आई

Submitted by abhishruti on 8 March, 2010 - 11:51

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पेपरात आलेल्या यशस्वी स्त्रियांबद्दलच्या बातम्या व लेख वाचता वाचता सहज आईकडे लक्ष गेलं. तिची नेहमीची कामं , रुटीन हालचाली चालू होत्या. मी पेपरात रमले म्हणजे लवकर हालणार नाही हे न सांगता समजून ती माझी कामही हळूहळू करायला लागली. नाहीतर नंतर माझी धावपळ, चीडचीड... हे सगळं टाळण्यासाठी तिचा एक भाबडा प्रयत्न! माझ्या आईला वाद-विवाद, भांडणं, मोठमोठ्या आवाजात रागाने बोलणं या गोष्टीचा मनापासून तिटकारा आहे. आणि वयानुसार ते सहनही होत नसेल. पण एव्हढा विचार करायला सवड कोणाला! आमची रोजची सकाळच मुळी आरोळीने होते.. "आदित्य उठ रे, आदित्य ऊsssठ! चल पटकन दुध टेबलावर ठेवलय्..पटकन ब्रश कर्..(वरती नीट डोळे, नाक धुतलेस का? आहेच).. अभी अरे तू अजुन काय लोळतोयस.. चहा गार झाला बघ.. रोज रोज काय रे? मला एकटीला किती करायला लागतं मग.. परत सारखी प्रत्येक गोष्टीला मागे लागते असं म्हणता. माणसानं वेळेवर न सांगता गोष्टी उरकल्या तर मागे लागायला लागणारच नाही. मला काय हौस आहे का रोज ही टेप लावायची.." एक ना दोन... चालू!
आम्ही लहान असताना आमच्या घरी असं काही घडत नसे. खरंतर एकाच खोलीच छोट घर, त्यात सकाळी साडे आठ पासून मुल शिकवणीला यायची, त्यामुळे त्याच्याआत सगळं आवरायलाच लागायचं. आई भांडी, धुणं, स्वैपाकपाणी, अंघोळी सगळ त्या वेळेत बरोबर उरकायची. आम्हालाही कधीतरी कंटाळा यायचा .. अगदीच नाही असं नाही! पण असं रुटीन कित्येक वर्ष चाललं होतं. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीपासून आईने संसाराचा रथ अक्षरशः एकटीने ओढलाय. कष्ट करुन, पडेल ते काम करुन, कठीण परिस्थितीशी कणखर आणि शांत चित्ताने सामना करणारी माझी माता! कधी कसली नाराजी नाही, कोणाविषयी तक्रार नाही, नशीबाला बोल लावणं नाही, कधी कोणाचा हेवा नाही, दुस्वास नाही. कुठल्याही गोष्टीचा गवगवा नाही. काळजी नाही असं म्हणता येणार नाही. मुलांविषयी काळजी न करणारी आई जगात सापडणच कठीण! पण ती कधी कृतीत, बोलण्यात, किंवा चेहर्‍यावर दिसली नाही.
चांगल्या सुखवस्तू घरात राहूनसुद्धा मुलांना वाढवतोय म्हणजे काय दिव्य करतोय अस भासवणारे, 'आम्ही तुमच्यासाठी किती करतोय' असं नेहमी बोलून दाखवणारे पालक पाहिले की मला माझ्या आईची महानता प्रकर्षाने जाणवू लागते.
काहींच्या मते ती सुगरण नाही, गृहकृत्यदक्ष नाही, हुशार नाही, व्यवहारी तर मुळीच नाही. सुंदरही नसेल ,
dashing नसेल. पण हे सगळे गुण आहेत असा दावा करणार्‍या किती स्त्रीया आपल्या एकटीच्या बळावर कुटुंब पोसू शकतात? दोन मुलांना उच्च शिक्षण देउन त्यांचे संसार उभे करुन देउ शकतात.. आणि ते ही कपाळावर एकही आठी न पाडता, तोंडाने वाच्यता न करता? To be very frank मला समाजाने हुशार, स्मार्ट, outgoing, social, well-educated अशी कितीही बिरुद लावली असली तरी मी सुद्धा हे सगळं इतक्या सहजतेनं करु शकणार नाही. आपण single parenting वगैरे विषयावर नुसती चर्चा करु शकतो,आपली मर्यादा तेव्हढीच!
आपल्याकडे कसं आहे ना ... मग ते राजकारण असो, समाजकारण असो वा दैनंदिन कौटुंबिक जीवन असो -- जो सतत त्या विषयी पराक्रमाची गाथा, अडचणींची/व्यथांची रडगाणी गात राहतो तोच महान समजला जातो. पण माझ्या आईसारखे कितीतरी लोक जगात असतील जे शांत राहुन, न बोलता वाट्टेल त्या परिस्थितीतून वाट काढू शकतात. स्वतःचा मार्ग शोधताना कुठल्याही कुबड्यांची त्यांना गरज पडत नाही. म्हणुनच मला कधीही माझी आई देवदेव करताना दिसली नाही, आणि भविष्य विचारणे, पत्रिका दाखवणे असल्या गोष्टी तिच्या पठडीत बसणार्‍या नव्हत्या. पण कोणी तसं करत असेल तर ते चूक की बरोबर यावर तिने कधी स्वतःचे मतही मांडले नाही. आपली मत, आवड्-निवड तिने कधीही दुसर्‍यावर लादली नाही - अगदी आम्हां मुलांवर सुद्धा! कधी 'स्त्री-मुक्ती' याविषयीही ती बोलली नाही की कधी स्वतःचा उल्लेख 'अबला' किंवा 'बिचारी' असाही तिने केला नाही. घर, संसार, नोकरी सांभाळताना कितीतरी वाईट अनुभव तिला आले आहेत पण त्यामुळे तिच्या स्वभावात कधीही कडवटपणा आला नाही. कटू आठवणी काढून कधी कुरवाळत बसली नाही. तिच मन कायम निर्मळ, निर्व्याज राहिलं. दुसर्‍याने केलेल्या स्तुतीने कधी ती भारावली नाही किंवा निंदेने कधी डळमळली नाही. ती स्वतः अत्यंत समाधानी आहे. हे सर्वांना जमत नाही. लहानपणापासून मी हे पहात आलेय.. तरीही मी एव्हढ्यातेव्हढ्या कारणावरुन नाराज होते, चिडते. कधीकधी माझीच मला लाज वाटते. आईकडुन मला अजुन बरचं काही शिकायच आहे!
आपण पटकन आईला म्हणुन जातो ' आई, तू हे केलं नाहीस.. केलं असतस तर आज..' पण तिने जे केलय ते आपल्याला करता येइल का याचा विचार मनात आला की आपण किती मोठ्ठी चूक करतोय हे जाणवतं. तिनेही चुका केल्या असतीलच, काही निर्णय चुकले असतील पण त्या दाखवून देउन त्या वरुन तिला दोष लावण्याएव्हढे आपण मोठे कधी झालो? पिढ्यांपिढ्यामधे अंतर असतं, बाह्यपरस्थिती, विचारसरणी बदलत जाते. पण तरीसुद्धा कोणीही कितीही कर्तृत्व गाजवलं तरी आईपेक्षा महान होऊ शकत नाही. आमचं जे काही कर्तृत्व आहे, गुण आहेत ते सर्व तिच्यामुळेच आहेत. या सगळ्याचा खरा आधार्स्तंभ तीच आहे.
तसं पहायला गेलं तर माझ्या आईच व्यक्तिमत्व सामान्य, शरिरयष्टी किरकोळ, राहणीमान अत्यंत साधं, स्वभाव संवेदनाशील, अबोल, बुजरा! पण कर्तृत्व असामान्य!! असं कसं? कोड्यात टाकणारा प्रश्न आहे नाही का? शक्ती म्हणजे काही तरी भव्यादिव्य, दृश्य स्वरुपातच असायला हवी असं थोडच आहे?
"वन्दे मातरम !!!"

गुलमोहर: 

श्रुती,
मस्तंच जमलाय लेख, डोळ्यात पाणी आलं वाचून. आईच करू जाणे आपल्या मुलांचं संगोपन ते ही मनापासून... न डगमगता, न हारता... भिडला लेख...
आणि सुरवातीपासून एकदम कॅची झालाय, सुटसुटीत एकदम.. Happy

>>काहींच्या मते ती सुगरण नाही, गृहकृत्यदक्ष नाही, हुशार नाही, व्यवहारी तर मुळीच नाही. सुंदरही नसेल, dashing नसेल. पण हे सगळे गुण आहेत असा दावा करणार्‍या किती स्त्रीया आपल्या एकटीच्या बळावर कुटुंब पोसू शकतात? >> या वाक्याला खूप खूप अनुमोदन....

अजून लिही... पुलेशु!! Happy

खरच " वंदे मातरम !".
सुरुवात तर छानच केलीस . आजच्या पीढीच्या स्त्री चे मन उघडे केलेस.पण "आई" बद्दल लिहिलेस ते खरच आजच्या पीढीने आत्मसात करण्यासारखे आहे. नव्या जुन्या विचारसरणीचा , संस्कारांचा मिलाफ व्हायला हवा. अर्थात मीही जुन्या पीढीचा प्रतिनिधी म्हणून हे बोलतो. पैशाने श्रीमंती येते त्याहीपेक्षा मनाच्या श्रीमंतीला मी जास्त महत्व देतो जी तुझ्या आईकडे आहे.आणि म्हणूनच पुन्हा एकदा "वन्दे मातरम !".

शक्ती म्हणजे काही तरी भव्यादिव्य, दृश्य स्वरुपातच असायला हवी असं थोडच आहे?<<<<<अनुमोदन
आवडलं Happy

श्रुति, अगदि मनाला हात घातलास. कोण ग इतका विचार करतो आईचा.. मिहि बोध घेतला तुझ्या लिखाणातुन.. माझ्याहि तोंडुन गेलय ते बरेचदा आईला.. आई तु हे केल नाहिस... विचार करुन पाणावले डोळे.. खुप दिवसान लिवलस.. लिवत रव गो... छानच लिवतस नेहमी.

>>आई, तू हे केलं नाहीस.. केलं असतस तर आज..'<<< आपल्या आईवडिलांस कधी ना कधी प्रत्येकजण असं बोलुन जातोच.
पण >>>तिने जे केलय ते आपल्याला करता येइल का?<<< याचा विचार करताना कोणीच दिसत नाही.

श्रुती, खुपच छान लिहिलंय. Happy

छान लिहीलयस श्रुती
>>काहींच्या मते ती सुगरण नाही, गृहकृत्यदक्ष नाही, हुशार नाही, व्यवहारी तर मुळीच नाही. सुंदरही नसेल, dashing नसेल. पण हे सगळे गुण आहेत असा दावा करणार्‍या किती स्त्रीया आपल्या एकटीच्या बळावर कुटुंब पोसू शकतात? >> खूप आवडले हे वाक्य.

अभिश्रुती, तुझ्या आईच्या अनुभवाने मला चांगले मार्गदर्शन झाले. आणखी अनुभव शेअर करता आले तर बघ.

श्रुती, खरच सुंदर लिहिलयस. आपल्याच आईकडे असं बघू शकणं सोप्पं असेल... पण ते इतक्या समर्पक शब्दात उतरवू शकणं सोप्पं नाही.
वन्दे मातरम... म्हणून म्हणून किंचित गुळगुळीत झालेल्या ह्या शब्दाला नव्याने झळाळी आल्यासारखं वाटलं.

<<शक्ती म्हणजे काही तरी भव्यादिव्य, दृश्य स्वरुपातच असायला हवी असं थोडच आहे?>>
कबूल.... शक्ती स्वतः कधीच दृश्य स्वरूपात नसते... किंबहुना शक्ती जेव्हा "अवतरते" तेव्हाच ती दृश्य स्वरूपात येते... "दोन मुलांना चांगली माणसं म्हणून जगायला समर्थं करणं, ते सुद्धा एक हाती " हे कितीतरी विजांच्या लखलखाटाइतकं उजळ आहे, समर्थं आहे, सुंदर आहे, मंगल आहे...

काहींच्या मते ती सुगरण नाही, गृहकृत्यदक्ष नाही, हुशार नाही, व्यवहारी तर मुळीच नाही. सुंदरही नसेल ,
dashing नसेल>>>

आईत ह्या सगळ्या गोष्टी असल्यानसल्या तरी काय फरक पडतो? तिचं 'आई' असणं हेच अगदी पुरेसं आहे.

धन्यवाद दोस्तहो! प्रत्येक वेळी लिहायला सुचतच असं नाही आणि मनासारख जमतच असही नाही. माझं लिखाण हे उस्फूर्त असतं म्हणुनच कदाचित माझ्याकडून वारंवार लिखाण होत नाही पण तुमच्या प्रतिक्रियांनी खूप प्रोत्साहन मिळत आणि परत लिहावसं वाटतं.
आईविषयी किती लिहावं तेव्हढ कमीच आहे. माझी आई बर्‍याच वेळा माझी मैत्रीणच असायची. मला वाढायला तिने मोकळी जागा दिली, स्वातंत्र्य दिलं. मला आलेली पत्र देखील मी दिल्याखेरीज ती वाचत नसे. मी कोणाबरोबर मैत्री करावी, करू नये याविषयी तिने कधी आपली मते माझ्यावर लादली नाहीत. मी न सांगता माझ्या मनातील बर्‍याच गोष्टी तिला समजायच्या. पण ती गरज नसेल तर बोलून दाखवायची नाही. कधी निर्णय घ्यायला तिने मदत केली असेल पण माझे निर्णय माझे मीच घ्यायला तिच्यामुळेच शिकले. मी मोठ्ठा मुलगा असल्यासारखी होते आणि तेव्हढीच जबाबदारीने वागत असे. पण मला आई स्वातंत्र्य देते ही गोष्ट मात्र कोणालाच फारशी आवडत नसे. तो काळही तसाच होता. कोणाला दोष देण्याचे प्रयोजन नाही.

mi kaay pratisad devu? tu tar aapale sagale june divas mazhya dolya samor aanles. Dhanyawad. Ya sagalya goshtinchi jaaniv kaayam rahavi hi eshwar charani prarthana.

छान लिहिलं आहेस. आईने वाचला का ग हा लेख? खूपदा काय होतं आपल्या भावना आपण व्यक्त करत नाही आईजवळ ती आपल्याला समजते अशा समजुतीखातर.

संतोष, सुखद धक्क दिलास!
BTW मित्रांनो, संतोष माझा सख्खा (धाकटा) भाऊ जो कधी इथे फिरकला नव्हता.
आर्च, आईला वाचायला दिला. नेहमीप्रमाणे तिचा शांत आवाजात "छान लिहिलयसं" एव्हढाच प्रतिसाद होता. खरयं आपल्या भावना दुसर्‍यापर्यंत पोचवण्यात आपण जरा कमी पडतो.