत्वाचा वापर वृत्तपत्रात. पी टी आय, रॉयटर अश्या संस्थांकडून बातम्या येत असत.

छान लेख ! SADP, OR, Lotus, Wordstar जुन्या जुन्या पण सुखद स्मृती जागृत केल्यात Happy

वर्डस्टारचे प्याकेजसहित सर्व फाईल्स १.२ च्या मोठ्या फ्लॉपीत बसत असे. नुस्त WS आणि WS4
यात नॉऩडॉक्युमेण्ट फाइल फार मस्त उघडता यायची, मी बरेचदा २००२ सालापर्यन्त हे वापरले आहे कारणपरत्वे!
लोटसचेही WK1 आणि WK3 असे दोन प्रकार होते
PW (बहुधा प्रोफेशनल राईटर) असेही एक प्याकेज होते, त्यात फॉरम्याटिन्ग/पेजसेटप वर्डस्टारपेक्षा जास्त चान्गला व्हायचा Happy
वर्डस्टारवर डॉटने कमाण्ड्स देता यायच्या जसे की .op आता विसरलो बहुतेक सगळे!
८० व १३२ (की १२०? ) कॉलम स्टेशनरीच्या रुन्दीचा हिशेब ठेऊनच प्रिण्ट्स घ्यायला लागायचे, फॉरम्याटिनही ते विचारात घेऊनच करावे लागायचे.
टाईपराईटरवर, जर कागदाला घडी घातली नसेल, तर सेन्टर काढणे वैतागाचे असायचे. स्पेसबारने सर्व लेन्थ मोजुन त्याच्या निम्म्यावर टॅब सेट करुन मध्य मिळवायला लागायचा, मग टाईप करायची ओळीतली सर्व अक्षरे मोजुन त्याच्या निम्मे इतके अन्तर ब्याकस्पेसने सेन्टरटॅबपासुन उलटे जायला लागुन मग ओळ टाईप करायची, अस प्रत्येक ओळीला. जेव्हा वर्डस्टारमधे हे सेन्टरीन्ग एका कमाण्डमधे होतय असे कळल्यावर स्वर्ग गाठल्याचा आनन्द झाला होता.
कोष्टक टाईप करताना व ते कागदात बसवताना, मोठ्यात मोठ्या व लहान सन्ख्यान्चा विचार करुन ट्याब सेट करायला लागायच्या, एखाद्या आगाऊ प्राण्याने मधेच सर्व ट्याब काढायची कळ फिरवली तर शिव्या घालण्यावाचून पर्याय नसायचा.
स्टेन्सिलचे बरेच काम केल, टायपिन्ग तर अफाट केल (जरी मला चूकूनही टायपिस्ट व्हायच नव्हत तरी..)
७० ते ७५ दरम्यान फ्यासिट मशिन वडिल घरी कामाकरता आणायचे तेव्हा वापरायचो! Happy
आर्किटेक्चरकडे / ड्राफ्ट्स्मन / मशिन ड्रॉइन्ग करणार्‍यान्कडे समान्तर रेषा आखत जाण्यासाठी पितळी पट्टी असायची जिला खाली रुन्द चाके असायची. हल्ली ओमेगाची प्ल्यास्टिकची पट्टी मिळते तशी, फक्त पन्चवीस रुपयात. ती पितळी पट्टी भारी महाग असायची, मला शेवटपर्यन्त घेता आली नाही.
त्यान्च्याकडेच वॉटरप्रुफ इन्कचे एक विशिष्ट पेन असायचे, ज्यात नोझलमधे एक सुई असायची, वजनामुळे ती नोझलचे तोन्ड बन्द करायची, पण अगदी सरळ उभे धरुन कागदावर टेकवल्यावर सुई आत जाऊन आतुन शाईचा प्रवाह सुरू व्हायचा. हात थबकुन चालायचा नाही नाहीतर ढब्बे पडायचे. ट्रेसिन्गपेपरवर ती शाई चकाकती दिसायची. हे पेन किमतीत भारी असायचे, मी घेतले होते विकत, अजुनही आहे शाई वाळलेल्या अवस्थेत. ती शाई झटपट वाळायची म्हणून वापर झाल्याझाल्या पेन टोपणाने बन्द करायला लागायचे. हल्ली ड्रॉईन्गकरता इतकी प्याकेजेस आलीत की तो बोर्ड, कानाला पेन्सिल अडकवून उभारुन ड्रॉइन्ग काढत असलेला माणूस इतिहासजमा झालेत.

लिंब्या... तशी अनेक पेन्स आहेत आमच्याकडे... डिझायनींगसाठी वापरायचे माझे वडिल...

केवढ्या त्या आठवणी... माझी कॉम्प्युटरची पहिली ओळख prince, CAT आणि Bricks ह्या खेळांमुळे झाली.. दर शनीवारी काकाच्या घरी फक्त कॉम्प्युटरवर खेळायला जायचो.. मग नंतर नववीच्या सुट्टीत dBase Jr 3 ह्या भाषेचा कोर्स केला होता... आणि त्यानंतर शाळेत आम्हाला कॉम्प्युटरचा वेगळा तास होता... तेव्हा लॅबमध्ये फक्त लांबूनच बघायला मिळायचा कॉम्प्युटर... त्यामुळे तुम्ही जे काही लिहीले आहे ते सगळे फक्त पुस्तकात वाचायला मिळाले पण प्रत्यक्ष कधीच नाही.. शाळेत असूनही...
आणि एक नववीतच भूमितीच्या पुस्तकात एक धडा होता Algorithms and Flow Charts नावाचा बहुतेक..

त्या साडेपाच इंचाच्या फ्लोपीज आठवताहेत का, लवचिक असायच्या (आणि चक्क फाटायच्या त्या )
मग साडेतीन इंचाच्या आल्या. त्या दोन्ही फॉर्मॅट कराव्या लागायच्या. मग सिडीज आल्या, आता त्याही इतिहासजमा होतील वाटतं.
वर्डस्टार मधे पेज लेन्थ ची पहिली कमांड द्यावी लागायची. (पी एल.) फारतर प्रिंटरच्या मॉडेलप्रमाणे, फॉन्ट बदलून, मोठ्या कागदावर प्रिंट करता यायचे. (आता लेसर प्रिंटरवर मोठे कागद नाही ना वापरता येत !!! )
मला वाटते, पहिल्यांदा, लोटसचीच ब्लॅक स्लॅश हि मेनू कि, विंडो ने वापरली होती.
टाईपरायटर वर अर्धी काळी आणि अर्धी लाल अशी रिबीन मिळायची, त्यातल्या लाल अक्षरांचे काय कवतिक वाटायचे. पण तो रंग फक्त पहिल्या कॉपीवर. (ती रिबीन संपली कि परत गुंडाळावी लागायची, कधी कधी ती सुटायची देखील )
खुपदा लग्नाच्या अहेराची पाकिटे, ते लोक टाईप करुन द्यायचे.

जुन्या आठवणी Happy
मामी आपल्याकडे (हैद्राबादेत) ८५-८६ मध्ये Apple, niitत शिकवायचे ९० मध्ये तर खुप कॉमन झाले होते. प्रत्येक जण एक तरी कोर्स शिकायचा. Happy

दिनेशदा, खूप पूर्वी टाईप केलेले पोस्टकार्ड ला "नॉन्पेड" म्हणून पोस्टवाले दन्डही वसुल करायचे, कारण काय? तर ते "छापिल" आहे म्हणून, यावर वाचकान्च्या पत्रव्यवहारात झालेली रणधुमाळी पुसटशी आठवते आहे.
साडेपाच इन्चाची फ्लॉपीच म्हणतोय मी, १.२ एमबीची
साडेतीन इन्चाची १.४५ एमबीची पाच/सहा वर्षान्पूर्वीपर्यन्त वापरात होत्या त्या आमच्या इथे! फॉरम्याट करतानाच, विशिष्ट ऑप्शनद्वारे याच डिस्क "सिस्टिम डिस्क" (बुटेबल डिस्क) म्हणून बनवता यायच्या, हल्लीच्या सीडी कशा बनवतात बुटेबल ते माहित नाही!
टाईपरायटरच्या रिबिनलाही रिइन्किन्ग करता यायचे, त्याची बाटली मिळायची असे पुसटसे आठवते.
झक्कीन्ना मात्र साडेपाच इन्चापेक्षा एक मोठी डिस्क वापरायचे ती माहीती आहे.
याशिवाय, टेप वापरणारे मोठे कॉप्युटर आमच्या कम्पनीत होतेच मुम्बैला. धडाकेबाज प्रकार असायचा तो.
हेवी ड्युटी प्रिन्टर्सची वेगळीच तर्‍हा. लाइन प्रिन्टर मधे चक्क अक्षराच्या उन्चवट्याची लोखण्डी / धातुची पट्टी असायची गरागरा फिरत, नन्तर आले ते डॉटम्याट्रिक्स प्रिन्टर! कलर इन्क्जेट ९५ नन्तरचे, व लेसर प्रिन्टर त्याही नन्तरचे, अर्थात सगळ्यान्ना सहज उपलब्ध नसायचे.

ह्या तर आदिमानवाच्या काळातील गोष्टी वाटत आहेत >>>> अगदी खरं!

पॅकमॅन, प्रिंस आणि नंतर वुल्फ!!! >>>>>> सॅम काय आठवणी काढल्यास! खूप खेळलोय हे सगळेच गेम्स!

दिनेश मस्तच लिहीलयेस. मीपण सुरवातीला फोट्रॉन शिकले होते. Happy

फक्त डोळ्यातून अश्रूच काये ते यायचे बाकी ठेवले ...

मामी १०००% अनुमोदन Happy
जाने कहां गये वो दिन ...
==============

College मधला स्टेंसिल प्रिंटर
फैसिट चा टाइप्रायटर
बैंकेतला लेजर बैलंस मशीन (ब्राडमा)
पीसी डॉस, एमएस डॉस, विंडोज ३, ३.११, ९क्ष
DOT Matrix Printers, Line Printers
फ्लॉपी नेच चालणारे डेस्क्टॉप
५ १/४ आणि ३ १/२ फ्लॉपी
कोरल ड्रॉ, पेज मेकर
Flat Bed Scanner यायच्या आधी वापरलेला Hand Scanner

पहिले गेम खेळलो PACMAN, बुद्धिबळ आणि प्रिंस ऑफ पर्शिया, लेजर बैलेंस होत नाही म्हणून घालवलेल्या रात्री, ब्रांच ऑडिट, ऑडिटर बरोबर रात्री पार्ट्या, A0 आकाराचे रिपोर्ट प्रिंट करायला केलेल्या धडपडी, क्लायेंट (बैंक मैनजर) कडून मिळालेली प्रशंसा (आणी चेक पण), स्क्रीन प्रिंटिंग वाल्यांकडे बसून उशीरा पर्यंत प्रूफे तपासणे, पहिल्यांदा Power Point Presentation द्वारे झोनल ऑफिस मधे एलसीडी प्रोजेक्टर वर १२० स्लाइड्स ची रिपोर्ट (त्यानंतर झालेला टाळ्यांचा कडकडाट) ....

==============
गेले ते दिन गेले ... Sad

दिनेशदा,
सगळ्या जून्या आठवणी जाग्या झाल्या. मी पीसी पहिल्यान्दा हाताळला तो थर्ड ईयर ला (i.e. 1987), त्याचं configuration होतं- 286, MS DOS, 2 Mb RAM, 20 Mb Hard Disk ! :D, ते आठवलं की आता गंमत वाटते! हल्लीचे मोबाईल फोन सुद्धा त्यापेक्षा जास्त शक्तिमान आहेत! तरी पण त्या पीसी वर काम करतांना जो Creative आनंद मिळाला तो फार मोठा होता. BASIC, QBASIC, FORTRAN 77, PASCAL इत्यादि Programming, FOXPRO (DBMS), Wordstar हे शिकताना फार उत्साह वाटायचा. Wordstar मधली Clip Art Gallery जेव्हा पहिल्यांदा बघितली, तेव्हा तर भलतीच मज्जा वाटलेली !
कॉलेज लॅब मध्ये 8085/ 8086 Assembly Language Programming Kit होतं, त्यावर छोटे छोटे, Microprocessor साठी चे प्रोग्राम्स रन करुन LEDs ना डान्स करताना बघणे म्हणजे creative joy at its peak!
मग नंतर Windows चा जमाना आला ! MS Windows 3.4 (!) म्हणजे फा ऽ र मोठ्ठी क्रांतीच होती. VGA Monitor वर Windows चा GUI हाताळतांना, MS Office 4.0 ( Word, Excel) शिकताना फार्फार्फार मज्जा यायची! मग Windows ची पुढची versions, Visual Studio (VB, VC ....!!), मग Multimedia (CD Player, mp3, QuickTime Video) चा धिंगाणा, आणि finally, ईन्टरनेट ! सगळा प्रवास कसा उमेदीचा, तारुण्यसुलभ उत्साहाने भरलेला ! सगळं डोळ्यापुढं उभं राहिलं ! आता सध्या मी हाताळत असलेली Telecom Hardware related Applications/ Web Based Apps, Networking, NMS, EMS हे, त्या सगळ्या, पूर्वीच्या (!!!) प्रणालींचीच अभिनव रुपे!!!
या सा-या प्रवासाचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहोत ही भावना केवढी सुखावून जाते ! Happy
आता तर emails, Google, Yahoo & You-Tube शिवाय जीवन, ही कल्पनाच अशक्य वाटते !

इतिहासातील एका अत्यंत गतिमान स्थित्यंतराचं छान रेखाटन !
<<ह्या तर आदिमानवाच्या काळातील गोष्टी वाटत आहेत >> म्हणजे आता साठी-सत्तरी ओलांडलेले आम्ही सर्व अचानक आदिमानव झालो कीं काय !;):डोमा:
संगणकच ज्यांच्या आयुष्यात खूप उशीरा आला,त्याना तीव्र ईच्छा असूनही सतत बदलणार्‍या कार्यप्रणाली आत्मसात करणं कठीणच होतं. त्यामुळे बर्‍याच ज्येष्ठाना आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार संगणकाच्या
निवडक सुविधा शिकून घेऊन त्यावर समाधान मानावं लागलं. पण त्यामुळेही जीवन प्रवाही व अर्थपूर्ण व्हायला अनेकाना अमूल्य मदत झाली आहे.

ज्यावेळी होम कोम्प्यूटर हा प्रकार नव्हता तेव्हा एका कम्पनीने एक छोटा सन्गणक काढला होता. १०० पौन्ड कीमत होती ह्याला मॉनिटर नव्हता तो टीव्ही ला जोडय्चा फ्लोपी नव्ह्तीच साध्या ओडिओ टेप्स वर प्रोग्रम लिहाय्चे RAM फक्त ८ के पण काय गमत यायची