वेळ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बाळा, आई होता होता
खोप्यातील मी चिऊ झाले
दोरीवरचा मी काऊ झाले
आकाशातील मी घार झाले
झाडीतला मी कोकीळ झाले
पिंजर्‍यातील मी पोपट झाले
बाळा, तुझ्यासाठी मी पक्षिण झाले..

कासवाची मी पाठ झाले
सशाचे मी कान झाले
हरिणीचे मी पाय झाले
बिळातील मी उंदीर झाले
खोक्यातील मी मांजर झाले
बाळा, तुझ्यासाठी मी प्राणी झाले..

मुंगीचा मी रवा झाले
कोळ्याचे मी जाळे झाले
भुंग्याचे मी कमळ झाले
फुलांचे मी फुलपाखरू झाले
बाळा, तुझ्यासाठी मी किटक झाले..

अवसेचा मी चंद्र झाले
चुलीतला मी निखारा झाले
रात्रीचा मी दिवस झाले
तव्यावरची मी पोळी झाले
वाटीतला मी काला झाले
तुझ्या मुलांची मी आजी झाले
नातवंडाची मी पणजी झाले
बाळा, अखेरशेवटी मी वृद्ध झाले

आता वेळ माझी आहे
गात्रंगात्र थकली आहेत
खारुताईचा मला काला दे
पोपटाची मला फोड दे
चिऊताईचा मला भात दे
उंदीराचे मला दात दे
सशाचे मला कान दे
हरिणीचे मला पाय दे
कासवाची मला पाठ दे
घारीची मला दृष्टी दे
कोकीळेचे मला गीत दे
मला तुझे वात्सल्य दे
बाळा, मी तुझी बाळ झाले आहे..

-बी

विषय: 
प्रकार: 

संपूर्ण कविता छानंच आहे; पण शेवट खूप अर्थपूर्ण आहे. म्हातारपणीची भावावस्था अचूक टिपली आहे बी!

किती गोड, भावपूर्ण कविता!

इतक छान कसे लिहु शकता. असेच लिहित रहा. वाचनाचा आनंद आमच्या सारख्यांना मिळुदे.

बी ..
कविता खूपच सुरेख आहे Happy
- संदीप

तू आई बद्दल लिहिलेल्या इतर साहित्याइतकं सुंदर नाही वाटलं पण छान आहे. शेवटच कडवं सुंदर आहे. सुरुवातीच्या काही उपमा ओढुन्-ताणुन लिहिल्या सारख्या वाटल्या.

मला तुझे वात्सल्य दे
बाळा, मी तुझी बाळ झाले आहे..

खुप सुंदर..

साधना

सहसा कवितांच्या वाटेला मी जात नाहि, मला जास्त काहि कळत नाहि.
पण तुमचि हि साधी सुंदर कविता भावली

बी, सुरेख अर्थपूर्ण कविता... !